जीवती

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
25 Jul 2009 - 1:13 pm

दादर स्टेशन.
बाहेरची एक गाडी आली आहे. दुसरी सुटणार आहे.
टॅक्सी वाल्यांचा गराडा.
हा बहुतेक माझ्या पावलावरून नेणार टायर.
मी मागे होतो.
हा बहुतेक चिरडणार मला.
मी उडी मारतो.
पायातला एक बूट मागे पडला.
अरेच्चा अंधार फारच आहे.
बूट मिळाला.
पायात घातला.
पण अंधार का बरं एव्हढा ?
दादर स्टेशनवर लाईट कमी आहे.
रांगेत उभा राहीलो. तिकीट काढायचं आहे.तुडंब गर्दी .
लोकलनी जाण शक्य नाही.महालक्ष्मीनी जावं हे बरं.
आतापर्यंत पावसात भिजलो होतो.
आता रांगेत उभं राहील्यावर उकडायला लागलं आहे.
समोर एक जोडपं उभं आहे. बाईच्या कडेवर लहान मूल आहे.
खास आईबाबांनी घ्यायची पिशवी आहे. मूल चुळबुळ करतं आहे.
अंधारात चेहेरे दिसत नाहीय्येत.
अहो, घ्या ना हिला जरा.
बाळ जरा कुरकुरत आहे.
व्वा ! लाईट आले. पंखा चालू झाला.
बाई चाळीशीची आहे.
बाबा बेचाळीस ?
की बाई पस्तीशीची ?
बाबा चाळीशीचा ?
पण बाळ आठ नऊ महीन्यांचं ?
उशीरा झालेलं दिसतंय.
बाळाच्या पिशवीतून एक नॅपकीन काढून त्याचं डोकं पुसायचा आई प्रयत्न करते.
बाळ परत कुरकुर करतंय
आई -बाबा -बाळ सगळेच ओले गच्च आहेत.
रांग पुढे का नाही सरकत आहे ?
गाड्या उशीरा येण्याची घोषणा.
अत्यंत खेद आहे.
म्हणजे तासभर तरी उशीर नक्की.
आता बाळ आईकडे.
रडण्याचा पहीला आलाप सुरु झाला आहे
रात्रीचे आठ वाजणार आहेत.
नवी घोषणा गाड्या स्थगीत आहेत.
रांगेत खळबळ .
काअहो आपण किती वाजता पोहचू ?
घरी गेल्यावर कळेल. तिरसट उत्तर.
अहो असं चिडताय का ?
मी नुस्तं विचारलं.
मी नको म्हणत होतो ना ?
आता घरी जाईपर्यंत ही रडून उच्छाद मांडणार आहे.
नाही हो शहाणी आहे. झोपेल आता.
गाडीत वारं लागलं की झोपेल.
गर्दी बघ.गाडीत चढायला मिळेल ?
पुढे काय ?
काही कळलं नाही.
बाळानी जोरात सूर लावला.
पावसाचा जोर वाढला आहे. रांग हलते आहे.
कुठे जाणार आहेत.
चला.
यांच संभाषण ऐकता ऐकता आता टाईम पास छान होईल.
अहो काय करायचं हो आता ?
बाळानी सूर ठणठणीत लावला आहे.
वरच्या कप्प्यातली पाण्याची बाटली द्या जरा .
कुठे आहे ?
अहो मी आठवणीनी घेतली होती.
टॅक्सीत पडली वाटतं.
अहो पाण्याची बाटली आणा न आता .
छ्या अजून भांडण पेटलं नाही बरोब्बर .
मी संभाषणात प्रवेश करतो.
माझा नंबर धरा . मी आणून देतो.
बाबा संशयानी बघतो आहे.
अर्धवट वाढलेली पांढरी दाढी. पडायला आलेला चश्मा .
खिशात हात घालून पैसे शोधायला लागतो.
मी आणतो नंतर द्या पैसे.
तोपर्यंत नंबर आला तर ? आता बाईंचा प्रश्न .
मी हातात दहाची नोट ठेवतो. एक ठाण्याचं तिकीट काढा माझं.
पाणी घेऊन येताना चार मऊ चॉकलेटं पण घेतो.अनुभव कधी कामाला ये ईल काही सांगता येत नाही.
परत येईस्तो बाळाचं रडणं जोरात सुरु झालं आहे.
पाण्याचा घोट कसाबसा गेल्यावर शांतता.
अगं तिला निघताना दूधपाजलं होतं ना /
होय हो .अगदी पोट टम्म होईस्तो.
टम्म होईस्तो म्हणेपर्यंत बहुतेक सूसू झाली असावी. बाळानी चेहेरा वेडावाकडा केला .
डायपर ?
आहे जागेवर.
बाळ आता इकडे तिकडे बघून रडतंय .
तुम्ही त्या बाकावर का बसत नाही ?
चांगली सूचना .रडं काही थांबत नाही आहे.
कुठंपर्यंत जाणार तुम्ही ?
कर्जत . तूटक उत्तर.
बाप रे .खोपोली आता पाच मिनीटापूर्वी गेली.
माहीत्येय. पाठच्या कर्जतनी जाणार आहोत.
त्रासीक तार आवाजात वाढत चालली आहे.
नवी घोषणा. गाड्या आणखी उशीरा येणार आहेत.
या गर्दीत चढायला मिळेल ?
त्याच्या वर्मावर बोट ठेवल्यासारखं झालं .
म्हणून मी ....अनोळखी माणसाला काय सांगायचं असं वाटून गप्प बसला.
बघा एक सांगू ?
त्या बाबाचा चेहेरा आणखी त्रासीक झाला .
तुम्ही महालक्ष्मी पकडा.
अहो तिकीट ?
लोणावळ्याचं काढा .
काय उपयोग ? जनरल डब्यात गर्दी मरणाची .
रीझर्व डब्यात चढा.
बघू.
दूरून बाळाच्या रडण्याचा आवाज आला.
बाळ आजारी आहे का ?
त्यानी मान नकारार्थी डोलावली.
का रडतय ?
खांदे उडवले.
आई परत आली.
बघा ना हो .रडायची थांबत नाहीय्ये.
तिला भूक लागली का ?
नाही हो .पोट भरलेलं आहे.
हे काका म्हणतायत महालक्ष्मीनी जाऊ या.
नको बाई ,टीसी पकडेल.
मी येतो बसवून देतो तुम्हाला .मला आता स्फुरण आलं आहे.
बसवून द्याल हो पण ..
बाळानी जोरात किंचाळायला सुरुवात केली आहे.
हीला जरा गप्प बसवा हो.
मी चॉकलेट पुढे करतो.
पाच मिनीटाची शांतता. तिकीट विंडो जवळ जवळ आली आहे.
तुम्ही नक्की बसवून द्याल का हो?
होय.
तुम्ही रेल्वेत आहात का ?
रेल्वेत असतो तर रांगेत कसा असतो ?
मग ?
अटेंडंटशी बोलायचं
बाप रे नक्की नाही म्हणजे .
नक्की आहे.
बाळाचं चॉकलेट संपलं आहे.
जोरात आवाज सुरु झाला आहे.
आई रडकुंडीस आली आहे.
काय झालं हो हिला ?
कळतच नाही. मघापासून रडते आहे.
झोप आलीय का ?
वेळ झालीच आहे.
मला पण आता थकल्यासारखं वाटायला लागलं आहे.
सिगरेटची वेळ झाली आहे.
मी तिकीट घेतो.
तुम्ही थांबा पाच नंबरवर थांबा . मी आलोच.
याल ना ? आईचा प्रश्न .
चल गं.
बाईंनी डायरेक्ट माझ्याशी बोलणं आणि माझ्यावर भरोसा करणं बाबाला आवडलेलं नाही.
माझा जीव सिगरेटसाठी कासावीस झाला आहे.
बाहेर उभं राहून दोन जोरकस दम मारल्यावर बरं वाटलं.आता घरी गेल्यावर गरम भात कालवायच्या आठवणीनी तोंडाला पाणी सुटलं .
बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि बघीतलं .आई बाबा माझ्यासाठी ताटकळत उभे होते.
चला.महालक्ष्मीची एस १ एस २ एस३ ची घोषणा सुरु झाली होती.
एस ६ मध्ये जाउ या .
एस-६ च्या दारात वर्मा किंवा यादव कुणीतरी उभा होता.त्याच्या बाजूला चार पाच फुटीर मंडळी चार्टची चर्चा करत उभी होती.
वर्माला बाजूला घेउन कल्याण कोट्यात बसायची व्यवस्था केली
थोडेसे संभाषण चातुर्य दाखवले तर हे रेल्वेत फारसं कठीण नसतं.
पाच मिनीटात गाडी हलली .बाळ रडण्याचं काही थांबत नव्हतं.
आता मांडीवर घेऊन बाबा झोपवण्याचा प्रयत्न करायला लागले.
आईनी बाळाची पिशवी उघडून एक दुपटं बाहेर काढलं .
आतून एक हॉस्पीटलची फाईल डोकावायला लागली.
तर मंडळी हॉस्पीटलला गेली होती तर.
मी मांडी घालून जरा स्वस्थ बसलो.
काही मुंगी किडा तर नाही ना बाळाच्या कपड्यात ?
आईनी एकदा चेक केलं .
बाबासाहेब टॉयलेटला गेले होते.
हात पुसत ते चुळबुळ करत उभे राहीले.
तू जाउन ये एकदा .
बाळ आता बाबांकडे.
मला एक नवल वाटतं होतं .
एक कोडं दादरपासून उलगडत नव्हतं.
ते हे की या रडणार्‍या पोरीशी दोघांपैकी कुणीच लाडेलाडे बोलत नव्हतं
मी खिडकीकडे खूण केली .
वार्‍यावर बाळ शांत झोपेल.
आश्चर्य नंबर दोन.
माझी जेव्हढी काही बडबड चालली होती ती एखाद्या नाटकातल्या पात्रानी स्वगत म्हणावं आणि श्रोत्यांनी शांतपणे ऐकावं असं चाललं होत.
आता बाळाची रडण्याची आणि शांत रहाण्याची फ्रीक्वेन्सी बदलत चालली होती.
बाळ झोपायला काही तयार नव्हतं.
आता त्यानी हातपाय झाडायला सुरुवात केली होती.
दोघंही न बोलता आळीपाळीनी एकमेकांकडे बाळाला देत घेत होते.
माला सारखी घरची आठवण यायला लागली.मी पायातून मोजे काढले.
बाहेरच्या बेसीनजवळ धुतले पिळले .परत घातले.
भयंकर अस्वस्थ वाटावं असं वातावरण .
पोराचा आवाज आता घसा बसल्या सारखा येत होता.
हुंदके वाढले होते.
रात्रीचे नऊ वाजले होते.
मला अचानक लक्षात आलं की बाळाला काय हवं आहे.
मग देत का नाही ही आई त्याला हवं ते ?
हॉस्पीटलची फाईल आठवली.
बाप रे! ह्या बाईला ब्रेस्ट कॅन्सर तर नाही ना ?
कुठली आई मुलानी रडण्याची वाट बघेल ?
मी स्वत:ला शिव्या घातल्या.
उशीरा पोरं झाली की असंच.सार्वजनीक ठिकाणी पोर पाजायला लाज वाटत असेल.
कदाचीत गाठी झाल्या असतील .मी माझं मेडीकलचं ज्ञान माझ्या मनासमोरच पाजळत होतो.
गाडी सायन स्टेशनच्या बाहेर थांबली.
मी बाबाकडे नजर टाकली.तो असहाय्य बघत बसला होता.
मी मनाशी धीर करून त्याला विचारलं .
बाळाला दूध पाजायचं असेल तर मी बाहेर उभा राहतो.
त्याचा चेहेरा मख्ख.
मी आईकडे रोखून पाहीलं .
चेहेर्‍यावर काहीही ढीम्म नाही.
बाळानी रडणं थांबवण्याची चिन्हं दिसेनात.
गाडी हलली.
कुर्ल्याला बाहेरच्या सिग्नलला थांबली.
मला आता बाळ निळसर दिसायला लागलं होतं.
तोंडातून येणारा फेस दिसायला लागला होता.
मनाला सांगीतलं आता हे पोर शॉकमध्ये जाणार.
दुसर्‍या क्षणी खणखणीत आवाजात मी आईला विचारलं
अहो, तुम्ही बाळाला पदराखाली का घेत नाहीय्ये. मी मघापासून विचारतोय तुम्हाला मी बाहेर जाऊ का म्हणून ?
आणि आपापसातली त्रयस्थ भिंत कोसळली.
दोघही एकाच वेळी म्हणाले
ही आमची मुलगी नाहीय्ये हो.आमची नात आहे .
आता शॉक मला बसला.
मी स्वतःला सावरत पुढचा प्रश्न विचारला .
मग आई कुठे आही ?
दवाखान्यात.वाडीयामध्ये.परेलला.
काय झालय ?
ही चार महीन्याची असतानाच तिला दिवस गेलेत.
आधीचं सिझरीअन.
डॉक्टर म्हणतात गर्भधारणा नळीतच झाली आहे.
नळी आणि पिशवी कालच काढली. जावई आहेत सोबत तिच्या
आम्ही हिला घरी घेऊन जातोय.
बाप रे !!
वय काय आहे तिचं ?
एकोणीस.
म्हणजे पहीलं मूल अठराव्या वर्षी ?
काय करणार ?
गावात वयात आलेल्या मुलीला घरात ठेवणं म्हणजे...तुम्हाला नाही कळणार ते.. आम्ही कर्जत पासून पाच मैलावर राहतो.आमच्या जातीची गावात दोनच घरं .
आमचंही लग्न आमव्या सोळाव्या वर्षी झालं .
एकच मिनीट विचार केला आणि बोलायला सुरुवात केली.
हे बघा ,या घडीला या बाळाला फक्त आईच्या स्तनपानाची गरज आहे.बाळाला स्तनपान करताना जेव्हढं सुरक्षीत वाटतं तेवढ आणखी कुठेच वाटत नाही. हा अक्रोश आईपासुन दुर केल्याचा आहे.
मी ठाण्याला उतरून जाईन पण कल्याणपर्यंत हे बाळ शॉकमध्ये म्हणजे बेशुद्धीत गेलेलं असेल.
माझा पंधरा वर्षाचा अनुभव कामाला आला.
आईनी नव्हे आज्जीनी डोळ्यात पाणी आणत विचारलं
आम्ही काय करू हो ? तिकडे पोर आजारी इकडे हिचं काय होईल हो आता...
मी नजर रोखून सांगीतलं
तुम्ही घ्या पदराखाली ..
कायच्या काय बोलता हो तुम्ही .आजोबांचा स्वर तापला होता
आम्ही तुम्हाला बरे भेटलो.. आम्ही काय अगदी गावठी नाही..
खक्कन आवाज आला.
बाळाचं रडणं थांबून छातीचा भाता घट्ट धरल्यासारखा झाला.
अहो बघा ना ही कशी करतेय.
आजोबांनी माझ्याकडे न बघता सांगीतलं
पाणी मार पाणी मार..
पाण्याचा शिपका मारला .
बाळाचा श्वास सुटला पण क्षणभरच,
दुसर्‍या क्षणी परत खक्क् खक्क आवाज आला.
बाळ बेशुध्दीकडे जायला लागलं होतं.
आता आजोबांचा धीर सुटला
हे काका म्हण्तात तसं करून बघ.
आज्ज्जीनी ताबडतोब पदर सावरून बाळाला पदराखाली घेतलं .
श्वास मोकळा सुटल्याचा आवाज आला.
मी आजोबांना खूण करून बाहेर बोलावलं .
हे बघा माझी सूचना तुम्हाला अगाऊपणाची वाटली असेल पण आहे ते असंच आहे.मलाही कळत की या वयात उगाचच दूध कसं येणार पण बाळाला दूध नको आहे .त्याला झोपेपूर्वीचं आई जवळ असल्याचे युफोरीक फीलींग हवंय. त्याला छान छान वाटायला हवंय.
तुम्हाला माहीती आहे ?
दक्षीणेकडे नवजात बालकाचं पहीलं स्तनपान आज्जी करते ते ?
त्यानी नकारार्थी मान डोलावली.
अहो तो मान आहे आज्जी होण्याचा.सगळ्या कुटूंबाची आई ती .घराण्यातल्या मातृत्वाचा सन्मान आहे तो.
गाडी आता जोरात धावायला लागली होती.
आम्ही दोघंही आत येऊन बसायला आणि एक वाक्य माझ्या कानावर पडलं
अगं चावू नकोस ना गधडे ?
परीस्थीती नॉर्मलला आल्याची पावती मिळाली.
आज्जीच्या मांडीवर नात शांतपणे पहुडली होती.
स्तनपान देउन शिणलेल्या बाईचा चेहेरा काही वेगळाच दिसतो.एक हलकं हास्य. थोडीशी वेदना.
आजोबा गंभीर झाली होते.
बराच वेळ माझा हात हातात घेउन रडत होते.
गाडी ठाण्याजवळ आली.
मी हात सोडवून घेतले.
आज्जीला आणि नातीला झोप लागली होती.
जीवतीचं एक सुरेख चित्र माझ्यासमोर होतं .
कोण म्हणतं साक्षात्कार व्हायला अध्यात्मात झोकून द्यायला हव.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

दशानन's picture

25 Jul 2009 - 1:22 pm | दशानन

निशब्द !

+++++++++++++++++++++++++++++

पर्नल नेने मराठे's picture

25 Jul 2009 - 1:35 pm | पर्नल नेने मराठे

खरच..
चुचु

पर्नल नेने मराठे's picture

25 Jul 2009 - 1:35 pm | पर्नल नेने मराठे

खरच..
चुचु

मराठमोळा's picture

25 Jul 2009 - 1:25 pm | मराठमोळा

वा!!
अनुभवकथन आणी समुपदेशन दोन्ही आवडले. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

मराठमोळा's picture

25 Jul 2009 - 1:27 pm | मराठमोळा

.

वेताळ's picture

25 Jul 2009 - 1:28 pm | वेताळ

.............
वेताळ

परिकथेतील राजकुमार's picture

25 Jul 2009 - 1:44 pm | परिकथेतील राजकुमार

गुर्जी पुन्हा एकदा निशब्द झालो !

खरच तुमचे अनुभव कथन बर्‍याचदा सुन्न करुन जाते.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

अमोल खरे's picture

25 Jul 2009 - 1:58 pm | अमोल खरे

असेच म्हणतो.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

28 Jul 2009 - 11:07 am | घाशीराम कोतवाल १.२

निशब्द झालो मास्तर
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती

प्रमोद देव's picture

25 Jul 2009 - 1:47 pm | प्रमोद देव

प्रभू तुझी ’लीला’ अपरंपार! :)

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Jul 2009 - 1:51 pm | बिपिन कार्यकर्ते

...

बिपिन कार्यकर्ते

आनंदयात्री's picture

25 Jul 2009 - 2:19 pm | आनंदयात्री

...

अवलिया's picture

25 Jul 2009 - 3:01 pm | अवलिया

...

Nile's picture

25 Jul 2009 - 3:06 pm | Nile

.

घाटावरचे भट's picture

25 Jul 2009 - 4:11 pm | घाटावरचे भट

....

श्रावण मोडक's picture

25 Jul 2009 - 4:13 pm | श्रावण मोडक

...

निखिल देशपांडे's picture

25 Jul 2009 - 8:09 pm | निखिल देशपांडे

...

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jul 2009 - 9:21 pm | llपुण्याचे पेशवेll

.....
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

संदीप चित्रे's picture

26 Jul 2009 - 5:26 am | संदीप चित्रे

...

मस्त कलंदर's picture

25 Jul 2009 - 3:23 pm | मस्त कलंदर

........

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jul 2009 - 3:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काय बोलू?

अदिती

प्रदीप's picture

25 Jul 2009 - 3:53 pm | प्रदीप

चरे पाडत जाणारे लिखाण. ...सजग अनुभव.

प्रभू मास्तर, तुमची अनुभवांची पोतडी अशीच भरलेली राहू दे.

विसोबा खेचर's picture

25 Jul 2009 - 4:27 pm | विसोबा खेचर

जीवतीचं एक सुरेख चित्र माझ्यासमोर होतं .
कोण म्हणतं साक्षात्कार व्हायला अध्यात्मात झोकून द्यायला हव.

सुरेख..!

तात्या.

दत्ता काळे's picture

25 Jul 2009 - 4:46 pm | दत्ता काळे

. . . . .

सहज's picture

25 Jul 2009 - 5:16 pm | सहज

भारी! पॅसीफायर माहीत नाही?

स्वाती२'s picture

25 Jul 2009 - 5:12 pm | स्वाती२

मस्त!

विसुनाना's picture

25 Jul 2009 - 5:20 pm | विसुनाना

बस इतकंच.

शैलेन्द्र's picture

25 Jul 2009 - 6:58 pm | शैलेन्द्र

खुपच छान हो खुपच....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jul 2009 - 7:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, काय लिहावं !प्रसंग डोळ्यासमोर तरळून डोळ्याच्या कडा ओलावून गेला. च्यायला आपण प्रगतीच्या लै गप्पा मारतो, पण साले आमचे प्राथमिक प्रश्न अजून सुटले नाहीत. छ्या..!

सर, लिहीत राहा..!

-दिलीप बिरुटे

पोलिसकाका_जयहिन्द's picture

25 Jul 2009 - 7:12 pm | पोलिसकाका_जयहिन्द

...................

"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."

My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

25 Jul 2009 - 8:07 pm | नितिन थत्ते

......
मास्तरांना अजून एक साष्टांग नमस्कार.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

प्राजु's picture

25 Jul 2009 - 8:21 pm | प्राजु

हम्म! ...
काय बोलू?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

कालिन्दि मुधोळ्कर's picture

25 Jul 2009 - 8:57 pm | कालिन्दि मुधोळ्कर

उत्क्रष्ट प्रकटन. धन्यवाद.

पिवळा डांबिस's picture

25 Jul 2009 - 9:19 pm | पिवळा डांबिस

सुंदर!!!

टारझन's picture

25 Jul 2009 - 9:24 pm | टारझन

लेखनशैली आवडली !! छाण लिहीलंय .... पण तुम्ही जे सांगितलं ते त्या रिकाम्या डोक्यांना कळायला हवं होतं .. सोळाव्या वर्षी लग्न वगैरे .. आणि पोरगी चार महिण्याची होत नाही तो पुन्हा एक टेंगूळ ? कठिण आहे !!

असो .. लेख वाचावासा वाटला !!

शाहरुख's picture

25 Jul 2009 - 11:01 pm | शाहरुख

प्रतिसादातील प्रत्येक वाक्याला +१ !!

विनायक प्रभू's picture

26 Jul 2009 - 12:38 pm | विनायक प्रभू

अपघात झाला की टेंगुळ येतेच की.

सखी's picture

25 Jul 2009 - 11:23 pm | सखी

जीवतीचं एक सुरेख चित्र माझ्यासमोर होतं .
सुरेखच लिखाण...

नंदन's picture

26 Jul 2009 - 12:14 am | नंदन
शशिधर केळकर's picture

26 Jul 2009 - 1:48 am | शशिधर केळकर

सर विलक्षण आहे हा अनुभव! वेळ निघून जाण्यापूर्वी तुम्ही आवाज चढवला म्हणून बरे. नाहीतर समोर घडताना मूग गिळून बसले, तर अनिष्ट व्हायचे टळले नसते. या क्षणी तुम्ही आजोबा आजी सर्व काही झालात! कमाल आहे. दुसरे आवडले, ते आजी ने सांगितल्याप्रमाणे केले. सगळेच जरतारी!
तुम्हाला साष्टांग नमस्कार!

योगी९००'s picture

26 Jul 2009 - 2:38 am | योगी९००

..........

..........
जीवतीचं एक सुरेख चित्र माझ्यासमोर होतं .
कोण म्हणतं साक्षात्कार व्हायला अध्यात्मात झोकून द्यायला हव.

हे खरंच छान...

खादाडमाऊ

विंजिनेर's picture

26 Jul 2009 - 5:47 am | विंजिनेर

आवडले....
बाकी आजीला मुलीपेक्षा अनुभवाने जास्ती जाण असते तेव्हा त्यांना हे(मण्हजे मूल का रडतं इ.) कुणी त्रयस्थाने सांगावे लागले ह्या गो­ष्टीचे नवल वाटले.
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

धमाल मुलगा's picture

29 Jul 2009 - 7:12 pm | धमाल मुलगा

विंजिनेराशी सहमत! ह्या गोष्टी एका आई होऊनच आजी झालेल्या बाईला कळू नयेत?

आणि त्या छोटीचा बाप काय डोक्यात पांगळा आहे का? एक पोर धड वरच्या अन्नाला तोंडही लावायच्या आधीच कसली आलीये इतकी घाई?

बाकी, मास्तराना _/\_.
गाढवांना झॅ: होऽऽ झॅ: करायचं हेही मोठंच काम की!

क्रान्ति's picture

26 Jul 2009 - 8:47 am | क्रान्ति

जीवतीचं एक सुरेख चित्र माझ्यासमोर होतं .
कोण म्हणतं साक्षात्कार व्हायला अध्यात्मात झोकून द्यायला हव.

शब्दांच्या पलिकडले!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

स्वाती दिनेश's picture

26 Jul 2009 - 12:55 pm | स्वाती दिनेश

काय बोलू? शब्द संपले.
स्वाती

प्रसन्न केसकर's picture

26 Jul 2009 - 2:25 pm | प्रसन्न केसकर

एव्हढेच म्हणतो.
काळजाला भिडले तुमचे लिखाण.....

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

ज्ञानेश...'s picture

26 Jul 2009 - 3:40 pm | ज्ञानेश...

=D> .

"Great Power Comes With Great Responssibilities"

डॉ.प्रसाद दाढे's picture

26 Jul 2009 - 10:29 pm | डॉ.प्रसाद दाढे

खरोखरीच निशब्द! शीर्षकही किती समर्पक..!

अश्विनीका's picture

27 Jul 2009 - 10:25 pm | अश्विनीका

आपला अनुभव छान मांडला आहे.

बाळांच्या अशा रडण्यावर पॅसिफायर हा एक चांगला उपाय आहे. पोट भरल्यावरही फक्त झोपेसाठी जवळ घेण्यासाठी बाळ रडत असेल तर पॅसिफायर तोंडात दिल्यास बाळ शांत होऊ शकते...विशेषतः जेव्हा बाळाची आई जवळ नसेल तेव्हा बाळाला सांभाळ्णार्‍यांनी पॅसिफायर जवळ बाळगल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. भारतात आता मिळत असावे . (बाटली चे बूच वापरू नये. त्याने पोटात हवा जाते.)
पॅसिफायरचेही काही तोटे आहेत पण ते व्यवस्थित वापरल्यास त्याचा बाळाच्या तब्येतीवर काहिहि वाईट परीणाम होत नाही. (जसे तोंडात देण्यापूर्वी स्वच्छ / निर्जंतुक केलेले असावे...यासाठी ३-४ सेट जवळ ठेवावेत. ते नेहमी स्वच्छ डबीत ठेवावे. आणी मुख्य म्हणजे बाळ त्यावरच अवलंबून राहील एवढी टोकाची सवय लावू नये. )

baby with pacifier

pacifier

- अश्विनी

श्रीयुत संतोष जोशी's picture

28 Jul 2009 - 9:21 am | श्रीयुत संतोष जोशी

जबरदस्त.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

ऋषिकेश's picture

28 Jul 2009 - 9:59 am | ऋषिकेश

मी हे उशीरा वाचलं पण देर आये दुरुस्त आये
प्रभूमास्तर
__/\__

-ऋषिकेश

स्मिता श्रीपाद's picture

28 Jul 2009 - 10:58 am | स्मिता श्रीपाद

जीवतीचं एक सुरेख चित्र माझ्यासमोर होतं .
कोण म्हणतं साक्षात्कार व्हायला अध्यात्मात झोकून द्यायला हव.

अप्रतिम...
डोळ्यात पाणी आलं..

-स्मिता

बेचवसुमार's picture

28 Jul 2009 - 11:10 am | बेचवसुमार

डोळ्यातुन पाणी काढायला लावलंत मास्तर तुम्ही!!!

दिपक's picture

28 Jul 2009 - 11:32 am | दिपक

निशब्द.

स्नेहश्री's picture

28 Jul 2009 - 4:17 pm | स्नेहश्री

फारच अप्रतिम आहे.

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

हर्षद आनंदी's picture

28 Jul 2009 - 4:36 pm | हर्षद आनंदी

कोण म्हणतं साक्षात्कार व्हायला अध्यात्मात झोकून द्यायला हव.

वाचता वाचता शब्दांशी एकरुप होऊन जाणे-- याचा अनुभव आला,

.....बाकी निशब्द.....

भोचक's picture

28 Jul 2009 - 6:27 pm | भोचक

शब्दांपलीकडचा अनुभव

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

संकेतजी कळके's picture

29 Jul 2009 - 6:51 pm | संकेतजी कळके

तोडलत मास्तर ..........

अश्विनि३३७९'s picture

30 Jul 2009 - 12:40 pm | अश्विनि३३७९

ख्ररचं निशब्द केलतं
अश्विनि ....

श्रावण मोडक's picture

3 Sep 2011 - 12:10 pm | श्रावण मोडक

शुचिनं अन्यत्र दुवा दिला आहेच. नव्या मंडळींनी आवर्जून वाचावं यासाठी धागा वर काढतो आहे. लेखकांना मार्गदर्शन, किंवा संपादकांचे संपादन असल्या मुद्यांच्या वादळात हे 'लव्हाळ' मोलाचेच. :)

शाहिर's picture

3 Sep 2011 - 1:44 pm | शाहिर

निशब्द....

नगरीनिरंजन's picture

3 Sep 2011 - 2:17 pm | नगरीनिरंजन

कासावीस झालो वाचून.

आळश्यांचा राजा's picture

3 Sep 2011 - 2:47 pm | आळश्यांचा राजा

डोळ्यांतून पाणी काढणारं लिखाण.

थँक्स, शुचि आणि श्रामो.

किसन शिंदे's picture

3 Sep 2011 - 5:04 pm | किसन शिंदे

ठाण्याच्या कट्ट्याला रामदास काकांनी मला विचारलं "तु प्रभू मास्तरांच लिखान वाचलयसं का?"

आधी पाहिलचं नसल्याने साहजिकच मी नाही म्हणालो.

" अरे नक्की वाच, त्यांच लिखान वाचण्यासारखं असतं, खुप छान लिहतात ते" रामदास काका.

जीवती वाचून मला रामदास काकांच बोलणं १००% पटलं.

प्रभू मास्तरांना _/\_

धनंजय's picture

3 Sep 2011 - 5:52 pm | धनंजय

विप्र यांच्या खास शैलीत चांगले लिहिले आहे.

(आधी हे लेखन मी वाचलेले नव्हते. वर आणल्याबाबत प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद.)

मितभाषी's picture

15 Sep 2011 - 6:10 pm | मितभाषी

.........

पाषाणभेद's picture

16 Sep 2011 - 12:05 am | पाषाणभेद

---^---

शहराजाद's picture

17 Sep 2011 - 5:13 am | शहराजाद

_/\_

जेपी's picture

1 Apr 2015 - 8:48 am | जेपी

....

सविता००१'s picture

1 Apr 2015 - 11:31 am | सविता००१

____/\_____

भिंगरी's picture

1 Apr 2015 - 2:33 pm | भिंगरी

आणि नविन माहिती मिळाली.
दक्षीणेकडे नवजात बालकाचं पहीलं स्तनपान आज्जी करते

प्रियाजी's picture

1 Apr 2015 - 3:01 pm | प्रियाजी

इतका सुंदर लेख वर आण्ल्याबद्दल धन्यवाद. वाचून डोळ्यात पाणीच आले. कोणाची काय काय मजबूरी. समूपदेशन हे सगळ्यात महत्वाचे ह्या अनुभवात. लेखकराव जियो.

रुपी's picture

25 Apr 2015 - 5:20 am | रुपी

सुंदर लेख! खूपच छान..

सुखी's picture

13 May 2020 - 11:48 am | सुखी

सुरेख....

चांदणे संदीप's picture

13 May 2020 - 12:41 pm | चांदणे संदीप

काळजाचा ठाव घेणारे वेगवान लेखन. अतिशय आवडले. वर काढणार्‍याला अनेक धन्यवाद!

सं - दी - प

सिरुसेरि's picture

13 May 2020 - 1:52 pm | सिरुसेरि

वेधक अनुभव कथन . +१००