प्रिय निखील,
कसा आहेस रे ?
खुप दिवस झाले, तुला लिहीन , लिहीन म्हणतोय पण सालं लक्षातच राहत नाही ! आताशा फार विसरायला होतं मला. माफ कर मित्रा.
तुला आठवतं आपली पहिली भेट झाली होती ती शाळेतल्या "स्मरणशक्ती" च्या परिक्षेच्या वेळी?
नेहेमी सहजपणे जिंकणारा तु, यावेळी मात्र बाजी मी मारली होती. पण तु ते स्पोर्टिंगली घेतलंस आणि आपली ओळख झाली. पुढे या ओळखीचं हळु हळु मैत्रीत रुपांतर होत गेलं.
ते दिवस कसे सुरेख होते ना ? शाळेत कुठलीही स्पर्धा असली कि आपल्या दोघांत चुरस सुरु व्हायची. मग तु जिंकतो का मी याचे अंदाज इतरांकडुन ऐकायला खुप मजा यायची. आपली बाजु घेवुन एकमेकात भांडणारे दोन मित्र बघितले कि मग आपण दोघे पोट दुखेपर्यंत हसायचो.......
आता बर्याच गोष्टी विसरायला होताहेत. या इथे आलो आणि हळु हळु .........................!
तुझाच,
चेतन.....
.....
.....
प्रिय चेत्या,
मला काय धाड भरलीय रे, तुच सांग कसा आहेस तु ? साल्या गेलास तो परत फोन नाही, पत्र नाही. काय हे, जणु काही अंटार्क्टिकावरच राहायला गेलाहेस. पण तुझं पत्र आलं आणि पुन्हा एकदा बालपणीच्या रम्य आठवणी जाग्या झाल्या.
चेत्या, काय रे, ९ वी ला असतानाची ती ' सामान्य ज्ञानाची' परिक्षा आठवते. ती रे "आंतरभारती शाळेत गेलो होतो आपण? ऐन वेळेला मला एका प्रश्नाचे उत्तर आठवेना आणि तु समोर बसुन मला खुणा करुन ते सांगायचा प्रयत्न करत होतास. आणि मग तुला तिथुन हाकलण्यात आलं...!
काय रे चेत्या, आई कशी आहे रे? तिला शेवटचं भेटलो तेव्हा खुप खंगली होती रे ती? ..बाबांचं अचानक जाणं फार मनाला लावुन घेतलं होतं तिने. तिच्या हातची कारल्याची भाजी आठवली की अजुनही तोंडाला पाणी सुटतं माझ्या. तु लेका कर्म दरिद्री, तिचा स्वयंपाक कधी आवडलाच नाही तुला? आणि नेहा, ती कुठे असते आता?
असो, चेत्या , लिहीत जा रे अधुन मधुन. तु परत येशील ना तेव्हा खुप मजा करु. आपल्या त्या नेहेमीच्या हॉटेल मध्ये जावु जेवायला आणि मग तुझ्या स्टाईलने त्याला अंडे भाजायला लावु. काय भंजाळला होता ना तो कुक तेव्हा? तु लवकर ये बे परत !
आणि नालायका, पोस्ट बॉक्स चा पत्ता काय देतोयस..का माझ्यापासुन देखील लपवतोयस, कुठे राहतोयस ते?
तुझाच
निख्या.
ता.क.: काय रे रेश्माचा काही फोन............?
.....
......
...............
प्रिय निख्या,
आता तुला निख्या म्हणायला कसंतरीच वाटतं मित्रा, तुझ्या सारख्या आय. पी. एस. असलेल्या माणसाला असं हाक मारणं, तेही माझ्यासारख्यानं.......
खरंच रे, तिला मी कधीच सुख दिलं नाही. सावत्र असली तरी आईच होती आणि तिने कधीच सावत्रपणा दाखवला नव्हता. उलट नेहापेक्षाही जास्त जीव लावायची ती मला. पण मी कधी तिला आई मानलंच नाही. एकही संधी सोडली नाही तिचा पाण उतारा करायची. पण तिने कधीही त्याचा राग मानला नाही.
जोपर्यंत होती तो पर्यंत माझं सगळं केलं तिने.
हो..गेली ती....माझ्या बापाने तिला पण सोडलं नाही रे? तो तरी काय करणार म्हणा, ही भुकच फार विचित्र असते?
एक सांगु निख्या, नेहा पण सध्या इथेच आहे रे! तिच्या कडे तर बघवत नाही सध्या, आधीच ती लहानपणापासुनच नाजुक आणि त्यात.....हे......!
मला खुप आवडायची नेहा, त्या आईवर जरी राग असला ना, तरी एखाद्या जपानी बाहुलीसारखी दिसणारी नेहा, माझा जीव कि प्राण होती.
तुला आठवतं मी तुला म्हणायचो सुद्धा, तु जर अजुन ६-७ वर्षांनी लहान असतास तर नेहाचं लग्न मी तुझ्याच बरोबर लावुन दिलं असतं.
चल, थांबवतो, बोटं खुप दुखताहेत आता....!
तुझाच,
चेत्या.
ता.क. : रेष्मा......? स्वप्न....कधीही पुर्ण होवु न शकणारं स्वप्न !
.....
.........
प्रिय चेतन,
मला निटसं काही कळलं नाही ?
तु काय म्हणतोयस काहीच संदर्भ लागत नाहीये.
हे बघ, तु बाबांशी भांडुन कलकत्त्याला निघुन गेलास. का भांडलास ते मलाही सांगितलं नाहीस, मलासुद्धा ?
असं काय कारण होतंबाबा? तसंही मोठ्या आईच्या मृत्युनंतर तुझं आणि त्यांचं कधी जमलंच नाही...
पण असं अचानक निघुन जाण्यासारखं काय झालं होतं?
आणि नंतर बाबा गेल्यानंतर काही दिवसांनी आईनेदेखील नेहाला घेवुन मुंबई सोडलं मग नंतर कुणाचीच भेट झाली नाही.
नेहा, आता तुझ्याकडेच आहे हे वाचुन खुप बरे वाटले. काय झाले रे ती खुप आजारी वगैरे आहे का ? काय झालंय तिला. तिला घेवुन इकडे मुंबईत का येत नाहीस. इथे आता खुप चांगल्या डॉक्टर्सबरोबर घसट आहे माझी. इथे दाखवु आपण तिला, तु येच !
या पत्रातला तुझा सुर खुप उदास वाटला. आणि चार ओळी लिहुन तुझी बोटं कधीपासुन दुखायला लागली रे.
जेमतेम अठ्ठाविशी ओलांडली आहेस आता.
तुला आठवतं, अकरावीत असताना तो "संतकाव्यावरचा आठ पानी निबंध तु एका रात्रीतुन लिहुन दिला होतास मला........! आणि आता चार ओळी लिहिल्या की तुझी बोटं दुखायला लागली.
खुप मोठा माणुस झालायस का रे बाबा? मित्राला पत्र लिहायचा देखिल कंटाळा?
तु ये एकदा, मग सांगतो तुला ?
ये रे एकदा, खुप दिवस झाले भेटुन..... खुप आठवणी आहेत त्या सोनेरी दिवसांच्या...
नक्की ये वाट पाहतोय...
तुझा,
निख्या..
ता. क. : आय. पी. एस. अधिकारी देखील माणुसच असतो, आणि मित्रापेक्षा मोठा तर मुळीच नसतो.
तुझाच,
निख्या.
.....
.......
प्रिय निख्या,
तुझं पत्र मिळालं, खुप समाधान वाटलं रे....
तुझ्या सगळ्या तक्रारी मान्य....पण माफ कर मित्रा आता आपली भेट होईल असं वाटत नाही. खरंतर होवु नये असंच वाटतंय मला. कारण चैतन्याने भरलेल्या ज्या चेतनला तु पाहिलं आहेस, ओळखतोस ....तो चेतन सहा वर्षापुर्वी जेव्हा घर सोडलं तेव्हाच वारला.
धक्का बसला ना ऐकल्यावर...मलाही बसला होता, जेव्हा मला कळलं की माझ्या मोठ्या आईचा मृत्यु (आईला मोठी आई म्हणताना, दुसर्या आईलाही माझ्या आईचा दर्जा देतोय..मला माझी चुक आणि तिचा मोठेपणा आता कळतोय..पण खुप उशीर झालाय रे)...
तर काय सांगत होतो जेव्हा मला कळलं की माझ्या मोठ्या आईचा मृत्यु कॅन्सरने नाही तर एडसने झाला होता, तेव्हा मलाही प्रचंड धक्का बसला होता. तिला एडस कसा झाला, हे तुला माझ्यापेक्षा बाबा जास्त चांगलं सांगु शकले असते, पण मुळात तिला एडस झाला होता हिच गोष्ट त्यांनी दडवली, मग त्यामागची कारणे सांगण्याचा प्रश्नच नव्हता.
पण मी सांगतो, हा एडस तिच्याकडे बाबांपासुन आला होता.
माझ्या बापाच्या एकेक सवयी तर तुलाही माहीत होत्याच. मला जेव्हा हे कळालं तेव्हा ती एडसने गेली याचा फार राग नव्हता आला मला.............
राग आला होता, तो आपल्याला एडस झाला आहे हे लपवुन केवळ आपल्या वासनेसाठी दुसरे लग्न करणार्या धाकट्या आईच्या स्वप्नांची राखरांगोळी करणार्या माझ्या बापाचा....
आपल्याला एडस झाला आहे हे माहित असताना आणखी एका मुलीला या जगात आणुन तिचं आयुष्य जन्माला येण्याआधीच उध्वस्त करणार्या एका वासनांध नराधमाचा....
घर सोडलं, पण नेहाच्या संपर्कात होतो मी. तिच्या कडुनच कळलं तो नराधम मेल्याचं...
त्यानंतर धाकटी आई आणि नेहा दोघींनाही माझ्याकडे बोलवुन घेतलं....
गेल्या वर्षी धाकटी आई गेली.. एडसने...
अरे हो, सद्ध्या मी कलकत्त्यात नाही, पुण्यात आहे. बरोबर ओळखलंस मी तरी कसा सुटेन रे यातुन...
शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत आता.
आता तु म्हणशील, एवढं सगळं होईपर्यंत का बोलला नाहीस....
कसा ही असला तरी माझा बाप होता रे तो, खुप प्रेम होतं माझं त्याच्यावर. मीच काय आम्ही सगळ्यांनीच जिवापाड प्रेम केलं त्याच्यावर.
त्याचाच गैरफायदा घेतला रे त्याने.
इतक्या वर्षानंतर पत्र लिहिण्याचं प्रयोजन एवढंच की.....
तु खुप केलं आहेस आजवर माझ्यासाठी, हे शेवटचं.....
माझे दिवस संपलेत आता, पण नेहा अजुन आहे रे....तिची काळजी घेशील ? तिलाही........!
तुझा..कदाचित कुणाचाच होवु न शकलेला...
चेतन.
ता. क. : इतके दिवस थांबली होती रे रेष्मा, गेल्या महिन्यात तिने आत्महत्या केली. आता माझी पाळी.
ती वाट पाहतेय रे, तुझ्या भरवश्यावर नेहाला सोडुन जातोय.
चेतन.
समाप्त.
विशाल.....
प्रतिक्रिया
23 Apr 2009 - 7:08 pm | प्राजु
केवळ भयानक!!!!
वाचतानाच काटा आला अंगावर.. तुम्हाला लिहायला कसं जमलं देव जाणे!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Apr 2009 - 7:15 pm | शितल
सहमत.
खुपच भयानक लिहिले आहे.:(
23 Apr 2009 - 9:35 pm | चकली
काय म्हणावे ते कळत नाहिये
चकली
http://chakali.blogspot.com
23 Apr 2009 - 10:40 pm | समिधा
दोघीं बरोबर सहमत आहे.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
23 Apr 2009 - 8:22 pm | प्रकाश घाटपांडे
उत्तम लेखन! पत्रातुन संवादाचा फॉर्म आवडला. वाचताना अस्वस्थ होते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
23 Apr 2009 - 9:50 pm | क्रान्ति
खरंच खूप भयानक! शेवटचे पत्र वाचताना सुन्न झालं मन.
लिहिण्याची शैली आवडली.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
23 Apr 2009 - 10:30 pm | विशाल कुलकर्णी
:-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
23 Apr 2009 - 11:10 pm | अभिज्ञ
अतिशय छान लिहिले आहे.
"भिन्न" आठवलि.
गुड वन
अभिज्ञ.
-----------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.