ओढ माहेरची

जयवी's picture
जयवी in जनातलं, मनातलं
17 May 2009 - 4:02 pm

नुकतं लग्न होऊ दे नाहीतर लग्नाची पंचवीस वर्ष होऊ देत……. माहेरी जायचं म्हटलं की एक आगळाच आनंद होतो…….आईला आणि लेकीलासुद्धा. आपल्या कोडकौतुकात वाढलेली लेक एकदम दुस-याला देऊन टाकायची आणि मग वर्षातून किमान एकदा तरी तिला भेटायची इच्छा कुरवाळत कुरवाळत दिवस पुढे ढकलायचे. “निघाले आज तिकडच्या घरी….” म्हणणा-या लेकीला डोळ्यात साठवून अश्रूंच्या पडद्यातून निरोप द्यायचा आणि तिच्या वाटेकडे डोळे लावून बसायचं.

आपल्या भारतीय संस्कृतीतच असतं मात्र हे असलं जीव लावणं. सगळं आयुष्य मुलांभोवती गुंफ़णं. त्यांच्यापलीकडे विचारच करायचा नाही. पूर्ण आयुष्यभर त्यांच्यासाठीच कमवायचं आणि ते व्यवस्थित मार्गी लागले की मगच आपला विचार करायचा. पण तोपर्यंत आयुष्य संपत आलेलं असतं. फ़क्त स्वत:साठी जगणं आपल्या संस्कृतीतच नाहीये. त्यात आई म्हणजे तर कळस! खरंच आपल्या आई – बाबांच्या पिढीसारखं आपल्याला रहाता येईल का…..?

आजकाल कुटुंब इतकी छोटी झालीयेत ना की पाहुणे म्हणून कोणाकडे रहायला जाणं वगैरे सगळं बंदच झालंय. येऊन जाऊन एक नाहीतर दोन मुलं, शिक्षणासाठी दूर कुठेतरी जाणार….तिकडेच नोकरी आणि छोकरी पसंत करुन तिथेच स्थायिक होणार. मग आई-वडील, नातेवाईक ह्यांचा गोतावळा आपोआपच दूर होणार. नाही म्हणायला वर्षा दोन वर्षातून आई-वडीलांना असतं बरं का तिकीट ! ३-४ वर्षातून एकदा देशात यायचं….त्यातला जास्तीत जास्त वेळ जाणार बॅंकेची कामं, शॉपिंग मधे. शिवाय तिकडल्या मित्रांच्या घरी भेटी, त्यांच्यासोबत ठरलेले कार्यक्रम…..! ह्या सगळ्यात आपल्या आई-बाबांच्या वाटेला कितीसा वेळ उरतो?

इकडे यायच्या ३-४ महिने आधीपासून आईची आपली धावपळ सुरु असते…. माझ्या लेकीसाठी हे करु दे…….माझ्या नातवासाठी ते करु दे….! पण हे सगळं कौतुक करुन घ्यायला खरंच आपण वेळ काढतो…..? किती आत्मकेंद्रीत झालंय ना सगळं….!

“घाल घाल पिंगा वा-या, माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात…….” म्हणणा-या लेकीचा हळुवारपणा आजकाल कमी झालाय का…? आईच्या कुशीत शिरुन तिच्याकडून कोडकौतुक करुन घ्यायला तरी वेळ उरलाय का? फ़क्त आपल्या माहेरपणासाठी माहेरी जायचं….पण आपल्या आईलासुद्धा आपल्याशी खूप काही बोलायचं असेल…. मन मोकळं करावंसं वाटत असेल ह्याचा विचार किती वेळा येतो मनात? आपली लेक आता सुखानं संसार करतेय ह्यात खूप खूप सुख असतं पण त्या सुखात रमलेल्या आपल्या लेकीशी थोडा वेळ काढून आपल्या मनातलं पण खूप काही सांगायचं असतं, विचारायचं असतं… काही निर्णय घ्यायचे असतात. ह्यासाठी मात्र तिला उरल्यासुरल्या वेळात सगळं कसंबसं बसवायचं असतं. खरंच लग्न झाल्यावर इतक्या परक्या होतात का मुली……..की आपल्या आई-बाबांसाठी वेळ सुद्धा अगदी मोजून मापून द्यावा लागावा. कितीतरी अशा गोष्टी असतात की ज्या सगळ्यांच्या समोर बोलता येत नाहीत, त्या रात्री जागूनच बोलायच्या असतात.

आता जाणार आहे भारतात...... भली मोठी कामाची यादी घेऊन. पण आता असं वाटतं…. कधीतरी फक्त आईसाठीच भारतात जावं. तिच्याकडे तिचं मन भरेपर्यंत रहावं. तिचं पोट भरेपर्यंत गप्पा कराव्या….तिला आराम द्यावा…. आयुष्यभर केलेली तिची तडतड आपल्या सहवासानं विसरायला लावावी. तिला तिच्या आवडीचं करुन खायला घालावं....!!

मुलं लहान आहेत तोवर हे जरा कठीणच आहे. पण तोपर्यंत दुधाची तहान ताकावरच भागवावी लागणार आईला !!

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

सायली पानसे's picture

17 May 2009 - 4:07 pm | सायली पानसे

शब्द आणि शब्द खरा आहे... डोळ्यात पाणी आला वाचुन आणि घरचि आठवण पण... मी पण जाणार आहेच लवकर आता घरी.

पर्नल नेने मराठे's picture

17 May 2009 - 4:15 pm | पर्नल नेने मराठे

काय बोलु हिच खन्त आहे मनाला...आताच एका मित्राला बोलले कि कधि वेळ मिळनार आणी कधी आइ कडे जाणार.
माझ्या मनातले ओळ्खुन शब्द लिहिले गेले आहेत असेच वाट्ले...
चुचु

समिधा's picture

18 May 2009 - 9:42 am | समिधा

मलाही असच वाटतय कधी भेटणार आईला. खुप ओढ लागलीय माहेरची
ताई तु सगळ्याच मैत्रिणींच्या मनातल लिहल आहेस गं

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

मीनल's picture

17 May 2009 - 4:27 pm | मीनल

सहमत
जमल तर भेटू तिथे सा-याजणी. पण आपपल्या आयांसकट. कशी आहे आयडिया?
मिपा मायलेकी कट्टा!

मीनल.

सहज's picture

17 May 2009 - 4:17 pm | सहज

>पण आता असं वाटतं…. कधीतरी फक्त ....!!

लवकरात लवकर म्हणता तशी कृती करायची वेळ यावो हीच शुभेच्छा!

लवंगी's picture

17 May 2009 - 4:30 pm | लवंगी

:( मीपण ताकावरच भागवते आहे तहान.. म्हणून आठवड्यातून १-२ वेळा २-४ तास फोनवर आम्ही गप्पा मारतो. विषयांची कधी कमतरता पडतच नाहि.

विसोबा खेचर's picture

17 May 2009 - 5:08 pm | विसोबा खेचर

पण आता असं वाटतं…. कधीतरी फक्त आईसाठीच भारतात जावं. तिच्याकडे तिचं मन भरेपर्यंत रहावं. तिचं पोट भरेपर्यंत गप्पा कराव्या….तिला आराम द्यावा…. आयुष्यभर केलेली तिची तडतड आपल्या सहवासानं विसरायला लावावी. तिला तिच्या आवडीचं करुन खायला घालावं....!!

सुंदर..!

तात्या.

प्राजु's picture

17 May 2009 - 7:03 pm | प्राजु

सध्या आई इकडे आहे.. तिला एकटेपणा जाणवू नये याची मी काळजी घेते आहे.
तिला इथल्या प्रकारचे नवनवे पदार्थ खाऊ घालते आहे स्वतः बनवून.
लेख आवडला जयूताई.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

17 May 2009 - 7:39 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला आणि हळवा करुन गेला जयवी,
स्वाती

चतुरंग's picture

17 May 2009 - 8:21 pm | चतुरंग

असंच होतं बर्‍याचदा.

चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2009 - 9:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कधीतरी फक्त आईसाठीच भारतात जावं. तिच्याकडे तिचं मन भरेपर्यंत रहावं. तिचं पोट भरेपर्यंत गप्पा कराव्या….तिला आराम द्यावा…. आयुष्यभर केलेली तिची तडतड आपल्या सहवासानं विसरायला लावावी. तिला तिच्या आवडीचं करुन खायला घालावं....!!

मॅम ! मस्त लिहिलंय !

मिथिला's picture

18 May 2009 - 4:28 am | मिथिला

लेख आवडला.... हळवा करुन गेला.

रेवती's picture

18 May 2009 - 7:54 am | रेवती

कधीतरी फक्त आईसाठीच भारतात जावं.
हे कधी शक्य होइल का?
माझी आई म्हणते की तिचे घर हे माझ्यासाठी हॉटेल आहे.... सामान टाकले कि निघाले सासरच्या नातेवाईकांना भेटायला...
मागच्या वर्षी मात्र आई माझ्याकडे चार महिने होती व तिचे पथ्यपाणी (बाबांचेसुद्धा) सांभाळून भरपूर पदार्थ करून घातले...
शेवटी तेच कंटाळले. माझे थोडेतरी समाधान झाले.
रेवती

क्रान्ति's picture

18 May 2009 - 10:13 pm | क्रान्ति

खास लिहिलंस जयवीताई!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

श्रीकृष्ण सामंत's picture

18 May 2009 - 10:55 pm | श्रीकृष्ण सामंत

लेख सुंदर आहे.
मला जरी नाही जमलं तर तू तरी जा!
"जाss रे पांखरा! माझिया माहेरा जा!"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

पिवळा डांबिस's picture

19 May 2009 - 2:04 am | पिवळा डांबिस

आईच्या कुशीत शिरुन तिच्याकडून कोडकौतुक करुन घ्यायला....
आई आहे तुम्हाला!
आमच्यासारख्यांनी काय करायचं हो?
:(

निवेदिता-ताई's picture

9 Feb 2011 - 7:34 pm | निवेदिता-ताई

अगदी बरोबर रे...माय मा़झी मला दिसणारच नाही आता...गेलीय दुरच्या प्रवासाला.
डोळे पाणावले बघा.

स्वाती राजेश's picture

19 May 2009 - 2:05 am | स्वाती राजेश

प्रत्येक सासुरवाशीणीच्या मनातील हे विचार आहेत...मग ती भारतात असो वा भारताबाहेर..

खरेच फक्त आईसाठी...कधीतरी फक्त आईसाठीच भारतात जावं. तिच्याकडे तिचं मन भरेपर्यंत रहावं. तिचं पोट भरेपर्यंत गप्पा कराव्या….तिला आराम द्यावा…. आयुष्यभर केलेली तिची तडतड आपल्या सहवासानं विसरायला लावावी. तिला तिच्या आवडीचं करुन खायला घालावं....!!
ही तुझी ईच्छा लकरच पुर्ण होवो... :)

मस्त लेख, हळवा करून गेला...

जयवी's picture

22 May 2009 - 3:24 pm | जयवी

मनापासून धन्यवाद :) आईची ओढ सगळ्यांनाच अशी हळवी करुन जाते ना......!!

भाग्यश्री's picture

23 May 2009 - 1:26 am | भाग्यश्री

भारतात गेल्यावर कसं होईल माहीत नाही(अजुन लग्न झाल्यापासून माहेरीच गेले नाही मी! :((( अमेरिकेला येण्याचे तोटे!).. पण मी आईबाबा इथे माझ्याबरोबर महीनाभर राहीले..दादाकडे होते तेव्हा त्यांच्याबरोबर, केवळ त्यांच्याचसाठी राहून आले ८ दिवस! इतकं रिलॅक्स्ड, मला व आईला कधीच वाटले नसेल!
जयवि खूप सुरेख लिहीलंयस, ऍज युज्वल! :)

www.bhagyashree.co.cc

संदीप चित्रे's picture

23 May 2009 - 1:50 am | संदीप चित्रे

माहेर म्हणजे बायकांच्या मनातला एक हळवा कोपरा असतोच.
खरंतर तू लिहिलेल्या पहिल्या वाक्यातच सगळ्या लेखाचं सार सामावलंय :)

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

चित्रादेव's picture

23 May 2009 - 6:43 am | चित्रादेव

>>कधीतरी फक्त आईसाठीच भारतात जावं. तिच्याकडे तिचं मन भरेपर्यंत रहावं. तिचं पोट भरेपर्यंत गप्पा कराव्या….तिला आराम द्यावा…. आयुष्यभर केलेली तिची तडतड आपल्या सहवासानं विसरायला लावावी. तिला तिच्या आवडीचं करुन खायला घालावं....!! <<

अगदी हेच हेच वाटत असते करावेसे. फक्त आई अन मी ,दुसरे अजिबात कोणीच नको. ऑफेसला द्यावी सुट्टी ठोकून,सकाळ संध्याकाळ फक्त तिच्या मनासारख्या गोष्टी कराव्या. तिला चांगले पदार्थ करून घालावे, मसाज पार्लरला घेवून जावे. एखादा मस्त पिक्चर पहावा. तिच्या बरोबर गाण्याच्या भेंड्या खेळाव्या , तिला तिच्या आवडिची गाणी म्हणायला सांगणे तिची आवड आठवून,लहानपणी तिला आपण दिलेल्या त्रासाची एकदम कबूली देवून टाकावी. रात्री तीला घट्ट मिठी मारून झोपी जावे तोच तोच तिच्या पदराचा वास घेत जो लहानपणी सुख द्यायचा कुशीत झोपल्यावर.....

पण छे! भारतात गेल्यावर आपलीच कामे खूप आणि त्यात लग्नांनंतर तर आणखी एक जबाबदारी पाड पाडायची असते.
जिने आपल्या लहानपणी झटून इतके केले असते ना आणिए आपण काय करतो ह्याची खंत वाटते विचार करून.. आता तर माझ्या आईला विमान प्रवास झेपत नसल्याने मला कधी वेळ मिळेल तेव्हा जाईन आणि असे माझे स्वप्न पुरे करेन. कधी कधी भितीने उगाच जीव तूटतो की कधी हे छोटेसे स्वप्न पुरे होइल?
हे पप्पांसाठी सुद्धा वाटते हो... पण तेव्हा दोघ्(आई व पप्पा एकत्र असले तर मज्जा असे वाटते).

जयवी, तुमच्या लेखाने एकदम मनातील विचार जागे झाले....