"ह्या भेटीने माझ्या सन्मानाचं सार्थक झालं."

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
9 Jul 2009 - 10:14 am

"सुजाता, तुझा सन्मान होण्यास खरोखरंच तू पात्र आहेस.माझी ही भेट तू घरी गेल्यावर उघडून बघ."

सुजाताचा ह्या वर्षाची उत्तम शिक्षिका म्हणून तिचा तिच्या शाळेत सन्मान केला गेला.सुजाताची आई त्याच शाळेत अनेक वर्ष शिक्षण देण्याचं पुण्य कार्य करून निवृत्त झाली होती.मी तिला आमच्या घरी बोलवून पार्टी दिली.जेवण वगैरे झाल्यावर मी सुजाताशी गप्पा केल्या.
"सुजाता तू तुझ्या आईमुळे शिक्षिका व्हायला प्रवृत्त झालीस का?" असं सरळ प्रश्न केला.
मला म्हणाली,
"मला वाटतं,जे ज्ञान आत्ता उपलब्ध आहे आणि उद्या विकसित केलं जाणार आहे त्यांच्या मधलं शिक्षक हे एक प्रवेश-द्वार आहे. माझ्या आईमुळे मी शिक्षक व्हायला जास्त प्रोत्साहित झाले ह्यात प्रश्नच नाही.
बर्‍याच विद्यार्थ्यांना वाटत असतं की शिक्षक केवळ काय करायचं आणि काय करूं नये हे सांगण्यासाठी असतात. असलं आचरण ठेवल्याने शिक्षण पद्धतित ही मोठी समस्या होऊन बसते.कारण अशाच आचरणाने त्या व्यक्ति आपल्या मुलांकडे आपले विचार व्यक्त करतात किंवा मुलांवर ते विचार प्रतिबिंबीत होण्याचा संभव असतो."

"पण मला वाटतं शिक्षाकाचा पेशा,इंजिनिअर,डॉक्टर किंवा एखाद्या अकौन्टट पेक्षा जरा यथा तथाच समजतात.तुला नाही वाटत? "
हा प्रश्न मी तिला विचारून थोडं ज्याला हिंदीत "उकसाना" म्हणतात ना तसं केलं.
हे ऐकून सुजाता शांतपणे म्हणाली,
"मला वाटतं आपण शिक्षकांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे आदर दाखवित नाही.शिक्षकच देशाचं रूप तयार करतात.कशा प्रकारची देशाची जनता असावी हे निर्धारित करतात.प्रत्येकाला आपल्या सुरवातीच्या कक्षेपासून शिक्षाकांच्या आठवणी असतात. स्मृती आणि संकेत बरोबरीने असतात,ते अल्पप्रमाणात प्रत्येकाच्या आयुष्यात निर्धारित असतात.तसाच त्याचा प्रभाव अल्पसाच असेल, परंतु,नीट पाहिल्यास कुणाचं आताचं जीवन आहे ह्यामधे, आणि त्यावेळचे शिक्षक किती प्रगतिशील असतील त्यामधे काही ना काही संबंध असावा असं दिसून येईल."
मी म्हणालो,
"माझे शिक्षक मला अजून आठवतात.
माझे जेव्हडे म्हणून शिक्षक होते ते सर्व माझ्या आठवणीत आहेत.काही शिक्षक मला आवडत नसत.
मला आठवतं काही शिक्षकांच्या वर्गात मला बसायला आवडायचं.कशा ना कशा तर्‍हेने आजचं माझं जीवन ह्या सर्व शिक्षाकामुळे घडलं आहे.मला माहित आहे की माझे राजकारणावरचे विचार माझ्या इतिहासाच्या शिक्षकामुळे आणि त्यांच्या मूल्यामुळे काहीसे निर्धारित झाले आहेत. माझ्या जीवनाचा अंत कसा व्हावा ह्याचा विचार बर्‍याच मोठ्या प्रकारे माझ्या बिझिनेस शिक्षकांच्या मूल्यावर निर्धारित झाला असावा.असेच हे काही प्रकार शिक्षकाडून विद्यार्थ्यावर चिरस्थायी प्रभाव करून जातात."

सुजाता म्हणाली,
’मला आठवतं एकदा माझ्या वर्गात एक विद्यार्थी आमच्या शिक्षकाच्या अगदी तोंडावर अनादर दाखवित होता. मला आठवतं मी त्या विद्यार्थ्याला पूर्ण मूर्ख समजून गेले होते.कदाचीत माझी आई पण शिक्षिका होती म्हणून मला त्या विद्यार्थ्याबद्दल तसं वाटलं असेल.तसं असो वा नसो तरी पण एखाद्याने असं का वागावं?.
काही वेळा शिक्षक विद्यार्थ्याना उद्विग्न करतात.मी स्वतः एकदा शिक्षाकवर रागावले होते.आणि त्या शिक्षकांना सांगावसं वाटलं होतं.पण मी तसं करू शकले नाही कारण एक तर मी त्या शिक्षकाबरोबर आपत्तित आले असते आणि त्याशिवाय माझ्या आईवडीलांना कळल्यावर मी आणखी संकटात पडले असते.
मला वाटतं शिक्षकच विद्यार्थ्यांच्या भावी यशाला जास्त जबाबदार असावेत.शिक्षकच विद्यार्थ्यांना लागणारी निपुणता आणि रोजच्या व्यवहारात लागणारं संपर्क ठेवता येईल असं कौशल्य विकसित करतात. ह्या निपुणतेचा उपयोग समाजात निर्वाह करण्यात होतो.शिक्षक त्यांच्या जीवनातले अनुभव विद्यार्थ्यांशी वाटतात. त्यामुळे आपल्या चुका आपल्याच लक्षात येतात.हेच अनुभव आपलं सामर्थ्य आणि क्षमाता काय आहे ते दाखवतात. मग कुठचंही कॉलेज कुणी निवडु देत कुठच्याही पेशाचं अनुसरण करू देत त्या अनुभवाचा उपयोग झाल्याशिवाय राहत नाही.आपल्या आयुष्यात शिक्षक खरोखरच प्रभावशाली असतात यात वाद नाही."

मला एका शिक्षकाची आठवण आली.
मी म्हणालो,
"सुजाता माझे एक शिक्षक मला आठवतात,त्यांना मी विसरणार नाही,ते माझे बायोलॉजीचे शिक्षक.त्यांना त्यांचा सन्मान अपेक्षीत होता आणि दुसर्‍यानाही ते सन्मानाने वागवित असत.आणि एकमेकाशी विद्यार्थ्यांनीपण मैत्रीपूर्ण रहावं अशी त्यांची अपेक्षा असे.माझे हे शिक्षक वृत्तिने कडक अणि सख्त असायचे.त्यांच्या व्याख्यानात स्वारस्य असायचं.कठीण विषयसुद्धा ते सोपे करून शिकवायचे.त्यांनी प्रवास खूप केला होता.बायोलॉजीच्या सम्मेलनाला जायचे,आल्यावर आम्हाला आधुनिक घटनेंची माहिती देऊन पूर्ण विषयावर सूचित करायचे.त्यामुळे ते शिकवीत त्या विषयात आमचं अप्रत्यक्षपणे स्वारस्य वाढलं होतं.ह्या शिक्षकांबरोबर त्यांच्या प्रयोग शाळेत काम करायला बरं वाटायचं. बायोलॉजी विषयावर प्रेम करायचं मी ह्या शिक्षकामुळेच शिकलो.ते नुसतेच चांगले शिक्षक नव्हते तर ते आमच्यावर ध्यान द्यायचे आणि आम्हाला सहाय्यपण द्यायचे.शाळा सुटल्यानंतर ते मागे राहायचे आणि शाळेच्या सुट्टीत शाळेत येऊन कुणाला जादा मदत हवी असल्यास द्यायचे.वरचा नंबर घेण्यासाठी ते आम्हाला आव्हान द्यायचे. "

"माझे पण असेच एक शिक्षक होते.कदाचीत अशाच सर्व कारणामुळे मी शिक्षिका होण्यास प्रवृत्त झाली असावी."
असं म्हणून सुजाताने मला शिक्षण ह्या शब्दाचा चक्क अर्थ सांगितला.ती म्हणाली,
"शिक्षण ह्या शब्दाचा दृढ विचाराने अर्थ असा होईल की "ज्या प्रक्रियेने सर्वसाधारण ज्ञान, प्रदान करणं किंवा प्राप्त करणं,तर्क आणि निर्धारणाचा विकास करणं, आणि सर्वसाधरणपणे स्वतःला किंवा दुसर्‍याला प्रौढ जीवनात बौद्धिक रूपाने तत्पर करणं."
कुणी कल्पना तरी करील का "शिक्षण" ह्या शब्दाचा अर्थ अनेक वर्षांच्या मेहनतीमुळे,समर्पणामुळे आणि वचनबद्धतेमुळे आचरणात आणता येतो. ज्ञान मिळवणं आणि प्रशिक्षण घेणं जीवनाच्या मुख्य अवधित केल्याने उभ्या आयुष्यात व्हायचा तो फरक होतो.आणि जसं वंय होत जातं तसं आणखी आणखी ज्ञान मिळवणं हे ज्या त्या व्यक्तिवर अवलंबून रहातं. मनुष्य जातिला उन्नतिसाठी आणि उत्कृष्ठ होण्यासाठी प्रत्येक पिढीने जास्त ज्ञान मिळवण्याच्या प्रयत्नात असायला हवं."

सुजाताचे हे विचार ऐकून मला तिचा खूपच आदर वाटला.
मी तिला आणलेली भेट तिच्या हातात देत म्हणालो,
"सुजाता, तुझा सन्मान होण्यास खरोखरंच तू पात्र आहेस.माझी ही भेट तू घरी गेल्यावर उघडून बघ."
घरी गेल्यावर ती भेट तिने लगेचच उघडून पाहिली.आणि सद्गदीत होऊन मला लगेचच फोन करून म्हणाली,
"काका,ह्या भेटीने माझ्या सन्मानाचं सार्थक झालं"
ती सर्व श्रेष्ठ शिक्षकाची प्रतिमा होती.तो सानेगुरूजींचा फोटो होता.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

9 Jul 2009 - 11:59 am | यशोधरा

छान लेख. आवडला.

मिसळभोक्ता's picture

9 Jul 2009 - 2:47 pm | मिसळभोक्ता

लय भारी.

-- मिसळभोक्ता

टारझन's picture

9 Jul 2009 - 9:26 pm | टारझन

असेच म्हणतो .

-- मिसळचापी
(खजिनदार, एक मंडळ)

प्राजु's picture

9 Jul 2009 - 9:01 pm | प्राजु

सुंदर!!
लेख खूप आवडला. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/