अक्षराची किमया.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
1 Mar 2009 - 4:58 am

"माझं जेव्हा शब्दाबद्दलचं ज्ञान वाढत गेलं,तेव्हा माझा आत्मविश्वास आणि माझं धैर्य पण वाढत गेलं.त्यानंतर मी ठरवलं,की माझ्या बहिणी आणि माझे भाऊ ह्यांना पण सुशिक्षीत केलं पाहिजे.आणि ते सुद्धा त्यांना शिकायचं असेल तेव्हडं."

आमच्या लहानपणी एक गोपिकाबाई नांवाची बाई घरकामाला यायची.आमच्या राहत्या घरापासून जवळ जवळ चार मैलावर ती राहायची.रोज सकाळी आठ वाजता यायची ती संध्याकाळी काळोख होता होता निघून जायची.तिला दोन तिन मुली होत्या.त्यातली धाकटी चमेली तिच्याबरोबर नेहमीच असायची.ती जशी शाळेत शिकायच्या वयाची झाली तेव्हा तिला मी नेहमीच म्हणायचो,
" चमेली तू खूप शिक.शिकलीस का तुला जगायला मजा येणार.आणि तुझ्या आईसारखी कामं करावी लागणार नाहित."
पण त्यावेळच्या रीतिरिवाजाप्रमाणे तिचं लहानपणातच लग्न झालं.नवर्‍याच्या घरी गेल्यावर शिक्षण कसलं होणार?
माझा कानमंत्र तिने जपून ठेवला असं वाटतं.कारण आता बरेच वर्षानी ती भेटल्यावर मला तिला ओळखताच आलं नाही.अठरा एकोणीस वर्षावर ती प्रौढ शिक्षणाच्या वर्गात जाऊन चांगलं शिकली.मुलांना आणि भावंडानापण तिने शिकवलं.मला भेटल्यावर ती म्हणाली,
"मी तुमचे शब्द खोल मनात जपून ठेवले होते.आणि त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला."
मी तिला म्हणालो,
"चमेली तू मात्र मला आश्चर्य चकित केलंस.तू एव्हडं मनावर घेशील अशी मला त्यावेळी नव्हेतर आता सुद्धा अपेक्षीत नव्हतं. हे सर्व कसं काय झालं?"
त्यावर तिने मला असं सुनावलं की ऐकतच राहिलो.
चमेली म्हणाली,
"मी अक्षरावर विश्चास ठेवते.कारण जीवन बदलण्याचा त्या अक्षरात क्षमता असते.अक्षरात छपून राहिलीली क्षमता मला ज्यावेळी पहिल्याच दिवशी मी शाळेत गेले तेव्हांच लक्षात आलं.माझ्या नांवात असलेली अक्षरं काय आहेत ह्याचा मला पहिल्यांदा धडा माझ्या बाईने दिला.मला चमीली म्हणायचे पण खरा माझ्या नांवाचा उच्चार चमेली असा आहे."म" वर मात्रा आणि "म" ला काना-वेलांटीने काय पण फरक होतो.नांवाचा उच्चारच बदलू शकतो.
माझ्या मनात आलं,जर का मात्रा आणि वेलांटीने माझ्या नांवाचा उच्चार बद्लू शकतो तर मग सर्वच अक्षरं मी शिकले तर माझ्या आयुष्यात किती बदल होऊं शकेल?तो सबंध दिवस मी माझं नांव परत परत लिहिण्यात घालवला.नंतर मी अंकलपटी -बारिक बारिक कामं करीत असताना- घेऊन फिरायची.अगदी चांगलं लिहिता येई तो पर्यंत.लिहायला शिकण्यापूर्वी माझं जीवन अगदी त्या ओढ्यातल्या गतिहीन पाण्यासारखं होतं.अगदी लहान वयात माझं लग्न झाल्याने ही व्यथा माझ्या मनात घर करून होती.माझ्या पतीने मला शिकायला कधीच मदत केली नाही.दयनीय गरीबी ही माझ्या जीवनाची वाटचाल होती.आणि त्याऊप्पर माझ्या अंगात कसली कला नव्हती ना धैर्य होतं.पण बरीच माणसं लिहीण्या- वाचण्याच्या प्रयत्नात लागली होती.अर्थात त्यांच जीवनमान सुधारत होतं.
माझ्या नंतर लक्षात आल की, सौंदर्याची नाही, नाही संपत्तीची माझ्या जवळ उणीव होती.उणीव होती ती फक्त अक्षरांची.
माझं जेव्हा शब्दाबद्दलचं ज्ञान वाढत गेलं,तेव्हा माझा आत्मविश्वास आणि माझं धैर्य पण वाढत गेलं.त्यानंतर मी ठरवलं,की माझ्या बहिणी आणि माझे भाऊ ह्यांना पण सुशिक्षीत केलं पाहिजे.आणि ते सुद्धा त्यांना शिकायचं असेल तेव्हडं.
तत्काळ अडचण होती ती करली नदीची.पावसाळ्यात नदी पार करून गेल्या शिवाय नदीपलिकडच्या शाळेत शिकायला जाणं अशक्य होतं.जास्त करून मोसमी पावसात.
मला त्या नदीवर पूल बांधून घ्यायचा होता.सुरवातीला गांवातल्या लोकानी मदत केली नाही.उलट माझी मजाच उडवली.तो पूल फक्त माझ्यासाठीच हवा आहे आणि त्याचं नांव पण "चमेली पूल" म्हणून देऊन पण ठेवलं.पण नंतर मात्र मला मदत मिळायला लागली.पूलाचं सामान आणलं गेलं,कामगार मिळाले आणि सरतेशेवटी पूल बांधला गेला.
आतां मात्र मुलांना त्या पूलावरून शाळेला धांवत जाताना पाहून डोळ्यांच पारणं फिटतं.तो पूल लोखंडाचा होता,समुदायाचा होता,अक्षरांचा होता.सर्वांच्या सहकारा शिवाय सफलता मिळणं नेहमीच कठीण असतं.
हे सर्व माझ्या अक्षर ओळखीमुळे झालं.जरी मी थोडं उशीरा शिकले तरी.अक्षरांत प्रचंड शक्ति आहे.त्यात जादू आहे.जगात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अक्षरं.असं मी तरी मानते."
हा तिचा सर्व खुलासा ऐकून मी पुर्ण अचंबीत झालो.
मी तिला म्हणालो,
"चमेली,तू एका प्रोफेसरला पण मागे टाकशील असं सुंदर लेक्चर मला दिलंस.पण काही असो,गोपिकाबाई मला नेहमी म्हणायची,
"माझी चमेली जात्याच हुशार आहे."
"माझी आई जीवंत असती तर तिने माझी नक्कीच पाठ थोपटली असती"...चमेली डोळ्यातलं पाणी पुसत पुसत पुटपुटली.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

शितल's picture

1 Mar 2009 - 6:11 am | शितल

सामंत काका,
नेहमीच तुमचे लिखाण खुप सुंदर आणि अनुभव संपन्न असते :)

रेवती's picture

1 Mar 2009 - 7:37 am | रेवती

सामंतकाका,
नेहमीप्रमाणेच चांगली, बोध घ्यावा अशी कथा आहे.

रेवती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Mar 2009 - 7:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>माझ्या मनात आलं,जर का मात्रा आणि वेलांटीने माझ्या नांवाचा उच्चार बद्लू शकतो तर मग सर्वच अक्षरं मी शिकले तर माझ्या आयुष्यात किती बदल होऊं शकेल ?

क्या बात है ! अनुभव लेखन अजून येऊ द्या !

अक्षरांचे असे सुंदर पूल माणसे उभी करतात, घडवतात, जोडतात आणि ती माणसे मग पुन्हा नवनवे पूल बांधून सारे जग जोडतात!
अक्षरांमध्ये फार मोठी शक्ती आहे, खरं आहे! म्हणूनच तर त्याला 'अक्षर' म्हणजे कधीही क्षरण न होणारे, नाश न पावणारे असं म्हणत असावेत का?

चतुरंग

विसोबा खेचर's picture

1 Mar 2009 - 8:27 am | विसोबा खेचर

अक्षरांत प्रचंड शक्ति आहे.त्यात जादू आहे.जगात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अक्षरं.
माझी आई जीवंत असती तर तिने माझी नक्कीच पाठ थोपटली असती"...चमेली डोळ्यातलं पाणी पुसत पुसत पुटपुटली.

श्रीकृष्णा,

अरे म्हातार्‍या, रडवलंस रे!

सुंदर छोटेखानी लेख..!

(अक्षरप्रेमी) तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Mar 2009 - 10:05 am | प्रकाश घाटपांडे

आमचे देव गुरुजी रोज पाच ओळी शुद्धलेखन करायला सांगायचे. टाक दौतीने . पेन चालायचा नाही. दिसला तर ठेचुन काढायचे. पन आमच अक्षर काय सुदारल नाही ब्वॊ. सुंदर अक्षर असणार्‍यांबद्द्ल आमाला असुया युक्त आदर वाटतो .अक्षर सुंदर असो वा नसो त्यात ताकद असते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

श्रीकृष्ण सामंत's picture

4 Mar 2009 - 8:45 am | श्रीकृष्ण सामंत

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्रमोद देव's picture

4 Mar 2009 - 12:27 pm | प्रमोद देव

सामंतसाहेब लेख मस्त शब्दबद्ध केला आहे आणि त्या चमेलीची जिद्दही जबरदस्त आहे.