धक्कादायक बातमी

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
21 Feb 2008 - 2:14 am

आताच मटावर बातमी वाचली की, ठाण्याचे खासदार श्री प्रकाश परांजपे यांचे निधन.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2799662.cms

समाजबातमी

प्रतिक्रिया

ईश्वर त्यांच्या आत्म्यास जन्म-मरणाच्या फेर्‍यातून मुक्ति देवो. चांगला माणूस असेल ना... माझा त्यांचा तर कधी संबंधच आला नाही.

विसोबा खेचर's picture

21 Feb 2008 - 2:52 pm | विसोबा खेचर

परांजपे साहेबांचा आणि माझा अतिशय चांगला परिचय होता.

पूर्वी ठाण्याला बहुतांशी उत्तर भारतीयांच्याच गाड्या थांबायच्या आणि पुण्या-नाशिककडे जाणार्‍या गाड्या मात्र हे उत्तर भारतीयांची मेजॉरिटी असलेले रेल्वे प्रशासन थांबवत नसे. मुंबई-पुणे, ठाणे-पुणे मार्गावर तेव्हाही आणि आजही अक्षरश: असंख्य मुंबईकर-ठाणेकर-पुणेकर मराठी मंडळी प्रवास करतात. परंतु ठाण्यासारख्या मध्यमवर्गीय मराठी लोकांची भरपूर वस्ती असलेल्या मोठ्या शहरासारख्या ठिकाणी पुण्याची गाडी थांबत नसल्यामुळे प्रवाशांना झक मारत एक तर गाडी पकडायला कल्याणला जावं लागे किंवा पुण्याहून येताना कल्याणला उतरावं लागे आणि पुढचा ठाण्यापर्यंतचा प्रवास मुद्दाम गाडी बदलून लोकलने करावा लागे. सर्वच लोकांना हे अतिशय गैरसोयीचे होत असे.

परांजप्यांनी उत्तर हिंदुस्थानी रेल्वे प्रशासनाशी वारंवार झगडा देऊन पुण्याच्या बर्‍याचश्या गाड्या ठाणे स्थानकावर थांबायला लावल्या. पूर्वी पुण्याला जाताना डेक्कन एक्सप्रेस ठाण्याला थांबत नसे, इंद्रायणी थांबत नसे, त्या आता जातायेता दोन्ही वेळेला थांबतात आणि त्यामुळे ठाणेकरांची आज खूपच सोय झाली आहे. या सगळ्याचे श्रेय माझ्या मते प्रकाश परांजपे यांनाच जाते कारण त्यांच्या या लढ्याचा मी प्रत्यक्ष साक्षिदार आहे.

अवांतर - प्रकाश परांजपे यांचे वडील वि रा परांजपे हे देखील माझ्या अतिशय चांगल्या परिचयाचे होते. ते आमच्याच मो ह विद्यालय या शाळेतील निवृत्त शिक्षक! आम्ही त्यांना बापू म्हणायचो! अरे, क्या बात है! आमचे बापू परांजपे म्हणजे एकदम रसिक माणूस! पक्का कोकण्या! वास्तविक बापू हे वयाने खूप वडील, परंतु आमच्याशी मात्र एकदम दोस्तासारखे वागायचे! खुसखुशीत आणि खमंग गप्पाटप्पा, शिव्या ओव्या, थट्टामस्करी यात तर बापूंचा हातखंडा आणि उत्साह सर्वात दांडगा! असो... !

बापू परांजपे हा स्वत्रंत्र व्यक्तिचित्राचा विषय आहे! सवड मिळाल्यास लिहीन केव्हातरी! :)

संगीतभूषण पं रामभाऊ मराठे हे आमच्या ठाणेनगरीचे भूषण. रामभाऊंसारख्या दिग्गज गवयाचा साठी सोहळा साक्षात भीमण्णांनी थाटामाटात पुण्यात सवाईगंधर्व महोत्सवात केला होता. त्या रामभाऊंच्या नांवे ठाणे शहरात एक उत्तम दर्जाचा सांगितिक सोहळा झालाच पाहिजे आणि त्याकरता ठाणे महापालिकेनेच सर्व पुढाकार घेऊन सर्व आर्थिक अनुदान/मदत केलीच पाहिजे असा आग्रह सर्वप्रथम परांजप्यांनी नगरसेवक असताना पालिकेच्या सभेत उचलून धरला आणि तडीस नेला. आणि त्यामुळेच आज गेली अनेक वर्ष ठाण्यात पं राम मराठे स्मृतीसोहळा अगदी उत्तम रितीने पार पडत आहे. दरवर्षी ठाणे, डोंबिवली, कल्याणादि परिसरातले अनेक श्रोते आज या संगीत महोत्सवाचा आनंद लुटत आहेत. याचेही सर्व श्रेय माझ्या मते परांजप्यांनाच जाते!

मी जवळजवळ ७-८ वर्षे या महोत्सवाच्या व्यवस्थापन समितीत काम केलं आहे. त्या काळात माझा परांजप्यांशी जवळून परिचय झाला कारण तेही अनेकवेळेला आमच्या सभांमध्ये उपस्थित असत! ज्येष्ठ संगीत समिक्षक श्रीकृष्ण दळवी, संगीतप्रेमी नंदन म्हसकर आणि मी, असे आम्ही तिघे मिळून या समारोहाची संपूर्ण रूपरेषा ठरवत असू..

असो.. प्रकाश परांजप्यांना माझी श्रद्धांजली..!

अवांतर - १) राम मराठे महोत्सवाच्या निमित्ताने माझा अभिजात संगीत क्षेत्रातल्या खूप कलाकारांशी जवळून संबंध आला, खूप अनुभव मिळाला, खूप शिकायला मिळालं. एक स्वतंत्र लेखमाला व्हावी इतपत राम मराठे स्मृतीसमारोहाच्या खूप हृद्य आठवणी, काही गंमतीशीर आठवणी/अनुभव माझ्या गाठीशी आहेत. लिहीन एकदा केव्हातरी त्याबद्दल!

अवांतर - २) आणि गंमत म्हणजे राम मराठे स्मृती समारोहाच्या अगदी पहिल्या वर्षी भीमण्णांचं गाणं ठेवावं असं ठरलं. परंतु सुरवातीला महापलिकेचं अनुदान खूपच कमी होतं, महोत्सव तर तीन दिवसांचा होता आणि त्यामुळेच भीमण्णांची त्यावेळची बिदागी आम्हाला परवडणारी नव्हती! तरीही प्रयत्न तर करुया म्हणून आम्ही पुण्याला अण्णांच्या घरी गेलो, त्यांना कार्यक्रम करण्याविषयी सांगितलं, तारीखही ठरली आणि प्रश्न आला तो बिदागीचा!

"अण्णा, तुम्ही यावं आणि गावं अशी आमची खूप इच्छा आहे परंतु आपल्या बिदागीचं काय? आपली बिदागी आम्हाला परवडणार नाही, हे आम्हाला माहित्ये तरीही आम्ही आलो आहोत. तेव्हा आता काय करायचं तुम्हीच सांगा!"

परंतु आमचे भीमण्णाही तेवढ्याच मोठ्या दिलाचे! एक सच्चा कलाकार! त्यांना आमची अडचण क्षणात ध्यानात आली. ते जराही विलंब न करता आम्हाला म्हणाले,

"अरे पैशांचं राहू द्या हो! मी या सगळ्यांतून गेलो आहे. मी जेव्हा कुणी नव्हतो, माझं काहीच नांव नव्हतं, तेव्हा सवाई गंधर्व महोत्सव उभा करताना मी अश्याच अडचणींतून गेलो आहे. तेव्हा मलाही अनेकांनी मदत केली, सांभाळून घेतलं!"

हे सांगताना अण्णांनी पुण्यातील पंडित गॅरेजच्या मालकांचा उल्लेख केला आणि सवाईच्या सुरवातीला त्यांनी खूप मदत केली, हे आवर्जून सांगितलं!

"तुम्ही मंडळी रामभाऊंच्या नांवाने संगीत महोत्सव करताय ना? मग झालं तर! माझी काहीच अट नाही. तुमच्या बजेट मध्ये जेवढी बसेल तेवढीच बिदागी मला द्या किंवा आजिबात नाही दिलीत तरी चालेल! मी समारोहात निश्चित येणार आहे आणि गाणार आहे! फार पूर्वी याच रामभाऊ मराठ्यांनी 'भीमसेन जोशी नावाचा एक मुलगा आहे, अगदी तयारीने आणि उत्तम गातो, त्याचं गाणं तुम्ही अवश्य ठेवा' अश्या आशयाचं पत्र गिरगाव ब्राह्मण सभेला लिहिल्याचं मला माहीत आहे!"

आणि बोलल्याप्रमाणे अण्णा आले, उत्तम गायले आणि राम मराठे स्मृती समारोहाची पहिल्या वर्षाची सांगता एकदम सुरेल झाली, स्वरांनी भारून गेली!

असो,

आपला,
(भीमसेनभक्त!) तात्या.