एक मोकळा, निवांत पसरलेला वीकांत निवडावा. भरपूर आराम करावा. आराम करायचा कंटाळा आला, की एक फर्मास चहा घ्यावा. चहामुळे पुन्हा आराम करण्याइतपत तरतरी आली, की पुन्हा आराम करावा! एखाद्या जुन्या चित्रपटाची सीडी पहावी.
बाजारात जावे. छानपैकी मुडदुशे आणि कोलंबी आणावी. दोन्ही व्यवस्थित साफ करून घ्यावी. कोलंबीचा काळा धागा काढण्यास विसरू नये.
आलं, लसूण आणि लाल मिरचीचे वाटण करून घ्यावे. ते मुडदुशांना व्यवस्थित लावून ठेवावे.
त्याच बरोबर आलं, लसूण, हिरवी मिरची यांचेही वाटण करून घ्यावे आणि ते कोलंबीला लावावे.
दोन्ही साधारणतः अर्धा तास मुरवत ठेवावीत.
मधल्या काळात एक घरगुती ब्लडी मेरी बनवून घ्यावी. त्याची कृती अशी -
१) एक ग्लास घ्यावा.
२) ग्लासाच्या कडेला लिंबाची फोड फिरवून घ्यावी.
३) एका थाळीत थोडे मीठ घ्यावे.
४) त्या थाळीत ग्लास उपडा ठेवावा.
५) ग्लासच्या कडेला लिंबू-मीठाचा एक मस्त गिलावा होईल.
६) ग्लासात थोडे बर्फाचे तुकडे टाकावेत.
७) आता ग्लासात एक पेग वोड्का (शक्यतो स्मिरनॉफ) घालावी.
८) आधीच करून ठेवलेल्या टोमॅटो ज्यूसने उरलेला ग्लास भरून घ्यावा.
९) त्यात थोडी मिरी टाकावी आणि वर एक लिंबाची चकती.
ब्लडी मेरीचा पहिला राऊंड संपल्यावर मुडदुशे आणि कोलंबी खरपूस तळून घ्यावीत. ब्लडी मेरीचा दुसरा राऊंड भरून घ्यावा.
छानपैकी गाणी लावावीत. गाणी ऐकता ऐकता ब्लडी मेरी, मुडदुशे आणि कोलंबी यांचा फडशा पाडावा. आस्वाद घेण्याच्या नादात, तळलेल्या माशांचे फोटो काढायचे विसरून जावे! आणि सगळ्याचा फडशा पडल्यावर, रिकाम्या प्लेटींचा फोटो टाकणे योग्य नसल्यामुळे त्यांचा फोटो टाकू नये!!!
प्रतिक्रिया
15 Mar 2009 - 4:29 pm | श्रावण मोडक
खास...
खाण्यापिण्यातल्यांना डिवचणारे हलकट लेखन आहे हे :)
आता तुम्ही अद्ययावत केलं म्हटल्यावर प्रतिसाद संपादित करणं आलंच.
फोटू फाटलेत... ब्लडी मेरी?
फोटूशिवाय वाचण्यातच मजा येतेय राव.
15 Mar 2009 - 5:10 pm | सुनील
श्रावणसर, ही आपली घरगुती ब्लडी मेरी! त्याला बारमधल्यासारखा प्रोफेशनल लूक कसा काय येणार बॉ?
;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Mar 2009 - 5:17 pm | श्रावण मोडक
आम्ही ब्लडी मेरीच्या लुकबद्दल नाही बोललो. लुक घेऊन करायचं काय, चव आणि 'ते' जमल्याशी मतलब.
फोटू फाटलेत, त्याला ब्लडी मेरी जबाबदार आहे का असं म्हणतोय... आता कॅमेऱ्याच तसा असेल तर आमचं काही म्हणणं नाही. :)
15 Mar 2009 - 4:29 pm | विनायक प्रभू
ब्लडी मारी.
15 Mar 2009 - 4:35 pm | स्वाती दिनेश
सुनीलभाऊ,
लय भारी..:)
स्वाती
15 Mar 2009 - 5:18 pm | नंदन
साष्टांग प्रणिपात :)
मुडदुशांची आमटीही झकास लागते बाकी. वेगळीच चव आहे या माशाला.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
15 Mar 2009 - 5:21 pm | शक्तिमान
छान!
अवांतरः इमेज साईझ ५१२ * ३८४ ठेवलीत तर लेख वाचायला सोपा जाईल...
16 Mar 2009 - 5:17 am | पिवळा डांबिस
ओह! ब्लडी... मेरी!!!
मुड्डुश्यांची करी
सुंगटा पण मेल्यान,
फस्त केली सारी
ओह! ब्लडी... मेरी!!!!!
(ह. घ्या.:))
16 Mar 2009 - 7:01 am | सहज
ऐसा मंगता है विकांत!
16 Mar 2009 - 8:32 am | छोटा डॉन
हा हा हा, सहजरावांशी सहमत ...
असाच हवा विकांत, फक्त ह्यातले कंटेन्ट्स बदलु शकतात आपल्या चवीप्रमाने ...
सोबत आवडणारे संगीत आणि इतर मनोरंजनाचे कार्यक्रम असले तर क्या बात है ...
खुद के साथ बाता : सोबत एखादी आपल्याला हवीहवीशी वाटणारी सुस्वरुप आणि तारुण्याने मुसमुसलेली कन्या असले तर विकांत लै भारी होईल का रे डान्या ? ;)
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
16 Mar 2009 - 8:58 am | विसोबा खेचर
सुनीलभैय्या, लेख आणि फोटू छान. पण फोटू अस्पष्ट आहेत...
तात्या.
16 Mar 2009 - 9:11 am | भडकमकर मास्तर
वा.. फोटू आल्यावर लेखाला अजून मजा आली.
मस्त
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
16 Mar 2009 - 9:56 am | प्रभाकर पेठकर
छायाचित्रांचा आकार फार मोठा आहे. आणि छायाचित्रांचे फोकसिंग तितकेसे शार्प वाटत नाही.
मौजमजा/विरंगुळा ह्या सदरात टाकल्यामुळे मुडदुशांना मसाला लावला पण कोलंबीला मसाला न लावताच का तळले हे विचारता येत नाही. असो.
दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
16 Mar 2009 - 12:19 pm | सुनील
सर्वांचे आभार!
श्रावण सर : फोटू फाटलेत, त्याला ब्लडी मेरी जबाबदार आहे का असं म्हणतोय... आता कॅमेऱ्याच तसा असेल तर आमचं काही म्हणणं नाही
प्रभाकर पंत : छायाचित्रांचे फोकसिंग तितकेसे शार्प वाटत नाही.
तात्या : पण फोटू अस्पष्ट आहेत...
बरोबर आहे. ह्याला कारणे दोन - एक म्हणजे, १.३ मेगापिक्सलचा मोबाइल कॅमेरा आणि दुसरे अर्थातच - ब्लडी मेरी!!
शक्तिमान : इमेज साईझ ५१२ * ३८४ ठेवलीत तर लेख वाचायला सोपा जाईल...
प्रभाकर पंत : छायाचित्रांचा आकार फार मोठा आहे
मान्य. चूक सुधारायचा प्रयत करतो.
नंदन : मुडदुशांची आमटीही झकास लागते बाकी. वेगळीच चव आहे या माशाला
छोटा डॉन : फक्त ह्यातले कंटेन्ट्स बदलु शकतात आपल्या चवीप्रमाने
सहमत.
छोटा डॉन : खुद के साथ बाता : सोबत एखादी आपल्याला हवीहवीशी वाटणारी सुस्वरुप आणि तारुण्याने मुसमुसलेली कन्या असले तर विकांत लै भारी होईल का रे डान्या ?
आता तेही फोटू इथे टाकायचे म्हन्ता?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
16 Mar 2009 - 1:29 pm | गणपा
सुनिल मस्त रे.
मुडदुशे लै टेस्टी . १.३ मेगापिक्सलने पण रंग जबरा आलाय. अजुन येउदे रेशिप्या.