लोकहो,
संतती न होण्याचे समाजातील प्रमाण मोठे आहे. आणि गेल्या काही वर्षात विविध कारणांनी ते वाढले आहे. याचे एक कारण म्हणजे प्रेमविवाहाचे वाढते प्रमाण. प्रेमविवाहात जोडिदारांच्या पत्रिका जुळत आहेत की नाही हा मुद्दा पूर्णपणे दुर्लक्षित होतो. आणि त्यानंतर त्याचे दुष्परिणाम संतती न होणे, संतती होऊन जाणे, वारंवार गर्भपात होणे, त्यातून येणारे नैराश्य, जोडीदारांचे एकमेकांशी न पटणे, "तुझ्यामुळे माझे आयुष्य बरबाद झाले" अशा स्वरूपाचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप, आणि त्याची परिणती म्हणजे घटस्फोट आणि विभक्तता.
त्याचप्रमाणे काहीजणांच्या कुंडलीत मुळातचं संततीसौख्य नसतं. त्यांना अनेक ट्रिटमेंट घेऊनही आणि विविध डॉक्टरांकडे जाऊनही संतानप्राप्ती होत नाही.
मुळात जर कुंडलीमध्ये काय आहे, हे जाणून घेतले तर वरील गोष्टींपासून आपोआप वाचता येतं. जर का दोघांपैकी एकाच्या कुंडलीत "वंध्यायोग" असेल( बीज-क्षेत्र अत्यंत कमकुवत ज्यामुळे गर्भधारणा होऊच शकत नाही), "मृतवंध्या" योग असेल ( मूल होऊन ते जाणे किंवा मृत बालक जन्मास येणे) किंवा "काकवंध्या" योग असेल ( संतती मानसिकदृष्ट्या विकलांग असणे - पंचमात बुध पापग्रहाने बिघडल्यास) , "नपुसंक" योग असेल ( पंचम आणि सप्तम भाव शनि, बुध, केतुने बिघडल्यास)आणि तो आधी समजला तर पुढे काय होणार आहे याची आगाऊ कल्पना असल्यामुळे संतानप्राप्ती न होताही अशी जोडपी आनंदाने एकमेकांबरोबर राहू शकतात. त्याचप्रमाणे ठराविक कालावधीपर्यंत वाट पाहून पुढे द्त्तक घेण्याचा विचारही करू शकतात.
ज्योतिषामध्ये संततीसंबंधी ज्या विविध गोष्टी सांगितल्या आहेत त्यातील महत्वाची म्हणजे बीज- क्षेत्र विचार ही आहे. त्यामध्ये स्त्री आणि पुरूषाची fertility कितपत प्रभावी आहे, त्यांना मूल होऊ शकते की नाही याचा सखोल विचार केलेला आहे.
बीज म्हणजे पुरूषाचे वीर्य आणि क्षेत्र म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयाची धारणाशक्ती.
बीजाची बलवत्ता म्हणजे केवळ sperm count नव्हे तर त्या sperm ची ताकद. त्यात गर्भधारणेची शक्ती आहे की नाही याचा विचार हा बीजावरून केला जातो. बीज कमकुवत असेल तर sperm count चांगला असूनही गर्भधारणा होत नाही कारण कमकुवत बीजात स्त्रीच्या गर्भाशयापर्यंत पोहोचून तेथे स्त्रीबीजाचा संपर्क होईपर्यंत जिवंत राहण्याची क्षमता नसते.
क्षेत्र म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयाची धारणाशक्ती. जर क्षेत्र दुर्बल असेल, त्यात योग्य वेळी योग्य ताकदीचे स्त्रीबीज येऊन टिकत नसेल तर पुरूषबीज कितीही बलवान असले तरी गर्भधारणा होत नाही.
फलज्योतिषात याचा फार सखोल विचार केला आहे. त्यासाठी पुरूष आणि स्त्री दोघांच्या कुंडलीतील बीज आणि क्षेत्र तपासले जाते. पुरूषबीजाची बलवत्ता तपासण्यासाठी पुरूष कुंडलीतील रवी( शक्तीचा कारक), शुक्र (वीर्याचा कारक) आणि गुरू (संततीचा कारक) यांच्या राशी, अंश आणि कलांच्या गणितातून पुरूषबीजासंबंधी निर्णय केला जातो.
तसेच स्त्रीक्षेत्रासाठी स्त्री कुंडलीतील मंगळ ( रक्ताचा आणि विटाळाचा कारक), चंद्र (गर्भधारणा शक्तीचा कारक) आणि गुरू (संततीकारक) यांच्या गणितातून स्त्रीबीजाचा अभ्यास केला जातो.
त्यानुसार दोघांची बलवत्ता ठरवून संतती होऊ शकेल की नाही, हा निर्णय होतो.
आज आम्ही असे पाहतो की, अनेक ज्योतिषांना या गोष्टी माहीत देखिल नसतात. संततीची समस्या घेऊन कोणी त्यांच्याकडे गेले की ते ज्योतिषी केवळ पंचमस्थान, त्यातील राशी, त्यातील ग्रह, त्यावर दृष्टी असणारे ग्रह आणि कारक गुरूची कुंडलीतील स्थिती यावरून अनुमान काढत असतात. त्यामुळे अनेकदा जातकांच्या शंकेचे निरसन होण्यापेक्षा त्यांच्या संभ्रमात भर पडते.
तसे होऊ नये, ज्यांना या स्वरूपाची समस्या आहे त्यांना त्याबद्दल माहिती व्हावी हा या लेखाचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे ज्योतिषांकडे ही समस्या घेऊन गेल्यावर त्यांना बीज-क्षेत्रासंबंधी जरूर विचारावे.
यासंबंधी कोणाला आमच्याकडून मार्गदर्शन हवे असेल तर आम्हाला dhondopant@gmail.com येथे पत्र पाठवावे. आमच्या सेवा सशुल्क आहेत याची कृपया नोंद घ्यावी.
आपला,
(ज्योतिषभास्कर) धोंडोपंत
प्रतिक्रिया
14 Feb 2008 - 1:10 pm | मनस्वी
वा धोंडोपंत
ज्ञानात भर पडली. अतिशय उपयुक्त माहिती.
14 Feb 2008 - 1:27 pm | शरुबाबा
ज्ञानात भर पडली. अतिशय उपयुक्त माहिती.
आमच्या सेवा सशुल्क आहेत याची कृपया नोंद घ्यावी.
हे सागितले नसते तरि चालले असते
14 Feb 2008 - 3:30 pm | मनीष पाठक
ज्ञानात भर पडली. अतिशय उपयुक्त माहिती.
मनीष पाठक
14 Feb 2008 - 6:47 pm | धनंजय
1. गेल्या काही वर्षात विविध कारणांनी ते (संतती न होण्याचे समाजातील प्रमाण) वाढले आहे.
वर्षवार वंध्यत्वाचे प्रमाण याविषयी आकडेवारी उपलब्ध असावी. त्यात अन्य कारणांमुळे वाढलेले वंध्यत्वाचे प्रमाण (उदाहरणार्थ पुरुष आणि स्त्रियांनी केलेले धूम्रपान) या विषयासाठी अप्रस्तुत आहे. (पर्यावरणातील काही प्रदूषकांमुळे स्पर्म काउंट कमी होतो. त्यामुळे गेल्या वर्षांत वंध्यत्वाचे प्रमाण वाढले असल्यास ते या चर्चेस अप्रस्तुत आहे.)
२. याचे एक कारण म्हणजे प्रेमविवाहाचे वाढते प्रमाण.
यासाठी आकडेवारी मिळाल्यास उत्तम, (अ) जसे प्रेमविवाहांचे प्रमाण वाढले तसे (बाकी कारणांशी असंलग्न) वंध्यत्वाचे प्रमाण वाढले, आणि (ब) कुठल्याही विशिष्ट काळात आणि प्रदेशात ज्यांचा प्रेमविवाह झाला त्यांच्यात, प्रेमविवाह न झाला त्यांच्यापेक्षा, वंध्यत्वाचे प्रमाण अधिक आहे काय.
(कारण माझ्या चुलत-आते-मावस-मामे कुटुंब पाहिल्यास दोन्ही प्रकारचे विवाह झाले आहे. जवळजवळ सर्वांना संतती आहे. दोन कुटुंबांत नाही, याबाबत चिंता आहे. एक प्रेमविवाह, एक नाही. पैकी दोन्ही ठिकाणी या बाबीमुळे लग्न मोडकळीस आलेले नाही.)
एक शुल्क-देण्या-घेण्याबाबत विचार :
प्रेमविवाहात जोडिदारांच्या पत्रिका जुळत आहेत की नाही हा मुद्दा पूर्णपणे दुर्लक्षित होतो. आणि त्यानंतर त्याचे दुष्परिणाम संतती न होणे, संतती होऊन जाणे, वारंवार गर्भपात होणे,
जर हा खरोखर परिणाम असेल, तर ठरवून केलेल्या लग्नात जर संतती न होणे, होऊन जाणे, वारंवार गर्भपात होणे, यांपैकी काही झाले तर पत्रिका बघणार्यास जबाबदार ठरवावे. तशी जोखीम येऊ नये, म्हणून पत्रिका बघणार्याने स्वतःच कारण-परिणाम दुव्याचा घट्टपणा आजमावणे, आणि त्याविषयी काही टक्के ग्यारंटी देणार्या व्यक्तीकडूनच सल्ला घ्यावा (म्हणजे एखादा दुकानदार जसा म्हणतो - हा टीव्ही घरी नेल्यावर ९५% चालेल [१००%ची अपेक्षा करू नये] पण ज्या ५% प्रमाणात चालणार नाही तिथे नुकसानभरपाई करून देऊ.) नुकसानभरपाईचे प्रमाण सेवेच्या शुल्कावर अवलंबून नसून चुकीच्या सल्ल्यामुळे त्या थोड्या टक्के लोकांना झालेल्या त्रासावर अवलंबून असावे. बहुसंख्य लोकांना जर फायदा होणार असेल, तर त्या थोड्या सल्ला फलित न झालेल्या लोकांना नुकसानभरपाई देऊनही सल्ला देणारा बुडीतखात्यात जाणार नाही.
14 Feb 2008 - 8:15 pm | पिवळा डांबिस
काय धमाल विनोदी लेख आहे!! :)))
नाही म्हणजे, धोंडोपंतांविषयी आम्हाला आदर आहे, पण या लेखातले काही मुद्दे वाचून ह. ह. पु. वा.!!
पुरूषबीजाची बलवत्ता तपासण्यासाठी पुरूष कुंडलीतील रवी( शक्तीचा कारक), शुक्र (वीर्याचा कारक) आणि गुरू (संततीचा कारक) यांच्या राशी, अंश आणि कलांच्या गणितातून पुरूषबीजासंबंधी निर्णय केला जातो.
तसेच स्त्रीक्षेत्रासाठी स्त्री कुंडलीतील मंगळ ( रक्ताचा आणि विटाळाचा कारक), चंद्र (गर्भधारणा शक्तीचा कारक) आणि गुरू (संततीकारक) यांच्या गणितातून स्त्रीबीजाचा अभ्यास केला जातो.
अनुवंशिक गुणसूत्रांची सशक्तता, आहार, व्यायाम, प्रदूषणमुक्त वातावरण, निर्व्यसनी रहाणी हे जास्त प्रेडिक्टर व्हेरियेबल्स (यांना मराठी प्रतिशब्द सुचवा) आहेत की ग्रह? माझ्या मते हा विषय फलजोतिष्याच्या नसून जीवशास्त्राच्या कक्षेतील आहे.
संतती न होण्याचे समाजातील प्रमाण मोठे आहे. आणि गेल्या काही वर्षात विविध कारणांनी ते वाढले आहे. याचे एक कारण म्हणजे प्रेमविवाहाचे वाढते प्रमाण.
संतती न होण्याला कारण प्रेमविवाह कसे? उलट लॉजिकली विचार केला तर नवराबायकोचे एकमेकांवर नितांत प्रेम असेल तर जास्त सेक्स घडून खूप संतती व्हायला पाहिजे! उगीच वडाची साल पिंपळाला लावण्यात काय अर्थ? तसेच धनंजयने म्हटल्यप्रमाणे आकडेवारीशिवाय हा मुद्दा सिद्ध होणे कठीण.
अनेक ज्योतिषांना या गोष्टी माहीत देखिल नसतात. संततीची समस्या घेऊन कोणी त्यांच्याकडे गेले की ते ज्योतिषी केवळ पंचमस्थान, त्यातील राशी, त्यातील ग्रह, त्यावर दृष्टी असणारे ग्रह आणि कारक गुरूची कुंडलीतील स्थिती यावरून अनुमान काढत असतात.
हे मात्र झकास! एक ज्योतिषी इतर ज्योतिष्यांची तासतांना पाहून मजा वाटली!! :)))
माझ्या मते अलिकडे संतती न/कमी होण्याची कारणे पुढीलप्रमाणे...
१. वर नमूद केलेले रहाणीविषयक मुद्दे (आहार, व्यायाम, प्रदूषणमुक्त वातावरण, निर्व्यसनी रहाणी वगैरे)
२. शिक्षण, नोकरी, स्थिरता यापायी वाढत गेलेले लग्नाचे वय. अठरा ते चोवीस या वयांत माणूस सेक्स करायला अधिक उत्सुक असतो. तिशीनंतर ती उत्सुकता कमी होते. (वाचकहो, स्वतःला प्रामाणिकपणे विचारून पहा!)
३. अलिकडे नवरा आणि बायको दोघेही नोकरी-व्यवसाय करीत असल्यामुळे व्यक्तिगत जीवनात वाढलेला ताण (स्ट्रेस) आणि शारिरीक दमणूक. (संध्याकाळी घरी आल्यावर सगळं आटपून बिछान्यावर पडायलाच अकरा वाजतात, उद्या परत पाच वाजता उठायचं आहे हे टेन्शन!!)
४. आधुनिक वि़ज्ञानामुळे घडलेले बदल. पूर्वी वीज नव्हती, अंधार पडल्यावर जेवणे आटोपून लोक बिछान्यात शिरत होते. आता तसे नाही. त्यात आणखीन तो टी. व्ही.!!
५. सर्वात महत्वाचे म्हणजे आता उपलब्ध असलेली संततीनियमनाची साधने. पूर्वीच्या काळी होणारी सगळीच संतती "वांछित" होती असे नाही. आता ती सुविधा उपलब्ध आहे. लग्नानंतर वर्षभरांतच मुले घेणारयांचे प्रमाण आज कमी झाले आहे (प्रेमविवाह आणि बिनप्रेम-विवाह झालेल्या जोडप्यांचेही) असे आपण पहातो.
एक वैज्ञानिक या नात्याने वरील लेखाचा परामर्ष घेणे मला भागच होते. नाहीतर आमच्या विज्ञानाच्या व्रताशी ती प्रतारणा ठरली असती. ज्योतिष्याच्या अभ्यास़कांवर वा ते मानणारयांवर आमचा राग नाही. धोंडोपंतांबद्दल तर आदरच आहे.
परंतु या विषयाची जीवशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय (आणि आमच्या मते अधिक संबंधित) बाजू मांडण्यासाठी हा पत्रप्रपंच! इतरांचे विचार जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत...
विज्ञानाचा अभ्यासक,
पिवळा डांबिस
15 Feb 2008 - 1:36 am | विसोबा खेचर
अठरा ते चोवीस या वयांत माणूस सेक्स करायला अधिक उत्सुक असतो. तिशीनंतर ती उत्सुकता कमी होते.
असहमत.. :)
बाकी चालू द्या..
आपला,
(कुठलंही औरस, अनौरस अपत्य नसलेला अविवाहीत!) तात्या.
15 Feb 2008 - 2:24 am | पिवळा डांबिस
तात्या,
मी अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणारया विवाहित जोडप्यांच्या संदर्भात ते विधान केलं होतं.
अविवाहित लोकांना ते कदाचित लागू होत नसेल!
त्यांना ते लगीन लागल्यावर कळतं. :))
आम्हाला बोलवा हो लग्नाला!!!!
आपला,
(लॉर्ड डलहौसीच्या काळात प्रेमविवाह झालेला) पिवळा डांबिस
15 Feb 2008 - 10:33 am | जुना अभिजित
अवांतरः डलहौसीच्या काळात दत्तक विधान नामंजूर होतं.
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
15 Feb 2008 - 9:53 pm | पिवळा डांबिस
पण प्रेमविवाह नामंजूर असल्याचा कोणताही पुरावा नाही...
पिवळा डांबिस
15 Feb 2008 - 1:51 am | इनोबा म्हणे
एक वैज्ञानिक या नात्याने वरील लेखाचा परामर्ष घेणे मला भागच होते. नाहीतर आमच्या विज्ञानाच्या व्रताशी ती प्रतारणा ठरली असती. ज्योतिष्याच्या अभ्यास़कांवर वा ते मानणारयांवर आमचा राग नाही. धोंडोपंतांबद्दल तर आदरच आहे.
डांबीसाच्या बोलण्यातही 'दम' आहे हो!
(डोळस) -इनोबा
14 Feb 2008 - 8:19 pm | वरदा
मीही वैज्ञानिक....तुमच्याशी १००% सहमत.......
14 Feb 2008 - 8:50 pm | चतुरंग
अशी अनेक कारणे आहेत.
प्रख्यात वैद्य श्री. बालाजी तांबे यांनी ई-सकाळ मधे अभ्यासपूर्ण आणि विवेचक लेख लिहिला आहे.
२० जाने. २००८ च्या 'फॅमिली डॉक्टर' पुरवणीचा दुवा.
हा अंक - ज्यांना संतती आहे त्यांना, नाही त्यांना, नुकतेच लग्न केलेल्यांना, करु इच्छिणार्यांना - अशा सर्वांनाच उपयुक्त ठरेल असे वाटते.
चतुरंग
14 Feb 2008 - 8:56 pm | llपुण्याचे पेशवेll
आपण एक उत्तम बाजू मांडली आहेत..वंध्यत्वाची ज्योतिषाच्या चष्म्यातून चिकित्सा.. लेख आवडला. लिहित रहावे.
पुण्याचे पेशवे
14 Feb 2008 - 9:04 pm | वरदा
फार चांगला लेख वाचायला मिळाला..धन्यवाद..
15 Feb 2008 - 1:28 am | प्राजु
धोंडोपंत काका,
तुम्ही कुंडलीतले जाणकार आहात. पण संततीबद्दल मार्गदर्शन कुंडलीपाहून करण्यापेक्षा स्त्रीरोग तज्ञाचा सल्लाच घ्यावा असा मी सल्ला देईन.
चतुरंग, अतिशय सुंदर लेख वाचायला मिळाला.
- प्राजु
15 Feb 2008 - 1:39 am | भाग्यश्री
माझ्या मते, कुंडली, पत्रिका या गोष्टी माणसाला थोड्याप्रमाणात मार्गदर्शन करू शकतात.. काय होऊ शकतं याच्या शक्यता नक्कीच मिळतात.. अर्थात वंध्यत्वासारख्या प्रॉब्लेम्सबद्दल त्या तज्ञाचा सल्ला घ्यावाच.. पण कुंडली,पत्रिका वगैरेनी दिशा नक्कीच मिळते.. अगदीच फोल नाहीय ते शास्त्र.. १००% त्यावर अवलंबून राहू नये, किंवा बाकीचे उपाय न करणे हे चुकीचे च आहे..
* प्रत्येक माणसाचं interpretation हे वेगळं असते.. त्यामुळे ज्योतिष्याच्या बाबतीत तुम्ही कुणाला विचारत आहात हा ही एक मुद्दा आहे.
15 Feb 2008 - 1:53 am | मगो
खरच॑, बालाजी तांबे यां॑चा ई-सकाळमधिल लेख खुप सुरेख आहे. धन्यवाद.
पिवळा डा॑बिस या॑च्या ज्योतिषख॑डनाला स॑पुर्ण पाठि॑बा...शेवटी सर्वात महत्वाच॑ ते दोघा॑च॑ शरीरस्वास्थ॑, ग्रहबल न॑तर..
अर्थात, गरजव॑ताला अक्कल नसते हेही तितकच॑ खर॑, पण कॄतिपुर्व विचार हवाच॑.
15 Feb 2008 - 2:43 am | व्यंकट
धोंडोपंत,
एक महत्वाचा विषय आपण श्रद्ध लोकांकरिता मांडला आहे त्या बद्दल आपले आभार.
15 Feb 2008 - 4:54 pm | तळेकर
अशा प्रकारचे "अंधश्रद्धा" वाढीला लागेल असे साहित्य येथे प्रकाशित होऊ देवूं नये. हि विनंती.
15 Feb 2008 - 5:46 pm | सर्वसाक्षी
असे साहित्य संपादकांनी नाकारण्यापेक्षा इथे ते येउ देवुन, त्यावर साधक बाधक चर्चा होणे व वाचकांनी निष्कर्शाप्रत येणे अधिक बरे.
दडपशाहीपेक्षा हा मार्ग अधिक सुसंस्कृत वाटतो. शिवाय इथले वाचक सूज्ञ आहेत, कुणी समजा अंधश्रद्धाळु लेखन केले तरी वाचक अविचाराने ते सर्वस्वी ग्राह्य वा मान्य ठरवणार नाहीत.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली सीमारेषा अनेकदा फार पुसट असते. एकाची श्रद्धा दुसर्यालाअंधश्रद्धा वाटू शकते व उलटही होऊ शकते.
ज्या लेखनाने सभ्यतेची, नितीची, सामाजिकतेची, राष्ट्राभिमानाची वा संतुलनाची हद्द ओलांडलेली नाही असे कोणतेही लेखन दडपले जाऊ नये, त्यावर बंदी असू नये.
अर्थात हे माझे पूर्णतः वैयक्तिक व सर्वसाधारण मत आहे; यात या लेखाचे समर्थन वा निषेध नाही तसेच इथे काय व्हावे वा होऊ नये याविषयीच्या तात्यामहाराजांच्या सर्वाधिकाराचे उल्लंघन करण्याचा हेतू नाही.
ए तात्या, वाच आणि कौल दे.
मिपा चा वाचक आणि नियमित आस्वादक
(परखड) साक्षी
15 Feb 2008 - 6:30 pm | विसोबा खेचर
शिवाय इथले वाचक सूज्ञ आहेत, कुणी समजा अंधश्रद्धाळु लेखन केले तरी वाचक अविचाराने ते सर्वस्वी ग्राह्य वा मान्य ठरवणार नाहीत.
ज्या लेखनाने सभ्यतेची, नितीची, सामाजिकतेची, राष्ट्राभिमानाची वा संतुलनाची हद्द ओलांडलेली नाही असे कोणतेही लेखन दडपले जाऊ नये, त्यावर बंदी असू नये.
पूर्णत: सहमत आहे रे साक्षिदेवा.
पंतांच्या लेखनामुळे वरीलपैकी अशी कुठलीही सीमारेषा ओलांडली गेलेली नाही, त्यामुळे सदर लेखन येथून काढून टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे या संदर्भात तळेकरांच्या प्रस्तावाचा विचार करता येणार नाही असे विनम्रतापूर्वक म्हणावेसे वाटते..
आपला,
(संपादक) तात्या.
15 Feb 2008 - 10:14 pm | पिवळा डांबिस
धोंडोपंतांनी त्यांचे विचार मांडले. त्यात गैर काहीही नाही. आपले विचार मांडण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे.
त्यांच्या लेखातील मुद्द्यांवर लोकांनी (व आम्ही) त्यांचे विचार मांडले. जाहीर लेखनावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यातही काही गैर नाही.
जोपर्यंत वैयक्तिक अप्रतिष्ठा केली जात नाही तोपर्यंत लिखाण काढून टाकले जाऊ नये. किंबहुना अशा प्रकारचे संवाद, चर्चा अधिकाधिक व्हायला हव्यात. ते लोकशाही सशक्त असल्याचं लक्षण आहे.
आज समाजात असंख्य लोक पंतांनी मांडलेले विचार पटणारे आहेत. जर आपल्याला आपली बाजू लोकांना पटवून द्यायची असेल तर अशा परिसंवादांची नितांत गरज आहे. दडपशाहीने लिखाण उडवून वा मुस्कटदाबी करुन आपण लोकांना आपले विचार पटवून देऊ शकत नाही. त्याला "तालीबानी पद्धत" म्हणतात...
निवाडा सूज्ञ वाचकांवर सोडावा हे बरे...
आपला,
पिवळा डांबिस
15 Feb 2008 - 9:44 pm | प्रकाश घाटपांडे
विवाह ,पत्रिका, संतती .सिंहस्थ याबाबत याबाबत थोडे इथे वाचता येईल
प्रकाश घाटपांडे