संत - कुसुमाग्रज (एक विलक्षण अनुभव)

मानस's picture
मानस in जनातलं, मनातलं
12 Feb 2008 - 3:52 am

रसिक मिसळपावकरांनो,

ही कविता मी "महामानवाला प्रणाम!" ह्या अंतर्गत प्रतिक्रिया म्हणुन दिली होती. एका वरिष्ठ मित्राच्या बर्‍याच आग्रहामुळे येथे पुन्हा देत आहे. थोडे फार फेरबदल (जसे आठवले, तसे) केले आहेत. माझे मित्र श्री. भाऊ मराठे ही कविता अतिशय सुंदर सादर करतात. बाबांच्या निर्वाणाची बातमी वाचली, तेव्हा ह्या कवितेची खूप आठवण झाली आणि म्हणुनच हा सगळा अट्टाहास.

काही वर्षांपुर्वी (खूप वर्षांपुर्वी) कुसुमाग़्रजांनी नाशिकमध्ये श्री. बाबा आमटे ह्यांचा सत्कार घडवून आणला होता. तेव्हा भाषणा ऐवजी त्यांनी "संत" ही कविता सादर केली होती.

"संत" - कुसुमाग्रज

“साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा”

आज आहे महोत्सव माझ्या शब्दांचा उसासले आहेत माझ्या निरर्थक नभावर
सहस्त्रावधी वारकरी नेत्र तुला पाहण्यासाठी
माझ्या घराच्या एकलकोंड्या कौलारावर बसले आहेत निळ्या पाखरांचे थवे
तुझ्या वाटेवरची धूळ आपल्या पंखांवर वाहण्यासाठी.

आकाशाचं मन कळत नाही वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय
प्रकाशाच्या देवळात शिरता येत नाही दिवा होऊन भक्त झाल्याशिवाय
म्हणून थोडं वारेपण - थोडं दिवेपण -
उचललं आहे माझ्या जिराईत अक्षरांनी तुझ्याच मेघशील जीवनातून
तुझ्याच स्वागताच्या कमानीवर तोरण बांधण्यासाठी.

लोहाराच्या भट्टीतील एखादी कलंदर ठिणगी झेप घेते आकाशात हरवलेपणानं
काळाच्या परमाणूत का होईना पण बारीकसा सूर्य होण्यासाठी
क्षणभर दिमाखानं जळण्यासाठी नंतर अनंत काल संकोचाशिवाय विझण्यासाठी.
तसंच आहे माझ्या शब्दांचं ह्या क्षणाला माखलेलं हे मोठेपण.

तसं पाहिलं तर कोण तू आणि कोण मी?
कोसांच्या नव्हे तर जगांच्या अंतराने विभागलेले दोन अनोळखी प्रवासी.
आणि तरीही - माझ्या सभोवारच्या चिरेबंद काळोखाला
जातात केव्हा तरी तडे आणि त्यातून पाहतो मी स्तंभित होऊन
स्वप्नात वितळलेल्या माणसाप्रमाणे तुझ्या प्रकाशमय विश्वातील
काही अग्नि-रेषा.

अशाच शंभर आभासात पहाट रात्रीच्या नि:शब्दातून
मी पाहिले आहे तुझे शिल्पचित्र तीनशे मैलांवरूनही.
सोमनाथच्या सूर्यद्रोही जंगलात पृथ्वीच्या गर्भात पाय खोचणार्या विराट वृक्षावर
अपराजित कुर्‍हाड मारणारा तू
सर्जन डॉक्टरांच्या सभागृहात डोंगराच्या सुळक्यासारखा उभा राहून
माझ्या देहात महारोगाची लस घाला म्हणून आव्हान फेकणारा तू -
श्वापदांच्या समूहात सिंहाचा स्वर होणारा सर्पांच्या प्रदेशात गरुडाचं घर होणारा
वणव्याच्या समोर घनघोर पाऊस होणारा दु:खाच्या समोर फक्त निर्भेळ माणूस होणारा
दुबळ्या दयेच्या चिखलातून माणुसकीला बाहेर काढणारा तू -
पृथ्वीवरच्या व्यवहारात ईश्वराचा हात माणसांपर्यंत पोचवणारा तू –

अरे आम्ही आहोत असे करंटे की आमच्या पेठेत लागतात पताका
फक्त मंत्री आले तर -

सोनेरी अंबारीचे ऐरावत जेव्हा झुलू लागतात रस्त्यावर
तेव्हा आमचे लाचार हिशेबी हात जुळून येतात छातीवर -
आमच्या गळ्यातले कोमल गांधार जातात निषादाच्या तीव्र पट्टीवर
त्याचा जयजयकार करण्याकरता.

आणि तुझ्यासारखे संत ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार
निघून जातात गस्त घालीत अंधारात,
उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून आसवांच्या दलदलीतून
दु:खानं उसवलेल्या दुनियेवर अमृताचं सिंचन करीत.

आणि

दोन शतकं गेल्यानंतर शोधू लागतो आम्ही वाळवंटावर
तुमच्या पायखुणा,
आम्ही होतो मशालजी आणि टाळकरी तुमच्या मखमली पालख्यांचे
तुमच्या मेलेल्या मतांचे,
आम्ही होतो मतवाले शूर शिपाई संरक्षण करण्यासाठी
मातीत मिसळलेल्या तुमच्या प्रेतांचे.

हे महामानवा,

आम्ही देणार आहोत तुला फक्त फावल्या वेळातला नमस्कार -
एखादा गुच्छ एखादा हार -
तीस पायांवर सरपटणार्‍या कॅलेंडरातील एखादा शनिवार, रिकामा रविवार.

पण तरीही -

त्यातल्याच एका साक्षात्कारी क्षणाला आम्हाला कळतं -
आज सारा संसार उभा आहे क्रांतीच्या दाराशी
जुने पडते आहे नवे घडते आहे
काळाच्या स्मशानातून उठलेली भुतावळ
जमिनीवरती जटा आपटीत रडते आहे रक्तबंबाळ होऊन.

मातीतून उठत आहेत गर्जना करीत लक्षावधी प्रचंड आकार
पोलादाच्या कारखान्यातील जळत्या राक्षसी तुळयांसारखे
तांबडेलाल, काही तोडण्यासाठी काही जोडण्यासाठी.

या ऐतिहासिक हलकल्लोळात सनातन आणि अजिंक्य आहे
ते फक्त तुझ्यासारख्याचं हात उभारून काळाच्या किनार्‍यावरुन धावणारं
संग्रामशील माणूसपण.

'' तुम्ही जाता तुमच्या गावा अमुचा रामराम घ्यावा.''

हे यात्रिका,

विस्कटलेल्या शरीरांचा चुरगळलेल्या आत्म्यांचा जथा घेऊन
तू तुझ्या मार्गानं जा मागे वळून पाहू नकोस
जो हिशेब कधी केला नव्हतास तो यापुढेही कधी करू नकोस.
तुला साथसोबत आम्ही करणार नाही
आमच्या दिवाणखानी दिव्यांचा प्रकाश तुझ्या रात्रीवर पडणार नाही
तुझ्या अलौकिक वेदनेसाठी आम्ही रडणार नाही
आमच्या जयघोषांच्या जमावातही तू राहणार आहेस एकटा
दक्षिण ध्रुवावरील बर्फासारखा अगदी एकटा.

पण असेच एकाकीपण लाभले होते ख्रिस्ताला
ज्याच्या हाताचा ठसा मला दिसतो आहे तुझ्या हातावर
असेच एकाकीपण लाभले होते बुद्धाला
ज्याच्या प्रज्ञेचे किरण मला दिसताहेत तुझ्या पथावर

हीच तुझी सोबत आणि हेच तुझे संरक्षण...

'' जेथे जाशी तेथे - तो तुझा सांगाती
चालवील हाती - धरोनिया.''

कवितासद्भावना

प्रतिक्रिया

नंदन's picture

12 Feb 2008 - 4:52 am | नंदन

कविता. येथे दिल्याबद्दल अनेक आभार.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

ऋषिकेश's picture

12 Feb 2008 - 5:53 am | ऋषिकेश

ही कविता इथे दिल्याबद्दल धन्यु!

-ऋषिकेश

सर्किट's picture

12 Feb 2008 - 8:05 am | सर्किट (not verified)

आणि ह्या शिरवाडकरांना मुक्तांगणात मित्रमेळाव्याला दिलेले आमंत्रण त्यांनी काहीतरी क्षुल्लक कारणे देऊन नाकारले होते.

बाबांविषयी कविता कुणीही लिहू शकतो. मीही साहित्य संमेलनात बाबांवरच्या कवितेवर टाळ्या मिळवलेल्या आहेत.

त्यांनी आनंदवनासाठी काय केलंय ते बोला ! कधी एकातरी महारोग्यची झडलेली बोटे हातात धरून दिलासा दिला आहे ?

- सर्किट

मुक्तसुनीत's picture

12 Feb 2008 - 8:30 am | मुक्तसुनीत
सर्किट's picture

12 Feb 2008 - 8:35 am | सर्किट (not verified)

उत्तरे स्वतंत्र लोकांकडून मिळाली असती तर अधिक विश्वासार्ह ठरली असती. माझे बाबांच्या जवळिकीतून आरोप, आणि शिरवाडकरांच्या प्रतिश्ठानाकडून मिळालेली "तथ्ये". जरा तिसर्‍या बाजूने संशोधन हवे. नाही का ?

- सर्किट

मुक्तसुनीत's picture

12 Feb 2008 - 9:02 am | मुक्तसुनीत

मी दिलेली उत्तरे मला आंतरजालावरून मिळाली तशी दिली. त्याचा मथळाच "काही उत्तरे" असा होता. हा वकिली युक्तिवाद नव्हे. (तसे करायला जाणे म्हणजे कुसुमाग्रजांकरता थोडे कमीपणाचे ठरेल.) असो.

सर्किट's picture

12 Feb 2008 - 9:28 am | सर्किट (not verified)

शिरवाडकर हा मोठा माणूस..

बाबा हा देखील मोठा माणूस..

माझ्यासारख्या लहान व्यक्तीने असे आरोप करणे चुकीचे आहे..

पण मोठी माणसे इतर मोठ्या माणसांचे वागणे समजून घेतात..

माझ्यासारखे लहान लोकच अशा छोट्या छोट्या गोष्टी मनात ठसवून घेऊन त्यांचे अवडंबर करतात..

माफ करा..

- सर्किट

विसोबा खेचर's picture

12 Feb 2008 - 10:25 am | विसोबा खेचर

आणि ह्या शिरवाडकरांना मुक्तांगणात मित्रमेळाव्याला दिलेले आमंत्रण त्यांनी काहीतरी क्षुल्लक कारणे देऊन नाकारले होते.

May be!

बाबांविषयी कविता कुणीही लिहू शकतो.

???

माझ्या देहात महारोगाची लस घाला म्हणून आव्हान फेकणारा तू -
श्वापदांच्या समूहात सिंहाचा स्वर होणारा सर्पांच्या प्रदेशात गरुडाचं घर होणारा
वणव्याच्या समोर घनघोर पाऊस होणारा दु:खाच्या समोर फक्त निर्भेळ माणूस होणारा
दुबळ्या दयेच्या चिखलातून माणुसकीला बाहेर काढणारा तू -
पृथ्वीवरच्या व्यवहारात ईश्वराचा हात माणसांपर्यंत पोचवणारा तू –

आणि तुझ्यासारखे संत ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार
निघून जातात गस्त घालीत अंधारात,
उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून आसवांच्या दलदलीतून
दु:खानं उसवलेल्या दुनियेवर अमृताचं सिंचन करीत.

!!!

बाबांविषयी अशी कविता कुणीही लिहू शकतो??

May be...!! :)

मीही साहित्य संमेलनात बाबांवरच्या कवितेवर टाळ्या मिळवलेल्या आहेत.

आपलीही कविता वाचायला आवडेल!

त्यांनी आनंदवनासाठी काय केलंय ते बोला ! कधी एकातरी महारोग्यची झडलेली बोटे हातात धरून दिलासा दिला आहे ?

प्रत्येकालाच या गोष्टी जमतात असे नव्हे! पण म्हणून काय कुसुमाग्रंजांसारखा कुणी असा एकदम असा नाकाम, नाकर्ता ठरत नाही!

असो, सर्कीटराव आपल्या प्रतिसादातून कुसुमांग्रजांविषयी विनाकारण कडवटपणा जाणवतो आहे, नव्हे अनादरही जाणवतो आहे त्याचा मी निषेध करतो!

आपला,
(कुसुमाग्रजप्रेमी!) तात्या.

सर्किट's picture

12 Feb 2008 - 11:15 am | सर्किट (not verified)

प्रत्येकाालाच या गोष्टी जमतात असे नव्हे! पण म्हणून काय कुसुमाग्रंजांसारखा कुणी असा एकदम असा नाकाम, नाकर्ता ठरत नाही!

अगदी बरोबर अहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमतेच असे नाही.

शिरवाडकरांचा मीही चाहता अहे, त्यांच्या काव्याच्या गोडीत मीही अशा छोट्या छोट्या बाबी जमेस धरत नाही..

अणि समजा धरल्यात तरी, त्यामुळे त्यांचे कवीत्व कमी होत नाही.

ते कवी म्हणून श्रेष्ठच राहतात.

असो.

- (कुसुमाग्रजांचा चाहता) सर्किट

सर्किट's picture

12 Feb 2008 - 11:17 am | सर्किट (not verified)

द्विरुक्तीबद्दल क्षमस्व.
प्रकाटाआ.

- सर्किट

सर्किट's picture

12 Feb 2008 - 11:36 am | सर्किट (not verified)

कडवटपणा आहे, नक्कीच...

पण कुसुमाग्रज, एक कवी, ह्यांच्याबदलचे प्रेम त्यामुळे कणानेही कमी होत नाही..

आजवर काय थोड्या कवी, लेखकांनी आपापल्या तुंबड्या भरल्या आहेत, बोटावर मोजण्याइतक्या समाजसेवकांविषयी लिहून ?

मुळात बाबा आणि शिरवाडकरांचे विचार जुळले होते. दोघेही नास्तिक, पण आस्तिकतेचा पगडा कधीही गेला नाही..

मर्यादा पुरुषोत्तम रामाला बाबांनी "मर्यादित पुरुषोत्तम" केले.. शिरवाडकरांना ते नकीच भावले असणार..

- सर्किट

विसोबा खेचर's picture

12 Feb 2008 - 8:19 am | विसोबा खेचर

मानसराव,

कुसुमाग्रजांची कविता इथे स्वतंत्ररित्या दिल्याबद्दल आभार...

माझे मित्र श्री. भाऊ मराठे ही कविता अतिशय सुंदर सादर करतात.

सहमत आहे. कविता, खास करून कुसुमाग्रजांच्या कविता भाऊ अतिशय सुरेख सादर करतात!

तात्या.

प्राजु's picture

12 Feb 2008 - 8:35 am | प्राजु

इथे दिल्या बद्दल धन्यवाद.

- प्राजु

मानस's picture

12 Feb 2008 - 9:57 am | मानस

सगळ्यांचे मन:पूर्वक आभार.

सर्किटराव

मला कोणी काय केलं, किंवा काय केलं नाही ह्या बद्दल काही म्हणायचे नाही. कुसुमाग्रज ह्यांच्या विषयी काही बोलायची माझी तरी लायकी नाही.

ही कविता देण्यामागे फक्त 'सद्भावना' एवढीच एक इच्छा होती. कुसुमाग्रजांच्या शब्दांची ताकद आणि त्यांचा बाबांवरचा आदर या कवितेत स्पष्ट दिसून येतो.

बाबांच्या निधनाची बातमी वाचल्यावर सर्व प्रथम मला हीच कविता आठवली, हे माझं दुर्भाग्य!!

दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, असे मनापासुन वाटणार्‍या दोन महान व्यक्ती, एक बाबा व दुसरे कुसुमाग्रज

हा विषय मी इथेच संपवत आहे.

धन्यवाद

सर्किट's picture

12 Feb 2008 - 10:12 am | सर्किट (not verified)

मोठ्या लोकांचे मोठे विचारच आपण आजवर लक्षात ठेवत आलो आहोत..

आणि तेच योग्य आहे..

कुसुमाग्रज मोठेच आहेत..

माझ्यासारख्या लहानांनी कितीही अकांडतांडव केले, तरी काय फरक पडतो..

आम्ही लहान लोक फक्त छोट्या छोट्या गोष्टींना महत्व देऊन आपल्या छोट्या विचारांना पुढे आणतो झाले..

बाबा गेल्यावर त्यांच्या विषयीच्या मोठ्या मोठ्या लोकांनी व्यक्त केलेल्या (तेही मटा सारख्या महान दैनिकात) विचारांना आम्ही आमच्या तथ्याने काय बाधा आणणार आहोत ?

छे..

पण तरीही.. केचे, पुलं, कुसुमाग्रज, ह्या सगळ्यांनी बाबांच्या कार्याविषयी इतके सुंदर लिहून ठेवले आहे, की त्यांनी प्रत्यक्ष आनंदवनकडे पाठ फिरवली हे नगण्य..

- सर्किट