बरेच दिवस अस्वस्थ होतो.
इस्राईलनं केलेल्या हल्ल्यात नाहक बळी पडलेल्या शेकडो पलेस्टिनींबद्दलची ही अस्वस्थता होती का?
इथिओपियामधल्या दुष्काळग्रस्तांना खायला अन्न नसताना इथे लोक फुकटच्या मेजवानीतदेखील अन्नाची नासाडी करत असल्याबद्दलची होती का?
शेकडो अधाशी, उतावळे उपवर तरुण गुढग्याला बाशिंग बांधून तयार असताना करीना कपूरनं सैफ सारख्या द्वितीय वराशी सूत जमवावं, याबद्दलची ही आर्त वेदना होती का?
की आपल्या लेखनाला कुत्रंही विचारत नाही, त्याची व्यथा??
छ्या!
ही अस्वस्थता, वेदना, वैषम्य होतं आपली पोरगी काही आपल्या पावलावर पाऊल ठेवून चालत नाही, त्याचं!
एकदा हात मोडणं, एकदा उजव्या बोटावर कोयती, एकदा डाव्या बोटावर ब्लेडचा स्वयंआघात, एकदा विळीवर, एकदा बांधावर पडून अजूनही जपलेल्या `पाय' आणि `ढोपर'खुणा, यापैकी काहीच आपल्या मुलीनं अनुभवलेलं नाही, याचं कोणत्याही सह्रुदय पित्याला राहून राहून वैषम्य वाटणारच, ना!
(माझ्या पायावरची विळीच्या जखमेची खूण दाखवली, तेव्हा काय खूश झाली होती पोरगी!)
नाही म्हणायला, मनस्वीनं एकदा `तुम्हाला बंद करते' म्हणून स्वत:लाच बाथरूममध्ये कोंडून घेण्याचा स्व्यंगोल केला, तेवढा एकच काय तो पराक्रम!
बाकी नाकात पेन्सिल अडकवणं म्हणून नाही, बोटं दारात साकटून घेणं नाही, गेला बाजार एखादी मौल्यवान वस्तू फोडणं/हरवणं नाही...!
पार वैताग आला होता!!
पण काल पोरीनं बापाचं नाव राखलं. ऊर अभिमानानं भरून यावा, अशी कामगिरी केली.
घरी आलेल्या पाहुण्यांना सोडायला सोसायटीच्या गेटपर्यंत गेलो होतो. परत येताना पोरगी उधळली. एकतर साध्या चप्पल घालायला सांगत असताना हट्टानं हील्सच्या चप्पल घातल्या होत्या. त्यातून खड्यात पाय अडखळला नि तोंडावर पडली. किरकोळ माती लागलेय, असं वाटत होतं. घरी आल्यावर खरी परिस्थिती कळली. डाव्या डोळ्याच्या वर-खाली मार लागला होता. चंगलीच सालटी निघाली होती नि रक्तही आलं होतं. पण जखम खोल बिल नव्हती.
रात्री कैलास जीवन लावून झोपवलं. सकाळी उठल्यावर जखमेनं आपलं खरं रूप दाखवल्याचं समजलं. डोळा मस्त सुजून टोमॅटोसारखा झाला होता. उघडताही येत नव्हता. डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागली. औशधांई दोन-चार दिवसांत सूज उतरेल, असा अंदाज आहे.
बघूया!!
प्रतिक्रिया
9 Mar 2009 - 1:41 pm | बिपिन कार्यकर्ते
काळजी घ्या!!!
अवांतरः शेवटी नाव राखलं पोरीने... थंड वाटले असेल ना? ;)
बिपिन कार्यकर्ते
9 Mar 2009 - 1:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पोरीची काळजी घ्या अभिजितराव. लिखाण आणि वारसा दोन्ही आवडलं.
अवांतरः माझ्या चेहेर्यावरच्या चार खुणा पाहून माझ्या बाबांना अगदी कृतकृत्य वाटत असणार. मला मात्र अर्धा डझन खुणा नसल्याचं वैषम्य वाटतंय.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
9 Mar 2009 - 1:56 pm | प्रकाश घाटपांडे
ही जखम काळजी लावणारी नसुन प्रेम वाढवणारी असते. सगळच ऑल वेल असल्यावर त्याचे महत्व समजत नाही. म्हणुन हा प्रसंग आठवणीत राहील. डोळा खोबणीत असल्याने कडेला मार लागतो. सिंहगडावरुन खाली उतरताना मला असाच मार लागला होता. गाडीवरुन खाली पडल्यावर काही काळ (एखादा अर्धा मिनिट) माझी स्मृती शुन्य झाली होती. २२ टाके पडले होते. काहींना "टाकल्यामुळे" हे घडले असावे तर काहींना "न टाकल्यामुळे" असे घडले असावे असे वाटले.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
9 Mar 2009 - 1:57 pm | सहज
प्रमोदकाका,प्रा. डॉ., ही पहा बापाची माया. :-(
काळजी घ्या हो. लहान मुलाला लागणे व ते वर्णन करुन करुन सांगणे पटत नाही अभिजीतराव. तुमच्या पुढल्या पाच लेखांना आम्ही भरघोस प्रतिसाद देउ पण असला लेख नका हो लिहू.
लवकरात लवकर बरी होवो ही सदिच्छा.
9 Mar 2009 - 2:07 pm | आपला अभिजित
आपल्या दुखण्याने आपल्या प्रेमळ पित्याच्या हाती कोलीथ मिळणार आहे, याची त्या बिचार्या मुलीला काय कल्पना?
दुखणं फार गंभीर नाहीये, म्हणूनच एवढ्या हलके-फुलके लिहिलंय.
तुमच्या भावना जाणतो. चुकीच्या अर्थाने घेऊ नका.
9 Mar 2009 - 2:02 pm | अवलिया
काळजी घ्या!!!
(स्कारफेस) अवलिया
9 Mar 2009 - 2:27 pm | दिपक
आता बापाला मुलीची काळजी घ्यायला सांगणे म्हणजे... जाऊदे
अभिजीतदा तुम्ही तुमची काळजी घ्या :)
9 Mar 2009 - 2:33 pm | परिकथेतील राजकुमार
असेच म्हणतो...
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य
10 Mar 2009 - 2:20 am | प्राजु
सगळे राजकारणी काय प्रामाणिक झाले की काय? नाही ...म्हणजे तू त्यांच्याबद्दल लिहायचं सोडून बिचार्या मुलीच्या पडण्याबद्दल चवीचवीने लिहिलं आहेस!!
लिहिलं आहेस हलकंफुलकं .. नो डाऊट! आवडलं..
असो.. काळजी घे,
वेळीच उपचार चालू ठेव. इतकंच आत्ता!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Mar 2009 - 2:40 am | पक्या
चटपटीत छान लिहिलंय.
फक्त वेळ चुकली असं वाटतयं. मुलगी बरी झाल्यावर हा लेख टाकायला हवा होता. म्हणजे तुमच्या लेखातील गंमत चांगल्या प्रकारे अनुभवता आली असती. मुलीची काळजी घ्या.
10 Mar 2009 - 2:52 am | संदीप चित्रे
काळजी घेणं, औषध-पाणी वगैरे सगळं करत असालच...
तिला नक्की सांग की पडलीस तरी पुन्हा अशीच धावायला घाबरू नकोस :)
10 Mar 2009 - 2:59 am | चतुरंग
काळजी घ्या! डोळे नाजूक अवयव!!
लेक लवकर बरी होवो.
(एक सांगू, असे विषय चटपटीतपणे नका लिहू बॉ, ब्लॅक कॉमेडी वाटते. :( )
चतुरंग
10 Mar 2009 - 12:10 pm | आपला अभिजित
भावना पोचल्या.
मूल या बाबतीत सगळेच हळवे असतात बुवा. माझ्यासकट!
असो. लेखनाची खुमखुमी जिरवणं, एवढा एकच उद्देश नव्हता. तिची दुखापत आता बरी आहे. म्हणूनच कदाचित, थोडा ताण हलका करण्यासाठी हे लिहिलं. असो. तरीही, दुखापत बरी झाल्यानंतर लिहिण्याची सूचना पटली.
संदीपच्या सूचनेचीही योग्य दखल घेऊच. धन्यवाद.
मीही एकदा आईला इलेक्शन ड्युटीवर सोडायला जाताना पहाटे स्कूटरवरून घसरून पडलो होतो. आईच्याही डोळ्यालाच मार लागला होता.
नंतर दोन-तीन वर्षांतच रत्नागिरीहून पुण्याला एकटा स्कूटर घेऊन यायची वेळ आली, तेव्हा वडिलांनी असाच आत्मविश्वास दिला होता.
तुमचीही तशीच मतं वाचून बरं वाटलं.