मेतकुट भात

शेखर's picture
शेखर in पाककृती
22 Feb 2008 - 3:27 pm

मेतकुट भात न आवडणारे फारच कमी लोक भेटतील. मेतकुट भात हा माझा वीक पॉइंट...
मी जरा वेगळ्या प्रकारे करुन खातो.

एका माणसाचा गरम व ताजा भात खोलगट भांड्यात घ्यावा. त्यात ३ ते ४ चमचे मेतकुट व ३ चमचे तुप घालावे. भांडे मंद आचेवर ठेवावे. त्यात अर्धा कप पाणी घालावे. हे सगळे मिश्रण नीट एकत्र करावे. भात गरम व चांगला गुरगुटा होऊन द्यावा. असा गरम गरम भात खाण्यास खुप चांगला लागतो. सोबत ताक असल्यास उत्तम..

शेखर.

पाकक्रियामाहिती

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

22 Feb 2008 - 5:16 pm | विसोबा खेचर

असा गरम गरम भात खाण्यास खुप चांगला लागतो. सोबत ताक असल्यास उत्तम..

खल्लास!

आपला,
(सहमत) तात्या.

स्वाती राजेश's picture

22 Feb 2008 - 5:55 pm | स्वाती राजेश

सोबत भाजलेला उडदाचा पापड आणि कैरीचे लोणचे... मस्तच!!!!!!!!!!!

खरे तर आम्ही त्याला गुरगुटा भात किंवा आटवल म्हणतो.
खूप पाणी घालून चुलीवर/ गॅसवर भात करायचा. शक्यतो वासाचा बारीक तांदुळ वापरायचा.
व्वा काय मस्त चविष्ट आठवण!

सृष्टीलावण्या's picture

25 Feb 2008 - 7:26 pm | सृष्टीलावण्या

सोबत भाजलेला उडदाचा पापड आणि कैरीचे लोणचे... मस्तच!!!!!!!!!!!
 
मानलं बुवा तुमच्या आवडीला, तुम्ही तर अगदी काळजालाच हात घातलात..
 पण मी एकच म्हणेन उडदाच्या पापडापेक्षा पेणचे तिखटजाळ पोह्याचे पापड 
म्हणजे अगदी मर्माघातच. ब्रह्मानंदीच टाळी लागते...

लबाड मुलगा's picture

22 Feb 2008 - 6:03 pm | लबाड मुलगा

एका माणसाचा गरम व ताजा भात खोलगट भांड्यात घ्यावा

माणसाचा भात कसा काय करतात बॉ....:)

पक्या

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Feb 2008 - 11:15 pm | llपुण्याचे पेशवेll

आपला सवाल लई आवडला.

"एका माणसाचा गरम व ताजा भात खोलगट भांड्यात घ्यावा" म्हणजे एका माणसाला पुरेसा. :)

पुण्याचे पेशवे

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Feb 2008 - 11:17 pm | llपुण्याचे पेशवेll

अहो ,
आटवल आणि मेतकूट काय भारी लागते म्हणून सांगू. आणि जर का ते तुम्ही केळीच्या पानावर खाल्लत तर अजूनच मजा येते.
पुण्याचे पेशवे

प्राजु's picture

22 Feb 2008 - 11:21 pm | प्राजु

असा वासाच्या तांदळाचा मऊ भात, त्यावर तूप, मेतकूट किंवा लिंबाचे गोडाचे/तिखट लोणचे...
सोबत भाजलेली सालपापडी...

- प्राजु

चित्रा's picture

23 Feb 2008 - 8:10 am | चित्रा

बारीक तांदळाच्या भातात ताक घालून मेतकूट घालून तुपात जिर्‍याची फोडणी, मिरचीचे तुकडे , मीठ घालून बुडबुडे फुटून आवाज येईपर्यंत गरम करायचे. खमंग लागते.

चित्रा

आवडाबाई's picture

23 Feb 2008 - 10:28 am | आवडाबाई

मेतकुटाची पाकृ कोणी द्याल काय?
माझी आजी, 'मम्मी'ची आई :-) काय छान करायची !! पण आता ती थकली बिचारी आणि तिच्या मुलींना काही 'तसे' जमत नाही बुवा!! कदाचित नातवंडांसाठी करताना जरा जास्तच मन लावून करतात वाटतं ह्या आज्या ! आणि मला वाटतं कोकणातल्या वस्तुंची चवच वेगळी असते.

एनिवे, पण म्हणून काय आम्ही आता मेतकूट करूच नये की काय?
मग सांगताय ना मला पाकृ?

आनंद जोशी's picture

23 Feb 2008 - 1:03 pm | आनंद जोशी

मेतकुट कसे बनवतात?

ॐकार's picture

24 Feb 2008 - 12:16 pm | ॐकार

सोबत टकू असेल तर उत्तम!

इंटरनेटस्नेही's picture

4 May 2010 - 1:39 am | इंटरनेटस्नेही

मेतकुट कसे बनवतात?
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

शुचि's picture

4 May 2010 - 1:48 am | शुचि

आपल्या बाळाला गुरगुट्या मेतकुट भात भरवता येणं यासारखं सुख नाही :)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

रेवती's picture

4 May 2010 - 6:18 am | रेवती

मस्तच!
मेतकूट भात म्हणजे काही बोलायलाच नको!
मी इथे जी कृती देतीये ती माझ्याकडच्या 'स्वयंपाक' या पुस्तकातील आहे. श्रेय लेखिका सौ. सिंधूताई साठे यांना द्यावे.
४ वाट्या हरभरा डाळ, १ वाटी तांदूळ, अर्धी वाटी गहू, अर्धी वाटी उडीद डाळ, २ टेस्पू धने, १ टेस्पू जिरे, ५ ते ६ लवंगा, ८ ते १० साधे वेलदोडे, एक जायफळ, सुंठीची २ कुडी, १ टीस्पू. लाल तिखट, अर्धा टिस्पू हळद, तेवढाच हिंग, १ टिस्पू मोहरी.
फक्त डाळी व तांदूळ बदामी रंगावर खमंग भाजून घ्या. सर्व साहित्य एकत्र करून दळून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
माझा मुलगा लहान असताना मेतकूट मी घरी करत असे. त्याला गुरगुट्या भात मेतकूट घालून फार आवडत असे........आताही आवडतोच! सध्या विकतचे मेतकूट वापरते, ते संपले कि घरीच करीन.

रेवती

प्रभो's picture

4 May 2010 - 6:23 am | प्रभो

च्यायला , घरून आणलेलं मेतकूट संपलय...सध्या वांदे चालू आहेत...

असो, मेतकूट दह्यात कालवून गरम गरम पोळी सोबत खायलाही मजा येते..

सुधीर१३७'s picture

4 May 2010 - 12:12 pm | सुधीर१३७

त्यात चिरलेला कांदा आणि वरून तुपाची फोडणी.......... अहाहा..... तोंडाला पाणी सुटले ब्वॉ........ <:P

मीली's picture

4 May 2010 - 6:26 am | मीली

मेतकुट करायची कृती दिल्याबद्दल धन्यवाद !
करून बघायला हवे.

मीली