मी विश्वास न ठेवण्यावर विश्वास ठेवतो

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
15 Aug 2009 - 10:26 pm

"जसं पृथ्वी गोल आहे असं आपण नेहमीच म्हणतो.जर का त्या गोष्टीत तुला शंका असेल तर अनेक मार्गानी तिची सत्यता पडताळून पहाता येते."

अलीकडे मी नक्षत्राचे देणे ही डी.व्ही.डी पहात होतो.ती सुरेश भटांवर प्रोग्राम केलेली होती.मला त्यांच्या कविता फारच आवडतात. आशा,लता आणि हृदयनाथानी गायिलेली गाणी तर अप्रतिम आहेत.त्यांच्या कवितेच पुस्तक प्रो.देसायानी त्यांच्याकडे आहे असं मला कधीतरी सांगितल्याचं आठवलं.मी त्यांना फोन करून त्यांच्या नांतवाबरोबर कधीतरी पाठवून द्या म्हणून सांगितलं होतं.
तेच पुस्तक घेऊन त्यांचा नातू आज माझ्या घरी आला होता.तो अलीकडे औषधं बनविण्याच्या कंपनीत रिसर्च असिसटन्ट म्हणून जॉब करीत आहे.
"आजा-नातवाच्या" गोष्टी मला सांगण्यात तो नेहमीच दिलचस्पी घेतो.कारण मला ही तो त्याच्या आजोबासारखाच मानतो.
हल्ली त्याच्या आजोबांना बरं नसतं.त्यांच्या जुन्या आठवणी काढून काही ना काही तरी मला प्रत्येक भेटीत सांगत असतो.मी पण कधी कधी त्याला त्याच्या अजोबाबद्दल सांगायला आवडतं हे ध्यानात घेऊन एखाद्या विषयाची ट्रिगर देत असतो.त्याला ही बोलायला आवडतं.

आज मी तो भेटल्यावर त्याच्या नव्या जॉबबद्दल विचारणा केली.
भाउसाहेबांच्या नातवाला त्यांच्यासारखीच मुळ विषयाला हात घालण्यापूर्वी अवांतर सांगून नकळत विषयाकडे झेप घेण्याची हातोटी आहे.
मला म्हणाला,
"काका,मी जेव्हा मोठा होत होतो तेव्हा माझे आजोबा मला नेहमीच म्हणाल्याचं आठवतं.
"विश्वास ठेवीत जाऊ नकोस"
हो,ते म्हणत की मी कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवित जाऊ नये कारण केवळ,
एक, ते छापलेलं होतं.
दोन,रेडिओवर किंवा टी.व्हीवर ऐकलं होतं.
तीन,कुणा विशेष व्यक्तिच्या संबंधात होतं.
म्हणून विश्वासपात्र आहे असं समजूं नको."
असं हाताची तीन बोटं मोडीत सांगत होता.
मी म्हणालो,
"हे तुझ्या आजोबांचं म्हणणं त्यांच्या अनुभवातून ते सांगत असावेत.कारण सगळ्याच गोष्टी अलीकडे विश्वासनीय नसतात.काही बातम्या सनसनाटी म्हणून विशेष करून टी.व्ही.वर सांगितल्या जातात,आणि कधी नंतर ते खरं नव्हतं म्हणून सांगून नंतर कधी तरी दिलगीरी प्रदर्शीत करतात.आणि बातमी ऐकणार्‍याने जर का त्यांची दिलगीरी ऐकली नाही तर तो पहिल्या बातमीवर विश्वास ठेवून जातो.हा तुझ्या आजोबाना पूर्वीपासूनचा अनुभव असणार."
"अगदी बरोबर.त्यामुळेच माझे आजोबा मला म्हणायचे,
"प्रथम तुला ठरवायला हवं की जी माहिती तुला मिळत आहे ती तुला कितपत महत्वाची आहे,किंवा तिचं तुला किती प्रयोजन आहे.जर तसं काही नसेल तर सोडून दे.ज्या गोष्टीची आपल्याला किंमत नाही तिच्या मागे लागून समय आणि प्रयत्न बरबाद का करावा?."
एव्हडंच नाही तर ते पुढे सांगायचे,
"तसंच अशी गोष्ट दुसर्‍याशी आदान-प्रदानसुद्धा करूं नये.त्यांचा समय व्यर्थ जातोच शिवाय कदाचीत चुकीची माहिती दिली जाते.ती गोष्ट जर का तुला महत्वाची असेल तर मात्र त्यात समय आणि प्रयत्न गुंतवणं ही एक गंभीर बाब होईल. खरं की खोटं हे तुला ठरवावं लागेल.परंतु,जर का त्यात तथ्य असेल तर मग त्यात विश्वास न ठेवण्यासारखं काहीच नाही.-जसं पृथ्वी गोल आहे असं आपण नेहमीच म्हणतो.जर का त्या गोष्टीत तुला शंका असेल तर अनेक मार्गानी तिची सत्यता पडताळून पहाता येते."
मी आजोबांना म्हणालो,
"पण आजोबा,एव्हडा मोठा निर्णय मी कसा घेऊं?"
त्यावर अगदी दिलखूश होऊन हंसत हंसत मला म्हणाल्याचं आठवतं,
"अरे माझ्या लाडक्या नातवा,म्हणूनच तुला चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे."

माझे आजोबा आता जरी थकले असले तरी त्यांच्या चेहर्‍यावरच्या हास्याची ती लकब अजून मी विसरलो नाही.मी त्यांचा उपदेश आता पर्यंत पाळीत आलो आहे.आणि म्हणून मी विश्वास न ठेवण्यावर विश्वास ठेवतो."
"पण हे तुला सगळीकडेच जमणार नाही.काही लोक तुला फारच चिकीत्सक आहेस असं नाही का म्हणणार?"
असं मी त्याला विचारलं.
"एक मला कबूल करावं लागेल की मी कधी कधी ह्यामुळे पेचात आलो आहे.मला आठवतं ध्रुव्व बाळाच्या गोष्टीबद्दल माझं स्पष्टीकरण माझ्या लहानपणी माझ्या मित्रांबरोबर आणि त्यांच्या आईवडीलांबरोबर सुरळीतपणे जाऊ शकलं नाही.
पण सरतेशेवटी मोठेपणी मी शास्त्रज्ञ झालो.त्याचं श्रेय मी माझ्या आजोबांना आणि माझ्या जिज्ञासेला देतो.
आता मला कुठच्याही गोष्टीवर विश्वास ठेवायची गरज वाटत नाही.मला जर का शंका आली तर मी त्यातलं तथ्य पडताळून कसं पहावं ह्याची माहिती मला कळली आहे. एक तर्फी विचारकरून नव्हे तर चारही बाजूनी विचार करून माझा मी निर्णय घेतो."

मी त्याला म्हणालो,
"जगात खूप माहिती उपलब्ध आहे.तुझ्या आजोबांसारखे अनेकांना आजोबा असतील ही.पण कुणालाही तथ्य कसं शोधून काढायचं आणि जास्त महत्वाचं म्हणजे उघड्या मनाने चारही बाजूनी समस्येबद्दल विचार करीत असतां कसलाही मनांत शंका न ठेवता निर्णयाला कसं आलं पाहिजे हे समजायला हवं."
माझा हा पॉईन्ट त्याला पटला.लागलीच मला म्हणाला,
"जर का तथ्य सहजासहजी कळण्यासारखं नसेल तर प्रयोग करून तथ्य शोधून काढणं मला जमतं.
एक खरं आहे की काही प्रयोग माझ्या आवाक्याबाहेरचे असतात.आणि काही बाबीवर आपल्याला प्रयोगही करता येत नाही."
आणि भाऊसाहेबांचा नातू त्यांच्या सारखाच मुळ विषयाकडे जाताना माझ्या प्रश्नाकडे नकळत वळला.मी त्याला म्हणालो होतो की तुझा नवीन जॉब कसा चालला आहे.

मला म्हणतो कसा,
"काका,सुरवातीला तुम्ही माझ्या जॉबबद्दल चौकशी केलीत ना,त्याच जॉबमधे मी माझ्या आजोबांचा उपदेश कसा वापरू लागलो आहे ते सांगतो.आम्ही नवीन नवीन औषधाचा शोध लावीत असतो.हे शोध लावून झाल्यावर त्या औषधाचा उपायाचा पडताळा करून पाहायचं असतं.अनेक उदाहरणं देता येतील.
उदाहरण म्हणून माणसाच्या मनोदशेचं घ्या. नवीन औषधांच्या उपायांचं परीक्षीण करताना ज्या लोकांवर त्याचे प्रयोग चालतात त्यांना प्रत्यक्ष नवीन औषध किंवा नकली गोळी देऊन औषध खरोखर उपयोगी होत आहे की नाही हे पडताळलं जातं.ही सर्व माहिती ज्यांच्यावर प्रयोग होत आहे त्यांना किंवा जे प्रयोग करीत आहेत त्यांच्यापासून निर्णयाला येईपर्यंत गुप्त ठेवली जाते.ज्या लोकाना ती नकली गोळी दिली जाते ते लोक जणू आपल्यावर खर्‍याच औषधाचा प्रयोग होत आहे अशी समजूत करून घेऊन वागतात.ह्याला placebo effect असं म्हणतात.हा effect बरेच वेळा सूचक असतो.कधी कधी अगदी शंभर टक्के असतो.
हा प्रयोग काय सिद्ध करतो?ज्यांना खर्‍याच औषधाची गोळी आपल्याला दिली आहे असं वाटत असतं आणि प्रत्यक्षात गोळी दिलेली नसते ते सुधारले जातात. माणसाची मनोदशा खूपच प्रभावशाली असते."

मी त्याला म्हणालो,
"परंतु,असं असेल तर मग साखर मिश्रीत गोळी देऊन, हे औषध आहे असं वर लिहून त्याचा placebo effect त्या रोग्याची काळजी घेईल काय?
असं जर आपण करू शकलो तर मग प्रकृतीस्वास्थ्य अगदीच सोपं झालं असतं."
मला म्हणाला,
"पण त्याचं उत्तर नाही असंच आहे.आणि ते तसं देणं हे पण बेकायदा आहे.पण समजा हेच प्रयोग लहान मुलांवर केले.ह्या मुलांना काय चाललं आहे याची मुळीच माहिती नसते. मी नक्कीच सांगतो त्यांच्यावर placebo effect होणारच नाही.जणूं उंदीर,सश्यावर प्रयोग केल्या सारखं होईल."
मी त्याला म्हणालो,
"ह्याचा अर्थ असा होतो की जस जसं आपण प्रौढ होत जातो तस तसं आपण हा placebo effect शिकत जातो.हे चांगलं आहे की वाईट आहे?"
माझी शंका त्याला आवडली.
"तुमचा प्रश्न मला आवडला.मी तुम्हाला प्रांजाळपणे असं सांगेन की मी जर का खरंच आजारी असेन तर मी स्वतःसाठी खरीच गोळी मागेन.
काका,मी माझ्या आजोबांशी सहमत आहे.विश्वास ठेवणं ही जरी प्रभावशाली शक्ति असली तरी ती दोन्ही तर्‍हेने कामात येते.असं जर आहे तर मग चान्स कशाला घ्यावा?
म्हणूनच मी विश्वास न ठेवण्यावर विश्वास ठेवतो."
"आजोबाचा नातू शोभतोस रे बाबा!"
असं म्हणून मी त्याची पाठ थोपटली.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख