माझ्या भूताला माझे धन्यवाद.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
12 Aug 2009 - 10:07 am

"मी भूताना आता मानू लागली.जेव्हा मला हवं त्यावेळी ते नेहमीच माझ्या जवळ असतं. "

"लेखिका सौ.मालती मुकुंद प्रभू"
असं लेखाच्या खाली नांव असलेला एक लेख मी अलीकडेच एका लोकल मासिकात वाचला.गोष्ट भूताची होती.आणि वातावरण आणि परिसर कोकणातला होता.
कोकणात भूताखेताच्या,देवचाराच्या,संबंधी,खवीसाच्या आणि मुंज्याच्या गोष्टीना तोटा नाही.फार पूर्वी कुणावरही अन्याय झाल्यावर तो अन्याय सहनशिलतेच्या मर्यादा ओलांडून गेला की त्याची परिणीती शेवटी जीव देण्यात व्हायची.बहुदा हे अन्याय बालविधवेवर,नव्या लग्न करून आलेल्या सूनेवर,"वेडसर" म्हणून आपआपसात ठरवलेल्या एखाद्या ऐन तारूण्यातल्या मुलावर किंवा मुलीवर आणि सरतेशेवटी म्हातारपणाला कंटाळून जीव नकोसा झालेल्या बाईवर किंवा बुवावर व्हायचे.तसंच जीव देण्याचं सोपं आणि इनस्टंट साधन म्हणजे खोल विहीर असायची.बरेच वेळा ही विहीर पडीक परिस्थितीतली असायची.कधी कुणी त्या विहिरीतल्या पाण्याचा वर्षानुवर्षे वापर केलेला नसायचा.पाण्यात जवळपासच्या झाडांचा पालापाचोळा पडायचा आणि पाण्याला दुर्गंधी असायची.कीर्र रानातली ही विहीर अशा ह्या पीडीत लोकांना जीवाचा शेवट करायला उपयुक्त वाटली तर नवल नाही. पु.लं.नी आपल्या लेखनात कोकण्यातल्या भुताखेताच्या गोष्टींवर सुंदर विचार लिहिले आहेत.

हे सगळं लिहिण्याचं कारण की,वर उल्लेख केलेली लेखिका ही माझी सख्खी मामेबहिण आहे हे मला अलीकडेच कळलं.आणि ते सुद्धा योगायोगानेच कळलं.
मालतीने लिहिलेली एक भूतावरची गोष्ट मी वाचत होतो.गोष्टीतलं सर्व वातावरण माझ्या आजोळचं होतं.एव्हडंच नाही तर त्या गोष्टीतली पात्रं आणि घटना माझ्या स्मृतीशी जूळत होत्या. एका पुस्तकपंढरीच्या मेळाव्यात माझी आणि मालतीची गाठ पडली. तिचं पुस्तक विकत घेणार्‍याच्या पुस्तकाच्या कॉपीवर ती सही देत होती.
खूप वर्षानी मी तिला पाहत होतो.दुडत्या अंगाची, सोन्याच्या बांगड्यानी दोन्ही हात भरलेले,मोठ्ठं कपाळावर कुंकू लावलेली, सुबक ठेंगणी,हिरवी पैठणी नेसलेली,गोरी पिठ्ठं बाईला बघून ही मालूच असावी असं माझ्या मनात आलं.आणि ते खरं ठरलं.
मग काय विचारता?रेवडीवाल्याला गंडेरीवाला भेटल्यासारखं झालं.वेळ काढून मी तिच्या घरी एकदा गेलो.आणि मग गप्पांना सुमारच राहिला नाही. आजोळच्या बालपणातल्या आठवणीत राहिलेल्या प्रसंगाना चर्चेत आणायला उतच आला.

मी मालूला विचारलं,
"तू केव्हा पासून भूतावर विश्वास ठेवायला लागलीस?"
"मी कधीच भूताखेतावर विश्वास ठेवला नव्हता.पण मला त्यांच्याशी बोलायला शिकवलं गेलं होतं.माझी आई मला नेहमी आठवण करून द्यायची, की मला ती देणगी आहे.
हे सर्व उदयाला आलं जेव्हा मी चार वर्षाची होते तेव्हा एकदा माझ्या आईकडे मी एक खोटं बोलले होते.
त्याचा संदर्भ सांगायचा झाल्यास,माझ्या आईच्या ध्यानात ती घटना होती.मी एक दिवशी रात्री झोपायला जायला तयार नव्हती. मी आईला म्हणाले की आपल्या न्हाणीघरात भूत आहे.
माझ्या आईला हे ऐकून हर्षच झाला.तिला वाटलं की मी भूतांबद्दल गोष्टी सांगणारं त्याचं एक माध्यम आहे.
त्यानंतर कधीही अकल्पीत असं काही झालं की आई मला विचारायचीच.एकदम अचानक वार्‍याची झुळूक आली किंवा एखादं शिंक्यावर ठेवलेलं भांडं अचानक पडलं की आई मला म्हणायची,
"ती तिथे आहे!"
ती म्हणजे माझी चुलत आजी.
मी जेव्हा अगदी लहान होते तेव्हा मला आईने सांगितलं होतं की माझ्या चुलत आजीने विहिरीत उडी मारून जीव दिला होता. ती आमच्या शेजारीच राहायची.तिला मुल नव्हतं आणि आमची पंजी-म्हणजे तिची सासू -तिला खूप छळायची.माझी आई तेव्हा दहाएक वर्षाची होती.आणि तिने ही घटना डोळ्याने पाहिली होती."
मी मालूला म्हणालो,
" मला हे आठवतं.तुझ्याच आईने मलाही ही गोष्ट सांगितली होती.मला वाटतं तुझ्या आईवर त्या घटनेचा जबर परिणाम झाला असावा."
"अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं.पुढे तर ऐक"
असं म्हणत मालू रंगात येऊन पुढे सांगू लागली,
"मी ज्यावेळी सोळावर्षाची झाले त्यावेळी माझ्या थोरल्या भावाला भ्रम झाला होता.मला आठवतं माझी आई माझ्या हातापाया पडून मला सांगायची की चुलत आजीला सांग की भावाला बरं कर.माझा भाऊ काही वर्षानी वारला आणि त्यानंतर माझी आई त्याच्याशी बोलायला मला सांगायची.मला आठवतं मी त्यावेळी तिला विरोध करून म्हणायचे,
"मला माहित नाही कसं (बोलायचं)"
माझी सख्खी आजी त्यानंतर सहा महिन्यानी वारली.माझी आई माझ्या खणपटीलाच लागली.तिला हवं होतं ऐकायला की माझी आजी-म्हणजे तिची आई-शेवट पर्यंत तिच्यावर-आईवर- प्रेम करायची.
तिला हवं असलेलं उत्तर मी तिला सूचित करायची,मी म्हणायची,
"होय नेहमीच (म्हणायची)"
"पण अजून तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस"
अशी मी तिला परत आठवण करून दिल्यावर मालू म्हणाली,
"तेच तर मी तुला सांगणार आहे.
मी काल्पनीक कथा लिहायला लागल्या पासून एकदा मी एका बाईची एक गोष्ट लिहिली होती.तिने विहीरीत उडी घेतली होती. नवर्‍याच्या जाचाला कंटाळून तिने कसा जीव दिला ही ती गोष्ट होती.माझ्या आईने ती गोष्ट वाचल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलं.
आता माझ्या आईला खरं ते कळलं.माझी चुलत आजी माझ्याशी बोलून तिने मला ही खरी गोष्ट सांगितली असं तिला वाटायला लागलं.
"नाहितर माझी चुलत आजी अपघाताने न मरता जीव देऊन मेली हे तुला कसं कळलं असतं?"आईने मला विचारलं होतं.
"ती इथेच आहे" असं ती वर म्हणाली.
मी तिला शपथ घेऊन सांगतलं,
"मला ठाऊक नाही."
नंतर काही वर्ष आणखी काही अवांतर घडलेल्या गोष्टींचं स्पष्टीकरण माझ्या लेखनात येत गेलं.हे माझ्याहून मला माहित नसावं. उदा.जागा,आणखी एखादी व्यक्ती,एखादं गाणं वगैरे.भूतांच्या गोष्टीत काही संकेत एव्हडे विपुल असायचे की कधी कधी मला माझंच हंसू यायचं.माझ्या नशिबाचे मी आभार मानण्यापेक्षा मी माझ्या भूतांचेच आभार मानायचे."
मी मालूला परत म्हणालो,
"पण तू खरंच भूतावर विश्वास ठेवतेस का?"
परत,परत तोच प्रश्न मी विचारला हे पाहून मालू हंसत हंसत मला म्हणाली,
"पांच वर्षापूर्वी मी खरोखरंच एक भूत पाहिलं.आणि ते माझ्याशी बोललं पण.
ती माझी आई होती.प्रत्यक्षापेक्षा तिचं डोकं दसपट मोठं होतं. आणि ते चमकदार प्रकाशासारखं स्पंदन करणारं थ्री-डायमेन्शल चलचित्र होतं.मी आश्चर्यचकीत झालेली पाहून माझी आई मला हंसत होती.ती माझ्या अगदी समिप आली.माझ्या छातीत एखादा गुद्दा मारल्यासारखं मला वाटलं.माझ्या फुफ्फुसातला श्वास निघून जाऊन काहीतरी सुनिश्चित गोष्टीने माझी छाती भरली होती. त्यात प्रेम होतंच आणखी शांती आणि आनंद होता.आणि त्यामुळे प्रेम शांती आणि आनंद हे सगळं सारखंच आहे असा माझा समज झाला.
आनंद प्रेमातून मिळतो,शांती प्रेमातून मिळते.
पुढे ऐक,माझी आई काय म्हणाली,
"आता तुला माहित झालं!"
माझी आई त्यावेळी मला म्हणाली.
मी भूताना आता मानू लागली.जेव्हा मला हवं त्यावेळी ते नेहमीच माझ्या जवळ असतं.माझी आई, माझी चुलत आजी,माझी भूतं."
मालतीचं हे सर्व स्पष्टीकरण ऐकून मी तिला म्हणालो,
"तू काही म्हण.कोकणातलं त्यावेळचं वातावरण भूताना पोषक होतं.ते मोठे मोठे पिंपळ,आणि वार्‍याने सळसळणारी त्यांची पानं.लाजाळूची झुडपं आणि स्पर्श झाल्यावर ती चटकन मिटणारी त्या पानांची धडपड.उंच माडाच्या वरल्या टवशीवर माडी साठी बांधून ठेवलेली ती मातीची मडकी माणसाच्या डोक्यासारखी भासून त्याला कुणी तरी म्हणायचं की संतापून भूत माडावर चढून बसलंय.आमावस्येच्या रात्री वडाच्या मोठ्या मोठ्या एका झाडातून दुसर्‍या झाडात जळत जाणारी चुडताची पेड, असली खरी किंवा कुणी सांगितल्यामुळे खरी वाटणारी दृश्य पाहून आणि आता आठवून तुझ्या सारख्या लेखिकेला भूतांच्या गोष्टी लिहायला चांगलच खुराक सापडलं असं म्हणायला पाहिजे."
माझं म्हणणं मालूला पटलं असं वाटलं.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

12 Aug 2009 - 4:56 pm | शैलेन्द्र

खुप जणांनी वाचलं, कुणिच काही बोलेना झालय, भ्यायले जणु सारे भुतास्नी...

मिसळभोक्ता's picture

13 Aug 2009 - 11:39 am | मिसळभोक्ता

जेव्हा शितं होती, तेव्हा भुतं जमत असावीत.

-- मिसळभोक्ता

लिखाळ's picture

13 Aug 2009 - 3:16 pm | लिखाळ

छान.
-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.