संडे स्पेशल ( व्हेज लसाने)

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in पाककृती
10 Feb 2008 - 8:36 pm

हा एक इटालियन पदार्थ (पास्ता प्रकारात मोडणारा) आहे.

साहित्यः
लसाने :८ रेडीमेड लसाने शीट्स.( ३ इंच बाय ६ इंच)
पालकः२० पाने देठ काढून ब्लांच करणे नंतर पाणी काढून टाकणे.
चीजः ५० ग्रॅम चेडर चीज (ब्रिटानिया)
५० ग्रॅम मोझारीला (अमुल)

टोमॅटो सॉसः
३टे.स्पून तेल (किंवा ऑलिव्ह ऑइल)
१ ढोबळी मिरची बारीक चिरलेली
१/२ किलो टोमॅटो (ब्लांच करुन , साल काढून बारीक चिरलेले)
१/२ टी.स्पून ओरेगानो (वाळलेले चालेल)
१/२ टी.स्पून काळी मिरी पावडर ( ताजी)
२टे.स्पून टोमॅटो प्युरी
१ टी.स्पून साखर
१/४ कप कोथिंबीर (किंवा बासिल)
मीठ चवीनुसार

व्हाईटसॉसः
३ टे.स्पून बटर
३ टे.स्पून मैदा
२चिमूट जायफळ पूड (नसले तरी चालते)
१/२ टी.स्पून काळी मिरी पावडर
२कप दुध
मीठ चवीनुसार

१.प्रथम टोमॅटो सॉस साठी एका कढईत तेल घालून त्यात ढोबळी मिरची घालून २-३ मि.परतवणे.
२.त्यात चिरलेले टोमॅटो, ओरेगानो, काळी मिरी पावडर, टोमॅटो प्युरी, मीठ, साखर आणि कोथिंबीर घालून परतवणे आणि उकळी आणणे. एक उकळी आली कि गॅस बारीक करून घाकण न ठेवता १५ मि.शिजवणे किंवा ग्रेव्ही दाट झाली कि गॅस बंद करणे.
३ व्हाईट सॉस करण्यासाठी एका पॅन मध्ये बटर घेऊन मंद गॅस वर मैदा, जायफळ पावडर, काळी मिरी पावडर आणि मीठ घालून १/२ मि परतवणे.
गॅस वरून पॅन काढणे त्यात हळुहळु कोमट दुध घालणे व सतत ढवळणे म्हणजे गाठी होणार नाहीत. परत मंद गॅस वर ठेऊन ५ मि उकळायला ठेवणे.कस्टर्ड सारखे दाट झाले कि गॅस वरून काढणे.
४ .दोन्ही चीज खिसून मिक्स करणे.
५.बेकींग डिश मध्ये तळाला १/२ तयार केलेला टोमॅटो सॉस पसरणे.
६.२ पास्ता शिट्स साईड बाय साईड सॉस वर ठेवणे.
७. पास्ता शिट्स वर १/३ व्हाईट सॉस पसरणे.
८.परत पास्त्त शिट्स ठेवणे.
९.त्यावर ब्लांच केलेला पालक पसरणे.त्यावर १/२ किसलेले चीज टाकणे.
१०.त्यावर पास्ता शिट्स ठेवणे. त्यावर टॉमॅटो सॉस पसरणे.
११.शेवटची पास्ता शिट्स ठेऊन त्यावर उरलेला व्हाईट सॉस घालणे व त्यावर उरलेले चीज पसरणे. अल्युमिनिअम फॉईल ने कव्हर करणे.
१२.प्रिहीटेड ओव्हन मध्ये १८० डिग्री ला २५- ३० मि. ठेवणे किंवा स्लाईटली गोल्डन ब्राऊन झाले ओव्हन बंद करणे.

टिप: सर्व्ह करायच्या अगोदर १ तास करून ठेवले तरी चालते.
सर्व्ह करताना फॉईल लावून रीहीट करणे व चौकोनी आकारात कापून देणे.

पाकक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

10 Feb 2008 - 9:59 pm | पिवळा डांबिस

हे आकाशातील बापा!
तुझ्या या शाकाहारी कोकरांना क्षमा कर!
आपण काय 'मिस' करतो आहोत त्याची त्यांना कल्पना नाही!!! :)

माझा शाकाहारी जेवणावर राग नाही. शेंगदाणे घातलेल्या आणि लसणाची फोडणी दिलेल्या पालकाच्या पातळभाजीवरून आपण जीव ओवाळून टाकतो.
पण म्हणून पालकाचा लझान्या? कमीतकमी तळलेला टोफू तरी वापरायचा!! :)

स्वातीजी, नेहमी सेन्चूरी काढाणारया तुम्ही, आज काय हो झालं तुम्हांला? :)))

चवचिकित्सक
पिवळा डांबिस

प्राजु's picture

10 Feb 2008 - 10:07 pm | प्राजु

डांबिसकाका,
हा लझान्या खरंच खूप छान होतो. फक्त मी करताना, त्यात व्हाईट सॉस नाही वापरत तर रिकोटा चिझ वापरते. पालक आणि रिकोटा मिक्स करून गॅसवर १-२ मिनिटे शिजवले की सुंदर चव येते पालक आणि रिकोटाची.
यात.. टोमॅटॉ सॉस खूप लागतो. मला खूप आवडतो लझान्या.

- प्राजु

पिवळा डांबिस's picture

10 Feb 2008 - 10:19 pm | पिवळा डांबिस

म्हणून तर न राहवून प्रतिक्रिया लिहिली! :)
पण मला आवडणारा लझान्या खिम्याचा किंवा गेला बाजार इटालियन हॉट सॉसेज घालून केलेला.
त्यातहि सुंदर चव येते...... मटणाची! :)))
या एकदा आमच्याकडे, घालतो खायला!!
-डांबिसकाका
ता. क.: व्हेज लझान्यामध्ये मश्रूम बारीक चिरुन घातले तर त्याची लज्जत वाढेल का? तू प्रयोग करून पाहिला आहेस का?

प्राजु's picture

10 Feb 2008 - 10:26 pm | प्राजु

मी जितक्या मिळतिल त्या भाज्या घलते लझान्या मध्ये...:)))

सोयाबिनचे न्यूट्रीला सुद्धा छान लागतात.
- प्राजु

स्वाती राजेश's picture

10 Feb 2008 - 10:47 pm | स्वाती राजेश

Bologenese सॉस वापरून वरील लसाने करता येते.

Bologenese सॉस : हा टोमॅटो आणि मटण/ चिकन चे बारीक तुकडे करून करता येतो.
१/२ किलो टोमॅटो (ब्लांच करून बारीक करणे)
२ टे.स्पून टोमॅटो प्युरी
१/४ किलो मटण /चिकन चे बारीक तुकडे
१/२ टी.स्पून लसूण पेस्ट
१/२ टी.स्पून ओरेगानो
१/४ कप कोथिंबीर्/बासिल
१/२ टी.स्पून काळी मिरी पावडर
३टे.स्पून तेल
मीठ चवीनुसार

१.सॉस करण्यसाठी प्रेशर कुकर मध्ये ३ टे.स्पून तेल घेऊन त्यात लसून पेस्ट घालणे.
२.चिकनचे पिसेस घालून ५/७ मि.ब्राउन होईपर्यन्त परतणे.
३.नंतर कोथिंबीर, मीठ, मिरीपावडर्,ओरेगानो,टोमॅटो, टोमॅटो प्युरी घालणे .१/४ कप पाणी टाकून २ कुकरच्या शिट्या करणे व गॅस कमी करून १५-२० मिनिटे ठेवणे.

वरील प्रमाणे रेसिपी करणे.

पिवळा डांबिस's picture

10 Feb 2008 - 10:58 pm | पिवळा डांबिस

स्वातीताई, आम्हाला माहित होतं की तुम्ही आम्हाला निराश करणार नाही. म्हणुनच थोडं डिवचलं हो! :))

शाबास!!!

-पिवळा डांबिस

प्रभाकर पेठकर's picture

10 Feb 2008 - 10:51 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या माहिती प्रमाणे पास्ता शीट्स उकळत्या पाण्यात आधी शिजवून घ्यायच्या असतात.
चुकत असल्यास तसे सांगावे. कारण अजून मी लसाने कधी ट्राय केले नाही.

स्वाती राजेश's picture

10 Feb 2008 - 10:54 pm | स्वाती राजेश

कारण सॉस च्या ओलेपणामुळे त्या आपोआपच ओल्या होतात आणि सोफ्ट पण.

प्रभाकर पेठकर's picture

10 Feb 2008 - 10:56 pm | प्रभाकर पेठकर

ओके.... धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

11 Feb 2008 - 12:12 am | विसोबा खेचर

एकदाच केव्हातरी हुंबईच्या एका हाटेलात हा पदार्थ खाल्ल्याचं आठवतंय, तेव्हा तो इतका आवडला नव्हता. असो...

स्वातीताई, धन्य आहे तुमची. तुमची पाककौशल्यातील रेंज पाहून कौतुक वाटते!

अजूनही अश्याच उतमोत्तम पा कृ येऊ द्यात.

अवांतर - तात्याची फर्माईश-

१) कोलंबीभात
२) मटण सूप (भारतीय पद्धत. चायनीज किंवा इतर कुठली नव्हे)
३) ओल्या बोंबलाचे कालवण. (आमचे पेठकरशेठ हे कालवण फार छान करतात. स्वातीताई, तुम्ही कसं करता याची उत्सुकता आहे म्हणून या पा कृ ची फर्माईश करत आहे!)
४) चिंबोरीचं किंवा कुर्ल्यांचं कालवण
५) पापलेटची मालवणी पद्धतीची आमटी

प्लीज टेक युअर ओन टाईम. घाई नाही.. :)

आपला,
(खादाड) तात्या.

वरदा's picture

16 Apr 2008 - 8:44 pm | वरदा

माहितेय मी खूपच उशीरा सांगतेय पण मस्तच रेसिपि आहे..तो फोटो पाहिल्याने करावासा वाटला लझानिया...बरं स्वाती तू सगळी चिझ फॅट फ्री वापरुन पाहिल्येत का? चवीत खूप फरक पडतो का?

बगाराम's picture

17 Apr 2008 - 7:38 am | बगाराम

मला इटालिया फूड विशेष आवडत नाही. पण ज्यांना आवडते त्यांच्यासाठी पाकक्रुती छान आहे.

ब्लांच करणे म्हण्जे काय?
तसेच
लसाने की लझानिया?

सहज's picture

17 Apr 2008 - 11:29 am | सहज

स्वाती & स्वाती होटेल काढले पाहीजे.

तिकडे काँबीनात्सिऑन इकडे लझानिया / लसाने / लझान्या.

इतके सगळे छान छान पदार्थ येतायत पण अजुन नीलकांत व मालक "चविष्ट" नावाचा वेगळा विभाग/प्रकार करत नाहीत? काय म्हणायच याला? तात्या खरच खाद्यप्रेमी असाल तर लवकरात लवकर असा वेगळा विभाग लिंक द्या वर चर्चा, काव्य, साहित्य बरोबर. [जनातलं, मनातलं , जे न देखे रवी , काथ्याकूट बरोबरच चविष्ट किंवा असे काहीसे नाव की जे दाबल्याबर फक्त पाककृतीच दिसतील ] प्लीज तात्या, नीलकांत तेवढे मनावर घ्या.