संभा

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
24 Mar 2009 - 2:51 pm

"संभा...या दोन पेपर्सच्या झेरॉक्स आणुन दे बाबा.....!"

संभा..ही फाईल अकाउंट्मध्ये नेवुन दे रे..............!

संभा......काल बाईंडिंगसाठी दिलेला प्रोजेक्ट रिपोर्ट आणलास का परत.........!

संभाजी.....अरे, त्या एसी सर्व्हिसींगवाल्याला फोन करायला सांगितला होता तुला, तो अजुन उलथला नाही...!

संभा....दोन चहा...............!

संभा......तो कालचा ड्राफ्ट चेक केलास....प्रत्येक गोष्ट किती वेळा सांगायची रे तुला...?

संभा.............?

हे रोजचंच होतं तेव्हा, हि वाक्ये कानावर आल्याशिवाय आमचा दिवसच मुळी जात नसे. आणि स्वतः संभालाही त्याशिवाय ऑफीसला आल्यासारखं वाटत नसेल. मुळात संभा कोण...हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आले असेलच म्हणा. तरी देखिल सांगतो. संभा आमच्या ऑफिसचा प्युन कम क्लार्क कम टेलिफोन ऑपरेटर कम पोस्ट्मन कम........बरंच काही.

संभाजी तुकाराम जाधव. ७-८ वर्षांपुर्वी सातार्‍याजवळच्या कुठल्याशा खेड्यातुन नोकरीच्या शोधात संभा मुंबईला आला. गावाकडे तीन एकर शेती ( बहिणीच्या लग्नात गहाण पडलेली)..दोन खोल्यांचं एक जुनाट घर...आणि त्या घराइतकीच जुन, जर्जर झालेली, थकलेली वृद्ध आई.
वडील संभाच्या लहानपणीच...........................
एका तमासगिरीणीच्या नादी लागुन परागंदा झालेले.

गावातल्या शाळेत कसे बसे एस. एस. सी. करुन संभा नोकरीच्या शोधात मुंबईला मामाकडे आला होता. परळच्या बी.डी. डी. चाळीत मामाच्या घरी...घरी म्हणण्यापेक्षा घरासमोरच्या बाल्कनीत राहात होता. बिचारा मामा तरी काय करणार, त्याची स्वतःची तीन लेकरे, बायको.......
अगदी सख्खा भाच्चा असला तरी एकुलत्या एक खोलीत किती जण राहणार...! मामी बिचारी रोज वेळेवर जेवायला वाढत होती हेच नशीब. पण संभा बहुदा हे सगळं गृहित धरुनच आला होता.

तेव्हा मी ठाण्याच्या एका छोट्याशा फर्ममध्ये सेल्स/सर्व्हिस इंजिनीअर म्हणुन काम करत होतो. तो दिवस अजुनही आठवतो. दुपारी एक- दिड वाजला होता. आम्ही सगळे डबे उघडुन उदरं भरणंचे पवित्र कार्य आटपत बसलो होतो. एक काळा सावळा, किडकिडीत मुलगा आत आला. त्यावेळचं आमचं ऑफीस म्हणजे १५ X २५ चा एक लंबुळका हॉल होता. एक पार्टिशन घालुन बॉसची केबीन बनवली होती. बाकी टेबलच्या दोन रांगा..एकुण पाच टेबलं....आणि आणखी एक पार्टिशन घालुन दर्शनी बाजुला रिसेप्शनिस्ट्चे टेबल. त्यामुळे कोणीही आले की लगेच दिसायचे. अशात तो आला..साहेबांना भेटायचेय म्हणाला. त्याला बसायला सांगुन आम्ही पुन्हा एकदा डब्यावर तुटुन पडलो.
मध्येच मला काय वाटले कुणास ठाउक मी त्या मुलाला हाक मारली, नेहेमीच्या सवयीप्रमाणे ...

" या जेवायला," ..

मी आपला सहजच म्हणालो होतो, पण तो खरोखरच आला आणि चक्क जेवायला बसला...

बाकीची चांडाळ चौकडी " असंच पाहिजे...कुणी सांगितला होता नसता आगावुपणा...?" या अविर्भावात माझ्याकडे पाहत होती. तो व्यवस्थित जेवला. जेवता जेवताच कळालं कि तो नोकरीच्या शोधात आलाय म्हणुन. मग तर ....., नंतर आमचा छान उद्धार होणार हे भवितव्य मला कळुन चुकले.

तो साहेबांना भेटला. त्याचं नशीब खरोखर जोरावर असावं, आधी फुकटचं जेवण आणि आता तर दरमहा आठशे रुपये (?) पगाराची नोकरी. उद्यापासुन येतो म्हणुन तो गेला.

जेवण करुन मी आमची धोकटी उचलली आणि बाहेर पडलो. तर तो खालीच उभा होता. मी साहजिकच रेंगाळलो..तो पुढे आला...

"खुप उपकार झाले साहेब. तुम्हाला वाटले असेल..ओळख ना पाळख, बोलावले कि आला अन बसला जेवायला. पण काय करु साहेब, सकाळपासुन फिरतोय. खिश्यात होते तेवढ्या पैशात दादर पासुन ठाण्यापर्यंतचं तिकीट काढलं...भुक लागली होती पण.....तशात तुम्ही बोलावलं...खुप लाज वाटली पण मन घट केलं अन तसाच निर्लज्जासारखा जेवलो. आता इथुन परळपर्यंत चालत जायचं म्हणजे अंगात ताकद पायजे ना? येतो साहेब...उद्यापासुन येतोय कामाला. तो निघाला..

मला काय वाटलं कोण जाणे पण त्याला म्हंटलं चल कुर्ल्यापर्यंत सोडतो तुला. त्यावेळेस माझी चेतक होती.
"हमारा बजाज.". कुर्ल्याला जाईपर्यंत तो अखंड बडबड करत होता.
आपल्या पळुन गेलेल्या बापाबद्दल आणि अडकुन बसलेल्या आईबद्दल सांगत होता.
उतरताना मी त्याला १०० रुपये दिले आणि सांगितलं ." महिन्याचा पास काढुन घे ट्रेनचा, पुढच्या महिन्यात पगार झाला की दे परत".त्याने फक्त हात जोडले.

आता विचार केला कि माझं मलाच आश्चर्य वाटतं, कसलीही ओळख नसताना, त्याची कसलीही माहिती नसताना मी त्याला तेव्हा कसे काय पैसे दिले असतील? कारण मी तसा काटकसरी माणुस आहे. (आता माझ्या मित्रांची काटकसरीपणाची व्याख्या कंजुष अशी आहे, यात माझा काय दोष?)

पण त्यानंतर संभा आमच्यात रुळला. इतका रुळला की त्याच्यावाचुन आमचं पान हलेना झालं. झलक वर दिलेली आहेच. शिक्षण फारसं नव्हतं एवढंच काय ते त्याचं न्युन. पण त्याचं त्यामुळे काहीही अडत नसे. हळु हळु बॉसला सुद्धा संभाची सवय लागत गेली. तो हुशार तर होताच. पण पडेल ते काम करायची तयारी आणि नविन गोष्टी शिकुन घ्यायची ईच्छा या मुळे हळु हळु तो सगळ्यांचाच लाडका बनला. दोन वर्षे हा हा म्हणता निघुन गेली.

एके दिवशी संभा पेढे घेवुन आला.....विशाल सर बारावी झालो...६५% मिळाले.
"अरे तु अभ्यास कधी केलास, परिक्षा कधी दिली?..पण ग्रेट यार....मानलं तुला.........!
"सर, रात्रीच्या शाळेतुन शिकतोय. आता पण एखाद्या नाईट कॉलेजमध्ये अँडमिशन घेवुन पुढे शिकायचं ठरवलंय...!"
मी अवाक झालो. मी कधी पासुन ठरवतोय बाहेरुन ME करायचं म्हणुन , पण मुहुर्त लागत नाही...आणि हा......................ग्रेट !
असेच काही दिवस गेले, मी त्याला विद्यापिठात घेवुन गेलो आणि पाठक सरांशी ओळख करुन दिली. आमच्या कंपनीने मुंबई विद्यापिठात काही फॅक्स मशीन्स विकली होती, त्याची सर्व्हिसिंग मीच पाहायचो. त्यामुळे सरांशी जुजबी ओळख होती. सरांनी प्रयत्न करुन संभाला अँडमिशन मिळवुन दिली. फी चे पैसे देखिल मी आणि सरांनी मिळुन भरले.
"आता नाईट कॉलेज मध्ये जावुन जागरणं करायची गरज नाही. आणि काही पैसे वगैरे लागले तर सांगत जा...!"
त्याची नेहेमीचीच प्रतिक्रिया...डोळे भरलेले आणि हात जोडलेले....!

त्या कंपनीत वर्षभर होतो मी त्यानंतर. मग मध्येच हि सद्ध्याची OmniSTAR B.V. ची ऑफर आली. आणि मी ती कंपनी सोडली. जाताना संभाला सांगुन गेलो होतो कि काही लागलं तर फोन कर म्हणुन.

वर्षभर संभाचे फोन येत राहिले. खुशाली कळवणारे. मागणी मात्र कधीच नव्हती. ते त्याच्या स्वभावातच नव्हतं म्हणा. नंतर हळु हळु फोन बंद होत गेले. माझाही व्याप वाढत होता , पगाराबरोबर दौरेही वाढले होते. मी ही हळु हळु विसरुन गेलो. मागे एकदा असेच ठाण्याला गेलो असता जुन्या ऑफिसमध्ये चक्कर टाकली तेव्हा कळले की संभाने नोकरी सोडली. परिक्षेच्या वेळेस त्याला एक महिन्याची सुटी हवी होती अभ्यासासाठी. कंपनीने नाकारली....
संभाने नोकरी सोडली यात मला काही विशेष वाटले नाही. कारण त्याचे शिक्षणाचे वेड मला चांगले माहित होते.

त्यानंतर असेच काही दिवस / महिने गेले. आमचे दोनाचे चार हात झाले. कुर्ल्याहुन मी खारघरला शिफ्ट झालो.
आणि एके रविवारी सकाळी सकाळी संभाची स्वारी अगदी आईसोबत माझ्या दारी अवतिर्ण झाली.
आल्या आल्या माझ्या आई आण्णांच्या पाया पडला. माझ्याकडे यायच्या आधीच मी खुर्चीवर मांडी घालुन बसलो.

"कुर्ल्याला गेलो होते सर. तिथे शेजारी समजलं की तुम्ही खारघरला शिफ्ट झाला आहात म्हणुन मग शोधत शोधत इथे आलो. आई हेच ते विशालसर , ज्यांच्या बद्दल मी नेहेमी बोलत असतो."

त्या माऊलीने हात जोडले.." लई उपकार जाले सायेब, तुमच्यामुळं माज्या पोराची जिनगानी सुदरली.."

मला उगाच लाजल्यासारखं झालं. आई आण्णांना तर काय चाललंय ते काहीच कळत नव्हतं. मी त्यांना हळुच खुणावलं..नंतर सांगेन म्हणुन....

"विशालसर बी. ए. झालो, इंग्लिश घेवुन. तुमची खुप मदत झाली सर ", त्याने नेहेमीप्रमाणेच भरल्या डोळ्यांनी हात जोडले. मी त्याचे हात हातात घेतले आणि म्हणालो..

"संभाजीराव श्रेय द्यायचे असेल तर ते तुमच्या आईंना, त्यांच्या आशिर्वादाला, मेहनतीला द्या. मी फक्त हातचं काही न राखता शक्य तेवढी मदत केली. बाकी सगळं श्रेय तुझी चिकाटी, परिश्रम आणि अभ्यासाचं आहे. असो..आता पुढं काय करणार आहेस."

"सर, विवेकानंद केंद्र , कन्याकुमारीच्या अरुणाचल प्रदेशमध्ये एकुण अठरा निवासी शाळा आहेत. त्यापैकीच एका शाळेत इंग्लिश शिकवायला चाललोय. शिक्षणाचं महत्व मला कळालंय. त्याचा फायदा तिथल्या गरिब मुलांना झाला तर बघतो. पगार नाही मिळणार फार..पण मी ठरवलंय लग्न करायचं नाही म्हणुन. आणि मी व माझी आई....आम्हा दोघांना असं कितीसं लागतंय. येतो सर. तुम्हाला न भेटता गेलो असतो तर मनाला खात राहिलं असतं..आता चिंता नाही."

त्या माय लेकांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघताना मला माझा खुजेपणा अगदी प्रकर्षाने जाणवला. मी नकळतच हात जोडले.

विशाल.

वाङ्मयअनुभव

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

24 Mar 2009 - 3:06 pm | घाशीराम कोतवाल १.२

मस्त आहे हा संभा
खरच छान लेख लिहिलात
तुम्हाला आनी तुम्ही केलेल्या मदतीला सलाम विशाल राव

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

अभिजीत मोटे's picture

24 Mar 2009 - 3:08 pm | अभिजीत मोटे

सुंदर. एवढेच म्हनू शकतो......

............अभिजीत मोटे.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Mar 2009 - 3:10 pm | परिकथेतील राजकुमार

विशाल भाऊ आपल्या निरपेक्ष मदतीला सलाम आणी संभाच्या कर्तुत्वाला सुद्धा :)

आज तुमच्या सारखे काहि चांगले लोक ह्या जगात आहेत म्हणुन जगबुडी होत नाहीये हेच खरे !
कालच एक होता कार्व्हर वाचायला घेतले आणी आज हा लेख वाचनात आला, दुहेरी आनंद म्हणतात तो हाच.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

रम्या's picture

24 Mar 2009 - 3:11 pm | रम्या

अतिशय छान!
विशाल साहेब, व्यक्तिचित्रणात तुमचा हातखंडा आहे खरा!

आम्ही येथे पडीक असतो!

दिपक's picture

24 Mar 2009 - 3:21 pm | दिपक

विशाल,

तुमचे हेही व्यक्तीचित्रण आवडले. संभाच्या चिकाटी आणि परिश्रमास तोड नाही.

तुम्ही करत असलेली मदत खरच खुप दुर्मिळ आहे. पुढेही तुमच्या हातुन असेच सत्कार्य होत राहुदे. :)

पु.ले.शु.

अमोल नागपूरकर's picture

24 Mar 2009 - 4:19 pm | अमोल नागपूरकर

उत्तम कथा. तुम्ही फिरवलेले दुसर्‍यान्ना मदत करण्याचे सुष्ट्चक्र असेच अविरत फिरत राहो.

सँडी's picture

24 Mar 2009 - 4:30 pm | सँडी

लेखन, संभाची जिद्द, आपण संभाला केलेली अनमोल मदत, सगळं मनापासुन आवडलं.

सत्कार्याची ही साखळी अशीच वाढत राहो!
आपणास व संभास शुभेच्छा!

क्रान्ति's picture

24 Mar 2009 - 7:12 pm | क्रान्ति

तुम्हाला आणि तुमच्या संभालाही लाख लाख नमने! अशी व्यक्तिमत्वं या जगात आहेत, म्हणूनच जग चाललंय.
=D>
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

योगी९००'s picture

25 Mar 2009 - 12:49 am | योगी९००

प्रतिकुल परिस्थितीतही एकाद्या गोष्टीची आस धरली आणि प्रयत्न केले यश आपल्या कवेत कसे येते याचे उत्तम उदाहरण..

अशी संभासारखी माणसे बघीतली की स्वतःची लाज वाटते. देवाच्या आणि आई-वडिलांच्या आशिर्वादाने सगळे काही असून कसे संभाइतकी जिद्द नाही याचीच खंत वाटते.

बाकी तुमच्या लिखाणाबद्दल काय बोलावे? उत्तम..!!!

खादाडमाऊ

प्राजु's picture

25 Mar 2009 - 12:53 am | प्राजु

आपण खुजे.. आणि आपले विचारही खुजेच म्हणायला हवे या संभा पुढे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लवंगी's picture

25 Mar 2009 - 1:06 am | लवंगी

संभा समर्थपणे ऊभा केला आहे.

जृंभणश्वान's picture

25 Mar 2009 - 3:02 am | जृंभणश्वान

मस्तच व्यक्तिचित्रण आहे, मानले पाहिजे संभाजीरावांना

चतुरंग's picture

25 Mar 2009 - 4:08 am | चतुरंग

आपल्या पदरात नशिबानं जे दान टाकलं आहे त्यातूनच डाव कसा जिंकायचा हे संभाकडून शिकावं!
विशाल, तुम्ही अशा संभाला मदत करुन त्याच्या ध्येयाप्रत पोचायला हातभार लावलात तुमचेही अभिनंदन आणि तुमची समाजाप्रती कृतज्ञता अशीच कायम राहूदे अशा शुभेच्छा! :)

चतुरंग

प्रमोद देव's picture

25 Mar 2009 - 1:59 pm | प्रमोद देव

रंगरावांशी पूर्णतः सहमत.
विशाल अजून येऊ दे.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

विसोबा खेचर's picture

25 Mar 2009 - 9:21 am | विसोबा खेचर

विशालराव,

उत्तम लिहिताय.. औरभी आने दो...

वाचण्यास उत्सुक आहे

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Mar 2009 - 9:44 am | प्रकाश घाटपांडे

विशाल ची व्यक्तिचित्रे खुपच सुंदर असतात. कारण ती जिवंत असतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अमोल केळकर's picture

25 Mar 2009 - 9:51 am | अमोल केळकर

मस्त लिहिले आहे. आवडले
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

ढ's picture

25 Mar 2009 - 2:12 pm |

हे असं आमंत्रण माझ्याकडून दिलं गेलं असतं का? याच एका वाक्यामुळे असं म्हणावंसं वाटतं की तुम्ही ग्रेट आहात.

अतिशय छान लिहिलंय आपण हे वेगळं सांगायला नकोच.

समीरसूर's picture

25 Mar 2009 - 2:12 pm | समीरसूर

अगदी इथे माझ्या क्युबिकलमध्ये बसल्या-बसल्या संभा येईल आणि मी त्याला कुठलीतरी फाईल देईल इतका संभा जिवंत उभा राहिलाय. विशाल सर, मस्त लिहिलय. इतकी जिद्द आपल्यात का नाही हा प्रश्न मला ही नेहमीच पडतो. कदाचित बुद्धी कमी असली तर चालते पण जिद्द असेल तर माणूस खूप मोठा होऊ शकतो हे खरे. संभाला हॅट्स ऑफ!! आणि तुम्ही निरपेक्षपणे त्याला मदत केलीत आणि एका माणसाचे जगणे सुसह्य केलेत या मनाच्या मोठेपणाबद्दल तुम्हाला देखील हॅट्स ऑफ!!

--समीर

सहज's picture

25 Mar 2009 - 3:09 pm | सहज

हेही उत्तम व्यक्तिचित्र. व्यक्तिचित्र हा हातखंडा प्रयोग बनतो आहे तुमचा.

सखी's picture

25 Mar 2009 - 6:19 pm | सखी

तुमचे व्यक्तीचित्रण आवडले. संभाच्या चिकाटी आणि परिश्रमास तोड नाही. -- वरील प्रतिसादाशी सहमत.

पण त्याबरोबरच तुम्ही योग्य वेळेला, योग्य तितकी मदत केलीत हाही तुमचा मोठेपणाच की. तुम्ही नुसतं बोलण्यातच वेळ घालवला नाही, तर योग्य ती कृतीसुध्दा केलीत. म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार पण उपयोगी पडतो. पु.ले.शु.

संजय अभ्यंकर's picture

25 Mar 2009 - 8:25 pm | संजय अभ्यंकर

आपल्या सारख्या माणसांविना, संभा सारखे कित्येक वाम मार्गाला लागतात.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

लिखाळ's picture

25 Mar 2009 - 8:43 pm | लिखाळ

छान कथा !
आपण केलेली मदत कौतुकास्पदच आहे. संभाने सुद्धा कष्टाने सगळ्याचे चीज केले.
-- लिखाळ.

सुधीर कांदळकर's picture

26 Mar 2009 - 7:27 pm | सुधीर कांदळकर

असेंच म्हणतो

सुधीर कांदळकर.

शितल's picture

26 Mar 2009 - 8:35 pm | शितल

संभाचे व्यक्तीचित्रण आवडले. :)
तुमचा मदतीचा हात आणी संभाची जिद्द नक्कीच कौतुकास्पद आहे. :)

diggi12's picture

20 Feb 2022 - 9:21 am | diggi12

वाह

चौथा कोनाडा's picture

23 Feb 2022 - 1:00 pm | चौथा कोनाडा

कौतुक खरं तर तुमचं करायला पाहिजे विशाल भाऊ !
एकाला मदतीचा हात देऊन बरीच आयुष्यं उभी केलीत !

संभाचं व्यक्तिचित्र सुंदर रंगवलंत !

"सर, विवेकानंद केंद्र , कन्याकुमारीच्या अरुणाचल प्रदेशमध्ये एकुण अठरा निवासी शाळा आहेत. त्यापैकीच एका शाळेत इंग्लिश शिकवायला चाललोय. शिक्षणाचं महत्व मला कळालंय. त्याचा फायदा तिथल्या गरिब मुलांना झाला तर बघतो. पगार नाही मिळणार फार..पण मी ठरवलंय लग्न करायचं नाही म्हणुन. आणि मी व माझी आई....आम्हा दोघांना असं कितीसं लागतंय. येतो सर. तुम्हाला न भेटता गेलो असतो तर मनाला खात राहिलं असतं..आता चिंता नाही."

तेथे कर माझे जुळती _/\_
एव्हढेच म्हणू शकतो !