सट्टाबाजार

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
14 Jun 2009 - 9:12 am

`साहेब, हा कॉम्प्युटर सट्टा बंद करून टाकला पाहिजे... महागाई बरोबर कमी होते की नाही बघा...' निवडणुकीवरून महागाईवर आलेल्या विषयावर बोलताना तो ताडकन म्हणाला आणि माझे डोळे विस्फारले.
`कॉम्प्युटर सट्टा?' मला कळलं नव्हतं. मी तोच प्रश्‍न त्याला केला आणि माझ्याकडे न पाहता तो बोलू लागला.
`ते पैसेवाले लोक धान्य, धातूंच्या भावावर सट्टा खेळतात. गरिबांना लुटून नफा कमावतात. खिशातला पैसाही इकडचा तिकडे न करता त्यांना लाखो रुपयांचा नफा होतो आणि आमच्यासारख्या हातावरचं पोट असलेल्या लोकांचा जीव जातो. हा सट्टा बंद केला, तर नफेखोरी कमी होईल आणि महागाई पण आटोक्‍यात येईल...'
त्याच्या विचारातलं अर्थशास्त्र आता मला उलगडू लागलं होतं.
कमोडिटी मार्केटमधल्या व्यवहाराविषयी तो बोलत होता.
या मार्केटमध्ये होणाऱ्या उलाढालीमुळे बाजारभाव वाढतात आणि महागाई असह्य होते, असं त्याचं स्पष्ट मत होतं. अशा बाजूनं मी याआधी कधी विचार केला नव्हता, हे मी प्रांजळपणे मनाशी कबूल करून टाकलं.
आणि नंतर याच विचारानं मला घेरलं.
कमोडिटी मार्केटच्या व्यवहाराविषयी त्यालाही फारशी माहिती असेल, असं वाटत नव्हतं. पण, त्यानं महागाईवाढीशी लावलेला या व्यवहारांचा संबंध तर्कसंगत असावा, असं मात्र मला राहून राहून वाटत होतं.
`निवडणुकीत कोण विजयी होतो, कोणत्या पक्षाचं सरकार येतं याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. फक्त महागाई कमी करेल, असा पक्ष सत्तेवर आला पाहिजे...' तो म्हणाला.
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत पुन्हा दाखल झालेले सुरेश जैन आणि भाजपचे गटनेते एकनाथ खडसे यांची जबरदस्त पकड असलेल्या जळगावचा शहरी चेहरा खूप मोहक आहे. खानदेशातलं हे आखीवरेखीव शहर सध्या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवान झालंय; पण मतदारसंघातल्या ग्रामीण भागात मात्र गरिबी, महागाई आणि सतावणाऱ्या रोजच्या समस्यांचीच चर्चा होते.
जळगावबाहेरच्याच एका गावात त्या दिवशी पोचलो, तेव्हा अवघा गाव रस्त्यावर गोळा झालेला होता. कुठलीशी बैलगाडीची शर्यत होणार होती. ती पाहायला गावाची गर्दी लोटली होती.
मी त्यातल्याच एकाला गाठलं आणि निवडणूक, राजकारणावर बोलू लागलो.
तोही बोलत होता; पण त्याची नजर मात्र बैलगाडीची ती शर्यतच शोधत होती.
त्यानंच महागाईचं मूळ कमोडिटी मार्केटमधल्या सट्टेबाजीत असल्याचं ठामपणे सांगितलं आणि सामाजिक स्तरामधील दडलेल्या विषमतेचं एक अस्पष्ट कारण मला दिसू लागलं.
माणसं समस्यांशी सामना करतानाही जगतात; पण आपण ज्या समस्यांना तोंड देतोय, त्या समस्या दुसऱ्या कुणाच्या तरी आर्थिक लाभाच्या खेळातून उभ्या राहातायत, अशी भावना कुठंतरी रुजतेय, असं मला उगीचच वाटून गेलं.
...जवळपास सगळं गाव तेव्हा रस्त्यावर आलं होतं.
`इथं लोकांना कामधंदे नाहीत...?' मी त्याला विचारलं. माझ्या सुरातला वेगळेपणा त्याच्या लक्षात आला असावा.
`साहेब, आत्ता घरात बसवत नाहीये. दिवसभर लाइट नसतो. घरात पंखे नाही, शेतात मोटारी चालत नाहीत. मग घरात बसून उकाड्यानं शिजण्यापेक्षा, असा काहीतरी विरंगुळा शोधतात माणसं... विसरतात आपली दुःख... महागाई वाढलीये... गरिबांचे जगणं कठीण झालंय... आठ दिवसांपूर्वी आणलेल्या किराण्या चे भाव आज आणखीन वाढलेत. व्यापारीही नफा कमावतात..' तो म्हणाला.
...जळगावच्या परिसरात केळीच्या बागांची हिरवाई दाटली आहे.
या बागांच्या बगलेत असलेल्या सुंदर बंगल्यांमुळे या भागाचं ऐश्‍वर्यही खुलून उठलं आहे... पण, हे रूप ओलांडून पलीकडे पाहिलं, की अशा समस्या, व्यथा बोलक्‍या होतात.
एकीकडे बड्या बागायतदारांचे टुमदार बंगले आणि थोडंसं पलीकडे, शेतमजुरी करून हातावरचं पोट कसंबसं भरणार्‍या कुटुंबांच्या झोपड्या... गरिबी आणि श्रीमंती एकमेकांच्या हातात हात घालून वावरते आहे.
आता अशा झोपड्यांमध्येही मतदानाची चर्चा सुरू झाली आहे...
कॉम्प्युटरवरचा सट्टा बंद व्हावा, महागाई कमी करणारं सरकार सत्तेवर यावं, असं त्याला वाटतंय; पण तसं होईलच, अशी त्याची खात्री नाही.
`तरीही, मी मतदान करणार आहे...' तो सांगतो.
लांबून रस्त्यावर उसळलेले धुळीचे लोट दिसत असतात.
तो बोलणं थांबवतो आणि मान उंच करून तिकडे लक्ष केंद्रित करतो.
निवडणुकांपेक्षाही, आजच्या शर्यतीत कोण जिंकतो, याची उत्सुकता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटलेली असते...

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

14 Jun 2009 - 10:40 pm | नितिन थत्ते

त्या माणसाचं म्हणणं खरं आहे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

हवालदार's picture

16 Jun 2009 - 11:20 pm | हवालदार

फार छन लेख लिहिल अहे तुम्ही. विषय वेगळा आहे. सट्टबाजाराचा खरच परिणाम होतो का ह खरच विचार करण्याजोगा मुद्दा आहे.

मराठी_माणूस's picture

17 Jun 2009 - 9:33 am | मराठी_माणूस

एका सामान्य माणसाचे साध्या शब्दातले विश्लेषण आवडले

अविनाशकुलकर्णी's picture

17 Jun 2009 - 9:49 am | अविनाशकुलकर्णी

पण सट्टा कसा लावतात? त्याचि यंत्रणा व व्यवस्थापन कसे असते ??कॉम्प्युटर सट्टा म्हणजे काय? त्याने कशि महागाई वाढते ??? नेमका काय परींणाम होतो? ते नाहि कळाले किंवा समजावुन नाहि सांगीतले???

अभिषेक पटवर्धन's picture

17 Jun 2009 - 10:10 am | अभिषेक पटवर्धन

मी स्वतः सट्टा बाजारात काम केले आहे....नॅशनल कमॉडीटी अँड डेरीवेटीव एक्सचेंज च्या मार्केट वॉच आणि सर्विलन्स मधे काम करताना या सगळ्या गोष्टीशी रोज संबंध यायचा...या बाजारामुळे वस्तुंचे भाव वाढतात या आरोपात थोडं फार तथ्य नक्कीच आहे...अधिक माहीती हवी असेल तर व्यनि करा..

हवालदार's picture

17 Jun 2009 - 2:49 pm | हवालदार

व्य. नि. पेक्शा इकडेच माहिती द्या ना. मला वाटते की बरेच लोक्स उत्सुक असतिल य विषया बद्द्ल.

संदीप चित्रे's picture

17 Jun 2009 - 11:42 pm | संदीप चित्रे

इथेच माहिती टाकली तर सगळ्यांनाच वाचता येईल.

सहज's picture

18 Jun 2009 - 7:46 am | सहज

इथेच माहिती टाकली तर सगळ्यांनाच वाचता येईल.

रेवती's picture

18 Jun 2009 - 5:34 am | रेवती

आपल्या लेखनाचे विषय अगदी रोजच्या जगण्यातले असतात म्हणून भावतात.

रेवती

छोटा डॉन's picture

18 Jun 2009 - 7:20 am | छोटा डॉन

रेवतीताईशी सहमत आहे.
आपले पत्रकारिता टाईपचे लिखाण खुप आवडते, शक्यतो ग्रासरुट लेव्हलचे विषय हाताळल्याने वाचायची फर उत्कंठा असते.

शिवाय हे सर्व "बातमीपलीकडचे जग" असल्याने जास्त महत्वाचे असते.
येऊद्यात अजुन, वाचतो आहोत.

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

विसोबा खेचर's picture

18 Jun 2009 - 8:08 am | विसोबा खेचर

दिनेश,

छान रे!

अजूनही लिही..

आपला,
(सट्टाप्रेमी) तात्या.