तसे आम्ही अप्रवासी. पण मुलीच्या अक्षरनंदन शाळेतल्या मैत्रिणी व त्यांचे पालक यांच्यामुळे कोयनानगर अभयारण्यात जायचा बेत ठरला. उत्साही पालकांमध्ये मित्र असल्याने गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणुन आम्ही समाविष्ट झालो. आम्ही माणसाळलो हे पाहुन त्यांनाही आनंद झाला. इकडची काडी तिकडे करावी लागणार नसल्याने आमचीही ना नव्हती. हं आता वसंतव्याखानमालेतील एका मित्राचे व्याखान नेमके त्याच वेळेला असल्याने त्याचा बळी द्यायचा आम्ही ठरविले.(त्याचा म्हणजे व्याखानाचा मित्राचा नव्हे).
पुण्याहुन नियोजित ट्रॆव्हलर गाडीने आम्ही पाच कुटुंबे सोळानग पहाटे साडेपाच म्हणता म्हणता साडेसहाला निघालो. आमी किन्नर शीट पकडली. पुणे- सातारा रोडने अर्थात राष्ट्रीय महामार्ग क्र ४ ने प्रवास चालु केला.वाटेत शिरवळ जवळ लोकांनी वडापाव खाल्ला. आम्ही मात्र लाडू खाल्ले. पुणे ते सातारा साधारण ११० किमी आहे.तिथपर्यंत तीन टोलनाके आहेत. साता-याच्या पुढे उंब्रज ३२ किमीवर आहे तिथुन पाटण कडे जाणारा रस्ता उजवीकडे फुटतो. वाटेत लगेचच थोडे पुढे चाफळला जाणारा फाटा आहे. तिथुन चाफळ ५ किमी आत आहे. तिथे नदीकिनारी राममंदिर आहे, समर्थरामदासांची ध्यानगुंफा आहे, दासमारुती आहे. तिथे जाताना आम्ही भेट दिली. तेवढेच रामाला दर्शन देउन याव म्हणल. मंदिराचा जीर्णॊद्धार झाला असावा. पुरातन वाटले नाही. गाभा-यात मुलींनी मोबाईल कॆमेरा यांचा दंग्यासह क्लिकक्लिकाट केला. पुजारी रागावले. इथे फोटॊ काढायचे नाहीत. बाहेर तशी सुचनाही लिहिली होती. मीही पुजा-याला बरे वाटावे म्हणुन मुलींना रागावलो " ए फोटो काढला तर देवाचा कोप होतो बर का!" अर्थात यात मुलींना रागावण्यापेक्षा पुजा-याला टोमणा होता. मंदिराचे व्यवस्थापन बिर्ला ट्रस्ट कडे होते. भक्त निवासही तिथे उपलब्ध दिसले. चाफळवरुन आम्ही कोयनानगरच्या दिशेने निघालो. ३३ किमि वर पाटण हे तालुक्याचे गांव. १० किमी थोडे पुढे गेले कि कोयनानगरकडे रस्ता अगदी सरळ जातो. याही रस्त्यावर जिल्हापरिषदेचे एकुण दोन ठिकाणी टोल द्यावे लागतात. कोयनानगरला पोचल्यावर श्रमजीवी संस्थेचे श्री कोळेकर आम्हाला न्यायला आले होते.एव्हाना साडेअकरा वाजले होते. वनखात्याचा परवाना, बोटीची व्यवस्था, निवासाची ब्यवस्था त्यांनी केली होती. एवढ्या उन्हात स्ट्यांडवर काहींनी चहा घेतला तर आम्ही ताक घेतले. कोयनाधरणालगतच्या एका ठिकाणाहुन आम्ही अवसरी नावाच्या एका गावाजवळ धरणातुन बोटीने जाणार होतो. गाडी धरणाजवळ सशुल्क गाडीतळावर पार्क केली.बोटीने एक तास अंतरावर कोयना अभयारण्याच्या विश्रांतीगृहाच्या शेजारीच "श्रमजीवी" संस्थेचे निवासी पाहुणालय आहे. अवसरी गाव प्रत्यक्ष तेथुन एक तास पाउल वाटेने आत आहे. अवसरी व तत्सम बावीस गावात श्रमजीवी संस्थेचे स्वावलंबी प्रकल्प चालतो. बचतगट, महिलाउद्योग यासारख्या उपक्रमातुन. त्यांनी कामाचे जाळे निर्माण केले होते.संस्थेकडेच बोटी आहेत. काही दानशुर व्यक्तींच्या मदतीने एक जलद होडीही नुकतीच घेतली होती. अवसरी गावाजवळील डोंगरावर भरपुर पवनचक्क्या आम्हाला दिसल्या. येथुन वीजनिर्मिती होउन ती साता-यातील औद्योगिक वसाहतींना वीज पुरवली जाते अशी माहिती कोळेकरांनी दिली. कोळेकर स्थानिक असल्याने येथील परिसराची चांगलीच माहिती त्यांना होती. वाटेत ती ही माहिती देत होते. ६४ किमी चा हा कोयना बॆकवॊटर महाबळेश्वरजवळील तापोळा पर्यंत प्रामुख्याने होता. आमची बोट किना-याला लागली. पाण्याची पातळी खाली असल्याने आम्हाला थोडे चढुन पाहुणालयात यावे लागले. रखरखीत उन्हात आजुबाजुचा हिरवा रंग सुखद वाटतो. व्हरांडा काही खोल्या, फणसाखालचे सारवलेले अंगण व चौथरे, बाजुला भाज्या व फुलझाडांच्या बागा थोडे वरती गेल्यावर जगंलाचा भाग.
परिसरात वीज आलेली होती. दूरसंचार फक्त बीएसएनएल ची ग्रामीण भागासाठी असलेली तरंग योजनाच. मोबाईल इथे चालत नाही.दोनच पाहुणालये. एक वनखात्याचे व एक श्रमजीवी संस्थेचे. पाहुणालयाला शौचालय व स्नानालय होती.पुरेशी व स्वच्छ होती. त्यात नळ होते. लागणा-या कड्या होत्या. बादली, मग होते. पाणी तलावाचेच. मोटारीने वर एका सामाईक टाकीत नेउन नळाने आणलेले.
लोकांचे भरपेट व आमचे फक्त पुरेसे जेवण झाल्यावर झाडाखाली अंगणात पहुडलो. काहींचे पत्ते चालू झाले. आम्हाला त्यातल काही कळत नाही. आम्हाला फक्त भिकार सावकार गेम येतो. लहानपणी बहिणी व शहरातुन आलेले इतर नातेवाईक पत्ते खेळायचे.३०४, झब्बू, नाटेकाटे ठोम, लॆडीज, बदामसात,रमी अशी काहीशी विक्षिप्त नावे असलेले खेळ खेळायचे. आम्हाला खेळायला घ्यायचे नाहीत. त्याचा राग म्हणून आमी एखादा दुसरा पत्ता हळूच आडात टाकून द्यायचा. परिणामी त्यांचा खेळ थांबत असे.मग आम्हाला आनंद होत असे. ही ष्टोरी कर्णॊपकर्णी मंजिरी (बायको) ला माहित असल्याने तिने ते लोकान्ला सांगितले. परिणामी आम्हाला खेळायचा कुणी आग्रह केला नाही
जवळच एक भुभी झाडाखाली ओलसर मातीत पहुडली होती. आम्ही तिच्याशी 'जवळीक' साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले पण नंतर अल्पकाळातील सहाअस्तित्वातून मैत्रीच नात तयार झाल. वय लिंग, जात, धर्म, पंथ (कंपु) इत्यादि संकुचित संकल्पनांपलिकडच नात तयार झाल. सदस्याचा सहअस्तित्वाचा कालावधी पहाण्याची गरज नव्हती. 'नसलेली दुरी' केव्हाच गळून पडली. अगदी अहंकार गळून पडावा तश्शी. अस काही गळून पडल की कस मोकळ मोकळ वाटत ना? आमाला अस मोकळ वाटण्याचा अनुभव होताच. पुण्याच्या पेशव्यांच्या 'डिझाईन' सुविचाराची आठवण झाली. 'एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला कि त्याच सर्टिफिट तयार होत. सिन्स १९८४.' आम्हाला युनिवर्सिटीने दिलेला डिग्रीचा कागद पेशव्यांच्या हाती लागला कि काय असही क्षणभर वाटुन गेल होत. असो पण एकंदरीत भुभीच आन आमच चांगल जमुन गेल. लाजुन हासणे आन हासुन ते पहाणे मी ओळखून होतो सारे तिचे बहाणे. तिच्या अदाकारीचे आम्हाला हवे तसे अर्थ काढत आम्ही तिच्याशी तलावाच्या किनार्र्यावर नंतर गुजगोष्टी केल्या.
लोकांचा चहावाचुन जीव तळमळु लागला.उन अजुनही होते. आम्हाला चहाच्या कल्पनेनेच मळमळू लागले. एकदाच चहा आला. आम्ही मात्र थंड ताक प्यालो. परिसरात फिरुन आलो. जंगल व तलावाचा किनारा उन्हामुळे फारसा उल्हसित वाटला नाही. संज्ञा (आमची मुलगी) भुभुप्रेमी असल्याने तिने भुभुच्या पिल्लांचा शोध लावला होता. पिल्ले किना-याजवळील एका मोठ्या दगडाच्या खाली झालेल्या कपारीत होती. कित्ती गोंडस होती. आमच्या मगाच्या मैत्रीण भुभीचीच पिल्ले होती. त्यांचे निळसर झाक असलेले कोकणस्थी डोळे भिरभिरत होते. पण अगदी निरागसपणे. त्यातल्या एकाला उचलून त्याचे गारगार नाक आमच्या कानाला व गालाला लावले. अहाहा काय रोमांच आले! पिल्ल्लुही मिष्कील होत. हळुच कानाला चोखु लागलं.
सुर्य मावळतील गेल्यावर सगळ्यांबरोबर किना-यावर गेलो. किना-या वरुन सुर्यास्ताचे दृष्य कॆमेरात टिपले. सुर्योदय व सुर्यास्त या तर रोजच्याच घटना आहेत. आपण खर तर अशा प्रसंगांची स्मृती टिपत असतो.नोंद म्हणुन अथवा पुरावा म्हणुन. प्रौढी म्हणुन अथवा शिदोरी म्हणुन.
पाहुणालयात परत आल्यावर अंगणात बसुन गप्पा चालू झाल्य़ा. मुलींना मोबाईल घेउन दिले ते योग्य कि अयोग्य? आहार आणि प्रकृती, निवडणुका व राजकारण, भारतातील विषमता, रोजगाराच्या संधी, व्यावसायिक नितिमत्ता वगैरे वगैरे... मुलींनी त्या ऐकल्या. नंतर मोबाईल या विषयावर गॊसिपिंग केल्याचा आरोप आमच्यावर ठेउन 'एवढ असेल तर नव्हता द्यायचा घेउन' असा बाणा दाखवुन पालकांच्या नाकीनउ आणले. रात्री भरपेट जेवण झाल्यावर गप्पा मारत झाडाखाली अंगणातच झोपलो. गाद्या उशा पांघरुण यांची व्यवस्था होतीच. रात्रीच तारका विश्व पहुडल्या पहुडल्या दिसत होत. एवढ्या मोठ्या विश्वात आपण किती क्षुद्र आहोत अशा वैचारिक उवांनी डोके खाजु लागले.डोके खाजु लागले विचारांना अधिकच उत येतो.मग वाहवत जातो. दगडधोंड्यातुन वहाणा-या पाण्यासारखा. खगोलावरील 'पॊवर ऒफ टेन' या ज्ञानपटाची अनुभुती आली. 'मी अमुक, मी तमुक' ' तो/ ती स्वत:ला काय समजतो/ते' 'एकेकाला बघुन घेईन' 'याला/ हिला फाट्यावर मारीन, त्याला/ तिला फाट्यावर मारीन' 'असशील तू मोठा/ठी आम्हाला काय घेण आहे?' 'तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी' 'याल तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय' ' तुम्ही अक्कल शिकवायची गरज नाही' वगैरे वगैरे हे सगळ कुठुन येत? आपल्या मेंदुतील विचार व भावना हेच आपल विश्व. विश्व कितीही मोठ असो प्रसंगी ते (*) मध्ये कोंबता/ घालता येत. मग मोठ काय? विश्व कि विवक्षित ष्टार(*)? विचार करता करता झोप लागुन गेली.
पहाटे कोंबड्याच्या आरवण्याने, पक्षांच्या कुजबुजाटाने व जंगली किड्यांच्या किरकिराटाने जाग आली. हल्कासा व्यायाम व आन्हिके उरकुन जरा तलावाच्या किना-वरुन फिरुन आलो. सावकाश न्याहारी करुन बोटीने अर्धा तासाच्या अंतरावर असलेल्या अभयारण्यातील शिरशिंगे टेहळणी बुरुजावर गेलो. तिथे दाट अरण्य होते. सापाची कात दिसली.मुलींनी गोळा केली ती गळ्यात अडकवून जरा आत संचार करुन आलो. मुलींचे कॆमेरे सरसावुन फोटो काढणे चालू होते. पालकांचेही चालू होते. आमचा अशक्त स्मृतीपटलाचा olympus camera आम्हाला पुरवून पुरवून वापरायचा होता आणि इतरांचे कॅमेरे होतेच की. अरण्यात मनसोक्त भटकल्यावर परत पाहुणालयात आलो. जेवण करुन थोडेसे पहुडल्यावर जायला परत निघालो. महाबळेश्वरला जाण्याची कल्पना अव्यवहार्य ठरल्याने कुंभार्ली घाटाच्या घाटमाथ्यावर जाउन हॊटेलात चहा व सरबत घेतले. खरतर आम्ही निसर्ग सौंदर्य पहायला गेलो होतो. पण तिथे गेल्यावर विसरलो. येताना साताराजवळ माहुली म्हणुन नदीकिनारी अविकसित तीर्थक्षेत्र आहे तिथे देवळांची मालिका पाहिली. पेशव्यांच्या काळातील होती. चांगली शिल्पकला १७८० सालातील असलेले देउळ आम्ही पाहिले. शंकराची पिंड , नंदी व कासव अगदी सरळ रेषेत असतात हे देवळात पाहिले. आवर्जून भेट देण्यासारखे.
अंधार पडायला लागल्याने अधिक पहाता आले नाही. तिथुन पुण्याच्या दिशेने रवाना झालो. वाटेत विरंगुळा नावाच्या खाद्यपेय केंद्रात लोकांनी हादडले. सेल्फ सर्व्हिस त्रासदायक वाटली. ग्राहकांपेक्षा केंद्रचालकांना ती अधिक सोयीची असते. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म असा संदेश देणा-या खाद्य संस्कृतीला धार्मिकतेचा पुळका कसा काय येतो हे समजत नाही. जिव्हाचौचल्याला जरा धार्मिक अधिष्ठान दिले कि विपणन कसे सोपे जाते. भूक लागल्यावर काही चविष्ट खाता पिताना 'ज्यांना दोनवेळच अन्नदेखील धड मिळत नाही असे लोक आपल्या भारतात/ जगात आहेत' हा विचार नेहमीच अस्वस्थ करुन जातो.पण तो बोलून दाखवला कि इतरांचा रसनाभंग होतो म्हणुन आम्ही तो मनातच ठेवतो. इतरांना त्रास कशाला? आपल्या गरजेपुरतच आपण खावं हे उत्तम. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा असे सांगणारे व्यंकटेशस्त्रोतातील आर्त शब्द मनातल्या मनात विरुन जातात.खाद्यसंस्कृतीसोबत ओबेसिटीने देखील भारतात प्रवेश केला आहे. आता दाही दिशांचे अन्न एकाच बोटाच्या दिशेला मिळत." फूडमॊल".बटर रोटी खाईन जाडजूड होईन मग तू मला खा असे सांगत रोगालाही थोपवणा-या म्हाता-या इथेच दिसतात.
यावज्जीवम सुखं जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत । भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत: ॥
( आयुष्य आहे तोपर्यंत सुखाने जगाव, कर्ज काढुनही तुपरोटी खावी एकदा देहाची राख झाली म्हणजे परत कोण येणार आहे?)
अस म्हणत आबालवृद्धांना सामावून घेणारे ही बकस्थळे राष्ट्रीय महामार्गांवर स्वागतास सज्ज असतात. भविष्यात खाद्यालय व रुग्णालय ही परस्पर संगनमताने व्यवसाय करतील असे आमचे भाकीत आहेच. ती काळाची गरज देखील आहे.
विरंगुळा संपल्यावर आम्ही पुण्याच्या दिशेने फायनली कूच केले. रात्री साडेदहाला पुण्यात पोचल्यावर घरी शेषधारी विष्णुसारखा पहुडलो. बायकोने चरणकमलांना गुदगुल्या केल्यावर श्रमपरिहार झाला. यासारख सुख नाही.
प्रतिक्रिया
2 May 2009 - 10:58 pm | अवलिया
हॅ हॅ हॅ
मस्तच !!!
:)
--अवलिया
2 May 2009 - 11:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त सफर, मस्त वृत्तांत !
अवांतर : तुमचे भुभुप्रेम काही कमी होत नाही. :)
2 May 2009 - 11:11 pm | यशोधरा
छान लिहिले आहे. आवडले.
5 May 2009 - 4:48 am | चित्रा
निराळी धाटणी.
2 May 2009 - 11:18 pm | वेताळ
सुंदर वृत्तांत.....कोयनानगर धरण परिसर खुपच छान आहे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
2 May 2009 - 11:27 pm | बिपिन कार्यकर्ते
हॅहॅहॅ!!! छानच लिहिलंय रे भौ... तुझे टोलनाक्याचे सटल टोले, पुजार्यावरची टिप्पणी वगैरे छानच. तुला बरे सगळीकडे भूभ्भे भेटतात. सध्या आमच्याकडे पण डिमांड चालू झालीये...
अवांतर: पाय पूर्ण बरा झालेला दिसतोय....
बिपिन कार्यकर्ते
3 May 2009 - 12:09 pm | प्रकाश घाटपांडे
हॅहॅहॅ
भुभुंशी 'जवळीक' आपोआप होते. थोडस भॉ केल कि झाल. त्याच त्यांनी केलेले डिकोडिंग मला अभिप्रेत असलेल्या अर्थाशी सुसंगत असत.माणसांबाबत ती गणित बदलतात. कारण डिकोडिंग बदलत. अनिल अवचट आपल्या 'सृष्टीत....गोष्टीत ' या पुस्तकात दगडधोंडे, झाडे फुले पाने यांच्याशी पण बोलतात. त्यांचा हा इतरांना वाटणारा विक्षिप्तपणा त्यांच्या प्रकृतीशी सुसंगत आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
3 May 2009 - 12:07 am | प्राजु
भूभी आणि तिची पिल्लं मस्तच!
टोले लगावत केलेलं खुमासदार वर्णन आवडलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 May 2009 - 5:57 am | यन्ना _रास्कला
अगदी लेकुरवाला बोल्तात की कायससा..
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
3 May 2009 - 6:58 am | सहज
एवढ्या उन्हात चहा..., सदस्याचा सहअस्तित्वाचा कालावधी..., नोंद म्हणुन अथवा पुरावा म्हणुन...,वैचारिक उवांनी डोके खाजु लागले...,आपल्या मेंदुतील विचार व भावना हेच आपल विश्व..,भविष्यात खाद्यालय व रुग्णालय ही परस्पर संगनमताने...
मस्तच!!
बायकोने चरणकमलांना गुदगुल्या केल्यावर श्रमपरिहार झाला. यासारख सुख नाही.
+१
एक प्रौढ प्रवासवृत्तांत खूप आवडला. :-)
3 May 2009 - 8:18 am | भडकमकर मास्तर
'मी अमुक, मी तमुक' ' तो/ ती स्वत:ला काय समजतो/ते' 'एकेकाला बघुन घेईन' 'याला/ हिला फाट्यावर मारीन, त्याला/ तिला फाट्यावर मारीन' 'असशील तू मोठा/ठी आम्हाला काय घेण आहे?' 'तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी' 'याल तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय' ' तुम्ही अक्कल शिकवायची गरज नाही' वगैरे वगैरे हे सगळ कुठुन येत?
वा... तारे पाहून आलेले विचार मस्तच...
भुभीचे फोटोही छान...
आणि अत्र्यांच्या तो मी नव्हेच मधले " अनंतकोटी ब्रह्मांडनायक भगवान श्रीकृष्णावतार श्री राधेश्याम महाराज " यांचे माहुलीचे मंदिर बघायला मिळाल ..आनंद वाटला...
... मात्र फूडमॉलमधल्या बटररोटी खाणार्या म्हातार्या पाहून तुम्हाला इतके का वाईट वाट्ले? :).. हॅहॅहॅ.... अगदी अध्यात्मिक झालात ते.. !
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
3 May 2009 - 8:44 am | क्रान्ति
मस्त प्रवासवर्णन. लिखाणाची शैली खूपच खुमासदार! भूभू कंपनीचे फोटो मस्तच. [बाकीचेही छान आहेत.] :)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
3 May 2009 - 8:49 am | विनायक प्रभू
वर्णन
3 May 2009 - 8:57 am | आनंदयात्री
मस्त प्रवासवर्णन काका.
आवडले.
>>आमी किन्नर शीट पकडली
=)) हि स्टाईल तुमची युनिक बरका !!
मज्जा आली लेख वाचतांना.
3 May 2009 - 9:06 am | प्रकाश घाटपांडे
आजच्या दै. सकाळ मध्ये थंड पर्यटन हा मामू यांच्या कॉफी शॉप सदरातील लेख खिशाला गारवा देउन गेला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
3 May 2009 - 9:29 am | चन्द्रशेखर गोखले
प्रवासवर्णन अतिशय सुंदर लिहिले आहे. आपली लिहिण्याची हतोटी पण छानच. प्रवासवर्णन करता करता मनुष्य स्वभावावर केलेल्या भाष्यांमुळे या लेखाचा दर्जा उंचवला गेला आहे . या लेखासाठी आपले खास अभिनंदन !!
3 May 2009 - 1:02 pm | कुंदन
मस्त वर्णन.
फोटो पण लै भारी.
बर्याच वर्षात असा भटकायला गेलो नाही, त्यामुळे अंमळ हेवा वाटला.
3 May 2009 - 2:18 pm | श्रावण मोडक
छान. त्यात मध्येच दडलेले मनोगतदेखील!
3 May 2009 - 2:42 pm | चतुरंग
पाडत, टिपत, चाखत केलेले लेखन आवाल्डे (तुमचाच शव्द तुम्हाला ;) )!
त्यात नळ होते. लागणा-या कड्या होत्या. बादली, मग होते.
हे निरीक्षण मार्मिक आहे! (नाहीतर दरवा़ज्याला टेकून गाणं म्हणत म्हणत आंघोळ करावी लागते! :T )
भूभीप्रेम हे तुमचे अविभाज्य अंग आहे त्यामुळे त्याला पर्याय नाही!
मॉलमधल्या बटररोटीधारी म्हातार्यांनी तुमच्या डोळ्यांवर अंमळ गुटगुटीत आघात केलेला दिसतोय! :P )
प्रवासवर्णन आवडले.
चतुरंग
3 May 2009 - 3:21 pm | प्रकाश घाटपांडे
एकाने राष्ट्र गीत म्हणणे चालू केल्याने शेजारी नुकताच 'आत' गेलेल्या सदारजीचे वांदे झाले. राष्ट्रगीताला मान दिलाच पाहिजे ना! (होस्टेलवर ऐकलेला किस्सा) :O
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
3 May 2009 - 3:26 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
3 May 2009 - 3:09 pm | स्वाती दिनेश
छानच लिवलय की तुम्ही प्रवासवर्णन, आवडले.
स्वाती
3 May 2009 - 3:17 pm | सँडी
वाह वाह! मस्तच प्रकाशराव! प्रवासवर्णन आवडले.
फणस पाहुन तोंडाला पाणी सुटले.
4 May 2009 - 8:11 am | विकास
प्रकाशराव,
वर्णन मस्त आहे. कॉलेजच्या काळात कोयना धरण बघण्याचा योग आला होता. मात्र नंतर काही तेथे गेलेलो नाही. पण आपल्या लेखामुळे त्याची परत आठवण झाली...
फोटोंवर एक प्रश्न: अभयारण्य असून फोटोत मनुष्यप्राणीच का दिसतात बरं? ;)
बाकी चाफळच्या मंदीराबाबत (पुसट आठवणीप्रमाणे): त्या मंदीरातील मूळ मुर्ती ह्या समर्थ रामदासांना नदीत मिळाल्या होत्या आणि त्यांची त्यांनी प्रतिष्ठापना केली. स्वातंत्र्यानंतर ते मंदीर बिर्ला ट्रस्टने घेतले आणि तेथील श्रीराम-सीता-लक्ष्मण आणि हनुमानाची मुर्ती बदलून "बिर्ला स्टाईल" मुर्ती आणायच्या होत्या. त्यावर विरोध झाला आणि केस कोर्टात गेली. नंतर तडजोड निघून बिर्लांकडच्या मुर्ती आणि मूळ मुर्ती अशा दोन्ही तेथे ठेवण्यात आल्या.
4 May 2009 - 11:58 am | विसुनाना
एकटेच अथवा समानशील-व्यसन असणार्या व्यक्तींबरोबर रहायला/भटकायला आदर्श जागा.
सर्वसामान्य मध्यममार्गी विचारधारेतील लोकांबरोबर वावरताना वेगळ्या धाटणीचे विचार असणार्या व्यक्तीची कुचंबणा लिखाणातून जाणवते.
अनेक ठिकाणी मुडपून घ्यावे लागते असे दिसते.
एकंदर तुम्ही हा प्रवास तुमच्या पद्धतीने जास्तीतजास्त 'एंजॉय' केलात हेही नसे थोडके.
4 May 2009 - 12:45 pm | परिकथेतील राजकुमार
लै भारी सहल !
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
4 May 2009 - 2:08 pm | पाषाणभेद
खरच कालच मला कोयनेच्या धरणाचा फोटो, फुगवटा बघायचा होता. आपण ईच्छा पुर्ण केली.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
4 May 2009 - 2:51 pm | मैत्र
मस्त प्रवासवर्णन... पाहुणालय हा शब्द झकास वाटला...
बटररोटी चापणार्या म्हातार्या बघून विचित्र वाटतं . मनाला त्रास होतो
भूक लागल्यावर काही चविष्ट खाता पिताना 'ज्यांना दोनवेळच अन्नदेखील धड मिळत नाही असे लोक आपल्या भारतात/ जगात आहेत' हा विचार नेहमीच अस्वस्थ करुन जातो...
मग लाखो रुपयांच्या शाही घरात, गरजेपेक्षा जास्त सोयी घेऊन, उच्चभ्रू वस्तीत अजूनच उच्चभ्रू सोसायटी निर्माण करून जागेचे वाढलेले भाव अजून कृत्रिम वाढवून ते पैसे बिल्डरला देउन राहताना -- कच्च्या घरात, पडक्या जागेत, राहणारे, दहा बाय दहाच्या खोलीत सहा पासून दहा किंवा मुंबइच्या चाळीप्रमाणे कितीही संख्येने राहणारे, स्वतःचं हक्काचं छप्पर असावं अशा आशेत आयुष्य घालवणारे लोक आठवतात का? बहुसंख्य जनतेला जगण्यापुरता धड निवारा मिळत नाही हे आठवतं का? तसं नसेल तर त्या बटररोटी खाणार्यांबद्दल काही वाटणं निरर्थक आहे.
शेजार नसलेल्या भिंती, तीन बाजूंनी ओपन घर असे जागेचा अपव्यय करणारे आणि अत्याधुनिक सोयींसकट असलेले घर घेताना, झोपण्यापुरती जागा मिळाली तर आनंद होणारी जनता आठवते का?
ओबेसिटी बरोबर ही विलक्षण विषमता आणि डोळ्यांवर आलेली ऐश्वर्याची गुंगी आणि उच्च वर्गीय वृत्तीची तुपकट चरबी हा तितकाच मोठा प्रॉब्लेम आहे.
ही विषमता सर्वत्र आहे. फूडमॉल पाहूनच जाणवली पाहिजे असे नाही. शोधायला लागलो तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यात पण ती पदो पदी दिसेल. यात फूड मॉल संस्कृतीचं समर्थन नाही. पण त्याकडे बोट दाखवताना स्वतःकडची चार बोटं नजरे आड करण्याचा विरोधाभास जाणवला इतकंच.
4 May 2009 - 3:24 pm | प्रकाश घाटपांडे
ब-याच वेळा मनाला विषमतेचा त्रास झाला कि आपण जगण्यातील विविधता म्हणुन सुसह्य करुन घेतो. काय करणार मित्रा? विकासरावांच्या उपक्रमावरील 'उदर भरण नोहे' धाग्याची आठवण आली. भुकेल्या नारायण चा प्रसंग कुठतरी मनावर कोरला गेला होता. त्यामुळे ते अधिक संवेदनशील पणे जाणवत असावे. आज घरातले उरलेले चांगले अन्न कोणा भुकेल्या जीवाला द्यायची सोय/उपलब्धता नाही म्हणुन संडासात टाकुन फ्लश करतानाही त्रास होतो. हे अन्न गावी असताना गाई -म्हंशीच्या दाण्यात (आंबोवण) टाकले जायचे. त्यामुळे वाया जात नव्हते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
5 May 2009 - 2:53 am | धनंजय
मजा आली.
भुभुकली पिले तर गोजिरवाणी आहेत.
5 May 2009 - 9:00 am | प्राची
घाटपांडे काका,सहजसुंदर लेख.
ह्यावेळी परीक्षेमुळे गावी जायला अंमळ उशीर होतोय.तुमचा लेख वाचला,फोटो बघितले,मन गावाची सैर करून आले.धन्यवाद काका.
अवांतरःशिवाजी महाराज आणि समर्थांची पहिली भेट जिथे झाली,ते ठिकाण चाफळपासून जवळच आहे.चाफळच्या पुजार्यांना विचारल्यावर ते रस्ता सांगतात.हे ठिकाणही अतिशय शांत असं आहे.चाफळपासून काही अंतरावर एक घळ आहे.समर्थांचं वास्तव्य तेथे होतं.त्या घळीच्या बाजूला एक कुबडी तीर्थ आहे.त्याची चाफळच्या पुजार्यांनी सांगितलेली आख्यायिका:शिवाजी महाराजांना तहान लागली तेव्हा तेथे पाण्याचा एकही स्त्रोत नव्हता,तेव्हा समर्थांनी तेथील दगडावर आपल्या कुबडीने प्रहार केला आणि तेथून पाण्याचा अखंड झरा येऊ लागला.म्हणून त्याला कुबडीतीर्थ असे नाव पडले.तो झरा उन्हाळ्यातही आटत नाही आणि उन्हाळ्यातही त्याचे पाणी अगदी थंडगार आणि गोड असते.