चानी (च्यानी नव्हे चानी चांगल्यातला चा )

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
28 May 2009 - 8:36 am

कोकणात खारीला-squirrel-चानी म्हणतात.हा तोंडाकडून उंदरासारखा दिसणारा प्राणी पूरा पाहिल्यास फारच मोहक वाटतो.पूर्वी परदेशात मोठ्या चान्यांच्या कातड्याच्या श्रीमंत स्त्रीया पर्स म्हणून वापरायच्या.प्रभू रामचंद्रांच्या लंकेपर्यंत सेतू बांधण्याच्या प्रयासात चानीचा वाटा होता.समुद्राच्या पाण्यात अंग भिजवून मग किनार्‍यावरच्या वाळूत लडबडून झाल्यावर अंगावरची वाळू पुलावर टाकायला मदत केल्याच्या प्रयत्नाबद्दल भावूक होऊन प्रभू रामचंद्रानी प्रेमाने तिच्या पाठिवरून बोटं फिरवली. तिच ती बोटं तिच्या पाठिवर दिसतात अशी आख्यायीका आहे."चानी" नावाची कादंबरी चिं.त्र्य.खानोलकरानी लिहिली आहे.त्यानंतर राजकमल कला मंदिरचा "चानी" म्हणून चित्रपट व्ही.शांताराम यानी ह्याच कादंबरीच्या आधारावर काढला होता. कोकणातल्या धामापूर ह्या गावात त्या चित्रपटाचं बरचसं चित्रीकरण झालं होतं.

हे सर्व एव्हड्यासाठी आठवलं की आमच्या कोकणातल्या घरातल्या मागच्या पोरसात चान्या खूपच दिसतात.ह्या चान्या ज्यावेळी काहीही कुरतडत असतात त्यावेळी मला अगदी वैताग येतो. ज्यावेळी घराच्या अगदी जवळ येऊन त्यांचे इवलुशे पाय एखाद्या वस्तूवर खरड खरड खरडतात त्यावेळी मला कशावरही ध्यान देता येत नाही.एव्हडा तो आवाज मला एकाग्र राहू देत नाही.परंतु,मी हे सर्व निभावून नेत असे कारण मी ह्या जगात काही एकटाच रहायला आलेला नव्हतो. एखादा लहानसा खडा तिच्या अंगावरून फेकून ओरडायचो,
"जा चालते व्हा इथून".
पण माझ्याकडे त्यांच लक्ष कुठे असायचं. खारी,मांजरं उंदीर माझे सहचर किंवा साथी आहेत असं मला वाटायचं.
रोज सक्काळी मी कोकणातल्या रानातून फिरायला जायचो.चालताना,पाया खाली सुकलेला पाचोळा चूरचूर करीत असायचा. जांभळांची उंच झाडं,रातांब्याची झाडं-त्यावरच्या लालबूंद फळापासून कोकम करतात- तसंच केवड्याची बनं, औदुंबराची, वडाची, पिंपळाची मोठ मोठी झाडं गर्द रानाची आठवण करून द्यायची.

जवळपासची ओली दलदलीत जमीन,आणि मधून मधून येणारे मातीचे उंचवटे कित्येक वर्षापासून होणार्‍या स्तित्यंतराची आठवण करून द्यायची.रानटी गवताच्या कडेकडेने जाताना ओबडधोबड दगडांच्या राशीत रचून ठेवल्यासारखे दिसणारे पण नैसर्गिकरीत्या तयार झालेली संथ झर्‍याची वाट शेवटी उतारावर येणार्‍या मोठ्या डबक्यात जाऊन संपते ते पाहून निसर्गसुद्धा त्यानेच केलेले नियम तोडत नाही हे लक्षात यायचं. मी ह्याच झर्‍य़ाचं दोन ओंजळी स्पटिकासारखं स्वच्छ पाणी तहान भागवण्यसाठी पित असे.पण आता इथे वस्ती वाढत असल्याने पूर्वीचं वातावरण राहिलं नाही.पाणी दुषीत झालं असावं उगाचच वाटतं.
उजाडत आहे हे चारी बाजूच्या पिवळ्या किरणांनी झाडांच्या फांद्या फांद्यातून शिरकाव करून जमिनीवरचा रंग पिवळा केल्याने ध्यानात यायचं.पुढे गेल्यावर त्या सूर्यनारायणाचं दर्शन झाल्यावर मन अगदी प्रसन्न व्हायचं.सूर्य हे जीवन आहे असं कुणी म्हटलं ते खोटं नाही.

रात्री कधी तरी पाऊस पडून गेला असायचा.पाऊस कसला एखादी सर येऊन गेली असावी.कारण झाडा झुडपावरची पानं आणि फुलं ओली झालेली दिसायची.
मला आठवतं ऐन पावसाळ्यात मी ह्या ठिकाणी उभापण राहू शकत नव्हतो.चालायचं झालं तर चिखलातून फार कष्टाने पावलं टाकावी लागायची.वरून पावसाचे मोठाले थेंब उंच झाडांच्या पानात जमून खाली पडताना कुणी मुद्दाम अंगावर पाणी शिंपडीत असावं असं वाटायचं.जमलेल्या पाण्याच्या पाणवाटा आणि हवेतल्या प्राणवायुमुळे बनलेले बुडबुडे आपोआप बनायचे आणि फुटून पण जायचे.
कोकणातला पाऊस! तो पडून गेल्यावर धबधब्या सारखा पूर आणायचा.हे सर्व पाणी जातं कुठे म्हणून अचंबा वाटून शोध लावला तर दिसून येईल ह्या लहान लहान पाणवाटांचे झरे व्हायचे,हे झरे डबक्यांत ओतले जाऊन ती डबकी पूर्ण भरल्यावर ओतून जायची,आणि ती लबालब भरलेली डबकी दिसेनाशी होऊन त्यातून छोट्या तलावात रुपांतरीत व्हायची. आणि ते तलाव भरभरून नाले बनायचे. ह्याच नाल्यांची नदी बनून शेवट समुद्रात मिसळून जायची.आणि तो समुद्र इथून पाच पन्नास मैलावर दिसायचा.ह्या रानात पडलेल्या पावसाच्या थेंबांचा प्रवास अशा तर्‍हेने शेकडो मैलांचा व्हायचा.

कधी कधी एखादा लहानसा नाला ओलांडून जायचं झाल्यास कंबरभर पाणी असायचं.नाल्यात आत शिरताना चिखल आणि बाहेर पडतानाही चिखल असायचा.जरा पाणी जमा झालं की कोकणातली जमीन चिखलात रुपांतरीत होते.मग त्या चिखलात बेडूक,गोडे मासे आणि आजुबाजूला डांस उत्पन्न व्हायचे.एका हातात काठी असेल आणि दुसर्‍या हातात केवड्याचं फूल असेल तर ह्या डांसांचा उपद्र्व आणि गुणगुणणं चुकवायला दोन्ही हाताचा खांद्या कडचा भाग कानाजवळ उंचावून उपयोगात आणल्या शिवाय गत्यंतर नसायचं.
हे चिखलातले बेडूक हळू हळू चिखलातून बाहेर पडून झाडावर राहायला जायचे.माझ्या पायाच्या अंगठ्यापेक्षा मोठे नसलेले हे प्राणी ओरडायला लागले की माझ्या कानाचे पडदे एव्हडे कंप पावायचे की असलं संगीत कुठेही न ऐकल्याचं आठवायचं.
हे सर्व प्राणी त्याशिवाय सरपटणारे बुरयाटे-मास्यांचाच प्रकार- काही जंगली बदकं असल्या ह्या क्वचीतच दिसणर्‍या प्राण्यामधे मला मी हजर असलेला पाहून माझी मलाच गंमत वाटायची.
मला आठवतं मी इकडे केवळ कुतूहल म्हणूनच येत नव्हतो.किंवा मनोरंजन होण्यासाठी येत नव्हतो.इथे आल्यावर मला वाटायचं की मी पण ह्यांच्यातला एक प्राणीच आहे.निसर्गाची नाडी मला भासायची.ह्या कबिराच्या विणलेल्या शेल्यामधे मी एखादा टाकां असावा.
ह्या रानातून मी रोजच फेरफटका मारायचो.ते किटक,ते प्राणी,तो पाऊस ती झाडं,त्यांच्या सानिध्यात झाडांच्या पानावरची ओली माती माझ्या कपड्यांना लागायची. कधी कधी मी घसरून चिखलात पडायचो.त्या चिखलात कुजून गाडलेली जूनी पानं,मेलेले बेडूक जवळून पहायला मिळायचे.पहाटेचा काळोख संपून उजाडल्यावर हे निसर्गाचं मंदिर उजाळून यायचं.

जेव्हड्या निसंदेहाने मला हवेतून श्वास घ्यावा लागायचा,तहानेसाठी पाणी प्यावं लागायचं,भूकेसाठी खावं लागयचं तेव्हडंच मला वाटायचं की निसर्गाचा ह्या धरतीचा,पाण्याचा,आगीचा,हवेचा मी एक अंश आहे. म्हणूनच मी रोज पहाटे उठून ह्या रानातून फेरफटका मारायचो.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

कपिल काळे's picture

28 May 2009 - 9:44 am | कपिल काळे

<<एका हातात काठी असेल आणि दुसर्‍या हातात केवड्याचं फूल असेल तर ह्या डांसांचा उपद्र्व आणि गुणगुणणं चुकवायला दोन्ही हाताचा खांद्या कडचा भाग कानाजवळ उंचावून उपयोगात आणल्या शिवाय गत्यंतर नसायचं.>>

सही, किती बारीक निरिक्षण आहे तुमचं. लेख तर मस्तच. वाचताना मी नकळत माझ्या लहानपणीच्या आठवणींमध्ये ओढला गेलो, कोकणातल्या घरी जाउन पोचलो.

मदनबाण's picture

29 May 2009 - 1:31 am | मदनबाण

खारीला चानी हे नाव आहे हे माहित नव्हतं...
आमच्या घरी स्वयंपाक घरात बर्‍याच वेळा खार येत असे...मग तिच्यासाठी मी बर्‍याच वेळा एखादा फळाचा तुकडा किंवा बिस्कीटाचा तुकडा एका को पर्‍यात ठेवुन देत असे,,,खारीची पिल्ल (तिच्या घरट्यासकट) मी पाहिली आहेत्...त्या घरट्यात पिल्लांना मऊ वाटावे म्हणुन तिने शेवरीचा कापुस निट लावुन ठेवला होता...आता सिमेंटची घरे वाढल्या पासुन खारींची संख्या मात्र रोडावली आहे!!!

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

क्रान्ति's picture

29 May 2009 - 8:57 am | क्रान्ति

लेख आवडला सामंतकाका. माझ्या समोरच्या गुलमोहरावर आणि औदुंबरावर तुरूतुरू धावत येणा-या खारुलीला पाहून मला लग्नातल्या करवलीचीच आठवण होते, काम काहीच नाही, नुसतंच इकडून तिकडे लगबग लगबग मिरवत रहायचं. कशाची इतकी घाई अस्ते तिला देव जाणे! औदुंबराची फळं खाताखाता मध्येच काहीतरी आठवल्यासारखं करून धावत सुटते! माझी सकाळ या चिमुकल्या मैत्रिणीचे खेळ पहाण्यात कशी जाते, कळत नाही!
:) क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा