अगदी लहानपणी उंदीर मला आवडायचा. कारण तेव्हा जेरी किंवा मिकी माऊस हाच खरा उंदीर अशी उंदराची प्रतिमा भलतीच ग्लॅमरस होती. खरा उंदीर पाहिला तेव्हा अशा विध्वंसक आणि पाताळयंत्री प्राण्याला गोंडस रूप देताना वॉल्ट डिस्नेने किती कल्पकता खर्ची घातली असेल ह्याचा अंदाज आला. बहुतेक जो जेरीस आणतो तो जेरी असंही वाटलं. शाळा-कॉलेजात असतानाही माझ्या कित्येक स्वप्नांचा व्हिलन उंदीर (किंवा उडरं झुरळ) असायचा. घरची बेल वाजते आणि दरवाजा उघडावा तर शे दीडशे गलेलट्ठ उंदीरांची टॊळीच घरात शिरते किंवा एम. ए. चा पेपर आहे आणि माझ्या सगळ्या नोट्सचं उंदराने भुस्कट पाडलंय अशी स्वप्न मला कितीतरी वेळा पडायची. तर खरंच एका शनिवारी भल्या पहाटे दहा वाजता आत्तापर्यंत पाहिलेली सगळी भयावह स्वप्न आता सत्यात उतरणार म्हणून आमचे डोळे खाड्कन उघडले.
तर झालं काय की सकाळी झोपेतच स्वैपाकघरातलं काचेचं दारवालं कपाट उघडणार तोच आत एक काळी लांबट आणि ओलसर गोष्ट दिसली. डोळे लहानमोठे करून, लांबून-जवळून कसंही पाहिलं तरी इतकी किळसवाणी गोष्ट उंदराच्या लेंडीशिवाय दुसरं काहीही असूच शकत नव्हतं. किडयांना मारायचा जबरदस्त पूर्वानुभव असल्यामुळे चिरडणे, चेचणे, जाळणे, फटकारणे, झोडपणे अशा कारवायांत मी एव्हाना तरबेज झाले होते. पण ह्यापैकी एकही कौशल्य उंदराच्या बाबतीत उपयोगी पडणार नव्हतं. त्यानिमित्ताने Variety is the spice of life या उक्तीला अनुसरून वीकांत मसालेदार होणार अशी चिन्ह दिसायला लागली.
तो उंदीर बहुतेक त्या कपाटाबरोबर सरळ माझ्या डोक्यातच घुसला होता. कारण लगेच माझ्या मेंदूने तार्कीक आणिबाणी जाहीर करून टाकली. परिणामी एरवी ज्याच्यासाठी मी इतरांना वेड्यात काढलं असतं अशा गोष्टी मीच करून बसले.
पहिल्याप्रथम वेळकाळाचा काहीही विचार न करता आधी भारतात आईला फोन लावला. पण त्यामुळे उंदीर आणि आई ह्या दोघांना काहीच फरक पडला नाही. शेवटी माझीच आई ती! “अगं पिंजरा वगैरे पाठवू का इथून? का गुरख्यालाच पाठवू?” अशी प्रेमळ शब्दांत विचारपूस झाल्यावर दुस-या मिनिटाला संभाषण संपले.
दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कपाटात संभावित लपून बसले होते ते कपाट आजपासून उघडायचेच नाही असं मी मनातल्या मनात ठरवून टाकलं. कारण त्यामुळे तो उंदीर स्थानबद्ध होऊन त्याला पकडणं सोपं जाणार होतं. पण कपाट लाकडी असल्याने बाहेर पडण्यासाठी उंदीर स्वतःची मदत स्वतःच करू शकतो एवढी एकच जुजबी गोष्ट माझ्या लक्षात आली नाही. (जाऊ द्या हो! महान माणसांना असल्या बारीकसारीक चुका माफ असतात!)
उंदराविषयी आजही माझ्या मनात संमिश्र भावना आहेत. तो दिसत असताना भीती वाटते; आणि दिसत नसताना राग येतो. गुपचुप घरात घुसतो काय, वाट्टेल ते कुरतडतो काय किंवा जिथेतिथे आपल्या खुणा सोडून जातो काय…बरं हा जर माणूस, मांजर किंवा कुत्रा असता तर मी माझ्या रागाचा बोलून, उपाशी ठेवून, आदळाआपट करून निचरा केला असता. पण उंदराला मात्र माझ्या रागाचं काहीही सोयरसुतक नसतं. उलट कुठलंही काम करत असताना माझ्या मेंदूचा एक भाग मात्र सतत “तो आत्ता काय करत असेल?” ह्याचा विचार करत रहातो. मग साला आपल्याला आपल्याच घरात बेशिस्त वागण्याची चोरी होते. म्हणजे एरवी केळी वगैरे मी बिनधास्त डायनिंग टेबलावर ठेवते. पण तो आल्यापासून जाळीच्या पिशवीत आणि ती जाळीची पिशवी एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायला लागले. एवढे कष्ट करूनही हा पठ्ठा ती पिशवी, जाळी आणि केळी हे सगळंच कुरतडू शकतो ही काळजी बाकी राहिलीच. थोडक्यात त्याच्यापुढे आपण अगदीच हॅss आहोत असं मला एकसारखं वाटायला लागलं.
तर अशाप्रकारे वीकांत तर तापदायक गेलाच पण पुढचा संपूर्ण आठवडा तसाच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला. पण उंदराचं भिजत घोंगडं तसंच होतं. ह्याच वेगाने काम केलं तर काहीही करायची गरज न पडता त्याचं यथावकाश वृद्धापकाळाने निधन होईल अशी शक्यता वाटून शाळेतल्या लोकांशी सल्लामसलत करायचं ठरवलं.
बराच उहापोह झाल्यावर वेगवेगळे मार्ग पुढे आले. लोखंडी पिंजरा हा ऑप्शन जपानमधे केव्हाच मोडीत निघाला आहे असं कळलं. आणि हायटेक पिंज-याची किंमत ऐकल्यावर त्यापेक्षा मायभूमीहून आयात करणे परवडेल असं वाटलं. दुसरा उपाय म्हणजे चिकटपट्टीचा. पण उंदीर तिच्यावर चिकटलाच तर त्या जिवंत उंदराची विल्हेवाट कशी लावणार? असा प्रश्न पडल्याने चिकटपट्टीवरही काट मारली. रहाता राहिली विषाची गोळी. गोळ्या मी विकत घेऊन त्या घरात ठिकठिकाणी पेरून ठेवल्या तर त्या खायचं आणि बाहेर जाऊन मरण्याचं काम उंदीर स्वतःचं स्वतःच करणार असल्याने हा कामाची समान वाटणी असलेला पर्याय मला सर्वाधिक पटला. अडचण एकच होती ती म्हणजे उंदीराचे अड्डॆ अजूनही गुलदस्त्यात असल्याने सुरुंग नेमके कुठे पेरावे हे समजत नव्हते.
शेवटी अंदाजाने फ्रीजच्या आगेमागे, कपाटाच्या आजूबाजूला अशा सहा गोळ्या ठेवल्या. (अजूनही मी कपाट उघडायची हिंमत होत नव्हती.) वाट बघण्यात अजून दोन आठवडे गेले. मी आपली रोज गोळ्या तपासून पहात होते. पण गोळ्यांच्या संख्येत किंवा आकारमानात ढिम्म फरक पडला नव्हता.
आता जवळजवळ एक महिना झाला होता. तोपर्यंत माझ्याकडे उंदीर आला असल्याची दवंडी पिटून झाल्यामुळे लोकही मूषकवधाच्या सुरम्य कहाण्या ऐकण्यासाठी उतावीळ झाले होते. पण सांगण्यासारखं काहीच घडत नव्हतं. अगदीच नाही म्हणायला रोज त्याची खुडबुड ऐकू येऊन मला जागरणं होत होती.
ज्या कपाटात तो घुसबंडा लपून बसला होता तिथे मी काचेची भांडी, झालंच तर पापड आणि मसाल्य़ाची पाकिटं ठेवते. जपानी उंदराला आपले बेडेकर, लिज्जत, बादशहा वगैरे न झेपून त्याचा उपासमारीने आधीच बळी तर गेला नसेल नां? आणि जिवंत उंदरापेक्षा मेलेला उंदीर अधिक त्रासदायक असतो ह्या उक्तीनुसार शेवटी ते कपाट उघडायचं ठरवलं. दार उघडल्या उघडल्या उंदीर टुणकन अंगावर उडी मारेल अशी मनाची पूर्वतयारी करून दार उघडलं. अरे! पण काहीच झालं नाही. आणि जिच्यामुळे हे सगळं घडत होतं ती आमची कृष्णवर्णा नायिका मात्र अजूनही जशीच्या तशीच पडून होती. आजवर जिला मी काचेच्या बाहेरून पहिलं होतं तिला काचेच्या अलिकडून आज प्रथमच पाहिलं आणि कपाळाला हात लावला. इथे मिळणार नाही म्हणून घरून हौसेने आणलेल्या हवाबाण हरडेच्या पाकिटातून सांडलेली ती एक गोळी होती.
ह्या गोष्टीला एव्हाना चार पांच महिने झालेत. आता स्वप्न आणि झोप ह्यांचं चक्र पुन्हा सुरळीत चालू झालं आहे. पण हवाबाणची दोन अख्खी पाकीटं संपवूनही खोट्याखोट्या उंदराकडून झालेला माझा खर्राखुर्रा पोपट मात्र अजूनही माझ्या पचनी पडलेला नाही.
प्रतिक्रिया
19 May 2009 - 6:13 pm | पहाटवारा
ह्याच वेगाने काम केलं तर काहीही करायची गरज न पडता त्याचं यथावकाश वृद्धापकाळाने निधन होईल अशी शक्यता वाटून शाळेतल्या लोकांशी सल्लामसलत करायचं ठरवलं.
-:)
19 May 2009 - 6:25 pm | आनंद घारे
उंदीरमामाच्या (कल्पनेतल्या) कौशल्यावरून शाळेत शिकलेल्या ढुमढुमढुमाक या गोष्टीची आठवण झाली.
शेवट तर फारच छान.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
19 May 2009 - 6:38 pm | अनामिक
मस्तं जमलाय उंदीरनामा.
-अनामिक
19 May 2009 - 6:39 pm | अवलिया
छान जमलाय उंदीरनामा !
--अवलिया
19 May 2009 - 7:00 pm | रेवती
मजेशीर लेखन!
रेवती
20 May 2009 - 6:53 am | विसोबा खेचर
मजेशीर लेखन!
हेच बोल्तो..!
तात्या.
19 May 2009 - 7:07 pm | सँडी
मस्त जमलाय! येऊ द्या अजुन.
19 May 2009 - 7:10 pm | प्राजु
खासच!!
मस्त जमला आहे लेख. :)
माझ्या घरीही उंदीर येऊन गेलाय. भारतात कधी उंदराला घरात प्रवेश नाही दिला, इथे मात्र १-२ वेळा घरात प्रवेश करता झाला होता उंदीर. :)
खर्या खुर्या उंदराची गोष्ट लिहिन नक्की.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 May 2009 - 7:34 pm | प्रमोद देव
सई लिहीलंय.....आपलं सही लिहीलंय!!!!!
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
19 May 2009 - 8:12 pm | क्रान्ति
वाचून खूप खूप मजा आली! मस्तच लिहिलंय!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
20 May 2009 - 7:01 am | विनायक प्रभू
उंदीर लय भारी
20 May 2009 - 7:27 am | सहज
मस्त!
आता एकदा डिस्नेलँडला जाउन जुन्या उंदराच्या स्मृती परत आणा :-)
20 May 2009 - 7:26 am | Nile
आवड्या! :)
20 May 2009 - 10:40 am | अ-मोल
एकदम खुसखुशीत!!
20 May 2009 - 10:48 am | मधु मलुष्टे ज्य...
मस्त मजेदार लेख आवडला. :)
एक आठवलं बर्याच दिवसांनी एका कोपर्यात ठेवलेला सिपीयु उचलला तेव्हा अचानक जड का झाला म्हणुन सीडी-रॉम लावण्यासाठी जी जागा असते तिथुन हात घातला तर तब्बल ६ जाडजुड उंदीर बाहेर पडले होते..
--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
20 May 2009 - 11:17 am | स्वाती दिनेश
उंदीरनामा आवडला,
स्वाती
20 May 2009 - 12:14 pm | मॅन्ड्रेक
छानच .
at and post : janadu.
20 May 2009 - 1:09 pm | जयवी
सही.....मज्जा आली वाचताना !
त्याचं यथावकाश वृद्धापकाळाने निधन होईल अशी शक्यता वाटून शाळेतल्या लोकांशी सल्लामसलत करायचं ठरवलं.....खास :)
20 May 2009 - 4:25 pm | सुप्रिया
सही जमलाय उंदीरनामा.
-सुप्रिया
देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.
20 May 2009 - 8:37 pm | श्रीयुत संतोष जोशी
बहुतेक जो जेरीस आणतो तो जेरी असंही वाटलं
हे लई भारी.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
21 May 2009 - 5:11 am | भाग्यश्री
वाह.. काय सुंदर लेख! (उंदीर नव्हे!).. काही काही वाक्यं तर मस्त जमली आहेत! पहीला पॅरा ग्रेट!
www.bhagyashree.co.cc
21 May 2009 - 8:10 am | पल्लवी
मस्त!
21 May 2009 - 12:29 pm | अश्विनि३३७९
:) बाहेर जाऊन मरण्याचं काम उंदीर स्वतःचं स्वतःच करणार असल्याने हा कामाची समान वाटणी असलेला पर्याय मला
सर्वाधिक पटला.
मजा आली ... :)
21 May 2009 - 8:00 pm | अबोल
पण हवाबाणची दोन अख्खी पाकीटं संपवूनही खोट्याखोट्या उंदराकडून झालेला माझा खर्राखुर्रा पोपट मात्र अजूनही माझ्या पचनी पडलेला नाही हे खुपच मस्त.
22 May 2009 - 5:09 pm | सुबक ठेंगणी
सगळ्यांनाच प्रतिसादाबद्द्ल मनापासून धन्यवाद.
वाचायला कुणी असलं की (पोपट झाला असला तरी) लिहायला खूप मजा येते! ;)