पुस्तक परिचय- नर्मदे हरं हरं (जगन्नाथ कुंटे)

चाणक्य's picture
चाणक्य in जनातलं, मनातलं
8 Mar 2009 - 11:31 am

नुकतंच जगन्नाथ कुंटे यांचं 'नर्मदे हरं हरं' हे पुस्तक वाचलं. भन्नाट आहे. नर्मदा परिक्रमा करताना लेखकाला आलेल्या अनुभवांवर त्यांनी हे पुस्तक लिहीले आहे. जगन्नाथ कुंटे यांनी १९९९ पासून नर्मदा परिक्रमा करायला सुरुवात केली. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, "सद्गुरुंची आज्ञा झाली आणि निघालो. "जगन्नाथ कुंटे म्हणलं तर एक सामान्य माणूस, म्हणलं तर एक अवलिया. सिगरेट आणि चहा ही विशेष आवड. देव देव करीत बसत नाहीत, पण अध्यात्मात गती फार. त्यांनी एकूण ४ परिक्रमा केल्या आहेत, त्यापैकी पहिल्या ३ परिक्रमांदरम्यान आलेले अनुभव त्यांनी या पुस्तकात लिहीले आहेत.

भारतामधे वर्षानुवर्षे लोक नर्मदा परिक्रमा करत आहेत. ज्यांना नर्मदा परिक्रमा म्हणजे काय माहिती नाही त्यांच्यासाठी: नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला पूर्ण प्रदक्षिणा घालणे. मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथून ही प्रदक्षिणा सुरू होते. प्रदक्षिणेचा मार्ग मध्य प्रदेश व गुजरात या राज्यातुन जातो. ही प्रदक्षिणा पुर्णपणे चालत करायची असते. वाटेत शूलपाणीश्वर नावाचे भयानक जंगल लागते. या जंगलात भिल्ल जमातीचे लोक राहतात आणि हे भिल्ल जंगलातून येणार्‍या जाणार्‍या लोकांना लुटतात. गम्मत म्हणजे या भिल्लांना 'मामा' म्हणतात. मामा का तर म्हणे हे नर्मदा माई चे भाऊ म्हणून. आणि परिक्रमावासी यांच्याकडून खूषीने लुटून घेतात. भौतिक वस्तूंमधला तुमचा लोभ सुटावा या (सद्)हेतूने हे मामा तुम्हाला लुटत असतात. अंगावरची लंगोटी सोडली तर हे मामा तुमच्या जवळचं सगळं लुटुन नेतात. आणि त्यांनी लुटल्यावर अन्नपाणी मिळण्यासाठी गाव जवळपास ३ दिवस चालल्यावर लागतं. असं म्हणतात की एखादा परिक्रमावासी जर या जंगलात अडचणीत सापडला तर 'अश्वत्थामा' स्वतः येउन त्याला मदत करतो. अनेक लोकांना हा अनुभव आला आहे. लेखकाला अश्वत्थाम्याने तिसर्‍या परिक्रमेच्या वेळी दर्शन दिले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पुस्तकात हा अनुभव दिला आहेच. हे जंगल म्हणजे अश्वत्थाम्याचा प्रदेश म्हणून ओळखलं जाते. ईतरही अनेक अद्भुत अनुभव लेखकाने पुस्तकात लिहीले आहेत.

हि प्रदक्षिणा करताना बरेच लोक मधून अधून वाहनाची मदतही घेतात. पण मग त्याला परिक्रमा म्हणत नाहीत. ते भ्रमण. भ्रमण करणारे शूलपाणीश्वराच्या जंगलातून जात नाहीत. ख्ररा परिक्रमावासी पूर्ण प्रदक्षिणा पायीच करतो. या प्रदक्षिणे ला अंदाजे ४-५ महिने वेळ लागत असावा कारण काही लोकांनी कमीत कमी १०८ दिवसांत प्रदक्षिण पूर्ण केल्या आहेत (जे सामान्य माणसाला जवळपास अशक्य आहे). बरोबर फक्त कपड्यांचा एक जोड घ्यायचा. अन्न वाटेत लागणार्‍या गावांत भिक्षा मागुन मिळवायचं. काही ठिकाणी लोक देतात, काही ठिकाणी हेटाळणीही करतात. नर्मदा माई परिक्रवासींना उपाशी पोटी ठेवत नाही असं म्हणतात. आणि जरी उपाशी जरी ठेवलं तरी भुकेची जाणीव होऊ देत नाही. लेखकाला हा अनुभव बर्‍याच वेळेला आल्याचं त्यांनी लिहीले आहे.
परिक्रमे च्यावाटेवर बरीच आदिवासी वस्ती आहे. ह्या आदिवासींचं जीवन, मध्य प्रदेश सरकारकडून त्यांची होणारी पिळवणूक, अपरीमित जंगलतोड, ढोंगी साधुंकडून समाजाची फसवणूक यावर लेखकाने सडेतोड लिहीले आहे. पुस्तक वाचायला घेतल्यावर जाणवलं की जी लोकं साधना करतात (म्हणजे देव देव नाही), अश्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शन पर आहेच, पण ईतरांनाही एक प्रवासवर्णन म्हणून वाचण्यास काहीच हरकत नाही.

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

8 Mar 2009 - 12:17 pm | छोटा डॉन

अत्यंत नितांत सुंदर असेहे पुस्तक आहे.
संपुर्ण प्रवासवर्णन आनि लेखकाचे वैयक्तीक अनुभव असुनसुद्धा पुस्तक जरासुद्धा कंटाळवाणे होते नाही ...

कुंट्याबरोबर यात्रा करणारे सर्वजण पन्नाशीच्या पुढचे असुन त्यांनी ज्या उत्साहाने व आंतरीक जोशाने यात्रा केली ते वाचुन खरोखर माणसाचे इच्छाशक्तीच्या सामर्थ्याचे महत्व पटते. सर्वांनी जरुर "वाचावेच" असे हे पुस्तक आहे.

चाणक्यांनी ह्या जबरदस्त ताकदीच्या पुस्तकांचे तेवढ्याच ताकदीने सार सांगितले आहे.
खुपच सुंदर ...

" नर्मदे हर ऽऽऽऽ ...!!!"

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

अवलिया's picture

8 Mar 2009 - 12:26 pm | अवलिया

अतिशय सुंदर पुस्तक आहे. एकदा जरुर वाचण्यालायक.
अनेक जणांनी यात्रा केल्यावर केलेले वर्णन, ही यात्रा नक्की करायचीच अशा इच्छेला खतपाणी देते.

नर्मदा मातेची इच्छा असेल तर जरुर होईल... नाहीतर पुढले जन्म आहेतच..
पापाच्या राशी इतक्या आहेत की मोक्ष या जन्मी मिळणारच नाही हे नक्की आहे.

" नर्मदे हर ऽऽऽऽ ...!!!"

--अवलिया

मुक्तसुनीत's picture

8 Mar 2009 - 12:34 pm | मुक्तसुनीत

चांगला परिचय. पुस्तक अतिशय रंजक आहे यात शंका नाही. थोडे अधिक विस्ताराने नंतर लिहितो.

एक (काहीशी अपरिचित ) बाब : जगन्नाथ कुंटे म्हणजे पुण्यातले युवा संवादिनी-वादक चैतन्य कुंटे आणि प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ आणि या विषयावरील मराठी पुस्तकांचे लेखक कृष्णमेघ कुंटे यांचे वडील होत.

विंजिनेर's picture

8 Mar 2009 - 1:25 pm | विंजिनेर

हे पुस्तक मी सलग वाचून काढलेलं आठवतंय.
त्या पुस्तकातला स्वतःला झोकून देणारा टोकाचा भक्तिभाव, त्यासाठी सोसायला लागलेले पराकोटीचे शारिरीक हाल हे थक्क करतं.
ह्या आधी गोनीदांच "भ्रमणगाथा" वाचलं होतं त्यामुळे नर्मदा-परिक्रमा आणि तिचा मार्ग हा थोडासा परिचित होता. पण कादंबरीच्या अंगाने जाणार्‍या भ्रमणगाथेची तुलना ह्याच्याशी करण गैर आहे.
मला कुंट्यांचे अनुभव आणि विचार वाचून भारावुन जायला झालं. पण ते विचार पटले मात्र नाहित. शास्त्रीय कसोट्यांवर घासून न घेता येणारे आकलनापलिकडचे अनुभव खटकतात. असो. मी केवळ एक अति-सामान्य पांढरपेशा माणुस. कुंटे आणि त्यांचे अनुभव हे माझ्या आकलनापलिकडचं सुद्धा असु शकेल. तेव्हा त्यावर भाष्य मी कोण करणार..
पण त्यापेक्षाही मला जो सात्विक संताप आला तो त्यांचा संसार संभाळणार्‍या बायकोच्या होणारी फरफट पाहून(त्यांच्याच पुस्तकातल्या वर्णनाच्या आधाराने).
माझ्या मते ज्या माणसाला असे अनुभव घ्यायचे आहेत आणि परमार्थी मार्गाने जायचे आहे त्याने गृहस्थाश्रमाची जबाबदारी स्विकारावी कशाला? केवळ विषयसुख म्हणून का आणखी काही? जो माणुस अश्वथाम्याच्या दर्शनासाठी तळमळतो त्याला त्या माउलीची जिला अर्थाजन न करणारा, फकिरी वृत्तीचा नवरा आहे तिची रोजच्या जबाबदार्‍यांचा सामना करणं किती कठीण होतं हा थोडा सुद्धा विचार करता येत नाही? बरं, पत्नी एकटी नाही. पदरात मुलं. त्यांची शिक्षणं, आजारपणं हे केवळ दुसर्‍याच्या "भिकेवर" निभावून नेणं हे काही सोपे नाही आणि कुंट्यानी जसं बेफिकीरपणे हसण्यावारी नेलं आहे तसं तर नक्कीच नाही.

केदार_जपान's picture

9 Mar 2009 - 9:18 am | केदार_जपान

माझ्या मते ज्या माणसाला असे अनुभव घ्यायचे आहेत आणि परमार्थी मार्गाने जायचे आहे त्याने गृहस्थाश्रमाची जबाबदारी स्विकारावी कशाला?>>>

एकदम बरोबर बोल्लात आपण!!...खरे आहे..लोकांचा परमार्थ होतो..मात्र घरच्या लोकांची मात्र विनाकारण फरफट होते.. :(
अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात...

-------------
केदार जोशी

सागर's picture

8 Mar 2009 - 4:43 pm | सागर

ह्याच पुस्तकावर मागे एकदा चर्चा झाली होती...
प्रसाद दाढेंनी सुरु केला होता हा धागा : http://www.misalpav.com/node/682

कदाचित यातून नव्याने वाचणार्‍यांना माहिती मिळू शकेन.

बाकी पुस्तक सुंदरच... एकदम सहमत

- सागर

मुत्सद्दि's picture

8 Mar 2009 - 8:27 pm | मुत्सद्दि

कोठल्याहि नवीन वाचकाला "नर्मदा परिक्रमा" हा विषयच मुळी भुलवून टाकणारा आहे.
नर्मदा परिक्रमेवर आधारीत माझ्या माहिती प्रमाणे ३ वेगवेगळी पुस्तके आहेत.
फारपुर्वी गो.नी.दांडेकरांच्या "स्मरणगाथा" ह्या आत्मपरिचयपर कादंबरीत ह्या परिक्रमेचा उल्लेख आहे.
अलिकडच्या काळात जगन्नाथ कुंटे ह्यांचे "नर्मदे हरं हरं " आणि सुहास लिमये ह्यांचे हर नर्मदे|नर्मदे हर नावाचे पुस्तक
बाजारात उपलब्ध आहे.
दोन्ही पुस्तके जरी एकाच धाटणीची असली तरि सुहास लिमये ह्यांचे पुस्तक जास्त उजवे व सरस आहे.
कुंटे ह्यांच्या पुस्तकात फक्त "चहा व सिगरेट पिली "एवढेच सतत वाचावयास मिळते.

मुत्सद्दि.

विनायक पाचलग's picture

8 Mar 2009 - 10:27 pm | विनायक पाचलग

अवघ्या काही दीवसापुर्वी गोनीदांच्या कन्या वीणा देव यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आल्या
त्यात त्यानी सर्वप्रथम गोनीदानी नर्मदा परिक्रमा लिहिल्याचे सांगीतले ते खरे आहे का
खुपशा लेखकानी ते वाचुन पुन्हा परिक्रमा केली व पुस्तकातदेखील तसा उल्लेख केला हे योग्य आहे का
क्रुपया माहिती द्यावी
बाकी हे पुस्तक नक्की वाचीन
सध्या खुप चर्चेत आहे
बाकी परिक्ष्ण उत्तम

छानसे वाचलेले

विनायक पाचलग

प्राजु's picture

8 Mar 2009 - 10:34 pm | प्राजु

सहज जमलं आणि सहज मिळालं नक्की वाचेन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चाणक्य's picture

11 Mar 2009 - 9:26 am | चाणक्य

मला कुंट्यांचे अनुभव आणि विचार वाचून भारावुन जायला झालं. पण ते विचार पटले मात्र नाहित. शास्त्रीय कसोट्यांवर घासून न घेता येणारे आकलनापलिकडचे अनुभव खटकतात. असो. मी केवळ एक अति-सामान्य पांढरपेशा माणुस. कुंटे आणि त्यांचे अनुभव हे माझ्या आकलनापलिकडचं सुद्धा असु शकेल. तेव्हा त्यावर भाष्य मी कोण करणार..
पण त्यापेक्षाही मला जो सात्विक संताप आला तो त्यांचा संसार संभाळणार्‍या बायकोच्या होणारी फरफट पाहून(त्यांच्याच पुस्तकातल्या वर्णनाच्या आधाराने).

विंजीनेरसाहेब, माझही काहिसं असंच झालं पुस्तक वाचून. मला कुंट्यांचे साधने बद्दल चे काही विचार पटले पण एखादा माणूस लग्न वगैरे झाल्यावर ईतक्या बेफिकीरीने कसा काय जगू शकतो हेच मला समजेना. बराच विचार केला (उगीचंच). ईतर लोक लाख मदत करतील हो, पण आपण काहीही न करता, त्यांच्या जीवावर जगतोय ही जाणीव माणसाला स्वस्थ कशीकाय बसू देते? काहीकाही माणसं वेगळ्याच मुशीतून आलेली असतात वाटतं. माझ्यातरी बुद्धीपलीकडचे आहे हे.

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Mar 2009 - 11:36 am | llपुण्याचे पेशवेll

बराच विचार केला (उगीचंच). ईतर लोक लाख मदत करतील हो, पण आपण काहीही न करता, त्यांच्या जीवावर जगतोय ही जाणीव माणसाला स्वस्थ कशीकाय बसू देते? काहीकाही माणसं वेगळ्याच मुशीतून आलेली असतात वाटतं. माझ्यातरी बुद्धीपलीकडचे आहे हे.

खरे आहे. बीडकर महाराजांचे चरित्र वाचले की माझे देखील असेच होते.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विसोबा खेचर's picture

13 Mar 2009 - 8:53 am | विसोबा खेचर

सुंदर परिचय. हे पुस्तक आम्ही नक्की वाचणार!

तात्या.

पद्मश्री चित्रे's picture

13 Mar 2009 - 9:46 am | पद्मश्री चित्रे

या पुस्तकाचाच परिचय लिहायला घेतला होता , मि पा वर देण्यासाठी. असो.. आता बेत बदलला.. बाकी पुस्तक खरच छान आहे.. त्यांची इतर पुस्तके- नित्य निरंजन वगैरे पण छान आहेत..
मला त्यांच्याइतकच त्यांच्या पत्नीच पण कौतुक वाटतं...