'फिटे अंधाराचे जाळे' - एक सुरेल अनुभव

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
15 Jun 2009 - 10:40 pm

डॉ. किशोर भिसे यांच्या ’सिद्धकला’ या ठाण्याच्या संस्थेतर्फे शनिवार दि. १३ जून ला गडकरी रंगायतन येथे "फिटे अंधाराचे जाळे’ हा श्री. श्रीधर फडके यांच्या व कै. बाबुजींच्या गाण्यांचा कार्यक्रम अयोजित करण्यात आला होता. संकल्पना व संयोजन डॉ. किशोर भिसे व श्री. रवि चौबळ यांचे. ही संस्था केवळ कार्यक्रमच नव्हे तर अनेक उपक्रमही सातत्याने सादर करीत असते.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीधरजींनी देवाचे नाव घेत केली - ’देव देव्हार्‍यात नाही’.

आणि पहिल्याच गाण्यापासून कार्यक्रम रंगला. सूत्रसंचालन धनश्री लेले यांनी सांभाळले होते. या कार्यक्रमात श्रीधरजींच्या सोबत विद्या करंदीकर या सहकलाकार होत्या.

श्रीधर फडके हे मितभाषी, पण अधुन मधुन ते गीताच्या वा चालीच्या अनुषंगाने आठवलेला किस्सा आवर्जुन सांगत होते. श्रीधरजींनी ’तोच चंद्रमा’ सुरु करताच श्रोत्यांनी टाळ्यांनी गडकरी दणाणुन सोडले.

मग एकापाठोपाठ एक गाणी रंगत गेली. निवेदिकेच्या तोंडून गाण्याच्ये पहिले दोन शब्द येताच पुन्हा एकदा श्रोत्यांनी खुशीने टाळ्या दिल्या त्या 'कधी बहर कधी शिशिर' या मंगेश पाडगावकरांच्या यशवंत देवांनी संगीत दिलेल्या सदाबहार गीताला. हे गीत ऐकताना श्रीधरजींनी जेव्हा हळुच लाजरा पक्षी गावा ही ओळ घेताच 'पक्षी' या उच्चाराने साक्षात बाबुजींची आठवण करुन दिली. या कार्यक्रमात कुसुमाग्रज, गदिमा, पाडगावकर, शांता शेळके, ना. धो. महानोर, ग्रेस, सुधीर मोघे, प्रविण दवणे, शिरीष गोपाळ देशपांडे, नितिन आखवे अशा अनेक प्रतिभावंतांच्या अप्रतिम रचना ऐकायला मिळाल्या.

या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे नेटका वाद्यसंच. मोजक्य पण सुरेल वादकांनी या सुरेल कार्यक्रमात रंग भरला. तबल्यावर तुषार आग्रे होते तर तालवद्यांचा ताबा होता सुर्यकांत सुर्वे यांच्याकडे. बासरीचे सूर होते मोहीत शास्त्री यांचे तर सिंथेसायझर वर होते सागर टेमघरे. मोजकी पण सुसंवादी वाद्ये दाद मिळवुन गेली. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे नामवंतांची उपस्थिती. या कार्यक्रमास लेखक/ कवी डॉ. शिरिष गोपाळ देशपांडे तसेच संगीतकार अनिल मोहिले हे उपस्थित होते. श्रीधरजींनी श्री, देशपांडे यांना आवर्जुन रंगमंचावर बोलावुन घेत त्यांच्या उपस्थितीत त्यांची ’सलाम सलाम सलाम’ सादर केली. बाबुजींनी संगीत दिलेल्या अनेक गीतांमध्ये संगीत संयोजक अनिल मोहिले होते याचा श्रीधरजींनी खास उल्लेख केला

आपले संगीत संयोजन असलेले गीत ऐकताना श्री. अनिल मोहिले

अनेक आठवणी निघत होत्या आणि एकाहून एक अप्रतिम गाणी येत होती. फिटे आंधाराचे जाळे, हे गगना, सांज ये गोकुळी, मन मनास उमगत नाही, काल मी रघुनंदन पाहिले, मी राधिका, फुलले रे, कानडा राजा पंढरीचा, विठ्ठल आवडी, ज्योती कलश, तेजोमय नादब्रह्म, धुंद येथ मी, देहाची तिजोरी, काही बोलायाचे आहे, अवेळीच केव्हा, ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर अशी अनेक भावनांची अनेक गीतकारांची संपन्न गीते एकामागुन एक बरसत राहिली.

कार्यक्रम रंगात आला होता. रंगमंचावर निवेदिकेकडे एक चिठ्ठी आली. तिने ती वाचुन श्रीधरजींकडे सुपूर्द केली आणि 'अरे वा - आता फर्माईश ऐकविणार' या वर श्रोते खुश झाले. मात्र दुर्दैवाने ती चिठ्ठी आवडीचे गीत सादर करण्याची विनंती करणाऱ्या रसिकाची नव्हती तर ’वेळ संपली आहे, कृपया आवरते घ्या’ असा निरोप देणारी होती. प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट हा असतोच. दुपारचे अडीच वाजायला आले होते. मग 'तुला पाहिले मी नदीच्या किनारी' ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम संपताच थेट रंगमंच गाठुन फडके साहेबांचे आभार मानले व त्यांनी विनंतीला मान देत आपली छबी टिपू दिली. मग श्री. अनिले मोहिलेंना विनंती करुन त्याची सुहास्य मुद्रा टिपली आणि डॉक्टरसाहेबांचे व श्री. रवि चौबळ यांचे आभार मानुन निरोप घेतला.

संगीतमाहिती

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

16 Jun 2009 - 12:29 am | विसोबा खेचर

साक्षीदेवा,

उत्तम वृत्तांत रे! श्रीधरपंतांकडून मलाही या कार्यक्रमाचं आवर्जून बोलावणं होतं परंतु वेळेअभावी जमलं नाही..

माझे गुरुजी स्वर्गीय बाबुजी, माझी लाडकी ललितामावशी (बाबूजींची पत्नी) आणि श्रीधरपंत ही सारी मंडळी माझ्या अत्यंत घरोब्यातली आणि जिव्हाळ्याची!

आता खुद्द श्रीधरपंतांनाच या लेखाचा दुवा देतो म्हणजे तेही वाचतील! :)

सूत्रसंचालन धनश्री लेले यांनी सांभाळले होते.

धनश्री लेले हे एक विद्याव्यासंगी व्यक्तिमत्व आहे. वक्तृत्व कलेत तिचं विशेष प्राविण्य आहे. 'गुरुमहिमा', 'कवी - तात्याराव सावरकर' इत्यादी विषयांवर बोलतांना ती लोकांना अक्षरश: खिळवून ठेवते. आपण एकदा ठाण्याला मिपा कट्टा करूया तेव्हा तिला अवश्य बोलावूया. धनश्री ही माझी मैत्रीण आहे याचा मला अभिमान वाटतो!

आपला,
(बाबुजींचा शिष्य) तात्या.

श्रावण मोडक's picture

16 Jun 2009 - 12:44 am | श्रावण मोडक

सुं द र. स ग ळे च!

मुक्तसुनीत's picture

16 Jun 2009 - 8:02 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो ! :-)

सहज's picture

16 Jun 2009 - 8:12 am | सहज

हेच म्हणतो.

कार्यक्रम नक्कीच उत्तम झाला असेल.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Jun 2009 - 1:11 pm | बिपिन कार्यकर्ते

हेच म्हणतो.

बिपिन कार्यकर्ते

स्वाती दिनेश's picture

16 Jun 2009 - 12:23 pm | स्वाती दिनेश

सुं द र. स ग ळे च!
हेच म्हणते.
स्वाती

क्रान्ति's picture

16 Jun 2009 - 7:57 am | क्रान्ति

प्रत्यक्ष कार्यक्रम पहातोय, असं वाटलं वाचून. छायाचित्रेही सही.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा