फेड...

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
28 Feb 2009 - 5:51 pm

"राजू...."

आक्काची किंचाळी रात्रीच्या घट्ट काळोखाला चिरत गेली. इतका गाढ झोपलो होतो तरी देखिल धडपडून उठलो मी. अशा वेळी सहसा उठलो तरी मला १-२ मिनिट काही सुधरत नाही. पण आक्काच्या आवाजात असा काहीतरी विलक्षण थरार होता की मी झोपलो होतो की नव्हतो असं वाटावं इतका लख्ख जागा झालो. मी अंथरूणातून उठणार एवढ्यात आक्का परत ओरडली...

"राजू... ये रे लवकर... तो आला बघ परत. मला हाक मारतोय. राजू, नंदा... अरे कुठे आहात रे सगळे... तो घेऊन जाईल मला... त्याला समजवा... आम्ही काही घेतलं नाही कोणाचं... का असा छळवाद मांडला आहेस रे तू?"

आक्काचा नुसता आकांत चालला होता. काय चाललंय काही कळत नव्हतं. मी तिथे पोचेपर्यंत राजू आणि नंदा पण तिथे पोचलेच. आक्काला सोबत म्हणून राहिलेल्या वसुधाताई पण होत्याच. राजू, नंदा, वसुधाताई सगळेच आक्काला आवरायचा प्रयत्न करत होते. आक्का बर्‍यापैकी बेभान झाली होती. शरीराने एवढीशी आमची आक्का पण त्या तिघांना आवरत नव्हती. राजू तिला समजवत होता...

"घाबरू नकोस गं आई, आम्ही आहोत ना... कोणी काही करत नाही तुला. कोण तुला घेऊन जातो बघतोच मी. शांत हो बरं."

नंदाने तिचं डोकं मांडीत घेतलं आणि आई मुलाला मायेने थोपटते तसं हळूवार तिला थोपटायला सुरूवात केली. राजू आणि वसुधाताईंनी तिला दाबून धरलं होतं. थोड्या वेळाने हळू हळू आक्का शांत झाली आणि बारीक आवाजात हुंदके देत रडू लागली. मी आपला नुसता एखादा चित्रपट बघितल्या सारखा दारात उभा राहून बघत होतो. काही कळतच नव्हतं. आक्काच्या चेहर्‍यावरची भिती एवढी स्पष्ट होती की मी पण थिजल्या सारखा झालो होतो. थोड्या वेळाने आक्काला झोप लागली. नंदाने तिचं डोकं हळूच बाजूला ठेवलं आणि ती बाहेर दिवाणखान्यात जाऊन बसली. वसुधाताई आक्काच्या बाजूला बसल्या आणि तिच्या छातीवर हात ठेवून शांतपणे हलक्या आवाजात रामरक्षा म्हणू लागल्या...

"श्रीगणेशाय नमः
अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य,
बुधकौशिक ऋषि:,
श्रीसीतारामचंद्रो देवता..."

रात्रीच्या अबोल शांततेत त्यांच्या मंद लयीतले खर्जात म्हणलेले रामरक्षेचे पुरातन मंत्र खरंच एक वेगळीच जाणिव करून देत होते. मनाला धीर देत होते. काही तरी अनामिक गूढ असं घडत होतं पण त्या मंत्रोच्चारामुळे मात्र ती जाणिव नक्कीच कमी झाली होती. राजू तिथेच बाजूला खुर्चीत डोळे मिटून बसला होता. त्याच्या चेहर्‍यावर थकवा स्पष्ट दिसत होता. मी पण हळूच बाहेर दिवाणखान्यात येऊन बसलो. नंदा सोफ्यावर बसली होती. माझ्या चाहुलीने डोळे उघडले तीने. क्षीणपणे हसली. मी काय बोलावं याचा विचार करत होतो, तेवढ्यात तीच म्हणाली,

"घाबरलास?"

"नाही. पण अगदीच नाही असंही नाही. खरं तर मी घाबरलोय, हादरलोय की स्वप्नात आहे... मला काही कळतच नाहीये."

"हं... स्वप्न असतं हे तर किती बरं झालं असतं रे... पण दुर्दैवाने हे स्वप्न नाहीये... वास्तव आहे."

"अगं पण हा काय प्रकार आहे? मला नीट सांगणार का? मी संध्याकाळ पासून बघतोय तुम्ही सगळे काही तरी विचित्र टेंशन मधे आहात. आणि मला असं तडकाफडकी का बोलावून घेतलं? तरी बरं एवढ्या शॉर्ट नोटिस मधे तिकिट मिळालं नाही तर आजकाल व्हेकेशन सीझन चालू आहे त्यामुळे सगळ्या फ्लाईट्स भरून जात आहेत. आणि या वसुधाताई कोण आहेत? इथेच राहतात का?" संध्याकाळपासून दाबून ठेवलेली आणि या प्रसंगामुळे शीगेला पोचलेली माझी उत्सुकता बदाबदा बाहेर पडली.

"सांगते रे... सगळं सांगते. तू एवढा परदेशातून थकून भागून आलास म्हणून संध्याकाळी काही बोललो नाही आम्ही. सकाळी बोलू निवांत असं वाटलं. पण आता मात्र सांगते सगळं."

त्या नंतर मात्र जे काही ऐकलं ते निव्वळ मतकरी, धारपांच्या कथा-कादंबर्‍यातच घडतं असं वाटायचं. प्रत्यक्षात, आपल्याच जीवनात कधी असं घडेल असं चुकूनही वाटलं नव्हतं.

नंदा सांगत होती.

"तुला माहितच आहे आमचं रूटिन. सकाळी सात वाजता जुई कॉलेजला जाते, साडेसातला राजू जातो फॅक्टरीत. मी आठ सव्वाआठ पर्यंत निघते. मग त्यानंतर दिवसभर आक्का एकट्याच असतात. मी सगळा स्वैपाक करूनच जाते. त्यांचं आंघोळ, पूजा, पोथी वगैरे चालतं बराच वेळ. मग जेवतात. दुपारी पेपर वगैरे वाचतात, टिव्ही बघतात. जुई येतेच तीन पर्यंत. मग तिचे लाड करण्यात वेळ जातो त्यांचा. चांगलंच गूळपीठ आहे दोघींचं. संध्याकाळी येतोच आम्ही दोघं. मग कधी देवळात जातात तर कधी त्यांच्या एक-दोन मैत्रिणी आहेत आमच्या सोसायटीतल्या त्या येतात.

आत्ता पर्यंत सगळं ठीक होतं रे. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांना थोडं विस्मरण व्हायला लागलंय. पटकन आठवत नाही. कधी तरी आंघोळ करून येतात आणि परत त्याच पावली बाथरूम मधे जाऊन आंघोळीला बसतात. एकदा जुई घरी आली दुपारी तर दार उघडलं त्यांनी पण 'कोण पाहिजे?' असं विचारलं. आणि एकदा मी शुक्रवारच्या हळदीकुंकवाला शेजारच्या देशपांडेकाकूंना बोलावलं तर मी त्यांना नमस्कार केल्यावर आक्कांनी मलाच नमस्कार केला. त्यांनी मला 'त्यांची आई' समजणं तर आता माझ्या अंगवळणीच पडलंय." मी ऐकत होतो.

आक्का माझी आत्या, राजू माझा आत्तेभाऊ. हे नातं नुसतं नावापुरतं. मी आणि राजू सख्ख्या भावापेक्षा जास्त जवळ आहोत एकमेकांच्या. आम्ही एकत्र वाढलो, खेळलो. एकाच कॉलेजमधे गेलो. नशिबाने आमच्या बायका पण एकमेकींशी खूपच छान ऍडजस्ट झाल्या. त्या मुळे मी परदेशात गेलो तरी वर्षातून एकदा तरी एकत्र येतो, फिरायला जातो. खूप जवळ आहोत आम्ही सगळे एकमेकांच्या. आक्का मला आईसारखीच आहे. काका तसे लवकरच गेले. पण आक्काने नीट सांभाळून घेतलं. आमची मदत योग्य तेव्हा घेतली. जमेल तशी परतफेड पण केली. राजू पण धडाडीचा. शिकला व्यवस्थित. आज त्याचा स्वतःचा उत्तम धंदा आहे. फॅक्टरी आहे. ५०-६० माणसांना रोजगार देतोय तो. नंदा, सुनंदा खरं नाव तिचं, पण स्वत:ची इस्टेट एजन्सी चालवते. जुई इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला आहे. एकंदरीत सगळं कसं छान चालू आहे. आणि आता हे अचानक नविन प्रकरण...

तेवढ्यात राजू पण बाहेर येऊन बसला.

"अरे काय सांगू तुला... आधी आमच्या लक्षातच नाही आलं की असं काही होतंय. पण जेव्हा आक्काने नंदाला आई समजून नमस्कार केला तेव्हा मात्र आम्ही घाबरलो. आपल्या काटदरे डॉक्टरांकडे घेऊन गेलो तिला. त्यांचं म्हणणं पडलं की हे सगळं म्हातारपणामुळे होतंय. टेस्ट्स वगैरे केल्या, त्यात कळलं की बहुतेक हा अल्झायमर्सचा प्रकार असावा. मेंदू मधे काही तरी गडबड होते आणि स्मरणशक्ती जाते माणसाची. पण गंमत म्हणजे लहानपणचं सगळं आठवतं तिला. मोठेपणीचंच विसरते ती. कधी कधी तर ती स्वतःला शाळकरी मुलगीच समजते." राजू सांगत होता.

"अरे कधी कधी त्या 'आई' अशी हाक मारून माझ्या कुशीत शिरतात ना... खूप रडू येतं रे... ज्या बाईने इतकं केलं आयुष्यभर लोकांचं तिला असं का व्हावं... मग मी पण जवळ घेते त्यांना, कुरवाळते, की मग बरं वाटतं त्यांना. पण हे सगळं तात्पुरतं. थोड्या वेळाने आपोआप भानावर येतात त्या. तेव्हा पासून आम्ही पूर्ण दिवसभरासाठी एक मुलगी ठेवली घरात. आक्काला एकटं ठेवणं शक्य नाही." ... नंदा.

"पण मागच्या दहा पंधरा दिवसांपासून मात्र एक फारच विचित्र प्रकार घडतो आहे. आक्का एक दिवस अचानक दुपारी बारा साडेबाराला जोरजोरात ओरडायला लागली. ती कुणालातरी घालवून द्यायचा प्रयत्न करत होती. त्या मुलीने तिला विचारलं तर रस्त्याकडे हात करून ती म्हणाली, 'तो बघ कसा तिथे उभा आहे. कधीचा आपल्याच घराकडे बघतो आहे. काय पाहिजे कुणास ठाऊक.' त्या मुलीने रस्त्याकडे बघितलं तर तिथे अरे चिटपाखरू सुद्धा नव्हतं. आक्काचे हातवारे मात्र किती तरी वेळ चाललेच होते. ती पोरगी जाम घाबरली होती. जुई येईपर्यंत कशीबशी थांबली ती घरी, जशी जुई आली तशी पळूनच गेली ती, परत आलीच नाही ती... उरलेले पैसे घ्यायला पण. त्या दिवसापासून नंदा घरीच आहे. आक्काचे भास मात्र हळू हळू वाढतच चालले आहेत. आता तर ती त्या माणसाशी बोलते पण. त्याला काही तरी सांगत असते.

'आम्ही काही कुणाचं देणं लागत नाही. मी आज पर्यंत कुणाचं एक पैसाही देणं अंगावर ठेवलं नाही. तुझे एवढे पैसे कसे राहू देईन. मुकाट्याने जा इथून.'

असंच काहीतरी बोलत असते."

राजूचं बोलणं ऐकून मी पण घाबरलो. खरं तर हे सगळं आक्काला होणारे भास म्हणून सोडून द्यावं, पण मग मगाशी जाणवलेलं ते गूढ अस्तित्व, ती अनाम भावना.... ते काय होतं? का तो मला झालेला भास होता? पण ती जाणीव एवढी स्पष्ट होती की केवळ भास म्हणून झटकून टाकूच शकत नव्हतो मी. त्या जाणीवेच्या केवळ आठवणीने माझ्या अंगावर काटा आला आणि अंगावर शिरशिरी आली. माझी अवस्था राजूच्या नजरेतून सुटली नाही. तो एकदम म्हणाला,

"म्हणजे तुला पण जाणवलेलं दिसतंय 'ते' !!!"

"काय म्हणायचंय तुला, राजू? काय जाणवलंय?"

"जेव्हा जेव्हा आक्काला असे भास होतात तेव्हा मला आणि नंदाला काही तरी गूढ वाटायचं, कोणी तरी जवळ उभं आहे असं जाणवायचं. फार विचित्र आहे रे हा सगळा प्रकार. ताबडतोब जुईला तिच्या मामाकडे पाठवलं आम्ही. मी पण घरूनच काम करतोय गेले दहा दिवस. नंदाला एकटं सोडू शकत नाही आक्का जवळ. आणि आता तर ती हिस्टेरीक होते. अनावर होते. तो माणूस तिला काही तरी सांगतो आणि ही त्याच्याशी भांडते. असह्य झालंय रे हे सगळं. कोणाशी बोलणार तरी आणि? काय सांगणार लोकांना, माझी आई वेडी झाली, तिला भास होतात, असं सांगू? आणि ती भयानक जाणिव... कोणाला पटेल तरी का?

म्हणून काल फोन केला आणि ताबडतोब बोलावलं तुला. तू येशील याची खात्री होती. संध्याकाळीच बोलायचं होतं खरं तर. पण नंदा म्हणाली तू दमून आला आहेस. सकाळी बोलू. पण आता तू सगळं बघितलंच आहेस, 'त्याचा' अनुभव घेतलाच आहेस."

"राजू अरे असं काही नसतं रे... उगाच काय बोलतोस तू? एवढा शिकलेला तू..." मी स्वतःच्या भितीला बाजूला ठेवून राजूला धीर द्यायचा एक क्षीण प्रयत्न केला. प्रयत्न क्षीण होताच कारण राजू थोडासा हसून म्हणाला...

"आधी स्वतःला पटव आणि मग मला पटवून द्यायचा प्रयत्न कर. ज्याला त्या अस्तित्वाची जाणिव झाली, तो विसरूच शकणार नाही." खरंच होतं त्याचं. पण बुद्धी मात्र हे मानायला तयार नव्हती. मन-बुद्धीचा झगडा चालूच होता.

"हे बघ राजू, उद्या आपण परत जाऊ काटदरे डॉक्टरांकडे, अजून काही टेस्ट्स आहेत का ते बघू. मी पण माझ्या काही मित्रांना विचारतो. अरे आजकाल नविन नविन औषधं निघत आहेत दिवसागणिक. काही तरी उपाय नक्कीच असेल. आता मी आलोय ना... बघू काय करता येईल ते. अरे पण त्या वसुधाबाई कोण रे?"

"त्या आक्काच्या ओळखीच्या आहेत. त्यांचा गावाबाहेर एक आश्रम आहे. त्या आणि त्यांच्या बरोबर अजून ४-५ लोक असे राहतात तिथे. एक छोटंसं रामाचं देऊळ आहे तिथे. प्रसन्न ठिकाण आहे. खूप जण त्यांच्या कडे जातात. दर गुरूवारी आक्का जायची तिथे. गेले २-३ गुरूवार गेली नाही ती, म्हणून काल त्या सहज चौकशी करायला आल्या. त्यांना बघताच आक्काने त्यांचा हात घट्ट धरून ठेवला, सोडेचना. त्या पण जरा शांतच बसल्या होत्या. आक्का पण त्यांना जाऊ देईना, म्हणून मग आम्हीच त्यांना म्हणलं की शक्य असेल तर रहा इथेच आज. त्या पण अगदी मोकळेपणी राह्यल्या. म्हणूनच आज आम्ही आमच्या खोलीत झोपलो. वाटलं त्यांच्या मुळे आक्का जरा शांत झाली. आज झोप मिळेल जरा, तर हे सगळं रामायण परत घडलं."

"अरे जाऊ दे रे... सगळं होईल ठीक. आता झोप बरं. मी बसतो इथेच जरा वेळ." बळजबरीने मी दोघांना झोपायला पाठवलं.

काय असेल हा प्रकार? खरंच असं काही असेल? कोण माणूस असेल तो? काय पाहिजे असेल त्याला? त्याची अशी काय वस्तू राहिली आमच्या कडे की तो ती परत मागतो आहे? मी एकदम चपापून भानावर आलो. मी तर खरंच तो माणूस आहेच असं मानून विचार करायला लागलो होतो. निग्रहाने सगळे विचार बाजूला सारले. आक्काच्या खोलीकडे गेलो. हळूच डोकावून बघितले. आक्का शांतपणे झोपली होती. वसुधाताई तिच्या बाजूला शांतपणे डोळे बंद करून बसल्या होत्या. नाईटलॅंपच्या निळसर प्रकाशात त्यांचा चेहरा वेगळाच भासत होता. चेहर्‍यावर एक प्रसन्नता होती. त्यांच्याकडे नुसतं बघून मला बरं वाटलं. ओझं जरा कमी झालं. मी अंथरूणावर येऊन पडलो. प्रवासाचा शीण, आक्काचा एपिसोड... सगळा ताण एका क्षणात माझ्यावर चालून आला आणि मी शरण गेलो.

***

सकाळी उशिराच जाग आली. नंदा-राजू उठलेच होते. माझीच वाट बघत होते. आक्का पण उठली होती. आता तर ती एकदम वेगळीच वाटत होती. रात्रीची आक्का जणू तिच्यासारखी दिसणारी पण दुसरीच बाई होती. सूर्यप्रकाशात काय जादू असते. तेच घर, त्याच वस्तू, तीच झाडं, त्याच व्यक्ति... रात्रीच्या काळोखात एखाद्या हिंस्त्र श्वापदाप्रमाणे भासतात कधीकधी. एकदा उजाडलं की मात्र सगळं अचानक मंगलमय होऊन जातं. हाही खरा आपला भासच. बदलत काही नसतं.... फक्त आपली नजर आणि आपलं मन बदलतं. पण अंधाराचा हा गुणधर्मच असावा.

राजू शांतपणे बसला होता. मीच बोलायला सुरूवात केली,

"चल तयार हो. डॉक्टरांकडे जाऊन येऊ."

"कशाला?"

"अरे असं काय करतोस? भेटून येऊ. विचारू त्यांना की अजून काय करता येईल." त्याची अवस्था बघून मला कसं तरीच झालं.

आमचं बोलणं चालू असतानाच वसुधाताईपण बाहेर डायनिंग टेबलवर येऊन बसल्या आमच्या बरोबर. राजूने आमची ओळख करून दिली. नमस्कार वगैरे झाले. वसुधाताईंनी बोलायला सुरूवात केली,

"राजू, कालची पूर्ण रात्र मी आक्कांच्या बाजूला बसले होते. मला काही तरी जाणवत होतं. काय ते नक्की अजून नाही कळलं, मी प्रयत्न करत होते, पण नीट पकडीत येत नव्हतं."

मी, नंदा, राजू.... फक्त खुर्चीतून खाली पडायचेच बाकी होतो. म्हणजे आम्ही एकटेच नव्हतो तर, 'त्या'ची जाणीव होणारे. आता मात्र डोकं कामातूनच गेलं. असह्य झालं अगदी. काही समजेचना. आजपर्यंतचं शिक्षण, विचार सांगत होते की असं काही नसतं. हे सगळे नुसते मनाचे खेळ असतात. पण मग ती जाणीव, राजू आणि नंदाला पण जाणवलं होतं ते आणि आता वसुधाताईंनी तर नुसतं त्याला अनुभवलं नव्हतं तर त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न केला असं म्हणत होत्या. मला हे द्वंद्व असह्य झालं, मी त्या तिरीमिरीतच त्यांना म्हणलं...

"माफ करा ताई, पण असं काही नसतं. हे सगळे मनाचे खेळ असतात. तुम्ही उगाच काही तरी यांच्या मनात भरवून देऊ नका. आधीच ते बिचारे घाबरून गेले आहेत. त्यांना धीर द्यायचा सोडून तुम्ही असलं काही तरी सांगून त्यांना अजून घाबरवताय? कधी जाताय तुमच्या आश्रमात परत तुम्ही? आता मी आलोय, मी घेईन त्यांची काळजी. तुम्ही काल इथे थांबलात त्याबद्दल धन्यवाद. या आता!!!"

वसुधाताई शांतपणे हसल्या.

"तुम्हाला असं वाटणं साहजिकच आहे. खरं तर हे सगळं गूढच आहे. मला पण अजून नीटसं कळलं नाहीये. साधना खूप लागते. मी तर अज्ञानीच आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी आक्कांना नक्की यातून बाहेर काढू शकेन. कमीत कमी 'तो' कोण आहे? त्यांना का भेटतोय? काय राहिलंय त्याचं? हे सगळं तरी आपल्याला नक्कीच कळेल. बाकी जशी तुमची इच्छा." शेवटचं वाक्य त्यांनी राजू-नंदा कडे बघून म्हणलं. बाई अतिशय हुशार आणि कॉन्फिडंट वाटत होत्या.

"वसुधाताई, हा काय बोलला त्याबद्दल माफ करा. आम्ही तुम्हाला ओळखतोय आज बरेच दिवसांपासून. तुम्ही जे म्हणताय त्यावर साहजिकच विश्वास बसणं कठिण आहे पण केवळ तुम्ही हे बोलत आहात म्हणून मी थोडा तरी विचार करते आहे. तुम्ही जर का खरंच मदत करू शकला तर खूप बरं होईल." नंदा म्हणाली.

"आपण प्रयत्न करू, नंदा. यश मिळणं न मिळणं त्या रामरायाच्याच इच्छेवर आहे."

"काय करावं लागेल आपल्याला?"

"काहीच नाही. मी काही मंत्र तंत्र जाणत नाही. की मला काही विद्या अवगत नाही. माझ्या कडे रामरायाचा अंगारा आहे. आपण तो आक्कांना लावू आणि त्यांना बोलतं करायचा प्रयत्न करू. आपल्याला आधी आक्का काय अनुभवातून जात आहेत ते जाणून घ्यायचंय. त्यातूनच आपल्याला मार्ग सापडेल हे निश्चित्त."

ताई स्वतः आंघोळ करून आल्या. नंदाने आक्कांना आंघोळ घातली. आम्ही सगळेच आंघोळी करून देवघरात बसलो. ताईंनी फक्त एक ऊदबत्ती लावली. कसलाही बडेजाव नाही की विधी नाहीत. शांतपणे हात जोडून रामरक्षा, मारुतिस्तोत्र म्हणलं. शेवटी त्यांच्या गुरूंचं स्मरण केलं. वातावरण भावमय झालं होतं. माझा सगळा आक्षेप एव्हाना गळून पडला होता. उरला होता फक्त एक असहाय्य पण शांत आश्वस्त जीव. आपल्याला काही धोका नाही, इथे मी सुरक्षित आहे ही भावना मनात दाटली होती. सगळ्यांची बहुतेक हीच अवस्था होती. आक्का तर अगदी लहान मुलासारखी दिसत होती. तिची क्षीण कुडी जमिनीवर मुटकुळं करून पडली होती. ताईंनी आक्काला अंगारा लावला आणि म्हणाल्या,

"आक्का, कश्या आहात? बरं वाटतंय ना?"

गेले कित्येक दिवस भ्रमिष्टासारखी वागणारी आक्का शांतपणे म्हणाली,

"हो, ताई. खूप बरं वाटतंय."

"मग आक्का आता आम्हाला सांगणार का? कोण येतो तुम्हाला भेटायला? काय पाहिजे त्याला? का त्रास देतोय तो तुम्हाला?"

आम्ही सगळे उत्कंठा ताणून बसलो होतो. आक्का काय बोलतेय आता? काही तरी अगम्य असं सत्य ऐकायला मिळणार. इतकं शांत वाटत असून सुद्धा 'त्या'चा विषय निघताच आक्का एकदम अस्वस्थ झाली. तरी ती मोठ्या कष्टाने बोलली,

"तो खंड्या रामोशी आहे. रोज येतो. कधीही येतो. म्हणतो 'माझे १० रूपये तुझ्याकडे उधार आहेत. मला परत कर. व्याजासकट पाहिजेत मला.' मी त्याला किती सांगते की अरे बाबा मी तुला ओळखत नाही की तुझ्याकडून कधी काही घेतल्याचं आठवत नाही. पण तो ऐकतच नाही. दुसरं काही बोलत नाही, फक्त पैशे परत मागतो."

"आक्का, अजून काही म्हणतो का तो? काही धमकी वगैरे देतो का?" बाईंनी विचारलं.

"नाही हो... धमकी वगैरे देत नाही. उलट म्हणतो की, 'मी रामोशी आहे. तुमचं मीठ खाल्लं आहे, तुझं रक्षणच करीन. तू मला सूनेसारखी आहे. मला घाबरू नकोस. पण माझे पैसे तेवढे परत कर.'"

"आक्का, तू त्याला कधी विचारलं नाहीस की तो कोण आहे? आपण कधी त्याच्याकडून पैसे घेतले होते? त्याने आपलं मीठ खाल्लं म्हणजे काय?" राजू.

आक्का बराच वेळ शांत बसली होती. जणू काही आठवायचा प्रयत्न करत होती.

"एकदा मला म्हणाला तो... तो आपल्याच गावचा आहे. गावाची गस्त त्याच्याकडे होती. एकदा तो असाच रात्री गस्त घालत असताना माझे सासरे अचानक काही काम निघालं म्हणून परगावी निघाले. घाईत त्यांचा बटवा राहिला घरीच आणि त्यांच्या लक्षात येई पर्यंत ते बरेच पुढे आले होते. तेवढ्यात त्यांना खंड्या भेटला म्हणून त्यांनी त्याच्याकडून थोडे पैसे उधार घेतले. त्या नंतर ते जेव्हा परत आले तेव्हा खंड्या आजारी पडला आणि त्याला तालुक्याला नेला होता वैद्याकडे. त्यातच तो गेला. आणि हे पैसे पण परत द्यायचे राहून गेले. आता त्याचा जीव अडकला आहे त्या पैश्यात. पैसे मिळाल्याशिवाय त्याचा जीव शांत होणार नाही म्हणतो. इतके दिवस तुझीच परिस्थिती चांगली नव्हती म्हणून तुला पैसे परत मागितले नाहीत असं सगळं तो सांगतो.

पण मी कसा विश्वास ठेवू? उगाच कोणाचेही पैसे मी कधीच ठेवले नाहीत आणि माझे सासरे पण अतिशय सज्जन होते. त्यांनी ते पैसे नक्कीच परत केले असणार."

आम्ही सगळे आश्चर्यचकित होऊन ऐकत होतो. कोणाचा विश्वास बसेल? अतर्क्यच होतं.

"पण आक्का, जरी समजा आपण त्याचे पैसे परत करायचे तरी कसे करणार? तो तर जिवंतच नाहीये ना. का त्याच्या नावाने काही दान करायचं? म्हणजे त्याला शांत वाटेल?" राजू म्हणाला.

"हे बघा, " वसुधाताई म्हणाल्या, "मला असं वाटतं... आपण क्षणभर असं धरून चालू की पैसे खरंच द्यायचे राहून गेले. आणि आता तो ते परत मागतो आहे. तर एक उपाय आहे. राजू, तू स्वत: गावी जा, त्या खंड्याचे कोणी वंशज असतील तर त्यांना शोधून काढ आणि ते पैसे त्यांना परत कर. त्यांना हे सगळं सांग आणि त्यांच्या कडून 'कर्ज फिटलं' असं वदवून घ्या."

परिस्थितीच अशी होती की राजूने त्या क्षणी कोणाचंही काहीही ऐकलं असतं.

"ठीक आहे ताई. मी लगेच निघतो, पण किती पैसे परत करायचे? तो तर व्याजासकट मागतो आहे ना. काय करायचं?"

"राजू, तू एखादी मोठी रक्कम दे त्यांना. पूर्वीच्या काळी अशी उधारी असून असून किती असणार. ५-१० रुपयांचीच असेल ना? त्या काळी एवढ्या पैश्यात महिनाभर घर चालायचं लोकांचं. हजार पाचशे परत कर म्हणजे खूप झालं."

"ठीक आहे. मी निघतो लगेच."

माझा जरी पूर्ण विश्वास अजून बसत नव्हता तरी, मी आणि राजू लगेच गाडी करून निघालो. राजूचं मूळ गाव तसं जवळच होतं. २-३ तासाचा काय तो प्रवास. गाडी मीच चालवत होतो. पूर्ण प्रवासात आम्ही दोघंही गप्प होतो. माझ्या मनात आता त्या खंड्याला कसं शोधायचं हाच प्रश्न होता. आम्ही गावात पोचलो. दुपार टळत आली होती. गावात राजूचे कोणीच नव्हते आता. आम्ही चौकशी करत ग्रामपंचायतीचं ऑफिस शोधलं. सुदैवाने गावचे सरपंच तिथेच भेटले. राजूने ओळख सांगितली. आम्ही सगळी कहाणी त्यांच्या कानावर घातली.

सरपंच तसे वृद्धच होते. त्यांच्या आठवणीत तरी खंड्या रामोशी नव्हता. पण त्यांच्या माहितीचा एक रामोशी होता. गावाबाहेर रामोश्यांची वस्ती होती. त्यांनी लगोलग शिपायाला पिटाळला. थोड्या वेळात ३-४ जण आले त्याच्या बरोबर. सगळे त्याच वस्तीतले होते. सरपंचांनी त्यांच्या पैकी खंड्या रामोशी कुणाला माहीती आहे का विचारलं. कुणालाच काही आठवेना. बराच वेळ चर्चा झाल्यावर त्यांच्यातला एक जण म्हणाला,

"सरपंच, त्यो सुर्श्या हाय न्हवं का... त्याचा बा, त्याच्या बाचं नाव 'खंडेराव' लावतोय बघा."

"अरे मग बघताय काय? बोलवा त्याला पटकन."

शिपाई तसाच पळाला त्यांच्यापैकी एकाला घेऊन. थोड्या वेळाने ते आले परत, एकाला पुढ्यात घालूनच आले ते.

"हा आमचा सुर्श्या. काय रे सुर्श्या, तुज्या बाच्या बाचं नाव खंडेराव होतं ह्ये खरं का?"

"व्हय सरपंच. खंडेराव माझा आज्जा. माझा बा ल्हान आसतानाच मेला त्यो. रात्रीला गस्त घालताना जनावर चावलं आणि काही अवशिद कराय अदुगरच ग्येला तो."

हे सगळं ऐकून आम्हाला पण हुरूप आला. राजू पुढे झाला. त्याने सगळी कहाणी परत त्या सगळ्यांना ऐकवली.

"सुरेश, आता एक उपकार कर बाबा आमच्यावर. मी हे हजार रूपये तुला देतो. जे काय व्याज असेल ते सगळं यात आलं. सरपंच आणि हे बाकीचे तुझे मित्र साक्षीदार आहेत. तेवढं 'कर्ज फिटलं' असं म्हण बाबा आणि मोकळं कर आम्हाला."

"साहेब, आम्ही गावाबाहेर असलो तरी सरपंच आम्हाला मान देऊन असतात. त्ये काय म्हन्तील त्ये खरं. आमाला काय कळतंय यातलं?" सगळा प्रकारच एवढा विलक्षण की ती माणसं पण चक्रावून गेली होती.

"सुर्श्या, पैक्यावर कोणाची किती वासना आसंल त्ये सांगनं कठीन हाय गड्या. खंडेरावचा जीव आडकला आसंल त्या पैक्यापायी. आपन कसं सांगनार? तू एक काम कर. हे पावने म्हन्तात तसं घे तो पैका आनि मोकळं कर त्याना कर्जातून. पन तो पैका घरात न्हेऊ नको... देवळात नाही तर कोना गरजवंताला टाक आनि ह्ये समदं इसरून जा."

राजूने १००० रूपये सुर्श्याच्या हातावर ठेवले. सुर्श्या 'तुमचं कर्ज फिटलं' अस त्याला म्हणाला. सरपंच आणि इतर साक्षी होते. त्यांनी माना डोलावल्या आणि आम्ही उठलो. सरपंच म्हणाले, "आता कुठे जाता? तिन्ही सांजा झाल्यात, थोडा वेळ थांबा. वेळ टळून जाऊ दे, मंग जा. न्हायी तर हितंच मुक्काम करा रातचा आनि सकाळी जा."

आम्हाला घरी पोचायची घाई झाली होती. मी तर कंटाळलो होतो. थोड्याश्या अनिच्छेनेच मी हे सगळे करत होतो. कसला बायकांचा खुळचटपणा असंच वातत होतं. हो नाही करता करता, थोडा वेळ थांबून निघू असं ठरलं. सरपंचांनी चहा नाश्ता मागवला. तेवढ्यात राजूचा मोबाईल वाजला... घरून होता फोन. मीच घेतला फोन, नंदा होती फोनवर.

"काम झालं ना आत्ताच?"

"हो आत्ताच झालं. आपण ठरवलं तसंच सगळं केलं. पण तुला कसं कळलं?"

"अरे, आक्का झोपल्या होत्या, आम्ही दोघी बाहेर बसलो होतो. तेवढ्यात इतक्या दिवसांनी आज पहिल्यांदा आक्का स्वतःहून चालत बाहेर आल्या. थेट बाथरूम मधे गेल्या. डोक्यावर पाणी घेतलं आणि बाहेर येऊन म्हणाल्या,

'नंदा, फिटलं गं बाई एकदाचं... खंड्या येऊन पाया पडून गेला... आता परत नाही येणार म्हणून निरोप घेऊन गेला.'

हे ऐकून लगेच तुला फोन केला."

मी सुन्नपणे ऐकत होतो, हातातून फोन गळून पडला होता, डोळ्यात पाणी होतं.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

ढ's picture

28 Feb 2009 - 6:00 pm |

बिपिन भाऊ.

मस्त लिहिली आहे कथा. फारच आवडली.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Feb 2009 - 6:30 pm | परिकथेतील राजकुमार

बिपिनभौ खल्लास लिहिले आहे अगदी. मस्त उत्कंठावर्धक कथा.
मुड बना दिया बॉस :)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

सुक्या's picture

28 Feb 2009 - 6:08 pm | सुक्या

कथा आवडली. असे काही प्रकार होत असतात. आमच्या बरोबर शिकत असलेला एक मुलगा असाच कधी रात्री किंचाळत उठायचा. नंतर त्रंबकेश्वर ला जाउन काही पुजा केली तेव्हा ठिक झाला असे नंतर ऐकले. खरे खोटे माहीत नाही.

कथा आवडली.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

यशोधरा's picture

28 Feb 2009 - 6:12 pm | यशोधरा

कसली मस्त कथा लिहिलीत बिपिनदा! नुसती कथाच की खराखुरा अनुभव??
विश्वासच बसणार नाही की फक्त काल्पनिक आहे, इतकी खरी वाटतेय!

मदनबाण's picture

28 Feb 2009 - 6:34 pm | मदनबाण

हेच म्हणतो.

मदनबाण.....

Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

सखी's picture

28 Feb 2009 - 8:10 pm | सखी

सहमत. अशा प्रसंगी आपले शिक्षित मन व प्रत्यक्ष अनुभव यात होणारी ओढाताण चांगली जमली आहे.

अवलिया's picture

28 Feb 2009 - 6:33 pm | अवलिया

सुंदर कथा...आवडली.

खरी असण्याची शक्यता वाटत आहेच.
नसेल तरी असा अनुभव आलेले अनेक जण माझ्या निकट परिचयात आहेत.
त्यामुळे, एकंदर कथा मस्त मांडली आहे हे नक्की सांगु शकतो.

--अवलिया

विंजिनेर's picture

28 Feb 2009 - 6:43 pm | विंजिनेर

झकास. दिवाळी अंक वाचल्या सारखं वाटलं राव...

स्वगतः च्यामारी, मिपा वर असे एक एक सुंदर लेख वाचायला मिळतात. थोडं आधी यायला पाहिजे होतं इकडे

विसोबा खेचर's picture

1 Mar 2009 - 12:13 am | विसोबा खेचर

दिवाळी अंक वाचल्या सारखं वाटलं राव...

जियो...!

मिपा हा वर्षभराकरताचाच दिवाळी अंक आहे त्यामुळे आम्हाला रोजी वीस रुपये, एक शिगारेट आणि एक कप चायच्या बोलीवर भाडोत्री संपादक नेमून केवळ दिवाळी जवळ आली म्हणून मिपाच्या दिवाळी अंकाचा फार्स करायची जरूरी भासत नाही!

:)

असो,

बिपिनदा, छानच लिहितोस रे तू! लै भारी! जियो..!

आपला,
शरदतात्या पवार.

सुक्या's picture

1 Mar 2009 - 9:03 am | सुक्या

मिपा हा वर्षभराकरताचाच दिवाळी अंक आहे

अगदी सहमत तात्या. मिपावर वर्षभर दिवाळी चालु असते. फटाके तर रोजच फुटतात. :-). मोकलाया .. सारखा ऍटम बाम कधी कधी . . . :-)

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

अनामिक's picture

28 Feb 2009 - 6:46 pm | अनामिक

जबरदस्तं भयकथा!

पण ते विसरणं, नंदाला आई समजणं हा पण ह्या 'खंड्या' प्रकरणाचा भाग होता/आहे का?

अनामिक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2009 - 6:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिपिनसेठ,
मस्त कथा....!

सूर्य's picture

28 Feb 2009 - 7:03 pm | सूर्य

बिपीनभाऊ, सॉलीड्ड कथा एकदम. लई भारी.

- सूर्य.

लवंगी's picture

28 Feb 2009 - 7:03 pm | लवंगी

खरच काल्पनिक आहे का? असेल तर मानल बुवा तुम्हाला..

गणपा's picture

28 Feb 2009 - 7:26 pm | गणपा

मस्त रे बिपीन , छान लिहिलयस..

शितल's picture

28 Feb 2009 - 8:09 pm | शितल

बिपीनदा,
अप्रतिम कथा लिहिली आहेस. :)

रामदास's picture

28 Feb 2009 - 8:11 pm | रामदास

जमलीय कथा.
चौफेर लिखाण .
वा! मजा आली वाचून .

घाटावरचे भट's picture

28 Feb 2009 - 10:31 pm | घाटावरचे भट

ऐसेच म्हणतो...

सुनील's picture

28 Feb 2009 - 8:25 pm | सुनील

अगदी शेवटपर्यंत उत्कंठा ताणून धरली आहे. मस्त कथा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

श्रावण मोडक's picture

28 Feb 2009 - 8:56 pm | श्रावण मोडक

खरी, खोटी; विश्वासार्ह, अविश्वसनीय; वास्तविक, भाकड... वगैरेत पडणार नाही.
भयकथा, गूढकथा याच मालिकेत ठेवून म्हणतो, छान!
सहजच मनात आलं प्रथमपुरूषी नॅरेशन नसतं तर कशी झाली असती?

शाल्मली's picture

28 Feb 2009 - 8:57 pm | शाल्मली

जबरदस्त कथा!! सुंदर!
वातावरणनिर्मिती मस्त झाली आहे.
खूप आवडली. :)

--शाल्मली.

चतुरंग's picture

28 Feb 2009 - 8:57 pm | चतुरंग

जामच कथा लिहिली आहेस. फ़ारच छान!
कलाटणी वगैरे नसूनही शेवटपर्यंत उत्कंठा ताणलेली ठेवलीस ह्यातच सारे आले.
तुझे नाव आजपासून 'बिपिन मतकरी'!! :)

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

28 Feb 2009 - 11:57 pm | भडकमकर मास्तर

बिपिन मतकरींचा विजय असो :)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

2 Mar 2009 - 10:17 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो . बिपिन्नारायत्नाकर कार्यमतधारपकरी , जिंदाबाद ! ;-)

मेघना भुस्कुटे's picture

3 Mar 2009 - 8:23 pm | मेघना भुस्कुटे

असेच म्हणते. बिपिनदा, मस्त झालीय कथा. मजा आली वाचून. तो खंड्या रामोशी क्रूरबिर दाखवला असता, तर सगळी मजाच गेली असती. पण तो असा मुक्या जनावरासारखा गरीब, 'परत येणार नाही' म्हणणारा दाखवलाय, त्यात खरी मजा आहे. सहीच!

रेवती's picture

28 Feb 2009 - 9:25 pm | रेवती

बाप रे! गोष्ट वाचताना थरथर कापत होते मी!
बिपिनभाऊ, मस्तच लिहिली आहे गोष्ट!
आपल्या समोरच जसं काही सगळं घडतय असं वाटत होतं.

रेवती

ब्रिटिश's picture

28 Feb 2009 - 9:47 pm | ब्रिटिश

लय भारी ! शिरयसली

मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

आनंदयात्री's picture

28 Feb 2009 - 11:18 pm | आनंदयात्री

सही रे बिपिनदा !!

समिधा's picture

28 Feb 2009 - 11:49 pm | समिधा

बिपीनदा खुपच मस्त लिहीलय तुम्ही. अगदी कोणीतरी समोर उभे राहुन
सांगतोय असं वाटलं.
अप्रतिम लिहील आहे. =D>

प्राजु's picture

1 Mar 2009 - 12:32 am | प्राजु

अतिशय उत्कंठावर्धक आहे.
शेवट पर्यंत एकादमात वाचून काढली कथा.
कुठेही शब्दांचा बडेजाव नाही.. तरीही उत्तम वातावरण निर्मिती झाली आहे.
अभिनंदन!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

कुंदा's picture

1 Mar 2009 - 1:17 am | कुंदा

खूपच छान. डोळ्यांसमोर चित्र उभा राहिला.
- कुंदा

मयुरा गुप्ते's picture

1 Mar 2009 - 4:06 am | मयुरा गुप्ते

व्वा.फारच छान कथा.कालच एक चित्रपट बघितला...'मैने गांधी को नहि मारा'...साधारण असाच. माझ्या आजीला 'Alzimer' झालेला.तिलाहि खुप खूप जुना आठवायच. तिचा एक भाऊ पहिल्या महायुधत त्याला वीरगति मिळालेली.त्याचि सारखी आठवण काढायची.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Mar 2009 - 12:32 pm | प्रकाश घाटपांडे

मैने गांधी को नही मारा! ची आठवण येते. कथेचा काही भाग सध्या मी घरात अनुभवतो आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

चंबा मुतनाळ's picture

1 Mar 2009 - 5:04 am | चंबा मुतनाळ

बिपिनभौ मतकरी,

सुंदर कथा/अनुभव आहे.
मानेवरचे केस उभे राहिले.
एका फटक्यात वाचून काढली कथा.

- चंबा

शारंगरव's picture

1 Mar 2009 - 5:30 am | शारंगरव

मस्त कथानक आहे.

दशानन's picture

1 Mar 2009 - 10:40 am | दशानन

बिपिन तुमच्या आज पर्यंत वाचलेल्या लेख कथा पेक्षा ही कथा उजवी आहे, अत्यंत सुंदर मांडणी... सुंदर वेग व तुम्ही लेखन शैली !

बेस्ट बेस्ट बेस्ट !!!!

=D>

प्रमोद देव's picture

1 Mar 2009 - 10:54 am | प्रमोद देव

कथा म्हणून आवडली.
पण ही सत्य घटना असल्यास अविश्वसनीय वाटते.

सहज's picture

1 Mar 2009 - 12:19 pm | सहज

जबरी सॉलिड मज्जा आली. पूर्ण मनोरंजन!

भयानक!!!

विनायक प्रभू's picture

1 Mar 2009 - 12:30 pm | विनायक प्रभू

हे चाललय तरी काय? काल झळा आज फेड

वल्लरी's picture

1 Mar 2009 - 1:34 pm | वल्लरी

सुंदर कथा...आवडली.
---वल्लरी

प्राची's picture

1 Mar 2009 - 1:55 pm | प्राची

बिपिनभाऊ
मस्त कथा... =D> =D> =D>

अवांतरःही कथा ऐकताना गावी एकाकडून ऐकलेली सत्य घटना आठवली.एका म्हातार्‍या आजीला रात्री स्वप्नात तिच्या घरी चोरी होत आहे,असे दिसले.सकाळी उठली, तर खरच चोरी झालेली होती.स्वप्नामध्ये चोरने जे जे चोरले होते,ते खरेच चोरीला गेले होते.

देवदत्त's picture

1 Mar 2009 - 8:06 pm | देवदत्त

मस्त कथा आणि सुंदर मांडणी :)

ऋषिकेश's picture

1 Mar 2009 - 11:44 pm | ऋषिकेश

झक्कास कथा!!
बर्‍याच दिवसांनी मिपावर आल्याने एकदम बरं बाटलं :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

अनिल हटेला's picture

2 Mar 2009 - 8:41 am | अनिल हटेला

एकदम झक्कास !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सुप्रिया's picture

2 Mar 2009 - 11:08 am | सुप्रिया

मस्त कथा आणि कथेची मांडणीही मस्तच ! पण ही कथा खरी आहे की काल्पनिक ?

मृगनयनी's picture

2 Mar 2009 - 12:45 pm | मृगनयनी

बिपीन दा, मस्त!!!
जबरदस्त उत्कंठावर्धक!!!

"असंभव" नन्तर... पल्लवी जोशी बैन्ना सिरियल काढायला... एक सुपर्ब स्टोरी!!!!!!!

:)

अजून अशा स्टोरी'ज ऐकायला उत्सुक,

फृग फैनी.
;)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

सुगंधा's picture

2 Mar 2009 - 9:39 pm | सुगंधा

कथा एकदम मस्त.एकटे राहण्याचा जबर्दस्त परिणाम झालेला दिसतोय.
हि कथा अनुभवलेलि कि काल्पनिक?

लिखाळ's picture

3 Mar 2009 - 5:54 pm | लिखाळ

फार सुंदर कथा .. एकदम आवडली .. जियो !
-- लिखाळ.

शशिधर केळकर's picture

4 Mar 2009 - 1:11 am | शशिधर केळकर

फेडलंस मित्रा!
सॉलिड कथा, जब्र्या व्यक्तिचित्रण. अगदी खरे खुरे घडलेले प्रसंग असले, तरी इतके जिवंत करून लिहिणे कठीण काम आहे. तुम्हीच ते करणे इष्ट! मजा आली. मिपाच्या दिवाळी अंकातली एक नंबरी कथा!
आता पुढची केव्हा? रोज रोज दिवाळी नसली तरी चालेल, पण कथा पॉंइजे!

घासू's picture

4 Mar 2009 - 6:08 pm | घासू

खूपच छान! आणि काही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवलेला.

घासू

नंदन's picture

4 Mar 2009 - 6:24 pm | नंदन

कथा आवडली. मस्त जमून आली आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

भोचक's picture

4 Mar 2009 - 6:43 pm | भोचक

छान कथा बिपिनभौ. मजा आला. पार घाबरवून सोडलंत.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

सध्या चालत असलेल्या 'मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव' या धाग्यातील अनेकांनी लिहिलेल्या अनुभवांच्या प्रकाशात तुमची ही कथा म्हणजे वास्तविक अनुभवाचे कथन असावे, असेच वाटते. असे आहे का? कृपया कळवावे.

तत्सत's picture

6 Sep 2011 - 3:03 pm | तत्सत
येडा पप्पु's picture

5 Sep 2011 - 1:16 pm | येडा पप्पु

मस्त.......सुन्दर झालय राव तुमच लिखाण........

सुहास झेले's picture

5 Sep 2011 - 2:06 pm | सुहास झेले

वाह !!
मस्त कथा ... आवडली !!

सविता००१'s picture

6 Sep 2011 - 2:16 pm | सविता००१

अतिशय सुंदर लिहिले आहे बिपिनभौ. हा खरच तुमचा अनुभव आहे का?

मनराव's picture

6 Sep 2011 - 3:02 pm | मनराव

मस्त !!!

मृत्युन्जय's picture

6 Sep 2011 - 7:13 pm | मृत्युन्जय

एक चांगला धागा वर आला. आता परत समग्र बिका वाचणे आले.

बेष्ट कथेचं उत्खनन करतो आहे.

जेपी's picture

9 Feb 2014 - 12:54 pm | जेपी

जबरदस्त .

आयुर्हित's picture

10 Feb 2014 - 8:49 pm | आयुर्हित

माणसाने केलेले प्रत्येक कर्म हे त्याच्या बरोबरच राहते, जो पर्यंत तो त्यातून मुक्त होत नाही. काही भोग शिल्लक असतील तर पुनर्जन्म होतो हे गीतेतही सांगितले आहे.
कृपया कर्माचा सिद्धांत हे पुस्तक वाचणे.
ह्या जन्मात काही त्रास असतील तर नक्कीच गेल्या जन्माचा काही तरी हिशेब बाकी असतो.
आक्काचे नशीब चांगले आहे, ह्याच जन्मात त्यांनी परतफेड केली, नाहीतर पुढचा जन्म घ्यावा लागला असता.