मि. पा च्या मेटामोर्फसिसच्या काळात हा लेख गहाळ झाला होता. तो आता प्रतिक्रियांसकट इथे चिकटवत आहे.
आतापर्यंत किडे ही फक्त करायची गोष्ट आहे अशी माझी प्रामाणिक समजूत होती. पण जपानला आल्यावर आपण आजपर्यंत करत आलो त्याला ’किडे करणे’ हे नाव किती सार्थ आहे हे कळून चुकलं एवढे विविध किडे पाहिले. इथल्या माणसांवरून इथल्या किड्यांच्या आकाराची कल्पना कृपया करू नये. म्हणजे इथली माणसं (सुमो सोडल्यास) अगदी सुबक ठेंगणी कॅटेगरीतली असली तरी किडे मात्र गुटगुटीत आणि बाळसेदार असतात. असतात. हे एकेक हाताच्या पंजाएवढे कोळी, कमावलेल्या शरीराची चिलटं, फावल्या वेळेत मारण्यासाठी रंगीबेरंगी माशा असे अनेक स्वघोषित रूममेट्स माझ्या घरी जाऊन येऊन असतात. देवाने पंख दिलेत म्हणून उगाच ते माझ्या कानाशी येऊन फडफडवण्यात त्या माशांना, जाळं विणता येतं म्हणून उगाच कानाकोप-यांत जाळी विणण्यात त्या कोळ्यांना, आणि रात्री सहा ढेंगा वर करून निवांत झोपायचं सोडून उगाच गगनभरा-या मारण्यात झुरळांना काय सुख मिळतं कोणास ठाऊक. पण ह्यांची आणि आमची शाळाकॉलेजपासूनची ओळख म्हणून खपवून घेते झालं! त्यामुळेच तर घरात सापडलेल्या पहिल्यावहिल्या मुकादेला मी निरागसपणे बाहेर टाकून जीवदान दिलं.
आता “मुकादे म्हंजे रे काय भाऊ?” यासारखे प्रश्न तुम्हाला पडणं किंवा दे च्या आधी मनातल्या मनात स्पेस द्यावंसं वाटणं सहाजिक आहे. प्रकरण ’चावट’ असले तरी रोमॅंटिक वगैरे अजिबात नाही. मुकादे हा शब्द जपानी चित्रलिपीत 百足असा लिहितात. ह्या दोन्ही चित्रांचा अर्थ अनुक्रमे ’शंभर’ आणि ’पाय’ असा होतो. ह्याचाच अर्थ मुकादे हा २० किंवा त्याहून अधिक पाय आणि दोन खतरनाक नांग्या असलेला काळाकुट्ट, तुरुतुरु पळणारा सेंटिपीड जातीचा किडा आहे. मराठीत मुक्याच्या देण्याघेण्याने मनात गुदगुल्या होत असल्या तरी मुकादेने मुका घेतला तर सूज, उलटया, अंग काळेनिळे पडून बधीरपणा येणे, जळजळ हे सर्व होतं. (अनुभव नसल्याने फार वर्णन करता येणार नाही!) पण माणूस मरत नाही हे नशीब. “मुकामुका होतंय” म्हणजे जपानीत “कसंतरी होतंय” त्यामुळे पठ्ठा जपानीत आपल्या नावाला जागून आहे. मुकामार मधला ’मुका’ म्हणजे काय हे मला माहित नव्हतं. त्याचा उगम बहुदा ह्या जपानी ’मुकामुका’ मध्ये असावा! असंही ऐकलंय की मुकादे नेहमी जोडीने फिरतात. त्यामुळे एक सापडला की दुसरा कुठेतरी निवांत प्लानिंग करत असेल हे सांगता येत नाही. मी जिथे रहाते तिथे औषधालाही माणूस सापडत नाही त्यामुळे जिवंत माणूस दिसला की माझ्यासारखाच मुकादेलाही आनंद होत असावा. आता आनंद व्यक्त करण्याची काहींची पद्धत असते चावरी! त्याला ते बिचारे काय करणार? असाही एक सहानुभूतीपूर्ण विचार माझ्या मनात येतो.
साधारण जूनच्या सुमारास जपानात ’त्सुयू’ म्हणजे ’मान्सून’ सुरु झाला की मुकादे फॉर्मात येतात. बाथटब, छान घडी करून ठेवलेले कपडे, चपला, उशा, गाद्या ह्या मुकादेच्या आवडत्या जागा आहेत. जपानी लोक साधारण मुकादे आला की त्याला प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून वरून दगड / काठीने बडवतात, गरम तेलात / पाण्यात टाकतात, किंवा मुकादेसाठीचा फवारा मारतात. पहिला साकुरा ही जशी जपान्यांसाठी बातमी असते तशीच पहिला मुकादे ही माझ्यासाठी. म्हणजेच कोणीही क्षयझने “आज मी घरात मुकादे पाहिला” असं म्हटलं रे म्हटलं की त्यादिवशीपासून लगेच मी चपला, गाद्या, उशा, कपडे वगैरे काहीही आधी झटकून मगच वापरते.
अगदी पहिल्या वर्षी “तुला इथे येऊन एक वर्ष झालं तरी मुकादे नाही दिसला?? घाबरला वाटतं तुला!” अशी खूप टिंगल झाली. पण सवयीनुसार तीही मी झटकली.
आणि एक दिवस नेहमीसारखी़च घाईत शाळेत जायला निघाले होते. मोजे घालून बूट घालायला उचलला तर खाली एक आठ इंची मुकादे माझी वाट बघत वळवळत होता. हसावं की रडावं तेच कळेना. मुकादेचा स्प्रे, गरम पाणी, तेल, बत्ता, मुसळ, वरवंटा असं काहीही जवळ नसतानाच्या निःशस्त्र अवस्थेत मुकादेशी वीसेक हात करणे भाग होतं. (अवांतर: बुटाने मुकादे मरत नाही.) मराठमोळं रक्त उफाळून आलं आणि त्याच तिरमिरीत त्याला चिमटयात पकडलं, सरळ गॅसवर धरलं आणि खालून गॅस पेटवून त्याचा एनकाउंटर केला. आणि त्यानंतर मिरच्यांची धुरी, एस. टी श्टॅंडावरील स्वच्छतागृहे, शाळेतली प्रयोगशाळा, २५ वर्ष सलग न धुता वापरलेले मोजे, जळका टायर ह्या सगळ्या वासाचं मिश्रण असलेला एक अवर्णनीय वास घरभर भरून गेला. तो वास एका स्प्रे वगैरे मधे भरून घेता आला असता तर फार बरं झालं असतं. म्हणजे माझे बॉस, वायफळ गोष्टींचा रिपोर्ट लिहायला लावणारे सुपर्वायझर, मी केलेल्या मसालेभातावर (“केवढा तिखट आहे!” असं म्हणत) यथेच्छ ताव मारणारे काही जपानी माझ्या दिशेने कूच करताना पाहून मी स्कंकसारखा ह्या स्प्रेचा वापर नक्की केला असता.
आत्तापर्यंत सापडलेल्या मुकादेची संख्या सम असल्याने सध्या मी निवांत आहे. लहानपणापासून जून म्हटला की नव्याकोर्या पुस्तकांचा, ओल्या मातीचा, आंब्याफणसाचा असल्या वासांची नाकाला सवय होती. आता मात्र त्यात काही नव्या वासांची भर पडली आहे.
मी मुकादे आला होता वगैरे सांगितल्यावर माझ्या काही हितचिंतक मित्रमैत्रिणींनी “काहीतरी शेंडया लावू नकोस. आता पुन्हा मुकादे आला नां की त्याचा एक फोटो काढून पाठव.” असे उत्साहवर्धक उद्गार काढल्यामुळे त्यांच्यासाठी हे पुराव्याने शाबीत! मुकादेचे अधिक रोमांचकारी छायाचित्रे व किस्से पाहाण्यासाठी यू-टयूब आहेच.
मस्त
प्रेषक प्राजु ( गुरू, 06/04/2009 - 11:58) .
मस्त लेख..
अगदी हलकाफुलका आहे. मुकादेचं एखादं चित्र मिळालं असतं बघायला तर मजा आली असती.
चित्रफीत दिसत नाहीये.
- (सर्वव्यापी)प्राजु
आत्ताच
प्रेषक मदनबाण ( गुरू, 06/04/2009 - 12:19) .
आत्ताच मुकादे ला तू-नळी वर वळवळ करताना पाहिले...आपल्या इथल्या सुरवंटाचा मोठा भाउ दिसतोय...
बाकी एक नवीन प्राणी आत्ताच आम्हाला जालावर सापडला...
http://www.funnyemails.info/uploaded_images/eyes-775341.jpg
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
मुकादे मुक्यानेच नाहीसा झालेला तुला कळलाच नसावा असे वाटते आहे!
प्रेषक नरेंद्र गोळे ( गुरू, 06/04/2009 - 14:22) .
लेख आवडला. मात्र मुकादे काही दिसत नाही आहे.
मुकादे मुक्यानेच नाहीसा झालेला तुला कळलाच नसावा.
आता अचानक कुठे प्रकट न होवो म्हनजे मिळवली.
काका..ब-याच
प्रेषक सुबक ठेंगणी ( रवी, 06/07/2009 - 10:02) .
काका..ब-याच वेळा प्रयत्न करूनही नाही जमलं फोटो टाकायला तेव्हा कंटाळून आणि लोक पहातील तू-नळीवर असा विचार करून लेख टाकला.
आता चतुरंगमुळे दिसता झालाय फोटू...
तुम्हाला आरिगातो...
लेख आवडला.
प्रेषक अभिज्ञ ( गुरू, 06/04/2009 - 14:36) .
लेख व लेखन शैली दोन्ही आवडले.
अतिशय सुरेख लिहिताय.
अभिनंदन.
अजून येउ द्यात.
अभिज्ञ.
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
वावा..
प्रेषक स्वाती दिनेश ( गुरू, 06/04/2009 - 14:45) .
मस्त लिहिले आहेस ग,
स्वाती
वेगळ्या
प्रेषक परिकथेतील राजकुमार ( गुरू, 06/04/2009 - 14:46) .
वेगळ्या विषयावरचा नाविन्यपुर्ण लेख. लेखनशैली एकदम मस्तच.
थोडे फोटु वगैरे पण टाकले असते तर मज्जा आली असती.
पराकिडा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
मस्त
प्रेषक भाग्यश्री ( गुरू, 06/04/2009 - 14:57) .
मस्त लिहीतेस!! जाम म्हणजे जाम आवडले मला!
येऊदे खूप असेच लेखन!
मुकामारचा स्त्रोत कळला बरे झाले!
मस्त
प्रेषक यशोधरा ( गुरू, 06/04/2009 - 15:02) .
मस्त लिहिलं आहे! आवडलं!
सुबक -
प्रेषक जागु ( गुरू, 06/04/2009 - 15:03) .
सुबक - लेखनशैली आवडली, वाचताना मजा आली. फोटो मिळाला तर नक्की टाका इथे.
मस्त
प्रेषक नंदन ( गुरू, 06/04/2009 - 15:14) .
लेख आणि लेखनाची शैली अतिशय आवडली. सहा ढेंगा वर करून न झोपणारी झुरळं, मुका मार आणि मुकादेशी वीस हात करणं हे खासच.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हा हा! मस्त!
प्रेषक Nile ( गुरू, 06/04/2009 - 15:17) .
हा हा! मस्त!
मस्त लेख!
प्रेषक सायली पानसे ( गुरू, 06/04/2009 - 15:19) .
मजा आली वाचायला.मस्त लेख!
मुका नको...
प्रेषक बिपिन कार्यकर्ते ( गुरू, 06/04/2009 - 15:44) .
आता मी यापुढे कोणालाही 'मुका दे' असं म्हणणार नाही.
तुम्ही मस्तच लिहिता हे वे सां न ल.
बिपिन कार्यकर्ते
आता मी
प्रेषक परिकथेतील राजकुमार ( गुरू, 06/04/2009 - 15:59) .
आता मी यापुढे कोणालाही 'मुका दे' असं म्हणणार नाही.
म्हणजे ? या आधी तुम्ही कोणालाही 'मुका दे' असे म्हणत हिंडायचा ?? काय हे नवाबी शौक
(खातय आज मार बिकांचा)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
मास्तर...
प्रेषक बिपिन कार्यकर्ते ( गुरू, 06/04/2009 - 16:11) .
आम्ही जे काही करतो उजळ माथ्याने आणि दुनियेला फाट्यावर मारून करतो. रात्री ९ नंतर तोंड लपवत फिरत नाही. काय समजलात, पराण्णा? आणि वरच्या तुमच्या वाक्यात 'कोणालाही' ऐवजी 'कोणाकोणाला' असं घालून वाचा. कोणालाही मुका मागितला तर तो नवाबीशौक होत नाही. पुढचे डिटेल्स स्फोटक असल्याने खव किंवा व्यनि मधे बोला. गॉट इट?
बिपिन कार्यकर्ते
परा,
प्रेषक Nile ( गुरू, 06/04/2009 - 16:28) .
परा, कोणाकोणाला ते कळले की अम्हाला पण कळव!
आयला...मुका
प्रेषक सुबक ठेंगणी ( रवी, 06/07/2009 - 10:06) .
आयला...मुकादेलाच धन्यवाद!
आज बिका व पराच्या खरडवहया चाळल्या पाहिजेत...
छान!
प्रेषक घाटावरचे भट ( गुरू, 06/04/2009 - 16:13) .
छान!
सुंदर लेख
प्रेषक निशिगंध ( गुरू, 06/04/2009 - 19:05) .
सुंदर लेख.. आपले धाडस आवडले.
अवांतर
{
“मुकामुका होतंय” म्हणजे जपानीत “कसंतरी होतंय”
म्हणजे
मुकामुका=कसंतरी
आणी
होतंय=होतंय
बरोबर ना!!!
धाडस बिडस कसचं कसचं...
प्रेषक सुबक ठेंगणी ( रवी, 06/07/2009 - 09:51) .
पाण्यात पडल्यावर पोहणे किंवा बुडणे एवढे दोनच ऑप्शन असतात हो...
"मुकामुका=कसंतरी
आणी
होतंय=होतंय
बरोबर ना!!!"
एकदम बरोब्बर!
प्रतिक्रियेबद्दल आरिगातो...
मस्त लेखन..
प्रेषक मराठमोळा ( गुरू, 06/04/2009 - 19:46) .
मस्त लेखन.. आवडली शैली..
अजुन लिहा....
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
छान
प्रेषक श्रावण मोडक ( गुरू, 06/04/2009 - 19:47) .
आवडली लेखनशैली. पु. ले. शु.
छान
प्रेषक शाल्मली ( गुरू, 06/04/2009 - 21:45) .
छान लेख.
तू-नळी वर आत्ताच तो किडा वळवळताना पाहिला. 'ईईईई' असं झालं अगदी.
भयानकच प्राणी आहे तो! आणि अश्या प्राण्याला तुम्ही यशस्वी रीत्या मारलंत!!!! तुमचं खास अभिनंदन !
फारच शूर-वीर आहात तुम्ही!
वरील सगळ्यांनी म्हणल्याप्रमाणेच तुमची लेखनशैली छान आहे.
अजूनही येऊदे.
--शाल्मली.
शाल्मलीशी
प्रेषक रेवती ( गुरू, 06/04/2009 - 21:58) .
शाल्मलीशी सहमत.
कधी जपानमधे जाइन असं वाटलच नव्हतं पण आता कुणी जबरदस्तीनं ढकललं तरी त्या देशात जाणार नाही.
सर्व प्रकारचे किडे, माश्या आणि कायकाय जे असेल ते यांचा आणि माझा ३६ चा आकडा आहे. ईई ग बाई!
रेवती
+१,
प्रेषक छोटा डॉन ( गुरू, 06/04/2009 - 22:02) .
शाल्मलीताईशी सहमत आहे ...
आत्ताच लेखही वाचला आणि व्हिडिओही पाहिला, किळसवाणा प्रकार आहे अगदी ...
मात्र तुमच्या शुरपणाचे कौतुक करावेच लागेल ...
मस्त लिखाण आणि शैली, अजुन लिहा असेच अनुभव वगैरे ...
खुद के साथ बाता :
च्यामारी, हापीसात २-४ मुकादे पाळावेत काय ?
दुहेरी फायदा होईल हो, एक तर जोराने "मुका देऽऽऽ" असे ओरडता येईल, कोनी दचकुन बघायला लागले तर साळसुदपणे "तुम्हाला नाही हो, इथे आमचा पाळीव प्राणी आहे ना त्याला म्हणतो आहे" असे म्हणता येईल. शिवाय मुकादे असल्यावर बॉस कशाला येतोय आपल्याकडे ?
केवढ्याला पडतो ही चौकशी केली पाहिजे ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ...
सहज
प्रेषक क्रान्ति ( गुरू, 06/04/2009 - 22:56) .
लिहिलंय अगदी! शैली आवडली. अशा भयंकर प्राण्यांशी दोन हात केल्याबद्दल कौतुक!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
अहा......क्या
प्रेषक जयवी ( गुरू, 06/04/2009 - 23:00) .
अहा......क्या बात है......!! झकास लिहिलंस पोरी
मस्तच! तुमची लेखनशैली एकदम अनोखी आणि धमाल आहे!
प्रेषक चतुरंग ( शुक्र, 06/05/2009 - 03:09) .
वाक्यावाक्याला कधी गालात, कधी जरा जोरात, कधी फिस्स्कन असे हसण्याचे विविध प्रकार अनुभवत होतो!
'मुकादे' ची ओळख आवडली! त्याला 'गॅसवर ठेवणं' हे तुमचं धाडस वाखाखण्याजोगंच!
(खुद के साथ बातां : आता कळलं ना रंगा सुपरवायझरला 'मुकादम' का म्हणतात ते! )
(मैलकुली)चतुरंग
(अवांतर - फ्लिकरवरुन फोटो चढवताना त्याचा यूआरएल सहज मिळतो. पिकासावरुन फोटो चढवताना मात्र ऍड्रेसबारमधली लिंक टाकली तर फोटू गंडतो. त्याऐवजी जे चित्र टाकायचे असेल त्यावर राईटक्लिक करुन, प्रॉपर्टीज मध्ये जाऊन, यूआरएल कॉपी करुन टाकावा. वरचा फोटू तशाच पद्धतीने दिसवलाय! )
मुकादम!!!!!
प्रेषक सुबक ठेंगणी ( रवी, 06/07/2009 - 09:54) .
हे पण भारीच!
फोटू टाकण्याबद्दलच्या सूचनांसाठी, टाकण्यासाठी आणि प्रतिक्रियेसाठी कमरेत वाकून आरिगातो गोझाईमास...
झटकून
प्रेषक लिखाळ ( शुक्र, 06/05/2009 - 03:58) .
झटकून टाकण्याची सवय, सहा ढांगा वर करुन झोप, वीस हात करणे, वासाचा तपशील आणि सम संख्येत मिळालेले मुकादे एकदम मस्त
लेख फार छान.. चतुरंग त्यांच्या प्रतिसादात म्हणतात तसे निनिराळ्या तर्हेचे हसलो
एकदम मजेदार
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी
प्रतिक्रिया
7 Jun 2009 - 9:34 pm | क्रान्ति
हरवलेला मुकादे सापडला!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
8 Jun 2009 - 9:04 am | सहज
छान लिहले आहे. मजा आली.