बाबूराव पाटील म्हणजे अवली माणूस. गोंधळे बुद्रुक गावाचे सरपंच; पण रुबाब पंतप्रधान असल्याचा. अडल्यानडल्याची कामं करतील, पण प्रत्येक ठिकाणी मिरवायला मिळालं तर! लग्न असो, मुंज असो, साठी-पंच्याहत्तरी असो की श्राद्ध; बाबूरावांना काही वर्ज्य नाही. श्रद्धांजली सभेतही असं भाषण ठोकणार, की निवडणुकीच्या प्रचाराची सभा आहे की काय, असंच वाटावं.
या अतिउत्साहापायी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यातही बाबूराव पटाईत. कधी तोंडघशी पडतील, याचा नेम नाही. बरं त्याचं यांना सोयर ना सुतक. आजूबाजूची मंडळीच खजील व्हायची. बाबूराव मात्र जय की थय!
एकदा काय झालं, गावातल्या कुणातरी मान्यवराचं दुःखद निधन झालं होतं. दुसऱ्या दिवशी श्रद्धांजली सभा होती. आता राजकारणातच लुडबूड करणारं कुणीतरी म्हातारं गचकलं होतं, त्यामुळं बाबूरावांना आणखी चेव आला होता. बाकीच्यांच्या श्रद्धांजल्या संपून आपल्याला भाषणाची संधी मिळेपर्यंत बाबूरावांना धीर नव्हता. शेवटी एकदाची त्यांची भाषणाची वेळ आली. धोतरबितर सावरत बाबूराव मध्यभागी पोचले. चांगलं पल्लेदार भाषण ठोकलं. गेलेल्या माणसाचे कधीच न पाहिलेले, जाणवलेले अनेक गुण त्या वेळी उपस्थितांना कळले. (श्रद्धांजली सभांच्या वेळी बऱ्याचदा असंच होतं ना?) बाबूराव भाषणाच्या ओघात असंही म्हणून गेले, ""तर, असं सगळं महान काम करणाऱ्या आमच्या गणपतरावांसारखा दुसरा पुढारी होणार नाही. त्यांनाच यंदाच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करा!''
तिथं असणाऱ्यांची तोंडं पाहण्यासारखी झाली. काही जणांची तर हसून हसून मुरकुंडी वळली.
बाबूरावांचा बंदोबस्त कसा करायचा, याचीच सगळ्यांना चिंता लागून राहिली होती. बाबूरावांना आवरायला तर हवं होतं, पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी?
गोंधळे बुद्रुकला सरकारी योजनांचंही अलीकडे वावडं नव्हतं. कुठलीही नवीन सरकारी योजना आली, की आपल्या गावात ती सगळ्यात आधी पोचली पाहिजे, असा बाबूरावांचा कटाक्ष होता. एकदा तर "पल्स पोलिओ'ची लस त्यांनी बायाबापड्यांसकट म्हाताऱ्याकोताऱ्यांनाही घ्यायला लावली होती आणि नसबंदी शिबिराच्या मोहिमेचे शाळेत बोर्ड लावले होते. गावातली हागणदारी मुक्त करून "सुलभ सार्वजनिक स्वच्छतागृह' बांधण्याची योजना सरकारनं जाहीर केली. मुळात ज्या ठिकाणी जाऊन अंगातली घाण निस्तरायची, त्याला "स्वच्छतागृह' कसं म्हणायचं, असाच प्रश्न गावातल्या सगळ्यांना पडला होता. पण बाबूरावांनी त्याचं निराकरण केलं. शेवटी "शरीराची स्वच्छता करण्याचं ठिकाण', असा सगळ्यांनी अर्थ काढला. पण मग तिथे जाऊन आंघोळ का करायची नाही, या बायाबापड्यांच्या प्रश्नाला बाबूरावांनी सफाईनं बगल दिली.
स्वच्छतागृहाच्या उद्घाटनासाठी बाबूरावांनी जंगी तयारी केली होती. एकतर आपण करून आणलेलं किंवा न आणलेलं कुठलंही काम असलं, तरी बाबूरावांचा आब बघण्यासारखा असे. त्यातून हे तर गावाच्या स्वच्छतेचं, कल्याणाचं काम. बाबूराव पेटलेच होते. रांगोळ्या, पायघड्या, सनई-चौघडे, फटाके, सगळी जय्यत तयारी होती. स्वच्छतागृहाचं उद्घाटन आहे, की एखादं संमेलन, हेच कळत नव्हतं. कुठल्याही गोष्टीचं उद्घाटन करायचं, म्हणजे तिथं प्रत्यक्ष तो अनुभव घ्यायचा, हा हिशेब बाबूरावांच्या डोक्यात पक्का. त्यामुळं मटण शॉपचं उद्घाटन मटण खाऊन, या तत्त्वानुसार केशकर्तनालयाचं उद्घाटन केस कापून घेऊन, देवळाच्या जीर्णोद्धाराचं उद्घाटन पूजा करून, हे ठरलेलं होतं. तसंच, स्वच्छतागृहाचं उद्घाटन ज्या उद्दिष्टासाठी ते बांधलं होतं, ते उद्दिष्ट साध्य करूनच बाबूरावांनी पार पाडलं.
तर बाबूरावांचा हा "धुमाकूळ' आता आवरणं आवश्यकच झालं होतं. गावातल्या जुन्या जाणत्यांची आणि तरुण तुर्कांची बैठक झाली. बाबूरावांच्या "उद्घाटनरोगा'ला कंटाळलेले त्यांचे समर्थकही त्यात सामील झाले. त्यांनी मिळून एक योजना आखली. बाबूरावांच्या डोक्यातलं खूळ कायमचं उतरवण्याची.
ठरल्याप्रमाणे बेत आखण्यात आला. एका नवीन इमारतीचं उद्घाटन करायचं होतं. इमारत पूर्ण होईपर्यंत बाबूरावांना खबर लागू देण्यात आली नाही. तयारी पूर्ण झाल्यावर गावकऱ्यांनी बाबूरावांना घरी जाऊन निमंत्रण दिलं. उद्घाटनाचं निमंत्रण म्हटल्यावर बाबूराव एका पायावर तयार झाले. त्यांच्यासाठी गाडी पाठवण्यात आली. बाबूराव आणि दोघे-चौघे तयारी करून त्या ठिकाणी अगदी वेळेवर पोचले. बघतात तो काय, सगळा गावच तिथे जमा झाला होता. बाबूरावांच्या वाऱ्यालाही कधी न उभे राहणारेही मोठ्या उत्साहात तिथे आले होते. बाबूरावांना हे गौडबंगाल कळेना. आपली लोकप्रियता वाढलेली दिसतेय, एवढाच समज त्यांनी करून घेतला.
सनई-चौघडे वाजू लागले आणि इमारतीची फीत कापण्यासाठी बाबूरावांच्या हाती कात्री देण्यात आली. सोपस्कार उरकून, फोटो-बिटो काढून बाबूराव मोठ्या ऐटीत आत शिरले. आत बघतात तो काय, कुणाच्या तरी मरतिकाची तयारी चालली होती. पिंड-बिंड लावले होते. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, पण कुणाला विचारायची सोय नव्हती. बाबूराव पुढे चालत राहिले. मागे गावकऱ्यांचा जथा. आणखी आत गेल्यावर मोठ्या गुहांसारखी दोन ठिकाणं होती. भक्कम दारांनी त्यांची तोंडं बंद केली होती. बाबूरावांना आता स्वस्थ बसवेना.
"गण्या, अरे काय आहे हे?' त्यांनी एकाला विचारलं.
"बाबूराव, अवो, आपल्या गावात चांगली मसणवट नव्हती ना! कुठंतरी लांब जावं लागायचं मरतिकाला. आता सरकारनंच ही सोय केलेय. इलेक्ट्रिक मरतिकाची! या गुहेत एकदा बॉडी ठेवली, की दोन मिनिटांत खेळ खल्लास! अस्थी जमा करणं नाय, अन् काय नाय. सगळं झट की पट!'
बाबूराव जागच्या जागी खाली बसले. थोडं पाणी प्याल्यानंतर भानावर आले.
"अरे, स्मशानाचं उद्घाटन? आणि माझ्या हस्ते? काय अवदसा आठवली ही तुम्हाला?'
""हां बाबूराव...! अवो, तुम्ही आमचे नेते. गावचे पुढारी. तुमच्याशिवाय कुणाला बोलवायचं? आता हार नाय मानायची. तुम्ही प्रत्येक ठिकाणी स्वतः अनुभव घेता ना! मग आता इथं मागं नाय हटायचं. इथं पन प्रत्यक्ष अनुभव घेऊन बघितलाच पायजे. अवो, इज्जतीचा प्रश्न हाय तुमच्या!'' गण्यानं भरीला घातलं.
बाबूराव आता लटलट कापायलाच लागले. कुणाशी काही बोलायचीही त्यांची हिंमत राहिली नाही. मागल्या पावली जी धूम ठोकली, ते पुढे कुणाला दिसलेच नाहीत.
तेव्हापासून बाबूरावांनी कधी उद्घाटनाचं, भाषणाचं नाव काढलं नाही.
आता शेंबडं पोरदेखील बाबूरावांच्या दारावरून जाताना म्हणतं, "काय बाबूराव, येता का शाळेत उद्घाटनाला?'
बाबूराव दाण्कन दार लावून घेतात.
-----------
प्रतिक्रिया
16 Feb 2008 - 8:27 pm | इनोबा म्हणे
खरे तर तुमच्या या लेखनाला प्रतिसाद देणारा पहीला मीच,म्हणजे माझ्याच हातून उदघाटन...व्हय की नाय....
आवडला बरं का! अजून येऊ द्या...
-इनोबा