लोकहो,
"आम्ही कोण?" या प्रश्नावर केशवसुत, केशवकुमारांपासून ते केशवसुमारांपर्यंत अनेकांनी कविता लिहिल्या असतील. त्यात आमची ही एक भर.
आम्ही नक्की कोण आहोत आणि कसे आहोत, ते या कवितेतून उलगडेल असे वाटते.
आम्ही ही कोकणी | माणसे सामान्य
नको असामान्य | जिणे आम्हां ||
हवी आंम्हा फक्त | थंडीला शेकोटी
गांडीला लंगोटी | आम्ही सुखी ||
भोजना मिळू दे | दोन वेळा भात
पान आणि कात | थुंकायला ||
आनंदाचा क्षण | येता जरी पहा
पिऊ अर्धा चहा | टपरीत ||
नाही परदेशी | केले पर्यटन
आमुचा कोकण | आंम्हा प्यारा ||
रेवस पावस | खेड चिपळूण
लांजा मालवण | स्वर्ग आंम्हा ||
गरम चहाचा | कप अंगणात
हगावे बागेत | पोफळीच्या ||
किर्र किर्र वाजे | खळ्यात रहाट
नागमोडी वाट | समुद्राची ||
अथांग सागर | कोकणा लाभला
जगाला वाटला | हेवा त्याचा ||
समृद्धी सुबत्ता | येई ना कोकणा
हाचि परगणा | दुष्काळाचा ||
अपुरे ते अन्न | भूक वरदान
तरी समाधान | चित्तालागी ||
ज्ञानियाची ओवी | तुक्याचा अभंग
असे अंगसंग | कैवल्याचा ||
जसे शांतपणे | आलो या जगात
जाऊ ही स्वर्गात | शांतपणे ||
----- धोंडोपंत
प्रतिक्रिया
10 Feb 2008 - 6:55 pm | राजे (not verified)
अपुरे ते अन्न | भूक वरदान
तरी समाधान | चित्तालागी ||
ज्ञानियाची ओवी | तुक्याचा अभंग
असे अंगसंग | कैवल्याचा ||
जसे शांतपणे | आलो या जगात
जाऊ ही स्वर्गात | शांतपणे ||
वा, सुदंर !
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
10 Feb 2008 - 6:56 pm | विसोबा खेचर
हवी आंम्हा फक्त | थंडीला शेकोटी
गांडीला लंगोटी | आम्ही सुखी ||
भोजना मिळू दे | दोन वेळा भात
पान आणि कात | थुंकायला ||
वा धोंड्या! भरून पावलो रे तुझी कविता वाचून...!
शिंच्या धोंड्या तुझ्यासारखं, त्या रांडच्या केशवासारखं मलाही लिहिता आलं असतं तर किती बरं झालं असतं रे! लेको, तुमचा हेवा वाटतो रे! :)
असो, उत्कृष्ट काव्य! क्या बात है...
आपला,
तात्या देवगडकर.
10 Feb 2008 - 7:10 pm | इनोबा म्हणे
पंत कोकणासारखीच सुंदर कविता.येऊ द्या अजून.
(मूळचा कोकणवासी) -इनोबा
10 Feb 2008 - 7:22 pm | विसोबा खेचर
आम्ही फणस काटेरी, आतुन गोड गर्यासारखे
शेलक्या शिव्या देणारे, परि काही न मनी ठेवणारे!
:)
(शिवराळ) तात्या.
10 Feb 2008 - 7:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लै भारी लिव्हलंय.... कोकणाचं शब्दचित्रं डोयासमोर उभ राह्यलं.असच लिव्हीत राव्हा :)
सा-याच वळी जब्रा हायेत पर.........आमी आमचा माथा खालच्या वळीवर टेकला.
ज्ञानियाची ओवी | तुक्याचा अभंगअसे अंगसंग | कैवल्याचा ||
पंताचा स्नेही
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
10 Feb 2008 - 7:37 pm | हैदर अली
वा पंत वा !! क्या बात है !! सुंदर !
आणखी वाचायला नक्की आवडेल.
आपला
हैदर अली
10 Feb 2008 - 7:46 pm | प्राजु
आनंदाचा क्षण | येता जरी पहा
पिऊ अर्धा चहा | टपरीत ||
नाही परदेशी | केले पर्यटन
आमुचा कोकण | आंम्हा प्यारा ||
रेवस पावस | खेड चिपळूण
लांजा मालवण | स्वर्ग आंम्हा ||
किर्र किर्र वाजे | खळ्यात रहाट
नागमोडी वाट | समुद्राची ||
हे एकदम छानच
अथांग सागर | कोकणा लाभल
जगाला वाटला | हेवा त्याचा ||
समृद्धी सुबत्ता | येई ना कोकणा
हाचि परगणा | दुष्काळाचा ||
माझ्या स्वप्नातले कोकणांतले घर.. समोर अथांग सागर पसरलेला आणि मी घराच्या अंगणात खुर्ची टाकून गरम चहाचा कप हातात घेऊन त्या समुद्राकडे पहात बसले आहे.. वा..वा..
- प्राजु
10 Feb 2008 - 7:48 pm | सुधीर कांदळकर
विसरलात की काय? गजालीशिवाय कोकण नाही महाराजा. पण कविता सुरेखच. मलादेखील तात्यांप्रमाणे आपला हेवा वाटतो.
10 Feb 2008 - 8:11 pm | अविनाश ओगले
फार छान. तुमचा हेवा वाटला पंत...
(कोकण नशीबात नसलेला कोकणस्थ) अविनाश ओगले.
11 Feb 2008 - 8:57 am | प्रमोद देव
पंत! अगदी सहजसुंदर काव्य.
त्यात माझी मोडकी तोडकी भर. तुमच्या पद्धतीने सुधारून घ्या.
माडांच्या बनात | निवांत बसून
कराव्या गजाली | वार्याच्या कानात||
11 Feb 2008 - 10:36 am | धनंजय
कराव्या गजाली | बसून निवांत |
माडांच्या बनांत | वार्यासंगे ||
11 Feb 2008 - 10:54 am | विसोबा खेचर
कराव्या गजाली | बसून निवांत |
माडांच्या बनांत | वार्यासंगे ||
सुंदर...! :)
(गजालिकार) तात्या.
11 Feb 2008 - 9:21 am | सहज
आम्ही नक्की कोण आहोत आणि कसे आहोत, ते या कवितेतून उलगडेल असे वाटते.
हो तसे उलगडल्यासारखे वाटतेय नक्की. कोणाला कसाही वाटो किंवा आवडो न आवडो, पण कोकणावर, कोकण संस्कृतीवर भरभरून प्रेम करणारा, प्रपंच, कला, संस्कृती मधे रमणारा, बडेजाव न मानणारा तसेच बडेजाव न दाखवणारा, कोकणाच्या मातीत पाय घट्ट रुजलेला रोख ठोक माणुस आम्ही पाहीला.
पंत तुमची भर ही आवडली.
कोकणाची लज्जत चाखवावी
क्लांत मने शांत करावी
सहल लवकर घडावी
आमुच्या धोंडोपंतांच्या गावी
11 Feb 2008 - 9:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहजराव,
मिसळपावच्या संस्काराने रसिक कविता करु लागले आहेत असे म्हणायचे का ? ( ह. घे. )
कोकणाची लज्जत चाखवावी
क्लांत मने शांत करावी
सहल लवकर घडावी
आमुच्या धोंडोपंतांच्या गावी
आपलीही इच्छा आहे, आमच्या पंताच्या कोकणात जायची, एक दिवस मुक्काम करु, त्यांच्या गझला ऐकू , काही ज्योतिषाचे किस्से ऐकू , धूम करु च्यायला. पंत, आपणास वेळ आहे ना ? :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
11 Feb 2008 - 2:36 pm | केशवसुमार
पंत..
एकदम, सहज, सोपी, सुंदर कविता..खूप आवडली
इथे राणीच्या देशात समुद्र आहे पण ते साला कोकणची मजा नाय...
आम्ही इथे कशा कशाला मुकतो आहोत ह्याची जाणीव करून दिल्या बद्दल धन्यवाद..
(राणीच्या देशातला कोकणस्थ) केशवसुमार
11 Feb 2008 - 7:52 pm | चतुरंग
कोकणचा राजा | आंबा हा हापूस |
वाटे मज खास | स्वर्गीय हा ||
काटेरी तरी ह्या | फणसाचे गरे |
खातातरी बरे | लागतात||
जरा दिसे तोही | काजूचा आकडा|
थोडा तो वाकडा | फेणी देई ||
शहाळेही मोठे | गोड खोबर्याचे |
पाणी थंडगार | तृप्त करी ||
कोकमेही लाल | घेता सरबत |
जातात निघून | उन्हाळे ही ||
किती सांगू तुम्हा | कोकणचा मेवा |
भरुन तो ठेवा | अंतरंगी ||
कोकणी माणूस | असेल लहान |
परि तो महान | कर्तृत्वाने ||
कोण तो रे आता | विचारी आम्हास |
कोकणाचे मित्र | आम्ही कोण?||
'धोंडो' केले काव्य | कोकणाची ओवी ||
स्फुरल्या ह्या ओळी | 'चतुरंगे ||
चतुरंग
11 Feb 2008 - 8:22 pm | प्राजु
चतुरंग,
तुमचे पाय धरावे वाटतात. किती अप्रतिम काव्य केले आहे..! आजपासून मी तुमची शिष्या...
जरा दिसे तोही | काजूचा आकडा|
थोडा तो वाकडा | फेणी देई ||
शहाळेही मोठे | गोड खोबर्याचे |
पाणी थंडगार | तृप्त करी ||
आणि
'धोंडो' केले काव्य | कोकणाची ओवी ||
स्फुरल्या ह्या ओळी | 'चतुरंगे ||
शब्दच नाहित.. सुंदर....
- प्राजु
11 Feb 2008 - 8:37 pm | चतुरंग
लाजवू नका हो! कुणालाही शिष्यत्व वगैरे देण्याएवढा मी महान नाही हो!
साधा कोकणी माणूस मी, मि.पा.वर लुडबुडतो झालं.
इथल्या सगळ्या प्रतिभावंतांचा सहवास मिळून त्याचा थोडा सुवास मलाही चिकटला असावा, श्रीखंडाला हापूसचा स्वाद लागल्यावर त्याचं आम्रखंड होतं ना, तसा!
चतुरंग
11 Feb 2008 - 8:54 pm | स्वाती राजेश
धोंडोपंतांनी छान काव्य केले आहे. कोकण वर किती प्रेम आहे ते कळते.
चतुरंग यांनी कमालच केली.छुपे रुस्तम निघाले.
प्राजु चे कौतुक करायला तर माझेकडे शब्द्च नाहीत.
तिला इतक्या छान छान कविता आणि चारोळ्या कशा सुचतात? याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे.
:))
11 Feb 2008 - 9:49 pm | ऋषिकेश
धोंडोपंत,
कविता अतिशय आवडली.. अगदी कोकणात असल्यासारखं वाटलं :) अजून येऊ द्या
-ऋषिकेश
11 Feb 2008 - 10:15 pm | संजय अभ्यंकर
फारच सुंदर!
वाचताना हसुही येत होते आणी आनंदही वाटत होता.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/