द शॉशँक रिडेम्शन

सुमीत भातखंडे's picture
सुमीत भातखंडे in जनातलं, मनातलं
8 Apr 2009 - 1:24 pm

१९९४ साली रिलीज झालेला, आणि आज एक क्लासिक म्हणून मानला गेलेला एक अप्रतिम चित्रपट. टिम रॉबिन्स आणि मॉर्गन फ्रीमन यांच्या अप्रतिम अभिनयानी नटलेला असा हा एक सर्वांगसुंदर चित्रपट आहे. कथानायक अँडी डूफ्रेन (टिम रॉबिन्स) याने शॉशँक स्टेट प्रिझन मधे घालवलेला जवळ्-जवळ २० वर्षाचा काळ, आणि तिथे त्याला करावा लागलेला अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना, आणि "Fear Can Hold You Prisoner, Hope Can Set You Free" ही टॅगलाईन सार्थ ठरवणारा सुरेख शेवट, हे या चित्रपटाचं मुख्य कथासुत्र.

कथेचा थोडक्यात सारांश असा:
साल १९४७. कथानायक अँडी डूफ्रेन याला स्वतःची बायको, आणि तिचा प्रियकर यांच्या खूनाच्या आरोपाखाली, निव्वळ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. आणि त्याची रवानगी शॉशँक स्टेट प्रिझन मधे केली जाते. या तुरुंगाचं वैशिष्ट्य म्हणजे, इथे असलेले बरेचसे कैदी हे, त्यांनी न केलेल्या गुन्ह्यासाठी, अँडी प्रमाणेच, निव्वळ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर इथे आलेले असतात. त्यांच्यापैकीच एक कैदी म्हणजे एलीस बॉईड (मॉर्गन फ्रीमन), ज्याला सगळे "रेड" या नावानी ओळखतात. ऑलरेडी २० वर्षं शि़क्षा भोगलेला हा माणूस, तुरुंगात काही डॉलर्सच्या बदल्यात कैद्यांसाठी बेकायदेशीर रित्या वस्तु स्मगल करण्यासाठी ओळखला जातो.

पहिल्याच दिवशी सर्वं नविन कैद्यांना भयंकर टॉर्चरला सामोरं जावं लागतं. हे सगळं सहन न होवून जर एखादा कैदी रडू भेकू लागलाच तर त्याला, शॉशँकचा Chief of guards "कॅप्टन बायरन हॅडली" याच्या अमानुष माराला सामोरं जावं लागतं. पण मुळातच शांत स्वभावाचा अँडी या सगळ्याला तितक्याच शांतपणे सामोरा जातो. काही दिवसातच या सगळ्या वातावरणाशी जुळवून घेता घेता, त्याची "रेड"शी मैत्री होते. इतर कैद्यांप्रमाणेच, रेड अँडीसाठीही त्याला हव्या असलेल्या वस्तु स्मगल करून आणू लागतो, ज्यामधे एक रॉक हॅमर आणि काही नट्यांच्या पोस्टर्सचा समावेश असतो.

असेच दिवस जात असतात, आणि एक दीड-दोन वर्षांनंतर योगायोगाने एक प्रसंग असा घडतो ज्यामुळे अँडीच्या त्या तुरुंगातल्या आयुष्याला एक विलक्षण कलाटणी मिळते. हुद्यानी बँकर असलेला अँडी, तुरुंगाचा Chief of guards कॅप्टन हॅडली याला त्याची वडिलोपार्जित संपत्ती पुर्णपणे टॅक्सफ्री करण्याची क्लुप्ती सांगतो. अर्थातच ती यशस्वी होते, आणि तुरुंगातले बाकीचे गार्ड्स सुद्धा आर्थिक सल्ल्यांसाठी अँडीकडे येउ लागतात. यांच्यातच तुरुंगाचा मुख्यं अधिकारी "वॉर्डन सॅम्युएल नॉर्टन" याचाही समावेश असतो.
अँडीच्या ह्या ज्ञानाचा फायदा नॉर्टन स्वतःच्या वैयक्तीक फायद्यासाठी करु लागतो. एका स्थानिक बांधकाम प्रकल्पासाठी तुरुंगातल्या कैद्यांचा उपयोग करुन त्यातून भरपूर आर्थिक नफा, अँडीच्या मदतीने नॉर्टन मिळवू लागतो. यातही अँडीच्या अप्रतिम बुद्धीमत्तेचा प्रत्यय येतो. सिस्टम मधल्या लूपहोल्सचा वापर करून, अँडी एक खोटी ओळख तयार करतो, ज्याचं नाव असतं "रँडल स्टिफन्स". नॉर्टनचा सगळा बेकायदेशीर कारभार लपवण्यासाठी या, मुळात अस्तित्वातच नसलेल्या, पण ड्रायव्हिंग लायसन्स पासून सोशल सिक्युरिटी नंबर पर्यंत, सर्वं डिटेल्स उपलब्धं असलेल्या व्यक्तिचा उपयोग केला जातो.

असाच काळ पुढे सरकतो, आणि एके दिवशी टॉमी विलियम्स नावाचा एक तरूण कैदी शॉशँकमधे येतो. याच्याकडून अँडीला त्याच्या बायकोच्या खून्याची माहिती मिळते. अँडी रिट्रायलसाठी नॉर्टनची मदत मागतो, पण एकदा अँडी सुटला तर नॉर्टनचा बेकायदेशीर कारभारही उघडकीस येईल या भितीने नॉर्टन अँडीला एकांतवासात पाठवून देतो, आणि कॅप्टन हॅडलीच्या हातून टॉमीची चा खून करवतो. अशाप्रकारे एकांतवासातून परत आल्यावरही, तुरुंगातून सुटण्याची उरली-सुरली आशाही संपलेला अँडी नॉर्टनचं बेकायदेशीर खातं सांभाळण्याचं काम करु लागतो.
आणि एक दिवस सकाळी, अँडी त्याच्या सेलमधनं गायब झाल्याचं लक्षात येतं आणि संपूर्ण तुरुंगात हाहाकार माजतो. सेलचं दार तर बंद, पण आतला कैदी गायब ह्या द्रुश्यावर नॉर्टनचा काही केल्या विश्वासच बसत नाही. आणि या क्षणी चित्रपटाला खरी कलाटणी मिळते. अँडी सेलमधून कसा पळतो, तो कुठे जातो, काय करतो यासाठी चित्रपट स्वतःच पाहिल पाहिजे. सगळं इथेच रिव्हील करून रसभंग नाही करणार.

तीव्र इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर माणूस काय करु शकतो याचं उत्तम दर्शन या चित्रपटात घडतं. संपूर्ण चित्रपट अथं पासून इती पर्यंत आपल्याला खिळवून ठेवतो. यात उत्तम पटकथेबरोबरच टिम रॉबिन्स आणि मॉर्गन फ्रीमन यांच्या अप्रतिम अभिनयाचाही मोठा वाटा आहे.
आज एक क्लासिक म्हणून ओळखला गेला असला तरी, त्यावेळी म्हणजेच १९९४ साली मात्र फारसं यश या चित्रपटाच्या पदरात नाही पडलं. ह्याचं मुख्यं कारण कदाचित त्याच वर्षी प्रदर्षीत झालेले "फॉरेस्ट गम्प" आणि "पल्प फिक्शन" हे सुपरहिट चित्रपटही असू शकतील. ह्याचा परिणाम त्यावर्षीच्या ऍकॅडेमी पुरस्कारांमध्येही दिसून आला. सात नामांकनं मिळून सुद्धा, एकही पुरस्कार याच्या पदरात पडला नाही.
त्यानंतरमात्र वर्षागणिक चित्रपटाची लोकप्रियता वाढायला सुरुवात झाली. आजच्या तारखेला हा चित्रपट आजवर बनवलेल्या गेलेल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.

मला कल्पना आहे की चित्रपटाच्या मानाने खूपच त्रोटक आहे हे लिखाण. अजूनही बरच काही लिहिता येईल, पण एकतर हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, आणि "द शॉशँक रिडेम्शन" सारख्या चित्रपटाचं सौंदर्य शब्दात मांडण्याइतकं सामर्थ्य माझ्याजवळ नाही. काही सुचना असतील तर जरूर कळवा.

सुमीत भातखंडे

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Apr 2009 - 1:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा माझाही आवडता चित्रपट! फुकटात डाऊनलोड करून पाहिला, आणि एवढा आवडला की त्याची डीव्हीडी विकत घेतली.
ब्लॉगविश्वात याचं परीक्षण आजानुकर्ण यांनी इथे लिहिलं आहे, तेही पहा एकदा!

ही आय.एम.डी.बी.ची लिंक!

टीम रॉबिन्सचं चित्रपटात नाव अँडी ड्रूफेन नसून अँडी डूफ्रेन आहे.

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

सुमीत भातखंडे's picture

8 Apr 2009 - 2:13 pm | सुमीत भातखंडे

सुचनेबद्दल धन्यवाद अदिती.
आजानुकर्ण यांचं परिक्षणही पाहिलं.
खूपच सरस लिहीलय. त्या लिंकबद्दलही थँक्यु.

निखिल देशपांडे's picture

8 Apr 2009 - 2:14 pm | निखिल देशपांडे

हा माझा पण आवडता चित्रपट आहे...

मैत्र's picture

8 Apr 2009 - 5:05 pm | मैत्र

गेल्याच आठवड्यात परत एकदा पाहिला.
रेड च्या स्वगताचे - नॅरेशनचे भाग हा जबरदस्त भाग आहे आणि होप - आशा हा याचा मध्यवर्ती विचार शब्दात मांडत राहतो.
Remember Red, hope is a good thing, maybe the best of things, and no good thing ever dies.

सालोमालो's picture

8 Apr 2009 - 4:15 pm | सालोमालो

अप्रतिम चित्रपट! या चित्रपटाला तोड नाही.

Hope is a good thing. May be the best of things.

ज्या प्रकारे हे वाक्य म्हटलं गेलेल आहे ते केवळ अशक्य आहे. या चित्रपटानी मला खूप दिलयं.

सालो

पाषाणभेद's picture

8 Apr 2009 - 1:57 pm | पाषाणभेद

अँडी सेलमधून कसा पळतो हि उत्सुकता ताणली गेली.
छान लिहीले आहे.
- पाषाणभेद

अनिल हटेला's picture

8 Apr 2009 - 3:22 pm | अनिल हटेला

सध्या बघतोये !!

http://v.youku.com/v_show/id_XNjU5MjY5Njg=.html

इथे उपलब्ध आहे !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

दशानन's picture

8 Apr 2009 - 3:29 pm | दशानन

सध्या डाऊन लोड करत आहे, अर्धा तासात डाऊनलोड होईल, त्यानंतर आज बघेन व मग लिहीन ;)

अभिरत भिरभि-या's picture

8 Apr 2009 - 4:31 pm | अभिरत भिरभि-या

पहिलाच प्रयत्न बराच चांगल जमला आहे. चित्रपट सुंदर आहेच. बघताना न कळालेले काही कच्चे दुवेही कळून गेले.
आऊर बी आने दो
अभिरत

अनामिक's picture

8 Apr 2009 - 5:03 pm | अनामिक

द शॉशँक रिडेम्शन पाहील्यानंतर "नाही आवडला" सांगणारा विरळाच असेल. या चित्रपटाचं कथानक आणि त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम अगदी जबरदस्तं आहे. चित्रपट अगदी संथपणे पुढे सरकतो, पण पुढे काय होणार ह्याची वाट बघत प्रे़क्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो. ह्याला कुठेही अतीरंजीत न होता, अगदी वास्तवाला धरून चालणारा एक अप्रतिम चित्रपट म्हणणे गैर ठरू नये. अनेक वेळा बघूनही अजून एकदा बघण्यासारखा हा चित्रपट आहे हे नक्की!

या चित्रपटात अँडीने जेलमधून सुटका झाल्यावर बॉईडसाठी लिहीलेल्या पत्रातलं एक वाक्य मनात घर करून जातं... ते अशा प्रकारचं "होप इज ए गुड थिंग, मे बी दि बेस्ट ऑफ थिंग्ज् दॅट किप्स् ह्युमन स्पिरीट अलाईव".... किती खरंय नाही?

(शॉशँकचा पंखा) अनामिक

संदीप चित्रे's picture

8 Apr 2009 - 5:31 pm | संदीप चित्रे

आय. आर. एस. च्या टॅक्सेसमधून मार्ग कसा काढायचा ते कथानायक सांगतो तो सीनही मस्त आहे.
कितीतरी सीन्स सांगता येतील या सिनेमातले.
या दुव्यासाठी धन्स सुमीत
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

मदनबाण's picture

8 Apr 2009 - 6:42 pm | मदनबाण

छान समीक्षा...जमल्यास नक्की पाहीन. :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

मुक्तसुनीत's picture

8 Apr 2009 - 7:04 pm | मुक्तसुनीत

परीक्षण आवडले ! सोप्याशब्दातला उत्तम परिचय !
काही मनात आलेले मुद्दे :

- स्पॉइलर अलर्टस् द्यायला हवेत.
- चुकीचा आळ येणे, तुरुंगात लांबच लांब शिक्षा भोगणे , सत्याचे ज्ञान होणे आणि ज्ञान झाल्यावर आशेचा किरण दिसणे , आणि तरीही हतबल वाटणे , इच्छाशक्ती, प्रयत्न , सुटका या सगळ्यामधेच एक ऍलिगॉरी (मराठी शब्द ) आहे : माणसाच्या एकंदर आयुष्याबद्दलची भाष्ये. याबद्दल थोडे विवेचन आवडले असते.
- चित्रपट ज्या काळाचे चित्रण करतो त्या काळाचे , त्या काळातल्या माणसांच्या विचारांचे , त्या काळच्या मूल्यांचे प्रभावी चित्रण. या चित्रणातून साधलेल्या परिणामाबद्दल थोडेसे ....
- चित्रपटाची गती. "तुरुंगात असताना काळ खूप संथ हलतो" या अर्थाचे वाक्य रेड च्या तोंडी आहे. तर काळाच्या या संथपणाला चित्रपटाच्या गतीमधे कसे प्रतिबिंबित केले गेले आहे याबद्दल ...
- रेडची व्यक्तिरेखा .मॉर्गन फ्रीमन. चित्रपट सांगतो कहाणी अँडीची , पण चित्रपटामधला व्हॉईस्-ओव्हर आहे रेड्चा. चित्रपट घडतो , काहाणी सांगितली जाते आहे रेड्च्या पर्स्पेक्टिव्हमधून. जितका सिनेमा अँडीबद्दल आहे तितकाच रेडबद्दल. अँडी आपल्या अन्यायावर मात करू शकतो. रेड तुरुंगाबहेर पडल्यावर फोलपटासारखा होतो ...दोघांमधला विरोधाभास. एकजण हिरॉइक कृत्ये करतो ...दुसरा अतिशय शांतपणे त्याचा लेखाजोखा टिपतो. बर्‍याचदा आपले लक्ष्य मैदानातल्या योद्द्याकडे असते आणि ते बरोबर आहे ; पण योद्ध्याला "कलोजियम"मधून दिसणारे दृष्य नशीबात नाही . ते दाखवयला आपल्याला "रेड" हवा. मॉर्गन फ्रीमनचा आवाज , त्याचे व्यक्तिमत्व ..... तो केवळ एक व्यक्तिरेखा उभी करत नाही ; तर काळ साकारतो.

मैत्र's picture

9 Apr 2009 - 10:20 am | मैत्र

ते दाखवयला आपल्याला "रेड" हवा. मॉर्गन फ्रीमनचा आवाज , त्याचे व्यक्तिमत्व ..... तो केवळ एक व्यक्तिरेखा उभी करत नाही ; तर काळ साकारतो.
हे खूपच आवडलं.

अँडी ला खूप मोठा हिरो करून सर्व संवाद त्याच्या तोंडी न कोंबता रेड चा - मॉर्गन फ्रीमन चा भरदार गंभीर आवाज त्याच्या स्वगतांमधून, स्थिर नॅरेशन मधून अँडीच्या आयुष्यातल्या गोष्टी, जेलमधलं वातावरण आणि चित्रपटाची मध्यवर्ती विचारधारा आपल्यापर्यंत पोचवत राहतो.

चित्रपट पाहून झाला आहेच अनेकदा. सहज त्याबद्दल वाचताना कळालं की या दोन्ही भूमिकांसाठी इतर अनेक दिग्गज अभिनेत्यांचा विचार झाला होता - विशेषतः टॉम हँक्स, केविन कोस्टनर आणि रेड साठी क्लिंट इस्टवूड, हॅरिसन फोर्ड.
पण दिग्दर्शकाला असं वाटलं की मॉर्गन फ्रीमन हाच खरा रेड आहे... आणि त्याने ते आपल्यालाही दाखवलं...

माणसाच्या एकंदर आयुष्याबद्दलची भाष्ये. याबद्दल थोडे विवेचन आवडले असते.
मुक्तराव - हा तुमचा खास इलाका आहे. यावर जरूर लिहा...

सुमीत भातखंडे's picture

9 Apr 2009 - 12:10 pm | सुमीत भातखंडे

खरं आहे.
मॉर्गन फ्रीमनच्या नरेशनचा उल्लेख मस्ट होता. त्यामुळे चित्रपट अजुन प्रभावी होतो.
थॅक्यु.

गणा मास्तर's picture

8 Apr 2009 - 7:17 pm | गणा मास्तर

अँडी डूफ्रेन पळुन गेल्यानंतर रेड एकदा त्याच्या स्वगतात म्हणतो 'I think I miss my friend' तो सीन अप्रतिम....

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

चित्रपट 'अभ्यासणार्यानी' हा चित्रपट कमीत कमी दोनदा पहायला हवा. याचे कारण चांगली कथा आणि कथेवरून चित्रपटासाठी निर्माण केलेली पटकथा या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात ते समजते. दुसर्यांदा चित्रपट बघत असता बर्याच संवादांचा आणि प्रसंगांचा एक वेगळाच अनुभव येतो. पटकथा लेखकाने चित्रपटात 'नाट्य्' फार छान आणले आहे.

माझ्या लक्षात राहिलेला प्रसंग म्हणजे 'रेड' ची तुरुंगातून मुक्तता.. त्यावेळचा त्याचा संवाद अमेझिंग आहे.. थोडीशी आधीची माहिती द्यायची तर, दर वर्षी (का दर ५ वर्षे ? आठवत नाही) प्रमाणे एक कमिटी कैद्याची मुक्तता करायची की नाही हे त्या त्या कैद्याची मुलाखत घेऊन ठरवत असते. या संवादा पुर्वी दर वेळेस 'रेड' ला विचारले जात असते? "Are you Rehabilitated?".. "Absolutely Sir! I'm completely!! ready to rejoin the society!!" असे नेहेमी 'रेड' म्हणत असतो.. आणि दर वेळी त्याची अर्जी 'नामंजूर' होत असते..

या ही वर्षी त्याची पाळी येते, 'अँडी' आधीच पळून गेलेला असतो..

आता वाचा :

1967 Parole Hearings Man: Ellis Boyd Redding, your files say you've served 40 years of a life sentence. Do you feel you've been rehabilitated?
Red: Rehabilitated? Well, now let me see. You know, I don't have any idea what that means.
1967 Parole Hearings Man: Well, it means that you're ready to rejoin society...
Red: I know what *you* think it means, sonny. To me it's just a made up word. A politician's word, so young fellas like yourself can wear a suit and a tie, and have a job. What do you really want to know? Am I sorry for what I did?
1967 Parole Hearings Man: Well, are you?
Red: There's not a day goes by I don't feel regret. Not because I'm in here, or because you think I should. I look back on the way I was then: a young, stupid kid who committed that terrible crime. I want to talk to him. I want to try and talk some sense to him, tell him the way things are. But I can't. That kid's long gone and this old man is all that's left. I got to live with that. Rehabilitated? It's just a bullshit word. So you go on and stamp your form, sonny, and stop wasting my time. Because to tell you the truth, I don't give a shit.

परिणाम? - मुक्तता! :)

शिवापा's picture

9 Apr 2009 - 12:24 am | शिवापा

अगदि अगदि. दोनदाच कशाला केवळ आवडला म्हणुन आठवड्यातुन चार वेळा असा महिनाभर पाहिला. नंतर तंत्र उमगत गेले तसे आणखि काहि डझन वेळा पाहिला. असा सिनेमा होने नाहि!

शब्देय's picture

9 Apr 2009 - 1:48 am | शब्देय

चित्रपटात अगदी सुरुवातीला जेव्हा अँडी गाडीत हातात पिस्तूल घेऊन बसलेला असतानाचे गाडीत वाजणरे गाणे
( If I didn't care would I feel this way? If this isn't love then why do I thrill?) सूचक आहे...

चित्रपटात शेवटी जेव्हा अँडी रेडशी बोलताना बायकोच्या मृत्यूला अप्रत्यक्षपणे मीच जबाबदार आहे असे जेव्हा म्हणतो तेव्हा या गाण्याचा अर्थ लागतो.

हा त्याचा दुवा ... ( तूनळीवर याचा व्हिडीओ अर्थात मूळ गाण्याचा आहे)

http://www.youtube.com/watch?v=rvwfLe6sLis

आणि हा त्याचा लिरिक्स चा दुवा ...
http://www.lyricsondemand.com/soundtracks/x/xfileslyrics/ifididntcarelyr...

हे आपले माझे निरीक्षण ... कसे वाटले ते जरुर सांगा...

सुमीत भातखंडे's picture

9 Apr 2009 - 12:07 pm | सुमीत भातखंडे

सर्व प्रतिक्रिया व सुचना देणार्यांचे मनापासून धन्यवाद.
मला कल्पना आहे की परिक्षण याहून खूप चांगलं होऊ शकलं असतं.
आतापर्यंत इथे फक्तं वाचत होतो. आता स्वतः लिहिल्यावर कळतय की किती अवघड काम असतं.
सर्व सुचना नक्की लक्षात ठेवीन.

पुन्हा एकदा धन्यवाद.

मैत्र's picture

9 Apr 2009 - 2:10 pm | मैत्र

सुमीत तुम्ही छानच लिहिलं आहे. या चित्रपटाचा आवाकाच इतका मोठा आहे की काय काय लिहावं हा प्रश्न आहे. काही ना काही निसटून जातं.. रसग्रहण लिहावं अशी कलाकृती. त्यातली पात्रं, संवाद, पार्श्वभूमी, अभिनेते, दिग्दर्शन आणि विचार / भाष्य.. बरंच काही आहे त्यामुळे असं वाटत राहणारच की अजून काहीतरी हवं होतं. असं वाटणं म्हणजे परीक्षण याहून चांगलं होऊ शकतं किंवा अवघड आहे असं नाही तर शॉशँक ला इतके आयाम / मिती (आस्पेक्ट्स / डायमेन्शन ला हाच शब्द आहे ना?) आहेत की सगळ्या बाजू एका लेखात मांडणं खरंच खूप अवघड आहे...

मुक्तसुनीत's picture

9 Apr 2009 - 4:06 pm | मुक्तसुनीत

मलासुद्धा मूळ परीक्षण आवडलेलेच होते. उत्तम परिचय करून दिला आहे. माझ्या प्रतिसादात जे लिहिले ते उणीवा दाखवायला नव्हे. वर मैत्र यांनी जे म्हण्टले त्याशी सहमत आहे.

सुमीत यांनी अशीच रसग्रहणे आणखी लिहावीत अशी विनंती करतो !

आनंदयात्री's picture

9 Apr 2009 - 12:37 pm | आनंदयात्री

मस्त रे सुमीत .. उत्तम परिचय !

विसुनाना's picture

9 Apr 2009 - 3:53 pm | विसुनाना

शॉशँकवर मस्त चर्चा सुरू आहे.

लायब्रेरियन ब्रूक्सने पाळलेला जेक नावाचा कावळा हे पात्रही अविस्मरणीय आहे.

अनिंद्य's picture

1 Feb 2017 - 5:40 pm | अनिंद्य

सुमीत, उत्तम परिचय.

होप इज ए गुड थिंग, मे बी दि बेस्ट ऑफ थिंग्स दॅट कीप्स ह्युमन स्पिरीट अलाईव..... ऑल टाईम फेव्हरेट!

या तुरुंगाचं वैशिष्ट्य म्हणजे, इथे असलेले बरेचसे कैदी हे, त्यांनी न केलेल्या गुन्ह्यासाठी, अँडी प्रमाणेच, निव्वळ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर इथे आलेले असतात. त्यांच्यापैकीच एक कैदी म्हणजे एलीस बॉईड (मॉर्गन फ्रीमन), ज्याला सगळे "रेड" या नावानी ओळखतात.

हे नाही पटलं. माझ्या आठवणीप्रमाणे रेडने खरोखर गुन्हा केलेला असतो.

अनुप ढेरे's picture

1 Feb 2017 - 6:47 pm | अनुप ढेरे

बरोबर. पण एकूणच ते लोक स्वतःच समाधान करायला एव्हरीवन इज इनोसंट हिअर असं म्हणत असतात. अँडीचा शिष्य देखील शिस्तीत गुन्हेगारच असतो.

हतोळकरांचा प्रसाद's picture

1 Feb 2017 - 6:44 pm | हतोळकरांचा प्रसाद

हो, रेडने बहुतेक बायकोच्या गाडीचे ब्रेक फेल करून तिला इन्शुरन्स साठी मारल्याचे दाखवले आहे बहुतेक. त्याच गाडीमध्ये शेजारची बाई आणि तिचं लहान मूल पण बसतात आणि तेही मरतात असं काहीसं!

शरभ's picture

1 Feb 2017 - 9:34 pm | शरभ

रेडच काय, बहुतेक सर्वांनी गुन्हा केलेला असतो. पण प्रत्येक जण "Didn't do it, lawyer f****d me.." म्हणत असतो.

//
हो, रेडने बहुतेक बायकोच्या गाडीचे ब्रेक फेल करून तिला इन्शुरन्स साठी मारल्याचे दाखवले आहे बहुतेक. त्याच गाडीमध्ये शेजारची बाई आणि तिचं लहान मूल पण बसतात आणि तेही मरतात असं काहीसं!
//

ही माहिती कुठून मिळवलीत? नाही म्हणजे आमच्या प्रिंटमध्ये अस काहीही नाहीए.

- श

हतोळकरांचा प्रसाद's picture

1 Feb 2017 - 10:47 pm | हतोळकरांचा प्रसाद

नक्की आठवत नाही पण बहुतेक अमेरिकेत असताना पाहिला होता त्यातलंच आठवतंय. माझ्याकडच्या कॉपीत बघून सांगतो.०

Red: There's not a day goes by I don't feel regret. Not because I'm in here, or because you think I should. I look back on the way I was then: a young, stupid kid who committed that terrible crime.

-श

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Feb 2017 - 2:53 pm | हतोळकरांचा प्रसाद

हो मीही काल पळवून पळवून बघितला मूवी परत. नाही सापडला मी म्हणतो तसा संदर्भ. काय माहित कुठे पाहिलं कि दोन मुव्हीज मिक्स करतोय फ्रीमनच्या :~.

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Feb 2017 - 5:31 pm | हतोळकरांचा प्रसाद

बहुतेक तो संदर्भ स्टीफन किंगच्या मूळ कादंबरीतला असावा. कुठे पहिला/चर्चिला/वाचला ते आठवत नाही. गुगल्यावर हा खालील एक संदर्भ मिळाला.

http://shawshank.wikia.com/wiki/Ellis_Boyd_'Red'_Redding

फार effective आहे. Esp अँडी जेंव्हा पहिल्यांदा तुरुंगात शिरत असतो तेव्हा..किंवा त्याची तुरुंगातील शेवटची रात्र..

- श

केडी's picture

2 Feb 2017 - 2:04 pm | केडी

जुन्या आठवणी ताज्या झाल्या! हा चित्रपट बहुदा अख्खा पाठ आहे/होता. अमेरिकेत वास्तव्यास असताना, आम्ही मित्रांनी मिळून एक पाहावे अश्या सिनेमांची यादी केली होती, ती ह्या धाग्यामुळे शोधून इथे देत आहे. (ह्यातले बरेचसे सिनेमे अजून मला बघायचे आहेत, तर काहींची कित्येदा पारायणे झाले आहेत, शॉशांक हा त्यातलाच एक)

यादी फक्त alphabetically दिलेली आहे. ह्यातले सगळेच चित्रपट सगळ्यांनाच आवडतील असे नाहीत, पण तरीही बरेचसे चुकवू नये असे आहेत. यादीत नसतील आणि तुम्हाला काही आवडले असतील, तर जरूर इथे टाका हि विनंती.

1 12 Angry Men
2 2012
3 20,000 Leagues under the Sea
4 A Few Good Men
5 A River Runs Through It
6 A Walk in the Clouds
7 Air Force One
8 American History
9 American President
10 Apollo 13
11 Arlington Road
12 As Good As It Gets
13 Aviator
14 Back to the Future Trilogy  (3 parts)
15 Basic Instinct
16 Beautiful Mind
17 Behind Enemy Lines
18 Ben Hur
19 Blood Diamond
20 Bourne Triology
21 Bucket List
22 Cape Fear
23 Casino Royal  (Bond)
24 Castaway
25 Catch me if you can
26 Commando
27 Contact
28 Core
29 Crimson Tide
30 Deep Impact
31 Devil’s advocate
32 Die Hard – 1
33 Die Hard – 2, 3
34 Dog Day Afternoon
35 E.T.
36 Enemy at the Gates
37 Erin Brockovich
38 Executive Decision
39 Face Off
40 Final Destination
41 First Blood  (Rambo)
42 Flight of the Phoenix
43 For a Few Dollars more
44 Forrest Gump
45 Freedom Writers
46 Ghost
47 Gladiator
48 Godfather
49 Good Will Hunting
50 Heat
51 Home Alone
52 Honey I shrunk the Kids
53 Hunt for Red October
54 In Pursuit of Happiness
55 Inception
56 Indiana Jones Trilogy
57 Into the Wild
58 Jaws
59 Jingle all the Way
60 Jurassic park
61 LA Confidential
62 Macanas Gold
63 Malena
64 MASK, The
65 Meet Joe Black
66 Men of Honor
67 Million Dollar Baby
68 Minority Report
69 Mission Impossible – 1
70 Mission To Mars
71 Mississippi Burning
72 My Cousin Vinny
73 Mystic River
74 National Treasure
75 Negotiator, The
76 No Country for Old Men
77 Nuremberg
78 Ocean’s Eleven
79 October Sky
80 One Flew over Cucoo's Nest
81 Out of Time
82 Pay Back
83 Pay it forward
84 Payback
85 Pelican Brief
86 Philadelphia
87 Prestige, The
88 Pretty Woman
89 Primal Fear
90 Punch Line
91 Rainman
92 Ransom
93 Ray
94 Reindeer Games
95 Rockey - 1, 2
96 Rudy
97 Rules Of Engagement
98 Saving Private Ryan
99 Saw
100 Scarface (Agnipath is on this)
101 Scent of a Woman
102 Schindler’s List
103 Schindler’s List
104 Seabiscuit
105 Serpico
106 Seven
107 Shawshank Redemption
108 Shutter Island
109 Silence of the Lambs
110 Simple Life
111 Sixth Sense
112 Sleepless in Seattle
113 Taxi
114 Terminal
115 Terminator 1
116 Terminator 2
117 The Accused
118 The Blind Side
119 The Bone Collector
120 The Contract
121 The Counterfeiters
122 The Dark Knight
123 The Game
124 The Good, The Bad, The Ugly
125 The Green Mile
126 The Illusionist
127 The Italian Job
128 The Shining
129 The Truman Show
130 The Unforgiven
131 The Untouchables
132 Thirteen Days
133 Titanic
134 Top Gun
135 Training Day
136 Tremors
137 Twilight
138 Unbreakable
139 Usual Suspects, The
140 What Women Want
141 When Harry met Sally
142 Where Eagles Dare
143 You've got mail

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Feb 2017 - 3:07 pm | हतोळकरांचा प्रसाद
हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Feb 2017 - 3:08 pm | हतोळकरांचा प्रसाद

यातला 12 Angry Men.. हा तर अप्रतिम! त्याचा हिंदी रिमेक "एक रुका हुआ फैसला" हाही आवर्जून पाहावा असा. 12 Angry Men तील संवाद जसेच्या तसे ट्रान्सलेट करूनही स्वतःचे असे एक सुंदर वेगळेपण एक रुका हुआ फैसला मध्ये आहे. बाकी वरील यादी भारीये! त्यातील खालील काही तर प्रत्येकाने आवर्जून पाहावे असे -
Beautiful Mind
Castaway
Enemy at the Gates
Forrest Gump
The Pursuit of Happyness
The Prestige
Saving Private Ryan

मराठी कथालेखक's picture

2 Feb 2017 - 3:10 pm | मराठी कथालेखक

हिंदी आवृत्ती आहे का नेटवर ?

पाटीलभाऊ's picture

2 Feb 2017 - 6:17 pm | पाटीलभाऊ

सुंदर चित्रपट आहे हा