नाना कुलकर्णी

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
19 Jun 2009 - 8:03 am

दुपारच्या टळटळत्या उन्हात भटकताना मी अकोल्यातल्या एका चौकातील आळशी संकुलाच्या इमारतीवरचा झेंडा बघून मी आत शिरलो आणि जिना चढून थेट तिसऱ्या मजल्यावर गेलो.
भाजपच्या त्या निवडणूक कार्यालयात पन्नासएक कार्यकर्ते हॉलमधल्या भल्यामोठ्या सतरंजीवर पहुडले होते. कुणी खांद्यावरचा रुमाल स्वतःभोवती पंख्यासारख्या फिरवत होते, तर कुणाच्या हातात वर्तमानपत्रांच्या घड्या होत्या. तिथून आणखी पुढे, आत गेलो.
टेबलावर एक जण फायलींच्या ढिगाऱ्यात डोकं खुपसून बसला होता. सिल्क खादीचा झब्बा, जाड चौकोनी फ्रेमचा चष्मा... निवडणूक कार्यालयाची सारी जबाबदारी त्याच्यावरच असावी, असं व्यक्तिमत्त्व. मी ओळख करून दिली.
त्यांनीही वर पाहत नमस्कार केला. `मी नाना कुलकर्णी...' स्वतःचं नाव सांगत समोरच्या खुर्चीत बसण्याची खूण करून त्यांनी पुन्हा फायलीत डोकं खुपसलं.
बाजूच्या पार्टिशनपलीकडच्या केबिनमध्ये आणखी काही जण कामात असावेत. नाना इकडूनच त्यांना सूचना देत होते. दहा-पंधरा मिनिटांनंतर मी घड्याळाकडे बघितलं आणि नानांनी फाईल मिटली. घड्याळाकडे पाहत त्यांनी बाहेर सुस्तावलेल्या कार्यकर्त्यांना हाक दिली.
`चला... कामाला लागा... निघा...' बसल्या जागेवरूनच ते म्हणाले आणि सुस्तावलेले ते कार्यकर्ते क्षणात ताजेतवाने झाल्यासारखे उठले. भिंतीशी ठेवलेल्या पिशव्या काखोटीला मारल्या गेल्या. मिनिटभरात कार्यालयातली गर्दी ओसरली.
उन्हं खूप असल्यामुळे त्यांना जरा वेळ सुट्टी दिली होती. थोडेसे सैलावून बसत नाना म्हणाले,
`बोला.'... माझ्याकडे पाहत, जुनी ओळख असल्याच्या सुरात नाना ऐसपैसपणे बोलले आणि मी काही बोलायच्या आधीच त्यांनी टेबलाचे खण उघडले. आतून भराभरा कागद बाहेर काढले आणि माझ्या हातावर ठेवले.
`हा आमच्या उमेदवाराच्या प्रचाराचा कार्यक्रम... हे प्रत्येक बूथवरच्या कार्यकर्त्यांचे नंबर... मी त्यांना वाटून दिलेल्या कामाची यादी... हा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी केलेला पत्रव्यवहार.. बाहेरच्या भिंतीवर उमेदवाराच्या येत्या आठवडाभराच्या प्रचार दौऱ्याचा संपूर्ण तपशील चिकटवलाय... कार्यकर्त्याला कोणतीही शंका राहू नये म्हणून सगळं काही कागदावर उतरवलं आहे. ते तसंच्या तसंच होणार.'... नाना झपाट्यानं बोलत होते.
`या मतदारसंघात कोणते मुद्दे प्रचाराचे ठरणार?'... नानांनी दिलेले कागद बॅगमध्ये ठेवत मी विचारलं आणि पुन्हा एक ड्रॉवर उघडून त्यांनी आणखी एक कागद माझ्या हातात ठेवला. संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या ठळक समस्यांची यादी त्यावर होती. वीजटंचाई, पाणीटंचाई, आदिवासींच्या, विकासकामांच्या, शिक्षणाच्या, कुपोषणाच्या समस्यांनी ग्रासलेल्या वेगवेगळ्या भागांचे नकाशेच त्यांनी तयार केले होते.
`अकोला जिल्हा आहे, पण इथला विकास मात्र तालुक्याच्या स्तराइतकाच... ग्रामीण भागात अजूनही चांगले रस्ते नाहीत. सांडपाण्याची विल्हेवाट नीट नाही. त्याचा परिणाम पाण्याच्या भूमिगत स्रोतांवर होतो. आरोग्याच्या समस्या उग्र होतायत. पूर्वी अकोल्याच्या मुलांचं नाव एस.एस.सी. बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये असायचं... काही वर्षांपासून ते गायब झालंय... अकोट विधानसभा क्षेत्रात आदिवासींच्या समस्या कायमच आहेत. मूर्तिजापूरला पाणीटंचाईचा प्रश्žन भेडसावतोय.'... नाना एकेका तालुक्याच्या समस्यांची यादी वाचत होते.
तो कागद हातात घेऊन आणि ऐकता ऐकता मी काही नोंदी करून घेत होतो.
शिवाय नानांची टेबलाच्या खणात आणखी काही कागदांची शोधाशोध सुरूच होती.
... `तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे?' माझ्या डोळ्यात रोखून पाहत नानांनी विचारलं. मी डोळ्यांनीच `काय' म्हणून विचारलं.
`इथे पेन्शनरांच्याही समस्या खूप आहेत... 1970 च्या दशकात सरकारी नोकरीत असलेले असंख्य लोक आता रिटायर झालेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रिकामेच असतात. वेळ कसा घालवावा, याच्याच चिंतेतल्या या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. निवडणुकीच्या राजकारणात या मुद्द्याला स्थान नाही, पण त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घ्या. त्यांना काम द्या.'... नाना तळमळून बोलत होते.
... ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या हा काही एकट्या अकोला मतदारसंघाचा विषय नाही.
नाना कुलकर्णी भाजपच्या निवडणूक प्रचाराच्या आखणीत बुडालेत. मोकळ्या वेळात ते जेव्हा घरी जात असतील, तेव्हा बागेत, मंदिरांमध्ये आणि वाचनालयांमध्ये दिसणारे ज्येष्ठ नागरिकांचे घोळके त्यांना अस्वस्थ करत असतील.
... पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडे पाहण्यासाठी मनाचा एक कोपरा जिवंत असावा लागतो.
राजकारणाच्या धबडग्यातही, नानांच्या मनाचा हा जिवंत कोपरा मला भावला. डायरीत नोंदवावासा वाटला...
----------

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

अनिरुध्द's picture

19 Jun 2009 - 9:38 am | अनिरुध्द

नाना कुलकर्णी फारच थोडे असतील आजच्या जगात. नानांसारखाच विचार प्रत्येकाला करायला जमला असता तर आज आपल्या देशातही प्रगती दिसली असती. असो. हे ही नसे थोडके. माणुसकीचा झरा हा असाच अखंड चालू राहूदे.

एकलव्य's picture

19 Jun 2009 - 10:10 am | एकलव्य

आवडली. धन्यवाद दिनेश५७!

असे नाना कुलकर्णी पायाचे दगड असतात... ज्यांच्या आधारावर कोठेतरी कधीतरी काहीतरी उभे राहण्याची आशा जागती राहते.

विसोबा खेचर's picture

19 Jun 2009 - 1:01 pm | विसोबा खेचर

एकलव्यासारखेच म्हणतो..

डायरीतली नोंद आवडली...

तात्या.

पुन्हा एकदा नाना कुलकर्णी मिपा वर भेटले. यापूर्वी ते सकाळमधून भेटलेच होते. आता पुस्तकातूनही भेटू द्या.....

अजय

रेवती's picture

19 Jun 2009 - 7:32 pm | रेवती

पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडे पाहण्यासाठी मनाचा एक कोपरा जिवंत असावा लागतो.
छान आठवण.
नाना कुलकर्णी ग्रेट म्हणायला हवेत.

रेवती

लिखाळ's picture

20 Jun 2009 - 10:02 pm | लिखाळ

नोंद आवडली. एकलव्याशी सहमत आहे.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)