केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरीडा

अजय भागवत's picture
अजय भागवत in जनातलं, मनातलं
7 Mar 2009 - 5:58 pm

मागील वर्षी ह्याच काळात फ्लोरीडाला एका संमेलनाला जायचा योग आला होता. फ्लोरीडा ह्याभूभागाचे वैशिष्ठ्य म्हणजे, भारताच्या अक्षांश/रेखांशाच्या अगदी मागच्या बाजूला तो येतो. फ्लोरीडाला उतरतांना तेथील मुख्य भूभागापासून विलग झालेली एका पट्टीसारखी भूरचना दिसते. ही खूप लांबलचक पट्टी असुन ती तुम्हाला अमेरिकेच्या नकाशावर ठळकपणे दिसेल.
From Florida

फ्लोरीडात बघण्यासारखे खूप आहे. पण सर्वात जास्त थरार आहे तो केनेडी स्पेस सेंटर बघण्यात. केनेडी स्पेस सेंटर एका बेटावर (साधारण पुणे शहराएवढे) आहे व आजुबाजूने प्रशांत महासागर आहे. समुद्रामुळे अनेक अवजड भाग तेथे समुद्र मार्गाने सोयीने आणता येतात. पण स्पेस सेंटर तेथेच करण्याचे खरे वैशिष्ठ्य म्हणजे स्पेस शटल, रॉकेट्ला अवकाशात योग्य मार्गाने व कमीतकमी तांत्रिक अडचणींने नेण्यासाठी पृथ्वीवरची सगळ्यात योग्य जागा विषुववृत्ताजवळची असते. (दुसरे उदा. श्रीहरीकोटा. ही माझी ऐकिव माहिती आहे, त्यात चुक असु शकेल). आणि हेच कारण त्याबेटाला स्पेस सेंटर करण्यात महत्त्वाचे ठरले.

वेळ मिळताच केनेडी स्पेस सेंटरला भेट दिली. एक पुर्ण दिवस लागतो सर्व बघायला. फ्लोरीडा स्पेस स्टेशनची वेबसाइट आहे त्याठिकाणी तुम्हाला जाण्यायेण्याची सोय, वेळा, तिकीट, सुविधा, इ. सगळी माहीती मिळतेच. पर्यटन बिझनेस अत्यंत शिस्तबध्द कसा करावा हे ह्याच लोकांकडून शिकावे. आणि ह्याठिकाणी तर साक्षात केनेडी स्पेस सेंटर असल्यामुळे सर्व पर्यटक सुविधा/आखणी दहा घरे वरच. मी अजून स्पेस सेंटरच्या प्रदर्शनीय गोष्टींबद्दल बोलतच नाहीये- त्या सर्व सुविधा तेथे जाउनच पहायला पाहीजेत.

माझ्याकडे भरपूर वेळ होता त्यामुळे मी सगळ्यात मोठी टूअर घेतली. त्याचेच हे धावते वर्णन.
टूअरचे स्वरुप: प्रथम बसने सर्व लॉंचींग पॅड, रॉकेट असेंब्ली स्टेशन, अंतराळवीर जिथून प्रसारमाध्यमांना फोटो देतात ती पारंपारीक जागा (नील आर्मस्ट्रॉंगनेही इथूनच फोटो दिला), छोटे-मोठे कारखाने, व इतर काही महत्वाची ठिकाणे दाखवत आपल्याला त्यांच्या एका अद्भूत अशा ठिकाणी आणुन सोडतात. तेथे आपण आपल्याला हवा तेवढा वेळ घालवू शकतो. ह्यासगळ्याचे वर्णन पुढे दिले आहेच.

गाइड आपल्याला आवर्जून सतत सांगत राहतो ते म्हणजे त्यांनी घातलेला निसर्ग आणि विज्ञान ह्याच्या मिलाफाबद्दल. त्या बेटावर त्यांनी वन्यप्राणीजीवन व निसर्ग जसे पुर्वापार होते तसेच ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. आपल्याला तेथे सुसरी, मोठाले गरुड सहज दिसतात. गाइडच्या सांगण्यावरुन तेथे सापही खूप आहेत.

हे सगळे ऐकता ऐकता गाइड आपल्याला एक एक छोटी छोटी लॉंचींग पॅड दाखवतो. बेटावर अनेक छोटी लॉंचींग पॅड आहेत. त्यांचा वापर अर्थातच छोट्या रॉकेट साठी करतात. अनेक ठिकाणी लोकांना छोट्याशा स्टेडियम सारखी रचना करुन बसुन यान आकाशात झेपावतांना बघण्याची सोय केली आहे. जेव्हा स्पेस शटल झेपावणार असते त्यादिवशी हजारो लोक मुलांसकट तेथे येउन मुक्काम करतात. यानाला काही कारणासाठी उशीर झाला तर थांबावे लागेल म्हणुन सगळी तयारी करुन येतात कारण बेटावर हॉटेलची सोय नाही.

हे पाहिल्यानंतर आपण जातो ते व्हेइकल असेंब्ली बिल्डींग पहायला.
From Florida

येथेच स्पेस शटल, ई. ची असेम्ब्ली होते व रॉकेट + स्पेस शटल उभे जोडले जाऊन, एका प्रचंड मोठ्या खास वाहनावरुन (क्रॉउलर ट्रांन्सपोर्टर) लॉंचींग पॅडकडे नेतात. हे आपण सगळ्यांनी फोटोत पाहीले असेलच. व्हेइकल असेंब्ली बिल्डींग खूप प्रचंड आहे, उंच आहे. रॉकेट + स्पेस शटलचे वजन हजारो ट्न असल्यांमुळे, ज्यारस्त्याने ते क्रॉउलर ट्रांन्सपोर्टरने नेतात तो अतिशत उच्च तंत्राने बनवला आहे. वाळु व इतर काही साधनांचे एक-एक थर देउन शेवटी गारगोट्यासारखे दगड अंथरलेले आहेत. त्यावरुन रणगाड्यासारख्या पटेरी चाकांच्या क्रॉउलर ट्रांन्सपोर्टरवरुन अत्यंत धीम्या गतिने रॉकेट + स्पेस शटल नेतात. ह्यावेळेस त्यात इंधन भरलेले नसते.

६ किमी प्रवास करुन ते रॉकेट + स्पेस शटल लॉंचींग पॅडकडे ८ तासात पोहोचते. लॉंचींग पॅडपाशी खूप मोठा रॅम्प आहे. त्यावरुन शेवटी ते जागेवर जाते. लॉंचींग पॅड पाहून धडकी भरते इतके ते उंच, अक्राळविक्राळ आहे. "लॉंच पॅड ३९" येथूनच पहिले यान चंद्रावर गेले. ते पाहताच आपण अंतर्मुख होतो. लॉंचींग पॅडच्या आजुबाजूला मोकळी जमीन आहे. लॉंचींगच्यावेळी सगळ्यांना एका ठराविक अंतरापर्यंतच जाता येते. यान एकदा लॉंचींग पॅडवर उभे झाले की, सगळ्या चाचण्या घेण्यास सुरुवात होते. सगळ्यात शेवटी ईंधन भरतात. ते भरण्यासाठी हजारो लिटरचे प्राणवायु व हायड्रोजनच्या टाक्या प्रत्येकी एका बाजुला आहेत. यानासाठी लागणारे हजारो घनलिटर (घनरूप) इंधन अत्यंत वेगाने कमीतकमी वेळात भरण्यासाठी शक्तीमान पंप आहेत. ते काही सेकंदात दोन्ही इंधन भरतात. उलट्मोजणी सुरु होताच एका क्षणी, अंतराळवीर त्यात बसतात. शुन्य सेकंदाला जेव्हा इंधन स्फोट होतो त्यावेळेस जो आवाज निर्माण होतो तो इतका मोठा असतो की, तो सगळ्यात जास्त ताकदीचा मानवनिर्मीत आवाज ठरतो. तो आवाज अतिशय उच्च वेगाच्या लहरी निर्माण करतो. त्या लहरींचा यानावरच आणि लॉंचींग पॅडवर दुष्परिणाम होउ नये म्हणून, याना्च्या व लॉंचींग पॅडच्या आजुबाजूने प्रचंड वेगाने पाण्याचा मारा करावा लागतो. ज्यामुळे त्यालहरी पाण्याने निस्ताकद होतात. दुसरी अडचण असते ती ज्वाळांना बाहेर पडतांना वाट करुन देण्याची. ह्यासाठी यानाच्या खाली लॉंचींग पॅडला एक भुयारी मार्ग असुन त्यातुन त्या आपल्याला बाहेर आलेल्या दिसतात.
प्रचंड वेगाने येणाऱ्या ज्वाळा, आवाज ह्यामुळे तेथे जमीन भुकंपसदृश थरथरते. ती थरथर इतकी जास्त असते की, त्यामुळे बेटावरील वन्यप्राणी सैरावैरा पळतात, साप बाहेर येतात.

हे सगळे वर्णन एकल्यानंतर व तेथील वातावरणामुळे आपण आधीच भारलेले असतो तेव्हा आपल्यालाही काहीतरी चांगली कामगिरी करायची इच्छा होते.

त्यानंतर बस जाते ती दुसऱ्या लॉंचींग पॅडकडे. नशीबाने मी जेव्हा गेलो तेव्हा तेथे रॉकेट + स्पेस शटल उभे होते व काही दिवसांनंतर ते आकाशात झेपावणार होते. त्यामुळे बऱ्यापैकी जवळुन त्याचे दर्शन घेता आले. आजपर्यंत टिव्हीवर पाहीलेले हेच ते केसरी रंगाचे यान! सगळे पर्यटक ते यान पहाताच आनंदाने चित्कारतात. एक वेगळ्याच उत्साहाने सगळे भराभर फोटो काढतात, एक अद्वितीय आनंदाचा क्षण असतो तो. आपण ते यान प्रत्यक्ष पाहतोय ह्याचा आपला विश्वासच बसत नाही.

From Florida

हे पाहिल्यानंतर आपण मंत्रमुग्ध होवुन परतीला निघतो. आता ते आपल्याला म्युझियम मधे नेतात. इतके सगळे पाहिल्यानंतर आता काय राहिले अशी आपली समजूत झालेली असते आणि आपल्याला एकामागोमाग धक्के बसायला सुरुवात होते. अंतर्मुख आणि मंत्रमुग्ध झालेलेच असतो, त्यात भर पडते ह्या धक्क्यांची आणि आपण थक्क होतो. हे मानवाचेच काम ना?- असा प्रश्न पडायला सुरुवात होते.

येथून आपल्याला नेतात ते स्पेस शटल पृथ्वीवर परतल्यावर ज्याठिकाणी उतरते ती धावपट्टी बघायला. स्पेस शटलचा उतरतांना वेग खूप प्रचंड असतो त्यामुळे धावपट्टीची लांबी विमानांना लागण्याऱ्या धावपट्टीपेक्षा जास्त आहे. तुम्ही पाहीले असेलच की स्पेस शटल एकीकडून दुसरीकडे नेतांना एका ७४७ बोईंग प्रवासी विमानाच्या वर बसवून नेतात. त्यासाठी एक असेंब्ली स्टेशन येथे आहे.

ह्यानंतर आपली बस टुअर संपते व आपल्य़ाला वेगवेगळी दालने पाहण्यासाठी एका ठिकाणी आणून सोडतात.

एका दालनात पहिल्या चंद्रस्वारीला जे जे काही वापरले त्या वस्तू, ज्यागाडीतुन नील व इतर अंतराळवीर बसुन यानापर्यंत गेले तेच वाहन, चंद्रावरचा एक दगड- ज्याला आपल्याला हात लावता येतो, अंतराळवीरांचा स्यूट ठेवलेले आहेत. पहील्या चंद्र मोहिमेनंतर ज्या यशस्वी मोहिमा झाल्या, त्यात त्यांनी एक बग्गी नेली होती तीची सहीसही प्रतिकृति तेथे आहे. पहिल्या यशस्वी चांद्रवारीच्या अपोलो स्पेस शिप आणि रॉकेट्ची पुर्ण प्रतिकृती इथे मांडली आहे! सगळे भाग सहीच्यासही. अंतराळवीर एका कुपीमधे आधी बसले, नंतर त्यातुन ते एका यानात बसले आणि ते यान चंद्रावर उतरले. रॉकेट व यान वेगवेगळे सुटे करुन मांडले आहेत. सगळ्यात मोठ्या रॉकेट्चा घेर २० मीटर असावा व संपुर्ण लांबी १२५ मीटर असावी. हे पाहून आपल्या तोंडातून शब्द फुटत नाहीत. खाण्यापिण्याची शुद्ध राहत नाही.
From Florida

From Florida

From Florida

From Florida

From Florida

From Florida

From Florida

थक्क्यातुन (धक्क्यातुन नव्हे) सावरल्यावर तुम्हाला जाणीव होते ती तहानेची. पाणी आणि कॉफीने आपण ताजेतवाने होतो व अजुन एका दालनात जायला तयार होतो.

हे दालन म्हणजे एक थिएटर आहे. बसायला खूर्च्या आहेत. ह्यादालनात शिरताच आपल्याला दिसतात ते जमीनीवरच्या नियंत्रण कक्षाचे. जो समोर दिसतो तो आहे पहिल्या चंद्रवारीचा नियंत्रण कक्ष. तीच IBM मशिनं, त्याच खूर्च्या, त्यावेळेच्या तंत्रद्न्यांचे ओव्हरकोटही तेच तसेच खूर्चीच्या पाठीवर टांगून ठेवले आहेत. सगळे थिएटरमधे बसल्यानंतर नासाचा एक कर्मचारी येतो व आपल्याला माहीती द्यायला सुरुवात करतो. सुरेख ध्वनी-प्रकाशयोजना करत माहिती दिली जाते. चंद्रावर नील/इतर उतरतांना मोहीम अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेली असतांना नियंत्रण कक्षात जे घडत होते, त्याचे रेकॉर्डींग आपल्याला ऐकू येते. समोर व्हिडीओवर त्यांनी जे पाहिले तेच आपण पाहत असतो. प्रकाशाचे झोत ठराविक खूर्चीवर टाकत तेथील तंत्रज्ञ त्यावेळेस जे बोलला तेच आपण ऐकतो. तेथला त्यावेळेचा उत्साह, हुरहूर आपण अनुभवू शकतो. चांद्रयान चंद्रावर पोहोचते व सगळे आनंदाने गलका करतात. नंतर एक भीषण शांतता...आणि मग नील बाहेर येतांना दिसतो, तो हळुहळू खाली उतरुन त्याचे पहिले पाउल चंद्रावर पडताच त्याने जे वाक्य उच्चारले ते आपण ऐकतो.. बरेच प्रक्षक/पर्यट्क ह्याक्षणी भावनांना वाट मोकळी करुन देतात व त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू घळाघळा ओघळतात.

ह्यानंतर सगळा सेट फिरतो व आपल्यासमोर येतो एक भन्नाट सेट. चंद्रावर जर तुम्ही त्यावेळेस उभे असता आणि जर त्रयस्थपणे चांद्रयान उतरतांना पाहत असता तर कसे दिसले असते तसे दिसते. नीकाळसर प्रकाश, समोर पृथ्वीचा गोळा आकाशात अतिशय सुंदर दिसतो. चांद्रयानाची पुर्ण प्रतिकृती वरुन खाली येते ती ज्या वेगाने चंद्रावर उतरली तोच वेग, तेच आवाज. मग दरवाजतून नील बाहेर येतो.... सगळेच अप्रतिम. ह्यावेळेस आपली मानसिक अवस्था आनंदाने भरलेल्या रांजणासारखी झालेली असते.

नंतर आपण जातो ते अशा एका दालनात की जेथे आपल्याला अनुभवायला मिळतो असा एक प्रसंग की त्याने आपण एका वेगळ्या विश्वात प्रवेश करतो. येथे आपण एका प्रेक्षकाच्या भुमिकेत शिरतो व हा प्रेक्षक उभा असतो तो लॉंचींग पॅडजवळ. त्याला काय अनुभव येतील, आवाज कसा असेल, जमीन कशी थरथरेल, इ गोष्टींची जाणीव होते. हा शो संपला की, आपण त्याच दालनाच्या दुसऱ्याभागात जातो ते असा अनुभव घ्यायला की जो कुपीत बसलेल्या अंतराळवीरांना यान शून्य सेकंदापासून झेपावतांना व पृथ्वीच्या वातावरणातून बाहेर पडेपर्यंत येइल. आपल्याला एका कुपीसदृश खोलीत नेतात. तेथे नेमकी तीच रचना आहे. अंतराळवीरांच्या खूर्च्या त्याच. त्यावर आपण बसतो, आपल्याला सीटबेल्ट घालायला सांगतात. दार बंद होते व उलट्मोजणी ऐकू येते. मग एक जोरदार धक्का बसतो, प्रचंड आवाज येतो, थरथर होते, आपली खुर्ची आणि प्लॅटफॉर्मसुद्धा त्यायानाच्या धक्क्यांनी हलत असतो व ग्रॅव्हीटीप्रमाणे तिरका/सरळ होतो. हे सगळे असेच चालू राहते. मग पहिल्या रॉकेटच्या निसटण्याच्या वेळेचा अनुभव मिळतो, एक धक्का बसतो. थोडी थरथर कमी होते. मग आपण अंतराळात प्रवेश करतो आणि अचानक आवाज, थरथर बंद होते. आपण अगदी शांत असा प्रवास करु लागतो व हा शो संपतो. आतापर्यंत आपण पृथ्वीवासी राहिलेले नसतो व एकदम ऐटीत वागयला लागतो.

दालनातून बाहेर पडताच आपल्याला दिसते ती एक्सप्लोरर यानाची प्रतिकृति.

From Florida

त्यात आपण आत जाउन ते पुर्ण यान आतून कसे आहे हे पाहू शकतो. यानाचे नियंत्रणकक्ष, खाद्यपदार्थ, इ. सामान ठेवण्याची जागा, असे त्याचे विभाग बघायला मिळतात.

नंतरच्या दालनात रोबोच्या काही प्रतिकृति आहेत. चंद्रावर ते कसे काम करतील ह्याची कल्पना करुन त्यांचे नियंत्रण करुन काही शो दाखवतात. ते पट्पट पाहून होतात.

आतापर्यंत नासाने रॉकेट बनवतांना जी प्रगती केली ती पाहण्यासाठी एक मोकळ्या मैदानातील म्युझियम आहे व तेथे रॉकेट, इंजन ह्याच्या सहीसही प्रतिकृति ठेवल्या आहेत. त्याच ठिकाणी आणखी एक जबर्दस्त आकर्षण आहे. ते म्हणजे एक वॉकवे.

From Florida

ह्याच वॉकवेवरुन नील व इतर त्यांच्या कुपीत शिरले. आपणही त्यावरुन चालत जाउन एका कुपीच्या दाराशी येतो. त्यांना त्यावेळेस कसे वाटले असेल त्याचा अनुभव घ्यायला मिळतो.

पुढचे आकर्षण म्हणजे IMAX थिएटरमधे दाखवलेले चित्रपट. हे ही सगळे बघण्यासारखे आहेत.

ह्यानंतर आपण भेट्वस्तु घ्यायला, खाणेपिणे करायला मोकळे होतो. नासाच्या ह्या भागात मात्र चीनचे आक्रमण आहे व बहूतेक सगळ्या भेट्वस्तु चायनीज आहेत पण खूपच मोहक आहेत. किचेनी, नासातले फोटो, पुस्तके, अशा अनेक घेण्यासारख्या गोष्टी आहेत.

फोटो घेण्यासाठी काही खास जागा आहेत, त्याठिकाणी नासाने त्यांचे लोगो लावले आहेत व त्यामुळे आपल्याला तो फोटो पाहून "तेथे" जाउन आल्याचा आनंद मिळतो.

From Florida

[मी फार मोठ्या ताकदीचा लेखक नाही त्यामुळे चु. भु. दे. घे.]

देशांतरअनुभव

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

7 Mar 2009 - 6:08 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त सफर जादुई नगरीची :) खुप आवडला आपला लेख, माहिती आणी त्याला चित्रांची योग्य जोड.
एकदम मघई पानासारखा जमुन गेलाय लेख भागवत शेठ.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य

धमाल मुलगा's picture

7 Mar 2009 - 6:30 pm | धमाल मुलगा

लेख वाचुन काय आणि किती प्रतिक्रिया देऊ ह्याच विचारात होतो.
शॉर्ट ऍन्ड स्विट पध्दतीतली ही प्रतिक्रिया एकदम आवडून गेली. :)

अजयराव,
मस्त वर्णन. येऊ द्या अजुनही.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Mar 2009 - 6:33 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत!!! सुंदर लेख आणि छायचित्रं.

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

7 Mar 2009 - 8:42 pm | प्राजु

चित्रे पाहिली. लेख वर वर पाहिला आहे. निवांत वाचून प्रतिकिया देईन. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मॅन्ड्रेक's picture

7 Mar 2009 - 6:12 pm | मॅन्ड्रेक

खुप छान .अ प्र ति म

at and post : janadu.

बाकरवडी's picture

7 Mar 2009 - 6:19 pm | बाकरवडी

छान आहे

सहज's picture

7 Mar 2009 - 6:24 pm | सहज

विस्तृत लेख आवडला.

एखाद्या वृत्तपत्रात/ मासिकात नक्की छापुन यावा असा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Mar 2009 - 6:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>एखाद्या वृत्तपत्रात/ मासिकात नक्की छापुन यावा असा.
सहमत आहे !

अवलिया's picture

7 Mar 2009 - 6:28 pm | अवलिया

सहमत

--अवलिया

अजय भागवत's picture

7 Mar 2009 - 6:32 pm | अजय भागवत

मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रियांबद्दल आभारी. खूप बरे वाटले की तुम्हाला हा लेख आवडला.

आपलाभाउ's picture

7 Mar 2009 - 6:41 pm | आपलाभाउ

मला आग्दि तेथे जाउन आल्या सारखे वाटले...........................फार मस्त

टिउ's picture

7 Mar 2009 - 9:29 pm | टिउ

परत जाउन आल्यासारखं वाटलं. मी मागच्या वर्षी मे मधे गेलो होतो. तुम्ही फोटो टाकलाय तेच स्पेस शटल ४ दिवसांनी लाँच होणार होतं...

मी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तेथे गेलो होतो आणि ७ फेब्रु ला शटल जाणार होते. नंतर येथे आल्यावर त्याचे प्रक्षेपण पाहिले टि. व्ही. वर.

टिउ's picture

7 Mar 2009 - 9:40 pm | टिउ

अच्छा मग हे दुसरं असेल. फोटो आणी वर्णनावरुन मला तेच वाटलं....

प्राची's picture

7 Mar 2009 - 9:59 pm | प्राची

आपण खूपच छान,ओघवत्या भाषेत केनेडी स्पेस सेंटरची महिती दिली.
आम्हालाही स्पेस सेंटरची सफर घडवून आणलीत.
आपले मनापासून आभार..... :)

भागवत शेठ असेच लिहीत राहा..... =D>

अजय भागवत's picture

7 Mar 2009 - 10:17 pm | अजय भागवत

आभार.

प्राचीताई, मी एक साधा शिक्षक आहे; शेठ ही खूपच मोठी उपाधी झाली. उगीच धोतर-बितर नेसुन गल्ल्यावर बसल्यासारखे वाटते. :-)

फ्लोरीडाच्या टेक्निकल इंस्टीट्युटच्या एका प्रोफेसरांना भेटायला गेलो होतो व त्यांच्याबरोबरीच्या २० प्रो. समोर एक भाषण ठोकुन आलो.

प्राची's picture

7 Mar 2009 - 11:05 pm | प्राची

पहिल्या प्रतिसादात परांनी तुम्हाला शेठ म्हटले,म्हणून मास्तरांना चुकून धोतर-बितर नेसवून गल्ल्यावर बसवले. :/
त्याबद्द्ल गुरूजी देतील ती शिक्षा मान्य.
आपले असेच आणखी Lectures attend करायला आवडतील :)

भडकमकर मास्तर's picture

7 Mar 2009 - 10:36 pm | भडकमकर मास्तर

एकदम मस्त लेख ...
आवडला...
तुमच्याबरोबरच स्पेस सेंटरची सफर झाली ....
फोटोही छान...
अवांतर : चंद्रावरचा दगड अंमळ बारकाच वाटला...
चांगला मोठा धोंडा आणायचास ना रे नील...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अजय भागवत's picture

7 Mar 2009 - 11:20 pm | अजय भागवत

आभार.
त्या चंद्रावरच्या दगडाच्या चकतीला हात लावल्यावर अक्षरशः अंगावर शहारे येतात.

सुक्या's picture

8 Mar 2009 - 4:34 am | सुक्या

स्पेस सेंटरची सहल आवडली. फोटो तर एकदम झकास.
पर्यटन उद्योग कसा असावा हे इथे आल्यावर समजते. केनेडी स्पेस सेंटर तर खुप मोठी जागा झाली. एकदम छोट्या छोट्या जागांचे मर्केटिंग इतकं चांगलं करतात की खुप भव्य दिव्य वाटुन जातं. इथल्या बर्‍याच जागा भारतातल्या प्रेक्षणिय जागांच्या पुढे काहीच नाहीत. पण प्रसिध्दीच्या भपक्याखाली उगिचच भव्य दिव्य वाटतात.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

मुत्सद्दि's picture

8 Mar 2009 - 6:46 am | मुत्सद्दि

संग्रहि ठेवावा असा उत्तम लेख.
अभिनंदन.

मुत्सद्दि