पुस्तक परिचय -"काबूल इन विंटर"

विंजिनेर's picture
विंजिनेर in जनातलं, मनातलं
8 Mar 2009 - 1:04 pm

"मी अफगाणिस्तानात आले ते बाँबहल्ले थांबल्यानंतर लगेचच...
११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर मी सुन्न झाले होते. (अमेरिकन सामर्थ्याची जणु प्रतिकं असणार्‍या) वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती जमीनदोस्त झाल्यावर आलेलं हरवलेपण मनात घर करून बसलं होतं. ... जॉर्ज बुशच्या सरकारने ह्या हल्ल्यावरचा उपाय म्हणजे हजारो मैल दूर असलेल्या, अनेक दशकांच्या युद्धांनी उध्वस्त झालेल्या एका अफगाणिस्तान नावाच्या देशावर हल्ला करणं हाच आहे असं जेव्हा जाहिर केलं, तेव्हा मात्र त्या मुजोरी बादरायण संबधाने माझ्या मनातल्या भीतीची जागा संतापाने घेतली... "

ऍन जोन्सच्या "काबूल इन विण्टर" ह्या पुस्तकाची ही सुरवात आपल्या मनाची जी पकड घेते ती शेवटपर्यंत सुटत नाही. ऍन २००२ साली स्वयंसेवक म्हणून अफगाणिस्तानात गेली आणि पुढची चार वर्षं ती समाजसेवा करत तिथेच राहिली, सामान्य अफगाणी लोकांमधे फिरली, तिनं त्यांना जवळून पाहिलं. हे पुस्तक म्हणजे त्या चार वर्षांचं अनुभव कथन. त्यात वस्तुस्थितीपेक्षा हजारो मैल दूर, वातानुकुलित स्टूडियोमधून, प्रसिद्ध होणार्‍या गुळगुळीत वार्तापत्रांचा बेगडीपणा नाहीये. आहे तो स्वानुभवातून लिहिलेल्या प्रसंगांचा सच्चेपणा. ते वर्णन चटकन मनाला भिडतं कारण ते अफगाणी मानसिकतेचं आणि तिथल्या समाजाचं जवळून आणि अनेक अंगाने सदर्शन घडवतं.
ऍन जोन्स ही न्युयॉर्क टाईम्ससारख्या अतिप्रतिष्ठेच्या वृत्तपत्रात पत्रकार. व्यवसायात उपयोगी पडणारी संशोधक वृत्ती तिच्या इतर लेखनात सुद्धा सहज जाणवून येते. ३०० पानी असलेल्या ह्या पुस्तकासाठी वापरलेल्या तिने तब्बल पावणेदोनशे संदर्भ वापरले आहेत. पण हे पुस्तक म्हणजे नुसती संदर्भांची जंत्री नाही. हा प्रगाढ्यतेचा आव आणणारा संशोधन-ग्रंथ तर नाहीच नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे हे एक अनुभवावर आधारलेलं केवळ एक सद्यस्थितीवरचं भाष्य आहे.

पुस्तक ऍनने तीन भागात मांडलं आहे. पहिल्या "इन द स्ट्रीटस्" मधे कायम चालणार्‍या युद्धाने उध्वस्त झालेल्या अफगाणी समाजाचं चित्र, वर्षांनुवर्ष चालत असलेल्या ह्या युद्धांमागचा इतिहास, भिन्न संस्कृती आणि भटक्या टोळ्यांची परस्परांवर कायम वर्चस्व गाजवणारी वृत्ती, ह्या वृतीचा फायदा घेऊन युद्धांच्या भडक्यामधे तेल ओतणारा पाकिस्तानच्या आय-एस-आय चा हात आणि त्याला असणारी सी-आय-ए ह्या अमेरिकन गुप्तहेरखात्याची फूस ऍनने विस्ताराने मांडली आहे.

ह्या भागाच्या पार्श्वभुमीवर ती ओळख करून देते ती काबूलमधल्या स्त्रियांच्या तुरुंगाची - "इन द प्रिझन्स" ह्या भागात.
तुरुंगातल्या स्त्री-कैद्यांवरचे आरोप, आणि तुरुंगात येण्याआधी आणि आल्यानंतर त्यांच्यावर झालेले अत्याचार पाहून स्त्री कैदी आणि पुरूष-आरोपी (बहुतेकवेळा त्या स्त्रीला वेश्याव्यवसायात विकुन तिच्या कमाईवर जगणारा सख्खा भाऊ, वडील नाहीतर उकळतं तेल अंगावर "गंमत" म्हणून फेकणारा नवरा हेच आरोपी!) ह्यांच्यापैकी टोकाच्या पुरूषप्रधान अफगाणी संस्कृतीत नक्की दोषी कोण हा प्रश्न पडतो.
ऍला स्त्री-मुक्तीच्या क्षेत्रात एक आदराचं स्थान आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार(लग्नाच्या चौकटीत आणि चौकटीबाहेर) तिनं तिच्या इतर ७ पुस्तकांमधून मांडले आहेत. साहजिकच, ह्या पुस्तकामधेसुद्धा अफगाणी स्त्रिया आणि त्यांच्यावर नवरा, बाप, भाऊ यांच्याकडून नित्य केले जाणारे अत्याचार, स्त्रीयांचं अफगाणी समाजात असलेलं पायातल्या वाहणेपेक्षाही खालचं स्थान, वारंवार होणार्‍या बाळंतपणांमुळे स्त्रियांचं आजारांनी ग्रस्त असं हलाखीचं आयुष्य (फक्त ४६ वर्षे!) हे आपल्या पांढरपेशी मनाच्या आकलनापलिकडचं आहे. ज्या गोष्टी वाचणं कठीण असे अनुभव जवळून पाहून त्यांचं तटस्थपणे वर्णन करण हे अर्थात येर्‍यागबाळ्याचे काम नोहे.

पण हे पुस्तक म्हणजे स्त्रियांवरच्या अत्याचारांची ओळख ह्यावर थांबत नाही. तिसर्‍या "इन द स्कुलस्" ह्या भागात तिच्या शिक्षणाच्या स्वयंसेवी कामाचे अनुभव आले आहेत. त्या अनुभवांमधे तिच्या प्रौढ शिक्षक-शिक्षण वर्गात असलेल्या स्त्री-पुरुष अशा दोन्हीप्रकारच्या शिक्षक-विद्यार्थ्यांचं बारकाईने केलेलं स्वभावचित्रण येतं. पुढे ह्यातल्या पुरुष-शिक्षक आणि स्त्री-शिक्षकांनी त्यांच्या शिक्षणाचा(त्यांच्यापरीने) कसा उपयोग केला ह्याचा ऍनने केलेला पाठपुरावा आहे. स्वयंसेवी कामासाठी आर्थिक मदत मिळवताना तिला आलेले अनुभव म्हणजे आंतर्राष्ट्रीय स्वयंसेवी आणि बिना-सरकारी संस्था कशा काम करतात, त्यांना मिळणारी लाखो डॉलर्सची मदत कुठुन मिळते, त्या मदतीचा विनिमय कसा होतो हे सगळं ग्रास-रूट लेव्हलवरून केलेलं वर्णनच आहे.
शाळा चालवताना करझाई सरकारच्या न्याय,शिक्षण आणि संस्कृती मंत्रालयात घालावे लागलेले खेटे आणि तिथले अडेलतट्टु, अति-बुरसटलेल्या विचारांचे कारकून/सचिव इतकच काय तर उच्चपदस्थ स्त्री-न्यायाधिशसुद्धा आपल्याला "असं सुद्धा सरकार असतं?" हा विचार राहून राहुन करायला लावतात.

वाचकाला भाषिक सामर्थ्य आणि डोळे उघडवणार्‍या अनुभवांच्या जोरावर घट्ट पकडून ठेवणार्‍या ह्या पुस्तकामधे काही मनोरंजक आणि धमाल विनोदी प्रसंगदेखील आहेत. अफगाणिस्तानचा राष्ट्रीय खेळ असणार्‍या बुझकाशीच्या वर्णनामधून(आठवतो का रँबो-३?) उलगडुन दाखविलेली अफगाणी पुरुषाची मानसिकता ऍनने नर्म विनोदी अंगाने रेखाटली आहे.
या पुस्तकात, कुठेही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची घाई नाही. लेखिकेनं परिस्थितीचं बरचसं समतोल आणि वस्तुनिष्ट वर्णन करत वाचकासमोर एक गुंतागुंतीचं आणि अनेक बारकावे असलेलं चित्र उभं केलं आहे. मी "बरचसं समतोल" अशासाठी म्हटलं,की ऍनचा डाव्या विचारसरणीचा मवाळ (डेमॉक्रॅटिक)स्वभाव स्पष्टपणे दिसतो. त्यात तिचे जॉर्ज बुश सारख्या कट्टर उजव्या आणि भांडवलशाही विचाराच्या सरकार वर ओढलेले ताशेरे (खुद्द बुशचा उल्लेख सुद्धा "कनिष्ट बुश"/बुश द लेसर असा उपहासात्मक येतो.) लपून राहत नाही. पण ह्या निमित्ताने अमेरिकेतले(किंवा एकुणच पाश्चिमात्य जगात), विशिष्ट राजकिय विचारसरणीची उघडपणे बाजु घेऊन भाष्य करणारे टिव्ही चॅनल्स, वृत्तपत्रे हे "व्यावसायिक पत्रकारितेचं", (भारतात सहसा न पाहायला मिळणारं) वेगळ जग समोर आणतात.

एकुण काय, हे पुस्तक वाचल्यानंतर "आजचा अफगाणी समाज" म्हणजे काय हे जाणवतंच पण त्याबरोबर एखाद्या कसबी विणकराने आपल्यासमोर अनेक बारकाव्यांचं चित्रण करणारा गालिचा झरझर विणून दाखवावा आणि आपण थक्क होऊन पाहत राहावं असं वाटत राहतं.


पुस्तकाचे नावः काबूल इन विंटर
लेखिका: ऍन जोन्स.
प्रकाशकः पिकॅडॉर प्रकाशन, न्युयॉर्क
पृष्ठे: ३२१
किंमतः १४$

टीपः चांगल्या पुस्तकाचा आस्वाद घ्यायला भाषेची आडकाठी येत नाही असं म्हणतात. हे पुस्तक मुळ इंग्रजीतून आहे. माझ्या माहितीप्रमाणे मराठी अनुवाद अजुनतरी उपलब्ध नाहीये.

साहित्यिकसमीक्षा

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

8 Mar 2009 - 2:52 pm | भडकमकर मास्तर

पुस्तक परीचय आवडला...
.... नुसत्याच अत्याचाराच्या कहाण्या नाहीत तर शेवटच्या प्रकरणात विकासकामाबद्दलही उल्लेख आहेत, हे वाचून बरे वाटले.....
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

8 Mar 2009 - 4:31 pm | प्रकाश घाटपांडे

विंजिनेर सायेब परिचय लई भन्नाट
आता पुस्तक विंग्रजीतून असल्यावर आमच्याच्याने वाचने व्हनार नाई. ते म्हेता वाले करतीनच की म-हाटीत. सद्या परिचयावर समादान मानतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अवलिया's picture

8 Mar 2009 - 6:52 pm | अवलिया

सोला आनं बराबर!!
म्या बी ह्येच बोल्तो...

(म-हाटी) अवलिया

मुक्तसुनीत's picture

9 Mar 2009 - 7:51 am | मुक्तसुनीत

पुस्तकपरिचय आवडला.
अफगाणिस्तानासारख्या ठिकाणाबद्दल विचार आला की तिथल्या एकंदर मध्ययुगीन व्यवस्थेबद्द्लचे चित्र दिसू लागते. पुस्तकातले वर्णन कल्पनेशी बर्‍यापैकी मेळ खाणारे दिसते. अशा ठिकाणी , अशा व्यवस्थेमधे काम करणार्‍या संस्था, लोक यांच्यासमोरच्या आव्हानांच्या राक्षसी , भीषण स्वरूपाची कल्पना करवत नाही. अफगाणिस्तानावरची मी आजतागायत वाचलेली पुस्तके म्हणजे "अफगाण डायरी" , खलिद होसेनी यांची "काईट रनर" कादंबरी , "मीना" या , स्त्रीमुक्तीची अपेशी झुंज देणार्‍या बाईची कहाणी . आता या पुस्तकाची भर यादीत पडेल.

मात्र , एकंदर तिथल्या स्त्रिया, मुले यांना ज्याप्रकारच्या वातावरणातून जावे लागते ते सगळे अंगावर शहारे आणणारे आहे. मुख्य म्हणजे , दिङमूढ करणारे : येथल्या भीषण रात्रीचा अंत कधी होणारे की नाही ?

दशानन's picture

9 Mar 2009 - 9:16 am | दशानन

सुंदर परिक्षण !!!

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

लिखाळ's picture

9 Mar 2009 - 8:31 pm | लिखाळ

फार छान शब्दांत पुस्तकाची ओळख करुन दिलीत.
-- लिखाळ.