आभाळ अगदी कोरं करकरीत
तू पाठवलेले ढग रिते होवून
उलटून गेले असतील
बरेच दिवस.
पुढयातल्या कागदासारखं
मनावरही उमटत नाहीत
तुझ्या पावसाची अक्षरं.
दाही दिशांना नजरेचे
घोडे फेकून पहावं
३६० अंशांत
एखादाही चुकार ढग
नाहीच.
निळा कॅनव्हासही
ओकाबोका.
विहिरीत उतरावं
खोल खोल
तर सगळे सांदी कोपरे
व्हॅक्युम सकरने
शोषलेले.
आता खणायचीही भीती वाटते
न जाणो तिथलंही पाणी
अंतर्धान पावलेलं असेल?
बारोमास दुष्काळ की काय ?
असं स्वत:ला विचारतानाच
ओल्या मातीचा गंध मनात
आणि मी
सचैल स्नात...
स्वत:लाच किती फसवावं माणसानं?
प्रतिक्रिया
20 Jun 2009 - 12:46 pm | विनायक प्रभू
कविता.
दुसरी विहीर शोधावी.
20 Jun 2009 - 12:50 pm | जागु
छान.