आपली करडी दुलई गुंडाळून ठेवून सृष्टी वसंताच्या स्वागताला सज्ज झाली. इवलाली कोवळी ,लालसर पालवी फांद्याफांद्यातून उमटू लागली. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निळ्याभोर आकाशाखाली पहाटेचे दवबिंदू पिऊन लुसलुशीत गवत बाहेर डोकावू लागले, त्यातूनच मग रानफुले डोलू लागली. चेरीचे वृक्ष मग नाजूक पांढर्या,गुलाबी फुलांनी मोहोरले. 'साकुरा' अंगणाअंगणात फुलू लागला तर मॅग्नोलियाच्या पांढर्या,गुलबट मादक अस्फूट कळ्यांनी फांदीनफांदी सजली. खट्याळ ट्यूलिप्सचे अर्धस्फुट कळे कोपर्याकोपर्यांवरच्या अंगणात दिसू लागले. सफरचंदाची झाडंही सफेद फुलांनी बहरली. एक सुवास वातावरणात कोंदू लागला. मधमाशा फुलांभोवती गुणगुणू लागल्या, पहाटेचा किलबिलाट वाढला आणि ससे आणि खारी हिरवळीतूनबागडताना दिसू लागले. हवेत सुखद गारवा असला तरी गारठा नव्हता, अशा वातावरणात दूरवर भटकायची लहर न येईल तरच नवल! आम्हीही 'तिसर्या डोळ्याला' बरोबर घेऊन सृष्टीचे हे नित्य तरीही नूतन वैभव टिपायला बाहेर पडलो. भटक भटक भटकलो, पाय आणि मन दोन्ही पुरे म्हणेपर्यंत.. फुलाफुलांच्या छब्या कॅमेर्यात आणि मनात बंदिस्त झाल्या.थकलो असलो तरीही खूप तरल भाव मनात घेऊन घरी आलो.
त्याच रात्री दिनेशला सर्दी होऊन अंगात कणकण आली. गारव्यात खूपच भटकलो होतो त्यामुळे असेल म्हणून क्रोसिन घेऊन तो झोपला. दुसर्या दिवशीही सर्दी तशीच, भरीला खोकला सुरू झाला आणि शिंकाही..आपल्या नेहमीच्या सिनारेस्ट्,कफ सिरप इ. वर काम भागवून तो हपिसात गेला. संध्याकाळी घरी आला तरी सर्दी,खोकला तसाच , घसाही खवखवू लागला. नाक चोक व्हायला लागले म्हणून व्हिक्सचा वाफारा, ऑट्रीविनचे डॉप्स आणि स्प्रे,हळद घालून गरम दूध इ. नेहमीचे हमखास उपाय सुरू केले. असाच आठवडा गेला तरी काही उतार पडेना, नाक बंद होतच राहिले. घशाची खवखव आणि खोकला, शिंकाही कमी झाल्या नव्हत्या, म्हणून मग डॉ़क्टरांकडे जायचे ठरवले. सुदैवाने इतके वर्षात कधीच इथल्या डॉक्टरांकडे जाण्याची वेळ न आल्यामुळे आमच्या आजीआजोबांच्या डॉक्टरांकडे जायचे ठरवले.
इस्टरच्या सुट्ट्या लागल्यामुळे डॉक्टरीणबाई १५ दिवसांच्या रजेवर होत्या.तिथल्या स्वागतकक्षातून दुसर्या डॉक्टरांचा पत्ता घेतला आणि अपॉईंटमेंट घेण्यात वेळ न घालवता सरळ तेथे जाऊन धडकलो. हीऽ गर्दी..सगळेजण सूंसूं तरी करीत होते नाहीतर खोकत तरी होते. 'साथ' आलेली दिसते असा विचार मनात करुन आम्ही आपले आमचा नंबर यायची वाट पाहत बसून राहिलो. जवळजवळ २ तासांनी आमचा नंबर लागला. डॉक्टरीणबाईंना साधारण कामचलाऊ इंग्रजी येत होते पण इंग्रजी तर सोडा जर्मनमध्ये बोललेले सुध्दा ऐकुन न घेता त्यांनी तपासायला सुरुवात केली. बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्याचे जाहीर करून अँटीबायोटिक्स लिहून दिली.एक कोर्स संपला तरी उतार पडेना,अँटिबायोटिक्सनी थकवा मात्र खूप आला म्हणून परत त्यांच्याकडे गेलो. ह्यावेळी भेटीची वेळ निश्चित करुन गेलो. परत एकदा तशीच प्रतीक्षा करून नंबर लागला.बाईंनी तपासणी करून फुफ्फुसं चांगली होत आहेत की तुमची ,असं म्हणत अजून एक अँटीबायोटिक्सचा कोर्स करण्याची गरज असल्याचे सांगितले आणि थकव्याकरता टॉनिक देते की असं म्हणत कागुद लिवायला सुरुवात केली. "अहो फुफ्फुसात प्रॉब्लेम नाहीये, घशात कफ नाहीये पण नाक मात्र बंद होतंय आणि खोकला आहे ,शिंकाही येतात बर्याच," दिनेशच्या ह्या बोलण्याला गंभीरपणे न घेताच त्यांनी टॉनिक घ्या आणि अँटिबायोटिक्सचा दिलेला कोर्स पूर्ण करा,बरे वाटेल असे सांगितल्यावर औषधाच्या दुकानातून टॉनिक घेऊन घरी आलो. अजून ४,५ दिवस गेले, टॉनिकं रिचवून आणि अँटिबायोटिक्स पचवून झाली तरी परिस्थिती जैसे थे। सर्दी कमी होत नव्हती.थकवा वाढतच होता. नाक सारखे सारखे बंद होऊ लागले की शेवटी ऑट्रीविनचे ड्रॉप्स आणि व्हिक्सच्या वाफार्याचाही उपयोग होईना. तात्पुरते बरे वाटायचे पण बाहेर जाऊन आला की परत येरे माझ्या मागल्या.. खोकला तरी लागायचा किवा नाक तरी बंद व्हायचे किवा कधीकधी दोन्ही एकदम होऊन जीव घाबरा व्हायचा!
सोमवारी रात्री जेव्हा नाक बंद होऊन तोंडाने श्वास घ्यायला लागला आणि धाप लागायला लागली तेव्हा म्हटलं आता पुरे झालं, इएनटी स्पेशालिस्टकडे जायचं सकाळीच.. इंटरनेटवरून युएस कॉन्सुलेटने शिफारस केलेला,इंग्लिश जाणणारा डॉक्टर शोधला आणि अपॉइंटमेंट वगैरे धाब्यावर बसवून आम्ही सकाळीच ८ वाजता दवाखाना उघडत असतानाच जाऊन धडकलो. तिथेही हेऽ पेशंट्स .. आमचे कार्ड स्वागतकक्षात देऊन प्रतीक्षा करत बसलो. डॉक्टरांना भेटल्यावर त्यांनी आधीचे सगळे केलेले उपाय ऐकून घेतले आणि मग तपासले. कानामध्ये आणि सायनसचा काही प्रॉब्लेम नव्हता पण घसा मात्र लाल आणि फुललेला होता. त्यांना काही वेगळी शंका येऊन त्यांनी ऍलर्जी टेस्ट करायचे ठरवले.
नर्शीणबाईंनी दिनेशच्या मनगटापासून कोपरापर्यंत पेनाने एक रेघ काढली आणि १०,१२ लहान लहान आडव्या रेषा काढून चौकोन तयार केले. त्यांना १,२,३ .. असे २२ पर्यंत नंबर दिले आणि एक पेटी उघडली. त्या पेटीत बर्याच लहान लहान कुप्या होत्या आणि प्रत्येक कुपीत कसल्यानाकसल्या लशी होत्या आणि त्यावर नंबर टाकलेले होते. हातावरच्या चौकोनात त्यातली एकेक लस थेंबथेंब टाकत तिने सगळे चौकोन भरले. लहानशा तीक्ष्ण चाकूने मग तिने प्रत्येक चौकोनात टोचले. रक्त येऊन त्यात ते लशींचे थेंब मिसळू लागले. अर्धा तास तसेच थांबून रहायचे होते. १० एक मिनिटातच चुरचुरायला लागले, काही चौकोनात खाज उठू लागली,लालसर पुरळ उठू लागले तर काही चौकोनात काहीच घडले नाही. अर्ध्या तासानंतर त्या हाताची तपासणी डॉक्टरांनी केली. २२ मधल्या १४,१५ चौकोनात लालसर पुरळ उठले होते त्यातही ४ चौकोनांतले पुरळ तीव्र होते. ही होती पोलन ऍलर्जी!
हवेतल्या परागणाचा हा मौसम असल्याने हे परागकण मोठ्या संख्येने हवेवर तरंगतात आणि दूरवर वाहून नेले जातात आणि जमिनीवर पडतात. पाऊस पडला की तेथे रुजतात आणि पुनरुत्पादन घडवतात असे शाळेतल्या विज्ञानाच्या पुस्तकात वाचले होते आणि ह्या हंगामात उडणार्या म्हातार्या पाहतही होतो. आमच्या काही मित्रांना पोलनऍलर्जी होतीही पण इतक्या वर्षात आम्हाला दोघांनाही हा त्रास न झाल्यामुळे हा सगळा पोलन ऍलर्जीचा प्रताप आहे हे समजलेच नाही. तसे आम्ही डॉक्टरांना सांगितलेही. ह्या ऍलर्जी मागचे कारण शोधू पाहता असे समजले की ह्या वर्षी हिवाळा बराच लांबला. वसंताचे आगमन जरा उशिराच झाले. एप्रिलमध्ये ० ते २ अंश से पासून एकदम १८,२० अंशापर्यंत तापमान एकदम वाढले. त्यामुळे अनेक प्रकारचे पोलन जे मार्चपासून परागण करतात ते आणि एप्रिलमधले पोलन असे सारेच एकदम फुटून हवेत पसरले. हवेमधील परागणाचे प्रमाण एकदम आणि लक्षणीयरीत्या म्हणजे नेहमीच्या अडीच ते तीनपट वाढले आणि बर्याच जणांना, ज्यांना पूर्वी हा त्रास नव्हता त्यांनाही ह्यावर्षी हा त्रास झाला.
" काही काळजी करु नका. पाऊस पडला की पोलन खाली बसतील मग हा त्रास होणार नाही. तोपर्यंत त्यांचा संपर्क टाळता येईल तितका टाळा. बाहेर जाताना नाका,तोंडावर मास्क बांधून जा." डॉक्टर म्हणाले. "पुढे काळजी घेऊच पण आत्ता आहे तो त्रास कमी व्हायचे काय? काही गोळ्याबिळ्या देतो की नाही हा बाबा?" आमच्या मनातले विचार वाचल्यासारखे डॉक्टरांनी गोळ्या आणि स्प्रे चे प्रिस्क्रिप्शन लिहून दिले. २,३ दिवसातच दिनेशच्या बंद नाकपुड्या पूर्ण मोकळ्या झाल्या,खोकला कमी झाला आणि परिस्थिती आटोक्यात आली. तरी अजूनही परगकणांचे शत्रूसैन्य हवेत मोठ्या संख्येने मुक्त विहार करत फिरते आहे. केव्हा हल्ला होईल हे माहित नसल्याने तोंडाला रुमाल बांधून डाकू दिनेशसिंग होऊन दक्षतेने बाहेर पडतो आहे. बाहेर पडण्यापूर्वी हवामानखात्याच्या वेबसाइटवर हल्ली आवर्जून पोलनकाउंट पाहिला जातो.
वसंतातल्या सुंदर दिवसांना हे गालबोट लागले आहे. त्यामुळे ह्यावर्षी कलादालनात वसंताचे वैभव घेऊन येता आले नाही. पण थोड्याच दिवसात हे सारे परागकण खाली बसतील,रुजतील आणि इवलाली नवी रोपटीही पुढच्या वसंतापर्यंत दिसू लागतील. पुढच्या वसंताचे वैभव टिपायला बाहेर जाताना थोडी काळजी घेऊन बाहेर पडावं लागेल, इतकंच..
प्रतिक्रिया
27 Apr 2009 - 12:14 am | टारझन
हाउ फ्लॉलेस !! खत्रा !! चियर अप !!
27 Apr 2009 - 12:25 am | ऋषिकेश
वसंतसमये हे काय मधेच!! :(
आधी पहिला परिच्छेद वाचुन म्हटलं वा आता भन्नाट चित्रं दिसणार .. तेव्हा आधी लेख न वाचताच स्क्रोलवला.. मग लेख वाचला.
बाकी देव करो आणि दिनेशरावांची साडेपोलनसाती टळो आणि तुम्हि भुंगे जोडीने बागांमधे बागडून आम्हाला उरलेल्या फोटोंची मेजवानी मिळो ही सदिच्छा!
(यंदा मतदानात पोलिंग बुथ न पाहिल्याने "पोल"न चा त्रास झाला असेल का अश्या भन्नाट विचारात)ऋषिकेश
27 Apr 2009 - 5:14 am | चित्रा
दिनेशरावांची साडेपोलनसाती टळो आणि तुम्हि भुंगे जोडीने बागांमधे बागडून आम्हाला उरलेल्या फोटोंची मेजवानी मिळो ही सदिच्छा!
:)
असेच म्हणते.
27 Apr 2009 - 6:02 am | प्राजु
पोलन्स चा त्रास आम्हालाही झाला इथे खूप.. पण सुदैवाने इतकी वेळ आली नाही.
अजूनही थोडी सर्दी आहेच.
असो...
दिनेश भाऊजींना, लवकर बरे वाटूदे.. आणि वसंताचा खरा आस्वाद तुम्हाला जोडीनेच घेता येऊदे.. हीच प्रार्थना. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Apr 2009 - 8:10 am | प्रमोद देव
हा तर रुसंत!
दिनेश काळजी घे रे बाबा. आणि स्वाती तूही काळजी घे स्वतःची.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
27 Apr 2009 - 8:14 am | क्रान्ति
वेड्या वसंताने मांडला कहर
कसा सोसावा हा अवेळी बहर?
सुरुवात वाचून छान वाटलं होतं, पण पुढे वाचताना वसंताचं हे वेगळंच रूप दिसलं. काळजी घ्यावी.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
27 Apr 2009 - 9:50 am | दशानन
:)
काय लिहू !
स्वतःच त्रस्त आहे मी सुध्दा ;)
थोडेसं नवीन !
27 Apr 2009 - 10:07 am | चतुरंग
नाकावर मास्क बांधून जाणे योग्यच. ऍलर्जीवर अँटीहिस्टामीन औषधांचा वापर होतो आणि तात्पुरते बरे वाटते. मुख्य उपाय त्या ऍलर्जी आणणार्या घटकाशी संपर्क येऊ न देणे हाच असावा.
(लवकर बरा हो आणि आम्हाला फोटोंची मेजवानी दे पुन्हा!)
चतुरंग
27 Apr 2009 - 10:26 am | विसोबा खेचर
तरी अजूनही परगकणांचे शत्रूसैन्य हवेत मोठ्या संख्येने मुक्त विहार करत फिरते आहे. केव्हा हल्ला होईल हे माहित नसल्याने तोंडाला रुमाल बांधून डाकू दिनेशसिंग होऊन दक्षतेने बाहेर पडतो आहे. बाहेर पडण्यापूर्वी हवामानखात्याच्या वेबसाइटवर हल्ली आवर्जून पोलनकाउंट पाहिला जातो.
काळजी घ्या रे बाबंनो!
तात्या.
27 Apr 2009 - 1:18 pm | श्रावण मोडक
शुभेच्छा!
विषय चिंतेचा आहे. तरीही लेखन चांगले आहे.
1 May 2009 - 8:38 pm | बिपिन कार्यकर्ते
हेच म्हणतो...
ऍलर्जीची टेस्टिंग म्हनजे अघोरीच आहे प्रकार एकदम... चाकू काय, पिना काय, रक्ताचे थेंब काय.... यक्क....
बिपिन कार्यकर्ते
27 Apr 2009 - 1:48 pm | ठकू
स्वाती आणि दिनेश, दोघंही काळजी घ्या. ह्या परागकणांच्या त्रासाचा वाईट अनुभव माझ्यापाशीही आहे.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
27 Apr 2009 - 1:54 pm | शाल्मली
डीडींच्या सर्दी-खोकल्याचं मोठ्ठंच प्रकरण झालं तर..
हे पोलन्स् यावर्षी फारच त्रास देताहेत. आमच्या इथली काही लोकंही सर्दी-खोकल्याने अगदी हैराण झाली आहेत.
डाकू दिनेशसिंग- काळजी घ्या हो.. :)
--शाल्मली.
27 Apr 2009 - 2:53 pm | सुनील
लेख चांगला लिहिलाय. काळजी घ्या.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Apr 2009 - 8:52 am | यशोधरा
छान वर्णन केले आहेस स्वातीताई फुलांचे आणि वसंत ऋतूचे.
ह्या पोलनच्या त्रासापासून मात्र जपा दोघेही...
29 Apr 2009 - 4:32 am | मयुरा गुप्ते
सुंदर वर्णन,छान फोटो पण काळजी घ्या. अमेरीकेत आल्यावरच कळलं की परागकणां मुळे २ महीने सतत ऍलर्जी होऊ शकते. अमेरीकेत आल्यावर लगेच सर्दी ...म्हंट्ल मुंबई सारख्या वातावरणातुन एवढ्या स्वच्छ हवेत येऊन सर्दी कशी होऊ शकते.
--मयुरा.
29 Apr 2009 - 5:45 pm | स्वाती दिनेश
सर्वांनी दर्शवलेल्या जिव्हाळ्याबद्दल धन्यवाद,
स्वाती
1 May 2009 - 5:59 am | Nile
ह्या पोलन लेकाच्यांनी मला ही वात आणलायं! :| ३ महीने झाले तरि तिच गत. मला इतका त्रास झाल्यामुळे इतरांना होउ नये या साठी हा लेख प्रपंच.
चतुरंग यांनी सांगितल्या प्रमाणे antihistamine वापरा, पण परिणाम फार काळ राहत नाही.
माझ्या मामीने एक भन्नाट कल्पना सुचवली पहा तुम्हाला जमतेय का!
तुम्ही जिथे राहता त्या गावातील मध रोज एक चमचा असे घ्या काही महीने, यात स्थानीक पोलन असतात व त्यामुळे तुमचे शरीर त्याला immunity develope करतं. पुढ्च्या खेपेला त्रास होणार नाही. मुळात allergy चा होणारा त्रास हा शरिराचा प्रतिसाद असतो. काही लोक immunity suppresant ची इंजक्शन्स घेउन काम भागवतात.
आता प्रश्न उरला तो स्थानीक मधाचा, भारता सारखं थोडचं आहे? म्हणुन जर एखादे विद्यापीठ गावात असेल तर अग्री विभागात जाउन माहीति काढा कुठे मिळण्याची शक्यता आहे का. आमच्या इथे भारतासारखच लोक स्थानीक लोक कधी कधी रस्त्यावर विकतात असे कळले, शोध सुरु आहे. :)
कधी नव्हे ते वसंत नकोसा झाला आहे, पण It's summer time and the weather is fine :)
5 May 2009 - 1:12 am | बहुगुणी
स्थानिक मध मिळण्याची जागा म्हणजे साधारणतः दर आठवड्याला त्या त्या ठिकाणी भरणारा शेतकरी बाजार, अमेरिकेत बहुतेक शहरांमध्ये असे फार्मर्स मार्केट्स असतात. आणि यातल्या मध-विक्रेत्यांकडे स्थानिक मधात केलेल्या गोळ्याही (hard candies) असतात, जाता येता तोंडात टाकायला सोप्या:-)
5 May 2009 - 2:18 am | Nile
आजच सकाळी मला आठ्वडी बाजारांबद्द्ल कळले. बघुया मिळते का. पण हे लोक किरकोळ विकतात की फक्त ठोक?
प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद! :)
5 May 2009 - 9:38 pm | बहुगुणी
विक्री चालते, निरनिराळ्या साईझ मधल्या बाटल्या, गोळ्यांची पाकिटं वगैरे. ठोक विक्री मी तरी पाहिल्याचं आठवत नाही.
1 May 2009 - 6:50 am | समिधा
लेख छान लिहीलायस स्वाती ताई.
पण खरचं दोघही काळजी घ्या.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
5 May 2009 - 2:33 pm | विजुभाऊ
सुरेख वर्णन आहे.
फोटो शिवाय सुद्धा चक्षुर्वैही सत्यम चा प्रत्यय येतोय
<