पहाटेचा अलार्म वाजला तसे सूर्य महाराज खडबडून जागे झाले. स्नान आटोपून, चहा घेवून, न्याहारी करून ते पृथ्वीच्या दिशेने जाण्यासाठी रथात बसणार इतक्यात सूर्यीणबाई कडाडल्या,
“अहो, विसरभोळेपणा कधी जाणार तुमचा?”
आता काय झालं, असा प्रश्न पडून सूर्य महाराज मागे वळले, तर सूर्यीणबाई हातात मास्क घेवून उभ्या.
“पृथ्वीकडे जायचं म्हटलं की तुम्हाला नेहमीच घाई असते हो, मग सख्खी लग्नाची बायकोही दिसेनाशी होते. शून्यनगरीत स्वाईन फ्लूची साथ चालू आहे माहिती आहे ना, हा मास्क नाकावर चढवा आधी अन मग उधळा कुठं उधळायचं ते.”
एरवी अख्ख्या जगाला आपल्या झळांनी सळो की पळो करून सोडणारे सूर्य महाराज.. पण सूर्यीणबाईंच्या समोर त्यांचाही काजवा होतो.
एक शब्दही न बोलता त्यांनी मास्क नाकाला लावला आणि रथ पृथ्वीच्या दिशेने हाकायला सारथ्याला आज्ञा सोडली. बघतात तो सारथ्यानंही नाकाला मास्क लावला होता. एवढंच काय, रथाचे सहा अश्वही आज मास्कमधून जमेल तसं फुरफुरत होते.
हम्म.. मामला गंभीर आहे, तर, सूर्यमहाराज स्वत:शीच म्हणाले. इतक्यात त्यांच्या डोक्यात एक कल्पना चमकली.
“सारथ्या, आज जरा पृथ्वीवर स्वाईन फ्लू ग्रस्त प्रदेशाची पाहणी करावी म्हणतो. सर्वात जास्त लागण कोठे झाली आहेत, तेथे जाउ.”
“पण महाराज, बाकीच्या जगाचं काय, त्यांचा दिवस उगवायचा राहिला, तर कामं खोळंबतील.”
“अरे हो, किरणांना तिकडे धाडून देतो, म्हणजे आपण फिरायला मोकळे.”
किरणांना कामाला लावून सूर्यमहाराजांनी आपला मोर्चा शून्यनगरीच्या दिशेने वळविला.
शून्यनगरीत हाहा:कार माजला होता. लोक नाकातोंडाला मास्क, रुमाल लावून फिरत होते. दवाखान्यांमध्ये नेहमीपेक्षा कित्येक पट गर्दी उसळली होती.
“सारथ्या, इथल्या परिस्थितीबद्दल आम्हाला माहिती देण्यासाठी तू कॉमेंट्रीच सुरु कर बाबा.”
सूर्य महाराज क्रिकेटवेडे आहेत हे सांगायची आवश्यकता नाहीच. त्यामुळे कुठलीही गोष्ट पहायची म्हटलं, की त्यांना कॉमेंट्री हवीच. अहो, परवा सूर्यीणबाईंनी कधी नव्हे ते लाडात येउन त्यांना बागेत नुकताच फुललेला पांढरा गुलाब दाखवायला नेलं, तर त्यासाठी सुद्घा त्यानी कॉमेंट्री हवीच असा हुकूम सोडला आणि आपली हौस पुरवून घेतली. असो.
सारथ्यानं कॉमेंट्री सुरु केली, “महाराज, हे बायडू रुग्णालय, पहा पहा किती गर्दी उसळली आहे. लोक आपली तपासणी करून घेण्यासाठी इथं आले आहेत.”
“सारथ्या, तपासणी म्हणजे नक्की काय करतात रे इथे?”
“तपासणी म्हणजे महाराज निम्म्या लोकांना तपासतात आणि निम्म्यांना न तपासताच तुम्हाला काही झालेलं नाही असं सांगून घरी पाठवतात.”
“अरेरे केवढा हा निष्काळजीपणा. सरकारी रुग्णालय आहे का रे?”
“होय महाराज”
“मग बरोबरच आहे बाबा”
“अरे सारथ्या, एवढा हाहा:कार माजला, तरी सरकारने काही केलं नाही का?”
“केलं ना महाराज. पहिलं म्हणजे, फक्त सरकारी रुग्णालयातच टेस्टिंगची सोय केली. आणि औषधांची मागणी उशिरात उशिरा नोंदवली.
ते का म्हणून?”
“आता ते मी तुम्हाला सांगायला हवं का महाराज. इथंसुद्धा कृत्रिम टंचाई आणि मक्तेदारी निर्माण करायची आणि आपल्या तुंबड्या भरायच्या.”
“वा,फारच कार्यक्षम सरकार आहे म्हणायचं? अरे पण सारथ्या, यांचे लोकप्रतिनिधी काही दिसत नाहीत, कोण आहेत इथले लोकप्रतिनिधी?”
“महाराज, एकापेक्षा एक चॅम्पियन नेते आहेत बरं का इथले. हा फजितदादा कुमारांचा बंगला, ते शून्यनगरीचे पालकमंत्री. तो तिकडे भुरेश सुरमाडींचा बंगला, ते इथले खासदार. तो तिकडे सूरप्रियाताई घोळेंचा महाल, त्या भानामतीच्या खासदार, पण इथंच पडीक असतात. बचत बचत खेळत असतात.”
“आता हे भानामती काय प्रकरण आहे?”
“शू… महाराज हळू बोला. भानामती हे शहर आहे, मोठ्या साहेबांचं. भानामती करण्यात लय हुशार आहेत ते.”
“हो का?”
“मग, जिथे लक्ष्मी असेल, तिथून ती चालत येउन बरोबर यांच्या गळ्यात माळ घालते अशी भानामती करतात हे. सध्या त्यांनी भिशीची आय ला भानामती केली आहे.”
“भिशीची आय?”
“अहो आपली चेंडू फळी संघटना. सध्या तिथेच असतात हे, लवकरच म्हणे आयशीची आय पन यांच्या गळ्यात माळ घालणार आहे.”
“आता ही आयशीची आय कोण?”
“आंतरराष्ट्रीय चेंडू फळी संघटना.”
“अस्सं, बरेच कर्तबगार दिसतात हे तुमचे सायेब. पण एवढा गोंधळ माजलाय तुमच्या शून्यनगरीत, कोठे दिसत नाहीत ते लोकांना धीर देताना. दादा पण नाही, ताई पण नाहीत आणि भाई पन नाहीत. ऑ?”
“अहो महाराज, पक्के बिझनेसमन आहेत ते. त्यांना आपला टारगेट ऑडियन्स बरोब्बर माहिती आहे.”
“म्हणजे?”
“म्हणजे असं बगा, ही साथ पसरली आहे तो आहे आपला मध्यमवर्ग. तो कुणाच्या अध्यात ना मध्यात. म्हणून मग यांनी पण ठरवलं, आपण तरी कशाला पडा यांच्या अध्यात अन मध्यात.”
“मग यांचा टारगेट ऑडियन्स कोणता म्हणतोच सारथ्या?”
“आता तो जरा वादग्रस्त मुद्दा आहे महाराज, उघड बोलावं तर लगेच दंगे-धोपे होतील आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होईल.”
“असू दे, असू दे, समजलो मी. अरे पण सारथ्या, हा स्वाईन फ्लु फारच भयंकर आजार आहे का रे?”
“नाही महाराज. वेळेत उपचार केले की लगेच बरा होणारा आहे, पण सध्या लोकांमध्ये घबराट आहे ना त्यामुळे तो फारच भीषण वाटतोय खरा. खरं सांगू का महाराज, या रोगाच्या विषाणूपेक्षा हे काही न करणारे सरकारी आणि राजकीय जंतू आहेत ना ते कैकपटीने विषारी आहेत.”
“मग यांच्या प्रतिबंधासाठी नाही का एखादी लस?”
“आहे ना महाराज. निवडणुका. मतदान. आता येणाऱ्या निवडणुकीत लोक यांना ती लस टोचतीलच.”
“अस्सं, सगळी मजा मजाच आहे बाबा सारथ्या या शून्यनगरीत. पण आता तू जास्त वेळ थांबू नको बरं. आपल्याला परतायला हवं आता. नाही तर हे विषाणू आपल्याला येउन चिकटायचे.”
“बरं महाराज, “असं म्हणून सारथ्यानं रथ पश्चिमेकडे वळवला. शून्यनगरीतल्या क्षुद्र पुढाऱ्यांचे विचार विषाणूसारखे झटकत सूर्य महाराज परतीचा मार्ग आक्रमू लागले.
…समाप्त…
प्रतिक्रिया
10 Aug 2009 - 12:13 pm | मनिष
१०१% सहमत...मस्त लेख अ-मोल! :)
10 Aug 2009 - 12:17 pm | चिरोटा
मस्त लेख. सुर्य महाराज येवोत न येवोत ,शुन्यनगरीत साहेबांच्या क्रुपेने 'सकाळ' होतेच.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
10 Aug 2009 - 1:18 pm | भोचक
आयला सहीच लिहिलंय. मस्त. फार फार आवडलं.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
10 Aug 2009 - 3:02 pm | मि.इंडिया
झकास जमलय.......
भानामती ची करामात पुण्याचे पाणी व लोणी पळवण्यासाठीच आहे. दादा बहुतेक आरोग्य विभागातही लक्ष घालणार........
प्रदीप
10 Aug 2009 - 9:02 pm | क्रान्ति
छानच लिहिलाय लेख. भानामती, सरकारी आणि राजकीय जंतू, निवडणुकीची लस जोरदार!
क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी
10 Aug 2009 - 9:18 pm | प्राजु
सह्हीच!!
हा फजितदादा कुमारांचा बंगला, ते शून्यनगरीचे पालकमंत्री. तो तिकडे भुरेश सुरमाडींचा बंगला, ते इथले खासदार. तो तिकडे सूरप्रियाताई घोळेंचा महाल, त्या भानामतीच्या खासदार, पण इथंच पडीक असतात.
भिशीची आय, आयशीची आय.... सोल्लिड!!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Aug 2009 - 11:22 pm | अवलिया
हॅ हॅ हॅ
भारी लिवलय... :)
--अवलिया
10 Aug 2009 - 11:31 pm | बेसनलाडू
लेखन फार आवडले.
(वाचक)बेसनलाडू
11 Aug 2009 - 12:30 am | विसोबा खेचर
वाचून मौज वाटली! सुर्यीणबाई ही संकल्पना मस्तच! :)
जियो..!
तात्या.
--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!
11 Aug 2009 - 11:31 am | झकासराव
उच्च :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
11 Aug 2009 - 11:46 am | यशोधरा
मस्तच लिहिलय!
11 Aug 2009 - 11:57 am | श्रद्धादिनेश
अतिशय सुन्दर लेख...उपमा, उपनामं खुपच आवडलीत. सद्य परिस्थितीचं खुपंच मार्मिक विश्लेषण...
विशेष आवडलेले:---
भिशीची आय
आयशीची आय
“म्हणजे असं बगा, ही साथ पसरली आहे तो आहे आपला मध्यमवर्ग. तो कुणाच्या अध्यात ना मध्यात. म्हणून मग यांनी पण ठरवलं, आपण तरी कशाला पडा यांच्या अध्यात अन मध्यात.”
11 Aug 2009 - 12:04 pm | विमुक्त
जबरदस्त लिहीलय..... भानामती विषेश आवडला....
11 Aug 2009 - 12:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
झकास ...
>> खरं सांगू का महाराज, या रोगाच्या विषाणूपेक्षा हे काही न करणारे सरकारी आणि राजकीय जंतू आहेत ना ते कैकपटीने विषारी आहेत.<<
:-(
अदिती
11 Aug 2009 - 4:06 pm | अनिल हटेला
एकदम वंटास लिखाण....
आंदे और भी...:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
11 Aug 2009 - 4:24 pm | दशानन
लै भारी !
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !