राम राम मंडळी,
आपल्याला एखादं गाणं का आवडतं?
दोन ढोबळ उत्तरं - १) त्याचे शब्द आपल्याला आवडतात, २) त्याचं संगीत, त्याची चाल आपल्याला आवडते.
आता चाल आवडते म्हणजे काय? तर त्यातील लय, स्वरावली, किंवा एखादा स्वर आपल्याला आवडून जातो. या लेखात वानगीदाखल म्हणून आपण शुद्ध गंधाराचा सुंदर उपयोग केलेलं एक गाणं पाहू. कसा आहे हो हा शुद्ध गंधार?
शुद्ध गंधार हा मला नेहमीच अत्यंत तेजस्वी स्वर वाटत आलेला आहे. एखाद्या मिट्ट अंधार असलेल्या रस्त्यावर वीज चमकावी आणि क्षणात संपूर्ण रस्ता प्रकाशमान व्हावा तसा आहे शुद्ध गंधार. अत्यंत तेजस्वी, स्वभावाने चौकस परंतु तेवढाच हळवा देखील! उत्तम मिळालेल्या तानपुर्यातून आपल्याला अत्यंत विशुद्ध, जवारीदार स्वरुपाचा शुद्ध गंधार जेव्हा ऐकू येतो तेव्हा मन अगदी प्रसन्न होतं.
मदनमोहन साहेबांचं 'बैय्या ना धरो' हे गाणं आपण सर्वांनी ऐकलं आहे. त्यातल्या 'ना करो मोसे रार' या ओळीतील 'रार' या शब्दावरचा शुद्ध गंधार किती सुंदर आहे पाहा. माझ्या मते त्यामुळे गाण्याची दिशाच एकदम बदलते. आधीच्या नुसत्या 'बैय्या ना धरो' या शब्दांतील कोमल धैवताचं काहीसं गंभीर वातावरण थोडं हलकं होतं. पुढे अंतर्यात हाच शुद्ध गंधार अजून मौज आणतो..
ढलेगी चुनरिया तनसे,
हसेंगी रे चुडिया छनसे..
या अंतर्यातील 'हसेंगी रे चुडिया छनसे' या ओळीतील 'चुडिया' या शब्दावर शुद्ध गंधाराचा जो काही न्यास आहे त्याला तोड नाही. मला वाटतं तो न्यास स्वत: मदनमोहन साहेबांना देखील अतिशय आवडला असावा कारण त्यांनी 'छनसे' या शब्दावर छान दुहाई घेऊन पुन्हा एकवार 'हसेंगी रे चुडिया छनसे' या ओळीतून तो शुद्ध गंधाराचा देखणा न्यास अभिव्यक्त केला आहे. अर्थात, अध्ध्या त्रितालाशी खेळणारी 'छनसे'ची दुहाई आणि नंतरची 'हसेंगी रे चुडिया'ची सम, या दोन्ही गोष्टी लाजवाब. उच्चतम गायकीचा एक नमुना! अर्थात, तुम्हा-आम्हाला अत्यंत अवघड वाटणार्या अश्या स्वरालयीच्या हरकती सहज करून जाणं हीच तर मदनमोहन साहेबांची खासियत आणि त्या हरकती, त्या जीवघेण्या जागा लीलया पेलणं हीच तर 'लतादिदी' या नावामागची जादू!
आपल्याला आवडलेल्या गाण्यातील एखाद्या स्वराचा, एखाद्या स्वरावलीचा अभ्यास करताना, शोध घेतांना, मागोवा घेतांना खरंच खूप आनंद होतो हेच खरं!
स्वरालयीचा शोध! कधीही न संपणारा एक अनमोल ठेवा. मम सुखाची ठेव...!
--तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
23 Jul 2009 - 5:25 pm | चकली
तुमचे गाण्यांच्या रसास्वादाचे लेखन एका धाग्यावर संकलित केलेत तर खूप छान होइल. हे रसग्रहण पण छान.
http://chakali.blogspot.com
23 Jul 2009 - 5:49 pm | यशोधरा
हे रसग्रहण आवडले, पण अधिक उदाहरणे देऊन लेख अजून खुलवता आला असता का?
23 Jul 2009 - 5:56 pm | विसोबा खेचर
नक्की आला असता. उदाहरणंही अनेक आहेत. परंतु ते पुन्हा केव्हातरी मूड लागेल तेव्हा नक्की लिहीन..
धन्यवाद..
तात्या.
23 Jul 2009 - 8:43 pm | क्रान्ति
आणि अशा सुंदर स्वरालयींचा शोध घेण्यासाठी तात्यांचा मूड लवकर लागो! आमच्यासारख्या गानवेड्या रसिकांसाठी ही एक पर्वणीच असते.
खूप सुरेख गाणं आणि तितकंच सुरेख रसग्रहण. :)
:) क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
23 Jul 2009 - 6:17 pm | सहज
गाणे ऐकायला मजा आली.
हिंदी चित्रपट संगीताची खुमारी काही औरच!
येउदे अजुन!
23 Jul 2009 - 6:37 pm | रेवती
कसलं जीवघेणं गाणं आहे.
आतापर्यंत मला त्याची चाल /स्वरावली आवडली होता.
आपण केलेल्या चांगल्या रसग्रहणामुळे शब्दही आवडू लागले आहेत.
आपणास धन्यवाद!
रेवती
23 Jul 2009 - 9:36 pm | तर्री
आम्हाला गाण्यातले एवढे कळत नाही हो तात्या , नाहितर नक्की लिहिले असते. पण आपण जरूर लिहावे.
पण तात्या , मला काही स्वरलयी खूप भावतात , तुम्ही त्यांचे रसग्रहण करावे ही.वि.
१.बडा नटखट हैं रे कॄष्ण कन्यैया ...मधील "है आणि रे " मधे/जवळ काय सुंदर जागा आहे . हे काय ?
२.चुपके चुपके चल रे पूर्ववै या..मधील पुढ्च्या ओळीत "काय जादू केली आहे.
दोन्ही गाणी पंचम्दांची आहेत व बाईंनी गायली आहेत (म्या पामरने काय बोलावे त्यांच्याबद्दल?)
23 Jul 2009 - 10:36 pm | भाग्यश्री
लेख काहीच झेपला नाही..
ते गाणं चांगले असून ऐकले पाहीजे हे कळले..
ऐकते आता.. :)
http://www.bhagyashree.co.cc/
23 Jul 2009 - 10:46 pm | बेसनलाडू
गाणे छानच आहे; परत परत ऐकावेसे! आता परत ऐकावेच!
(कानसेन)बेसनलाडू
23 Jul 2009 - 10:45 pm | स्वाती२
तात्या, रसग्रहण आवडले. एक लेखमाला कराना.
23 Jul 2009 - 10:51 pm | मनीषा
आणि त्याचं तितकच सुरेख रसग्रहण ...
23 Jul 2009 - 11:09 pm | बिपिन कार्यकर्ते
तात्या, गाणं आहेच क्लास. मला नेहमीच आवडत आलेलं आहे हे गाणं. परत ऐकलं. परत आवडलं. पण आपल्याला गाण्यातलं कळत नाही ही बोच परत एकदा तीव्र झाली.
बिपिन कार्यकर्ते
23 Jul 2009 - 11:15 pm | विसोबा खेचर
स्वरांशी थोडीफार तरी ओळख असल्यास ते नक्कीच चांगले परंतु नसली तरी काही बिघडत नाही. गाण्यातलं काही कळलं नाही तरी चालेल, गाणं आवडल्याशी मतलब!
आमची म्हातारी पुरणपोळी फार सुरेख करते. ती कशी करते, इत्यादी पाककृतीतले बारकावे मला माहीत नाहीत..
तरीही तिने केलेली पुरणपोळी मला प्रचंड आवडते हे सत्य नाकारता येत नाही! :)
तात्या.
23 Jul 2009 - 11:59 pm | बिपिन कार्यकर्ते
सहमत आहे तात्या. बरं वाईट तेवढं कानाला कळतं. पण बारकावे कळले असते तर अजून मजा आली असती. बाकी उदाहरण चपखल आहे.
अवांतर: या निमित्ताने मागे एकदा धनंजयबरोबर 'कलेचा आस्वाद कसा घ्यावा' ही याच अनुषंगाने झालेली चर्चा आठवली.
बिपिन कार्यकर्ते
24 Jul 2009 - 12:56 am | धनंजय
होय त्या खरडचर्चेची मलाही आठवण आली.
पुरणपोळीचे उदाहरण चपखल आहे. अन्नाच्या चवीत बरे ते कित्येकदा कळते.
वाईटही कधीकधी कळते, पण त्याबद्दल कधी पाय घसरू शकतो. कधीकधी "बरे" सुद्धा कळण्यापूर्वी ते वाईट वाटू शकते. वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षी मासे खायला लागलो, तेव्हा अगदी सुगरणीच्या हातचे सुद्धा बांगडे, तार्ले, वगैरे तीव्र-सुवासिक मासे आवडत नसत. नावडतच. सौम्य चवीचा काटे नसलेला विसवण (?रोहू?) तितका आवडायचा. हळू-हळू सोप्या विसवणाच्या कापापासून सुरुवात करून मग आमटीतले काटेरी मासे, (आता कच्चे मासेही!) आवडू लागले आहेत. कोणी हात धरणारा गाईड मिळाला तर अनुभवसौंदर्याचे विश्व मोठे होते.
म्हणूनच हिंदी चित्रपट, उपशास्त्रीय गाण्यातली मेख समजावून देणारा असा लेख वाचून बरे वाटते. हा रोहू चवीने खाऊन, मग पुढे तार्लेही मिटक्या मारत चाखू लागेन, अशी आशा उत्पन्न होते.
24 Jul 2009 - 1:06 am | बिपिन कार्यकर्ते
परत एकदा सहमत!!!
बिपिन कार्यकर्ते
24 Jul 2009 - 7:55 am | नंदन
म्हणजे सुरमई. 'सूरमयी' चर्चेत हे उदाहरण पाहून गंमत वाटली :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
23 Jul 2009 - 11:21 pm | अवलिया
तात्या, लेख वाचला.
कळला नाही हे स्पष्ट आधीच सांगतो, कारण आपल्याला गाण्यातलं ओ की ठो कळत नाही.
पण गाणं ऐकायला आवडतं. आणि ऐकतो.
आता माझा प्रश्न -
गाणं आवडायला ते कळलंच पाहिजे असे आहे का ?
--अवलिया
23 Jul 2009 - 11:29 pm | विसोबा खेचर
असे मुळीच नाही...
जसे,
उत्तम बालूशाही कशी करतात हे मला कळत नाही परंतु आवडते मात्र खास! :)
तात्या.
24 Jul 2009 - 11:00 am | अवलिया
धन्यवाद तात्या.
असे जर असेल तर एखादे गाणे ऐकल्यावर सूरतज्ज्ञ (पक्षीः तुमच्यासारखा 'सा' पासुन 'नी' पर्यंत सूर जाणणारा ) जेव्हा "गाणं आवडलं" असे म्हणतो आणि मकारतज्ज्ञ (पक्षीः आमच्यासारखा पंच'म'कारात रमणारा ) "गाणं आवडलं" असे म्हणतो, तेव्हा "गाणं आवडलं" या वाक्याने दर्शवल्या जाणा-या अनुभुतीतला साम्य-भेद काय असतो?
कोणती अनुभुती श्रेष्ठ व का ?
--अवलिया
* * * * * * * * * * * *
डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !
24 Jul 2009 - 12:04 pm | विसोबा खेचर
ज्याला जे भावले, जसे भावले तेच श्रेष्ठ! मला त्यातल्या चार स्वरांची ओळख आहे म्हणून मी थोडं डिटेलमध्ये लिहू शकतो, एक्सप्रेस करू शकतो. या गाण्यातला गन्धार मला भावला, तोच गन्धार दुसर्या कुणालाही भावू शकतो, फक्त त्याला गंधार म्हणतात हे त्याला ठाऊक नसतं. त्याकरता काही एक शिक्षण लागतं आणि बरीचशी श्रवणभक्ति लागते जी मी केली आहे, आजही करतो..
परंतु मिळणार्या आनंदात काहीच फरक नसतो. स्वर जाणणार्या, न जाणणार्या कुणालाही तो तेवढाच मिळू शकतो..
ईश्वरी साक्षात्कार केवळ वेद वगैरे जाणणार्या-मुखोद्गत असणार्या एखाद्या प्रकांड पंडितालाच होतो असं नव्हे, तर तो तुकोबांसारख्या केवळ भक्तिने ओतप्रोत भरलेल्या एखाद्या वाण्यालाही होऊ शकतो आणि माझ्यासारख्या दुनीयेभरची सव्यापसव्य केलेल्यालाही होऊ शकतो..
आनंद मिळवायचा असेल तर श्रद्धा असणं, भक्ति असणं सर्वात महत्वाचं! मग ती गाण्यावर असो, खाण्यावर असो, एखाद्या सुंदर डोंगरावर असो, की एखाद्या सुंदर मुलीवर असो..! :)
आपला,
(वेदविद्या-संगीतविद्याशास्त्र संपन्न, हरिभक्त परायण)
पंडित तात्याशास्त्री अभ्यंकर.
24 Jul 2009 - 4:01 am | योगी९००
अर्थात, तुम्हा-आम्हाला अत्यंत अवघड वाटणार्या अश्या स्वरालयीच्या हरकती सहज करून जाणं हीच तर मदनमोहन साहेबांची खासियत आणि त्या हरकती, त्या जीवघेण्या जागा लीलया पेलणं हीच तर 'लतादिदी' या नावामागची जादू!
म्हणूनच मदनमोहन यांच्याविषयी दिग्गज संगितकार नौशाद असे म्हणतात की "मदनमोहन ..तुझ्या एका गझलेसाठी माझ्या सर्व चालीं ओवाळून टाकाव्या वाटतात".
आणि ओ.पी. म्हणतात की " देवाने लताचा आवाज मदनमोहन यांच्या चालींसाठी बनवला आहे का मदनमोहन यांना लताच्या आवाजासाठी बनवले आहे हे ठरवणे कठिण आहे."
खादाडमाऊ
(लग जा गले के फिर...)
24 Jul 2009 - 5:07 am | विकास
रसग्रहण आवडले. शाळाकॉलेजात असताना विविधभारतीवर सकाळच्या प्रहरी "संगीत सरीता" म्हणून एक कार्यक्रम लागायचा त्याची अचानक या निमित्ताने आठवण झाली. (त्याकाळी असे सकाळी ऐकायचो... मिपावगैरे वाचन आणि खरडन सकाळच्या प्रहरी नसायचे ;) )
बाकी लेख जसा थोडा अजून विस्तृत असलेला बरा तसेच अजुन काही अशी चांगली उदाहरणे देता आली तर पहा. एकाच सुरावटीतून नाहीतर गंधार समजून घेणे जरा अवघड वाटते.
या निमित्ताने मदनमोहनजींनी गायलेले "माई रे ..." हे आवडते गाणे युट्यूबवर ऐकायला मिळाले...
24 Jul 2009 - 8:45 am | क्रान्ति
हा संगीत सरिता कार्यक्रम अजूनही रोज सकाळी ७.३० वाजता विविधभारतीवर प्रसारित होतो. संगीतक्षेत्रातील तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन लाभणारा हा कार्यक्रम अप्रतिम आहे. [पण बहुधा त्यात हिंदी गीतांचेच रसग्रहण होते. मराठी नाट्यसंगीताबद्दलची आशाताई खाडिलकरांची एक मालिका सोडली, तर बाकी मराठी कमीच. रागांची माहिती, त्यातली बंदिश, आणि त्यावर आधारित हिंदी गीत असं साधारण स्वरूप असतं. कधी वेगवेगळी वाद्ये, ध्रुपद, धमार हे भारदस्त गीतप्रकार, ठुमक चली ठुमरी या शीर्षकांतर्गत
ठुमरी-दाद-याचे प्रकार असा अवघा १५ मिमिटांचा सुरेख कार्यक्रम आहे तो. सध्या रुद्रवीणा या वाद्यावरची मालिका सुरू आहे.
नंदा यांचा प्रतिसाद खूप आवडला. तसेच धनंजय यांनी दिलेले दुवेही खूप महत्त्वाचे आहेत.
[संगीत सरितेतली छोटीशी मासोळी] क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
24 Jul 2009 - 5:09 am | नंदा
तात्यांना जसा या गाण्यातला शुद्ध गांधार भावला, तसा मला काही गाण्यांतला अनपेक्षित असा शुद्ध मध्यम भावतो.
१. 'मावळत्या दिनकरा' हे हृदयनाथांनी बरचसं मारव्यात बांधलेलं गाणं (गायिका अर्थात लताबाई). यात ते पहिल्या आणि शेवटाच्या कडव्यांत शुद्ध मध्यम वापरतात (उदा: 'जो तो पाठ फिरवी मावळत्या' ओळीमधली 'वळत्या' वरली जागा, तसंच मुखड्यातलं 'अर्घ्यं तुज' मधली 'तुज' वरची जागा) तो मला चमत्कृतीपूर्ण वाटतो पण अतिशय आवडतो. कदाचित मारव्यातलं या शुद्ध मध्यमाच आगंतुक अस्तित्व यामागे कारणीभूत असावं.
२. अशीच एक जागा महावीर काथक यांनी मारव्याच्या आसपास बांधलेलं 'सांज भई घर आजा' (ऐका: http://ww.smashits.com/tsearch/music/song/ghar-aaja.html - यादी मधलं शेवटाच गाणं) या लताबाईंच्या गाण्यात आहे. 'आसका सूरज आजा' या ओळीत 'जा' वरती जो मारव्यातल्या तीव्र मध्यमानंतर शुद्ध मध्यमावरचा ठहराव येतो तो केवळ लाजवाब. या गाण्याचं ऑर्केस्ट्रेशनही फार सुरेख आहे. मारव्यातली सायंकाळची आर्त हुरहुर त्यांत नेमकी उतरली आहे. त्यांत बाईंचा भावपूर्ण स्वर ... मग काही विचारायलाच नको.
३. पुन्हा बाळासाहेबांचच, अलिकडलं यमनातलं, सुरेश भटांच 'मग' हे विरहगीत. त्यात मारव्याची अस्वस्थ हुरहुर नाही, पण पूर्ती न झालेल्या प्रीतीचा विषाद आहे. हा सारा विषाद व्यक्त करत भट शेवटी त्या प्रेमाच्या 'अवचिता परिमळु' प्रमाणे अनपेक्षितपणे वार्याच्या मंद झुळुकेसोबत येणार्या सुगंधी आठवणींची 'मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद, माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल' अशी प्राजक्ताच्या हळुवारपणे टपटपणार्या फुलांशी तुलना करतात, तेंव्हा बाळासाहेब दुसर्या 'मंद' वर दोन्ही मध्यमांना असा काही स्पर्श करतात की लताबाईंच्या वयोमनानुसार पोक्तावल्या सुरांमधूनही तो परिमळ तुमच्यापर्यंत पोहोचतो.
24 Jul 2009 - 8:03 am | नंदन
लेख.
>>> उच्चतम गायकीचा एक नमुना! अर्थात, तुम्हा-आम्हाला अत्यंत अवघड वाटणार्या अश्या स्वरालयीच्या हरकती सहज करून जाणं हीच तर मदनमोहन साहेबांची खासियत आणि त्या हरकती, त्या जीवघेण्या जागा लीलया पेलणं हीच तर 'लतादिदी' या नावामागची जादू!
-- सहमत आहे. एरवी ऐकताना सोपं वाटणारं गाणं इतर कोणी म्हणायचा प्रयत्न केल्यावर किती कठीण आहे याची कल्पना येते. नंदा यांचा प्रतिसादही आवडला.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
24 Jul 2009 - 4:37 pm | मोहन
तात्या
तुमचे गाण्यांच्या रसग्रहणात्मक लेख छानच असतात.
पण मला नेहमीच प्रश्न पडतो की कवितेच्या,लेखांच्या किंवा अगदी चित्रांच्या रसग्रहणासारखे गाण्याचे रसग्रहण, रसास्वादात मदत करते का? कविता कळायला, त्यातली ,रुपके, वृत्त, छंद ई. समजायला रसग्रहणाने मदत होते. तसेच इतर प्रकारात पण म्हणता येईल. पण गाण्याच्या व तेही चित्रपट वा सुगम संगीताच्या रसग्रहणा बाबतीत होते का?
पुरणपोळी खाल्ली व अप्र्तीम लागली. त्यात जायफळ घातल्याने , अर्धा गूळ ,अर्धी साखर याच्या मिश्रणाने चांगली चव लागली वगैरे तपशील करणार्याला महत्वाचे वाटतील खाणार्याला त्याचे काय?
आम खाओ पेड क्यूं गिनते हो? ( हां लेकिन आम खाया या अमरुद ये मालुम करने के लीये पेड देखने पडेंगे :B )
मोहन
24 Jul 2009 - 5:31 pm | प्रशांत उदय मनोहर
गंधारचा आणखी प्रभावी प्रयोग "गगनसदन तेजोमय" या गाण्यात आढळतो. वास्तविक तिलककामोद रागाचा वादीस्वर नसूनही समेवरचा गंधारचा प्रयोग एक सुरेख टेम्पो सेट करतो. "तेजोमय" गाताना सुरुवातीला दीदींनी गंधारापासून जी हरकत घेतली आहे तीतर लाजवाब. डोंगराळ भागात नागमोडी वळणातून झरा वहावा आणि एकदम दरी आल्यावर त्याचा धबधबा होऊन आसपासच्या खडकांना स्पर्श न करता थेट खालती सपाट भागावर आदळावा इतक्या आकर्षकपणे षड्जावरून समेवर येऊन गंधार दाखवण्याचा इफेक्टसुद्धा अप्रतीम.
आपला,
(संगीतप्रेमी) प्रशांत
24 Jul 2009 - 6:02 pm | प्रदीप
सुंदर माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार. हे लेख इथे संग्रहित करावे हे मी अगोदरही तुम्हाला लिहीले होते, ते जरा मनावर घ्यावे.
व्यक्तिशः मला गांधार इत्यादी काही कळत नाही :( . तरीही जुनी गाणी ऐकतांना अनेक जाग भावून जातात ('गूजबंप्स जागा'). ती गाणी मदन मोहनची असतात, तसेच शंकर जयकिशन, नौशाद, सलिल चौधरी, एस. डी. बर्मन, जयदेव, चित्रगुप्त (गुणी पण दुर्लक्षित संगीतकार), आणि लक्षीकांत प्यारेलाल (उगाच बदनाम झालेले)... यादी बरीचा मोठी आहे.....
पटकन आठवतात ती दोन उदाहरणे...
इथे सुरूवातीची तान, आणि त्यानंतर आलेला 'हो...'हा उसासा (हा 'विंटाज' लताबाईंचा..)
अजून एक गाणे मनात घर करून आहे ते हे
शब्द, गाण्याची चाल, मधले इंटरल्यूड्स (सतार व सरोद इतर कुणीही एकाच इंटरल्यूडमधे वाजवलेल्या ऐकल्या नाहीत), आणी अर्थातच लताबाईंचे गायन, सर्वच कसे जमून आलेले.
24 Jul 2009 - 10:31 pm | शशिधर केळकर
लेख छान आहे. चर्चा ही चांगली रंगली आहे. एकूण असे वाटते, की अभिजात कलेबद्दल, तिचा आस्वाद घेण्याबद्दल अनेकाना खूप आवड आहे.
मागे एकदा कोणी एकाने लिहिले होते की संगीतातल्या 'जागा' कोणत्या असतात ते सांगा. वरती चर्चेत काहीनी म्हटले आहे, की संगीताची शास्त्रोक्त जाण त्याना नसली, तरी आस्वादकाचा कान आहे. शास्त्रोक्त जाण असल्याने काही फरक पडतो का? वगैरे. या बद्दल मला एक गोष्ट प्रकर्षाने वाटते, जाणवते. ज्या कलेमधे आपण जितके अधिक पारंगत होऊ, तितके अधिक तिचा आस्वाद घेण्याची आपली क्षमता वाढत जाते. कला म्हणा, विद्या म्हणा, तिच्यात अतुलनीय साधना होऊ शकते - अमर्याद. ज्याचा जितका व्यासंग जास्त, तितकी आस्वादाची प्रगल्भता जास्त. कुसुमाग्रजांच्या कविता, अर्जुनाचे शरसंधान, अण्णांची तान, बिरजूमहाराजांचे पदलालित्य, थिरकवांचा तबल्यावरचा हात - हे सर्व उदाहरणादाखल उल्लेखले - या सर्वांबद्दल कोण भाष्य करू शकेल? ज्याला ती ती विद्या आत्मसात असेल तो. तात्यानी वर तुकारामांबद्दल लिहिले. आध्यात्मिक प्रगती या विषयातही बहुधा असेच असावे. ज्याला गंधार म्हणजे काय हे माहीत नाही, त्याला ते समजून त्याची जेव्हा प्रचीती येईल तेव्हा होणारा आनंद, हा ती 'जागा' कळल्याचा आनंद आहे. असो. वाटले, सुचले तसे लिहिले. चुकले असल्यास क्षमस्व!
(कलासक्त) शशिधर
24 Jul 2009 - 10:52 pm | विदेश
एक्दम्बेष्ट रसग्रहण! एका पाठोपाठ एक शोध येऊ द्या, तात्या.