शर्त - The Challenge

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
31 Mar 2009 - 12:39 pm

हा चित्रपट पाहताना बाजूला काढून ठेवलेल्या डोक्यात आलेले विचार....

ष्टॅट...
हीरो रागाने बघतोय असा पोस्टर म्हणजे अ‍ॅक्शन पॅक्ड वगैरे पिक्चर असावा. बघू.

काही गुंड, अतिरेकी वाटणारे लोक कोठेतरी बॉम्ब फोडायच्या तयारीत आहेत. पण स्क्रीन वर एक नुस्ताच बूट दिसतो जाड सोल वाला , मग एक पिस्तूल 'क्लिक' होते. आणि कमांडो च्या वेषातील काही लोक तिकडे जाताना दिसतात व एक एक करून ते गुंड मारले जातात.

लगेच एक स्टेज, रॉक स्टार च्या पोज मधे कोणीतरी उभा. हजारो प्रेक्षक दोन्ही हात (लोकल च्या डब्यांना जसे 'चौकट' आकारात वरच्या वायरींना जोडणारे पेंटोग्राफ असतात तसे) वरती जोडून डोलतायत. आणि गाणे चालू होते "यहॉ से आने दे वहॉ से आने दे, दिन मे दिखा देंगे रात". दिन मे दिखा देंगे रात म्हणजे आम्ही त्यांना मारू असा अर्थ असावा. म्हणजे आम्ही सुचेल ते शब्द वापरू, प्रेक्षकांनी संदर्भावरून अर्थ घ्यावा. आणि मग "I am an Indian, love being an Indian..." अशा अर्थाची वाक्ये आणि त्यावर पिवळी धमक पॅंट, त्यावर डार्क निळा शर्ट आणि काळे जॅकेट घालून वेगवेगळे अंगविक्षेप. जे कधी मिथुन ची तर कधी जीतेंद्रची आठवण करून देतात. मागे शोभेची दारू उडतेय, काही कडवी स्टेज वर तर काही बाहेर कोठेतरी. बाहेरच्या शॉट्समधले प्रेक्षक मॉर्निंग वॉक ला निघालेल्या लोकांना इंटरेस्ट नसलेल्या मोर्चात बळेच ओढले तर ते ज्या उत्साहाने घोषणा देतील तशा अ‍ॅक्शन करणारे, तर स्टेज समोरचे प्रेक्षक एका कडव्यात मशाली, दुसर्‍यात फुगे, तिसर्‍यात मेणबत्त्या तर चौथ्यात भारताचे झेंडे घेउन नाचतायत.

भारून टाकणारे वातावरण एकूण.

म्हणजे तो पहिल्या कमांडोंपैकी कोणीतरी तुष्षार कपूर असावा. आणि तो फायटिंग करू शकतो आणि डान्स करू शकतो हे दाखवण्यासाठी हे सर्व होते तर. पुढचा पिक्चर पाहून त्याला कल्पना नसताना तो कॉमेडी ही करू शकतो हे कळाले. एक मात्र नक्की की त्याची फायटिंग पाहून गुंड पळाले नाहीत तर हा डान्स पाहून नक्कीच पळतील.

आता चित्रपट चालू. तुषार कपूर हा एका अ‍ॅड कंपनीचा मेन कोणीतरी आहे. फक्त त्याच्या ऑफिस मधे मॉडेल्स च्या फोटोंऐवजी याचेच फोटो लावलेले आहेत. तेथे एक मॉडेल निवडीबाबत संवाद ज्यात तुष्षार म्हणतो मुलगी अशी पाहिजे के तिला बघून दिल की घंटी वगैरे वाजायला पाहिजे. म्हणजे आता पुढच्या शॉट मधे गुलाबी गुलाबी फ्लफी फ्लफी वातावरणातून मुख्य हीरॉइन स्लो मोशन मधे येणार. ग्रेसी सिंग येतेच तशीच.

मग कॅमेरा आपल्या हीरो च्या घरी. त्याची झोपण्याची जागा म्हणजे तीन बाजूला पाणी व मधे बेड. त्यावर फुलांचे गुच्छ, सफरचंदे व इतर फळे, दारू किंवा सरबताचे ग्लास, खेळण्यातील गाड्या आणि इतर काय काय आहे. बहुधा 'हर माल पाच रुपिया' ची आख्खी गाडी विकत घेउन मांडलेली दिसते. तो उठून थेट त्याची एक मोठी यामाहा घेउन बागेत जातो (जी यामाहा पुढे अनेक प्रसंगात दिसते. तो कोठेही असला तरी तेथेच शेजारी उभी असते). तेथे ग्रेसी भेटते आणि मग यांचे बालपणापासून एकमेकांवर प्रेम आहे हे निष्पन्न होते. मग ते एका हॉटेलात जातात. तेथे काही गुंड तिची छेड काढतात. ते पाहून तुषार कपूरने नुसती मूठ वळवली तरी त्याच्या बोटातून काड काड काड काड आवाज येतो म्हणजे तो प्रचंड ताकदवान आहे हे सिद्ध होते. मग तो सर्वांची धुलाई करतो.

पण तेवढ्यात एक 'मामा' म्हणून कोणीतरी त्या गुंडांचा बॉस उठतो. तो ग्रेसी चा उल्लेख 'गुलाब जामुन' असा करतो. आता तुषार पेटतो. तो त्याला सांगतो की आपण एक पैज लावू. मी असे पुढे हात धरतो आणि तू जर त्यावर मारू शकलास तर तुला या गुलाब जामुन चा किस घेता येइल, नाहीतर मी तुला मारणार वगैरे. या लोकांपैकी काहींनी आपल्याला गुलाब जामुन म्हणणे तर काहींनी दुसर्‍याला आपला किस घेउ देण्याबद्दल पैज लावणे हा जणू आपला बहुमानच आहे असे भाव चेहर्‍यावर घेऊन ग्रेसी हे सर्व बघत आहे. तुषार कपूर पैज खोर असतो हे दाखवण्यासाठी हा उपद्व्याप.

मग नंतर एकदा या दोघात एक मोठी पैज लागते. पहिल्या भेटीत खरे प्रेम होउ शकते का. ग्रेसी त्याला सांगते की तू मी सांगेन त्या मुलीला पटवून दाखव आणि जिंकलास तर मी देईन ते गिफ्ट तू घ्यायचे. पण मुलगी कोण निवडायची? तर लगेच समोरच एका देवळातून हातात पूजासाहित्य घेउन अमृता अरोरा तिला शक्य आहे तेवढी निरागस दिसत येत असते.

तुषार चे आईवडील त्यांचे लग्न करण्यासाठी अमेरिकेतून आलेले असतात पण मग ते मधेच ग्रेसी ला घेउन तिकडे परत जातात (ते का ते रहस्य शेवटी उलगडले आहे). आता ठराविक पद्धतीने तुषार अमृता ला पटवतो.

या पिक्चर च्या सेट्स मधले डेकोरेशन, नेपथ्य वगैरे जे काय असेल ते बहुधा कोणीतरी फुलांच्या विक्रेत्याने स्पॉन्सर केले असावे. कारण प्रत्येक शॉट मधे किमान २-३ तरी फुलांचे गुच्छ दिसतात. ते ही २०-२५ वेगवेगळ्या प्रकारची फुले असलेले. म्हणजे हॉल मधे अमृता व तिचा भाऊ उभे आहेत, तेथे जेथे ठेवायला जागा आहे अशा ठिकाणी २-३, ती वरती जाते तेव्हा जिन्यात वाटेत आणखी दोन, मग तिच्या रूम च्या दरवाज्याशेजारी आणखी एक. ग्रेसी च्या तर सायकलवर एक दणकेबाज गुच्छ. 'जिस्म' मधे बिपाशा च्या घरात मेणबत्त्या जास्त होत्या की येथे अमृता च्या घरात पुष्पगुच्छ जास्त आहेत नक्की ठरवणे अवघड आहे.

ड्रेस तर चुकूनही स्वत:ला शोभणारे घालायचे नाहीत असा नियम सगळ्यांनी पाळलेला आहे. मिलिटरी वेषात तुषार ८-९ वीतील नुकत्याच NCC मधे जाऊ लागलेल्या मुलांसारखा दिसतो. ग्रेसी ला ग्रीसी सिंग म्हणता येईल एवढा तिचा तेलकट मेक अप आहे. एका शॉट मधे तुषार चा शर्ट अर्धा जांभळा व अर्धा निळा दिसतो. त्यामुळे तो एका बाजूने आम टिकिया व दुसर्‍या बाजूने ट्रिपल पॉवर रिन ने धुतल्यासारखा वाटतो.

मग दोन तीन वेळा केवळ एक गाणे म्हणून त्यावर डान्स करायला ते यूरोपात जाउन पुढच्या शॉट ला भारतात परत येतात. डान्स ही बहुधा कॅमेर्‍याच्या शेजारी उभे असलेल्या डान्स डायरेक्टर च्या पोज कॉपी करत 'बसवलेले' असावेत. कारण ते एकमेकांच्या प्रेमात नाचतायत असे न वाटता हे बघा आम्ही किती मस्त नाचतो हे आपल्याला दाखवतायत असे वाटते.

मग थोडा वेळ हे सगळे शर्त मधे चालले आहे हे आपण, कलाकार, दिग्दर्शक सगळे विसरतात आणि एकदम ग्रेसी टपकते. आता क्लायमॅक्स चालू होतो. अमृता चा भाऊ महारागीट असतो, त्याला हे सर्व कळते. तो अमृता ला तुषार ला भेटायची परवानगी देत नाही, मग ती 'जहर' पिते. तिला भेटायला तुषार हॉस्पिटल मधे जातो.

येथेही यामाहा. अरे कळले आम्हाला त्याच्या कडे एवढी भारी गाडी आहे. ती जरा कधी पार्क बिर्क करणार की नाही? हॉस्पिटल मधे जाताना नुसता त्या गाडीवरून तो उतरतो ते सुद्धा पाय 'whoop, whoop' असा आवाज करत फिरवून, ते ही तीन वेळा. बरं खरोखरच तीन वेळा फिरवला असता तरी म्हंटले असते ठीक आहे. पण एकदा whoop केल्यावर तुषार कपूर बहुधा बाजूला स्वत:ची कंबर धरून उभा असेल म्हणून उरलेले दोन whoop हे अ‍ॅक्शन रिप्ले दाखवलेत.

तेथे तिचा भाऊ आणि याच्यात मारामारी व्हायची वेळ येते. पण अमृता त्यांना सांगते मी तुमच्या भांडणांना वैतागले आहे. त्यावर तिचा भाऊ तिला सांगतो की याचे लग्न ठरले आहे. मग "कहदो ये झूठ है" छाप संवादात काही वेळ जातो. डॉक्टरांनी तिला आराम करू द्या म्हणून सांगितलेले असते. पण मग ती उठते, सलाईन वगैरे स्वत:च काढते आणि तडक बाहेर पडते दोघांच्या मधून. ते ही आधी तिला पुढे जाऊ देतात आणि मग थांब थांब करत तिच्या मागे लागतात.

ती तडक घरी येऊन बॅग भरून 'शहर छोडके' निघून जाते. तुषार ला ते कळल्यावर तो लगेच (पुन्हा यामाहा) तिच्या मागे जातो, ते ही कोणत्या बाजूला वगैरे न विचारता. बहुधा शहर सोडून जाणारे सगळे एकाच रस्त्याने जात असावेत. मधेच ग्रेसी येते व तुषार ला सांगते की तू पैज जिंकलास आणि त्याबद्दल मी तुला गिफ्ट देते ते म्हणजे अमृता शी तू लग्न कर. येथे एकदम वादळ येते. पण तेथेच अमृता येऊन सांगते की तू हिच्याशीच लग्न कर. या वाक्यावर विजा चमकतात आणि पाउस पडतो. दोघींनीही एवढी पॉवर दाखवल्याने याला कळत नाही की कोणाशी लग्न करावे. अनुपम खेर (तुषार चे वडील) ला ही प्रश्न पडतो की "अब इसकी शादी, किससे करू?"

आणि मग असा उलगडा होतो की एका अपघाता मुळे ग्रेसी मॉ बनू शकत नसते आणि अनुपम खेर व त्याची बायको यांना तर मुले हवी असतात. म्हणूनच ते तिला अमेरिकेला उपचारासाठी घेउन गेलेले असतात. तुषार ला कळू न देण्यासाठी त्याच्या समोर बोलत नाहीत, पण तो नसलेल्या शॉट्स मधे सुद्धा काही भाव चेहर्‍यावर न दाखवता त्यांनी आपल्याला ही गंडवलेले असते. तेथे त्या दोघांनी स्वत: तिचे ऑपरेशन केलेले असते, पण ते यशस्वी होत नाही, म्हणून तुषार ला दुसर्‍या मुलीच्या मागे लावून देण्यासाठी हा सगळा उद्योग केलेला असतो, ग्रेसी व इतरांनी. मग लग्न होउ द्यायचे की? मधेच कशाला टपकली?

मग अमृता च्या ताब्यात तुषार ला देउन ग्रेसी परत अमेरिकेला जाते आणि पुढच्या वर्षी सौतन बनायला परत येईन हे ही सांगते. बहुधा येथे चित्रपट संपला. असावा. पुन्हा कोण चेक करणार! पण मग ते सुरूवातीचे कमांडो, गुंड, रॉक स्टार वगैरे काय होते? आणि मधेच एक स्पेन मधे चित्रीत केल्यासारखे वाटणारे काहीतरी 'चिकिता' वगैरे शब्द असलेले गाणे आणि त्यात अमिशा पटेल हे सर्व खरेच होते का पिक्चर मधे लोकांना स्वप्नात गाणे दिसते तसे पाहताना मला स्वप्नात हे गाणे दिसले? जाउ दे. त्यासाठी पुन्हा बघायची आपली डेअरिंग नाही.

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

31 Mar 2009 - 12:46 pm | चिरोटा

बघणे म्हणजे एक Challenge च म्हणायचा!!

दशानन's picture

31 Mar 2009 - 1:25 pm | दशानन

+१
हेच म्हणतो.

पण चित्रपट तुषार चा आहे हे माहीत असून देखील तुम्ही पुर्ण चित्रपट बघितलात, तुमच्या हिमतीला माझा सलाम ;)

यशोधरा's picture

31 Mar 2009 - 1:38 pm | यशोधरा

खुसखुशीत! मस्त जमलेय! =))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Mar 2009 - 1:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कुणीसं म्हटलं आहे, " फडतूस चित्रपट हुच्च समीक्षणवजा लेखाची जननी आहे"! हे कुणीसं वगैरे नाही, मीच म्हटलं आहे.
आज एकदम प्रत्यय आला! उत्तम लिखाण!! हे लोकं असेल फालतू पिच्चर बनवत राहोत आणि आम्हा लोकांना हुच्च परीक्षणं वाचायला मिळोत.

खरंतर च्यानेल सर्फ करताना एकदा हा फक्त शेवटचा सीन पाहिला होता. तेव्हा एवढी हसले होते की या पिच्चरचं नाव शोधत होते, पण मिळालं नाही. आज कायसंसं म्हणतात ना, एक वर्तुळ पूर्ण झालं! ;-)

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

1 Sep 2010 - 4:54 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

सलमान खान चा 'द वाँटेड'
अफलातुन विनोदी...आणि कम्माल्लीचा फड्तूस....
पाहिला नसशील तर मिळवून पहा.

बाकी तुषा कपूर या प्राण्याला पिक्चर मध्ये का घेतात देव जाणे.
त्याचा तो so called भयंकर विनोदी पिक्चर ज्यात तो मुक्या-बहिर्‍याचा रोल करतो....त्यावरही लोक का हस्तात तेच जाणे..
मला तर जाम irritate करतो...
तो एक आणि अक्षय कुमारही...फालतू कॉमेडी...तेच तेच रीपीटेड कॉमेडी...
काहिही पाहतात लोक आज्काल यार!

सुवर्णा's picture

31 Mar 2009 - 4:29 pm | सुवर्णा

=)) =))

सुवर्णा
http://www.suvarnam.blogspot.com/

सूहास's picture

31 Mar 2009 - 4:42 pm | सूहास (not verified)

शर्त - The Challenge कोणीही लावली तरी बघणार नाही!!!

सुहास..
भले-बुरे जे घडुन गेले || विसरून जाऊ सारे क्षणभर ||
जरा विसावु या वळणावर || या वळणावर ||

भडकमकर मास्तर's picture

31 Mar 2009 - 5:09 pm | भडकमकर मास्तर

देव आनंदच्या मिस्टर प्राईम मिनिस्टरचे परीक्षण लिहायला हरकत नाही असे वाटले...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

क्रान्ति's picture

1 Apr 2009 - 7:31 pm | क्रान्ति

=)) =)) =)) =)) =))
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

संदीप चित्रे's picture

1 Apr 2009 - 7:51 pm | संदीप चित्रे

मी हा सिनेमा पाहण्याच्या भानगडीत पडलो नाही !!
>> या लोकांपैकी काहींनी आपल्याला गुलाब जामुन म्हणणे तर काहींनी दुसर्‍याला आपला किस घेउ देण्याबद्दल पैज लावणे हा जणू आपला बहुमानच आहे असे भाव चेहर्‍यावर घेऊन ग्रेसी हे सर्व बघत आहे.
वाक्य आवडलं :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

शितल's picture

1 Apr 2009 - 8:02 pm | शितल

=))
परिक्षण भन्नाट लिहिले आहे हसुन हसुन दमले. :)
तो तुषार कपुरला तर पैसे मुव्ही साईन करण्यासाठी देण्या ऐवजी घरी बस बाबा ह्या साठी दिले पाहिजेत.

ड्रेस तर चुकूनही स्वत:ला शोभणारे घालायचे नाहीत असा नियम सगळ्यांनी पाळलेला आहे. मिलिटरी वेषात तुषार ८-९ वीतील नुकत्याच NCC मधे जाऊ लागलेल्या मुलांसारखा दिसतो. ग्रेसी ला ग्रीसी सिंग म्हणता येईल एवढा तिचा तेलकट मेक अप आहे. एका शॉट मधे तुषार चा शर्ट अर्धा जांभळा व अर्धा निळा दिसतो. त्यामुळे तो एका बाजूने आम टिकिया व दुसर्‍या बाजूने ट्रिपल पॉवर रिन ने धुतल्यासारखा वाटतो.

>>>> अतिशय हुच्च.... मला तर हा सिनेमा बघावासा वाटायला लागलाय!!!

राजेश घासकडवी's picture

1 Sep 2010 - 8:41 pm | राजेश घासकडवी

त्यामुळे तो एका बाजूने आम टिकिया व दुसर्‍या बाजूने ट्रिपल पॉवर रिन ने धुतल्यासारखा वाटतो.

हे हुच्चच!

चतुरंग's picture

1 Sep 2010 - 10:24 pm | चतुरंग

हे वाक्य वाचून मी खाली पडायच्या बेतात होतो खुर्चीवरुन!! =))

फारएन्ड तुमचं निरीक्षण अफलातून आहे आणि उपमा इतक्या फिट्ट असतात की बस, त्वाडा जवाब नै!! ;)

Pain's picture

2 Sep 2010 - 5:41 am | Pain

हाहाहा
भारी आहे.

शित्रेउमेश's picture

7 Jul 2017 - 11:15 am | शित्रेउमेश

-एका शॉट मधे तुषार चा शर्ट अर्धा जांभळा व अर्धा निळा दिसतो. त्यामुळे तो एका बाजूने आम टिकिया व दुसर्‍या बाजूने ट्रिपल पॉवर रिन ने धुतल्यासारखा वाटतो.

-बहुधा 'हर माल पाच रुपिया' ची आख्खी गाडी विकत घेउन मांडलेली दिसते.

-पण एकदा whoop केल्यावर तुषार कपूर बहुधा बाजूला स्वत:ची कंबर धरून उभा असेल म्हणून उरलेले दोन whoop हे अ‍ॅक्शन रिप्ले दाखवलेत

- हे सर्व खरेच होते का पिक्चर मधे लोकांना स्वप्नात गाणे दिसते तसे पाहताना मला स्वप्नात हे गाणे दिसले? जाउ दे.

आज पासून तुम्ही लिहिलेली चित्रपट परिक्षण हापिसात बसून वाचनार नाही, अवघड होता अहो हसु दाबुन बसणं...

वेल्लाभट's picture

7 Jul 2017 - 1:18 pm | वेल्लाभट

बेक्कार हसलो ! अनेक दिवसांनी आलेलं हे पिक्चरचा पार-एन्ड करुन टाकणारं परीक्षण अगदी ट्रिपल पावर रिन सारखंच लखलखतं ! क्लास.

म्हणजे धागा जुनाच आहे, पण नव्याने वर आला. असो. हरकत नाही.

रुपी's picture

8 Jul 2017 - 6:36 am | रुपी

हा हा..मस्तच!

हा सिनेमा मी पाहिलाय.. तेव्हा 'आन - मेन अ‍ॅट वर्क' नावाचा सिनेमासुद्धा पाहिला होता. :))

मुक्त विहारि's picture

8 Jul 2017 - 7:37 am | मुक्त विहारि

ह्या मानाने आमचा "महान" बराच बरा होता.

असो,

रंगीला रतन's picture

13 Dec 2021 - 3:35 pm | रंगीला रतन

मागच्या महिन्यात सलून मधे दाढी करायला बसलो होतो तेव्हा कुठल्यातरी चॅनलला हा पिक्चर लागला होता. तोच तो गुलाब जामूनवाला सिन तेव्हा बघितला. आत्ता तुमचे सर्व लेखन वाचायला घेतले तर पहिल्याच लेखात त्या महान पिक्चरचे नाव कळाले :=)
भारीच आहे परीक्षण. पंचेस तर शॉल्लीट एकदम.