"आपण एकटे नसून,आपण इथे पुर्वी पण होतो."

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
16 Mar 2009 - 8:54 am

"मला वाटतं,कुठच्याही नवीन समस्येला जूनं उत्तर असतं.त्या जुन्या आणि होऊन गेलेल्या अक्कलवंत कानगोष्टी आपल्या बरोबरच असतात त्या आपल्याला आश्वासन देतात,
"आपण एकटे नसून,आपण इथे पुर्वी पण होतो"

श्रीधर आणि मी एकाच गावात वाढलो आणि शिकलो.मी शिक्षण पुरं केल्यावर जास्तशिक्षणासाठी परदेशी गेलो.आणि या वयात परत आपल्या गावात येऊन उर्वरीत आयुष्य लेखन करण्यात वापरायचं ठरवलं आहे.पण श्रीधरने माझ्या सारखं काही केलं नाही. त्याच्या वाडवडीलानी शेती आणि बागायती घेऊन त्यावरच उदर्निवाह केला त्यावरच तो आपलं उर्वरीत आयुष्य जगतोय.

काल त्याचा मुलगा अमेरिकेहून थोड्या दिवसासाठी गावाला आला होता.श्रीधरला मनोमन वाटतं की आपल्या मुलाने परदेश सोडून आता इकडे येऊन राहावं आणि आपली शेतीवाडी पहावी.माझ्या समोर एकदा त्याने मुलाला जवळ बोलावून त्याला मनातल्या चार गोष्टी सांगाव्या ह्या इराद्दाने विषय काढला.
तो मुलाला म्हणाला,
"आता माझं पण वंय होत आलं आहे.तू एकूलताएक आहेस.ही एव्हडी शेती,ही आंब्या, फणसांची आणि नारळांची झाडं,ही एव्हडी बागायती आपल्या वाडवडीलांनी जोपासून वाढवली आहे,ते माझ्या नंतर पुढे चालू ठेवण्यासाठी तुझी इथे राहाण्याची अत्यंत जरूरी आहे तुला नाही का वाटत?"

मुलगा आपल्या वडीलांच्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वीच मी मुलाला माझा प्रश्न केला,
"का रे,इतक्या लांब राहून तुला तुझ्या घराची आठवण तरी येते कां?."
अगदी मी असाच काही तरी प्रश्न विचारावा अश्या अपेक्षेत असलेला तो मला अगदी मनापासून म्हणाला,
"मी जरी आता माझ्या जन्म झालेल्या राहत्या घरापासून दूर असलो तरी त्या खिडक्यांवरच्या जूनाट वेली,माझ्या पंजोबानी बांधलेला मागचा मांगर, चोहोबाजूला उंच उंच नारळाची झाडं-माड-आणि त्यावरचे नारळाचे पेड, खूप वर्षाची फणसाची झाडं
आणि त्या झाडांच्या बुंध्यावर लटकणारे ते रसाळ आणि कापे फणस,समोरचं औदुंबराचं झाड आणि त्याच्या सभोवती बांधलेला चिरेबंदी कट्टा त्या कट्ट्यावर पडून विखूरलेली औदुंबराची लहान लहान फळं,त्या फळांतली साखर खायला सोकावलेल्या लालसर मुंग्या,कलमी आंब्याच्या झाडांच्या पानाला आलेले आणि भरभर पळणारे केशरी हुमले, आणि त्यांची जाळीदार घरटी,ह्या सर्व प्रतिकृत्या मी तिकडे आठवल्यावर माझ्या घरापासून मी दूर आहे हे मला भासत नाही.पण खरं सांगू का तिच तिच शेतीची, बागायतीची कामं गेल्या पिढ्यानपिढ्या तिथेच राहून वर्षानुवर्ष करण्याने डोक्यावर निष्कारण ओझं ठेवून बंधनात राहिल्या सारखं होतं."

हे त्याचे विचार श्रीधरच्या कानावर पडल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपल्या मुलाला त्याच्या या विचाराच्या पलिकडे जाऊन काही तरी सांगावं.
माझ्याकडे नजर ठेवून पण मुलाला उद्देशून म्हणाला,
"उलट ती कामं ही एक असामान्य सांखळी माझ्या पूर्वी जन्माला आलेल्यांची होती ज्यामुळे त्यानी अविरोध वाढणार्‍या त्या वेलींची कापणी करून त्यांना सुशोभित ठेवलं, त्यानी ज्या मशागती केल्या आणि घराची डागडूजी केली,त्याच गोष्टी मी आता करीत आहे.त्या माझ्या पूर्वजानी ब्रिटीश सत्येचा दाह सोसला,ज्यांनी स्वातंत्र्याची फळ चाखली,ज्यांनी थंड पाण्याने आंघोळी केल्या,आणि येईल त्या परिस्थितीला तोंड दिलं,ह्या सर्व गोष्टींचा विचार मनात आणून मला नेहमीच वाटलं की इथे राहून ती कामं ओझं न मानता रहावं. तरच इकडच्या समस्या, महागाई,राजकारण, आतंगवाद आणि अश्या अनेक प्रकारच्या संकटाना सामोरं जायाल कठीण होणार नाही."

हे ऐकून,मोठं धारीष्ट करून श्रीधरचा मुलगा म्हणाला,
"जग सतत पुढे पुढे जात आहे.लोक लांब जाऊन स्थाईक होत आहेत.आणि त्यांना तिथे स्थिरता मिळाल्याने तिकडेच राहाण्यात समाधान मानीत आहेत."

हा त्याचा विचार ऐकून श्रीधरचा चेहरा जरा पडलेला मला दिसला.
त्याला सावरण्यासाठी मला जे पटकन लक्षात आलं ते सांगावं म्हणून मी म्हणालो,
"मला वाटतं आपणां सर्वांना ह्या सतत पुढे पुढे मजल दरमजल करणार्‍या, जगात खरं उचित काय आहे ते सिद्ध करायची जरूरी आहे.काही लोक नावीन्यासाठी आपलं घर सोडून आणि कधी कधी आपला देश सोडून स्थायीत्व मिळण्यासाठी आपल्या मित्र-मंडळीचा किंवा समाजाचा टेकू घेतात.काहीना धर्म स्थिरता देतो.परंतु,आपल्याला आपण रोजच सुचित करणार्‍या पाट्या लावून त्यावर लिहिलं पाहिजे की,
" घर सोडून राहाण्यात काही नाविन्य असेलही पण इकडे जे आपल्या पूर्वी येऊन गेले
त्यांच्या त्यावेळी, घडत गेलेलं आणि आता घडत असणारं,काही चांगलंही नाही आणि वाईटही नाही."

मला मधेच बोलताना थांबवून श्रीधर म्हणाला,
"माझ्यासाठी मी म्हणेन हे माझं घर,ती वृक्षवल्ली, त्या खिडकीवरच्या वेली माझं मूळ आहे. जरी ह्या जगात मी एकटा आलो आणि एकटाच जाणार असलो तरी मी काही इकडे एकटा पडलेला नाही."

वडलांचा विचाराचा कल पाहून त्यांना थोडसं बरं वाटावं म्हणून श्रीधरचा मुलागा म्हणाला,
"मला वाटतं,आपण सगळे आपल्या अस्तित्वाच्या शृंखलेचा नैसर्गिक दूवा आहोत.आणि आपल्यापूर्वी आलेल्यानां जशी,आता काय वेळ झाली आहे?,पुढचा येणारा ऋतू काय आहे?,वारा उत्तरेकडून वाहतो की दक्षिणेकडून? आणि उद्दा पौर्णिमा आहे का? हे समजण्याची जी जरूरी होती तिच जरूरी आपल्याला आहे."

हे त्याच्या मुलाचे विचार ऐकून श्रीधरचा चेहरा आनंदी दिसला.
मला ते पाहून बरं वाटलं मी श्रीधरला म्हणालो,
"जग सतत बदलत चाललेलं आहे पण मनुष्य स्वभाव मात्र बदलत नाही.जे काही आपलं उणंपूरं आयुष्य आहे त्यातून कसला तरी अगम्य अर्थ काढून आपलं सांत्वन करून घेतलं पाहिजे की आपले पुर्वज ह्यातून पूर्वीच निभावून गेले आहेत."

माझ्या विचाराची री ओढीत श्रीधर अप्रत्यक्षपणे मुलाला म्हणाला,
"कदाचीत तुम्हाला हे भूतकाळ आठवून वर्तमानात राहाण्याची क्रिया मोठी दखल घेणारी वाटेल. पण मला ती अत्यानंद देणारी वाटते.
मला वाटतं,कुठच्याही नवीन समस्येला जूनं उत्तर असतं.त्या जुन्या आणि होऊन गेलेल्या अक्कलवंत कानगोष्टी आपल्या बरोबरच असतात. त्या आपल्याला आश्वासन देतात,
"आपण एकटे नसून,आपण इथे पुर्वी पण होतो"

श्रीकृष्ण सामंत

कथालेख