शिवसेना पुन्हा उभी राहील?

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
5 Jun 2009 - 12:47 pm

नमस्कार,

आमचे स्नेही तात्या अभ्यंकर यांच्या मिसळपाव ह्या संकेतस्थळाचा सभासद होतांना मला आनंद होत आहे. ह्या संकेतस्थळाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा!

सुधीर काळे, जकार्ता.

शिवसेना पुन्हा उभी राहील? (पूर्वप्रसिद्धी - http://beta.esakal.com/2009/05/25131710/pailteer-sad-pratisad-about-sh.html)

मी एक सामान्य माणूस आहे. मी कुणी "शिवसैनिक' नाही; पण बाळासाहेबांबद्दल खूप आदर असलेला व शिवसेनेला मनोमन मानणारा असा एक मराठी माणूस आहे. रोज इमाने-इतबारे कामावर जाणारा, दहा-बारा तास "पाट्या टाकणारा' व महिन्याच्या एक तारखेला मिळणाऱ्या पगारावर घराचा चरितार्थ चालविणारा! राजकारणी नव्हे; पण राजकारणात रस घेणारा, त्याबद्दल वाचन करून स्वतःला अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करणारा; भारताबद्दल, महाराष्ट्राबद्दल व मराठी माणसांबद्दल अतिशय आस्था असणारा; पण शेवटी एक चारचौघांसारखा सामान्य माणूस. २००५ मध्ये राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर मला अतोनात दुःख झाले; पण शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न करूनही या दोघांची दिलजमाई आजपर्यंत झाली नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

पराभवाच्या दुःखात असलेल्या शिवसेनेचा "पिंजऱ्यामध्ये व्याघ्र सापडे, बायका-मुले मारती खडे' या थाटात अवमान करण्यासाठी हा लेख लिहिलेला नसून, नजीकच्या भविष्यकाळात पुन्हा देदीप्यमान विजय मिळविण्यासाठी शिवसेनेने काय केले पाहिजे याबाबतीत मला जे व जसे सुटले ते व तसे मी खूप कळकळीने इथे लिहिलेले आहे.

१९६४ मध्ये नोकरीनिमित्त मुंबईला आल्यापासून मराठी माणसाची सगळ्या भारतात, विशेषतः मुंबईत होणारी पीछेहाट पाहून मी अतिशय खिन्न होत असे. म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून मी शिवसेनेकडे आकर्षित झालो.

बाळासाहेबांचे कर्तृत्व आचार्य अत्रे यांची आठवण करून देते यात शंका नाही. एकाने मुंबई महाराष्ट्रात आणली, तर दुसऱ्याने तिथे मराठी लोकांना ताठ मानेने कसे राहता येईल याकडे लक्ष पुरविले. दोघांचे कर्तृत्व उत्तुंग आहे व जोवर महाराष्ट्र व मराठी माणूस जिवंत आहे तोवर या दोघांची मधुर आणि आदरयुक्त स्मृती मराठी लोकांच्या हृदयात सदैव ताजी राहील.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती तेव्हा मी पुण्यात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो. दै. मराठा "मेस'मध्ये आला रे आला, की त्याच्यावर उड्या पडत! शिवसेनेने जेव्हा मराठी पुनरुत्थान हाती घेतले, तेव्हा "मार्मिक'वरही अशाच उड्या पडत. त्या काळी मी "मार्मिक'चा वर्गणीदार होतो व प्रत्येक अंक नियमितपणे वाचत असे.

"मार्मिक'मध्ये मुंबईतील वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या कार्यालयांत कशी मराठी माणसांची अवहेलना होत आहे, महाराष्ट्रातही उपरे लोक कसे सरकारी नोकऱ्यांत भरती होत आहेत, याची यादी असे. ती वाचल्यावर प्रत्येक मराठी माणसाला राग न आला तरच नवल! बाळासाहेबांचा व शिवसेनेचा उदय होण्यापूर्वी माझ्यासारख्या मराठी माणसाला वाटायचे, की मुंबईत मराठी माणसाच्या हिताकडे बघणारा मराठी माणसांचा "वाली' असा कोणीही मराठी नेता नाही; पण बाळासाहेबांनी मराठी माणसांची बाजू अतिशय परखड शब्दांत मांडली, त्यात प्रसंगी कधी परप्रांतीयांची थोडी-फार पिटाईही झाली व मराठी माणसांना वाटले, की "आहे, मराठी माणसाचा बाळासाहेबांच्या रूपाने एक तरी तारणहार आहे व हा शिवसेनेचा ढाण्या वाघ आपल्याला मुंबईतली आपली हक्काची जागा मिळवून देईल.'
बाळासाहेबांनी गल्लीपासून सुरवात करून शेवटी दिल्लीवरही शिवसेनेचा ध्वज फडकाविला; पण स्वतः कुठलेही पद स्वीकारले नाही. ते सत्तेपासून अलिप्तच राहिले. तिची भराभर झालेली वाढ व तिची वाढती राजकीय शक्ती यांचे गूढ बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा किंवा त्यांच्या राजकीय मतांपेक्षा "आपल्यावर अन्याय होत आहे,' या मराठी माणसांच्या मनातल्या भावनेत व रागातच होते व आहे. त्या वेळी बाळासाहेब ही एकच अशी व्यक्ती होती, की जिला मराठी लोकांबद्दल कणव व कदर होती, जिला स्वतः मराठी असल्याचा अभिमान होता व जिला "मी मराठी माणसाच्या कल्याणासाठीच झटेन,' असे म्हणायला संकोच वाटत नसे. त्यांच्या डोक्‍यात "अखिल भारतीय' दृष्टिकोनाचा वैचारिक गोंधळ नव्हता, तर "मराठी एके मराठी' हा सुटसुटीत पाढाच होता व तोच ते सतत म्हणायचे. कामाच्या दिशेबाबतचे त्यांचे विचारही सुस्पष्ट होते.

म्हणून तर बाळासाहेबांनी "दो कलियॉं'विरुद्ध आंदोलन पुकारले तेव्हा महाराष्ट्रातली तमाम मराठी मंडळी त्यांच्यामागे उभी राहिली. याच कारणास्तव स. गो. बर्वे व त्यानंतर तारा सप्रे यांना निवडून देताना मराठी लोकांनी कृष्ण मेनन यांसारख्या अव्वल मोहऱ्याला मुंबई-ठाण्यात धूळ चारली. शिवसेनेचा पहिला-वहिला आमदार असाच वामनराव महाडिकांच्या रूपाने परळमधून थाटात निवडून आला. त्या विजय सभेलाही मी हजर होतो. हळूहळू बाळासाहेबांनी मुंबई महापालिका जिंकली आणि हा हा म्हणता केवळ मुंबई-पुण्यातच नव्हे, तर मराठवाडा, कोकण, विदर्भ यांसारख्या मुंबईपासून दूर असलेल्या व जिथल्या मराठी माणसाला अवहेलना वाटेल अशी मुंबईसारखी परिस्थिती नसलेल्या ठिकाणीही मराठी मंडळी त्यांच्यामागे उभी राहिली. १९९५ मध्ये महाराष्ट्र राज्यावर शिवसेनेचा भगवा फडकला, "बॉम्बे'ची "मुंबई' झाली व साऱ्या मराठी माणसांना खूप आनंद झाला. तीच गोष्ट मुंबई विमानतळाला छत्रपतींचे नाव देण्याबद्दल. टाटा कितीही थोर असतील; पण छत्रपती कुठे आणि टाटा कुठे? शिवसेना नसती तर टाटांचेच नाव मुंबई विमानतळाला दिले गेले असते यात काहीही शंका नाही.

पण मग असे वाटते, की बाळासाहेबांची काही पावले चुकीची पडली. त्यांच्या हृदयातील मराठीबद्दलच्या आस्थेची जागा काही प्रमाणात तरी हिंदू धर्मीयांनी व्यापली. त्यांना "हिंदुहृदयसम्राट' ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची पदवी जास्त भावू लागली! मराठीबद्दलच्या निष्ठेत हिंदूंबद्दलच्या निष्ठेची भेसळ झाली आणि मग तेव्हापासून शिवसेनेचे मराठी माणसांच्या हितसंबंधांकडे दुर्लक्ष होऊ लागले व बाळासाहेबांच्या व शिवसेनेच्या यशाला ओहोटी लागू लागली.

खरे तर त्या आधीही त्यांच्या हातून बऱ्याच चुका झाल्या. जनरल करिअप्पांसारख्या उपऱ्याला अनुमोदन दिले गेले व मराठी मंडळी रागावली, "मराठी मराठी मारल्या गप्पा, आता का आणलात करिअप्पा'च्या घोषणा भिंती-भिंतींवर झळकल्या! सुदैवाने बाळासाहेबांना त्यांची चूक वेळेवर समजली व ती त्यांनी दुरुस्तही केली व मराठी मंडळींनीही त्यांना मोठ्या मानाने माफ केले.

जी चूक भाजपने केंद्रात सत्तेवर आल्यावर केली तीच शिवसेनेनेही केली. सत्तेवर आल्यावर जसा भाजप हिंदूंना विसरला व मुस्लिम मतांच्या लोभाने त्यांचा अनुनय करू लागला व स्वतःची "हिंदूंच्या हिताचा एकमेव कैवारी' ही भूमिका विसरू लागला, तशीच चूक बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या बाबतीत केली. थोड्याफार मतांसाठी त्यांना अमराठी लोकांसाठीही पान्हा फुटू लागला.
संजय दत्तसारख्या पंजाबी संशयित देशद्रोह्यालाही त्यांनी पदराखाली घालून तुरुंगातून सोडवून आणले (आणि आता त्याच संजय दत्तने शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार करून स्वतःच्या बहिणीला निवडून आणले.) संजय निरुपमसारख्या बिहारी माणसाला त्यांनी खासदारपदावर बसवले; पण त्यांच्या हाताने दूध प्यायलेला हा साप बाळासाहेबांनाच डसला व राम नाईक यांना पराभूत करून निवडून आला. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील.

पण, बाळासाहेबांचा सगळ्यात मोठा पराभव झाला जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांमधली एकी ते टिकवू शकले नाहीत. दोघांना सारखे वागवून हे त्यांना टाळता आले असतं किंवा दोघांना दोन वेगवेगळे "सुभे' देऊन, म्हटले तर एकत्र व म्हटले तर वेगवेगळ्या क्षेत्राचे प्रमुख अशी वाटणी करून, हे भांडण मिटविता आले असते; पण असे न करता "एक शेंबडे पोर' अशी श्री. राज ठाकरेंची संभावना करून त्यांची अवहेलना व निर्भत्सनाच त्यांनी केली. त्यांच्या मनात काहीही असो; पण श्री. उद्धव ठाकरेंची शिवसेनेच्या कार्यकारी अध्यक्षपदावर निवड करून त्यांनी स्पष्ट केले, की त्यांच्या पश्‍चात श्री. उद्धव ठाकरेच शिवसेनाप्रमुख होतील.

हे पद वंशपरंपरागत नाही याचा त्यांना विसर पडला का? जरी त्यांचे वडील (प्रबोधनकार) स्वतः एक श्रेष्ठ पत्रकार असले, तरी बाळासाहेबांना शिवसेनाप्रमुख हे पद काही परंपरागत म्हणून मिळालेले नव्हते, तर त्यांनी ते स्वतःच्या कर्तबगारीवर जिंकले होते!

वारस निवडायचा प्रयत्न करण्याची गरजच नव्हती. तो अधिकार कुणाचाच नसतो. त्यांनी एखाद्याला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून कार्यकर्त्यांवर जरी लादले असते, तरी मराठी लोकांनी त्यांच्या पश्‍चात त्या नेत्याला स्वीकारले असतेच असे नाही. वारसा किंवा नेता जनता ठरविते हा मूळ मंत्र ते विसरले आणि शिवसेनेचा ऱ्हास व्हायला लागला.

उद्धव ठाकरे एक आज्ञाधारक पुत्र असतील, बाळासाहेबांचे सहायक म्हणूनही योग्य असतील; पण एखाद्या संघटनेच्या प्रमुखाला (numero uno) ज्या गुणांची आवश्‍यकता असते (करिष्मा, दूरदृष्टी, धमक, जनतेला आकर्षित करण्याची क्षमता व निर्णय घेण्याची धडाडी इ.) ते गुण उद्धव ठाकरेंकडे असायला हवेत; तसेच ते "संघटनेला कुठे नेऊ इच्छितात' असे एक स्वप्न पाहण्याचे (ज्याला आपण इंग्रजीमध्ये vision म्हणतो) आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे कर्तृत्व त्यांच्यात असले पाहिजे. असे स्वप्न पाहण्याची पात्रता बाळासाहेबांकडे होती आणि आहे म्हणूनच ते शिवसेनाप्रमुख झाले व इतकी वर्षे त्या पदावर राहिले. उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेंकडे ही पात्रता आहे का? बाळासाहेब हयात आहेत तोवर त्यांचा सल्ला सतत मिळत असल्यामुळे व बरेच अवघड निर्णय तेच घेत असल्यामुळे हे गुण आता दिसणार नाहीत, नंतरच दिसतील. ज्याच्याकडे हे गुण आहेत, तो गादीवर बसेल, दोघांतही ते नसल्यास या दोघांना डावलून तिसराच नेता सिंहासनावर बसलेला पाहायला मिळेल.

मध्यंतरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना निवडून आली त्याची नशा शिवसेनेला जरुरीपेक्षा जास्तच चढली असे वाटते. त्यांना इतके यश मिळेल असे कुणालाच वाटले नव्हते; पण बाळासाहेबांचा प्रत्यक्ष सहभाग असलेली ती शेवटची निवडणूक आहे, असे समजून मराठी जनतेने प्रेमाने शिवसेनेला महापालिकेत सिंहासनावर बसविले; पण उद्धव ठाकरेंच्या कर्तृत्वाबद्दलचा फाजील आत्मविश्‍वास त्यामुळे निर्मिला गेला आणि इथेच चुकले! त्या निवडणुकीत जर शिवसेनेला इतके भरघोस यश मिळाले नसते, तर उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची "युती' तेव्हाच झाली असती व आजचे पानिपत टळले असते. आज मुंबईत कोणता मराठी माणूस चांगल्या पदावर आहे? म्युनिसिपल कमिशनरपदी एक केरळी माणूस आहे. शहरातले अर्ध्याहून अधिक वरिष्ठ पोलिस अधिकारी अमराठी आहेत, यांपैकी कित्येक अमराठी पोलिस अधिकाऱ्यांनी या ना त्या कारणाने नको त्या गुन्हेगारांना संरक्षण दिले असे मानायला जागा आहे. सर्व टीव्ही चॅनेलवरील मुंबईचे जवळजवळ सगळे वार्ताहर अमराठी आहेत! आम्ही राहतो तिथे झी न्यूज हा चॅनेल येतो. या चॅनेलवर पौर्णिमा सूर्यवंशी, नीलेश खरे, कांबळे व विनोद जगदाळे अशी मोजकी मराठी मंडळी सोडल्यास बाकी सर्व अमराठी लोकांचा भरणा आहे. सर्व सिनेनट वा सिनेतारकांच्या मुलाखती घ्यायला सगळे वार्ताहार जणू सिंधी-पंजाबी असले पाहिजेत, असा अलिखित नियम आहे, असे वाटावे अशी परिस्थिती दिसते! आता तर हे लोण पुण्यालाही पोचले आहे! हे बाळासाहेबांना आपणहून दिसले पाहिजे; पण शिवसेनेला व मनसेला लिहिलेल्या माझ्या पत्रात हे सर्व लिहूनही एकानेही (उद्धव किंवा राज) याबाबत काही केलेले नाही. त्या वेळी पुण्याचा वार्ताहार मयूर पारिख होता! तेव्हा "मुंबई फास्ट'ची Anchor सीमा गुप्ता होती. मला वाटायचे, की ही सीमा गुप्ते का नाही? कुमावत का? नौटियाल का? शुक्‍ला का? शिंदे, चितळे, कर्णिक, राजे, आपटे, मोरे, दराडे का नाहीत? या अमराठी लोकांना मराठी माणसांपेक्षा जास्त काय येते? मुंबईत प्रत्येक चॅनेलचा प्रत्येक वार्ताहार मराठीच असला पाहिजे, असा फतवा का नाही काढत शिवसेना? बाळासाहेबांनी असा फतवा काढला, तर कुणाची "टाप' आहे त्याविरुद्ध जाण्याची? या उलट कोलकत्यात प्रत्येक वार्ताहार बंगाली असतो आणि हिंदी भाषेचा चुकीच्या लिंग-वचनाचा वापर करून रोज खून पडत असतो, तरी तेथे बंगालीच माणूस ठेवावा लागतो, मग मुंबईत का नाही?

माझ्या मते आताची ही परिस्थिती तर १९६४ पेक्षाही गंभीर आहे. अधिकारी वर्ग तर सोडाच; पण गंमत म्हणून सांगतो, की मुंबईत आताशा टॉपचे गुंडही अमराठी आहेत. एखादा अरुण गवळी-राजनसारखा अपवाद वगळता, गुन्हेगारी विश्‍वाच्या "डॉन'पदावरही कुणी मराठी माणूस नाही आणि असे मुद्दे सोडून बाळासाहेब उद्धव-राजच्या चक्रात का अडकले आहेत? त्यांच्या पश्‍चात कोण येईल हे कोण सांगणार? कदाचित उद्धव ठाकरे पुढे येतील, कदाचित राज ठाकरे पुढे येतील. बाळासाहेबांची शक्ती, त्याचे वाक्‍चातुर्य, त्यांची लोकांना आकर्षित करण्याची हातोटी या दोघांतही नसेल, तर कदाचित दोघेही वाऱ्यावर उडून जातील व कुणी तिसराच नेता निवडून येईल! म्हणूनच वारसाबद्दल आतापासून घोळ न घालता मराठी लोकांना न्याय देण्याकडे बाळासाहेबांनी व शिवसेनेने लक्ष द्यावे हे उत्तम.

शिवसेनेचा ऱ्हास किंवा पराजय हा पर्याय मराठी माणसापुढे असूच शकत नाही. मराठी माणसाच्या हितासाठी "शिवसेना' ही संघटना जगलीच आणि वाढलीच पाहिजे. ती मराठी माणसाच्या अस्मितेची व पोटापाण्याची संरक्षक शक्ती आहे. ती पराभूत होऊन कसे चालेल? सर्व मराठी मंडळी कित्येक वर्षे बाळासाहेबांकडे कौतुकाने, आदराने व अपेक्षेने पाहत होती व आजही पाहत आहेत. अशा परिस्थितीत कोता स्वार्थ सोडून शिवसेनेचे पुनरुज्जीवन त्यांनी केलेच पाहिजे. भाऊबंदकीच्या किंवा वारसाच्या संभ्रमात जर शिवसेनेचा पूर्ण ऱ्हास झाला, तर बाळासाहेबांच्या पश्‍चात कोणीही मराठी माणूस त्यांच्याबद्दल प्रेमाने वा आदराने बोलणार नाही. आजपर्यंत शिवसेनेचा रथ जसा एकछत्री पद्धतीने केवळ मराठी माणसाच्या हिताकडे पाहून त्यांनी चालविला तसाच आताही त्यांनी चालवावा. प्रत्येक निर्णय निःस्वार्थी पद्धतीने केवळ मराठी माणसांच्या हिताकडे पाहूनच घेतला जावा, तरच ते खरोखर मराठी हृदयसम्राट म्हणून इतिहासात गणले जातील. हिंदुहृदयसम्राट ही सावरकरांची पदवी फक्त त्यांच्यासाठीच आहे, ते एकच त्या पदाचे हक्कदार आहेत हे कुणीही विसरू नये. मराठी हृदयसम्राट ही पदवीही झकास आहे, त्यात काहीही कमी नाही. ती बाळासाहेबांनी घाम गाळून मिळविली आहे व तिच्यावर फक्त त्यांचाच हक्क आहे, तीच त्यांनी वापरावी.

शिवसेनेच्या कार्याला स्वतःला वाहून घेणारे किती तरी स्वयंसेवक निघतील; पण जर शिवसेनाच अशा तऱ्हेने संपली तर कसे?
निःस्वार्थी संघटनेसाठी काम करायला लाखो मिळतील, तर पुत्रप्रेमाने आंधळ्या झालेल्या नेत्याला "मोले घातले रडाया, नाही आसू, नाही माया' छापाचेच स्वयंसेवक मिळणार, तरी शिवसेनेने वेळेवरच जागे व्हावे. मराठी माणसाला त्यांच्याशिवाय आज तरी कोणताही पर्याय नाही व म्हणून शिवसेना ही जगलीच पाहिजे व तिची पूर्वीची ताकद तिने मिळविलीच पाहिजे आणि हे फक्त बाळासाहेबच करू शकतील. राणे, भुजबळांसारखे जुने नेते त्यांनी परत शिवसेनेत आणावेत. त्यांच्याशी मोठ्या मनाने दिलजमाई करावी व शिवसेनेला तिचे जुने वैभव परत मिळवून द्यावे. आज राणेंमुळे कोकणात व राजमुळे मुंबई-ठाण्यात शिवसेनेची धूळधाण झाली याकडे दुर्लक्ष करू नये आणि केवळ त्या दोघांना त्याबद्दल जबाबदार धरू नये. टाळी एका हाताने वाजत नाही. २००९ च्या पानिपतात शिवसेनेची वा या दोन व्यक्तींची सारखीच, समान जबाबदारी आहे. म्हणून बाळासाहेबांनी भाऊबंदकीत गुंतून न राहता शिवसेना यशस्वी कशी होईल याकडेच लक्ष दिले पाहिजे. जर बाळासाहेबांनी हे क्रांतिकारक कार्य करायचे टाळले, तर उद्याची पिढी त्यांनाच "सूर्याजी पिसाळ' म्हणून ओळखू लागले व ते इतिहासाआड जातील! ना कुणाला खेद ना खंत अशा परिस्थितीत!! पण इतक्‍या उत्तुंग कर्तृत्वाच्या बाळासाहेबांनी स्वतःवर अशी वेळ येऊ देऊ नये, ही त्यांना कळकळीची विनंती.

आपला वारस कोण याचा निर्णय मराठी जनतेला निवडणुकीने घेऊ दे. कुठलाही नेता कुठल्याही नावाने त्यांच्यावर लादला जाऊ नये. असे लादलेले नेते कधीच टिकत नाहीत. जनतेने निवडलेले नेतेच यशस्वी होतात. उद्धव, राज, राणे, भुजबळ यांपैकी किंवा या चौघांबाहेरील कुणी, ज्याच्याबद्दल मराठी माणसाला खात्री वाटेल तोच शिवसेनेचा नवा प्रमुख होईल व व्हावा. कुणा येऱ्या-गबाळ्याला नेतेपदाची माळ चढवून सेनेचा सर्वनाश होऊ देऊ नये.

मराठी माणसाला दुहीचा व भाऊबंदकीचा शिवरायाच्या वेळेपासून, पेशवाईपासून शाप आहे व ती परंपरा ठाकरे कुटुंबीयांनी चालू ठेवलेली दिसते. ती वाईट परंपरा नष्ट करून व नेतृत्वपदाच्या निवडणुकीला योग्य ते महत्त्व देऊन, ती गुप्त व निर्भय वातावरणात पार पाडून, बाळासाहेबांनी एक चांगला पायंडा पाडावा जो त्यांचे वारसही चालवतील हीच त्यांना विनंती व हे कार्य त्यांच्या हातून होवो हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना.

हुकूमशहांना "लुटपुटी'च्या निवडणुकीत नेहमीच ९०-९५ टक्के मते मिळतात पण अशा निवडणुका या निवडणुका नसतात, तर तो एक देखावा असतो. ट्रक भरभरून माणसे अणून घेतलेल्या संजय गांधी छाप "विराट सभा' निरर्थक असतात. वेळ आली, की असले ९० टक्के नेते भुर्रकन वाऱ्यावर उडून जातात. शिवसेनेचा नेता असा असून चालणार नाही.

लाखो मराठी माणसे सैनिक म्हणून बाळासाहेबांच्या बाजूला उभे राहायला तयार होतील, जर ते उर्वरित आयुष्यात निःस्वार्थीपणे मराठी लोकांची सेवा करणार असतील तर; अन्यथा नाही. मग शिवसेना इतिहासजमाच होईल! केवढा हा दैवदुर्विलास!

- सुधीर काळे, जकार्ता

राजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

5 Jun 2009 - 12:50 pm | विनायक प्रभू

भारी

अमोल केळकर's picture

5 Jun 2009 - 1:20 pm | अमोल केळकर

शिवसेना या पक्षाबद्दल सुंदर आढावा घेतला आहे.

शिवसेना पुन्हा उभी राहील?
माहित नाही ( कदाचीत नाहीही )
मराठी माणूस मात्र आता मनापासून उभा रहायला /जागा व्हायला लागला आहे.

--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

चिरोटा's picture

5 Jun 2009 - 2:25 pm | चिरोटा

अतिशय चांगला आढावा घेतला आहे.
मला एक प्रश्न नेहमी पडतो तो म्हणजे मराठी माणसावर होणार्‍या कथित अन्यायाविषयी.'बाहरचे' येतात आणि नोकर्‍या बळकावतात ह्यात आताच्या काळात कितपत तथ्य आहे?नोकरीत स्थानिक माणसाला प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे ह्यावर दुमत नाही पण जाणिवपुर्वक मराठी माणसाला डावलले जाते ह्यात तथ्य आहे का? शिवसेना किंवा मनसे फारतर मराठी माणसाला व्यवसाय चालु करण्याबाबत उत्तेजन देवू शकतील पण तेही मर्यादित स्वरुपात्.ईतरांच्या (अमराठी) लोकांच्या तुलनेत मराठी माणुस नोकरीत/व्यवसायात काही कारणांमुळे मागे पडत असेल तर राजकिय पक्ष तरी काय करु शकतील?
शिरिष कणेकर पुर्वी कणेकरीत विनोदाने शिवसेना- बाळासाहेब ठाकरे = शुन्य असे म्हणायचे.व्यक्तीच्या करिष्म्यावर चालणार्‍या पक्षांचा पक्षांतर्गत लोकशाही अभावी कालांतराने प्रभाव कमी होतो असे माझे मत आहे.
शिवसेना टिकवायची असेल तर उध्धव ठाकरे ह्याना बरेच पक्षांतर्गत बदल करावे लागतील.

भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

नम्रता राणे's picture

5 Jun 2009 - 3:27 pm | नम्रता राणे

लेख खुपच भावला...
होय! शिवसेना पुन्हा उभी राहील, फिनिक्स पक्षाप्रमाणे..
नव्हे..मराठी माणसासाठी शिवसेनेला पुन्हा गरुड्झेप घ्यावीच लागेल.
यासाठी आई जगदंबेने बाळासाहेबांना उदंड आयुष्य द्यावे..

अनंता's picture

5 Jun 2009 - 4:27 pm | अनंता

शिवसेना पुन्हा नव्याने शक्तीनिशी उभी रहावी हीच इच्छा!!

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

तिमा's picture

5 Jun 2009 - 7:39 pm | तिमा

मी व्यक्तिशः शिवसेनेच्या विरोधात नाही. बाळासाहेबांनी जेंव्हा शिवसेना सुरु केली तेंव्हा इतर मराठी माणसांप्रमाणे मीही त्याचे स्वागतच केले होते. पण नंतर ज्याप्रमाणे शिवसेनेचे स्वरुप झाले ते बघितल्यावर बहुतांशी सुशिक्षित व सुसंस्कृत मराठी समाज शिवसेनेपासून दुरावला. तर तो का दुरावला त्याचा तुम्ही आढाव्यात समावेश केला नाही म्हणून स्पष्ट लिहित आहे.
स्वातंत्र्यपूर्व नेते हे स्वच्छ चारित्र्याचे व सत्ता वा संपत्तीभिलाषी नव्हते. त्यामुळेच एस. एम. जोशीं, सेनापती बापट यांच्यासारख्या स्वातंत्र्योत्तर काळातल्या नेत्यांनाही एक नैतिक अधिष्ठान होते.
आता सांगा, शिवसेनेतले नेते (सर्वच आजी व माजी) या परंपरेतले आहेत का ? यांच्याजवळ एवढी अमर्याद संपत्ती आली कोठून ?
राजकीय हप्त्याची परंपरा कोणी सुरु केली ?
कायदा हातात घेऊन कोणाच्याही तोंडाला काळे फासणे, कानाखाली आवाज (त्यांचाच लाडका शब्द) काढणे, ठोकशाहीची भाषा उठसूट करणे हे कुठल्या सुसंस्कृत मनाला पटेल ? बरे सत्ता प्रत्यक्ष नसली तरी रिमोट होताच ना ? मग तुमच्यात व सोनियामधे फरक काय?

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

कसाबला ताबडतोब फाशी द्या.
अण्णा हजारेची सुपारी देणार्‍यानां ताबडतोब फाशी द्या.
फाशी देणे येवढे सोपे असते तर मग अफझल गुरुला ५ वर्षे झाले फाशी का देता आली नाही. भारतात त्याबद्दल कायदे आहेत हे कार्याध्यक्षांना माहित नाही काय? उठसुट प्रत्येकाला फाशी दिली जात नाही. हे कधी समजणार त्याना देव जाणे. ;;)

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

सुधीर काळे's picture

5 Jun 2009 - 9:42 pm | सुधीर काळे

मा. तिरशिंगराव माणुसघाणे,
माझा हा लेख प्राथमिकपणे शिवसेना "जगविण्या"वर जोर देणारा होता. म्हणून त्यात दोन ठाकरेंनी एक व्हावे यावर भर दिलेला आहे व याच कारणासाठी त्या लेखात शिवसेनेतल्या तृटींचा उल्लेख मुद्दाम टाळला आहे. "पिंजर्‍यामध्ये व्याघ्र सापडे, बायका-पोरे मारती खडे" असे होऊ द्यायचे टाळले आहे. म्हणजे या गोष्टी मी ऐकल्या नाहींत असे नाहीं.
म्हणूनच या लेखाला सकाळच्या वाचकांच्या मुद्द्यांवर आधारलेला एक पूरक ले़ख (sequel) मी लिहिला आहे त्यात अनेक असे मुद्दे आहेत. मुख्य मुद्दा हा आहे कीं मराठी माणसाला आजच्या स्पर्धापूर्ण जगात स्वबळावर ताठपणे उभे रहायला "तयार" कसं करायचं. हा शिवसेनेच्या सांस्कृतिक कार्याचा भाग आहे व तो शिवसेनेने दुर्लक्षू नये अशी तिला कळकळीची विनंतीही आहे.
तो ले़ख सध्या "सकाळ"कडे पाठवला आहे.
तो यथायोग्य वेळी इथे श्री तात्यासाहेब अभ्यंकरांकडे पाठवेन.
वाचकांनी शक्य तो टोपणनावे टाळावीत असे वाटते.
सुधीर काळे (मूळ लेखक)

अविनाशकुलकर्णी's picture

5 Jun 2009 - 9:56 pm | अविनाशकुलकर्णी

बाळासाहेब "हिंदु ह्रुदय सम्राट " झाले..उध्धव साहेबांनि " मराठी ह्रुदय सम्राट" व्हावे..व मराठी मानसाचा उध्धार करावा..नाहि तर राज साहेब बसलेच आहेत्...

हरकाम्या's picture

6 Jun 2009 - 1:33 am | हरकाम्या

मला वाटते शिवसेना आता संपण्याच्या मार्गावर आहे.पुढील ५ वर्षाच्या काळात
ही गोष्ट प्रकर्शाने जाणवेल. कारण सेनाप्रमुख आता फक्त नामधारि सेनापती
राहिलेले आहेत. त्यांच्यातला जोश कधिच संपलाय, उध्दव ठाकरे हे जोश्पुर्ण
वाटत नाहीत.मराठी जनता आपला तारणहार म्हणुन राज ठाकरे यांना पहाते
याचे प्रत्यंतर या निवडणुकीत आले आहे. दुसरी दुर्दैवी बाजु म्हणजे या दोघांच्या
भांडणात कोंग्रेसचा फायदा झालेला आहे् दोघे एकत्र असते तर आज चित्र वेगळे दिसले असते पण मराठी इतिहासाला " भाउबंदकीचा "शाप आहे.तोच शाप
या शिवसेनेला भोवला.

महाराष्ट्रात आज कॉग्रेस-रा कॉची सत्ता आहे. त्याना फक्त बिगर मराठी लोकानी सत्तेवर आणले आहे का?हे महाराष्ट्रात तरी शक्य आहे का? राहिला प्रश्न शिवसेनेचे काय होईल. हा प्रश्न आपल्या पेक्षा उध्दव ठाकरेना पडला पाहिजे होता.आज जे काही शिवसेनेची हालात झाली आहे ती फक्त उध्दव ठाकरेंच्या हेकेखोरपणा मुळे झाली आहे.आज शिवसेनेत किती स्वंयशिध्द नेते आहेत? जे कोण आहेत ते फक्त बाळासाहेबाच्या करिश्म्याने निवडुन येणारे विजेचे बल्ब आहेत्.आजही उध्दव ठाकरेना बाळासाहेबाचे नाव घेवुन मते मागावी लागतात हेच शिवसेनेचे दृदैव आहे.बाळासाहेबाचे स्वप्न आहे की विधानभवनावर भगवा फडकावा म्हणुन शिवसेनाला मते द्या. हे इतके पालुपद सोडुन ते काय दुसरे काही विकासाबद्दल बोलतात का?. खरतर समंजसपणा दाखवुन त्यानी सेना नेतृत्व राज ठाकरेंकडे ध्यायला हवे होते. आज जी काही मनसे प्रगती झाली आहे ती फक्त राज ठाकरे याच्या स्वःताच्या करिश्म्यामुळे. त्यामुळे आता त्यानी मागे पाऊल उचलावे हे पटत नाही.शिवसेनेत जी काही मुठभर स्वयंप्रकाशित नेते होते त्याना उध्दव ठाकरे कंपनीने जाणिवपुर्वक बाजुला केले. त्याचे परिणाम शिवसेनेवर होणार हे नक्की होते. आज ते होत असताना त्या नेत्यांविषयी नकाश्रु ढाळण्यात काहीच अर्थ नाही. नारायण राणे यानी कॉग्रेसचा मार्ग धरला व आज कोकणात सेना फक्त बोर्ड पुरती उरली आहे. राज ठाकरेच्या मनसे मुळे मुंबई मध्ये सेना आता शेवटची घटका मोजत आहे. ह्याचा विचार उध्दव ठाकरे ह्यानी अगोदर करायला हवा होता. अजुनही मला राज ठाकरे व नारायण राणे ह्यानी सेनेविरुध्द गद्दारी केली हे पटत नाही. त्याना अक्षःरशा अपमानित करुन सेनेतुन बाहेर काढण्यात आले. शिवसेनेला अस्तित्व फक्त बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यतच आहे.शिवसेनाचा धनुष्य पेलण्याची ताकत सध्या तरी सेनेत कुणाच्या हाती नाही.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

विसोबा खेचर's picture

6 Jun 2009 - 1:44 pm | विसोबा खेचर

काळेसाहेब,

मिपावर स्वागत..

लेखनाची सुरवात दमदार झाली आहे. लेख फार आवडला. कळकळीने लिहिल्याचे जाणवते!

या पुढेही आपले असेच उत्तमोत्तम वैचारिक लेखन मिपावार व्हावे हीच इच्छा...

आपला,
तात्या.

निखिलराव's picture

6 Jun 2009 - 2:48 pm | निखिलराव

काळेसाहेब,
सुंदर लेख.

वेताळ-जी,
आपण दोघेही एकाच बाजूला उभे आहोत! मीही राज व उद्धव यांनी एक व्हावे, नारायण राणे व भुजबळ यांना मानाने परत आणावे व शिवसेनेत बुलंद एकी व्हावी असेच मानतो. मी या लेखाला जो पूरक लेख लिहिला आहे त्यात मी याखेरीज शिवसेनेने मराठी माणसाला आजच्या स्पर्धापूर्ण जगात इतर स्पर्धकांबरोबर टक्कर द्यायला सक्षम बनवावे या व अशा सामाजिक कार्याकडे तितकेच लक्ष द्यावे जेवढे निवडणुकीकडे दिले जाते याचे आग्रहाने प्रतिपादन केलेले आहे. हा लेख मी श्री तात्यासाहेबांना लवकरच प्रसिद्धीसाठी देईन.
सुधीर काळे (मूळ लेखक)

chipatakhdumdum's picture

8 Jun 2009 - 1:52 am | chipatakhdumdum

मा. बाळासाहेबान्च वय बघा.. त्यान्ची सध्याची तब्येत बघा. या वयात ते शिवसेनेकरता काहीही करु शकत नाहीत. त्यान्चा मातोश्रीवर बाबू करुन ठेवला आहे. त्यान्च्या नावाने सामनामध्ये अग्रलेख लिहीले जातात, ते राउत लिहीतो.. मा. बाळासाहेबानी या वयात हे कराव आणि ते कराव असे वेडझवे विचार मनात येणे हे अकलेच्या दिवाळ्खोरीच लक्षण आहे. उद्या म्हणाल शिवाजी महाराज आज जिवन्त हवे होते..

मूर्खा भूत भूत म्हणत पळशील...

ज्या वेबसाईटवर स्त्रिया असतात अशा ठिकाणी भाषा वापरण्याचे जे अलिखित संकेत असतात त्यांना पूर्णपणे धाब्यावर बसवून ही पोस्ट लिहिली गेली आहे याबद्दल प्रथम नाराजी प्रकट करतो. कुठे काय बोलवे आणि कुठे काय लिहावे याच्या शिष्टाचारानुसार कांहीं सीमारेषा असतात. त्या ओलांडून श्री. (कीं श्रीमती) chipatakhdumdum यांनी ही पोस्ट लिहिली आहे. अशी भाषा वापरणार्‍यांना सहाजिकपणे टोपणनांव वापरावेच लागते,कारण खरं नांव सांगितलं तर घरी आया-बहिणी बहिष्कार घालतील! माझ्या मतांशी मतभेद जरूर असू देत, पण "वेडxx विचार" असले शब्द न वापरता ते मांडता येत नाहींत कां? जरा विचार करा!
मा. बाळासाहेब हे कांहीं कष्टकरी नाहींत व मी केलेल्या सूचनांमध्ये कुठलंही अंगमेहनतीचं काम नाहीं. त्यांनी फक्त दिशा दाखवायची आहे. नुसत्या नजरेच्या इशार्‍यावर ते राज-उद्धव एकी घडवून आणतील. तेवढे त्यांना नक्कीच करता येईल व ते त्यांनी केले तर मराठी जनता त्यांना मनापासून धन्यवाद देईल यात शंका नाहीं.
श्री. तात्यासाहेब अभ्यंकर यांनी सुरू केलेली ही वेबसाईट कांहीं मार्गदर्शक तत्वांवर अधारभूत आहे असे मला वाटते. ती तत्वे त्यांनी नीटपणे मांडावीत व त्याचे पालन होत आहे याची खबरदारी घ्यावी अशी त्यांना वैयक्तिक विनंती.
आपला कृपाभिलाषी,
सुधीर काळे (मूळ लेखक)

श्रीयुत संतोष जोशी's picture

9 Jun 2009 - 7:38 am | श्रीयुत संतोष जोशी

लेख जाम भारी जमला आहे.
पण माझं स्पष्ट मत आहे की जेव्हा म्हणजे आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सेना ठाण्यात पडली तिथेच संपली.
सेनेचा रायगड गेला.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

नितिन थत्ते's picture

9 Jun 2009 - 6:21 pm | नितिन थत्ते

मराठी माणसांचे भले व्हावे अशी बाळासाहेबांची (तसेच उद्धवची आणि राजचीही) खरोखरची इच्छा आहे असे गृहीत धरून बर्‍याच प्रतिक्रिया आल्या आहेत.
श्रद्धेला उत्तर नाही हेच खरे. :(

खराटा
(रंग माझा वेगळा)

स्वानन्द's picture

9 Jun 2009 - 8:25 pm | स्वानन्द

ते तर आहेच. कुणाची श्रद्धा काँग्रेस आपलं भले करेल यावर तर कुणाची कम्युनिझम वर!

सुधीर काळे's picture

10 Jun 2009 - 5:41 pm | सुधीर काळे

खरं सांगायचं तर आतापर्यंत सर्व राजकीय पक्ष धरून अशी एकच व्यक्ती व एकच पक्ष माझ्या तरी पहाण्यात आला आहे कीं जो स्पष्टपणे म्हणतो कीं मी मराठी माणसांसाठीच काम करणार. आणि ती व्यक्ती आहे मा. बाळासाहेब.
मा. शरद पवार पहा! त्यांनी तर सांगितलं कीं त्याच्या बारामतीच्या गोठ्यातही त्यांनी भय्ये ठेवले आहेत कामाला. ही झाली रा.कॉं.पक्षाची गत. तीच कहाणी विलासारावांची व सुशीलकुमार शिंद्यांची. मग मराठी जनतेनं कुणाकडे पहायचं?
राष्ट्रीय दृष्टिकोन व प्रादेशिक दृष्टिकोन यात गल्लत फक्त बाळासाहेबच करत नाहींत. म्हणूनच हिंदुत्वाची भेसळ मला आवडली नाहीं. ते काम त्यांनी भाजपावर सोपवायला हवं होतं!
आताची परिस्थिती मला माहीत नाहीं, पण बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली तेंव्हा १०० टक्के ती मराठी माणसाशी प्रमाणिक होती यात शंका नाहीं.
असो. तूर्तास इतके पुरे.
सुधीर काळे (मूळ लेखक)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jun 2009 - 9:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खरं सांगायचं तर आतापर्यंत सर्व राजकीय पक्ष धरून अशी एकच व्यक्ती व एकच पक्ष माझ्या तरी पहाण्यात आला आहे कीं जो स्पष्टपणे म्हणतो कीं मी मराठी माणसांसाठीच काम करणार. आणि ती व्यक्ती आहे मा. बाळासाहेब.

आपल्यासाठी इतर कोणी काम करावं, दुसर्‍याने येऊन आपलं भलं करावं, "देवा मला पाव" प्रार्थना करत बसायची, तर मग आपण (मराठी माणसाने) नक्की काय करायचं?

मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळून काय केलं? राज्यात आणि देशातही पाच-सहा वर्ष सत्ता मिळाल्यावर काय केलं? अजूनही, एवढ्या वर्षांनंतरही 'मराठी वाचवा' असा गळा का काढावा लागतो?

'श्रद्धे'च्या जोरावर वाट पहात बसायची का स्वतःची ताकद ओळखून कष्ट करायला लागायचं?

रम्या's picture

11 Jun 2009 - 11:52 am | रम्या

>>मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळून काय केलं? राज्यात आणि देशातही पाच-सहा वर्ष सत्ता मिळाल्यावर काय केलं? अजूनही, एवढ्या वर्षांनंतरही 'मराठी वाचवा' असा गळा का काढावा लागतो? <<

यालाच म्हणतात विश्वासघात! आणि आता चुकीचं खापर दुसर्‍यांच्या डोक्यावर फोडताहेत!
आता बघू पुतण्या काय करतो. का तोही नुसताच बोलबच्चन?

आम्ही येथे पडीक असतो!

(१) ज्या मराठी तरुणांना तृतिय-चतुर्थ श्रेणीच्याही नोकर्‍या मिळत नाहींत त्यांच्यासाठी शिवसेनेची अतोनात गरज आहे, जे प्रथितयश आहेत त्यांच्यासाठी शिवसेनेची गरज त्या मानाने कमी आहे.
(२) मराठी माणसाला एकाद्या अपंग व्यक्तीला मदत करतात तशी मदत नकोच आहे. कारण तो स्वत:च्या गुणांवर यशस्वी होऊ शकतो. पण परप्रांतीय मालकांकडून त्याच्याविरुद्ध  जी कारस्थाने केली जातात, त्याच्या मार्गात जे अनैसर्गिक अडथळे आणले जातात त्यांचा पाडाव करून एक तर्‍हेचे सपाट पटांगण (Level playing field) निर्माण करण्यासाठी शिवसेना हवी.
उदाहरणार्थ केंद्र व राज्यसरकारातल्या नोकर्‍या परप्रांतीय घेऊन जातात, त्या कांहीं त्यांच्या गुणांमुळे नाहीं तर परप्रांतीयांच्या पाताळयंत्री कारस्थानांमुळे! रेल्वेच्या नोकर्‍यांसाठीच्या परिक्षेला फक्त बिहारीच कसे येतात? सगळे दाक्षिणत्य लोक कसे आपल्या समाजाचे लोक इकडे महाराष्ट्रात घुसवितात? हे मेरिटवर होतं? अजीबात नाहीं. ते आपल्याविरुद्ध एकजुटीने षड्यंत्र रचतात, आपल्या मुलांच्या तोंडचा घास काढून स्वत:च्या मुलांच्या तोंडात घालतात. त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी शिवसेना हवी. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापली ती अशा लोकांसाठी. तरी याबाबत वैचारिक गल्लत अजीबात करू नये.
सुधीर काळे (मूळ लेखक)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jun 2009 - 1:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ज्या मराठी तरुणांना तृतिय-चतुर्थ श्रेणीच्याही नोकर्‍या मिळत नाहींत त्यांच्यासाठी शिवसेनेची अतोनात गरज आहे,

शिवसेना गेली काही (किती ते नक्की मला माहित नाही, पण काही दशकं तरी आहेच) वर्षांत या कामात किती यश मिळवू शकली आहे?

उदाहरणार्थ केंद्र व राज्यसरकारातल्या नोकर्‍या परप्रांतीय घेऊन जातात, त्या कांहीं त्यांच्या गुणांमुळे नाहीं तर परप्रांतीयांच्या पाताळयंत्री कारस्थानांमुळे!

नक्की काय काय "कारस्थानं" केली या परप्रांतीयांनी?
मराठी वर्तमानपत्रांमधे रेल्वे बोर्डाच्या (आणि तत्सम सर्व सरकारी नोकर्‍यांच्या) जाहीरातींचं भाषांतर करून मराठी मुलांपर्यंत ही माहीती का येत नाही? "सामना" (मी वाचत नाही!) अशी माहिती छापतो का? मराठी मुलं "एंप्लॉयमेंट न्यूज" (या वृत्तपत्रात अशा नोकर्‍यांच्या जाहीराती असतात) का वाचत नाहीत? त्यासाठी काही जागृतीचा कार्यक्रम स्वतःला प्रादेशिक म्हणवणार्‍या पक्षांकडून होतो का?
शिवसेनेतर्फे (किंवा 'मराठी'चा कैवार असणारे आणि त्याचं राजकारण करणारे इतर कोणीही) या नोकर्‍यांसाठी मराठी मुलांना किती प्रशिक्षण देतात? उदा: कोटा, राजस्थान इथे आय.आय.टी. प्रवेशासाठी 'फॅक्टरी' बनवली आहे असं म्हणायला हरकत नाही. किंवा पुण्यात अविनाश धर्माधिकारी 'चाणक्य मंडळ' चालवतात तिथे, किंवा ठाण्यात सी.डी.देशमुख अध्यासनातर्फे एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सी.च्या प्रवेश परीक्षांसाठी वर्ग चालतात.

वैचारीक गल्लत मी करत असेनही, कदाचित मला राजकारण आणि समाजकारण यांतला फरक कळत नाही. किंवा "आपल्या" लोकांसाठी सपाट पटांगण (Level playing field) निर्माण करण्यासाठी इतरांना दहशत दाखवायला हवी हे मला पटत नाही.

अवांतर: बंगाली लोकांच्या मते, आपण, मराठी लोकं फार कष्ट करतो. बंगाली लोकं दुसर्‍या बंगाल्याला कधीही मदत करत नाहीत. मला ही महत्त्वपूर्ण माहिती देणारे दहा-पंधरा बंगाली माझे कार्यालयातले चांगल्यापैकी मित्र-मैत्रिणी आहेत.

नम्रता राणे's picture

11 Jun 2009 - 2:15 pm | नम्रता राणे

मुळात १९६६ साली शिवसेनेचा जन्म झाला नसता आणि मा. बाळासाहेबांनी मराठी माणसाला 'बजाव पुंगी हटाव लुंगी 'चा गगनभेदी नारा देत डिवचल नसत आणि तर आज ४३ वर्षानंतर मुंबईत मराठी माणूस राहीला असता की यंडू गूंडूचा वरचष्मा राहीला असता ?त्याकाळी दाक्षिणात्यांना रोखल नसत तर आज शासकीय, निमशासकीय कार्यालयात मराठी ट्क्का राहीला असता ? मुंबई तुमची भांडी घासा आमची असे हिणवणार्‍या शेट्जी मारवाड्यांनी मराठी तरुणाला व्यापारधंदा करू दिला असता? माहीती व तंत्रद्यान क्षेत्रात मराठी लिपीचा उगम होऊन मिसळपाव सारखे व्यासपिठ मराठी माणसाला उपलब्ध झाले असते? ढाण्या वाघासारखा शिवसैनिक रस्त्यावर उतरला नसता तर धर्मांधानी मुंबई जाळली नसती? यु.पी बिहारच्या मस्तवाल गुंडानी आम्हा मराठमोळ्या स्त्रियांना रस्त्यात मोकळेपणाने हिंडू फिरु दिल असत?
निवडणूकीच्या समरांगणात जय पराजय हा होतच असतो.. म्हणून शिवसेना इतिहासजमा झाली असे म्हणणे अतिशयोक्ती होतेय...
शिवसेना नक्की पुन्हा उभी राहील, नव्हे ती नक्की गरुडझेप घेईल

नितिन थत्ते's picture

11 Jun 2009 - 2:30 pm | नितिन थत्ते

>>>निवडणूकीच्या समरांगणात जय पराजय हा होतच असतो.. म्हणून शिवसेना इतिहासजमा झाली असे म्हणणे अतिशयोक्ती होतेय...
शिवसेना नक्की पुन्हा उभी राहील, नव्हे ती नक्की गरुडझेप घेईल

सहमत. तशी उभारी पुन्हा घ्यायला काही हरकत नाही. पण शिवसेना टिकली पाहिजे म्हणून मराठी माणसाने मुद्दामहून मदत करावी असे कशाला. (आज मराठी माणसाला शिवसेना जवळची वाटत नसेल तरीही)

खराटा
(रंग माझा वेगळा)

नम्रता राणे's picture

11 Jun 2009 - 3:40 pm | नम्रता राणे

शिवसेना टिकली पाहिजे म्हणून मराठी माणसाने मुद्दामहून मदत करावी असे कशाला. (आज मराठी माणसाला शिवसेना जवळची वाटत नसेल तरीही)
केवळ मुंबई -ठाण्यात लोकसभेच्या पाच जागा कमी झाल्या म्हणुन मराठी माणूस शिवसेनेपासून दुर झाला असे वाटत नाही.
शिवसेनेचा मतदार फक्त मराठी माणूसच आहे. गेलाबाजार काही प्रमाणात गुजराथी समाज. बस
भय्या-बिहारी, मुस्लीम, कॅथलीक हा समाज सेनेला मतदान करतो?
मराठी माणूस काही प्रमाणात राज यांच्याकडे आकर्षीत झाला हे नक्की, पण म्हणून आज मराठी माणसाला शिवसेना जवळची वाटत नाही असे नाही.

चिरोटा's picture

11 Jun 2009 - 3:17 pm | चिरोटा

त्याकाळी दाक्षिणात्यांना रोखल नसत तर आज शासकीय, निमशासकीय कार्यालयात मराठी ट्क्का राहीला असता

म्हणजे शिवसेनेने दाक्षिणात्यांना रोखले? दाक्षिणात्य्(विशेषकरुन तामिळ) त्यावेळी खाजगी नोकर्‍यांसाठी येत(जसे आता मराठी सगळीकडे जात आहेत!!). नंतरच्या काळात दक्षिणेतल्या राज्यानी बरीच गुंतवणूक केली म्हणुन प्रमाण कमी झाले.

मुंबई तुमची भांडी घासा आमची असे हिणवणार्‍या शेट्जी मारवाड्यांनी मराठी तरुणाला व्यापारधंदा करू दिला असता?

आता काय परिस्थेती आहे? शेयर मार्कॅट मध्ये गुज्जु/मारवाडीच आहेत्.कुठच्याही उपनगरीय स्थानकाबाहेर जा, मोक्याच्या जागा/दुकाने ह्याच लोकांची आहेत.दादर्/गिरगाव्/परळ ह्या ठिकाणीही हेच लोक आले आणि मराठी माणुस बदलापूर्,कसार्‍याची स्वप्ने पाहु लागला.वांद्रे,खार्,सांताक्रुझ्,विलेपार्ले ह्या उपनगरांच्या पस्चिमेच्या बाजुस मराठी माणुस् औषधालाच सापडतो.(शिवसेनेच्या शाखा मात्र तिकडे दिसतात!!)
अर्थात ह्यात सगळा दोष शिवसेनेचा नाही तर सरकारी तिजोरी भरण्यासाठी झालेल्या सरकारी धोरणांचा आहे.दक्षिण मुंबईत चाकर्मान्यांची अफाट गर्दी होते असे म्हणायचे आणि वांद्रे-वरळी सेतुवर करोडो रुपये खर्च करायचे.राज्याच्या काही ठराविक भागांचाच विकास होवु द्यायचा,बाकीचा भाग जाणुन बुजुन मागासलेला ठेवायचा्. ह्या धोरणाना सेनेने विरोध करणे आवश्यक होते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

निखिलराव's picture

13 Jun 2009 - 12:34 pm | निखिलराव

"नम्रता राणे आगे बडो हम तुम्हारे साथ हे"

माझ्या मते "शिवसेनेने काय केले" हा प्रश्न विचारण्याऐवजी "शिवसेना नसती तर काय झाले असते" हा प्रश्न विचारणे जास्त सयुक्तिक आहे. म्हणून "कोण-पुढे-कोण-मागे" किंवा "कोणाच्या मागे मराठी जनता आहे" याच्या तपशिलात न जाता दोन्ही ठाकरे बंधूंनी (उद्धव-राज) एक होणे अतीशय जरूरीचे आहे.
शिवसेनेने काय केले याचे मूल्यमापन करायला हवे, पण अशा गोष्टी मापणे सोपे नसते!
http://www.loksatta.com/daily/20090607/sun03.htm हा आमदार गजानन कीर्तीकर यांनी लिहिलेला लेख वाचावा. छान आहे.
मला कुणी आमदार गजानन कीर्तीकर यांचा ई-मेल आय्. डी. देऊ शकेल काय?
(३_१४ चा π (पाय-२२/७ किंवा ३.१४) या भूमितीतल्या खुणेशी संबंध आहे कीं १४ मार्चशी?)
धन्यवाद,
सुधीर काळे (मूळ ले़खक)

नम्रता राणे's picture

12 Jun 2009 - 10:08 am | नम्रता राणे

काळे साहेब
कीर्तीकरांचा लेख खरच खुप छान आहे.
त्यांच्या संपर्कासाठी www.gajanankirtikar.com हि वेबसाईट पहा

नम्रता राणे's picture

12 Jun 2009 - 10:09 am | नम्रता राणे

काळे साहेब
कीर्तीकरांचा लेख खरच खुप छान आहे.
त्यांच्या संपर्कासाठी www.gajanankirtikar.com हि वेबसाईट पहा

नम्रता राणे's picture

12 Jun 2009 - 10:09 am | नम्रता राणे

काळे साहेब
कीर्तीकरांचा लेख खरच खुप छान आहे.
त्यांच्या संपर्कासाठी www.gajanankirtikar.com हि वेबसाईट पहा

सुधीर काळे's picture

12 Jun 2009 - 3:11 pm | सुधीर काळे

धन्यवाद, नम्रता. मी कीर्तीकरांशी ई-मेलने संपर्क साधू शकलो. बघू काय उत्तर देतात ते.
सुधीर काळे

चिरोटा's picture

12 Jun 2009 - 4:12 pm | चिरोटा

..आणि प्रिया दत्त, मिलिंद देवरा, गुरुदास कामत आणि संजय निरुपम या अमराठी उमेदवारांना निवडून दिले.

जो महाराष्ट्रात राहतो आणि तिकडे अनेक वर्षे काम करतो तो महाराष्ट्रीयन नाही का?मिलिंद देवरा आणि कामत तर चांगले मराठी बोलतात्.प्रिया दत्त ह्यांची कर्मेभूमी मुंबईच आहे.

१९९२-९३ च्या दंगलीत मुंबईतील हिंदूंचा एकमेव आधार होती शिवसेना! त्यावेळी शिवसेना दंगलखोरांच्या विरोधात खंबीरपणे उभी ठाकली नसती तर आज हिंदू, मराठी माय-भगिनींना मुंबईच्या रस्त्यांवरून फिरणे शक्य झाले नसते.

Maximum City हे सुकेतु मेहता ह्यानी लिहिलेले पुस्तक वाचले तर मराठी म्हणुन मान शरमेने खाली जाइल अशी 'थोर कार्ये' शिवसैनिकानी केली आहेत त्यावेळी.

आज मुंबईतील हिंदू समाज केवळ शिवसेनेमुळेच सुरक्षित आहे. असे असूनही मुंबईत शिवसेनेचे उमेदवार पराभूत होतात यासारखे दुर्दैव ते कोणते?

ह्याचा अर्थ मुंबईकर हिंदु समाजाला आता सध्याच्या परिस्थीतीतच जास्त सुरक्षित वाटत आहे असा होवु शकतो.

४३ वर्षांपूर्वी बेरोजगारीमुळे त्रस्त झालेल्या मराठी तरुणांना शिवसेनेने आधार दिला

सहमत.(असल्या बुनियादी मुद्द्यांवर शिवसेनेने जर पुढच्या निवड्णुका लढवल्या असत्या आणि प्रश्न सोडवले असते तर स्वबळावरच सेना राज्यात सत्तेवर असती.)

मुंबईतून निवडून गेलेल्या प्रिया दत्त पंजाबी आहेत, मिलिंद देवरा मारवाडी समाजाचे आहेत, तर संजय निरुपम बिहारचे आहे.

जयवंतीबेन मेहता/किरीट सोमैय्या जर निवडुन आले असते तर किर्तीकरांनी असे विधान केले असते का?समजा अडवाणी मुंबईतुन उभे राहिले असते तर किर्तीकरांनी मुंबईकराना काय सल्ला दिला असता?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

मैत्र's picture

12 Jun 2009 - 4:28 pm | मैत्र

१. संजय निरुपम शिवसेनेकडून लोकसभेवर गेले (होते ना चुभू देणे घेणे) तेव्हा मराठी होते का?

२. किरीट सोमैय्या व्यक्ती आणि उमेदवार म्हणून चांगले आहेत. मग त्यांच्या बाबतीत त्यांना डावलून मराठी बाणा लावून तिथून दुसर्‍या कोणाला उभं का केलं नाही?

३. प्रिया दत्तचा देशद्रोही भाऊ जो आता अबू आझमी आणि अमरसिंगांच्या मांडीला मांडी लावून बसतो त्याचबद्दल असलेले प्रेम जगजाहीर आहे. त्याला कधी विरोध केला का अमराठी म्हणून किंवा एके ४७ चुकून बाळगली म्हणून?

शिवसेना पूर्ण वाईट आहे आणि काँग्रेस उत्तम असे बिलकूल नाही. पण आपण जो मुद्दा लावून धरतो आणि ज्या मुद्द्यावर सरकार मिळावे अशी इच्छा करतो त्या बाबतीत स्वच्छ आणि स्पष्ट असणे गरजेचे आहे. नाही तर या अशा चुका जास्त महागात पडतात.

नम्रता राणे's picture

12 Jun 2009 - 5:10 pm | नम्रता राणे

१. संजय निरुपम शिवसेनेकडून लोकसभेवर गेले (होते ना चुभू देणे घेणे) तेव्हा मराठी होते का?
त्यांना राज्यसभेवर पाठवलेले, फितुर झाले, हा काय सेनेचा दोष?

२.किरीट सोमैय्या व्यक्ती आणि उमेदवार म्हणून चांगले आहेत. मग त्यांच्या बाबतीत त्यांना डावलून मराठी बाणा लावून तिथून दुसर्‍या कोणाला उभं का केलं नाही?
किरीट सोमय्या हे भाजपाचे उमेदवार होते, हा काय सेनेचा दोष?
(जरी युती असली तरी भाजपा हा स्वतंत्र पक्ष आहे)

३. प्रिया दत्तचा देशद्रोही भाऊ जो आता अबू आझमी आणि अमरसिंगांच्या मांडीला मांडी लावून बसतो त्याचबद्दल असलेले प्रेम जगजाहीर आहे. त्याला कधी विरोध केला का अमराठी म्हणून किंवा एके ४७ चुकून बाळगली म्हणून?
संजय जर दोषी असेल तर त्याला खुशाल फासावर लटकवा असे बाळासाहेबांनी विधान केले होते. संजयला दोषी ठरल्यावर व सजा झाल्याव सेनेने त्यास कधीही विरोध केल्याचे स्मरत नाही.

माझ्यापरीने केलेला हा खुलासा.

वेताळ's picture

12 Jun 2009 - 6:15 pm | वेताळ

नम्रता..तुम्ही केलेले खुलासे अत्यंत हास्यापद आहेत.
१. संजय निरुपम च्या अगोदर सेनेने पाठविलेले अमराठी राज्यसभा संसदपटु अजुन ही सेनेशी प्रामाणिक आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहेत का? चंद्रिका केनिया, राम जेठमलानी ,प्रितिश नंदी आजकाल सेनेच्या वाढीसाठी काम करत आहेत का?
प्रत्येक वेळी माणसे पारखताना ? चुक करणार व नंतर त्याला गद्दार ठरवणार व सहानभुती मिळवणार का?
२. किरीट सोमैयाच्या एवजी दुसर्‍या पक्षाचा मराठी उमेदवार निवडुन आल्यावर सेनेला इतका आकाडतांडव करण्याची काहीच गरज नाही.
(राष्ट्रवादी कितीजरी राष्ट्रीय पक्ष म्हणत असला तरी मराठी पक्ष आहे.)
३. आता संजय दत्त दोषी आहे.तुम्ही आता काय करणार?
कारण आताचे कार्याध्यक्ष प्रत्येकाला फासावर लटकवायला निघाले आहेत.ह्या प्रकरणात त्यानी चुप्पी साधली आहे.
आमच्या परीने दिलेले उत्तर.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

नम्रता राणे's picture

12 Jun 2009 - 6:28 pm | नम्रता राणे

१. संजय निरुपम च्या अगोदर सेनेने पाठविलेले अमराठी राज्यसभा संसदपटु अजुन ही सेनेशी प्रामाणिक आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहेत का? चंद्रिका केनिया, राम जेठमलानी ,प्रितिश नंदी आजकाल सेनेच्या वाढीसाठी काम करत आहेत का?
प्रत्येक वेळी माणसे पारखताना ? चुक करणार व नंतर त्याला गद्दार ठरवणार व सहानभुती मिळवणार का?
मला वाटत सेना यापुढे अशी चुक करायला धजावणार नाही.

२.किरीट सोमैयाच्या एवजी दुसर्‍या पक्षाचा मराठी उमेदवार निवडुन आल्यावर सेनेला इतका आकाडतांडव करण्याची काहीच गरज नाही.
संजय पाटील, एकनाथ गायकवाद हे निवडून आल्यामुळे सेनेने आकाडतांडव केलेले नसुन गुरुदास कामत, आणि निरुपम हे परप्रांतीय महाराष्ट्राच्या राजधानीत निवडून गेल्याचे दु;ख आहे. ‍
आता संजय दत्त दोषी आहे.तुम्ही आता काय करणार?
३. कारण आताचे कार्याध्यक्ष प्रत्येकाला फासावर लटकवायला निघाले आहेत.ह्या प्रकरणात त्यानी चुप्पी साधली आहे.
आमच्या परीने दिलेले उत्तर
न्यायप्रविष्ट प्रकरण नोंदघ्यावी

चिरोटा's picture

12 Jun 2009 - 7:07 pm | चिरोटा

गुरुदास कामत, आणि निरुपम हे परप्रांतीय महाराष्ट्राच्या राजधानीत निवडून गेल्याचे दु;ख आहे.

कामताना परप्रांतिय का संबोधत आहात कळत नाही आहे. त्यांचा जन्म उत्तर कर्नाटकातला आहे.१९८४ मध्ये ते प्रथम खासदार झाले.केवळ महाराष्ट्राबाहेर जन्म म्हणजे परप्रांतिय अशी व्याख्या आहे का? असे असेल तर महाराष्ट्रातल्या काही ज्येष्ट गायक्/गायिकांचा जन्म महाराष्ट्राबाहेर झाला आहे.त्या बद्दल आपले काय म्हणणे आहे?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Jun 2009 - 10:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

निरुपम हे परप्रांतीय महाराष्ट्राच्या राजधानीत निवडून गेल्याचे दु;ख आहे. ‍

शिवसेनेत असतील ते (भय्ये आणि बिहारीसुद्धा) स्थानिक आणि (तेच लोकं) इतर पक्षाकडून निवडून गेले की परप्रांतीय असा काही हिशोब आहे का?

अडाणि's picture

13 Jun 2009 - 4:37 am | अडाणि

मला वाटत सेना यापुढे अशी चुक करायला धजावणार नाही.
मला वाटते सेनेला अशा चुका करायची यापुढे संधीही मिळणार नाही...

-
अफाट जगातील एक अडाणि.

अभिरत भिरभि-या's picture

13 Jun 2009 - 11:23 am | अभिरत भिरभि-या

मुंबईत मराठी माणसाच्या समस्या आहेत हे मान्य; पण त्यावर शिवसेना (आणि अर्थातच मनसे) उत्तर नाही. कारण आम्ही नसतो तर तुमचे हाल कुत्र्याने खाल्ले नसते असे समज करून देऊन स्वतःची राजकीय पोळी भाजण्यात शिवसेनेचा स्वार्थ आहे हे उघड आहे.

जर शिवसेनेचा दहशतीचा मार्ग इतका प्रभावशाली होता तर आपली मुंबईमधून (तथाकथित) हकालपट्टी का झाली ?

फाळणीनंतर कितीतरी सिंधी लोक केवळ अंगावरच्या वस्त्रांनिशी मुंबईच्या आसपास राहाय्ला आली; आज तो समाज बहुतांशी सुस्थिर आहे.
यातून आपण काय शिकलो आहोत??

वर म्हटले तसे, श्रद्धेला उत्तर नसते. अनेक मराठी लोकांच्या सेनेंबद्दलच्या (अंध)श्रद्धेबद्दल कणव वाटते.
वर अनेक ठिकाणी रास्त आक्षेपांना हास्यास्पद उत्तरे आली आहेत.

इतिहासात जर तर ला अर्थ नसतो तरीही जर शिवसेना नसती तरी आजची मराठी माणसाची स्थिती कदाचित बरी असती .
कारण ..
मुंबईत घुमणारा "त्यांचा" आवाज म्हणजे आमचाच आवाज आहे अशी खोटी फसगत करून घेतली नसती;
इतर समाजांचे पाहून आर्थिक प्रगतीचे मार्ग मराठी समाज लौकर शिकला असता;
दहशतीपेक्षा लॉबिंगचे प्रभावी अस्त्र तो शिकला असता;
कोलकाता शबार (सर्वांचे) किंवा चेन्नई यल्लरिगु (सर्वांचे) च्या चालीवर मुंबई सर्वांची म्हणत स्वतःचे घोडे पुढे दामटवण्याचा दुपट्टीपणा शिकला असता.

पण तसे होणे नव्हते :(

सुधीर काळे's picture

13 Jun 2009 - 12:14 pm | सुधीर काळे

याला माझे उत्तर मी एका नव्या लेखात दिले आहे, पण तो इतरत्र प्रसिद्धीसाठी दिलेला असल्याने सध्या इथे देता येत नाही.
जिथे दिला आहे तिथे प्रसिद्ध झाल्यावर किंवा प्रसिद्ध होणार नाहीं असे नक्की समजल्यावर मी इथे तो देईन.
तसेच "ऑडॅसिटी ऑफ होप" या बराक ओबामालिखित पुस्तकाचा मराठी वाचकांसाठी लिहिलेला व ३००० शब्दसंख्या असलेला लेख "पी.डी.एफ" फॉर्मॅटमध्ये तयार आहे. पण लिप्यंतर कोण करणार?

नितिन थत्ते's picture

13 Jun 2009 - 12:19 pm | नितिन थत्ते

नेटवर लेख उपलब्ध असेल तर त्याचा दुवा येथे देऊ शकाल.

खराटा
(रंग माझा वेगळा)

अभिरत भिरभि-या's picture

13 Jun 2009 - 12:32 pm | अभिरत भिरभि-या

किंवा सारांश थोडक्यात येथे ही मांडता येईल

सुधीर काळे's picture

13 Jun 2009 - 3:35 pm | सुधीर काळे

माझा लेखच एका ३००-पानी पुस्तकाचा सारांश आहे, त्याचा सारांश दिल्यास सगळीच गोडी जाईल. पण एका सदस्याने लिप्यांतर करण्याची तयारी दर्शविली आहे. तसे झाले तर तो लेख इथे उपलब्ध होईल. तरी जरा वाट पहाण्याबद्दल विनंती.