अमराठी भाषिकांनाहि प्रेरणा देणारे शिवराय !!!
छत्रपति शिवाजी महाराजांचे कार्य,शौर्य,राजनिती,मुत्सद्दीपणा हे सर्व केवळ महाराष्ट्राच्या चौकटीमध्ये बंदिस्त रहाणे शक्यच नाही.महाराजांचे स्वराज्याचे उद्दीष्ट,त्यामागची भुमिका,येथे एतद्देशियांचे समतेचे ,ममतेचे, सुखाचे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे ही तो प्रभुचीच इच्छा हे महाराजांचे मनोगत महाराष्ट्राबाहेरचे विचारवंतानाहि उमगले होते,आहे.शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नेते नव्हते तर ते सर्व भारताचे आदर्श राष्ट्रपुरुष होते अशी भावना भारतीय विचारवंत अन प्रतिभावंत यांच्या मनात शिवकालात अन नंतरहि निर्माण झाली होती अन आजही ती कायम आहे.म्हणुनच मराठी बरोबरच भारताच्या अनेक भाषांमध्ये त्यांच्यावर खंडकाव्ये,
महाकाव्ये आणि स्फुट काव्ये निर्माण झाली.इतर भाषेमध्ये गध्य अन विवेचक चरित्रेहि लिहिली गेली यात महाराजांचे थोरपण लक्षात येते.
परमानंद नेवासकर हे महाकवि तर महाराजांना समकालीनच होते.त्यानी महाराजांचे चरित्र'शिवभारत"हे संस्क्रूतमध्ये लिहिले आहे.त्याच काळात जयराम पिंडे यांनी"पर्णालपर्वतग्रहणाख्यान"मध्ये पन्हाळा घेतला याचे वर्णन केले आहे.
आणखीहि एक संकर्षण सकळकळे यांचे शिवकाव्य प्रकाशात आले आहे.त्यामध्ये चंद्रराव मोरे यांचे पारिपात्य,कल्याण-भिवंडीची मोहिम, अफझलखान वध हे तीन महत्वाचे प्रसंग त्यात वर्णिले आहेत.समर्थानी तर त्यांच्या वेगळ्या वेगळ्या स्वभावाचे,वेगवेगळ्या पैलुंचे सुंदर वर्णन केले आहे.अद्नानदास या शाहिराने अफझलखान वधावर बहाद्दर पोवाडा रचला आहे.रामचंद्रपंत आमात्य हे अष्टप्रधानातील एक प्रधान.त्यानी "आद्न्यापत्रा"मध्ये महाराजांच्या राज्यव्यवस्थेबद्दल अतिशय योग्य शब्दामध्ये वर्णन केले आहे.
प्रतिक्रिया
27 Feb 2009 - 10:03 am | सुभाष
भूषण हा प्रख्यात हिंदी (ब्रज भाषेमधिल)कवि.त्याने तर महाराजांच्या मोहिमा प्रत्यक्ष पाहिल्या आहेत.
शिवभुषण अन शिवाबावनी अशी दोन अतिशय सुंदर ब्रज भाषेतिल काव्ये त्याने रचली आहेत.शिवाजी महाराजांच्या १४ गुणांचे वर्णन त्याने एका छंदामध्ये केले आहे.......सुंदरता,गुरूता,प्रभुता,भनि भूषन होत है आदर जामे !
सज्जनाता औ,दयालुता,दिनता,कोमलता झलके प्रजामे !!
दान क्रुपानहु को करिबो,करिबो अभय दिननको बरजामे !
साहसनों रन ठेक,विवेक,इते गुन एक सिवा सरजा मे !!!!
हिंदू धर्म,हिंदू संस्क्रूती,कुळधर्म,कुळाचाराच्या आधारे चालणारी हिंदू परंपरा यांचे रक्षण आपल्या तलवारीच्या जोरावर केल्याचा उल्लेख एका कवनामध्ये करताना तो म्हणतो.....
वेद राखे विदित पुरान राखे सारयुत रामनाम राख्यो अति रसना सुधार मे !
हिंदून की चोटी राखी है सिपाहिनकी,कांधेमे जनेऊ राख्यो माला राखी गरमे !!मिडी राखे मुगल मरोरि राखे पातसाह,वैरी पीसि राखे वरदा राख्यो करमे !
राजन की हद्द राखी तेग बल शिवराज,देवराखे देवल स्वधरम राख्यो घर मे !!!!
अर्थ --शिवजीराजाने आपल्या तलवारीच्या जोरावर वेद आणि पुराणे यांचे संरक्षण केले.सर्वस्वाचे सार असे जे रामनाम ते हिंदूंच्या जिव्हेवर कायम ठेवले.हिंदूंची शेंडी राखली आणि शिपायांची रोटी(ऊपजीविका)चालविली. खांध्यांवरील जानवी अन गळ्यातील माला सुरक्षित ठेवल्या.मोंगलांचे व्यवस्थित मर्दन केले अन बादशहास मुरगाळून टाकले.शत्रूंचे चूर्ण केले.इतके करुन आपल्या हाती वर देण्याचा अधिकार ठेवला.देवळात देव अन घरात कुलधर्म कुलाचार कायम ठेवले.(५१)
बंगालचे संस्क्रूत कवी कालिदास विध्याविनोद "शिवाजी चरितम्"नावाचे काव्य लिहिले असून ते कलकत्त्याच्या संस्क्रूत साहित्य पत्रिकेच्या ११ व्या अंकात प्रकाशित झाले आहे.बंगालमधील श्री.अंबिकादत्त व्यास या महाकवीने प्रगल्भ आणि बाणभट्ट शैलीत"शिवराज विजयम्" नावाचे गध्य चरित्र लिहिले आहे.डॉ.श्री.भा.वर्णेकर या विख्यात संस्क्रूत पंडिताने"श्रीशिवराज्योदरम्" नावचे सर्गबद्ध महाकाव्य लिहिले आहे
27 Feb 2009 - 10:05 am | सुभाष
बंगालमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी शिछत्रपतिंवर एक दिर्घ कविता लिहून बंगाली तरुणांना शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवण्याबद्दल आवाहन केले आहे.छिन्न,विघटित भारत एक धर्मराज्य पाशात बांधण्याची महाराज्यांची आकांक्षा त्यांना अनुकरणीय वाटली आहे.ते म्हणतात.- - -...
कोन दूर शताब्देर,कोन एक अख्यात दिवसेनाहि जानि आजि
मराठार कोन शैले अरण्येर अंधकारे बसे हे राजा शिवाजी
तव भाल उदभासिया ए भावना तडित्प्रभावत एसे छिवो नामि
एक धर्मराज्य पाशे खंड छिन्न विक्षिप्त भारत वंदे दिवो आमि !!
श्री.वा.भ.बोरकरांनी याचा सुंदर अनुवाद असा केला आहे----
कवण दूर शतकाच्या कवण्या अश्रुत दिवशी केंव्हा
नाही ठाउके आज कवण मराठी शैली बसला
कानन घन अंधारी प्रभु तुम्ही शिवराज
तडित्प्रभावत एक भावना उजळीत तुमच्या भाळा
स्थिरावली ह्रुदयात छिन्न विखंडित क्षिप्त भारता
सांधित बांधित एक धर्मराज्य पाशात !
श्री.जोगेंद्रनाथ बसू यांचे "शिवाजी" हे खंडकाव्य असेच प्रेरणादायक आहे.महाराजांच्या राज्यव्यवस्थेचे वर्णन करताना ते लिहितात----
द्न्यानी गुणी मंत्री जन अलंक्रुत सभा
धनपूर्ण राजकोष सुखी प्रजागण
रामराज्ये यथा बसे निश्चित निर्भय
स्नेहे प्रेमे बद्ध भ्रुत्य सैनिक सचिव
अर्थ---शिवछत्रपतिंचे राज्य हे रामराज्य होते.द्न्यानी,गुणी,मंत्रीगणानी राजसभा भूषित होती.राजकोषहि भरलेला असून प्रजा सुखी होती.सैनिक मंत्री आणि सेवक स्नेहाच्या पाशाने बांधलेले होते.
शचिन सेन गुप्तांनी बंगाली भाषेत एक नाटक लिहिले आहे." गैरिक पताका " या नाटकाच्या प्रारंभीच भवानी मंदिरात तानाजीला आपला उद्देश सांगतांना महाराज म्हणतात---- "आमि ताइ शक्तिर आराधना कोरछि,आमि तोहरी कोरते चाइछि एमनी एकटा जाति,जार प्रतिटी मानुष सकल अधिकार आयत कोर धरणीर बूके बेडे उठते पारे तारई जन्य आमार राज्येर प्रयोजन" 'गैरिक पताका' मुळे प्रत्येक बंगाली ह्रुदयात शिवाजीराजांची एक ओजस्वी अश्वारुढ मूर्ती स्थापन झाली आहे.सोनार बांगलामध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरु केला.वंग भंग आंदोलन घडवून आणले.
27 Feb 2009 - 10:08 am | सुभाष
श्री.झवेरचंद मेघाणी हे गुजराथचे एक नावाजलेले कवी त्यानी "हाल रड्डु" या नावाने शिवाजी महाराजांचा एक उत्क्रुष्ट पाळणा लिहिला आहे त्यामधील कांही ओळ अशा----अभमां उगेल चांदलोने जिजाबाइने आव्या बाळ,बाळडानो मात हिंचोळे घणघण डगरा बोले.शिवाजीने नींदरू नावे माता जिजाबाई झुलावे,पेतमां पोटीने सांभाळेली बाळे राम लक्ष्मण नी बात,माताजीने मुखजे दी थी ऊडी एनी ऊंघते दी थी !
अर्थ...आकाशात चंद्र उगवला.आणि जिजाऊंच्या पोटी शिवाजी जन्माला आला.बालकाला जिजाबाई आंदुळते आहे.पण बाजूलाच डोंगराडोंगरात संकटाचा घणघण असा आवाज घुमतो आहे.त्यामुळे शिवबाबाळाला काही झोप लागत नाही.पोटात असतानाच आईच्या तोंडून ऐकलेल्या राम लक्षमणांच्या गोष्टींनी त्याची झोप पार उडाली आहे
श्री.वामन सिताराम मुकादम यांनी गुजराथी मध्ये ५८० पानांचे शिवचरित्र लिहिले आहे.हिन्दी भाषेमध्ये शिवचरित्रावर सहा महाकाव्ये असुन खंडकाव्ये बरीच आहेत.श्री केदारनाथ मिश्र यांचे 'रक्त के अक्षर" हे खंड फारच उदबोधक आहे.डॉ.सुरेन्द्रनाथ सेन यांनी शिवाजी महाराजांची' परकियांनी लिहिलेली चरित्रे 'या नांवाचा ग्रंथ संपादित केला असून त्यात फ्रान्सिस मार्टीन (फ्रेंच),कॉस्मा द गार्डा (पोर्तुगीज)व अन्य डच लेखकांनी लेखकांनी लिहिलेली माहिती एकत्र केली आहे.
खाफीखान हा महाराजांचा कट्टर द्वेष्टा याने महाराजांविषयी फार्सी भाषेत लिहिले आहे " शिवाजीने सर्वकाल स्वराज्याच्या प्रजेचा मान राखण्याचा प्रयत्न केला.लज्जस्पद क्रुत्यांपासून तो सदैव अलिप्त राहिला.मुसलमान स्त्रियांच्या अब्रूंचे त्याने दक्षपणे रक्षणच केले.मुसलमान मुलांचेहि त्याने रक्षण केले.या बाबतीत त्याच्या आद्न्या फार कडक होत्या.जो कोणी या अद्न्यांचा भंग करील त्याला तो कडक शासन करीत असे."
श्री.कोमाराजू वेंकट लक्षणराव हे तेलगू इतिहासकारांचे अग्रणी समजले जातात.त्यांनी तेलगू भाषेतील " शिवभारतम "नावाच्या महाकाव्यामध्ये ते म्हणतात----
धीर ग्रसरमूर्ति हइंदवधरित्री भाग्य सत्यापनम्!
प्रारंभुडु दयागुणाम्बुधी महाराष्ट्रान्वयत्तोम सुंडौ
वीर क्षत्रीय मौली देशमत गोवेदादि रक्षार्पित
धीरम्युंड भवानी भवत्त्तुंड शिवाजी राजु सामान्युडे !!
अर्थ---धीरोदत्तांचा अग्रेसर,हिंदुभूमीच्या भाग्योदयाचा प्रारंभक,दयेचा सागर,महाराष्ट्राच्या चारित्राचे प्रतीक,वीर क्षत्रीय.मौली देश,गायी अन वेद यांचा रक्षणकर्ता,लक्षीचा लाडका अन भवानीचा भक्त शिवाजीराजा असामन्य होता.
27 Feb 2009 - 10:10 am | सुभाष
कन्नड कवी श्री निवास यानी मावळेगळ नावाचे काव्य रचले आहे,त्यामध्ये ते शिवरायांचे वर्णन असे करतात-----
शिवराय शत्रुरायर गंड शिवरायर हगेयजवराय
तवकित म्लेंच्छर कत्तले तंडके शिवराय चंड मार्तांड !!
अर्थ--शत्रुना पुरुन उरणारा व वैर्यांचा कर्दनकाळ असा हा शिवराय दुर्दात मेंच्छ राज्याच्या अंधकाराचा नाश करुन चंड सूर्याप्रमाणे नभांगणामध्ये तळपत आहे .
श्री.सुब्रह्मण्यम भारती हे तमिळ साहित्याचे पितामह समजले जातात.शिवराय आपल्या सहकार्याना उद्देशून आवाहन करीत आहेत असा प्रसंग कल्पून ते लिहितात--जय जय भवानी!जयजय भारतम्
शनैत्तलेवरघाळ,शिरन्द मंत्रिघाळ
नीरदन पुदलघर,इन निनैवह जादिर!
भारतनाडु पाकैल्लाम तिलकम्
नीरदन पुदलवर इन निनैवह जादिर!
अर्थ---भवानीचा जयजयकार असो,भारताचा जयजयकार असो.माझ्या सेनापतींनो आणि राजकारणी मुस्तद्दी मंत्र्यानो,तुम्ही या भुमीचे सुपुत्र आहात हे विसरु नका.हे या भुमीच्या पाईकांनो,भारतवर्ष हा अलम दुनियेचा सौभाग्य तिलक आहे हेहि विसरु नका.
शिवरायांच्या हयातीतच त्यांच्या विषयीच्या अदभुत कथा आसामपर्यंत पोहोचल्या होत्या.शिवाजीराजांची ही मुर्ती इतिहास संशोधकाना ही श्रध्येय वाटली हे विशेष .सर जदुनाथ सरकार हे सुरवातीला महाराजांचे भक्त नव्हते.ते औरंगजेबाचे चरित्र लिहित होते.शिवाजीराजे हे त्या चरित्रामधील एक प्रकरण होते.पण जसजशी साधन,आधार,माहिती मिळत गेली आणि जदुनाथांनी ती सत्याच्या निकषावर घासून पाहिली तशी तशी त्यांच्या मनात महाराजांची प्रतिमा उजळू लागली,आणि "आधुनिक इतिहासातील युगप्रवर्तक राष्ट्रपुरुष"अशा शब्दामध्ये त्यांनी महाराजांचा गौरव केला.
मराठी भाषेनंतर महाराजांचे पहिले चरित्र(बॉयोग्राफी)ऊर्दूमध्ये लाला लजपतराय यांनी लिहिले.नंतर बहुतेक सर्व भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले.पारतंत्राच्याकाली राष्ट्राला प्रेरणा देणे,गलितगात्रांचे मनोधैर्य,आत्मविश्वास जाग्रुत करणे याहेतूने देशभक्तांनी शिवाजीराजांविषयी साहित्य निर्मिती सुरु केली.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हिंदुस्थानातुन प्रयाण करण्यापुर्वि दिलिप रॉय यांचेशी जे बोलणे झाले ते रॉय यांनी अम्रुतबझार पत्रिका.हिंदुस्थान स्टँन्डर्ड या व्रुत्तपत्रामधुन पसिद्ध झाले आहे.नेताजी रॉय यांना म्हणाले की"आपल्याला शिवाजी महाराजांच्या धोरणाचे अनुकरण करावे लागेल.त्यांनी strategy हा शब्द वापरला आहे.नेताजींनाहि महाराजांचे अनुकरण करावेसे वाटले.
25 Mar 2009 - 9:58 pm | चकली
सुभाष ,
महितीपूर्ण लेखन. सगळे सग्रंहित स्वरूपात वाचयला आवडेल.
चकली
http://chakali.blogspot.com
26 Mar 2009 - 8:10 am | प्राजु
+१
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Feb 2009 - 10:24 am | प्रमोद देव
सुभाष आपला व्यासंग दांडगा दिसतोय!
खूपच नवी माहीती मिळते आहे.
येऊ द्या अजून.
27 Feb 2009 - 3:59 pm | सहज
सुभाषजी अजुन लेखन येउ द्या.
पुढील लेखनास शुभेच्छा!
27 Feb 2009 - 1:42 pm | सुभाष
विजयनगरच्या नाशानंतर हिंदुसमाजात निराशा पसरली होती.अनेक वर्षाच्या गुलामगिरीमुळे स्वातंत्र आणि स्वाभिमान यांचा विचार क्षीण झाला होता.सत्ताधिश फक्त मुस्लिमच,हिंदू सत्ताधिश होउच शकणार नाही असा न्युनगंडा निर्माण झाला होता.हिंदूच असे मानत होते की"जगदिश्वरो वा दिल्लिश्वरो" काशीचा जगदिश्वर आणि दिल्लिचा बादशहा...दोनच परमेश्वर.अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवरायांनी समतेचे ,ममतेचे,सुखाचे धर्मराज्य निर्माण केले.महाराजांनी केलेली हिंदवी स्वराज्याची स्थापना ही एक अलौकिक घटना होती.भारतीय इतिहासकार जदुनाथ सरकार लिहितात----
The coronation of Chatrapati Shivaji has shown that the tree of hinduism is not really dead,like the Akshaya vatut tree of allahabad.it can risefrom beneath the seemuingly crushing load of centuries of political bondage.it can put forth new leaves and branches can again lift its head upto the skies.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची कल्पना आली की ,श्रीक्षेत्र प्रयागच्या अक्षय वटव्रुक्षाची आठवण होते.जहांगिर बादशहाने हा अक्षय वटव्रुक्ष मुळापासुन तोडुन त्यावर निखारे ठेवले,अशाकरिता की पुन्हा कधीहि त्याव्रुक्षाचा अवशेष कोणाला दिसू नये.पण दहा विस वर्षानी तो वटव्रुक्ष पुन्हा उगवला! त्याच प्रमाणे हिंदुत्वाचा व्रुक्ष अक्षय आहे हे इतक्या शतकानंतरहि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने दाखउन दिले.
27 Feb 2009 - 1:49 pm | सुभाष
श्री. प्रमोद देव, ५ भाग पोस्ट केले....६ वा भाग पोस्ट करणार तितक्यात लाईत गेली....आत्ता लाईट आली अन जेवायच्या अगोदर ६ वा भाग पोस्ट केला.तुम्हाला आवडले हे ऐकून बरे वाटले.आपल्यासारखीच आवड असणारे कोणी आहे हे समजल्या जसा आनंद होतो तसा आनंद झाला.धन्यवाद.
27 Feb 2009 - 4:21 pm | रम्या
अतिशय छान. सुंदर विषयावरील अतिशय सुंदर संग्रह!
पुढील लेखनास शुभेच्छा!!
आम्ही येथे पडीक असतो!
27 Feb 2009 - 4:28 pm | चैतन्यकुलकर्णी
शोध घेत रहा ... उत्तमतेचा, नाविन्याचा आणि सत्याचा!
28 Feb 2009 - 1:45 am | सुभाष
शोध घेत रहा ... उत्तमतेचा, नाविन्याचा आणि सत्याचा!
अगदी समर्पक प्रतिकिया व्यक्त केलीत्.धन्यवाद
27 Feb 2009 - 4:44 pm | विसोबा खेचर
सुभाषराव,
ऊर अभिमानाने भरून आला!
असा महामानव पुन्हा होणे नाही.. महाराजांना मानाचा मुजरा!
तात्या.
28 Feb 2009 - 1:51 am | सुभाष
खरेच असा महामानव पुन्हा होणे नाही . पराकोटीचे शौर्य असुनहि या महामानवकडे क्रौर्य थेंबभरहि नव्हते. त्यांना कोटी कोटी प्रणाम.
26 Mar 2009 - 7:18 am | सनविवि
>> पराकोटीचे शौर्य असूनही या महामानवाकडे क्रौर्य थेंबभरही नव्हते.
+१!
सुभाषजी, फार माहितीपूर्ण लेख आहे, असंच लिहित राहा :)
27 Feb 2009 - 4:56 pm | अभिजीत मोटे
अतिसुंदर. फारच नविन माहीती वाचायला मीळाली. पुढील लिखाणास शुभेच्छा.
............अभिजीत मोटे.
28 Feb 2009 - 2:07 am | सुभाष
अभिजीत तुमच्या शुभेच्छेमुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढला आहे.धन्यवाद
27 Feb 2009 - 5:05 pm | विटेकर
वाट पहातोय !
अप्रतिम, महाराजांसारखा राजा मिळावा अशी आमची लायकिच नाही.
शुभेच्छा !
आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!
28 Feb 2009 - 2:00 am | सुभाष
"महाराजांसारखा राजा मिळावा अशी आमची लायकिच नाही."
इतके निराश होउ नका.शिवाजी महाराजांच्यावेळीहि अशीच परिस्थिती होती.अन सर्वसामान्य जनतेने साथ देउन शत्रुला उधळुन लावले.आजहि असा नेता आपल्याला लाभला तर .......आजची सर्वसामान्य जनताच असामान्य इतिहास निर्माण करील.
27 Feb 2009 - 5:26 pm | लिखाळ
उत्तम.. फारच छान..
अजून पुढे वाचायला उत्सुक आहे.
थोडे विस्तृत लिहिलेत तर अजून काही तपशील समजतील.
-- लिखाळ.
28 Feb 2009 - 2:03 am | सुभाष
विस्तृत लिहिण्यासंबंधीची आपली सुचना मान्य.धन्यवाद
27 Feb 2009 - 6:25 pm | गणपा
छान उद्बोधक माहिती सुभाषराव..
शिवाजी महाराजां बद्दल बरीच नवीन माहिती मिळाली.
आज वर जे काही महारजां विषयी वाचल ते मराठी आंणि ईंग्रअजीतुनच.
ईतर प्रादेशीक भाषांतुन पण महाराजां बद्दल इतक लिहीलय हे माहित नव्हत.
पुढच्या भागांची वाट पहतोय...
28 Feb 2009 - 1:39 am | सुभाष
तुमच्या ऊत्साहि प्रतिसादामुळे माझा लिहिण्याचा ऊत्साह अजुनच वाढला आहे.धन्यवाद.
28 Feb 2009 - 1:42 am | सुभाष
मनापासुन धन्यवाद.
27 Feb 2009 - 7:12 pm | अनामिका
सुभाषकाका!
मिपावरच्या आपल्या लिखाणाचा श्रीगणेशा शिवरायांना स्मरुन आणि त्यांच्या विषयीच्या आगळ्यावेगळ्या विषयावर लेख लिहुन केल्याबद्दल आपले अभिनंदन!
आजपर्यंत फक्त मायमराठीतुनच आणि प्रसंगी आंग्लभाषेतुन महाराजांबद्दल वाचत आणि माहिती करुन घेत आलो पण तुम्ही इथे हजेरी लावली आहेत म्हणजे बर्याच माहीत नसलेल्या गोष्टि देखिल कळणार आहेत याबद्दल शंकाच नाही.
महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर प्रदेशातील कवी ,साहित्यिक व लेखकांकडुन महाराजांबद्दल इतक्या विस्तृतपणे लिहिले गेले असेल हे कधी लक्षात आलेच नाही.
तुमच्या ज्ञानाचा व माहितीचा खजीना मिपावर लवकरात लवकर उपलब्ध करुन द्या!
महाराजांबद्दलचा अभिमान आज १००० पटीने दुणावला त्याचे श्रेय आपल्या या लेखालाच.
महाराजांचे अलौकीकत्व इतर भाषिकांनी मान्य केले पण आपण एत्तदेशीय मात्र कपाळकरंटेच, कारण उगीच आस्तित्वात नसलेल्या नसत्या वादांना आपल्यातलेच काही सुर्याजी पिसाळ तोंड फोडुन शिवरायांचा अपमान करीत फिरत आहेत.
"अनामिका"
28 Feb 2009 - 1:34 am | सुभाष
अनामिका/प्रद्न्या....
महाराजांच्या शौर्य्, धैर्य,पराक्रम ,मुत्सद्देगिरी, स्वराज्याच्या ध्येयावरची अढळ निष्टा,दुरदर्शीपणा वगैरे गुणांवर अमराठी भाषिकहि प्रभावित झाले नसतील तर नवलच्.साधारणपणे आपण मराठी माणसे मराठी,हिंदी,इंग्रजी यांचे वाचन करतो् हिंदी आणि मराठी लिपीमध्ये खुपच साम्य आहे .पण तमिळ,मल्याळम.तेलगू,कन्नड या भाषांची लिपी अगदी वेगळी आहे(मला तर या ४ भाषेंची अक्षरे कडबोळ्यासारखीच वाटतात ) म्हणुन आपण या भाषेंच्या वाटेला जात नाही. " महाराजांचे अलौकीकत्व इतर भाषिकांनी मान्य केले पण आपण एत्तदेशीय मात्र कपाळकरंटेच" हे तुमचे म्हणणे बरोबरच आहे. शिवरायांचे कैसे चालणे,शिवरायांचे कैसे बोलणे,शिवरायांची सलगी देणे कैसी असे?" हेच आपल्यामधिल काही जण विसरत चाललो आहेत. महाराजांनी भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले अन ममतेचे,समतेचे,सुखा--शांतीचे राज्य निर्माण केले.मग आपले आजचे स्वराज्य आपण बलाढ्य करण्यासाठी अपापसातील मतभेध,भांडण बाजुला ठेऊन एकत्र यायला हवे ना?
28 Feb 2009 - 10:59 am | अमोल नागपूरकर
बाबासहेब पुरन्दरेनी एकदा सन्गितले होते की बान्गला देश मुक्तिलढ्यातील काही योद्ध्यान्नीही शिवरायान्पासून प्रेरणा घेतली होती.
5 Mar 2009 - 3:32 am | सुभाष
अमोल, बाबासाहेब पुरंदरे म्हणजे मुर्तिमंत इतिहासच्.त्यानी सांगितले म्हणजे खरेच असणार.स्वातंत्र मिळविणार्या अनेकांना शिवाजी महाराजांपासुन प्रेरणा मिळाली आहे.व्हिएतनामचे स्वातंत्रसेनानी हो चि मिन्ह यांनी तर दिल्लीला पत्रकार परिषदेमध्येच हे मान्य केले होते की व्हिएतनामी जनतेने शिवाजी महाराजांच्या गनिमीकाव्याचा उपयोग करुनच व्हिएतनाम स्वातंत्र केले !
25 Mar 2009 - 9:32 pm | आळश्यांचा राजा
सुंदर लेख आणि चर्चा.
आळश्यांचा राजा
25 Mar 2009 - 10:35 pm | सर्वसाक्षी
मा. सुभाषराव,
अत्यंत स्तुत्य लेखनमाला! शिवराय हे केवळ मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत नव्हते तर ते स्वातंत्र्यसंग्रामात सर्वस्वाची आहुती द्यायला सिद्ध् झालेल्या क्रांतिकारकांचेही आराध्य व स्फूर्तिदाते होते.
हुतात्मा भगतसिंग हे काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनाला (१९२४?) 'अकाली' या पत्राचे प्रतिनिधी म्हणुन जेव्हा दक्षिणेत आले तेव्हा ते आवर्जुन महाराष्ट्रात आले व रायगडावर जाऊन त्यांनी तेथली माती मस्तकी लावुन स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला होता.
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आता देश सोडुन बाहेर पडणे आवश्यक आहे या निष्कर्शाप्रत येताच नेताजी सुभाष यांनी आपल्या तुरुंगवासात बाहेर निसटण्यापूर्वी जदुनाथ सरकार लिखित शिवचरित्रातील 'आग्र्याहुन सुटका' पर्वाची पारायणे केली होती.
मा. बाबासाहेब पुरंदरे यांच्या सहवासात जेव्हा पन्हाळा-विशाळा-प्रतापगड असे भटकायची संधी आली तेव्हा 'प्रतापगडचे युद्ध' जगातील नऊ देशांच्या लष्करी प्रशिक्षण अकादमींमध्ये अभ्यासक्रमात समाविष्ट असल्याची थक्क करणारी माहिती मिळाली होती. कमीत कमी वेळात कमीत कमी माणसांनिशी कमीतकमी युद्धसामग्रीत बलाढ्य शत्रूचा साफ फडशा पाडणारे हे गनिमी काव्याचे युद्ध म्हणजे नियोजन, निर्धार, अभ्यास, निष्ठा व शौर्य यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
उत्तम माहितीबद्दल धन्यवाद.
27 Mar 2009 - 12:22 pm | विशाल कुलकर्णी
सुभाषजी, अतिशय सुंदर आणि उत्साहवर्धक लिहीलय तुम्ही. उर भरुन आला. अभिनंदन आणि धन्यवाद.
कविराज भुषण यांनी शिवबांवर लिहीलेल्या श्री सिवराज भुषण या काव्यातल्या काही ओळी इथे देत आहे. पंडित रत्नाकर त्रिपाठी असे मुळ नाव असलेल्या या उत्तर भारतीय कविने सुरुवातीचा काही काळ औरंगजेबाकडेही चाकरी केली होती. पण तिथे केवळ बादशहाचे गुणगान करणारी काव्येच लिहीण्याची मुभा असल्याने या स्वाभिमानी कविने राजाश्रय नाकारला व पुढे तो शिवरायांची किर्ती ऐकुन तत्कालिन हिंदवी स्वराज्यात आला. केवळ व्यक्तीचे गुणगान करणार नाही म्हणुन औरंगजेबाचा आश्रय सोडलेला हा विलक्षण कवि शिवाजी महाराजांच्या दैवी व्यक्तिमत्वाने एवढा प्रभावीत झाला की त्याने राजांवर एक सोडुन दोन महाकाव्ये लिहीली.
"श्री सिवराज भुषण" आणि "शिव भवानी"
......................................................................................................
जै जयंति, जै आदि सकति, जै कालि कपर्दिनी
जै मधुकैटभ छलनी, देवि जै महिष बिमर्दिनी !!
इंद्र जिमि जंभपर, वाढव सुअंभपर, रावन सदंभपर
...............................रघुकुल राज है !
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यो सहस्त्रबाह पर
...............................राम द्विजराज है !
दावा दृमदंड पर, चीता मृगझुंडपर, भुषण बितुंडपर
..............................जैसे मृगराज है !
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यो मलिच्छ बंस पर
.............................. सेर सिवराज है
.............................. सर्जा सिवराज है !
दशरथ जु के राम, मै वसुदेव के गोपाल !
सोंई प्रगटे साहि के, श्री सिवराज भुपाल !!
सिव हि औरंग जीत सके, और न राजा राव !
हत्थिं मत्थ पर सिंह बिनु, और न घालै घाव !!
औरन को जो जनम है, सो याको यक रोज !
औरनको जो राज है सो, सिर सरजाको मौज !!
जीवन में नर लोग बडों, कवि भुषन भाषत पैज अडो है !
है नर लोगनमें राज बडों,सब राजनमे सिवराज बडों है !!
को दाता ? को रन चढो ? को जग पालनहार...!
कवि भुषन उत्तर दिखो, सिव नृप हरि अवतार..!!
तेरे तेज है सरजा दिनकरसो, दिनकर है तेरे तेज के निकटसो !
तेरो जस है सरजा हिमकरसो, हिमकर है तेरो जस के अकरसो !!
कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ
............................सरजा जस आगे !
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ
........................ तेरे साहसके आगे !!
कवि सिवराज भुषण
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)