खरं तर 'रोमायण' घडल्यापासून इटलीला जायचा मी धसकाच घेतला होता. दिनेश कामानिमित्त मिलानला ३,४ दा जाऊन आला तरी प्रत्येक वेळी मी आपली कारणं काढून घरीच थांबले होते पण फिरेन्झ, काप्री ,नापोली आणि अशी कितीतरी जणं खुणावत होती, बोलावत होती. ते आकर्षण होतंच दडलेलं.. अशातच विपिनचं डॉर्टमुंडचं बिर्हाड फिरेंझला हललं. आता तिथे एक आपलं घर आहे, विपिनने फिरेन्झशी चांगली दोस्ती केली आहे, आता इटलीला जायला हरकत नाही असं मनाला समजावून, बजावून शेवटी इस्टरच्या सुटीत फिरेन्झचे बुकिंग केले. लहानशाच पण सुबक विमानतळावर आमचे चिमुकले अगदी ३० एक जण बसतील एवढेसेच विमान उतरले. एका बसमधून १००/१२५ पावलांवर असलेल्या प्रवेशदारापर्यंत आम्हाला सोडण्यात आले. पाठीवरची एक पोतवजा पिशवी सोडली तर आमच्याकडे बाकी सामान नव्हतंच. लगेचच बाहेर आलो तर विपिन स्वागताला हजर! घरी पोहचल्यावर मिनेस्ट्रोन सूप, इटालियन स्पागेटी बरोबर चवीला उद्या काय पहायचे त्याची चर्चा करत जेवलो. जोडीला किआंतेची साथ पण होतीच.
जुलियस सिझरने ख्रिस्तपूर्व ५९ साली हे शहर वसवले आणि फ्लोरेन्टिया म्हणजे फ्लरिशिंग असे लॅटिन बारसे केले. त्याचेच इटालियनमध्ये फोरोएन्झा आणि पुढे फिरेन्झ झाले.(इंग्लिश सायबाने त्याचे फ्लोरेन्स असे इंग्रजी बारसे केले.) तुस्कानो प्रांताची राजधानी असलेले फिरेन्झ म्हणजे अर्नो नदीच्या काठावर वसलेलं अतिशय रेखीव,टुमदार,कलासक्त गाव! नदीच्या पल्याड निळ्या,हिरव्या डोंगरमाळा आणि त्यांच्या उतरंडीवर सुबक बंगल्या आणि वसंतऋतु असल्यामुळे फुलाफळांनी बहरलेल्या आणि डवरलेल्या सुंदर बागा आहेत. दगडी,जुन्या बांधणीचे रस्ते आणि जुन्याच बांधणीची सुबक पण भक्कम अशी दुमजली,तिमजली घरे. आकाशाच्या पोटात शिरू पाहणार्या अतिउंच इमारती युरोपात फार दिसत नाहीत आणि फिरेन्झमध्ये तर नाहीतच अजिबात,ज्या काही थोड्याफार उंच इमारती आहेत त्या नव्या फिरेन्झमध्ये. विमानतळाच्या जवळपासची नवी वस्ती आधुनिक फिरेन्झ मिरवते आहे तर अर्नो नदीच्या काठावर जुने वैभव दिमाखात जपणारे फिरेन्झ आहे. मायकेल अँजेलो, लिओनार्दो डी विंची, दॉंते,कवी रॉबर्ट आणि एलिझाबेथ ब्राउनिंग,फ्लोरेन्स नाइटिंगेल,गॅलिलिओ आणि कितीतरी सारेजण फिरेन्झचे सुपुत्र आहेत. कला, रसिकता आणि तंत्रज्ञानाच्या देणगीचा वारसा लाभलेलं हे कलानगरच! ह्या नगराचा कोपरानकोपरा पाहण्यासारखा आहे. ६६ सालच्या भयंकर पुरात अर्नो नदीने उत्पात घडवले आणि कितीतरी वैभव तिने गिळून टाकले. पण आजही त्या भयंकर पुरातून वाचलेले ते ऐश्वर्य पाहता नष्ट झालेले आणखी किती वैभव होते ह्याची कल्पनाच करता येत नाही.
सांता मारिया नोवेलाची बॅसिलिका फिरेंझ रेल्वे स्टेशनाच्या बाहेर आले की दिसतेच. पांढर्या आणि हिरव्या संगमरवरातले दर्शनी भव्य प्रवेशद्वार पाहतानाच आत किती चित्रकारी,शिल्पकारी पहायला मिळणार आहे ह्याची कल्पना देतात. आतमधील काचांवरची चित्रकारी तर अप्रतिम आहे. खांबांवरचे कोरीवकाम,जागोजागी असलेली प्रस्तरचित्रे .. किती वेळ तिथे रेंगाळलो. तेथूनच थोडे पुढे गेले की दुओमो म्हणजेच सांता मारिया डेल फिओरे आहे. पांढर्या,हिरव्या आणि गुलबट संगमरवरातले दुओमो त्याच्या घुमटासाठी हे कथीड्रल सुप्रसिध्द आहे. इस. १२९४ सालापासून सुरू झालेलं हे बांधकाम इस. १४१८ मध्ये पूर्णत्वाला गेले. घुमटाचे काम १४२० मध्ये सुरू झाले ते १४३६ पर्यंत चालले होते. ह्या घुमटावर आतील बाजूला कित्येक फूट उंचावर रंगवलेला ख्रिस्तचरितातला देखावा पाहून चित्रकलेतलं फारसं काही समजत नसतानाही नि:शब्दच व्हायला होतं. खरं तर फिरेन्झमध्ये फिरताना आ वासून आणि नि:शब्द होऊनच फिरत होतो. शेजारीच असलेल्या भव्य मनोरा चढून फिरेन्झचे विहंगम दर्शन घेता येते. खरं तर तिथल्या व्हिया (रस्ते) आणि पियाझा (चौक)मधून चालतचालत,रेंगाळत जुने फिरेन्झ घुटक्याघुटक्याने मुरवायला मजा येते. ह्यावेळी आमच्याकडे वेळेची टंचाई नव्हती त्यामुळे फिरेन्झ अगदी मनसोक्त फिरलो. त्या रस्त्यातून फिरताना सारखे पुलंचे ते 'आद्य शंकराचार्यांचे इटालियन मानसशिष्य' कोणत्या रस्त्यावरच्या व्हिलात राहत असतील ? आता तेथे म्युझियम असेल की आणखी काही? असे विचार मनात येत होते.
रेल्वे स्टेशनच्या लगेचच बाहेर रस्ते खोदून ठेवलेले दिसले, ह्यांच्याकडेही उन्हाळी कामे चाललीत वाटते? असा विचार आलाच लगेच मनात. तेथे ट्रामच्या मार्गाचे काम चाललेले आहे. युरोपात बर्याच ठिकाणी ट्राम सर्रास आहेत आणि बर्याच जुन्या आहेत पण फिरेन्झमध्ये मात्र इतके दिवस ट्राम नव्हत्या, आता तेथे ट्रामचे काम चालू झाले आहे म्हणूनचे ते खोदकाम ही सामान्यज्ञानात भर पडली. दुओमोवरुन चालत आम्ही सांता क्रोचेकडे निघालो. सांता क्रोचे हे इटलीतले सर्वात मोठे फ्रान्सिस्कन चर्च आहे.आतील काचांवरील चित्रकला अप्रतिम आहेच पण महत्त्वाचे म्हणजे तेथे गॅलिलिओ, मायकेल अँजेलो,दाँते अशा अनेक फिरेन्झपुत्रांचे स्मारक आहे. तेथे जाताना वाटेवरच असलेली नॅशनल लायब्ररीची रुंद इमारत लक्ष वेधून घेतेच. चालताना प्रत्येकच इमारतीचा फोटो काढावासा वाटत होता. प्रत्येकच ठिकाणी काहीतरी वैशिष्ठ्यपूर्णता होती,ऐतिहासिकता होती.
इटलीत एक बरं आहे, डबाबाटलीची फार गरज लागत नाही. सिग्नोरियाच्या चौकात खुसखुशीत पिझ्झा नाहीतर चमचमीत पास्ता खाऊन गेलाटो म्हणजे इटालियन आइसक्रिमचे गोळेच्या गोळे रिचवून पुढे फिरायला तय्यार होतात मंडळी.. इटलीच्या पिझ्झा आणि पास्त्याने तर जगभर हातपाय पसरले आहेत पण खुद्द इटलीत खाल्लेला पिझ्झ्याला मात्र पर्याय नाही, हे रोम,मिलान,पिसा, व्हेनिस,फिरेन्झ इ. ठिकाणी पिझ्झा खाल्ले की अगदी पटतेच. त्यातही परत त्या त्या गावची, उत्तर,दक्षिण इटलीतली पिझ्झ्याची आणि पास्त्याची खासियत आणखी वेगळी !
उफिझी म्हणजे फिरेन्झचं कलादालनच! अक्षरशः हजारो चित्रांचा खजिना तेथे आहे.मायकेल अँजेलो,लिओनार्दो विंचीपासून सार्यांची शेकडो चित्रे तिथे आहेत. अलिबाबाच्या गुहेत शिरल्यावर डोळे दिपावेत तसे तेथे गेले की होते. तेथेच कशाला फ्लोरेन्समध्ये उतरल्यापासून अलिबाबाच्या गुहेतला खजिनाच तर पाहत होतो. पिआझा देला सिग्नोरिया किवा पालाज्झो व्हेकिओ हा तर तिथला सगळ्यात गजबजता चौक, मायकेल अँजोलोचा सुप्रसिध्द डेव्हिड आता आर्किऑलॉजी म्युझिअममध्ये हलवला आहे पण येथे हुबेहुब दुसरा डेव्हिड तेथे उभा केला आहे. पालाज्झो व्हेकिओ म्हणजे तर अर्नो नदीच्या अगदी काठावरच आपण येतो. तेथूनच जरा पुढे चालत गेलो की लहानशा दगडी पुलावर येऊन पोहोचतो. नदीच्या मध्यावर, एका बाजूला निळ्याहिरव्या डोंगरमाळा तर दुसर्या बाजूला जुने दगडी वैभव आणि समोर हिरवट पाणी घेऊन वाहणारी अर्नो नदी आणि तिच्या काठावर आपल्याच नादात गळाला मासा गावतो का याची वाट पाहत बसणारी मंडळी, मध्येच नावा वल्हवत जाणारी हौशी मंडळीही दिसतात.हे सारं पाहताना वेळ कसा जातो समजत नाही.
पुलावरुन दिसणार्या त्या डोंगरमाळांमध्येच एक टेकडी आहे. तिचं नाव विआटो मायकेल अँजोलो. विपिनची ही आवडती जागा.. तेथून फिरेन्झचे विहंगम दर्शन खरोखरीच अतिशय मनभावन दिसते. अर्नो नदीची हिरवटनिळी लाडिक वळणे आणि तिच्या काठावरचे फिरेन्झ मनसोक्त आइसक्रिम खात पाहत होतो. पूर्वी तो किल्ला असावा असे तेथल्या दगडी वेस असलेल्या भिंतींवरुन वाटले. सुंदर उद्याने आणि हिरवाई तर जागोजागी आहे. ह्या टेकडीवर देखील मायकेल अँजेलोच्या डेव्हिडचा एक पुतळा उभा केला आहेच. जागोजागी असलेले पुतळे, प्रस्तरचित्रे, कलाकारी.. किती पाहू आणि काय पाहू असं सार्या फिरेन्झभर फिरताना होतं. रोम भव्य आहे, व्हेनिस ग्लॅमरस आहे, पिसा त्याच्या जगप्रसिध्द मनोर्याचं ओझं घेतलेलं वाटत पण फिरेन्झ लहानसं,अटकर आणि आपलंसं वाटतं.
स्वीसची चिजं, बेल्जियमची चॉकलेटं तसं इटालीची कॉफी आणि गिलेटो.. म्हणजे आइसक्रिम! अम्म.. इटालियन आइसक्रिमला जगात पर्याय नाहीच.(अपवाद जोगदेवचं आंबाआइसक्रिम!) येथे आम्ही रोज आइसक्रिम खात होतोच. कोको,कॉफी,चॉकलेट, रम ऍन रेझिन्स, तिरामिसु,पिस्ता, ऑरेंज, अननस, लेमन,कोकोनट.. किती किती प्रकार त्याची गणतीच नाही. त्यातही एकदा लिंबाचे आइसक्रिम मोठे लिंबू पोखरुन त्यात भरून देतात ते खाल्ले होते म्हणून एके ठिकाणी विचारले. तिथल्या बाईंनी मला आइसक्रिमं ठेवली होती तेथेच नेले.. आणि डोळे विस्फारलेच माझे. लहानसा अननस पोखरुन त्यात अननसाचे आईस्क्रिम, पिच,संत्री, लिंबे पोखरुन त्यांच्या पोटात ती ती आइसक्रिमे नांदत होती आणि नारळाच्या करवंटीतले खोबरे काढून त्यात खोबर्याइतकेच लुसलुशीत कोकोनट आइसक्रिम होते. नजाकतीने आणि रसिकतेने पेश केलेले ते आइसक्रिम खायला काय मजा आली. कापुचिनो कॉफीही इतक्या नजाकतीने आपल्यासमोर आणतात ही फिरेन्झी मंडळी !
त्या आइसक्रिमची, पिझ्झा आणि पास्त्याची,मिनेस्ट्रोनसूपाची,किआंतेची.. सार्या फिरेन्झचीच चव घोळवत आम्ही फ्रांकफुर्टच्या विमानात बसलो.
प्रतिक्रिया
19 Apr 2009 - 8:54 pm | यशोधरा
सही वर्णन! आइस्क्रीमचे वर्णन तर अगदी मस्त!
आणि जळवायला फोटो टाकलेयस वरुन! :)
19 Apr 2009 - 9:13 pm | प्राजु
स्वातीताई,
प्रवास वर्णात तुझा हात कोणी नाही धरू शकणार..
यशो प्रमाणेच मलाही आईस्क्रीम खूप आवडलं.. आयडीया काय भन्नाट आहे.. :)
सगळ्या लेखाला चित्रांमुळे खूप छान रंगत चढली आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Apr 2009 - 7:05 am | भडकमकर मास्तर
प्रवासवर्णनात तुमचा नेहमीच पैला नंबर ....
.. फोटो आणि तिथली प्रसिद्ध खादाडी यामुळे तर अहाहा... =D>
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
20 Apr 2009 - 7:13 am | सँडी
हेच म्हणतो.
-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
20 Apr 2009 - 11:43 pm | धनंजय
उत्तम प्रवास आणि खादाडी-वर्णन!
19 Apr 2009 - 10:22 pm | रामदास
नेहेमी प्रमाणे सुंदर लेख.
19 Apr 2009 - 11:03 pm | चकली
लेख छान आहे. फोटोंमूळे अजून रंगत वाढलीय. युरोप टूर ला जावेसे वाटायला लागले
चकली
http://chakali.blogspot.com
20 Apr 2009 - 12:06 am | बेसनलाडू
नेहमीसारखेच रंगतदार सचित्र प्रवासवर्णन. आणि माहितीपूर्णही!
वर चकलीताई म्हणतात तसे युरो ट्रिप करावीशी वाटते आहे.
(प्रवासी)बेसनलाडू
20 Apr 2009 - 7:13 am | नंदन
आहे, लेख आणि फोटोज दोन्ही आवडले. एक शंका - गेलाटो हा इटालियनमधला उच्चार आहे का? इथे त्याच पदार्थाला जिलाटो म्हणताना ऐकले आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
20 Apr 2009 - 11:12 am | स्वाती दिनेश
गिलेटो-जिलेटो : जर्मनाळलेला उच्चार गिलेटो आहे रे, त्यामुळे तोच डोक्यात फिट्ट बसलाय.. पण जिलाटो/जिलेटो.. हा इटालियन उच्चार बरोबर. आइसक्रिम पार्लरला जिलेटोरिया का काहीस म्हणतात ना..
स्वाती
20 Apr 2009 - 12:00 pm | पर्नल नेने मराठे
जिलेटो म्हणतात......
चुचु
26 Apr 2009 - 7:25 pm | टारझन
अर्रे वा !!! हे मराठी लिखाण अचाणक कसं काय सुधारतं बुआ ?
असो !! स्वाती तै !! बाकी लोकांसारखंच म्हणतो ...आपला हेवा वाटतो !!
20 Apr 2009 - 6:23 am | चित्रा
प्रवासवर्णन. अजून योग आला नाही, तिथल्या प्रवासाचा, पण नक्की लक्षात ठेवावे असे ठिकाण आहे.
20 Apr 2009 - 7:24 am | दशानन
छान माहीती व छायाचित्रे !
* छायाचित्रे जरा मोठी नाही का डकवता येणार, छोटी छायाचित्रे रसभंग करत आहेत :)
20 Apr 2009 - 11:09 am | घाटावरचे भट
मस्त प्रवासवर्णन!!
20 Apr 2009 - 11:14 am | विनायक प्रभू
भारी
20 Apr 2009 - 11:35 am | चिरोटा
वर फोटोपैकी एक फोटो पोन्टे विकियो चा आहे.बरोबर? जिकडे पुलावर दागिन्यांची दुकाने आहेत?गेल्या वर्षी तिकडे गेलो असताना खरेदी करण्याचा ईरादा होता पण किंमती भन्नाट होत्या म्हणून विचार सोडला.
अवांतर-सांता मारिया चर्चकडे जाताना एक माणूस रस्त्यावर बसून भीक मागत होता.एका हातात सेल फोन घेवून तो बोलत होता आणि दुसर्या हातात पैशाची थाळी होती.!!फोटो काढणार ईतक्यात त्याचे संभाषण संपले.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
20 Apr 2009 - 11:43 am | स्वाती दिनेश
वर फोटोपैकी एक फोटो पोन्टे विकियो चा आहे.बरोबर? जिकडे पुलावर दागिन्यांची दुकाने आहेत?गेल्या वर्षी तिकडे गेलो असताना खरेदी करण्याचा ईरादा होता पण किंमती भन्नाट होत्या म्हणून विचार सोडला.
हो, तो जुना पूल- पोंटे विकिओ/व्हेकिओ.. दागिन्यांची दुकाने पाहिली..पण नुसतीच पाहिली..
अवांतर-सांता मारिया चर्चकडे जाताना एक माणूस रस्त्यावर बसून भीक मागत होता.एका हातात सेल फोन घेवून तो बोलत होता आणि दुसर्या हातात पैशाची थाळी होती.!!फोटो काढणार ईतक्यात त्याचे संभाषण संपले.
:)
स्वाती
20 Apr 2009 - 4:42 pm | मेघना भुस्कुटे
तो फोटो हुकला की आमचा! कसली धमाल आली असती...
मस्त लेख. विशेषतः आइसक्रीम... :(
20 Apr 2009 - 11:54 am | ऋषिकेश
वा! बरेच विस्तृत लिहिले आहे. (फोटु + लेखन) आवडले. नेहेमीप्रमाणे तिथे जायची इच्छा अनेकपटींने वाढली
ऋषिकेश
20 Apr 2009 - 2:36 pm | मदनबाण
ताई तु इतकं सुंदर कसं लिहतेस बरं ? सगळीकडे मीच फिरुन आलोय असे वाटले.
फोटो तर क्लासच आहेत... :) विशेष्तः आईस्क्रीमचे तर फारच आवडले.
(फॅमेली पॅक आईस्क्रीम चा डब्बा एकटाच चट्टम करणारा)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
20 Apr 2009 - 2:46 pm | llपुण्याचे पेशवेll
वाह सुंदर वर्णन. पास्ता, पिझ्झा, स्पागेटी आणि आईस्क्रीमचे वर्णन अगदी अत्युत्तम जमले आहे. बाकी लेखही खासच.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
20 Apr 2009 - 3:03 pm | स्वाती राजेश
मस्त वर्णन केले आहेस..
सोबत फोटोही छान आहेत...
आइस्क्रीमचे प्रेझेंटेशन आवडले.... :)
20 Apr 2009 - 3:08 pm | बिपिन कार्यकर्ते
जळ जळ जळ जळलो. :(
बिपिन कार्यकर्ते
20 Apr 2009 - 7:29 pm | क्रान्ति
प्रवासवर्णन आणि फोटोग्राफी दोन्हीत हातखंडा आहे स्वातिताई! अशीच जगाची सफर घडवा आम्हालाही. दिल खूश!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
20 Apr 2009 - 7:54 pm | शितल
स्वातीताई,
तु प्रवास वर्णन खुपच सुंदर लिहितेस..आणि आम्हाला ही तुझ्या सोबत फिरवुन आणतेस. :)
फोटो ही सुरेख. :)
20 Apr 2009 - 9:46 pm | योगी९००
फ्लोरेन्स जवळच पिसा आहे. ते पाहिले का? मी नुकताच पिसा, फोरेन्स, मिलान आणि व्हेनिस पाहून आलो. मला व्हेनिस आणि पिसाच जास्त आवडले.
फ्लोरेन्स हि छान आहेच. पण पिसा मला जास्त आवडले. (जरी एकच बघण्यालायक ठिकाण असले तरी).
खादाडमाऊ
21 Apr 2009 - 12:43 pm | स्वाती दिनेश
पिसा,व्हेनिस मागे एकत्र केले होते. ह्यावेळी फकस्त मनमुराद फिरेन्झ !
स्वाती
20 Apr 2009 - 11:12 pm | रेवती
नेहमीप्रमाणे प्रवासवर्णन छान!
पिझ्झा व पस्ताचे वर्णन चांगले केले असलेस तरी आता अजून नको बाई!
आम्ही कसे पोहोचणार तिकडे?
जिलाटो/ गेलाटो बद्दल समजले.
इतके दिवस ते लुसलुशीत आइसक्रिम आम्ही जेलाटो म्हणून खात होतो.
आता जिलाटो किंवा गेलाटो म्हणून खाऊ.;)
बाकी अननसामध्ये अननसाचं आइसक्रिम, लिंबामध्ये लिंबाचं...
भारीच!!!:)
(आधी रोमायण वाचले....धक्का बसणे स्वाभाविक आहे.)
रेवती
20 Apr 2009 - 11:17 pm | कुंदन
मजा आली वाचायला...
21 Apr 2009 - 3:27 pm | परिकथेतील राजकुमार
नेहमी प्रमाणेच सर्वांग सुंदर प्रवास वर्णन :)
फोटु शॉल्लीड !
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
22 Apr 2009 - 11:16 am | सुधीर कांदळकर
वर्णनाला नांवाची व्यु्त्पत्ति झकास जोडली. त्यामुळें खुमारी मस्त वाढली .शहराच्या इतिहासाचा मागोवा, विविध शहरांच्या सौंदर्याची छान तुलना, तिथल्या पिझ्झांच्या चवींची तुलना चित्रें नेहमीप्रमाणे झकास.
आअपल्या भ्रमंतीचे सगळेच भाग छान असतात. पण हा विशेष आहे. भीमसेनांच्या सगळ्याच मैफिली छान असतात. पण एखादी जास्तच रंगते तसें वाटलें.
सुधीर कांदळकर.
22 Apr 2009 - 1:58 pm | स्वाती दिनेश
सर्वांना मनापासून धन्यवाद,
स्वाती
22 Apr 2009 - 3:05 pm | स्मिता श्रीपाद
स्वातीताई,
फार सही लिहिलंयस...अगदी तिथे फिरुन आल्यासारखं वाटलं....
आणि आईस्क्रिम चा फोटो तर लाजवाब.. :-)
-स्मिता
26 Apr 2009 - 7:20 pm | सुनील
नेहेमीप्रमाणेच झक्कास प्रवासवर्णन!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.