"डोकं फिरलंया...बयेचं डोकं फिरलंया...'
लग्नसमारंभाला अगदी साजेसं आणि नवरा-नवरीच्या मनःस्थितीचं सुयोग्य वर्णन करणारं गाणं बॅंडवर वाजवलं जात होतं. (लग्नाचीही काय गंमत असते बघा...आधी वधूपक्षाकडली मंडळी नवऱ्या मुलासाठी बॅंड वाजवतात आणि मग त्याचा बॅंड वाजवतात !) पाहुणे झकास नाचत होते. गणपतीतल्या नाचापेक्षा या नाचाचा दर्जा किंचित वरचा आहे, अशी शंका घ्यायला वाव होता. फुगड्या रंगल्या होत्या. काही जण लग्नातल्या कामांचा शीण घालवण्यासाठी अंग हलवत होते तर काही जण आधीच "श्रमपरिहार' करून आले होते आणि आता अंगात भिनलेलं रसायनच त्यांना नाचवत होतं. करवल्या घरात असले-नसलेले सगळे दागिने अंगावर चढवून, मेकअपची तमाम साधनं वापरून तरुण पोरांचं लक्ष वेधून घेण्याच्या आटोकाट प्रयत्नात होत्या. ज्येष्ठ मंडळींच्या सध्या कशी हवा पडलेय, रस्त्यांवर चालताना कसा त्रास होतो वगैरे गप्पा रंगल्या होत्या. बायका मंडळी एकमेकींच्या साड्या, दागिने, नवी खरेदी, अमक्याच्या लग्नात असं झालं, तमकीच्या सासरच्यांनी तमूक हुंडा मागितला वगैरे विधायक गप्पांमध्ये रंगल्या होत्या.
एकूण काय, सगळं वातावरण अगदी उत्साही आणि आनंददायी होतं. सगळे मजेत बेधुंद होते. एक नवरा मुलगा सोडून. कारण ज्याच्यासाठी हे सगळं चाललं होतं, त्या बिचाऱ्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. खाटिकखान्याकडे निघालेल्या कोकराच्या चेहऱ्यावरचे भाव त्याच्या मुखड्यावरून ओघळत होते. एकतर आयुष्यात तो घोड्यावर पहिल्यांदाच बसला होता. (तसं, प्रत्येक नवऱ्या मुलाला लग्नाच्या निमित्तानं वधू आणि वरपक्षाकडील मंडळी "घोड्यावरच' बसवतात म्हणा!) त्यातून ते घोडं जरा जास्तच उंच होतं. वर चढतानाही त्याला दोन-तीन मित्रांच्या हातांच्या जुडीचा, खांद्यांचा, पाठीचा आधार घ्यावा लागला होता. त्यामुळं घोड्यावरून खाली बघताना त्याला जत्रेतल्या उंच पाळण्यात बसल्यासारखंच वाटत होतं. त्यातून त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. म्हणजे जरा काही इकडचं तिकडे झालं, तरी कुणाला हाक मारण्यासारखीही परिस्थिती नव्हती. अशा प्रचंड दारूण अवस्थेत अंग चोरल्यासारखा तो आपला घोड्यावर बसला होता. उतरायची वेळ कधी येतेय, याची वाट बघत!
बॅंडवाले तर त्या दिवशी पिसाळल्यासारखेच वाजवत होते. त्यांचा ढणढणाट अख्ख्या पंचक्रोशीत ऐकू गेला पाहिजे, असा पणच केला होता त्यांनी जणू. त्यामुळं दुसऱ्यानं बोललेलं काय, स्वतः बोललेलंही समजणं कठीण होतं.
म्हातारे-कोतारे आपले कडेकडेनं आपला जीव सावरत चालत होते. बॅंडवाल्यांनी "डोकं फिरलंया' संपल्यावर "मुंगळा' वाजवायला घेतलं. मग नाचणाऱ्या मंडळींना आणखी चेव चढला. वरातीत नवा जोष भरला.
लग्नमंडप नजरेच्या टप्प्यात आल्यावर नवरदेवाच्या जिवात जीव आला. आपल्या लग्नसमारंभाऐवजी "निरोप समारंभ' होण्याची शक्यता आता कमी झाली, अशी धाकधुकी त्याच्या मनात आली. एरंडेल प्यायल्यासारखा झालेला त्याचा चेहरा जरासा उजळला. आशेनं तो लग्नमंडपाच्या दिशेनं डोळे लावून बसला.
पण मंडप जवळ आल्यावर वरातीचा वेगही कमी झाला. बॅंडवाले मुंगीच्या पावलांनी चालू लागले. वऱ्हाडी मंडळींनी दिलेल्या अनेक गाण्यांच्या फर्माईशी त्यांना अजून पूर्ण करायच्या होत्या. तसं, ते कोणतं गाणं वाजवताहेत, याच्याशी नाचणाऱ्यांना काही सोयरसुतक नव्हतंच, कारण कानावर काहीतरी पडत राहिल्याशी त्यांना मतलब होता. त्यांची "झिंग' फक्त त्या ढणढणाटात होती.
वरात ऐन रंगात आली असताना एक आक्रीत घडलं. म्हणजे तशी ती गावातली नेहमीचीच घटना होती, पण वरात व्यवस्थित चाललेली दैवालाही बघवलं नसावं. काहीशा अंतरावरून जाणाऱ्या म्हशींच्या कळपातली एक म्हैस आपली कळप सोडून या वरातीच्या दिशेनं भरकटली. दोघा-तिघांनी तिला हाकलण्याचा प्रयत्न केला, पण ती बधेना. ते बघून एका "स्वयंसेवक' आजोबांच्या अंगात संचारलं. आपल्या हातातली लांबच्या लांब छत्री त्यांनी तिच्यावर उगारली. छत्रीचं खालचं टोक म्हशीच्या पाठीला किंचित घासलं. तशी म्हैस उधळली. आणि आपल्या कळपाच्या दिशेनं जायचं सोडून थेट वरातीतच घुसली. ऐन रंगात आलेल्या वरातीचा रंगाचा बेरंगच झाला. "फुल टू' झालेल्यांची एका क्षणात उतरली. कुणी खाली पडले, कुणी एकमेकांच्या अंगावर, कुणी चिखलात. कुणी धावताना चप्पल निसटून पडले, कुणी अडखळून तोंडावर आपटले. कुणाचं डोकं दगडावर आपटलं आणि रक्त वाहू लागलं. कुणाला म्हशीच्याच जबरदस्त खुरांचा प्रसाद मिळाला. कुणाच्या नव्याकोऱ्या कपड्यांवर म्हशीच्या शेणानं माखलेल्या शेपटाचा फटकारा बसला आणि वेगळीच नक्षी उमटली. कुणाच्या दिशेनं म्हशीनं शिंग उगारलं आणि त्यांचं धोतर सुटून अनावस्था प्रसंग ओढवला.
नवरदेवाची तर जागीच दातखीळ बसली. देवाचं नाव घेण्याशिवाय त्याच्या हातात काही नव्हतं. वरातीतला हा धुमाकूळ पाहून आणि म्हैस अंगावर धावून येताना पाहून घोडाही उधळला. पुढचे दोन्ही पाय उचलून त्यानं उंच सलामी दिली आणि एवढा वेळ टिकवून ठेवलेलं नवरदेवाचं अवसान गळालं. तो मागच्या मागे खड्ड्यात पडून पाठीवर आपटला. त्याचा कोरा करकरीत जोधपुरी चिखलानं माखला. चेहरा न ओळखता येण्यासारखा झाला.
पोरीबाळींना तर पळता भुई थोडी झाली. कानातली, गळ्यातली खाली पडून मातीशी एकरूप झाली. सगळ्यांच्या पायदळी तुडवले गेल्यानं ते न ओळखता येण्याजोगे झाले. भरजरी साड्या काटेकुटे लागून, अडकून जागोजागी फाटल्या. डोक्यावरच्या बिंद्या धुळीत मिळाल्या. रेशमी कपड्यांना पोतेऱ्यांची कळा आली.
हा सगळा धिंगाणा घडवणारी म्हैस आणि ते म्हातारे आजोबा नामानिराळेच राहिले होते. जणू काही वरात उधळणं, हेच इतिकर्तव्य असल्याच्या थाटात म्हैस हा सगळा "राडा' झाल्यानंतर निमूटपणे तिथून चालती झाली. आजोबांनी एकंदर लक्षणं ओळखून दुरूनच सगळ्या परिस्थितीचं निरीक्षण चालवलं होतं. वर काही जणांना सूचना करण्याचं आणि काहींना शिव्या घालण्याचं कर्तव्यही ते पार पाडत होते.
वरातीचा हा सगळा "इस्कोट' इकडे झालेला असताना तिकडे भटजीबुवा मात्र मुहूर्त टळून जात असल्यामुळे घाई करत होते. बरं गावात भटजी एकच. त्यामुळे त्यांना हे लग्न आटपून दुसरीकडे श्राद्धाचे जेवायला जायचं होतं. तिथून संध्याकाळी पुन्हा या लग्नातल्या जेवणाचा डबा न्यायला येतो, असं त्यांनी सांगून ठेवलं होतं.
वाजंत्रीवाल्यांनाही गावात आणखी एक लग्न होतं. आणखी एका लग्नात मुहूर्ताआधीच वाजंत्री वाजवून ते इकडे धावत आले होते. त्यामुळं त्यांची घाई चालली होती. शेवटी कंटाळून ते निघाले.
मंडपापासून काही अंतरावर ही घटना घडली होती, त्यामुळं मंडपातल्या लोकांना ती कळायला मार्गच नव्हता. वरात एकाएकी गायब कुठे झाली, हे पाहण्यासाठी मंडपातलं कुणीतरी बाहेर आलं, तेव्हा ही सुवार्ता कळली. मुहूर्त टळून गेल्यानं सगळीच मंडळी घाई करत होती, त्यामुळं काहीतरी थातूरमातूर कारण सांगून यजमान मंडळींनी लोकांना आधीच भोजनाच्या पंगतीकडे वळवलं.
नवरदेव आणि वरपक्षाकडची मंडळी कण्हत, कुथत कशीबशी मागच्या दारानं मंडपापर्यंत पोचली आणि भरलेल्या पिंपातच एकेकानं आंघोळी केल्या. कुणाचे तरी कपडे घातले आणि नवरदेव अखेर मंडपात अवतीर्ण झाले.
लग्नातल्या आठवणी मनाच्या कुपीत जपून ठेवण्यासारख्या असतात म्हणतात. या लग्नाच्या आठवणी तर नवरदेवाच्याच नव्हे, तर वरपक्षाकडच्या सगळ्याच मंडळींनी मनाच्या कुपीत खोल खोल, पार तळात दडवून ठेवल्या. पुन्हा कधीही बाहेर न काढण्यासाठी !
------
प्रतिक्रिया
4 Feb 2008 - 2:25 am | प्राजु
नेहमिचा मिडास टच नाही जाणवला..यात.."आपल्या अभिजीत्"च्या श्टाईलमध्ये नाहिये हे.
पण ठीक आहे.
- प्राजु
4 Feb 2008 - 7:19 am | विसोबा खेचर
अभिजितशेठ,
मस्त वर्णन आणि नेहमीप्रमाणे झकास लेख...:)
तात्या.