उन्हात लखलखणारे झुंबर
मनात वसलेला गुलमोहर
नजर खिळवुनी जिकडेतिकडे
नजरबंदिचा खेळ खेळतो
लाल तांबडे शेले उडवित
हिरव्या छायेतुन सळसळतो
गारुड याचे चराचरावर
कधि पानांच्या पडद्याआडुन
हळूच हसतो लाल तजेला
कधि तेजाचे पलिते घेउन
फुलांनीच हा रसरसलेला
वैशाखाचा घुमवित जागर
घरी, अंगणी, वाटेवरती
कुठे माळरानी एकांती
तप्त उन्हाच्या काहिलीतही
मोहरलेली याची कांती
पायांखाली कुंकुम-केशर
प्रतिक्रिया
1 Jun 2009 - 8:44 am | पाषाणभेद
"लाल तांबडे शेले उडवित"
"हळूच हसतो लाल तजेला
कधि तेजाचे पलिते घेउन"
"मोहरलेली याची कांती
पायांखाली कुंकुम-केशर"
आजची सकाळ चांगली आहे. माझ्या ऑफिसातुन समोरचा गुलमोहर पाहत ही कविता वाचली. आनंद वाटला.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
1 Jun 2009 - 8:47 am | विनायक प्रभू
मोलाची कविता
1 Jun 2009 - 8:48 am | प्राजु
क्रान्ती..
सुंदर आहे कविता.
गुलमोहोराची विविधरूपं खूपच खुलवली आहेस..
मस्तच!
वैशाखाचा घुमवित जागर
आणि
मोहरलेली याची कांती
पायांखाली कुंकुम-केशर
तुफान आहेत या ओळी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Jun 2009 - 9:31 am | जयवी
अहाहा !!
फार फार सुरेख !! गुलमोहराचं लाल भडक झाड अगदी नजरेसमोर आलं गं !!
तप्त उन्हाच्या काहिलीतही
मोहरलेली याची कांती
पायांखाली कुंकुम-केशर अप्रतिम !!
1 Jun 2009 - 11:15 am | मनीषा
वा ! सुरेख कविता
उन्हात लखलखणारे झुंबर
मनात वसलेला गुलमोहर
.... सुंदर
1 Jun 2009 - 11:18 am | जागु
छान. गुलमोहराच दर्शन घडवलस.
1 Jun 2009 - 12:13 pm | ऋषिकेश
वाह! गुलमोहर हे माझ्या आवडत्या झाडांपैकी एक.. साकुरा जितका आवडतो तितकाच (किंबहुना काकणभर अधिकच) मला फुललेला गुलमोहर भुरळ घालतो.
आणि या सुंदर गुलमोहराचे रुप तुम्हि कवितेते इतके सशक्तपणे मांडलंय की वाह! क्या बात है !!!
खुप खुप खुप आवडली कविता
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
1 Jun 2009 - 4:54 pm | अनामिक
हेच म्हणतो.
खूप खूप आवडली कविता.
ऋषिकेश, तुम्ही टाकलेला फोटोही अप्रतिम!
-अनामिक
1 Jun 2009 - 12:17 pm | परिकथेतील राजकुमार
वाह ! मस्तच कविता, खुप खुप आवडली.
झाडा आणी फुलांची फक्त वर्णने वाचायची नशिबात आहे सध्या. जाता येता दिसणारे एकमेव झाड म्हणजे तुळस.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
1 Jun 2009 - 12:40 pm | दत्ता काळे
घरी, अंगणी, वाटेवरती
कुठे माळरानी एकांती
तप्त उन्हाच्या काहिलीतही
मोहरलेली याची कांती
पायांखाली कुंकुम-केशर
- हे कडवं फार छान जमलंय.
मी पण एक गुलमोहोरावर कविता केली आहे, ती अजून टाकली नाही आणि आता टाकणारही नाही. कारण हि कविता त्यापेक्षा जास्त छान झालीये.
माझ्या कवितेमध्ये नदीकाठच्या उतारावर असलेल्या एका कलंदर गुलमोहोराबरोबर झालेले कल्पनेतले संभाषण काव्यस्वरूपात मांडलेले आहे.
1 Jun 2009 - 3:50 pm | क्रान्ति
तुमची कविता अवश्य टाका. नक्कीच छान असणार आहे ती. आणि वेगळ्या स्वरूपातली. मला वाचायला आवडेल.
:) क्रान्ति
क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो?
गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं|
अग्निसखा
1 Jun 2009 - 12:52 pm | निखिल देशपांडे
गुलमोहर....... कविता वाचुन डोळ्या स्मोर उभा राहिला..
कालच घरासमोर अर्ध्यापाउण तास निवांत गुलमोहराच्या झाडा कडे आणी त्या रस्त्याकडे डोळे लावुन बसलो होतो.
घरी, अंगणी, वाटेवरती
कुठे माळरानी एकांती
तप्त उन्हाच्या काहिलीतही
मोहरलेली याची कांती
पायांखाली कुंकुम-केशर
ह्या गुलमोहराकडे वेड्यासारखे पहाण्यामुळे एकदा मास्तराने कॉलेज मधुन हाकलुन दिले होते ते पण आठवले.
==(गुलमोहर मधे रहाणारा )निखिल
1 Jun 2009 - 8:35 pm | चन्द्रशेखर गोखले
एक सुंदर काव्य रचना वाचल्याचा आनंद मिळाला !!
2 Jun 2009 - 11:20 am | प्रेरणा
गुलमोहोराशी माझे खुप सलगीचे नाते आहे. गावाकडच्या घरातील खिड्कीतुन अख्खा फुलापनांचा घोस कवेत घ्यायाला येतो. तित्कीच जवळ्ची वाटली कवीता. जपुन ठेवीन.
- प्रेरणा.
2 Jun 2009 - 2:27 pm | मराठमोळा
छान. मस्तच आहे. :)
बिचार्या गुलमोहराच्या फुलांना तेवढी किंमत मिळत नाही, तुमची कविता त्याच्यासाठी अप्रतिम भेटच की.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
2 Jun 2009 - 8:02 pm | नाना बेरके
गुलमोहोर - गुलछबू झाड. हा वृक्ष अफगाणिस्थानातून भारतात आला म्हणे.