"कधीकधी कुणाजवळ बसून,ऐकून घेणं खूपच महत्वाचं असतं."
जान्हवी लिखिते त्या हॉस्पिटलमधे जवळ जवळ तीस वर्षं कामाला होती.हे हॉस्पिटल एका छोट्याश्या शहरात होतं.कुणा आजार्याला भेटण्यासाठी किंवा माझ्या डॉक्टर मित्राला सांगून कुणातरी माझ्या नातेवाईकाला ह्या हॉस्पिटलमधे उपचारासाठी दाखल करण्याच्या निमीत्ताने माझ्या इकडे बर्याच खेपा व्हायच्या. लिखितेचा आणि माझा त्यामुळे चांगलाच परिचय झाला होता.आज लिखिते निवृत्त होणार आहे हे समजल्यावर तिची भेट घेण्यासाठी मी मुद्दाम तिला भेटायला आलो होतो.निवृत्त होण्यापूर्वी तिच्या जागी येणार्या एका बाईला ती आपलं काम समजावून सांगत होती.
ती कामं सांगून झाल्यावर मला म्हणाली,
" आज मला खूपच भावनावश व्हायला झालं आहे.माझा जॉब संपला म्हणून नव्हे.माझा मी कामावर आल्यावर जो रोजचा रिवाज असायचा त्याला मी आता मुकणार आहे म्हणून. तुम्ही येण्यापूर्वी तोच रिवाज मी ह्या माझ्या जागेवर उद्दापासून येणार्या बाईला न विसरता समजावून सांगत होते."
मी म्हणालो,
"अरेरे,मला थोडा उशिर झाला.मला पण तुमचा हा इतका महत्वाचा रिवाज ऐकाला आवडलं असतं."
मला लिखिते म्हणाली,
"त्यात काय? तुम्हालाही ते सांगायला मला आवडेल,पण तुम्हाला सांगताना मला जरा जास्त विस्ताराने सांगावं लागेल.कारण माझ्या रोजच्या रिवाजाच्या माहितीच्या पलिकडे जाऊन इथे काम करणार्या ज्या नर्सबद्दल सांगणार आहे तिला तुम्ही निवृत्त होताना पाहिलं आहे.माझ्या जागी येणार्या ह्या नव्या बाईला त्या नर्सची काहीच माहिती नाही."
असं म्हणून लिखिते मला सांगू लागली,
"इतर रोजचीच कामं असायची.मी सकाळी प्रथम आल्याआल्या माझ्यासारखीच छोटीमोठी कामं करणार्या माझ्या ग्रुपमधल्या मैत्रीणीना भेटून त्याना स्पर्श करून दत्तगुरूंची मुर्ती डोळ्यासमोर आणून त्याची आराधाना करून त्यांच्या आजच्या दिवसाच्या कामाच्या सफलतेची मी कामना करायची.
आणि त्यासाठी प्रत्येकाला हुडकून काढावं लागायचं. बेसमेंटमधे,बाथरूममधे,कॅन्टीनमधे,जिथे सापडतील तिथे जावं लागलं तरी. ज्यावेळी मी त्याना शोधून काढून भेटायची तेव्हा मला बघून त्यांना सहाजिक आनंद व्हायचा.
बेसमेंटमधे ह्या मैत्रीणीनां शोधून काढीत असताना,त्या नर्सला मी भेटायची.ती आपल्या कामात ह्या बाबतीत आणखी काळजी घ्यायची.तिचं काम असं असायचं की,जेव्हा एखाद्दा पेशंटची ऑपरेशनची तयारी करायची असायची तेव्हा त्याला लागणारी सर्व टूल्स आणि इतर साधनं एके ठिकाणी नीट लावून ठेवायची.त्याची एक चेकलीस्ट तिला बनवावी लागायची आणि सर्वात वरती त्या चेकलीस्टवर पेशंटचं नांव लिहावं लागायचं.अशावेळी ती सुद्धा त्या पेशंटचं नांव घेऊन त्याचं ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी देवाची मनोमन प्रार्थना करायची. असं ही बाई गेले चाळीस वर्ष करत आली आहे.
पुढे लिखिते म्हणाली,
"माझी खात्री आहे की ती जे करीत होती ते कुणालाही माहित नसावं.आम्हां सर्वांपेक्षा जुनी ही काम करणारी बाई इतका महत्वाचा जॉब करीत असताना- की जे काळजीपूर्वक आणि ठिक-ठिक कराव लागणारं काम होतं- प्रार्थना करायला विसरत नव्हती.
हे असं करीत असताना,कदाचीत ती त्या पेशंटना भेटतही नसावी किंवा पुन्हा भेटणारही नसावी.कदाचीत तिला ऑपरेशन कसं झालं हेही माहित नसावं."
मी लिखितेला म्हणालो,
"तुम्हा दोघांची ही उदाहरणं पाहून हॉस्पिटलच्या कामात पडद्दाआड अशा किती गोष्टी होत असतील ह्याची तुम्ही हे सांगितल्यावरच मला कळलं,एरव्ही कळलं नसतं.
एखादं असं अत्यंत उदात्त काम सुद्धा पेशंटच्या आणि त्याच्या कुटूंबीयांच्या नजरे आड होत असावं.ही सर्व कामं करणारी मंडळी आपआपली नेमून दिलेली कामं करत असणार.पण ह्या कामगारांचं जीवन किती मौल्यवान असतं आणि त्यांच्या कहाण्या पण किती मौल्यवान असाव्यात हे त्या कुटूंबीयाना सहाजीकच कळत नसावं."
आमचं बोलणं संपल्यावर त्या बाईने लिखितेना विचारलं की जाता जाता इतर सहकार्यांना काही संदेश तुम्हाला द्दायचा आहे का?
लिखिते तिला म्हणाली,
"मनोभावनेने ह्या असल्या केल्याजाणार्या मनोमन प्रार्थनांची कदर केली जावी.त्या होऊ द्दाव्यात आणि त्यांना कमी लेखलं जाऊ नये एव्हडीच माझी प्रार्थना आहे."
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
18 Mar 2009 - 8:43 pm | क्रान्ति
लेख उत्तम आहे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}