मनस्वीच्या आयुष्यातील पहिली शाळा संपून एक वर्ष झालं. गेल्या वर्षी मार्चमध्ये तिची शिशु गटाची शाळा संपली. पहिल्या दोन-तीन दिवसांचा अपवाद वगळता ती कधी रडली नाही. नव्या शाळेत गेल्या वर्षी बालवाडीसाठी प्रवेश घेतला, तिथेही रमली. आता नव्या शाळेहून येताना बऱ्याचदा आम्ही तिच्या पहिल्या म्हणजे शिशु गटाच्या "पाखर' शाळेवरूनच बरेचदा जातो. अनेकदा त्यामागचा उद्देश असतो - तिच्या शाळेच्या आठवणी कायम ठेवणं!
हा आजार "अटॅचमेंट'चा! भावनिक जवळिकीचा. अशा भौतिक वस्तूंशी माझी कदाचित प्रत्यक्ष नात्यांपेक्षाही जास्त अटॅचमेंट आहे. आणि मुलीचीही तशी असावी, अशी (अनाठायी) अपेक्षा आहे. तिला मात्र पहिल्या "पाखर' शाळेतलं ढिम्म काही आठवत नाही. एकदा तिथल्या मुख्य बाई भेटल्या, त्यांनाही तिनं फारसं ओळखलं असावं, असं वाटलं नाही. बाकीच्या बाया आणि मुलांची नावं तर तिला अजिबात आठवत नाहीत. तिथली बाग, झोपाळा, घसरगुंडी आणि रचनाही आठवत नाही. कदाचित, ती नव्या शाळेत रमलेय म्हणूनही असेल. पण तिनं यापैकी काहीच विसरू नये, असं मलामात्र वाटत राहतं.
माझी सगळ्याच गोष्टींशी अटॅचमेंट व्हायची, होते. बालवाडीत मी एका नगरपालिकेच्या शाळेत होतो, तिथलं काही आठवत नाही. पण पहिली ते चौथी ज्या शाळेत शिकलो, तिथल्या पाण्याच्या टाकीपासून गॅदरिंगच्या रंगमंचापर्यंत सर्व काही लख्ख आठवतं. किंबहुना, ते बदलू नये, असंच वाटायचं. तीच गत माध्यमिक शाळेबद्दलची. सातवीत आम्ही शाळेच्या दुसऱ्याच इमारतीत होतो. पण एकच वर्ष. बाकी जवळपास नऊ वर्षं एकाच शाळेच्या दोन इमारतींत काढली. आजही तिथली रचना, खोल्या, प्रयोगशाळा, शिक्षकांची खोली, आमचे वर्ग, मैदान, पाण्याच्या टाक्या, जिने, आमची दंगामस्ती करण्याची जागा, सगळं काही डोळ्यांत भरलेलं आहे. मोकळ्या वेळी हे आठवणींचे अल्बम चाळायला घेतले, की एकही फोटो खराब झालेला नाहीये, याची खात्री पटते.
नव्या युगाच्या गरजेनुसार दोन्ही शाळांचं रूप मात्र बदललं. इमारती पाडून नव्या आधुनिक पद्धतीनं बांधण्यात आल्या. आताच्या इमारतींशी तेवढी अटॅचमेंट वाटत नाही.
कॉलेजशी पहिल्या काही वर्षांत माझी फारशी जवळीक नव्हती. बारावीत एकदा, एसवायला एकदा नापास झाल्यानंतर आणि एखादाच अपवाद वगळता बहुतेक वार्षिक परीक्षांत "एटीकेटी'च्या शिडीच्या आधारे वर सरकल्यानंतर कॉलेजविषयी फार काही आस्था असण्याचं कारण नव्हतं. पण टीवायला मात्र मी अगदी सिन्सिअर वगैरे विद्यार्थी झालो होतो. फर्स्टक्लासच्या रूपानं त्याचं फळही मिळालं. सुदैवानं, आम्ही कॉलेजात होतो, तेव्हाची रचना आहे तशी कायम आहे. अजूनही त्याच वर्गात, त्याच प्रयोगशाळेत पुन्हा जाऊन बसावंसं वाटतं. पण कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता!!
पुण्यात राहायला आल्यानंतर पहिली सहा-सात वर्षं जिथे काढली, त्या भाऊ महाराज बोळातील लॉज म्हणजे माझं दुसरं घर झालं होतं. रत्नागिरीनंतर सर्वाधिक काळ राहिलो, असं दुसरं ठिकाण! तिथून कधी सोडावंसंच वाटत नव्हतं, पण नंतर वेगळं राहण्याची खुमखुमी आली, म्हणून सोडावं लागलं. त्यानंतर शनिवार पेठेतल्या त्या भाड्याच्या कोंदट, एकलकोंड्या खोलीशीही माझी कायमची सलगी झाली. आत्ता नुकताच तो वाडा पाडून अपार्टमेंट बांधायला घेतल्याचं कळलं, तेव्हा जीव गलबलला. गेली सात वर्षं आता पुण्यात स्वतःच्या हक्काच्या घरात राहतोय. कधीकाळी परवडलं तर, अधिक सुविधांसह मोठा फ्लॅट घ्यायचा विचार आहे. पण त्या वेळी सुद्धा या घराशी नातं तोडण्याच्या कल्पनेनंही कसंनुसं होतं!
रत्नागिरीचं आमचं घर पूर्वी कौलारू होतं. 89 सालाच्या दरम्यान ते पाडून स्लॅब घातला. आमच्या जुन्या घराचा फोटो काढून ठेवायला हवा होता, ही रुखरुख कायम मनात राहील. अजूनही डोळ्यांच्या अल्बममधून ते दूर गेलं नसलं, तरी माझ्या मुलीला, बायकोला दाखवायला त्याच्या स्मृती छापील स्वरूपात तरी शिल्लक नाहीत! म्हणूनच आता डिजिटल कॅमेरा घेतल्यापासून कुठल्याही गोष्टी कॅमेऱ्यात टिपून तारीख-वारासह साठवून ठेवण्याचं व्रत अंगीकारलं आहे.
आयुष्याच्या संध्याकाळी बाकी काही नाही राहिलं, तरी या स्मृती कायम सोबत राहणार आहेत!
प्रतिक्रिया
19 Jul 2009 - 5:16 am | रेवती
वा! मस्त विषय!
मलाही माझ्या शाळेच्या अश्या आठवणी आहेत पण माझ्या मुलाला मात्र त्याची पहिली शाळा तिथल्या भरपूर जाड पण प्रेमळ असलेल्या बाई असं काहीही आठवत नाही. त्यांच्याबरोबर काढलेला एकमेव फोटो मात्र आहे. त्यावेळी ,"आई, तू मिस् मरियासारखी जाड का नाहीस?" अशी तक्रार सारखी करायचा. हेही त्याच्या लक्षात नाही. आता सांगितलं तर जोरात हसतो.
रेवती
19 Jul 2009 - 8:42 am | नाना बेरके
फार सुंदर लिहिलंय.
आयुष्याच्या संध्याकाळी बाकी काही नाही राहिलं, तरी या स्मृती कायम सोबत राहणार आहेत!
- हे खरंच आहे . . . कदाचित सगळ्यांच्याच बाबतीत.
19 Jul 2009 - 1:53 pm | प्राची
फारच सुंदर लेख.... :)
हा लेख वाचून आता मन आठणींच्या अल्बममध्ये विहार करतंय. 8>
19 Jul 2009 - 1:55 pm | दशानन
फार सुंदर लिहिलंय.
19 Jul 2009 - 7:48 pm | क्रान्ति
आवडलं. खूप मनातलं लिहिलंय!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
20 Jul 2009 - 12:12 am | विसोबा खेचर
आठवणींचा कॅलिडिओस्कोप आवडला..
जियो..!
तात्या.
20 Jul 2009 - 6:00 am | स्वाती२
खूप छान लिहीलय.
20 Jul 2009 - 4:27 pm | ज्ञानोबाचे पैजार
फारच सुंदर निरीक्षण आहे. मला असे वाटते की हे नैसर्गीक आहे. आपण मोठी माणस जरी "लहान पण देगा देवा" असे म्हणत असलो तरी मोठे होणे हे लहानांसाठी फारच कष्टाचे असते. साधे दात पडुन नवीन उगवण्याचे बघा. तशा प्रकारच्या वेदना आपण मोठे झालो की सहन करुच शकणार नाही. अशा अनेक घटना लहान मुलांच्या आयुष्या मधे घडत असतात की ज्या त्यांना न आठवलेल्याच बर्या. याचमुळे की काय निसर्गतः त्यांच्या मधे भुतकाळ विसरुन जाण्याची रचना असावी. जेणे करुन ते भविष्याला हसत हसत सामोरे जाउ शकतील.
मोठे झाल्यानंतरच्या आठवणी आजुबाजुचा समाजच आपल्याला विसरु देत नाही. ( आता हेच पहा ना माझे लग्न झाले आहे याचा विसर पडु लागे पर्यंत समोरील युवती मला काका म्हणुन हाक मारते)
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
20 Jul 2009 - 6:41 pm | आशिष सुर्वे
वरील धागा वाचून माझ्या गावचे आणि गावच्या घराची काही छायाचित्रे ईथे प्रकाशित करावीशी वाटली...
तात्यांची अनुमती असेल तर्र करीन म्हणतो.
-
कोकणी फणस