ये जो देस है तेरा.. स्वदेस है तेरा!

भाग्यश्री's picture
भाग्यश्री in जनातलं, मनातलं
22 Jul 2009 - 2:21 am

"श्या.. हाईट झाली ही.. गेल्या काही दिवसात किती वेळा आले हे फिलिंग? असं काय होतंय.. ओह नो.. मला उचला इथून कोणीतरी ! चिडचिडचिडचिड होतीय........................." मी पाय आपटत होते अक्षरश:..
"अगं हो.. शांत हो जरा! काय होतंय़? कंटाळा आला का परत?? " इती नवरा
"हो मग काय.. दुसरं काय होतं मला.. कंटाळा कंटाळा कंटाळा.. कंटाळ्याचाही कंटाळा आला या कोटीचा सुद्धा कंटाळा आलाय!! .. :("
"ह्म्म.."
"ह्म्म काय!! कर काहीतरी या कंटाळ्याचे.. मी दमले आता.. रोज आपलं सोल्युशन शोधायचे आजचा कंटाळा कसा घालवू मी...."
"असं काय करतेस.. मान्य आहे बोर होतं इथे कधी कधी.. आईबाबा,मित्र मैत्रिणी,आपण जिथे वाढलो ते शहर.. आठवणी तर येतातच! तुला हवं तेव्हा उठून भारतात नाही जाता येणार.. पण किती वैतागशील? आई बाबा होते ना इथे सहा महीने.. तुझ्याच बरोबर ६ महिने नव्हते ते.. पण एकाच देशात, एकाच टाईमझोन मधे असण्याचा फायदा झालाच ना! फोनबिलावरुन कळलेच मला ते!! ;) "
"हो रे.. काय मजा यायची.. दिवसातून ३दा तरी फोन व्हायचे आमचे! त्यातून भाच्याच्या गमती जमती! वाह काय मस्त दिवस होते.. पण ते भारतात परतल्यापासून जास्तच वाटतंय मला असं.. :( "

"ही ना अमेरिका भंगार..भंगार.. भंगारेस्ट आहे !! मला आत्ताच्या क्षणाला काहीही आवडत नाहीये इथलं.. एकतर आपल्या गावात आपली लोकं कमी.. त्यातून अमेरिकन्स जास्त.. त्यान्ना हाय हॅलो सोडून काही बोलता येतं की नाही कोण जाणे! मला ना असं कोणीतरी पाहीजे.. अपॉइन्टमेन्ट, फॉर्मॅलिटी सगळं सोडून फोन न करता छान पैकी आरामात घरी येऊन कॉफी पीत गप्पा हाणणारी मैत्रीण हवीय़! श्या किती आम्ही मारायचो गप्पा अशा.. मिथु,मनी.. sigh.. ... इथे आहेत ना लोकं, मैत्रीणी.. पण किती ते अंतर? अमेरिकेच्या एका टोकावरून दुसरीकडे जायचे म्हटले तरी विमानाने ८-१० तास लागतात!! सगळंच अवघड! साधी कोथिंबीर आणायला गाडी काढून १५-२० मैल तरी गाडी हाकावीच लागते!! "
" घरं पण कसली पुठ्ठ्याची! मला इथल्या भिंती पण आवडत नाहीत.. पांढरे पुठ्ठे सगळे! रात्री अंगावर येतात अंधारात! सुरवातीला आठवते ना कसे झाले.. २-३ आठवडे नुसती वाईट स्वप्नं मला! म्हणजे आधीच तो वाईट्ट जेटलॅग लागला होता.. वेड्यासारखी कधीही झोपायचे.. रात्री टक्क जागी.. कधीतरी झोप लागली तर वाईट स्वप्नांची रांग.. कधी मी पडतीय, कधी कोणीतरी माझा पाठलाग करतंय, कधी कोणी मारतंय.. अर्रे काय्ये हे ?? :(( "
"अगं नवीन जागा.. त्यातून तू कधी पुणे सोडून राहीली नाहीयेस.. येणारच ना त्या अशा (भितीदायक) जुन्या आठवणी..!! " (माझा नवरा पुण्याचा नाही, त्यामुळे तो पुण्यावरून टॉन्ट्स मारणे सोडत नाही!! )

"गप हा.. पुण्याला नावं नकोयेत.. मी आधीच इतकी मिस करतीय.. आणी तू असं बोलतोस.. काही वाटतं का तुला?? तुझी गरीब बिचारी बायको इतकी वैतागलीय.. आणि तुला जोक्स सुचतायत.. व्हेरी फन्नि!!! :(( ते काही नाही.. तू काहीतरी कर.. कळलं का? मला पुण्याला जायचेय..सगळ्या मैत्रिणींना भेटायचेय.. पुण्याला भेटायचेय माझ्या! आई बाबांबरोबर राहायचंय.. आईला स्वयपाक करून तिच्या आवडीचे खायला करून द्यायचंय(एकदातरी!! :D ), त्यांच्याबरोबर कॅरम,रमी खेळायचीय! खूप काही! तेही आत्ताच्या आत्ता !!?? "
"आय नो, आय नो... डोन्ट वरी.. जाशील तू लवकरच.. ओके? नॉऊ चिअर अप! काय कंटाळा कंटाळा करतीयस.. विकेंडला कुठे जायचे ते कर बरं प्लॅन.. मी काही पाहणार नाही.. लोकेशन, रस्ते, हॉटेल्स सगळं ठरव.. जाईल वेळ जरा.. तसंही तू काही सोडणार नाहीस प्लॅनिंग नीट करायला.. नंतर ऑर्कुटवर फोटो टाकून शायनिंग मारायचे असते ना! हेहे"
"हो म्हणजे काय! :)) अरे ते शायनिंग मारणे नसते रे ! मी काय करतीय सद्ध्या, कुठे भटकंती, किती खादाडी केली ते सगळं एका क्लीक मधे कळतं ना माझ्या मित्र-मैत्रिणी,घरच्यांना.. ते सगळं शेअर करणं हा उदात्त(!) हेतू असतो बरका! लोल.. :) "
"ह्म्म नशीब हसलीस.. आता जा काहीतरी मस्त खायला कर! वरणफळं नाहीतर साबुदाण्याची खिचडी कर! "
"ह्म्म, आला मूळपदावर! सा.खि. काय अरे.. जमेल का अशी इन्स्टंट! करते काहीतरी !! मलाही भूक लागली वैताग करून!"
-------------------------------------------------------------------------------------------
नेहेमीचे डायलॉग्स हे..
( घरची मंडळी : घाबरू नका! टेन्शन घेऊ नका! मी एकदम मजेत आहे! :) )

सगळे तोंडावर आले नसतील संवाद.. पण मनात सतत वाजत असतात..
किती मिस करते मी इंडिया, पुणे, सगळंच,सारखंच..
वरचा संवाद वाचून असे वाटेल की मी अगदीच दिवसभर फ्रस्ट्रेट होऊन बसलेली असीन.. तसं काही नाही! मस्त आराम फर्मावतीय़.. भरपूर हिंडतीय.. खूप नवीन पदार्थ करायला शिकतीय, ते खात सुद्धा आहे! इथेही मैत्रिणींशी फोनवर का होईना गप्पा हाणतीय.. चॅट तर काय असतंच.. इथेही मंडळाचे कार्यक्रम असतात, भरपूर मराठी पब्लिक साधारण ४०-५० मैलांवर असतेच! बरेच नातेवाईक राहतात जवळच..

सगळं बेस्ट आहे हो! पण म्हणून इंडीयाची आठवण येणारच रोज! नाही जाऊ शकत मी हवं तेव्हा, मनात येइल तेव्हा.. अंतर,नोकरीतून सुट्ट्या,व्हीजाच्या कटकटी असतातच, त्या सगळ्या जंजाळातून जाणे म्हणजे कुठे सोप्पंय!

आत्ता लिहीता लिहीता अजुन एक जाणवलं.. भारताबद्दल आपल्या मायभूबद्दल इतकं, इतकं आतून वाटत असतं सारखं.. जीव तीळ तीळ तुटतो कधी कधी! आई कधीतरी सांगते शक्य तितक्या नॉर्मल आवाजात, की चिऊड्या आत्ताच तुझी इतकी आठवण आली, असला सही पाऊस पडातोय़!.... अशा परिस्थितीत धड उठून जाताही येत नाही.. समजूत काढूनही उपयोग नसतो, आणि काय काढणार? कसंनुसं हसून विषय बदलायचा अन काय!
असं आणि इतकं वाटत असताना जेव्हा कोणी भारतातले भारतीय, भारतात नसलेल्या भारतीयांवर सरळ जिभेचे आसूड ओढतात ना तेव्हा खरंच कळत नाही.. आजकाल नेटने जग फार जवळ आलंय.. लिखित मिडिअम असल्यामुळे कोणी काहीही बोलले तरी फारसा फरक नाहीच पड्त! पडून घेऊ नये! पण मग असं पदोपदी दिसत असेल तर आपण नक्की काय करावं?(अगदी कॉमन उदाहरण घ्या, इसकाळमधे येणारे वाचकांच्या कमेंट्स!! ) आमची काही आकांक्षा आहे, एक ठराविक ध्येय आहे आयुष्यात, काही नवीन गोष्टी साध्य करायच्या, नवनवे प्रदेश पाहायला मिळ्तात, काही शिकायचे असते.. हे सर्वं चूकच का?? आपलं, आपल्या आई बाबांचे, कुटुंबाचे आयुष्य जमेल तितके सोपे करायचे.. या विचाराने आम्ही इथे येतो.. त्यांच्याबद्दल प्रेम जाऊदे, पण द्वेष का वाटावा इतका? इतका.. की त्या लोकांनी भारताबद्दल आपुलकीनी बोलायचेही नाही, काही सुधारणा दिसल्या परदेशात, तर त्यांबद्दल बोलले की तुम्ही बादच! आमचा देश आम्ही पाहून घेऊ.... अरे?? आमचा देश?? तो आपला देश आहे ना? देश सोडला ’फिजिकली’ की संपलं का? मग खेडेगावातून पुणे मुंबईत येणार्‍याचा का अपवाद? त्यानेही त्याचा गाव सोडला म्हणायचा का?? नाही ना! मग तीच संकल्पना ग्लोबली का ताणता येत नाही आपल्याला? :( इट हर्ट्स.. पण जाऊदे.. जशी परदेशात आहे म्हणून बळंचच भारावून जाणारी लोकं असतात तस्साच पण उलटा प्रकार!

आम्हालाही अभिमान वाटतो ना देशाचा, तिरंगा दिसला की ऊर भरून येतो, छ. शिवाजी महाराजांच्या कथा ऐकून स्फुरण चढते, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला जमेल तसे कार्यक्रम होतात इथे, कार्यक्रमापेक्षाही ती देशभक्तीची भावना आमच्याही मनात तेव्हढीच असते, मुंबईवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा माझ्याच काळजाची जखम असल्यासारखे सैरभैर झाले होते मन... अजुनही ए.आरचे "ये जो देस है तेरा..." ऐकताना न चुकता पाणी येतं!! आम्ही भारतीयच आहोत शेवटी... जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी! आणि मायभूला स्वत:च्या ’माय’ इतकंच मिस करत राहणार.. म्हणून तर हे सगळं मराठी साईट्स शोधणे, मराठीतून ब्लॉग लिहीणे, पुस्तकं शोधणे वगैरे करत असतो आपण.. जमेल तसं भारतीय,महाराष्ट्रीय लोकं शोधून गणगोत जमवतोच ना आपण? इंडियन रेस्टॉरंट दिसलं की पावलं वळतातच ना तिथे? शेवटी आयुष्याची कमीत कमी २४-२५ वर्षं जिथे काढली ती पुसून थोडीच जाणारेत?? कसं शक्य आहे..!
------------------------------------------------------------------------------------------------
हे अन असं सारखं येतच असतं डोक्यात.. बर्‍याच दिवसांपासून काहीतरी लिहायचे होते असे.. अर्थात मनातले विचार परफेक्ट नक्कीच उतरले नाहीयेत.. नाहीतर मी प्रथितयश लेखिका नसते का झाले! :) नेहेमीप्रमाणेच मनात आले तसे उतरवले..
आवडले तर नक्की कळवा.. नाही आवडले तरी कळवा चालेल! :)

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Jul 2009 - 2:28 am | llपुण्याचे पेशवेll

हम्म खरे आहे..
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jul 2009 - 7:15 pm | बिपिन कार्यकर्ते

खूप मनापासून लिहिलंय. जाणवतंय लख्खपणे. त्रास करून घेऊ नकोस. नवीन आहेस. एकटी आहेस त्यामुळे होतंय असं. अर्थात जुनी झाल्यानंतर होणार नाही असं नाही. माणसामाणसातला फरक आहे हा. कोणाला आयुष्यभर वाटतं कोणाला एक दिवसही वाटत नाही. पण असं मुळापासून उपटून काढल्यासारखी भावना येते ना ती अगदी जीवघेणी असते. पण आपल्यासाठी, आपल्या आईवडिलांसाठी, लेकराबाळांसाठी करायचे म्हणून मन मारून करावे लागते. दॅट्स लाईफ. कान्ट डू मच अबाउट इट. बी हॅप्पी. :)

बाकी अनिभा वि. निभा हा एव्हरग्रीन विषय आहेच. मी भारतात राहून गोरे झालेले आणि भारताबाहेर राहूनही अजून काळेच असलेले असे सगळेच प्रकार बघितले आहेत त्यामुळे माझ्या दृष्टीने असे सरधोपट क्लासिफिकेशन होऊ शकत नसल्याने हा वादच मुळात गैरलागू आहे. असो. बाकी चालु द्या.

बिपिन कार्यकर्ते

यशोधरा's picture

22 Jul 2009 - 7:44 pm | यशोधरा

मस्त प्रतिक्रिया बिपिनदा.

लिखाळ's picture

22 Jul 2009 - 8:49 pm | लिखाळ

बिपिनचा प्रतिसाद आवडला.

आपल्या मनोरंजनासाठी उपाय शोधत राहणे आणि एकाच उपायावर जास्त काळ अवलंबून न राहणे हा एक बरा उपाय असतो.

बाकी मराठीसंकेतस्थळांवर या पूर्वी निवासी-अनिवासी या विषयांवर इतके चर्वण झाले आहे की नवा प्रतिसाद टंकण्याऐवजी जुन्या चर्चांचे दुवे देणे जास्त बरे पडावे :)
-- लिखाळ.
जगी सर्वसूखी असा कोण आहे । विचारी मना तूची शोधूनी पाहे । -समर्थ.

संदीप चित्रे's picture

23 Jul 2009 - 12:43 am | संदीप चित्रे

तुझ्या प्रतिसादातलं प्रत्येक वाक्य पटलं.
भाग्यश्री --
अमेरिकेत आल्यापासून भारत दौरा घडला की नाही? कारण भारतातून परत येताना अर्ध्यावाटेतूनच परतावंसं वाटतं मग भले ती पहिली भारतभेट असो की दहावी !

हवालदार's picture

22 Jul 2009 - 3:17 am | हवालदार

अनिवसीवदी भारतीय : अगदी मनातले लीहिले आहेस.

निवसीवदी भारतीय : एवढी आठवण येते तर गेलातच का तिकडे. इकडे सहनुभुती मिळवयची आणि फुकट्चे सल्ले द्यायचे

;-) क्रुपया हसून घेणे.

लेख छान जमला आहे.

भाग्यश्री's picture

22 Jul 2009 - 3:22 am | भाग्यश्री

हेहे.. येस, वादासाठी तलवारी आणि वादानंतरसाठी चपला तैय्यार आहेत! :))
जोक्स अपार्ट, मला खरंच उगीचच वाद नकोय इथे.. म्हणूनच लिहून आठ दिवस नुसताच ठेवला होता.. आता पब्लिश केलं खरं, but I really wish to have a good discussion and not bombardment of arguments! :)

http://www.bhagyashree.co.cc/

पिवळा डांबिस's picture

22 Jul 2009 - 3:46 am | पिवळा डांबिस

भाग्यश्री,
चांगलं लिहिलंयस...
पण याचा कितपत उपयोग होईल याबद्दल मी साशंक आहे...

नीलकांत's picture

22 Jul 2009 - 4:01 am | नीलकांत

छान लिहीलंय. सरळ आतून आलेलं वाटलं.
लिहीत रहावे ही विनंती.

- नीलकांत

धनंजय's picture

22 Jul 2009 - 7:42 pm | धनंजय

मनापासून झालेले लिखाण. लिहीत राहावे, भाग्यश्री.

प्रमेय's picture

22 Jul 2009 - 4:46 am | प्रमेय

अगदी माझ्या मनातलं लिहिल आहे अस वाटतयं.
खरचं, जेव्हा जेव्हा कारमध्ये हे गाणे लागते तेव्हा तेव्हा मन बंड करून उठते...
वाटतं, जर एक संशोधक नासातली नोकरी सोडून घरी (खेडेगाव ते पण घरच ...)
जाऊ शकतो केवळ देश प्रेमाखातर तर, आपण कोणत्या खोडाचे आहोत तसे न वाटायला...

पण त्याचवेळी हा विचार मनात येतो:
जेव्हा तो शाहरूख खान भारतात परत येण्याचे ठरवतो, तेव्हा त्याला त्याच्या भारतातल्या भविष्याची खात्री असते. तो ISRO त संशोधक म्हणून नक्कीच प्रगती करू शकत असतो.
जर आपण परत जायचे ठरवले तर मिळून मिळून काय मिळणार?
Infy, LnT, TATA, Mahindra मध्ये नोकरीच ना?
ती पण कसली? तर Software Engineer...
म्हणजे काय? इकडे असतो घोडा, तिकडे गाढव.... फक्त ओझीच वहायची ना... मग घोडा तर घोडा. सिंहाच्या जास्त जवळ! (म्हणजे माझी ही समजूत आहे हं.. लहानपणी जे काही इसापनिती, हतीमताई वाचले आहे, त्यामुळे जंगलात जे काही प्राणी राहत असतात त्यांच्यामध्ये असे वर्गीकरण असते.सगळ्यात खाली कोल्हा, लांडगा असे दुष्ट प्राणी आणि वरचढक्रमाने गाढव ,घोडा, हत्ती, ऊंट असे प्राणी आणि सगळ्यात वरती वाघ आणि सिंह)

जर IITian झालो नसलो तरी काय झाले? मिळवलेले कमी नाही पडू द्यायचे... अजून काम करू, पण आता मन नाही मारायचे... जे मिळाले ते प्राक्तन जे घडवू ते भाग्य!
आलोच आहोत ना इथे.. मग पोतं भरून घेऊन जाउ या परत... मागाहून वाटायला नको कमी पडले म्हणून...

आणि जरा आजूबाजूला पाहिले तर काय दिसते? १०० माणसे आधीपासून इथेच होती की? मग आपण काय पाप केले आहे जर इथे राहिलो तर? आपण पण मारवाड्या, पंजाब्यांसारखी आपली माणसे आणि गाववाले आणूया इथे... सगळे मिळून प्रगती करूया..

काही वेळा वाटतं की, बाकीचे जे मराठी माणसाबद्द्ल बोलतात ते खरंच आहे.
आपणच एकमेकाचे पाय ओढत बसतो. बाकीचे वर जात राहतात आणि शेवटी आपणच आपली एकट्याची पुंगी वाजवत बसतो... मी एकटा आणि माझे कुटुंब एकटे. झक मारली आणि इथे आलो...

पण हेच विसरून चालत नाही की, आपण बाहेर पडलो आणि जास्त स्वतंत्र झालो. जास्त मोकळा विचार करू शकलो. नातेवाईकांना जास्त मदत करू शकलो... जर घरी असतो तर हे सगळे जमले नसते...

बाकी बरच नंतर...

अनामिक's picture

22 Jul 2009 - 5:41 am | अनामिक

प्रमेय साहेब, देश सोडून दुसरीकडे येण्याचा निर्णय स्वतःचा होता मग त्यासाठी उगाच अपराध्यासारखं का वाटून घेता, आणि प्रतिसादात दिलेलं जस्टीफिकेशन कशासाठी? मुळात देश आणि परदेश अशी तुलनाच व्हायला नको. प्रगती म्हणाल तर कुठेही होते... आपल्यालाच सोपा मार्ग हवा असतो... त्याचा अवलंब करणे चुक नक्कीच नाही... पण मग उगाच जिथे होतो ते खराब पेक्षा तुलनात्मक कमी दर्जाचं आणि जिथे आहोत ते चांगलं असा युक्तिवाद करू नये.

-अनामिक

Nile's picture

22 Jul 2009 - 5:08 am | Nile

मनमोकळं मनोगत आवडलं. जवळजवळ प्रत्येकाच्या मनातलं आहे असं म्हणलं तर अतिशयोक्ती होईल असे वाटत नाही.

कोणी भारतातले भारतीय, भारतात नसलेल्या भारतीयांवर सरळ जिभेचे आसूड ओढतात ना तेव्हा खरंच कळत नाही

अशा लोकांशी वाद घालणं निव्वळ निरर्थक! आपलं देशप्रेम-आपुलकी या लोकांनी असं म्हणल्याने नाहीशी होणार आहे का? :)

बेसनलाडू's picture

22 Jul 2009 - 5:24 am | बेसनलाडू

कोणत्या देशात, जातीत, प्रांतात इ. जन्माला यावे याची निवड आपली नाही; मात्र शिक्षण, रोजगार यांसाठी स्वकर्तृत्त्वावर जगाच्या पाठीवरील कोणत्या देशात, प्रांतात आणि मुख्यत्त्वे किती कालावधीसाठी जायचे ही निवड नक्कीच आपली आहे. ही निवड जितकी स्पष्ट नि ठाम असेल, त्या प्रमाणात लेखातील भावुकतेशी सामना करणे सोपे जाईल, असे वाटते. कारण मुळातच अनिवासी भारतीय वि. निवासी भारतीय या रटाळ वादाला भावनिकतेची पार्श्वभूमीच जास्त आहे, असे मला वाटत आले आहे.
व्यक्तिशः, ज्या उद्देशाने स्वदेश सोडला तो उद्देश कितपत सार्थ झाला किंवा नाही आणि कधी याचे फलित ध्यानात घेऊन स्वदेशी परतण्याचा किंवा न परतण्याचा निर्णय घेता येणे, हे सगळ्यात महत्त्वाचे आहे.
(अनिवासी)बेसनलाडू

टुकुल's picture

22 Jul 2009 - 5:38 am | टुकुल

>>>व्यक्तिशः, ज्या उद्देशाने स्वदेश सोडला तो उद्देश कितपत सार्थ झाला किंवा नाही आणि कधी याचे फलित ध्यानात घेऊन स्वदेशी परतण्याचा किंवा न परतण्याचा निर्णय घेता येणे, हे सगळ्यात महत्त्वाचे आहे... <<<
यातच सर्व काही आले..

बाकी लेख तर चांगला लिहिला आहे.. लिहित रहा..

--- अनिवासी भारतीय टुकुल.

अनामिक's picture

22 Jul 2009 - 5:51 am | अनामिक

भाग्यश्री, लेख अगदी मनापासून लिहिला आहेस. आवडला! मनाची झालेली द्विधावस्था ही इथून तिथून सारखीच असावी.

-अनामिक

आण्णा चिंबोरी's picture

22 Jul 2009 - 6:08 am | आण्णा चिंबोरी

भाग्यश्री तुला एवढे वाटते तर मग भारतात का येत नाहीस? तसे नसेल तर मग हे उसने उमासे कशासाठी? तुमचे भारतावर प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी?

छोटा डॉन's picture

22 Jul 2009 - 6:52 am | छोटा डॉन

भाग्यश्री, लेख अगदी खणखणीत जमला आहे.
एकदम मनापासुन आणि बहुतेक आहे तसे लिहले असल्याने कॄत्रिमता आणि नाटकीपणा अज्जिबात जाणवत नाही व एक प्रामाणिक वर्णन वाटले, खुब भालो ....

बाकी तो निवासी आणि अनिवासी वाद निरंतर आहे, त्याचे काळजी नकोच करु ...
>>वादासाठी तलवारी आणि वादानंतरसाठी चपला तैय्यार आहेत! )
=)) =)) =))
हा हा हा, हे एक भारी केलेस, तयार असलेले बरे नाही का ?

असो, उत्तम लेखन, असेच अजुन येऊद्यात.
आणि हो, जरा फ्रिक्वेंसी वाढवा लिखाणाची मॅडम...

------
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)

विकास's picture

22 Jul 2009 - 7:31 am | विकास

लेख चांगला आहे आणि भावना नक्कीच समजू शकतात...वर अनेकांनी म्हणल्याप्रमाणे हा निवासी-अनिवासी वाद हा कायमचा आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष देणे न देणे हे आपल्याच ठरवावे लागते.

थोडे वेगळ्या निरीक्षणाने आणि अनुभवाने या वादासंदर्भात लिहीतो. असे वाद का घडतात यावर जास्त विचार केला तर मनात खोल दडलेला कुठल्यान कुठल्याप्रकारचा गंड (complex) असतो. तो सर्वत्र असतो मात्र सर्वात असतो असा याचा अर्थ नाही. फक्त कारण केवळ. "आमचा देश आहे.." असे आपल्याच कालपर्यंतच्या देशवासियास आणि संस्कृतीने आजही तसाच असलेल्या म्हणणार्‍या व्यक्तीचा असतो तसाच तो विविध पद्धतीने नावे ठेवणार्‍या अनिवासी भारतीयपण त्याला कारण असतात. काही गोष्टी नक्कीच अशा आहेत ज्या बाहेर गेल्याशिवाय समजत नाहीत. मात्र त्याचा अर्थ आपण कसेही बोलावे आणि तुच्छ लेखावे अशी काही स्थिती नाही. आणि तशी असली तर ती कुठेही कुठल्यान कुठल्या कारणासाठी असू शकते...

मात्र यात अजून एक प्रकार पाहीला आहे: कधी कधी येथे (अमेरिकेत) जर कोणी कायमचे भारतात जात आहे असे सांगितले तर थोडे offensive वाटते. मग ते लगेच यावर वाद घालणार की तेथे काय ठेवले आहे, चांगले नसते वगैरे...

मला वाटते कोणी कुठे रहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि जो पर्यंत त्याच्यावरून देखावा (show off) केला जात नाही - मनापासून, तो पर्यंत काही फरक पडायचे कारण नाही.

या व्यतिरीक एक कायम प्रश्न पडतो:
अनिवासी भारतीय प्रकारात जर अमेरिकास्थित भारतीय हा प्रकार नसता, तर मग निवासी-अनिवासी भारतीय हा वाद कितपत झाला असता? ;)

प्राजु's picture

22 Jul 2009 - 8:05 am | प्राजु

विकासदादा ब्राव्हो..!

आम्ही दुसर्‍या देशात राहतो म्हणून आमचं आमच्या देशावर आमच्या मातीवर प्रेम नाही असा अर्थ नका रे काढू. तिथल्या शाळां -कॉलेजातून शिक्षण घेतलं आणि इथे येऊन पैसे कमवले... याचा अर्थ आम्ही भारतावर प्रेम करत नाही असा नक्कीच नाही. यातून फक्त तुमच्या मनात असलेला कॉप्लेक्स दिसतो असंच म्हणेन मी.

अनिवासी भारतीय प्रकारात जर अमेरिकास्थित भारतीय हा प्रकार नसता, तर मग निवासी-अनिवासी भारतीय हा वाद कितपत झाला असता?
१००% सहमत
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शाहरुख's picture

22 Jul 2009 - 9:38 am | शाहरुख

>>अनिवासी भारतीय प्रकारात जर अमेरिकास्थित भारतीय हा प्रकार नसता, तर मग निवासी-अनिवासी भारतीय हा वाद कितपत झाला असता? ;)

हे नाही कळाले..

विकास's picture

22 Jul 2009 - 9:43 am | विकास

जेंव्हा निवासी-अनिवासी असा (तुम्ही देशाबाहेर रहाता, आणि त्या संदर्भातील इमोशनल ब्लॅ़कमेलींग) तेंव्हा वाद हा अमेरिकेसंदर्भात होतानाच जाणवतो. कोणी ब्रिटनमधे आहे, जर्मनीत आहे, जपान मधे आहे, सौदी अरेबियात आहे अथवा सिंगापूर/हाँककाँग/चायना मधे आहे तर त्या संदर्भात विशेष बोलले जात नाही असे जाणवते.

आधी म्हणल्याप्रमाणे असे वाद घालायचे काही कारण नसते. पण तसे तरी वाद घातले जातात. कारण आधी दिले आहेच...

रेवती's picture

22 Jul 2009 - 8:09 am | रेवती

अगं भाग्यश्री, तू 'गीता' का वाचते आहेस?!

रेवती

प्राजु's picture

22 Jul 2009 - 8:13 am | प्राजु

सॉल्लिड प्रतिसाद.
=)) =)) =))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अडाणि's picture

22 Jul 2009 - 8:39 am | अडाणि

+१ सहमत....
विकास रावांचा प्रतिसाद पण खूप आवडला....

अवांतरः रेवतीतै तुम्ही पुण्याच्या का हो ? कमीत कमी शब्दात.....
-
अफाट जगातील एक अडाणि.

विकास's picture

22 Jul 2009 - 9:46 am | विकास

रेवतीतै तुम्ही पुण्याच्या का हो ? कमीत कमी शब्दात.....

=)) हा प्रतिसाद अजूनही कमी शब्दात झाला! ;) बाकी रेवतींचा प्रतिसाद सॉलीडच आहे!

अडाणि's picture

22 Jul 2009 - 10:17 pm | अडाणि

पुण्याच्या लोकांशी पंगा नाय पायजेल.... B)

-
अफाट जगातील एक अडाणि.

नंदा's picture

22 Jul 2009 - 8:14 am | नंदा

सुरवातीला सर्वचजण जातात यातून. पुढे नौकरी वगैरे करायला लागलात, स्वतःचे काही असे कामधाम असले, मित्र-मैत्रिणींचा ग्रुप असला की अमेरिका काय आणि भारत काय, सारे सारखेच. तोवर काही व्हॉलंटीयरींग, नॉन-प्रॉफिट सेक्टरमधे काम करता येइल. नाहीतर रिकामं मन, सैतानाच घर अशी अवस्था होइल. पण पुढे भारतातले संदर्भ निवत जातील, मुळ उखडत जातील. आता हेच घर, जितक्या लवकर हे समजताल, जवळ कराल, तेवढा मार्ग सुकर होइल. शुभेच्छा!

विसोबा खेचर's picture

22 Jul 2009 - 8:56 am | विसोबा खेचर

पण पुढे भारतातले संदर्भ निवत जातील, मुळ उखडत जातील. आता हेच घर, जितक्या लवकर हे समजताल, जवळ कराल, तेवढा मार्ग सुकर होइल. शुभेच्छा!

सहमत आहे. आमच्याही शुभेच्छा..

छान छान, पॉश पॉश, स्वच्छ स्वच्छ अश्या अमेरीकेत बसून लिहिलेला लेख आवडला! :)

आपला,
(निवासी भारतीय) तात्या.

ऋषिकेश's picture

22 Jul 2009 - 8:35 am | ऋषिकेश

छान! भावपूर्ण मनोगत.
कोणी कुठे रहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न हे खरेच. स्वतःला त्रास होत असूनही रहावं का हे ही ज्याचं त्याने ठरवावं.
बेला म्हणतो तसे परदेशी जाण्याचा उद्देश मनाशी नक्की असला की अशी घालमेल कमी होते हे स्वानुभवावरून सांगतो. मी जेव्हा परदेशात होतो तेव्हा पर्यटन हा मुख्य उद्देश होता. (बहुदा यापुढेही कधी गेलो की हाच मुख्य उद्देश असेल). तसेच ठराविक काळाहून अधिक काळ सलग भारताबाहेर (एकाच शहरात :) )रहायचे नाहि असे ठरवूनच गेलो होतो. त्यामुळे तिथला वेळही मजेत गेला आणि अशी चिडचिड कमी झाली.

ज्याने कायमचं रहायचं ठरवलं आहे ते आणि ज्यांनी रहायचं नाहि हे नक्की केलंय ते असे दोघेही कमी चिडचिड करतात, मात्र कुंपणावरचे या घालमेलीतून जातात.. नाहि का?

(जाहिरातः कुंपणावरल्या मित्रांसाठी)

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

JAGOMOHANPYARE's picture

22 Jul 2009 - 8:46 am | JAGOMOHANPYARE

मुन्गी उडाली आकाशी....????????

हा मुन्गी टोळाचा सिक्वल का ? :)

विंजिनेर's picture

22 Jul 2009 - 9:03 am | विंजिनेर

सांस्कृतिक धक्का अर्थात कल्चर शॉक ही प्रदीर्घ प्रक्रिया आहे आणि त्यात अनेक छटा+ पायर्‍या असतात.
प्रथम परदेशात गेल्यावर आपल्या देशातल्या ओळखीच्या गोष्टी/व्यक्तींशी पदोपदी तुलना होते (उदा जेवणाचे पदार्थ/वेळा, ऋतुमान , आपल्या इथली माणसे कित्ती मनमोकळी ह्या देशातली किती तुटक इ. इ.) ह्या फरकातून येणारा ताण सहाजिक असतो मग पर्यायाने एकटेपण/चिडचिड/नैराश्य येते. गड्या आपुला गाव बरा असे वाटू लागते :)).

काही काळाने परदेशातल्या गोष्टींची सवय होते आणि आपल्या देशात काही कमीपणा/विरोधाभास असेल तर तो जाणवू लागतो (उदा, पाश्चिमात्य देशांतील स्वच्छता, मोठे रस्ते, सुळक्कन धावणार्‍या मोटारी आणि भारतातली धूळ/ गर्दी /उन्हाळा इ.)
अजून वास्तव्य लांबले तर मग परदेशातल्या कुठल्याच गोष्टींचे नवल वाटेनासे होते, आपण तिथल्या राहणीमानास सरावतो.

ह्यानंतर मात्र आपल्या देशात परत आलो कि पुनर्धक्का बसतो आणि दोन्ही देशातला विरोधाभास प्रकर्षाने जाणवतो पण झुकते माप ह्याखेपेस परदेशाला असते :) (उदा मुंबई/कलकत्ता एअरपोर्ट वरचा विशिष्ट "वास" !).

ह्या सर्व अनुभवात हौशे/नवशे/गौशा लोकांना वेगवेगळ्या छटा जाणवतात.

ह्या सगळ्यावर उपाय म्हणजे दिलासा देणार्‍या गोष्टी आवर्जून कराव्यात (उदा बाहेर बर्फ पडत असताना मरणाच्या थंडीत, घरात बसून गुरगुटी भात+मेतकूट+ कुळीथाचे पिठले खाउन बघा- कम्फर्ट फूड) ताण हमखास कमी व्हायला मदत होते :)

पर्नल नेने मराठे's picture

22 Jul 2009 - 10:16 am | पर्नल नेने मराठे

आम्हालाही अभिमान वाटतो ना देशाचा, तिरंगा दिसला की ऊर भरून येतो

माझ्या ओफ्फिसच्या ड्राइवरची (पाकिस्तानि) कि-चेन म्हन्जे तिरंगा होता. मी पहिले आणी विचारले कुठुन आण्लिस वैग्रे.
तो म्हणाला ते जाउ दे हिच ह्या...मला मोह झाला पण तो मी आवरला.

चुचु

विनायक प्रभू's picture

22 Jul 2009 - 10:21 am | विनायक प्रभू

चुचु तै शी संपर्क साधा. कंटाळ्याच्या बाबतीत त्या समदु:खी असाव्यात.
त्यांची भाषा शिकाल तर परत कंटाळ्याचे नाव काढणार नाही आपण.

पर्नल नेने मराठे's picture

22 Jul 2009 - 10:26 am | पर्नल नेने मराठे

:D :))

चुचु

चेतन's picture

22 Jul 2009 - 10:26 am | चेतन

मनापासुन लिहलेला लेख खरच आवडला.

मी घरापासुन दुर राजस्थान मध्ये राहताना देखील माझी हिच अवस्था होते.

अजुनही ए.आरचे "ये जो देस है तेरा..." ऐकताना न चुकता पाणी येतं!!

मनातलं बोललातं

या लेखाबद्दल खरचं धन्यावाद

चेतन

JAGOMOHANPYARE's picture

22 Jul 2009 - 10:35 am | JAGOMOHANPYARE

मुन्गी टोळाचा हा सिक्वल आहे..
त्यामुळे टायटल असे हवे होते...
:)

ये जो वारूळ है तेरा.. स्ववारूळ है तेरा...

JAGOMOHANPYARE's picture

22 Jul 2009 - 10:58 am | JAGOMOHANPYARE

देश सोडणे, गाव सोडणे हे प्रकार लोक इतक्या सिरीयसली का घेतात , मला समजलेले नाही..... माणूस हा माकडापासून तयार झालेला आहे, मग मी आणि हजारो वर्षापूर्वीचे ते माकड यान्च्यामधल्या सगळ्या पिढ्या एकाच गावात्/एकाच घरात घडून गेलेल्या असतात का ? काही ठराविक पिढ्यानन्तर स्थित्यन्तरे/ स्थानन्तरे ही अपरिहार्यपणे झालेली असतात... सगळीकडचे चान्गले एकत्र करून पुढच्या पिढीला देणे , एवढेच आपले काम....

हिन्दु धर्मामध्ये देशान्तर हे पाप कधीपासून मानले जाऊ लागले, याचा सन्दर्भ कुणी देऊ शकेल का ? कारण गम्मत म्हणजे रुग्वेदामध्ये एक रुचा आहे....

'हे मित्रावरूणानो आम्हाला दूरदेशी जाण्याची, ज्ञान आणि धन कमावण्याची सन्धी द्या. आपली कृपा आमच्या पुत्रपौत्रावरही असू द्या.'

याचा नेमका संदर्भ ( मन्डल्/रुचा क्रमान्क ) ही मी देईन...

रामाने लन्केला केलेले गमन , कृष्णाने गुजरातजवळ समुद्र ओलान्डून द्वारकेची केलेली स्थापना ही याचीच रूपे आहेत असे मला वाटते... ( आणि योगायोग ( ?) म्हणजे रामाने समुद्र ओलान्डण्यापूर्वी रामेश्वरला शिवलिन्गाची स्थापना केली तर कृष्णाने सोमनाथ मन्दिर निर्माण केले... एन आर आय लोकानी देखील प्रत्येक सुट्टीतून पुन्हा परदेशात येताना आधी शिव मन्दिरात जाण्याची प्रथा ठेवली तर ..? यातील धर्मशास्त्र कुणी उलगडले तर जास्ती बरे होईल..)

एवढा भक्कम इतिहास असताना आपण का भाण्डत आहोत ???

shweta's picture

22 Jul 2009 - 11:09 am | shweta

नाइस रायटिंग

अर्चिस's picture

22 Jul 2009 - 11:21 am | अर्चिस

मागे एकदा पुणे सोडुन दादरला एक आठवडा रहायला लागले होते. त्याची आठवण आली.

अर्चिस

चिरोटा's picture

22 Jul 2009 - 11:28 am | चिरोटा

सहमत्.'हे विश्वचि माझे घर'!

हिन्दु धर्मामध्ये देशान्तर हे पाप कधीपासून मानले जाऊ लागले, याचा सन्दर्भ कुणी देऊ शकेल का

माहित नाही पण देशापेक्षा महाराष्ट्रात असे मानण्याचे प्रमाण आतापर्यंत होते.उत्तरेत/तामिळ्/आंध्र्मध्ये स्थलांतर करण्याचे प्रमाण पुर्वीपासुन आहे. कॅलिफोर्नियात शीख लोक १९०५ मध्ये प्रथम आले होते. आफ्रिकन देशांत गुजराती/मारवाडी तर १०० वर्षापेक्षा जास्त काळ आहेत. खुद्द महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत जवळ्पास २० वर्षे होते.मॉरिशस्,सेशेल्स,फिजी सारख्या देशांत भारतिय अनेक वर्षापासुन आहेत.

अनिवासी भारतीय प्रकारात जर अमेरिकास्थित भारतीय हा प्रकार नसता, तर मग निवासी-अनिवासी भारतीय हा वाद कितपत झाला असता?

हा वादाचे मुळ बहुदा अमेरिकेचे प्रमाणाबाहेर केले जाणारे उदात्तीकरण असावे.हल्लीच हिलरी क्लिंटन भारत भेटीवर आल्या होत्या. मिडिया,सरकार ह्याना त्याना 'कुठे ठेवू कुठे नको' असे झाले होते.९ वर्षापुर्वी बिल क्लिंटन भारतात आले असता सही घेण्यासाठी भारतिय खासदारांची झुंबड उडाली होती.मनमोहन सिंग अमेरिका भेटी वर येतात त्यावेळी बहुदा ती बातमी nytimes च्या पाचव्या पानावर असते!.ईंडिया कॉकस वगळता त्यांच्या भेटीला अमेरिकेत विशेष महत्व नसते.अमेरिकेच्या द्रुष्टिकोनातुन भारताचे स्थान नगण्य असले तरी भारतिय उच्च मध्यम वर्ग अजुनही(अमेरिकेत सध्या नोकर्‍या कमी असल्या तरीही) ड्रीम लँड म्हणून अमेरिकेकडेच बघतो.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

Nile's picture

22 Jul 2009 - 11:51 am | Nile

बर्‍याच मुद्द्यांशी असहमत आहे.

उत्तरेत/तामिळ्/आंध्र्मध्ये स्थलांतर करण्याचे प्रमाण पुर्वीपासुन आहे.

एक उदाहरण.
थोडक्यात संकुचित बुद्धीला काळ नाही.

मनमोहन सिंग अमेरिका भेटी वर येतात त्यावेळी बहुदा ती बातमी nytimes च्या पाचव्या पानावर असते!

अगदी टीपीकल अन-ईन्फॉर्मड प्रतिपादन! या अशा वाक्यानीच अडाणी भारतीय जनते मध्ये चुकीचे समज पसरतात.
मी रोज वॉल स्ट्रीट जर्नल वाचतो व त्यात मी अनेकदा भारतातील अनेक बातम्या पहील्या पानावर वाचल्या आहेत. (मला उलट, ही बातमी पहिला पानावर! असेही अनेकदा वाटले आहे, शोधुन दुवे देईन हवे असल्यास.)

अमेरिकेच्या द्रुष्टिकोनातुन भारताचे स्थान नगण्य असले तरी भारतिय उच्च मध्यम वर्ग अजुनही(अमेरिकेत सध्या नोकर्‍या कमी असल्या तरीही) ड्रीम लँड म्हणून अमेरिकेकडेच बघतो.

अत्यंत खुळा गैरसमज! मग काय त्या क्लींटन बाई तुमच्या मिडीयाची पॉप्युलॅरीटी मिळवायला आल्या होत्या का भारतात? की पुढच्या निवडकुणित भारतीय मतं मिळवायला?

उच्च मध्यम वर्ग अजुनही(अमेरिकेत सध्या नोकर्‍या कमी असल्या तरीही) ड्रीम लँड म्हणून अमेरिकेकडेच बघतो.

हे का याचा निट विचार करा. अर्थात हे वरील वाक्य ही पुर्ण सत्य नाहीच आहे.

हा वादाचे मुळ बहुदा अमेरिकेचे प्रमाणाबाहेर केले जाणारे उदात्तीकरण असावे

या बाबतीत विकासरावांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.

चिरोटा's picture

22 Jul 2009 - 12:55 pm | चिरोटा

थोडक्यात संकुचित बुद्धीला काळ नाही

सहमत. माझ्या म्हणण्याचा उद्देश हा की उत्तरेत(गुजरात्/राजस्थान्/पंजाब) स्थलांतरीत लोकांचे प्रमाण ईतर राज्यांपेक्षा जास्त आहे.

मग काय त्या क्लींटन बाई तुमच्या मिडीयाची पॉप्युलॅरीटी मिळवायला आल्या होत्या का भारतात

नाही. भविष्यात भारत दोन राज्यांमध्ये अणु प्रकल्प चालु करणार आहे.ह्याचे कोट्यावधी डॉलर्स चे कंत्राट काही अमेरिकन कंपन्याना पाहिजे आहे. जी बोलणी झाली त्यात हा मुद्दा प्रामुख्याने होता.
(संदर्भ- nytimes.com). हा झाला व्यवहाराचा भाग.
अमेरिकेच्या उच्च राजकिय वर्तुळात भारताचे स्थान नगण्य आहे. म्हणजे ब्रिटन्,फ्रांस,जर्मनी सारखे त्याला स्थान नाही(ह्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही.प्रत्येक देश्(भारतही) आपला फायदा बघतो).

हे का याचा निट विचार करा

अमेरिकेला जावून स्थायिक होणे ह्यात काही गैर आहे असे मला तरी वाटत नाही.

क्ष्^न + य्^न = झ्^न

Nile's picture

22 Jul 2009 - 1:20 pm | Nile

हा झाला व्यवहाराचा भाग.

म्हणजे भारत त्यांच्या साठी व्यवहार करण्याइतका महत्त्वाचा आहे तर! :)

अमेरिकेच्या उच्च राजकिय वर्तुळात भारताचे स्थान नगण्य आहे. म्हणजे ब्रिटन्,फ्रांस,जर्मनी सारखे त्याला स्थान नाही

समजा, ब्रिटन जर्मनी सारखे स्थान नाही, म्हणजे नगण्य का? मला तुमचा मुद्दा कळला होता पण तुम्ही 'जितके भारताला महत्त्व (त्यांच्यामते) द्यायचे आहे तितकेच देतात, पण जितके द्यायला हवे (भारत, भारतीय लोक वगैरे) तितके देत नाहीत' असे म्हणालात तर योग्य होईल असे वाटते.
हा एक वेगळ्या धाग्याचा विषय होउ शकेल म्हणुन यावर जास्त बोलत नाही.

अमेरिकेला जावून स्थायिक होणे ह्यात काही गैर आहे असे मला तरी वाटत नाही.

तुम्हाला गैर वाटते की नाही यावर मी तो प्रतिसाद नव्हता दिला, तर तुमच्या विधानातील मला वाटलेल्या चुका दुरुस्त करण्याकरीता.

रामपुरी's picture

23 Jul 2009 - 12:21 am | रामपुरी

मी रोज वॉल स्ट्रीट जर्नल वाचतो व त्यात मी अनेकदा भारतातील अनेक बातम्या पहील्या पानावर वाचल्या आहेत. (मला उलट, ही बातमी पहिला पानावर! असेही अनेकदा वाटले आहे, शोधुन दुवे देईन हवे असल्यास.)

मनमोहन सिंग निवडून आल्यावर वॉल स्ट्रीट जर्नल च्या पहिल्या पानावर मोठ्या फोटोसकट बातमी होती.
(पण हे फक्त वॉल स्ट्रीट जर्नल वरच. बाकीचे पेपर एवढी दखल घेत नाहीत. CNBC चे संकेतस्थळ पाहीले तर २६/११ ची बातमी सुद्धा कळेल न कळेल अशी दिली होती. कोणी सांगावे, कदाचित भारताबद्द्ल आकस असेल)

विकास's picture

22 Jul 2009 - 6:38 pm | विकास

हा वादाचे मुळ बहुदा अमेरिकेचे प्रमाणाबाहेर केले जाणारे उदात्तीकरण असावे.हल्लीच हिलरी क्लिंटन भारत भेटीवर आल्या होत्या. मिडिया,सरकार ह्याना त्याना 'कुठे ठेवू कुठे नको' असे झाले होते.९ वर्षापुर्वी बिल क्लिंटन भारतात आले असता सही घेण्यासाठी भारतिय खासदारांची झुंबड उडाली होती.मनमोहन सिंग अमेरिका भेटी वर येतात त्यावेळी बहुदा ती बातमी nytimes च्या पाचव्या पानावर असते!.ईंडिया कॉकस वगळता त्यांच्या भेटीला अमेरिकेत विशेष महत्व नसते.अमेरिकेच्या द्रुष्टिकोनातुन भारताचे स्थान नगण्य असले तरी भारतिय उच्च मध्यम वर्ग अजुनही(अमेरिकेत सध्या नोकर्‍या कमी असल्या तरीही) ड्रीम लँड म्हणून अमेरिकेकडेच बघतो.

बराचसा सहमत आहे. पण वरचे विधान जर गृहीत धरले, तर त्याचा राग अमेरिकास्थित अनिभांवर का?

अडाणि's picture

22 Jul 2009 - 10:00 pm | अडाणि

+१
-
अफाट जगातील एक अडाणि.

पक्या's picture

22 Jul 2009 - 11:35 am | पक्या

परदेशी जा...जरूर जा. नवीन गोष्टी शिका...पैसा कमवा..पण खरोखरच मायभूमीबद्दल ओढ असेल ना तर तो माणूस एका विशिष्ठ काळानंतर परत देशात जातोच.
जे जात नाहीत त्यांनी वरवर काहीही कारणे सांगितली तरी त्यांना आता भारत देश रहाण्यासाठी आवडेनासा झालेला असतो हेच मुख्य कारण असते.

हा लेख म्हणजे स्वत:च्या अपराधी पणाला स्वतःच काहितरी कन्व्हिंसिंग उपाय शोधल्यासारखे वाटत आहे.

यशोधरा's picture

22 Jul 2009 - 11:35 am | यशोधरा

छान लिहिलं आहेस भाग्यश्री.

JAGOMOHANPYARE's picture

22 Jul 2009 - 12:33 pm | JAGOMOHANPYARE

<<<<<<<<<<<<<<<हा लेख म्हणजे स्वत:च्या अपराधी पणाला स्वतःच काहितरी कन्व्हिंसिंग उपाय शोधल्यासारखे वाटत आहे.>>>>>>>>>>>>>>

देश सोडल्यामुळे अपराध केला असे कुठे आहे ? होम सिकनेस/ त्याच त्याच गोष्टीचा कन्टाळा म्हणजे अपराधी व्रुत्ती थोडीच आहे..?

रामदास's picture

22 Jul 2009 - 12:50 pm | रामदास

भाग्यश्री ,वर्षानुवर्षं आपण सगळे एका ठिकाणी स्थिरावल्यावर पोटापाण्यासाठी दुसर्‍या देशात जावे लागते तेव्हा मनात असं बरंच काही येतं हे अत्यंत सहज आहे.
आपल्या समाजाला स्थलांतराची सवय नव्हती म्हणून मनाची तयारी करायला वेळ मिळालाच नाही.
काही वर्षानी प्रत्येक कुटुंबातला एखादा तरी सदस्य मूळ गाव -शहर सोडून जाईल तेव्हा आपल्या सगळ्यांना आपले गाव सोडून राहण्याची मानसीक तयारी करावीच लागेल.
मला असे वाटते की इतर राज्यातून येणार्‍यांना असेच काहीसे वाटत असेल.
मराठी माणसांना स्थलांतर करून पोट भरण्याची सवय उशीरा लागली.

निवासी आणि अनिवासी वादात मला भाग घ्यायचा नाही पण दुसर्‍या देशात जाउन रोजीरोटी मिळवणार्‍यांचे मला कौतुक वाटते हे खरे आहे.
वेस्टर्न सबर्ब मध्ये राहणारी मुलगी सेंट्रल सबर्ब मध्ये राहणार्‍या मुलाला या एकाच कारणासाठी लग्नाला नकार देते तेव्हा विशेषेकरून अनोळखी देशात कायम वास्तव्य करणार्‍या मुलींचे -मुलांचे मला फार कौतुक वाटते.

चिरोटा's picture

22 Jul 2009 - 1:01 pm | चिरोटा

मराठी माणसांना स्थलांतर करून पोट भरण्याची सवय उशीरा लागली

सहमत.स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त औद्योगिकीकरण महाराश्ट्रात झाले हे त्याचे मुख्य कारण.त्यामुळे संधी मुबलक प्रमाणात होत्या.१९९० पर्यंत देशाबाहेर स्थालांतर मर्यादित स्वरुपातच होई.नंतर उदारीकरणानंतर संधी इतर देशात्/राज्यांमध्येही वाढल्या.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

पर्नल नेने मराठे's picture

22 Jul 2009 - 1:04 pm | पर्नल नेने मराठे

तेव्हा विशेषेकरून अनोळखी देशात कायम वास्तव्य करणार्‍या मुलींचे -मुलांचे मला फार कौतुक वाटते.

नुस्तेच वास्तव्य नाहितर, तिक्दे नोक्र्या, व्यवसाय करतात, सोपे कहिच नस्ते :-d
चुचु

ऍडीजोशी's picture

22 Jul 2009 - 1:10 pm | ऍडीजोशी (not verified)

जेव्हा जेव्हा निवासी अनिवासी वाद होतो तेव्हा तेव्हा मी त्यात हिरिरिने सहभागी होतो. मला सरसकट सगळ्या अनिवासी भारतियांबद्दल राग नाहिये.

पण बरीच लोकं २-३ वर्ष परदेशी राहिली की इथली उणी-दुणी काढायला सुरुवात करता. भारतात हे नाही, ते नाही, भ्रष्टाचार आहे, घाण आहे वगरे बडबड सुरू होते. इथे रहाणार्‍यांना अक्कल शिकवायला सुरुवात करतात. अरे हे बदलण्यासाठी तुम्ही काही केलं का? (उलट इथे रहातात तेव्हा ह्या सगळ्याला हातभारच लावतात) तुम्ही देशाला एक चान्स तरी दिलात का? शिक्षण संपल्यावर शेपूट घालून गेलात ना पळून परदेशात पैशासाठी? मग देशाच्या प्रगतीला काडीचाही हातभार न लावता नुसतं नावं ठेवणे कितपत बरोबर आहे? माझ्या मते हा शूद्ध कृतग्नपणा आणि हलकटपणा आहे.

२५-२६ वर्ष राहिलात तो देश ३ वर्षात नकोसा कसा होऊ शकतो? आपला देश आपल्याला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करतो, चांगले विद्यार्थी घडावेत म्हणून कितीतरी शिक्षक तुटपुंज्या पगारावर ज्ञानदानाचे पवित्र कार्य कर्तव्य म्हणून करत असतात. असं असताना ह्या सगळ्याच्या जोरावर केवळ स्वत:चा स्वार्थ बघून परदेशी निघून जाणे कितपत योग्य आहे. (देशाला ROI कधी मिळणार?)

आय टी बूम च्या वेळी ह्या स्थलांतराला 'ब्रेन ड्रेन' असं संबोधलं गेलं हे किती योग्य आहे ते आता जाणवतं.

देशाची प्रगती होण्यासाठी काय लागतं? उत्तम तंत्रज्ञ, नव्या नव्या कल्पना प्रत्यक्षात साकारणारे धडाडीचे तरूण, अंगात धमक असलेले शास्त्रज्ञ, कलाकार, डॉक्टर्स, प्रोफेशनल्स. आपला देश हे सगळं काही तयार करतो. पण ते सगळं जातं कुठे? परदेशात. कसा जाणार आपला देश पुढे? हुशार लोकांच्या पिढ्याच्या पिढ्या परदेशी निघून गेल्यावर देश प्रगतीपथावर जाणार कसा? आणि नेणार कोण?

लोकं परदेशी जाऊन पैसा कमावतात म्हणजे काय करतात? तर त्या देशाच्या प्रगतीला अर्थव्यवस्थेला चालना देतात.

तुम्हाला देशाची आठवण येते. तशीच देशालाही तुमची आठवण येते. त्याचाही जीव तीळ तीळ तुटतो. माझी सगळी हुशार मुलं आज शेजार्‍याची चाकरी करून मलाच नावं ठेवतायत? अडचणीच्या वेळी मला सावरण्याऐवजी मला सोडून जातायत? देशालाही तुमची गरज आहे हे कधी जाणून घेणार आहात तुम्ही?

देशाबद्दल खूप काही वाटणं हे त्याच्या जागी ठीक आहे. पण हे वाटणं जोवर कॄतीत येत नाही तोवर त्याला काहिही अर्थ नाही. माझा देश माझा देश म्हणून गळे काढायचे, आणि वेगवेगळी कारणं देत रहायचं मात्र परदेशात हे कितपत योग्य आहे?

अवांतर: फ्री सीट / स्कॉलरशीप्स घेऊन अथवा सरकारी कॉलेजेस मधे शिकलेल्यांना किमान ५ वर्ष भारतातच नोकरी करायची सक्ती करणारा कायदा करायला हवा. नसेल करायची तर त्यांच्यावर झालेला खर्च सव्याज सरकारला परत करावा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jul 2009 - 1:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण बरीच लोकं २-३ वर्ष परदेशी राहिली की इथली उणी-दुणी काढायला सुरुवात करता. भारतात हे नाही, ते नाही, भ्रष्टाचार आहे, घाण आहे वगरे बडबड सुरू होते. इथे रहाणार्‍यांना अक्कल शिकवायला सुरुवात करतात. अरे हे बदलण्यासाठी तुम्ही काही केलं का? (उलट इथे रहातात तेव्हा ह्या सगळ्याला हातभारच लावतात) तुम्ही देशाला एक चान्स तरी दिलात का? शिक्षण संपल्यावर शेपूट घालून गेलात ना पळून परदेशात पैशासाठी? मग देशाच्या प्रगतीला काडीचाही हातभार न लावता नुसतं नावं ठेवणे कितपत बरोबर आहे? माझ्या मते हा शूद्ध कृतग्नपणा आणि हलकटपणा आहे.

ज्या लोकांना भारताने चान्स दिला नाही त्यांचं काय? तरीही इथे येऊन दारिद्र्यात मेलेल्यांचं काय? उदाहरणही देते, डॉ. खानखोजे. या कृषकाला इंग्रजांनी वॉरंट काढलं नाही म्हणून स्वतंत्र भारतात व्हीजा मिळवायला किती त्रास झाला याची कल्पना आहे का? असे कितीतरी खानखोजे संधी मिळत नाही, भ्रष्टाचार आहे, त्याला एकटा माणूस काहीही करू शकत नाही याचा अनुभव घेऊन वैतागून देश सोडतात त्यांनाही तुम्ही असेच बोल लावणार का?

माझाच व्यक्तीगत अनुभव सांगते.
स्थळ साहेबाचा देश, विद्यार्थ्यांसाठी असलेलं विद्यापीठाचं घर:
एक तक्रार येते, गाद्या फार खराब आहेत, पाठदुखी होते. दोन आठवड्यांत नवीन गाद्या आल्या आणि शिवाय हळहळ व्यक्त झाली, तुम्ही आधी का सांगितलंत नाहीत.

स्थळ असंच एक विद्यार्थी, पोस्ट-डॉक्ससाठी असलेलं होस्टेल, देश आपलाच:
एक तक्रार, आम्हाला जेवण बनवायचं आहे, कँटीनच्या जेवणाचा त्रास होतो, गॅसचं कनेक्शन कसं घ्यावं आम्ही?
तुम्हाला काय करायचं आहे जेवण-बिवण बनवणं? गोंधळच घालाल जास्त! आणि तुम्ही कँटीनमधे नाही जेवलात तर कँटीन कसं चालणार? मग व्हिजीटर्सना काय आणि कसं जेवायला घालणार आम्ही? ते काही नाही, तुम्ही इथेच जेवायचं.

सगळ्यात शेवटी सार सांगण्याची पद्धत असते म्हणूनः 'सब घोडे बारा टके' यामुळे अनेकांवर अतोनात अन्याय होतो याची जाणीव असावी.

अदिती

भाग्यश्री's picture

22 Jul 2009 - 1:21 pm | भाग्यश्री

'सब घोडे बारा टके' यामुळे अनेकांवर अतोनात अन्याय होतो याची जाणीव असावी

याबद्दल अदितीला लाख अनुमोदनं!
बाकी जास्त लिहीत नाही.. तुम्ही आरोप करा, आम्हीही करतो याने काही चर्चा होत नाही.. त्यामुळे एव्हढच बास.. :)

http://www.bhagyashree.co.cc/

ऍडीजोशी's picture

22 Jul 2009 - 3:21 pm | ऍडीजोशी (not verified)

तुमचा गोंधळ होतोय. मी आत्ता भारतात आदर्श परिस्थिती आहे असं म्हटलंच नाहिये. अनेकांवर अन्याय होतोय ही वस्तुस्थिती आहे. जरा विचार करा की ही परिस्थिती का आली?

Nile's picture

22 Jul 2009 - 1:33 pm | Nile

पण बरीच लोकं २-३ वर्ष परदेशी राहिली की इथली उणी-दुणी काढायला सुरुवात करता. भारतात हे नाही, ते नाही, भ्रष्टाचार आहे, घाण आहे वगरे बडबड सुरू होते. इथे रहाणार्‍यांना अक्कल शिकवायला सुरुवात करतात. अरे हे बदलण्यासाठी तुम्ही काही केलं का? (उलट इथे रहातात तेव्हा ह्या सगळ्याला हातभारच लावतात) तुम्ही देशाला एक चान्स तरी दिलात का? शिक्षण संपल्यावर शेपूट घालून गेलात ना पळून परदेशात पैशासाठी? मग देशाच्या प्रगतीला काडीचाही हातभार न लावता नुसतं नावं ठेवणे कितपत बरोबर आहे? माझ्या मते हा शूद्ध कृतग्नपणा आणि हलकटपणा आहे.

अच्छा म्हणजे ते लोक उणी-दुणी काढतात म्हणुन राग आहे होय!
चुका शोधणे, त्या दाखविणे हा चुका दुरुस्त करणे ह्यातील पहीला टप्पा असतो. (त्या दाखविण्याची एखाद्याची (वा काही लोकांची) पद्धत जर चुकत असेल तर अक्ख्या अनिवासी भारतियांना शिव्या घालणं म्हणजे काय?)

मी तरी भारत(त्यातही माझं गाव, मी रहात असलेलं, पुर्वी राह्यलो होतो असं शहर) सोडुन (आणि राहता देश) इतर देशाला कश्याला शिव्या घालु? माझ्या देशात जे चुक आहे त्याबद्द्ल मला खेदच वाटतो. जे बरोबर आहे त्याबद्द्ल आनंद आणि अभिमानच वाटतो.

बर परदेशी येणारे सगळेच काय उच्च दर्जाचे विद्वानच असतात का? काही लोकांनी बेजबाबदार व्यक्तव्य केली तर त्यात काय नविन? भारतात भारताबाबत वाट्टेल ते बडबडणारी कमी आहेत की काय कि तुम्हाला याचा राग यावा? की भारतात असल्यावर अशी बेजबाबदार, तुमच्या भाषेत अक्कल शिकवणारी भाषा बोलायला नैतीक परवानगी मिळते?

ऍडीजोशी's picture

22 Jul 2009 - 3:27 pm | ऍडीजोशी (not verified)

अच्छा म्हणजे ते लोक उणी-दुणी काढतात म्हणुन राग आहे होय!

अजीबात नाही.

चुका शोधणे, त्या दाखविणे हा चुका दुरुस्त करणे ह्यातील पहीला टप्पा असतो.
१००% सहमती. राग ह्याचा आहे की जेव्हा शक्य असतं तेव्हा वैयक्तीक स्वार्थासाठी देश सोडून जायचा. स्वत: काहिही न करता टोमणे मारण्याचा राग आहे.

एक उदाहरण देतो: एका गिरणी कामगाराला २ मुलं असतात. मोठ्याचं शिक्षण झाल्यावर तो दुसरं घर घेऊन वेगळा रहायला लागतो. काही दिवसानी थोडा वेळ घरी आल्यावर म्हणतो, किती लहान घर आहे, टिव्ही नाही, वीज नाही. मी नाही राहू शकत इथे. बाप शांतपणे म्हणतो, तू सुद्धा ह्या घराचाच भाग होतास ना? इथेच शिकून मोठा झालास ना? ह्या गिरणी कामगाराच्या जिवावरच प्रगती झाली ना तुझी? मग स्वत: मोठं घर घेण्याआधी ह्या घराला किमान रहाण्याजोगं बनवण्याचा विचार नाही का आला मनात?

मराठी_माणूस's picture

22 Jul 2009 - 4:36 pm | मराठी_माणूस

एकदम चपखल उदाहरण

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Jul 2009 - 7:13 pm | llपुण्याचे पेशवेll

+१
चूका दाखवणे कायम सोपे आहे. बदलण्यासाठी काय करतात?
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

अडाणि's picture

23 Jul 2009 - 4:01 am | अडाणि

अनिवासी भारतीयांच्या चुका दाखवणे सोप्पे आहे, पण त्यामागची परीस्थिती बदलालया काय करतात ?

-
अफाट जगातील एक अडाणि.

भाग्यश्री's picture

22 Jul 2009 - 1:10 pm | भाग्यश्री

ओके.. मला वाटतं मी काही गोष्टी क्लिअर केलेल्या बर्‍या!

हे जे प्रकटन लिहीले आहे ते काय विचाराने लिहीले आहे हे नमूद करते.
हा असा लेख लिहीला म्हणजे लगेच अपराधीपणाची भावना,रिकामं मन सैतानाचे घर टाईप कमेंट्स कशा लिहील्या जातात?
जागोमोहनप्यारे म्हणतात तसं होम सिकनेस वाटणे आहे हे.. ही एक फेज असते. आपण काही कामंधामं सोडून हे असे विचार नाही करत. असे विचार नेहेमीच येतात जातात.. कधी जास्त रेंगाळतात.. अशा त्या फेजला मला कॅप्चर करायचे होते... बस्स.. ते होम सिकनेस वाटणे, त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा येणे! हा काही रोग किंवा प्रॉब्लेम नाहीये लोकहो! .. :) इट हॅपन्स, एव्हरीटाईम!! फक्त आपण आपल्या देशी,आपल्या माणसात असलो की त्यावर उपाय निघतात लगेच! तसे कधी कधी इथे राहून नाही निघत.. फॉर एग्झँपल, मला पाऊस फार्रच आवडतो, पण इथे कॅलिफॉर्नियात तसा मनासारखा नाही पडत.. आहे काही उपाय? त्या पावसासाठी मला पुण्यात येणं परवडणार आहे का! :)) असल्या चिडचिडीला मोकळं करण्याचे हे प्रकटन..

ते लिहीता लिहीता, शेवटचा मुद्दा डोक्यात आला, आणि तो मी मांडण्यापासून राहवू नाही शकले..
निवासी-अनिवासी हा मुद्दा मला प्रत्यक्शात कधीही अनुभवावा लागला नाहीये! कोणालाही मी सांगायला गेले नाहीये की परदेशात ना असं असतं इत्यादी, आणि कोणीही मला पर्सनली लेक्चर दिले नाहीये, तुम्ही अनिवासी वगैरे! ( थँक गॉड, तितका अविचाराने उगीचच झोडणारं पब्लिक नाहीये माझ्या संपर्कात!)
पण जेव्हा कुठेही कोणालाही असं जेव्हा बोलले जाते तेव्हा मी विचार करतेच. मला ते खटकतेच! त्यामुळे ते सगळं इथेही उतरलं..

प्रत्यक्षात मी बेसनलाडू म्हणातात त्या तत्वाने वागते. ( खरे तर मी कशी आणि का जगते हे सांगायचे कारणच नाहीये, पण काहीजणांनी बरेच सल्ले दिलेत व्हॉलेंटिअरी वर्क, रिकामं मन!, इत्यादी.. म्हणून लिहावे लागतेय. ) वर कोणीतरी म्हटलेय ( ऋषिकेश बहुतेक) ज्यांचे फिक्स काही ठरलेले असते त्यांना फारसा त्रास होत नाही. मला ते पटते. म्हणूनच ठराविक उद्दीष्टं समोर असली की त्रास होत नाही यावर माझा विश्वास आहे! असो.. पण मूळात तो मुद्दाच वेगळा आहे. मला याठिकाणी केवळ ती चिडचिड, होम सिकनेस मांडायचा आहे. बाकी काहीही नाही!
ह्म्म, आता असं म्हणू नका, कोणी सांगितलंय मग लांब राहायला होम सिकनेस होतो तर!! हेहे.. त्याला काही अर्थ नाहीये! इथे येणे, किती काळ राहणे हे सर्वस्वी पर्सनल डिसिजन्स असतात. त्यामुळे तसं जर कोणी म्हणणार असेल, तर मी दुर्ल़क्षच करणे पसंत करीन..

पण येस.. जो होम सिकनेस मला मांडायचा होता, तो बव्हंशी सर्वांपर्यंत पोचला काही अपवाद सोडून असं म्हणता येईल! वेल डन भाग्यश्री! हेहे..
http://www.bhagyashree.co.cc/

नंदन's picture

22 Jul 2009 - 1:24 pm | नंदन

>>> जो होम सिकनेस मला मांडायचा होता, तो बव्हंशी सर्वांपर्यंत पोचला काही अपवाद सोडून असं म्हणता येईल! वेल डन भाग्यश्री!

- असेच म्हणतो :).
बाकी चालू द्या.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jul 2009 - 9:13 pm | बिपिन कार्यकर्ते

वेल डन भाग्यश्री!!!

बिपिन कार्यकर्ते

मेघना भुस्कुटे's picture

22 Jul 2009 - 1:19 pm | मेघना भुस्कुटे

सही झालाय ग लेख भाग्यश्री. तुला अमेरिकेत बसून असं होतं, मला तर बेंगलोरमधेच असं होतंय... अशानं स्थलांतरंच बंद व्हायची. काय बरोबर नि काय चूक, काय माहीत.
रेवतीचा प्रतिसाद बाकी हहपुवा हहपुवा हहपुवा हहपुवा हहपुवा....

भाग्यश्री,
उत्तम प्रकटन. मनातले विचार बाहेर पडले ना? आता जरा मोकळं मोकळं वाटतंय ना? फिनिश :)

बाकी, मेघना म्हणते तसं मला दिल्ली आणि ग्वाल्हेरात झालं होतं..
दिल्लीमध्ये फार नाही फक्त खाण्याच्या सवयींमुळे आणी ग्वाल्हेरात तर विचारु नको, वेड लागायची वेळ आली होती....भयानक होमसिक झालो होतो. नोकरी सोडून परत आलो. आता, माझं घर बारामतीला, आई-वडील भाऊ सगळे तिकडंच. पण मी परत आलो ते पुण्यात. तरीही मला समाधान वाटायला लागलं...म्हणजे होमसिकनेस हा 'होम' बद्दल नव्हता तर 'होमलँड'बद्दल :) सेम थिंग देअर ऑन युअर एंड टू! राईट?

-(सध्या पुण्यातच होमसिक झालेला) ध.

अवलिया's picture

22 Jul 2009 - 2:13 pm | अवलिया

उत्तम लेख. आवडला.

अवांतर - तुम्ही नेहमी लिहित रहा हो... हल्ली ५०+ प्रतिसाद मिळवणारे लेख कमी येतात मिपावर ;)

--अवलिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2009 - 7:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला !

-दिलीप बिरुटे

_समीर_'s picture

22 Jul 2009 - 7:57 pm | _समीर_

>>ही ना अमेरिका भंगार..भंगार.. भंगारेस्ट आहे !!

अमेरिकेत राहून लोक भारताला शिव्या देतात त्याचा अनेकांना राग येतो म्हणून अमेरीकेत राहून अमेरिकेलाच शिव्या देण्याचा प्रयत्न आवडला :) (ह.घ्या.)

एकंदरीत लेख हा, "गादी खूपच मऊ आहे झोपच लागत नाही..सगळ्या सुखसोयी आहे पण सुख बोचतं आहे" अश्या छापाचा वाटला.

विजुभाऊ's picture

13 Aug 2009 - 10:44 pm | विजुभाऊ

बरेच दिवसानी एक चांगली चर्चा वाचायला मिळाली

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

झकासराव's picture

14 Aug 2009 - 10:11 am | झकासराव

मनापासुन लिहिल आहेस. छान जमलाय. :)
एवढी तीव्रता नसली तरी काहिवेळा घरच्यांची आठवण येवुन म्हण किंवा कोल्हापुरच्या वेगवेगळ्या आठवणी येवुन म्हण पुण्यात सुद्धा सुरवातीला मला त्रास झालाच होता की.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

पूजादीप's picture

14 Aug 2009 - 12:05 pm | पूजादीप

भाग्यश्री, जगाच्या पाठिवर कुठेही गेले तरी मायभुमी आणी आपले लोक यांवरील आपले प्रेम कधीच कमी होत नाही.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

14 Aug 2009 - 1:19 pm | भाग्यश्री कुलकर्णी

अग मी साधी महाराष्ट्राच्या बाहेर आहे तर मी जाम वैतागलेय्.त्यामुळे भा.पो.