ह्यो आमचा वाडा... या असं हिकडून... वाईच थांबा पर... न्हायी,म्हनलं आमच्या वाड्यामन्दी यायच्या आधी एक गोस्ट इच्चारायची र्हायली... तुमच्या आंगी सौजन्य हाये न्हवं? मंग झालं तर... का सांगतुया की...
आमच्या वाड्या मन्दी येकून बिर्हाडं म्हन्ताल तर खालच्या आंगाला पाच आन वरच्या अंगाला दोन. तुम्हासनी कंच्या आंगाच्या लोकासनी भ्येटायचं हाय त्ये आदुगर कळालं पाईजे म्हंजी म्या तुम्हासनी बराबर न्येतू की नाय त्ये बघा...
तर बघा खालच्या आंगाच्या लोकांची गुन-इशेश सांगते...
तर ह्ये हाय यकदम कोपर्यात राहानारं दिंडोरे कुटुंब... म्हनावं तर पाच माणसंच घरी नवरा बायको आनी दोन ल्येकी आन येक शेंबडा ल्योक... तर त्यास्नी आम्ही "ब" फ्यामिली म्हन्तोया, "का" म्हनून इचारा, इचारा की वो..
त्याच्या दोन पोरींची नाव हायती बाबी आन बाळी आनी पोरगं बाळु... मंग त्याची बायकु बबीता... आनी ह्यासनी आमी समदी त्याच्या मागारी बबनराव म्हन्तुया. त्याच्या बायका पोरांची नावं हायती ग्वाड पन त्याचं "ब" अक्षरावरचं पिरेम हाय का काय, ठाऊक नाय, सम्द्यासनी "ब"च्या नावाने हाका मारूतुया.
तर आसं ह्ये तिरसट, टकलु, बबन्या म्हंजी आगीचा बंब हाय नुस्ता वाड्यात, म्हन्जी तसा वाड्यात कोनी त्याची चालू देत न्हाय हा भाग येगळा पन घरात इतका दंगा करतुया की बाहेरच्या लोगासनी बी भ्या वाटतया.
ह्या बबन्याची फ्यामिली मात्र लई साधी, गरीब. बबीता, आवो बबन्याची बायकु तर येकदम गरीब गाय...
बिचारीच्या घरी कधीबी नलाचं पानी येत नाय, मागच्या आंगाला खोली असल्यानं फुडच्या आंगाच्या घरात राहनारे घरचं समदं पानी भरून झालं तरी बी नल बंद करीत नाय मग तिच्या घरच्या नलात पाणी कोठुन येणार, तरी बिचारी घागर-कळशी घेऊन वाडाभर पाण्यासाठी फिरत असतीया...
त्यात ह्यो बबन्या म्हन्जी लै लै मुडी व्हो, सांच्याला पानी यायच्या टायमाला हा हापिसातुन घरी येतो आनी त्याच्या यायच्या टाईमाला बायको एकदम हिरोईन सारखी मॆक्सीत दिसली पायजे ह्याला पन ती बया आपली पाण्यासाठी वाडाभर फिरत असतीया... आन मग बबन-बबीतात होनारा प्रेमळ संवाद सगळ्या वाड्याला त्याच्या त्याच्या खोलीतून ऐकू येईल असा चाललेला असतो.
घरच्यासनी वरडुन झालं की मंग त्याच्या घराच्या पुढच्या आंगाला राहणार्यांची पाळी...
तर अस्सा हा बबन्या सक्काळी हापिसात गेल्याशिवाय वाड्यातील बाईमाणुस परसाकडे जायला मागत नाय, इचारा की राव "का" ते. अवो, ह्यो बबन्या हाये तंद्रीमन, त्याचं न्हानीघर हाये परसाच्या बाजुला, कवा कवा हा गानी म्हनत न्हानीघराचं दार न लावताच अंग धुत असतो, न जाणो कवा काय बघायला मिळंल ह्या भितीनं वाड्यातलं बाई माणुस तर बबन्याच्या एम-८० गेल्याचा आवाज आल्यावर परसाकडं पळतात.
असा हा बबन्या त्याच्या फॅमिलीसंग वाड्यात सौजन्याने नांदत हाये.
आता समोर बापु दिसते हाये का तुम्हासणी ?
"बापु" अवो पण ती बाई माणुस हाये , बापु का म्हणुन राहिले तुम्ही?
अवो पाव्हणं, तेच ते वो, ती हाये बाईच पण दिसतीया कशी बापया वाणी नव्ह म्हणुन "बापु".
तर त्या बबनाच्या म्होरच्या अंगाला हे बि-हाड रहातया, आडनाव हाये यादव. गावाकडे शेती, गाई-म्हशी, दुधाचा धंदा पण ह्यासणी गावाकडे शेण काढत नाय बसायचंय, त्यासणी शहरात रहायचंय म्हणुन शाण ते हिकडे राहत्याती.
तर त्या यादवाच्या घरी पण दोन सुंद-या, अव असं उडु नका ,त्याच्या पोरी बद्दल म्हणतुया वो मी, जरा कुठं रंगांन गोर्या हायती समद्या वाड्यात तर त्यासणी वाटतया एक माधुरी दिक्षित आणि एक ऐश्वर्या.. आणि हे एक ध्यान त्या सुंद-याचा धाकला भाऊ सुनिल नाव आहे त्यांच, गावस्करनं १०० रन काढल्या एका मॅच मन्धी तेव्हा जन्मलेलं म्हणुन शाण त्याच नाव ठेवलया सुनिल. ते बेन कसं बंस १० वी पर्यत गेलया, अजुन तिथंच हाय.
तर पावन्ह ह्या यादवांच जेवाण म्हणजे वराण -भात, गरा, आणि गुल्कोजची बिस्कीट आणि शेजारच्यांकडुन मागुन शेजारच्यांनी दिलच तर दुध बी.
तर अशा ह्या यादवांचा कुटुंब हाये दीड शाणा म्हन्जी बघा, जेवुन झाल्यावर ह्या वाड्यातील बाई-बापया माणसं जरा वाड्या बाहेर थांबताती , सहज आपलं कोण येताव जाताव बघाया, तर त्या यादव्या ह्या सुंदर्या रोजच्यान असत्यात तिथं, बाप हाये रिक्षा ड्रायव्हर त्याची कधी कधी वाट बघत बसत्यात.
त्याच्या तोंड्ची लैई वाक्य नाय सांगत एकच सांगते त्यावरून तुम्ही तरक लावा..
हाय.. ह्यो शबद एकदम जोरात बोलणार ते बी लै लै हसत हसत.. आणि म्होरं .. "कवा आलीस? " म्हंजी आजु बाजुचे जे सुशिक्षित लोक असतील त्याच्यात हसा पिकवणार.
त्यात त्या पोरींचा काय बी दोष नाय अवो त्यांची मायच लै हुशार हाये. अवो त्यांची माय टि.व्ही वर उभ राहुन वरचे छप्पर साफ करते, साठवणिच्या डब्या मन्धी किराणा तसाच ठेवुन डब बाहेर घास घासुन वाळत ठेवती.
काय फोडण्या घालती काय ठाव सगळ्या वाड्यात नुसता खाट उठविती.
मेन म्हन्जी हिच्या जिव्हाळाचा विषय हाये पाणी. त्या बबनाच्या घरी पाणी न पोहचायची बराबर यवस्था हीच बाई करून ठेवती.
आणि तिचा माघारी तर त्याच्या घराच्या शेजारी बोळ आहे, त्या बोळात कपडे वाळत घालण्यासाठी तारा हायती, वाड्यातील कोणी त्या तारेवर कपडे वाळत घातले की ह्यो आलाच हाफ पॅन्ट वर बायांशी भांडाया. वाड्यातील बाया त्याला म्हणत्यात, बाबा काय बोलायचं ते बोल पण आदुगर तु़झ्याकडे बघता तरी येईल असे कपडे घालुन तर ये.
.....तर पाव्हण आज दिंडोरे आन यादव ह्या दोन फॅमिलीची तुम्हासणी ओळख करून दिली हाये.. अव अव .. जातायसा कुठ बसा गप गुमान अजुन बाकीची जिंत हायती तवा त्यासणी बी घेऊन येणार हाये..;)
अपुर्ण..
प्रतिक्रिया
22 Apr 2009 - 2:55 am | अनामिक
शितल तै.. इचारा की तुमी कसं लिवलंय? आवं इचारा की.... तर तुमास्नी म्हुन सांगतो लै झ्याक लिवलंय बगा! आता ते अपुर्णचं पुर्ण कवा करता ते सांगा...
-अनामिक
22 Apr 2009 - 5:02 am | अवलिया
शितल मौली !!
अवं काय लिव्हलय ... आक्षी नजर लागंल असं झालय बगा!
आता त्ये अपुर्न चं पुर्न कराचा प्लान करा म्हंजी झालं !
काय बरुबर म्हंतो नव्हं का ? हांग आशी !!
--अवलिया
22 Apr 2009 - 5:56 am | क्रान्ति
लै लै भारी हाय वाडा! दिंडोरे आनि यादव भेटले, आता बाकी पब्लिक बी येऊ द्या लौकर लौकर.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
22 Apr 2009 - 6:32 am | दशानन
अस्सल कोल्हापुरी !
कधी कोल्हापुरात वाड्यांची रेलचेल होती आता म्हणे बघायला सुध्दा नाही आहे वाडा !
जबरदस्त वेग व लेखन.. लवकर लवकर पुढचं बी ल्या.
थोडेसं नवीन !
22 Apr 2009 - 7:13 am | शिप्रा
जबरदस्त लिहिले हाय्...लवकर येऊ द्या पुढच भाग..
22 Apr 2009 - 9:44 am | मदनबाण
व्वा. लयं भारी...एकदम ढिंनच्याक लिवलयं बघा तुम्ही. :)
लिवा बरं पुढचा भाग लवकर...
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
22 Apr 2009 - 7:57 am | निखिल देशपांडे
लवकर येवु द्यात बाकिचे कुटुंब.......
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
22 Apr 2009 - 9:40 am | राघव
बाकी मपल्याला पह्यले वाटलं हुतं का ह्ये बी आता उडवशान मिपाकरांची!!
पन नाय.. अजून बी बरंच हाय लिवायला लोकांकडं ;)
लय झ्याक वाडा हाय थुमचा.. येऊ द्येत अजून!!
पाणी नव्हं वो.. पानी म्हनास्नी हवं.. नायतर खडा लागल्यावानी वाटतंय!! ह. घ्या.
(गावरान)राघव
22 Apr 2009 - 9:40 am | आनंदयात्री
येउदे पुढचा भाग पट्ट्म्हन !!
22 Apr 2009 - 9:44 am | विसोबा खेचर
मस्त गावरान झणझणीत! :)
22 Apr 2009 - 9:45 am | यशोधरा
मस्त लिहिते आहेस गं शीतल. लिही अजून.
22 Apr 2009 - 9:45 am | llपुण्याचे पेशवेll
वा शितल. आजकाल एकदम षट् कार, चहुकार मारायलीयस की.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
22 Apr 2009 - 4:35 pm | हर्षद आनंदी
आमाला पार वाड्याच्या अंगणात उभं करुन्श्यान टाकलं की बाई तुमी!!
त्यो यादव आत्ता हाफ प्यॅन्ट घालुन भांडाय येईल, वाड्याची कीरत साता समिन्द्रापावतुर नेल्या बद्दाल
आनि यक तेवढं गोस्ट बीगिन पुरी करा की ओ..
22 Apr 2009 - 4:53 pm | शितल
वाड्यातील सौजन्य आवडल्याचे कळविल्या बद्दल धन्यवाद, तसेच सर्व वाचकांचे आभार. :)
आज नाही तर उद्या वाड्यातील मंडळींना आणते..;)
22 Apr 2009 - 11:25 pm | प्राजु
यवड्यात कंच हाबार मानतायसा..!
आमी बी हायकी अजून हित्तं...!
गाडी लई झोक्कात निगाली बघा. बिगीबिगी लिवा म्हंजी झालं. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Apr 2009 - 12:51 am | संदीप चित्रे
शितलताई ... लवकर लवकर पुढचं लिहून टाका... वाचूनशान राह्यलोय नव्हं का ?
न्हायतर वाड्यावरच्या मंडळींना आज आन्ते - उद्या आन्ते म्हन्ता म्हन्ता दिवस जातील ;)
23 Apr 2009 - 2:55 am | समिधा
शितल ताई भन्नाट लिहिलया.. लवकर टाका बघा पुढचा भाग
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
23 Apr 2009 - 5:46 pm | मनीषा
छान आहे ...
पुढचा भाग लवकर लिही .
23 Apr 2009 - 8:04 pm | स्वाती राजेश
मस्त भाषाशैली वापरली आहेस....
कोल्हापुरात नेऊन सोडलेस अगदी...बस आली नाही कि तेथील भाजीवाल्या आणि आम्ही शाळेची मुले चालत चालत घरी येत असताना...
माहीतीची देवाण-घेवाण अशाच भाषाशैलीने व्हायची...
भाजी-मंडइ मधे तर हीच भाषा.....
सुरेखच....इथल्या नाटकी भाषा ऐकून कंटाळा आला आहे.....
तुझा लेख म्हणजे तापलेल्या उन्हात....वार्याची झुळुक कशी येते तसा...झाला आहे..
:) पुढचे लगेच लिही वाट पाहात आहे...