लज्जत सुखाची

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
11 Mar 2009 - 7:27 pm

लेवून तवंग सुखाचा
आयुष्य बनतं गुळचट
न अडचणींचे डोंगर आडवे
न आशांचे किल्ले रासवट
ऐश्वर्याच्या सरळसोट, उंचच उंच भिंती
न कुठे अश्रूंचा कोनाडा, न कुठे दु:खाची पणती
प्रकाशाची दारं उघडी सताड
रात्रीचा अंधारही कुंपणाच्या पल्याड
असतं आयुष्य असं
बेचव आणि अळणी
जरी पाऊस सुखाचा,
तोंडात मिठाची गुळणी
सुखाला हवी खरी, फोडणी खमंग दु:खाची
हिंग थोडा चिंतेचा अन्‌ मोहरी हवी कष्टांची
तडतडलेली मोहरी आणते आगळीच खुमारी
सुखाची अशा मग लज्जतच न्यारी.

जयश्री अंबासकर

कविताअनुभव

प्रतिक्रिया

अवलिया's picture

11 Mar 2009 - 7:37 pm | अवलिया

दुःखाची मागणी करणारी कुंती आठवली..

--अवलिया

मराठमोळा's picture

11 Mar 2009 - 7:44 pm | मराठमोळा

सुखात सुद्धा कोणी दु:ख शोधु शकतं याची कल्पना न केलेलीच बरी..
दु:ख हे आहे कि काहीच दु:ख नाहिये वाह वाह..

बाकी तुम्ही कविता मांडलीत छान..

मराठमोळा.

चकली's picture

11 Mar 2009 - 7:45 pm | चकली

वेगळी पण छान कविता!

चकली
http://chakali.blogspot.com

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Mar 2009 - 7:46 pm | बिपिन कार्यकर्ते

तुझ्या कडून जरा वेगळी कविता. मस्त आहे. छान मांडली आहे.

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

13 Mar 2009 - 11:25 am | विसोबा खेचर

तुझ्या कडून जरा वेगळी कविता. मस्त आहे. छान मांडली आहे.

हेच बोल्तो..!

आपला,
(जयूचा फ्यॅन) तात्या.

शितल's picture

11 Mar 2009 - 7:53 pm | शितल

जयवीताई,
खमंग फोडणी दिलेली कविता आवडली..
खुप अर्थपुर्ण कविता. :)

प्राजु's picture

11 Mar 2009 - 7:54 pm | प्राजु

अंधाराशिवाय प्रकाशाला अर्थ नाही.. तसंच दु:खाशिवाय सुखाची लज्जत कशी समजणार?
शब्दबद्ध छान केलं आहेस हे जयुताई..
मस्त!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मनीषा's picture

11 Mar 2009 - 8:42 pm | मनीषा

प्रकाशाची दारं उघडी सताड
रात्रीचा अंधारही कुंपणाच्या पल्याड
असतं आयुष्य असं
बेचव आणि अळणी ... अगदी खरं आहे .

अनामिक's picture

11 Mar 2009 - 9:24 pm | अनामिक

कविता आवडली!

-अनामिक

क्रान्ति's picture

11 Mar 2009 - 10:31 pm | क्रान्ति

मस्तच! सुखाला हवी खरी फोडणी खमंग दु:खाची! भन्नाट कल्पना आहे. कविता खरच छान आहे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

बेसनलाडू's picture

11 Mar 2009 - 10:35 pm | बेसनलाडू

(कल्पक)बेसनलाडू

शरदिनी's picture

11 Mar 2009 - 11:02 pm | शरदिनी

हिंग,मोहरी,खमंग,खुमारी असे खूप छान शब्द कवितेत अनुभवायला मिळाले...
खूप छान...
अवांतर : मात्र सर्वांनाच आयुष्यात अशी दु:खाची फोडणी कमी येवो, असे चिंतिते...

स्वाती राजेश's picture

11 Mar 2009 - 11:51 pm | स्वाती राजेश

कविता छान आहे...
सुखाला हवी खरी, फोडणी खमंग दु:खाची
हिंग थोडा चिंतेचा अन्‌ मोहरी हवी कष्टांची
मस्तच!!!

अवांतरः कविता बहुतेक स्वयंपाक करताकरता लिहिलेली दिसते....:)

सहज's picture

12 Mar 2009 - 7:10 am | सहज

>कविता बहुतेक स्वयंपाक करताकरता लिहिलेली दिसते

:-)

कविमन असलं की जगातील दु:ख पाहून कळतच(कळवळतच) की मग स्व:तासाठी वेगळं मागायची हौस कसली? नाही पटत. :-)

मैत्र's picture

12 Mar 2009 - 8:33 am | मैत्र

सुंदर शब्द योजना आणि आशयपूर्ण कविता...
अजून लिहा.

जागु's picture

12 Mar 2009 - 1:14 pm | जागु

जयवी छान कविता. मा.बो. वर प्रतिक्रिया दिली आहे.

जयवी's picture

12 Mar 2009 - 2:41 pm | जयवी

मित्रांनो....... मनापासून धन्यवाद :)
स्वयंपाक करता करता कविता सुचली असं म्हणायला हरकत नाही ........कारण नवरा म्हणतो कवितांपेक्षा सैपाक घरातला वावर वाढवा.... त्यामुळे असं झालं असावं ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Mar 2009 - 3:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जयवीताई, कविता आवडली आणि इथेही दाद देत आहे.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Mar 2009 - 10:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता...!

आनंदयात्री's picture

12 Mar 2009 - 11:58 pm | आनंदयात्री

सुरेख कविता. आवडली !!

चतुरंग's picture

13 Mar 2009 - 12:38 am | चतुरंग

नेहेमी वृत्तबद्ध राजरस्त्याने जाणार्‍यांनी कधी थोडे मुक्तकाच्या पायवाटेने जाणेही मनोरंजक असते! :)

चतुरंग

जयवी's picture

13 Mar 2009 - 12:45 am | जयवी

वृत्तबद्ध राजरस्ता...... चतुरंगा....... प्रतिक्रिया राजवर्खी आहे हो :) मनापासून आभार :)