धर्म

चेतन१२३प's picture
चेतन१२३प in जनातलं, मनातलं
8 Mar 2009 - 11:02 pm

धर्म! बाजारातुन भाजी घेऊन ये लवकर. पावशेरच आण. हे घे पैसे. उठ बघु लवकर." आईच्या बोलण्याने धर्म लेख अर्धवट सोडुन उठला. आईने टेबलवर ठेवलेले पैसे आणि पिशवी घेऊन तो घरातून खाली मान घालूनच बाहेर पडला. काही वेळापुर्वीच तो कॉलेजमधुन परत आला होता. कॉलेजमध्ये आज परत त्याचा सर्वांनी अपमान केला होता. तो सहन न झाल्याने धर्माने दु:खाश्रु ढाळले होते. माझ्या आयुष्यातच हे सर्व का घडतं? हा प्रश्न त्याला पडला होता. अल्पभाषी असणाऱ्या त्याला पदोपदी अवमान सहन करावा लागत होता. शरीराने क्रुश म्हणुन सगळॆ त्याला सुपरमॅन म्हणत. आजतर संपुर्ण वर्गासमोर एका मुलीने त्याला सुपरमॅन म्हणुन हिनवले होते. त्यानंतर खोटी सहानुभूती दाखवत त्याच्या मित्रांनीदेखिल त्याच्या दु:खात भर घातली होती. संपुर्ण वर्ग आपल्याला तोंडावर हसत आहे हे तो बघु शकत होता पण बोलणार काय? तो क्रुश आहे ह्या न केलेल्या गुन्ह्याची त्याला शिक्षा मिळाली होती. त्याच्या एका पायामध्ये थोडा व्यंग असल्याने त्याच्या चालण्यात किंचीत विचीत्रपणा होता. त्यामुळे बरेचदा लोक त्याला कॅटवॉकर म्हणत असत. रस्त्याने चालत असताना त्याला सतत कुठुन तरी कोणाकडुन तरी डिवचल्या जाण्याची भिती असे. म्हणुन तो आजदेखिल खाली मान घालुनच पुढे जात होता. बाजारामध्ये पोहोचल्यानंतर स्वस्त दरातल्या भाजीसाठी त्याचा शोध सुरु झाला. सायंकाळ नुकतीच सुरु झाली होती. बाजारामध्ये सर्वत्र धुळ उडत होती. थोडा शोध केल्यानंतर धर्माला स्वस्त दरात भाजी मिळाली. काही क्षणासाठी त्याच्या चेह-यावर स्मित झळकले. पण, जणु पावसाळ्यामध्ये दिसणा-या सुर्याप्रमाणे त्याचे स्मित अल्पकाळ टिकले. त्याने पावशेर भाजीची मागणी करताच "मालक अर्धा किली घ्या की! चांगली बॉडी बनवायची असेल तर भरपूर खावं लागतं" ह्या भाजीवाल्याच्या सहज बोलण्याने त्याच्या व्यंगाची त्याला परत जाणीव झाली आणि तो कोमेजला. शरीर बलदंड बनविण्यासाठी त्याने नियमीतपणे आखाडयामध्ये सराव केला. पण एक वर्षानंतरही शरीरावर अजिबात फ़रक पडत नाही हे बघुन तो अधिकच चिंतित झाला. रस्त्याने परत येताना त्याला आठवत होते की, त्याने जिममध्ये जाण्याची गोष्ट सर्वांपासुन लपवून ठेवली होती. ती कुठल्यातरी मार्गाने एका मित्राला माहित पडताच दुस-या दिवसापासुन सर्वांनी त्याला हनुमान, अर्र्नॉल्ड म्हणुन वेदना दिल्या होत्या. लोकांच्या त्रासाने तो एकलकोंडी झाला होता. एकेकाच्या आयुष्यात देव अशी विचित्र परिस्थिती का तयार करतो की ज्यामुळे समाजशील म्हणवणाऱ्या या माणसाला समाजाचीच वीट यावी हा विचार करत धर्म पुढे जात होता. काय असतो हा समाज म्हणजे? काही पांढरपेशी जीव पुढे येऊन काही देहरोग्यांनी मिळुन तयार केलेली नियमावली??? स्वत:ची कमजोरी, स्वत:ची उणीव दुसऱ्यांपासून लपवून ठेवण्यासाठी मात्र दुसऱ्यांचे व्यंग दाखविण्यासाठी तयार केलेली शिस्तबद्ध व्यवस्था? मी तर दूसऱ्यांकडे कधीच लक्ष देत नाही. कधीच दुसऱ्यांचे दोष दाखवत नाही. दुसऱ्यांबरोबर फ़ार कमी संपर्क करतो मग सगळे जण माझ्या आयुष्यात का म्हणुन झाकुन बघतात? मी प्रयत्न करुनही वजन वाढवु शकत नाही. कदाचित कर्णालादेखिल सुतपुत्र म्हटल्यानंतर अश्याच वेदना होत असाव्यात. पण मी कर्णदेखिल नाही. कारण, दूसऱ्याच्या प्रतिभेवर जळणे, कपट कारस्थान करणे हा तर माझा स्वभावच नाही. मला संपुर्ण वर्गासमोर सुपरमॅन म्हणनाऱ्या तिला मात्र मी कसा माफ़ करु?? मी तिला माफ़ केले तर हा समाज मला माणुस म्हणुन स्वीकारणार नाही. कारण, स्त्रीकडुन झालेला अवमान सहन करुन गप्प बसण्याची मी जेथे राहतो तेथिल समाजामध्ये पद्धत नाही. पण मी करु तरी काय? अभ्यास करुन खुप मार्क्स मिळवणे हे माझ्यासाठी नविन नाही आणि ते सर्वांनाच माहित आहे की माझ्या बुद्धीला तोड नाही म्हणुन. त्याने होणार काय? आज जगायचे म्हणजे पैसा आणि आकर्षक शरीर असणे गरजेचे आहे. ह्या दोन्ही गोष्टी मिळविण्यासाठी लागणारी महत्वाकांक्षा माझ्या अंगी नाही असे नाही पण, सरस्वती आणि लक्ष्मी एकाच ठिकाणी वास करत नाही हेदेखिल नकारण्यासारखे नाही. लोकांच्या त्रासाला कंटाळुन पळुन जाणाऱ्यांपैकी मी नाही पण लढण्यासाठी मार्गदेखिल सापडत नाहीए. लोकांकडुन डिवचल्या जाण्याची भिती मनात नाही असे नाही पण म्हणुन मी घाबरट ठरतो असेही नाही. फ़क्त एवढेच की मला विरोध करण्याचा उपाय सापडत नाहीए. अभ्यास करुन मार्क्स मिळवुन तर मी समाजाला माझ्यापुढे मान खाली घालायला लावु शकत नाही. मुळात समाजाने मान खाली घालने हा माझा उद्देश आहे असे नाही फ़क्त मला माझे आयुष्य माझ्या तर्हेने जगु द्या एवढेच मला म्हणायचे आहे. आणि माझे म्हणणे हा मुर्दाड समाज तेंव्हाच ऐकेल जेंव्हा मी पैशाच्या आवाजाने बोलणे सुरु करेन.........

कथाविचार

प्रतिक्रिया

गणपा's picture

8 Mar 2009 - 11:18 pm | गणपा

@) वाचा बसली आहे..