ऒळखीचे भेळवाले

सुबक ठेंगणी's picture
सुबक ठेंगणी in जनातलं, मनातलं
20 May 2009 - 8:53 pm

मुंबईच्या कुठल्याही नाक्यावर असतो तसाच आमच्याही नाक्यावर एक भेळवाला होता. ब-याच लहानपणीपासून माझा त्याच्यावर (म्हणजे त्याच्या भेळेवर) डोळा होता. आपण चांगले मार्क मिळवावेत आणि मग आईने “जा, नाक्यावरच्या भेळवाल्याकडून भेळ घेऊन ये” असं म्हणावं असं माझं एक माफक स्वप्न होतं. पण आईपुढे आमची डाळ शिजत नसे. त्यामुळे इव्हसारखंच मलाही त्या भेळेच्या “forbidden fruit” चं कायम आकर्षण वाटत राहिलं.
आणि मग एका कोजागिरीला भय्याची भेळ खायचा “दुग्धशर्करा” योग आला आणि मग पुन्हा पुन्हा आला, येतच राहिला. कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मी “को जागर्ती” असं म्हणत जागत्या घरी जाते असं म्हणतात. ब-याच कोजागिरीच्या रात्री मी लक्ष्मीच्या नव्हे तर भय्याच्या भेळेच्या आमिषाने जागून काढल्या आहेत. एवढंच नव्हे तर खुद्द लक्ष्मीदेखील चांदण्या रात्री भेळेसारखा ’स्वर्गीय’ (की ’पार्थीव’?) आनंद लुटायला येत असावी असा माझा पक्का समज आहे.
खरं म्हणजे भेळ घरच्या सगळ्यांना खायची असायची पण ती आणायला मात्र कुणीच तयार होत नसे. अशावेळी स्वयंसेवकगिरी करायला मी एका पायावर तयार. त्याचं एक कारण म्हणजे तिथे उभं राहिल्यावर कधी चटणी-बटाटा, कधी तिखटमीठ लावलेली करकरीत कैरी, कधी शेव-कुरमुरे अशी चविष्ट खिरापत न मागताच मिळत असे. आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष भेळेइतकीच भेळेच्या प्रोसेसच्याच मी एवढी प्रेमात होते की भेळ खाण्याचा अर्धा आनंद मला ती खाण्याआधीच मिळत असे. (असाच आनंद मला डोसा घालताना पळीबरोबर गोल फिरणारे डोसावाले किंवा टोमॅटो/ बटाटयाच्या चकत्या फ्रिस्बीसारख्या बरोब्बर पावावर उडवणारे सॅंडविचवाले पाहिले की पण होतो!)
वर्षानुवर्ष भय्याची यायची वेळ आणि जागा एवढया ठराविक होत्या की बिस्किट फॅक्टरीचा पाचचा भोंगा कशासाठी होतो? तर सगळ्यांना भय्याच्या येण्याची वर्दी देण्यासाठी असा समज झाला किंवा “नाका म्हणजे काय?” असं विचारल्यावर चड्डीतल्या पोरापासून धोतरातल्या आजोबांपर्यंत कुणीही “जिथे रस्ते आणि भेळवाला मिळतात अशी जागा” असं उत्तर दिलं तर चुकीचं वाटू नये.
एकदा का तो त्याच्या पिचवर स्थिरस्थावर झाला की मग एखाद्या सैन्याच्या कमांडरच्या थाटात बहुतांच्या रसनेवर राज्य करण्याची त्याची तय़ारी सुरू होई. कुरमु-यांवर निखा-यांचं मडकं ठेवणे, गाडीच्या आतल्या बाजूने कैरी, बटाटा, कांदे, टोमॅटो अशी रंगीबेरंगी चळत रचणे, मासिकांचे गुळगुळीत आणि साधे कागद वेगळे करून फर्रकन ओढता येतील अशा अंतरावर लावणे, चटण्या तयार करणे ही कामं होईहोईपर्यंतच “भय्या, दो भेल..एक मीठा कम, एक जैन बनाना…इस्त्रीका कपडा लेके आता हू।“ अशी कुणीतरी ऑर्डर देऊन गेलेला असे. भय्याची वाट पहाणारी माझ्यासारखी अनेकजण असतील पण तयारी होऊन गि-हाईकांची वाट पहाणारा रिकामटेकडा भय्या मी कधीच पाहिलेला नाही.
मला सर्वात आकर्षण वाटायचं ते तो कांदा कापताना. प्रथम कांद्याची साले आणि शेंडी काढून सोलीव कांदा डाव्या हातात धरून तो त्यावर उभे काप देई. आणि मग कांदा एका लयीत गोल फिरवत खसाखस आडवे काप देई. त्याबरोब्बर कांद्याच्या छोट्याछोट्या चौकोनी तुकड्यांचा पांढ-याशुभ्र खच काही क्षणात जमा होई. इतर वेळेस भल्याभल्यांना रडवणा-या कांद्याचा भय्याच्या हातात मात्र सपशेल पांढरा बावटा! मी कित्येक वेळा कांदा तसा चिरून पहायचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी कांद्याची दोन शकलं आणि माझी फजिती मात्र झाली.
पहावं तेव्हा भय्याभोवती माणसांचा गोतावळा जमलेला असे. कारण भेळेइतकाच तो नाका म्हणजे रसभरीत गप्पांचादेखील अड्डा होता. हिंदीमध्ये ’बातें बनाना’ असं का म्हणतात हे भेळवाल्यापाशी दोन मिनिटं थांबूनसुद्धा तुमच्या लगे़च लक्षात येईल. बरं तिथे जमणारी सगळीच माणसं सरळसाधी होती असं नाही. काहीजण त्याच्या गाडीपाशी नुसतेच टाईमपास करायला येत; काही गप्पांबरोबरच शेवेवर हात मारत किंवा पु-या लाटत; काही भेळ मागवून पैसे खात्यात जमा करायला सांगत. पण आपल्या गि-हाईकांवर वैतागलेला, पैशाचा तगादा लावणारा भय्या मी ऐकलेला नाही. उलट ही सगळी रिकामटेकडी माणसं भय्याने सांगताच भेळेच्या पुडया बांधणे, बटाटे सोलणे, भेळ नेऊन पोचवणे अशी चिल्लर कामे करायला लगेच तयार होत. वर भय्याचं त्यांना प्रोत्साहन “आप सेवममरा खाते है जरूर पर काम बढिया करें हों। एक दिन मेरी छुट्टी करोगे।“ ग्राहकराजावरच गुपचुप राज्य करायचं अचाट कौशल्य त्याच्याकडे होतं. ही सगळी माणसं त्याच्या चटपटीत भेळेसाठी तिथे जमत की मधाळ गप्पांसाठी हे ठरवणं खरंच कठीण आहे.
पुढे आम्ही घर बदललं आणि मग ओघाने भेळवालाही बदलला. पण पहिल्या प्रेमासारखा ह्या पहिल्या भेळवाल्याने मनातलाही एक नाका कायमचा व्यापून ठेवला आहे.
***
दुसरा एक माझ्या आठवणीतला भेळवाला म्हणजे दादर स्टेशनवरचा. जनसामान्यांच्या उदरभरणाचा भार आपल्या अगडबंब पोटावर पेलणारा तो दादरचा भेळवाला पाहिला की मला अवघ्या पृथ्वीचा भार आपल्या खांद्यावर पेलणारा ग्रीक पुराणकथेतला ऍटलासच आठवतो. ट्रेनमधली खिडकीजवळची जागा, गार वारा, खिडकीतून दिसणारी झोपेला आलेली मुंबईची झगमग, आठवणी चाळवणारी एफ. एम.वरची गाणी आणि भूक चाळवणारी सुक्या भेळेची चटपट अशा खास मध्यमवर्गीय सुखासाठी कित्येक वेळा फास्ट ट्रेन सोडून स्लो ट्रेनने जाण्याचा मोह मला आवरता आलेला नाही.
प्लॅटफॉर्मवरच्या वर्दळीमुळे असेल किंवा पानाच्या तोब-यामुळे माहित नाही, पण ह्या भय्याचा आवाज ऐकण्याची संधी फार कमी वेळा आली. त्याच्या आजूबाजूला झडणा-या राजकारण, कला, क्रीडा, तेजी मंदीवरच्या चर्चाही त्याची लय कधीच बिघडवू शकल्या नाहीत. मला वाटतं की वर्तमानपत्राशी त्याचा संबंध फक्त भेळेच्या पुड्या बांधण्यापुरताच येत असावा. एखाद्या कसलेल्या गायकाने ताना मुरक्या घेऊन समेवर यावं तसंच याने पुढ्यातल्या दहा पिशव्यातून हात फिरवून शेवटी पुरी खोचलेली पुडी आपल्या हातात द्यावी. मला भेळेत चणे आवडत नसत आणि हा तपशील मी एकदाच त्याला सांगितल्याचं माझ्या आठवणीत आहे. मला खात्री आहे की माझ्यासारख्याच त्याच्या अनेक रसिकांचे ’वर्ज्य’ त्याच्या मेंदूत कायमचे साठवले गेले असतील.
त्याच्या आजूबाजूला कणीसवाले, चटपटे चणेवाले असे अनेकजण होते. एकदा कुणीतरी भय्याला म्हटलं, “भय्याजी, देखो सभी लोग कैसे भाव बढा रहें है। आपही हो जो सदियोंसे ५ रुपियें में भेल खिलाते आये हो। आपभी बढाईए… ” त्याच्यावर तो आधी नुसताच तोबरा सांभाळत हसला. आणि मग म्हणाला,”एक बात यू हैं की भाव पाच से सात करो तो छुट्टें पैसे देने होंगे। आजकल छुट्टोंकी शार्टेज हैं साब। और दुसरी दिलकी बात कहें तो सिर्फ़ रुपिये नही तो लोगोंकी दुवाए भी तो हम कमाते है। पैसोंसे जेब भरे पर दिल तो नहीं…एक जमाना था जब हम भी आये थे बम्बई मुलुकसे…दो रुपियोंकी कीमत हमही जाने।“ आणि पहिल्यांदाच मला भय्याच्या विशाल देहामागचा तेवढाच विशाल माणूस दिसला.
***
जपानात आपल्या भेळवाल्यांसारखेच ताकोयाकी, ताईयाकी, ओमोची वगैरेंचे स्टॉल दिसतात. पण बाह्य रूप सोडल्यास भेळवाल्याशी त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. भेळ हा चमच्यांच्या मापाने, कॅलरीचा हिशेब मांडत बसणा-यांचा प्रांत नव्हे. तिथे बचके आणि मुठींचं राज्य चालतं. (हां आता चवीचं परिमाण स्वच्छता असेल तर गोष्ट वेगळी!) आमचा भय्या नसेल इथल्या एप्रन घातलेल्या ताकोयाकीवाल्याएवढा अदबशीर पण त्याच्याकडे शेव कुरमुरे हक्काने मागता येतात. ताकोयाकीवाल्याच्या पारदर्शक काचेतून पलिकडची स्वच्छता आणि काटेकोरपणा दिसतो. पण काचेमागचा ताकोयाकीवाला मात्र माझ्यासाठी आजतागायत अदृश्य आहे. प्रत्येक पदार्थात त्याच्या कर्त्याचा अंश असतो म्हणे! जेव्हा तो मला जपानात सापडेल तेव्हा मला आमच्या भेळवाल्याची उणीव इथे भासणार नाही.

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

20 May 2009 - 8:58 pm | स्वाती दिनेश

भेळेसारखाच चटकदार लेख,
अर्थातच आवडला,
स्वाती

प्राजु's picture

20 May 2009 - 9:14 pm | प्राजु

+१
सहमत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शाल्मली's picture

20 May 2009 - 9:38 pm | शाल्मली

एकदम चटकदार लेख.
लगेच भेळ खावीशी वाटत आहे..

--शाल्मली.

मिंटी's picture

21 May 2009 - 4:25 pm | मिंटी

खरंच एकदम चटकदार लेख......

आता आज हापिसातुन घरी जाताना भेळ न्यावीच लागणार :)

विसोबा खेचर's picture

21 May 2009 - 9:37 am | विसोबा खेचर

भेळेसारखाच चटकदार लेख,
अर्थातच आवडला,

हेच म्हणेन..

जियो...! :)

तात्या.

मीनल's picture

20 May 2009 - 9:10 pm | मीनल

मस्त आहे लेख.
भेळ कर्त्याचा अंश असणारी ती भेळ कधी खाते अस झालय.
काही केल्या घरी तसली जमत नाही.
माझे यजमान म्हणतात, " त्या भेळवाल्याचा बनियन घरी आण, रात्रभर पाण्यात भिजवून ठेव आणि त्यात चिंच, गूळ घालून चटणी कर. मग कशी चट्कदार होत ते"
आत हे कस काय जमायच ? :?
मीनल.

सुबक ठेंगणी's picture

22 May 2009 - 5:19 pm | सुबक ठेंगणी

हेहेहे...अगं माझी आई पण म्हणते...पाणीपुरीवाल्याचं लाल कापड पाणीपुरीच्या पाण्यात पिळलं तरंच ते चविष्ट होतं... :P
शेवटी काय जिथे पाहिजे जातीचे....

मॅन्ड्रेक's picture

20 May 2009 - 9:14 pm | मॅन्ड्रेक

काय बोलु ? तोंडाला पाणि सुट्लेय.
छान.

at and post : janadu.

संदीप चित्रे's picture

20 May 2009 - 9:16 pm | संदीप चित्रे

माझ्या जीवाभावाच्या विषयावर लिहिल्याबद्दल धन्स :)
>> दुसरं म्हणजे प्रत्यक्ष भेळेइतकीच भेळेच्या प्रोसेसच्याच मी एवढी प्रेमात होते की भेळ खाण्याचा अर्धा आनंद मला ती खाण्याआधीच मिळत असे.
मी शाळेत असताना कार्यानुभवाच्या परीक्षेत 'पदार्थाची साहित्य आणि कृती लिहा' या प्रश्नात भेळेवर सगळं लिहून आलो होतो.
--------------------
पुण्याला सारसबागे समोर 'संतोष' भेळ हा माझा आवडता स्पॉट. सायकलवरून जाताना/येताना पटकन थांबून एक भेळ खायचो :)
आता त्यांची सहकारनगरलाही शाखा आहे !

अजूनही पुण्याला गेलो की संतोष भेळ चुकवत नाही.
कधी कधी तर अमेरिकेत येण्याच्या दिवशी त्यांच्याकडच्या चटण्या बांधून आणतो आणि इथे आल्यावर भेळ करून घेतो :)

खरंतर हा विषय इतका आवडीचा आहे की खूप लिहावंस वाटतंय पण वेळेअभावी इथेच थांबतो !!

मला वाटलं 'भेळेअभावी' इथेच थांबतो म्हणलास की काय! ;)

चतुरंग

संदीप चित्रे's picture

21 May 2009 - 1:44 am | संदीप चित्रे

=D> =D>

सहज's picture

21 May 2009 - 7:59 am | सहज

भेळेअभावी :-)

लेख मस्तच आहे.

सुबक ठेंगणी's picture

22 May 2009 - 5:22 pm | सुबक ठेंगणी

लिही की त्या संतोषच्या भेळेबद्दल...अजूनही तुला माहीत असलेले भेळेच्या गाड्या कुठे कुठे आहेत ते सांग..ह्या वेळच्या भा.भे.त भेट देईन त्यांना पण!

मेघना भुस्कुटे's picture

20 May 2009 - 9:25 pm | मेघना भुस्कुटे

एकदम मस्त लेख आहे. भेळ हा रसभरित विषय तर खराच. पण भाषा आणि शैलीही तितकीच रसाळ आहे.
कांद्याचा पांढरा बावटा,
दो रुपयेकी कीमत हमही जाने है,
रसिकांचे 'वर्ज्य'....
एकदम वाक्यावाक्याला दाद घेऊन गेला लेख. आणिक लिहा..
अवांतरः मलापण भेळ बनण्याची प्रोसेस, डोशाचा तो चुर्र आवाज - विशेषतः मुंबईत म्हैसूर मसाला बनवतात ना अण्णा, तेव्हाची त्यांची एकतानता, वडे तळणारा भय्या.. हे सगळं असंच बघायला खूप आवडतं. माझी मैत्रीण मला न चुकता 'हावरट' म्हणते. आज 'माझिया जातीची' कुणी भेटल्यावर लई आनंद झाला!

नंदन's picture

21 May 2009 - 1:58 am | नंदन

सहमत आहे, मस्त लेख.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अगदी कैरी घातलेल्या आंबटगोळ भेळेसारखाच लागला! मस्तच. अजून येऊदेत. :)

चतुरंग

टिउ's picture

20 May 2009 - 9:57 pm | टिउ

सगळ्या भय्या लोकांना महाराष्ट्रातुन हाकलुन लावलं पाहीजे...पाणीपुरीवाले आणी भेळवाले भय्ये सोडुन!

यावेळी भारतात गेलो तेव्हा महिनाभर मिनरल वॉटर प्यायलो पण आईला न सांगता एकदा नेहमीच्या गाडीवर जाउन पाणीपुरी, भेळपुरी, रगडापॅटिस सगळं चापुन आलो! आणि शेवटी एक मसालापुरी...आहाहा!!!

यन्ना _रास्कला's picture

21 May 2009 - 7:01 am | यन्ना _रास्कला

यावेळी भारतात गेलो तेव्हा महिनाभर मिनरल वॉटर प्यायलो पण आईला न सांगता एकदा नेहमीच्या गाडीवर जाउन पाणीपुरी, भेळपुरी, रगडापॅटिस सगळं चापुन आलो!

काय राव नेहेमीची गाडी व्हती त भय्याला बोलायचा ना, हव्व तेवड पैशे घे पन पानिपुरीमदी पन मिणरल पानी घाल म्हनुन. वरत केल त मोडायच नाय अज्याबात

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

श्रीयुत संतोष जोशी's picture

20 May 2009 - 10:00 pm | श्रीयुत संतोष जोशी

झक्कास

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

लिखाळ's picture

20 May 2009 - 10:38 pm | लिखाळ

अतिशय उत्तम लेख. मला फार आवडला. आपली शैली खास आहे.
कांद्याचा बावटा, अनेकांचे वर्ज्य, अदृश्य विक्रेता आणि असे अनेक इथे नमूद करायचा मला मोह होतो आहे.

अतिशय बांधीव आणि चटकदार लेख.

इतका छान लेख 'डोळ्यांत पाणी आणून' संपवावा असा मोह होणे शक्य असते (अनेक प्रतिथयशांना सुद्धा असा मोह होतो :)). पण आपण एक लहानसा गंभीर करणारा प्रसंग शेवटून दुसर्‍या परिच्छेदात लिहिलात आणि शेवट वेगळा छान केलात हे मला आवडले. नाहीतर सगळा चटकदार लेख वाचायचा आणि शेवटच्या वाक्याने गंभीर होऊन 'जीवनावर गंभीर विचार' करत पान उलटायचे, असे झाले की मला वैताग येतो.

पु ले शु
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

लवंगी's picture

21 May 2009 - 6:25 am | लवंगी

अगदि सहमत.. सुंदर शैली

क्रान्ति's picture

20 May 2009 - 10:43 pm | क्रान्ति

आणि चटपटीत भेळ [म्हणजे लेख] खूप खूप आवडला.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

भडकमकर मास्तर's picture

20 May 2009 - 10:56 pm | भडकमकर मास्तर

आतापर्यंत खाल्लेल्या सर्व भेळींची आठवण करून देणारा लेख...
उ त्त म....
असेच अजून लिहा..

.. लिखाळशी सहमत..( शेवट पाणीकाढू केला की वैताग येतो... अगदी व्यक्ती आणि वल्लीचा क्लास लावल्यासारखे वाटते... ;) )
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

मुशाफिर's picture

21 May 2009 - 2:37 am | मुशाफिर

हा लेख वाचून चमचमीत भेळ खाल्ल्यानंतर भय्याजवळ मी नेहेमी करत असलेली फर्माईश इथे केल्याशिवाय राहवलं नाही! :). आपले सकस (आणि सुग्रास) लेखन असेच वाचायला मिळत राहो.

मुशाफिर.

घाटावरचे भट's picture

21 May 2009 - 4:46 am | घाटावरचे भट

कडक!!

रेवती's picture

21 May 2009 - 5:38 am | रेवती

लेख भयंकर आवडला.
भेळ हा असा प्रकार आहे जो मी पहाटेसुद्धा झोपेतून उठून खाऊ शकेन.
बाकी वर्णन वगैरे झकास!
(लेखनशैली अकृत्रिम आहे असं म्हणणं बहुतेक लेखिकेलाच आवडणार नाही असं वाटलं इतकं गप्पा मारल्यासारखं लिहिलय.):)

रेवती

पल्लवी's picture

21 May 2009 - 8:03 am | पल्लवी

छोट्या छोट्या गोष्टीतल्या मोठ्या आनंदाची आठवण जागवल्याबद्दल धन्यवाद !
खूप आवड्ला लेख :)

अवलिया's picture

21 May 2009 - 8:23 am | अवलिया

वा! मस्त !!

--अवलिया

स्वानन्द's picture

21 May 2009 - 8:28 am | स्वानन्द

लेख अगदी उत्तम जमलाय, भेळेसारखाच!

परिकथेतील राजकुमार's picture

21 May 2009 - 1:03 pm | परिकथेतील राजकुमार

यकदम चटकदार आणी ढिश्क्यांव लेख.
जबर्‍याच !!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

21 May 2009 - 1:39 pm | नितिन थत्ते

इकडे (भिलाईला) चांगली भेळ मिळत नाही. घरी गेलो की खायला हवी.

खराटा
(रंग माझा वेगळा)