हं तु उभा राहा रे, नवीन आलाहेस ना? नाव काय तुझं?
अं..गुर्जी माझं नाव विशाल कुलकर्णी आहे!
कानफटात आवाज काढीन ! बापाचं नाव घ्यायला लाज वाटते का? पुर्ण नाव सांग. आणि गुरुजी म्हणावं राजा, गुर्जी नाही, समजलं ?
हो गुरुजी. माझं नाव विशाल विजय कुलकर्णी. आधी पुण्याला होतो, वडिलांची बदली झाली म्हणुन इथे कुर्डुवाडीला आलो. आज पहिलाच दिवस आहे शाळेत माझा.
हं, ठिक आहे. पाटी बघु तुझी.
गुरुजींनी माझी पाटी घेतली, माझ्याच पेन्सीलने त्यावर एक ओळ लिहीली....ते मोत्यासारखे अक्षर मी पाहातच राहीलो.
हे घे, आता या ओळी सुवाच्य अक्षरात फळ्यावर लिही आणि नंतर सगळे मिळुन तास काढा. शेवटचे वाक्य सगळ्या वर्गाला उद्देशुन होते.
गुरुजी, तास म्हणजे? ..... मी
अरे हो, तु नवीन आहेस ना ! तास म्हणजे फळ्यावर लिहीलेल्या ओळी पाटीवर पाच वेळा काढायच्या.
पा.....च वेळा?
गुरुजींनी माझ्याकडे रागाने बघीतले, "तु आता दहा वेळा काढशील! समजले?"
मी गपचुप मान डोलावली आणि माझ्या अक्षरात फळ्यावर लिहीले.
"खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे !"
गुरुजींनी एकदा फळ्याकडे पाहीले, मग हळुच माझ्या खांद्यावर हात ठेवला.
दहा जावु दे तु सात वेळाच लिही. तुला कळालं का मी तुला इतरांपेक्षा जास्त वेळा का लिहायला सांगतोय ते?
हो गुरुजी, माझी आई नेहेमी सांगते, मोठ्यांना प्रतिप्रश्न करु नये, त्यांचा अनादर केल्यासारखे होते ते. चुक केलीय तर शिक्षा भोगायची लाज का वाटावी? मला मान्य आहे.
शाब्बास, आत्ता मी दहावरुन पुन्हा तुला सातच वेळा का लिहायला सांगितले ते सांग बरं.
ते मात्र मला नाही समजलं गुरुजी. कदाचित तुम्हाला माझी दया आली असेल." मी एवढेसे तोंड करुन खालमानेने म्हणालो.
तसे गुरुजी खदखदुन हसले, "अरे वेड्या, हा तास लिहायचा प्रपंच कशासाठी तर तुम्हाला लिहीण्याची, सुवाच्य आणि शुद्ध लिहीण्याची सवय लागावी म्हणुन. आणि तु फळ्यावर लिहीलेली अ़क्षरे बघताना लक्षात आले की तुला हे तास लिहायची गरज नाहीये. पण तरीही हे हस्ताक्षर असेच टिकावे म्हणुन तास काढणे आवश्यकच आहे आणि प्रत्युत्तर केल्याची शिक्षा म्हणुन दोन वेळा जास्ती लिहायला लावले. समजले?
तुझं अक्षर छान आहे रे विशाल, ते असंच टिकव शेवटपर्यंत. सुंदर अक्षर हा खुप मोठा दागिना आहे लक्षात ठेव. समजलं?
त्यांना बहुदा प्रत्येक वाक्यानंतर समजलं ? म्हणुन विचारायची सवयच होती. हसताना मात्र त्यांच्या तोंडाचे बोळके होत होते. त्यांचे पुढचे, वरच्या रांगेतले दोन आणि खालच्या रांगेतला एक असे तीन दात पडलेले होते. पण ते हसणे..., ते हसणे मात्र एखाद्या निरागस बाळासारखे गोड होते.
येरगुंडे गुरुजींची आणि माझी ही पहिलीच भेट. पण पहिल्याच भेटीत माझ्या हस्ताक्षरामुळे मी त्यांच्या मर्जीस उतरलो आणि त्यांची शाबासकी मिळवली. आमच्या आईसाहेबांची कृपा. ती मला रोज सकाळी उठले की काहीतरी लिहायला बसवायची. काहीही लिही पण नीट लिही, शुद्ध लिही हा तिचा आग्रह असे. पुण्यातील पाषाण येथील संत तुकाराम प्राथमिक विद्यालयात तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यावर ति. आण्णांची कुर्डुवाडीला बदली झाली आणि कुर्डुवाडीच्या सरकारी शाळेत चौथीला प्रवेश घेतला. तिथला पहिल्या दिवसाचा हा प्रसंग. पुढे आयुष्यात खुप चांगले शिक्षक भेटले, खुप काही शिकायला मिळालं त्यांच्याकडुन. नांदी कुर्डुवाडीत झाली होती येरगुंडे गुरुजींच्या हाताखाली. खुप गोड होता हा माणुस. जातिवंत शिक्षक ... आजच्यासारखे ट्युशन्सवर जगणारे शिक्षक नव्हते आमचे येरगुंडे गुरुजी. तो माणुस खुप मोठा होता.... अगदी आभाळाएवढा.
गुरुजींनी फक्त अभ्यासक्रमातलेच धडे नाही शिकवले. त्यांनी जगण्याचे धडे दिले, जगणं समृद्ध कसं करावं ते शिकवलं. त्यावेळेस ते कळायचं नाही, कधी कधी तर जाचक वाटायचं पण आज ते दिवस आठवले की वाटतं गुरुजी किती पुढचा विचार करायचे. आता बर्याचवेळा कार्यालयीन कामात काही अडचणी निर्माण होतात. क्षणभर मेंदु ब्लॉक होवुन जातो. पण मग आपसुकच येरगुंडे गुरुजींची आठवण येते आणि मग जाणवतं की अरे हे तर गुरुजींनी शिकवलं होतं, सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी दिलेली उदाहरणे वेगळी असतील, संदर्भ वेगळे असतील पण निष्कर्ष तेच होते. अगदी साध्या साध्या गोष्टीतुन शिकवायचे ते.
एक प्रसंग आठवतो, शाळा सुरु झाल्यावर काही दिवसांनी गुरुजींनी सांगितलं की उद्यापासुन तु ही इतरांबरोबर शिकवणीला येत जा. माझ्या अंगावर काटाच आला. शिकवणीला जायचं म्हणजे २०-२५ रुपये महिना फ़ी भरणं आलं, आणि घरची परिस्थिती मला माहीत होती. आण्णा नाही म्हणाले नसते पण मग मला त्यांची पार्श्वभागावर ठिगळे लावलेली पॆंट आठवली. तिच्यावर अजुन एक ठिगळ नको होते मला. मी परस्परच गुरुजींना सांगुन टाकले की घरच्यांनी शिकवणीला नकार दिलाय म्हणुन. पण इतक्यात ऐकतील तर ते येरगुंडे गुरुजी कसले त्यांनी दुसर्या एका विद्यार्थ्याला घरी पाठवुन माहीती काढली आणि माझ्या दुर्दैवाने आण्णांनी त्याला सांगितले की काही हरकत नाही उद्यापासुन विशुलाही घेवुन जात जा शिकवणीला म्हणुन. दुसर्या दिवशी पहाटे साडे पाच वाजता वर्गातली चार दांडगी मुलं घरापाशी हजर झाली आणि चक्क माझा मोरया करुन शिकवणीला आणले. गुरुजींनी समोर उभे करुन विचारले
"का रे खोटे का बोललास? मला सगळ्या चुका चालतील पण माझा विद्यार्थी खोटे बोलतो हे नाही चालणार, समजले?"
मी रडतरडत मनातलं कारण सांगितलं तसे गुरुजी हसायलाच लागले. "इकडे ये!"
मी जवळ गेलो,
" वेड्या, तुला कुणी सांगितलं की या शिकवणीची फ़ी द्यावी लागेल म्हणुन? अरे जी मुलं खरोखर अभ्यासु आहेत आणि ज्यांना ज्यादा अभ्यासाची गरज आहे अशा दोन्ही प्रकारच्या मुलांसाठी मी या शिकवण्या घेतो. इथे कसलीही फी नाहीय, असली तर फक्त नियमीत हजेरी आणि मनापासुन अभ्यास बस्स ."
मी गुरुजींकडे बघतच राहीलो. आजही माझ्याकडे दर शनिवार रवीवार आमच्या सोसायटीच्या मागे असलेल्या झोपडपट्टीतली १० वी पर्यंतची मुले येतात. मी शक्य होईल तेवढे त्यांना इंग्रजी आणि गणित हे विषय शिकवतो, अगदी विनामुल्य. या सगळ्यांची पाळंमुळं बहुदा येरगुंडे गुरुजींनीच रुजवली असावीत.
तर माझी शिकवणी सुरु झाली. पहीले काही दिवस गेल्यावर गुरुजींनी एकदम शिकवणीची जागा बदलली. आधी ते शाळेतच शिकवणी घेत होते. पण आता त्यांनी सांगितलं की उद्यापासुन माझ्या घरी या. सकाळी साडे सहा वाजता. गुरुजींचं घर गावाबाहेर, कुर्डु रोडला आंतरभारती शाळेपाशी त्यांचं घर होतं. आम्ही राहायला गावाच्या दुसर्या टोकाला. गुरुजींकडे साडे सहाला पोचायचे म्हणजे घरातुन साडेपाचला निघणे आले. त्यासाठी कमीत कमी साडे चारला तरी ऊठणे आले. पण जवळ जवळ ८-९ जणांचा गृप होता. त्यामुळे आम्ही उत्साहाने लवकर उठुन गुरुजींच्या घराकडे पळायला लागलो. साडे पाचलाच आम्ही तिथे हजर असायचो. मग गुरुजी सांगणार,
"माझी पुजा व्हायची आहे अजुन, तोपर्यंत समोरच्या मैदानावर खेळा. "
मग सहा - सव्वा सहाला माई मैदानावर यायच्या बोलवायला. माई म्हणजे गुरुजींच्या पत्नी. गुरुजींचेच दुसरे रुप. साडे पाच फुटाची सावळ्या रंगांची माई मला अजुन आठवते. घरात गेलो की आधी गुरुजी तिला ऒर्डर सोडायचे.
"माई, पाखरं खेळुन दमलीत. आधी त्याना काहीतरी खायला दे. हात पाय धुवुन घ्या रे आधी."
मग कधी बटाट्याचे पापड, कधी मटकीची उसळ, कधी ताक भाकरीचा काला असा पौष्टिक, सात्विक आहार पोटात पडायचा. त्यानंतर गुरुजी आधी एखादा श्लोक शिकवायचे आणि मग शिकवणीला सुरुवात व्हायची. माझी मुंज तशी उशीराच झाली पण गायत्री मंत्रापासुन मृत्युंजयमंत्रासकट सगळे मंत्र गुरुजींनी आम्हाला चौथीतच शिकवले होते. रामरक्षा, हनुमान स्तोत्र, मनाचे श्लोक त्या काळी आम्हाला मुखोद्गत असायचे. अजुनही म्हणायला सुरुवात केली की डोळ्यासमोर गुरुजींची बुटकेली, गौरवर्णीय मुर्ती उभी राहते. श्लोक म्हणताना चुकले की वटारलेले डोळे अजुनही कुठलीही चुक झाली की डोळ्यासमोर येतात आणि आपोआपच ती चुक सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. अगदी अभ्यासापासुन ते शारिरीक मैदानी खेळापर्यंत सगळ्या चांगल्या सवयी त्यावेळी गुरुजींनी आम्हाला लावल्या होत्या. खरेच त्यावेळी जर गुरुजी भेटले नसते तर........! आज कदाचित विशाल कुणी वेगळाच असला असता.
कुर्डुवाडीत जास्त वर्षे नाही राहीलो आम्ही. दिड वर्षे असु फार तर. त्यानंतर दौंडला बदली झाली आण्णांची. मला फार राग यायचा त्यावेळी. कुठेही व्यवस्थित शाळा सुरु आहे म्हटले की आण्णांची बदली झालीच. माझे प्राथमिक शिक्षण (पहिली इयत्ता ते पाचवी इयत्ता) एकुण चार ठिकाणी मिळुन झाले. आता कुठे नवीन मित्र होताहेत म्हटले की निघालो नवीन गावाला. मला आण्णांच्या पोलीसाच्या नोकरीचा फार राग यायचा. मी रागाने म्हणायचो की चुकुनही पोलीसात जाणार नाही.
येरगुंडे गुरुजींना सोडुन जायचे खरेच जिवावर आले होते. अवघ्या एक वर्षांचा त्यांचा सहवास होता, पण त्या माणसाने वेड लावले होते. कुर्डुवाडी सोडायच्या आधी मी गुरुजींना भेटायला गेलो. खुप रडलो आणि नेहेमीप्रमाणे आण्णांच्या पोलीसाच्या नोकरीला शिव्या दिल्या. तसे गुरुजींनी मला जवळ घेतले आणि मला म्हणाले...ते शब्द माझ्या मनावर कोरले गेले आहेत जणु.
"असं म्हणु नये राजा, अरे त्यांचं पोलीस खातं आहे म्हणुन आपण आरामात, बिनधास्तपणे सुखाने जगु शकतो. तुझ्या आण्णांची दर एक दिड वर्षांनी बदली होते याचं कारण माहीत आहे तुला?
वेड्या .. पोलीसात दोन प्रकार असतात
१) खाकी वाले : यांचा आपल्या खाकी गणवेशावर विश्वास असतो, निष्ठा असते. त्याच्यासाठी, त्याचा मान राखण्यासाठी ते आपलं सर्वस्व पणाला लावतात.
आणि
२) खा ......की वाले: यांच्यासाठी खाकी म्हणजे भ्रष्टाचार, शक्य होईल तेवढे खावुन घ्यायचे, लोकांना लुबाडत राहायचे हाच त्यांचा धर्म बनतो. आणि अशी माणसं मग वर्षानुवर्षे एका ठिकाणी चिकटुन राहतात.
सुदैवाने तुझे आण्णा पहिल्या वर्गात म्हणजे खाकीवर निष्ठा असलेल्यात मोडतात. पण त्यांचा हा प्रामाणिकपणाच त्यांना एका जागी टिकु देत नाही. पण म्हणुनच मला खुप अभिमान वाटातो तुझ्या आण्णांचा आणि तुलाही वाटायला हवा, समजलं ?
मी मान डोलावली .......
हे आणि असंच बरंच काही गुरुजींनी त्यावेळी सांगितलं. शब्द वेगळे असतील त्यांचे पण मतितार्थ हाच होता. खरेतर त्यावेळी मला काहीच कळालं नव्हतं. मी फक्त मान डोलावत होतो. मला फक्त एवढेच कळाले की आण्णा काहीतरी चांगलं काम करताहेत ज्याचा गुरुजींनासुद्धा अभिमान , आनंद वाटतोय. गुरुजींच्या त्या बोलण्याचा अर्थ आज खर्या अर्थाने कळतोय मला.
त्यानंतर परवा एक दोन तीन वर्षापुर्वी एकदा कुर्डुवाडीला गेलो होतो तेव्हा गुरुजींचं घर शोधत गेलो होतो. पण तिथे आत्ता एक मोठी सोसायटी उभी राहीलेय. गुरुजींच घर मला कुठे दिसलच नाही. शाळेत जावुन विचारले तर त्यांच्याकडेही गुरुजींचा सद्ध्याचा पत्ता मिळाला नाही. पण मला माहीत आहे , गुरुजी जिथे कुठे असतील तिथे आजुबाजुची चार मुले जमवुन त्यांना शिकवीत असतील.
सद्ध्या कंपनीतल्या कामगारांची बाजु घेवुन मी जेव्हा आमच्या मॅनेजर्सबरोबर वाद घालतो तेव्हा माझे सहकारी म्हणतात...
"यार विशाल, तेरेको क्या पडी है ! वो लोग निपट लेंगे उनका, क्युं अपनी नोकरी खतरेमें डाल रहे हों !"
त्यांना कसं सांगु ? हे मी नाही करत. माझ्या मनातला माझ्या आण्णांबद्दलचा आदर, येरगुंडे गुरुजींनी अंगात भिनवलेला आदर्शवाद हे करतोय. ते माझं कर्तव्य आहे, ते टाळायचे म्हणजे, यदाकदाचित कधी गुरुजी कुठे भेटलेच तर त्यांना तोंड नाही दाखवु शकणार मी.
अहं .... जर गुरुजी भेटलेच तर त्यांची नजर चुकवुन जाणे मला नाही जमणार, कदापी नाही.
अजुनही मी मुद्दाम सगळ्यांना पत्रे लिहीतो. लिहिताना मुद्दाम काहीतरी चूक करतो आणि इकडे तिकडे पाहतो. वाटतं, येरगुंडे गुरुजी कुठूनतरी येतील आणि म्हणतील...
"विशाल, ती वेलांटी चुकलीय, चल आजपासुन पुन्हा तास काढायला सुरुवात कर !"
विशाल
प्रतिक्रिया
23 Mar 2009 - 12:19 pm | नरेश_
अरे तुम्ही तर छुपे रुस्तम निघालात, काय छान लिहीता हो!
तुमच्या लिखाणाची शैली मनाला भावली. खरंच मला तुमचा हेवा वाटतो,
एक - भावस्पर्शी लिहीता म्हणून
दोन- तुम्हाला येरगुंडे गुरुजी लाभले म्हणून !!
असेच लिहीत रहा !!
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
23 Mar 2009 - 12:33 pm | समीरसूर
विशालराव,
खूप छान लिहिले आहे. येरगुंडे गुरुजी अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. आपली मनगटे बळकट करणारी अशी बरीच माणसे आपल्या आयुष्यात येऊन जातात आणि आपल्याला अमुल्य असे काहीतरी देऊन जातात. शिक्षक, मित्र, आई-वडील आणि बरीच्...आपणही असे कुणाला काहीतरी देऊ शकू का जे आपल्या पश्चात कित्येकांना जगण्याचे बळ देईल?
--समीर
23 Mar 2009 - 12:38 pm | विंजिनेर
आपल्या ओघवत्या लिखाणातून "चितळे मास्तरांची" पुन्हा एकदा भेट घडवून पी एल सारख्या महान माणसाची आठवण जागी केलीत!!
धन्यवाद आणि पुलेशु!
23 Mar 2009 - 2:08 pm | भिडू
हेच म्हणतो.... पु.लं. च्या चितळे मास्तरांची आठवण आली.
23 Mar 2009 - 5:37 pm | स्वाती दिनेश
चितळे मास्तर आठवले,
लेख आवडला. पुलेशु.
स्वाती
23 Mar 2009 - 6:29 pm | शितल
सहमत.
छान लिहिले आहे .
असे कोणी तरी वळण देणार असते प्रत्येकाच्या आयुष्यात. :)
23 Mar 2009 - 6:46 pm | निखिल देशपांडे
सहमत
खुपच छान लिहिले आहे.
26 Mar 2009 - 5:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सुंदर ... आणखी शब्दच नाहीत.
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
23 Mar 2009 - 12:40 pm | मुक्ता २०
खरंच छान लेख..!! :)
23 Mar 2009 - 12:40 pm | समिधा
छान लिहीलय तुम्ही. :)
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
23 Mar 2009 - 12:40 pm | सहज
खूप छान लिहले आहे विशाल. सर्व प्रसंग डोळ्यासमोर घडत आहेत असे लिहले आहे.
23 Mar 2009 - 12:43 pm | गोमट्या
अतिशय छान लेख .
23 Mar 2009 - 12:44 pm | दिपक
येरगुंडे गुरुजीचे चित्रण आवडले, भावले.
झोपडपट्टीतली १० वी पर्यंतची मुले येतात. मी शक्य होईल तेवढे त्यांना इंग्रजी आणि गणित हे विषय शिकवतो, अगदी विनामुल्य.
उत्तम काम करत आहात. तुम्हाला शुभेच्छा :)
23 Mar 2009 - 1:40 pm | सुप्रिया
खूप सुरेख आणि भावस्पर्शी लेखन. पुलेशु.
(देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.)
23 Mar 2009 - 1:49 pm | मोहन
फारच सुंदर. डोळ्यातून पाणी काढायला लावले राव.
पु.ले.शु.
मोहन
23 Mar 2009 - 2:26 pm | अनिल हटेला
सुंदर लिहीताये विशालराव !!
येउ द्यात अजुनही !!! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
23 Mar 2009 - 3:24 pm | केशवराव
विशाल भाऊ,
कमालच केलीत. काय मस्त शब्दचित्र साकारलय तुम्ही ! पुलंची आठवण झालीच आणि प्रती 'चितळे मास्तरांची' आठवणही करुन दिलीत !
असे येरगुंडे मास्तर आपल्याला खरोखर भेटले असतील [ म्हणजे हे काल्पनिक शब्दचित्र नसेल ] तर आपण धन्य आहात. मलाही असे भावे सर भेटले होते. ११वी एस्.एस्.सी. ला. भला मोठठा पंजा होता त्यांचा. रपाटा मारला कि आमची अख्खी पाठच त्याखाली यायची.[ म्हणून रुंदी कळायची ] पण निरोप समारंभाला बाहेर पडताना दारात दह्याचा वाडगा घेवून उभे होते .. आमच्या हातावर दही घालायला.
23 Mar 2009 - 5:12 pm | प्रकाश घाटपांडे
विशाल
अगदी डोळ्यासमोर चित्र उभे केले.
वा छानच सुंदर
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
23 Mar 2009 - 5:17 pm | विसोबा खेचर
अजुनही मी मुद्दाम सगळ्यांना पत्रे लिहीतो. लिहिताना मुद्दाम काहीतरी चूक करतो आणि इकडे तिकडे पाहतो. वाटतं, येरगुंडे गुरुजी कुठूनतरी येतील आणि म्हणतील...
"विशाल, ती वेलांटी चुकलीय, चल आजपासुन पुन्हा तास काढायला सुरुवात कर !"
वा! सुंदर..
बर्याच दिवसांनी एक सुंदर व्यक्तिचित्र वाचायला मिळालं. विशालभैय्या, और भी जरूर लिखना..
आपला,
(व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.
23 Mar 2009 - 6:12 pm | चतुरंग
विशालभाऊ तुमचे "चितळे मास्तर", येरगुंडे गुरुजी भावले! :)
तुमची लिहिण्याची शैली छान आहे. अजून लिहा!
चतुरंग
23 Mar 2009 - 8:19 pm | प्रमोद देव
रंगरावांसारखेच म्हणतो.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
23 Mar 2009 - 6:40 pm | बिपिन कार्यकर्ते
अतिशय उत्तम व्यक्तिचित्र. खूप भावनिक न करता अगदी योग्य रंगवलं आहे. शेवट पण आवडला.
खूपच छान. आणि असेच लिहिते रहा. खूप खूप शुभेच्छा!!!
बिपिन कार्यकर्ते (कुर्डूकर)
23 Mar 2009 - 6:44 pm | संदीप चित्रे
विशाल...
एकदम 'चितळे मास्तर' आठवले.
प्रत्येकाच्या आयुष्यातले हे वेडे कुंभार खूप खूप महत्वाचे असतात ना?
23 Mar 2009 - 7:34 pm | मराठमोळा
लेख आवडला..असे गुरुजी सर्वाना लाभोत
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
23 Mar 2009 - 7:37 pm | क्रान्ति
सुन्दर व्यक्तिचित्रण! कुर्डुवाडीचा उल्लेख जुन्या काळात घेऊन गेला. माझ सासर आहे ते, पण अलिकडे बर्याच वर्षात जाण नाही झाल. लेख खूपच छान लिहिलाय.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
23 Mar 2009 - 8:28 pm | प्राजु
सुरेखच..
लगे रहो!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Mar 2009 - 8:45 pm | रेवती
व्यक्तीचित्र आवडले.
दिडेक वर्षाच्या काळात जे गुरूजींचे संस्कार आपल्यावर घडले
तो काळ काही फार मोठा नव्हता तरी आयुष्यभर पुरेल असे विचार मिळाले.
यावरूनच त्यांची महानता कळते.
रेवती
23 Mar 2009 - 9:39 pm | मदनबाण
छान लिहले आहेत... :)
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
23 Mar 2009 - 9:50 pm | भाग्यश्री
व्यक्तीचित्रण आवडले !! :)
24 Mar 2009 - 7:04 am | लवंगी
अतिशय समर्थपणे उभे केलय. तुमच्या गुरुजींना खूप अभिमान वाटेल तुमचा.
24 Mar 2009 - 11:46 am | मि माझी
अप्रतिम ले़ख...!!!
मी माझी..
पुणेकर होण्यासाठी तूम्हांला कोणत्यातरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगण आवश्यक आहे..!!
24 Mar 2009 - 11:44 am | ढ
विशालराव,
खूपच छान लिखाण! व्यक्तिचित्र सुरेख उभं केलंत आपण डोळ्यांसमोर.
24 Mar 2009 - 1:34 pm | रम्या
वा! छानच!
उत्तम व्यक्तिचित्रण!
असेच लिहीत रहा!
पुलेशु
आम्ही येथे पडीक असतो!
24 Mar 2009 - 2:29 pm | योगी९००
विशालभाऊ,
तुम्ही खरचं नशीबवान..कारण तुम्हाला असे शिक्षक लाभले..
खादाडमाऊ
24 Mar 2009 - 2:38 pm | विशाल कुलकर्णी
सगळ्यांचे मनापासुन आभार. खरेच असे शिक्षक लाभणे याला सुद्धा भाग्यच लागते. मी भाग्यवान आहे हे या सगळ्या प्रतिसादांवरुन पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
धन्यवाद.
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
26 Mar 2009 - 4:43 pm | सुमीत
गुरुजी मनात उतरले, शेवट तर फारच भावला.
असेच लिहित राहा
26 Mar 2009 - 6:16 pm | सुधीर कांदळकर
चितळे मास्तरच आले. झकास.
सुधीर कांदळकर.