दोन संघटना

अजय भागवत's picture
अजय भागवत in जनातलं, मनातलं
19 Mar 2009 - 8:19 pm

१३ जानेवारी१८८८ रोजी ३३ संशोधक आणि शोधक (एक्सप्लोरर) कॉसमॉस क्लब, वॉशिंग्टन येथे जमले व त्यांनी नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना केली. ह्या मंडळींना कळून चुकले होते की, जगात अजुन खूप काही शोधून काढायचे बाकी आहे व मानवाला पृथ्वीबद्दलची एकंदरीतच माहिती खूपच त्रोटक आहे. केवळ स्थानिकांकडे असलेली माहिती व आत्तापर्यंत जेथे मानव जाउच शकला नाही तेथे जाउन नवी माहिती जगासमोर आणणे अशा दोन्ही बाबी महत्वाच्या मानुन ह्या सोसायटीची गुढी उभारली गेली.

ह्या सोसायटीचे उद्दीष्ट्य "भौगोलिय माहितीचा विस्तार व प्रसारण" असे ठरले. सोसायटीची घटना तयार करुन गार्डीनर हबर्ड हे पहिले अध्यक्ष झाले. ह्याबद्दलची अधिक माहिती विकीवर वाचयला मिळते.

आज ह्या सोसायटीचा जो वटवृक्ष झाला आहे त्याच्या शीतल छायेखाली आपल्याला जगाबद्दल जी नवनवी काही माहिती मिळते ती उत्कंठापूर्ण असते ह्यात शंकाच नाही. नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचा वाचक वर्ग जगात सर्वदूर पोहोचला आहे व कोट्यवधी लोक त्याचे वाचक, श्रोते व प्रेक्षक आहेत.

********
दोन वर्षांपुर्वी म्युनिक येथे २ आठवडे कष्टंबरकडे जायला मिळाले म्हणून खुष झालो. जर्मनीत मॉन्शेग्लॅडबाख (ड्युसल्डॉर्फजवळ) येथे पुर्वी अनेक महिने वास्तव्य होते पण इथे जाण्याचा योग आला नव्हता. माझ्यामते जगात मी पाहिलेल्या शहरांपेक्षा ह्या शहरात इतिहास, आधुनिकता, कला, साहित्य, इंजिनीअरिंग, सायन्स वगैरे जितके अनुभवायला मिळते त्याची तुलनाच होउ शकत नाही. मोझार्टतर शेजारचाच- ऑस्ट्रीयाचा. म्युझियममधे लिओ द विन्सी, पिकासोची खरी चित्रे/शिल्पे पाहिल्यावर रोमांच येतात. अडॉल्फ हिटलरचे हे गांव व कट्टर जर्मन म्हणजे काय ते येथेच अनुभवावे. पुण्यातल्या अनेक आयटीवाल्यांना येथे जाता आले व अनेक तेथे आहेत. मराठी लोकांनी एक वेब्साईट करुन एकमेकांच्या संपर्कात असतात. मला एकतरी मराठी तरुण प्रवासात रोज भेटायचा. बसस्टॉपवर मराठी कानावर यायचे व सहजपणे गप्पा सुरु व्हायच्या. इतके मराठीपण पुर्वीच्या जर्मेनी वारीत कधीच अनुभवायला मिळाले नाही. - पण ह्यासगळ्याबद्दल नंतर कधीतरी

अडॉल्फ हिटलर ज्या कॅफेमधे बसुन त्यानी नात्सी संघटना बांधली तो कॅफे आता पर्यटकांचे आकर्षण आहे. तो पाहिल्यानंतर सहजपणे मनात विचार आला की जवळचा एखादा कॉन्सट्रेशन कॅम्प पहायचा. पण अंगावर शहारा आला. अगदी भुताखेतांचे विचार मनात आले. ज्यांचे हालहाल करुन मारण्यात आले त्यांचे तळमळणारे आत्मे तेथेच घुटमळत असतील असा एक विचार आला व मी तेथे जाण्याचा विचार झटकून टाकला.

पण जसजसे मी म्युनिकला पाहुन घेतले तसतसे मला त्याठिकाणी जाउन यायचेच असे वाटायला लागले. तरीसुद्धा आनंदावर विरजण नको म्हणुन अगदी पुण्याला परतायच्या आदल्या दिवशी जायचे ठरवले.
म्युनिकपासुन जवळचा कॅम्प डकाउ ह्या गावांत आहे. खूपच छोटे गाव आहे व रस्त्यावर फारशी गर्दी नव्ह्ती. स्टेशनवर उतरल्यावर कॅम्पवर जाण्यासाठी बस कुठे मिळेल हे विचारण्यासाठी कोणालातरी शोधत असतांना दोन आफ्रिकन दिसले.
त्यांना विचारल्यानंतर दोघेही हसले. मी प्रश्नांकित चेहऱ्याने पाहिल्यानंतर एकजण म्हणाला, "काही खाल्ले आहे का?"
मी म्हंटले, "का?"
तो, "तुला कॅम्प पाहिल्यावर जेवण जाणार नाही!" "ओकारी येते, मन विषण्ण होतं"... मी प्रचंड विचारात पडलो...चल्बिचल झाली..खरंच जायचे आहे ना कॅम्प पाहायला की असेच मागे फिरायचे?
पुढे म्हणाला, "पण तू कॅम्प जरुर पहा...सगळ्यांनी पहायलाच पाहिजे..." त्यांने शांतपणे मला बस कोणती पकडायची व कोठे उतरायचे ते सांगितले.

कॅम्पचे वर्णन मी करत नाही. तेथे काय बघायला मिळाले ते सांगण्यासारखे नाहीच. विकिवर वाचा. डकाउ गुगल मॅपवर दिसते - कॅम्प दिसतो तो पहा.
इतकेच सांगतो की, ज्युंनी खूप भोगले. त्यांनी कॅम्पच्याच प्रांगणात आता एक चर्च बांधले आहे. तेथे मी जाउन प्रार्थना केल्यानंतर माझे मन शांत झाले.

**************

दोन संघटना- नॅशनल जिओग्राफिक सोसायटी आणि नात्सी- दोन्ही माणसांनी घडवल्या. किती फरक आहे त्यांच्या उद्दिष्टांत! एक अनेकांचे प्राण घेउन रसातळाला गेली तर दुसरी अजुनही फोफावते आहे- मानव कल्याणाचे काम करत आहे.

**************

प्रवासप्रकटन

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

19 Mar 2009 - 9:35 pm | लिखाळ

लेख छान आहे.

छळछावणी प्रकार भयानकच !

नॅशनल जोऑग्राफिक बद्दल तुम्ही दिलेली माहिती माझ्यासाठी नवी आहे.
नॅशनल जिऑग्राफिक आणि नात्झि यांची सांगड का घातली गेली हे मला कळाले नाही. दोन्हीचे उद्देश पूर्णतया वेगळे आहेत. अश्या लाखो संघटना आहेत पण त्यांची एकमेकांशी
तुलना कशी करणार? या दोन्ही संघटनांचा स्थापना दिवस एकच आहे का? (मी न गुगलता लिहितो आहे. गुगलायचा कंटाळा आला आहे.)

आपला लेख ब्राउजरवर खुप आडव्या जागेत लिहिला गेला. तो संपादन करुन उभ्या जागेत सामावता आला तर वाचणे सोयीचे जाईल.
-- लिखाळ.

अजय भागवत's picture

19 Mar 2009 - 9:56 pm | अजय भागवत

ह्या दोन संघटनांच्या उदाहरणांतुन मला मानवाच्या एकत्र येण्याच्या उद्दिष्टांत/भावनात किती टोकाचा फरक असु शकतो हेच मांडायचे होते. ३३ जण एकत्र येतात व नानफा-नातोटा ह्या मार्गावर जाऊन मानवाला माहितीसंपन्न करण्याचा ठराव मांडतात आणि तोच मानव राक्षशी महत्वांकांक्षा ठेवुन एकत्र येतो हे कसे घडू शकते? दोन्ही संघटना बर्यापैकी एकाच काळातल्या पण प्रदेश वेगळे. फरक त्यांच्या एकत्र येण्याच्या उद्दिष्टांचा आहे व तोच महत्वाचा विचार.

आपला लेख ब्राउजरवर खुप आडव्या जागेत लिहिला गेला. तो संपादन करुन उभ्या जागेत सामावता आला तर वाचणे सोयीचे जाईल.

तसा तो फक्त आय ई मधे दिसतो. मी क्रोम व सफारी मधे पाहिला- व्यवश्थित आहे.

अजय भागवत's picture

19 Mar 2009 - 10:29 pm | अजय भागवत

आपला लेख ब्राउजरवर खुप आडव्या जागेत लिहिला गेला. तो संपादन करुन उभ्या जागेत सामावता आला तर वाचणे सोयीचे जाईल.

त्याचे मुळ सापडले, ते उखडले व आता आय ई मधेही लेख हवा तसा दिसतो आहे.

लिखाळ's picture

19 Mar 2009 - 10:47 pm | लिखाळ

हा आता छान झाले ! :)
-- लिखाळ.

चतुरंग's picture

19 Mar 2009 - 9:56 pm | चतुरंग

ह्यांच्या तुलनेचे कारण लक्षात न आल्याने लेख वाचून गोंधळल्यासारखे झाले.

चतुरंग

अजय भागवत's picture

19 Mar 2009 - 10:03 pm | अजय भागवत

खरे म्ह्णणजे ती तुलना संघटनांची नव्हेच- किंबहुना तुलनाच नाही. कदाचित मी दिलेल्या लेखाच्या नावामुळे तसा आशय निर्माण होतो आहे असे वाटते. मी ते नाव देण्याआधी खूप विचार केला पण समर्पक नाव सुचले नाही. लिखाळ ह्यांच्या प्रतिसादाला मी आत्ताच तसे उत्तर दिले आहे.

धनंजय's picture

19 Mar 2009 - 11:42 pm | धनंजय

चांगली कल्पना आहे, आणि लेखनशैलीही ओघवती आहे.

(लेखाच्या दृष्टीने) तुलना नाही असे म्हणता येत नाही. येथे अलंकारिक विरोधाभास आहे. "नॅशनल" शब्दाने दोन्ही संघटनांची नावे सुरू होतात. वगैरे, वगैरे, उथळ साम्यस्थळे दाखवून मग "हेतू उच्च/हीन असल्यामुळे टोकाचा फरक" अशी काही टिप्पणी करता आली असती.

अलंकारिक विरोधाभासाला कठोर तर्क लागू करता येत नाही, म्हणून हा अलंकार आहे हे लेखातच स्पष्ट व्हायला हवे होते. नाहीतर चतुरंग, लिखाळ यांना आलेली तर्कशुद्ध शंका कोणत्याही वाचकाला येणारच - हा लेखक मधुर संत्रे आणि कुजके सफरचंद शेजारीशेजारी ठेवून काय संत्रे-सफरचंद तुलना करतो आहे?

चतुरंग's picture

20 Mar 2009 - 12:08 am | चतुरंग

धनंजयची टिप्पणी वाचून अजयला काय म्हणायचे आहे हे लक्षात आले.
माणूस हा प्राणी संघटना स्थापण्यामागे कोणते विचार/उद्दिष्टे बाळगून ती स्थापतो आणि त्या विचारातून पुढे काय जन्माला येते ह्यातला टोकाचा परिणाम हा चक्रावून टाकणारा आहे आणि हा विरोध अत्यंत विदारकपणे समोर यावा ह्यासाठी त्याने ह्या दोन संघटनांचे उदाहरण घेतले आहे.
ह्या अप्रत्यक्ष तुलनेचे स्पष्टीकरण लेखातच आले असते तर गोंधळ झाला नसता!

चतुरंग

अजय भागवत's picture

20 Mar 2009 - 7:10 am | अजय भागवत

अलंकारिक विरोधाभास

धनंजय, आभार. लेखनकलेचे हे शास्त्र मलाही समजुन घेउन आत्मसात करावे लागणार.

चतुरंग,

"माणूस हा प्राणी संघटना स्थापण्यामागे कोणते विचार/उद्दिष्टे बाळगून ती स्थापतो आणि त्या विचारातून पुढे काय जन्माला येते ह्यातला टोकाचा परिणाम हा चक्रावून टाकणारा आहे आणि हा विरोध अत्यंत विदारकपणे समोर यावा ह्यासाठी त्याने ह्या दोन संघटनांचे उदाहरण घेतले आहे."

अगदी हेच मला म्हणायचे आहे. आभार.