कालच 'स्लमडॉग मिलिएनिअर' हा चित्रपट पाहिला. बरीच उलट-सुलट मते, नावावरून झालेले वादंग, गोल्डन ग्लोब, बाफ्टा, ऑस्कर इत्यादी पुरस्कारांची लयलूट, भारताच्या ओंगळ आणि हिडीस चेहर्याची केलेली वारेमाप प्रसिद्धी इत्यादी बाबींमुळे हा चित्रपट गेले कित्येक आठवडे कायम चर्चेत राहिला आहे. उत्सुकता होतीच की या चित्रपटात असे नेमके काय असेल ज्यामुळे सर्वत्र याचीच चर्चा होत आहे. अखेर तो योग काल आला. अर्थात बरेच पूर्वग्रह मनात ठेवून हा चित्रपट पाहिला. आस-पास घडणार्या घटनांचा, जनमानसात दिल्या गेलेल्या प्रतिक्रियांचा आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा मनावरचा प्रभाव पूर्णपणे काढून टाकून अगदी कोर्या मनाने हा चित्रपट पाहणे अवघड होते हे मान्य! तरीही मी शक्य तितक्या त्रयस्थपणे या चित्रपटाकडे पाहण्याचा प्रयत्न केला.
चित्रपटाची निर्मितीमुल्ये अत्युच्च दर्जाची होती यात शंकाच नाही. छायालेखन तर उत्कृष्ट होतेच पण इतर तांत्रिक बाबी खूपच सरस होत्या. कॅमेराचा वापर अगदी परिणामकारकरीत्या केला गेला आहे. पात्रांना ओळख देतांना, त्यांच्या व्यक्तीरेखा घडवतांना आणि गोष्ट उलगडून सांगतांना आस-पासच्या परिसराचा, प्रकाशयोजनेचा, गडबड-गोंधळाचा पात्र म्हणून उपयोग करून घेण्यात कॅमेरा यशस्वी ठरलाय. छायालेखकाने प्रत्येक निर्जीव गोष्टीला एक व्यक्तिमत्व दिलेले आहे आणि त्यातूनच चित्रपटाचा संदर्भ आणि एकूण चेहरा स्पष्ट होतो. झोपडपट्टीचे आणि मोठ्या इमारतींचे एका चौकटीत घडणारे दर्शन, लहान पोरे पोलीस आल्यानंतर सैरावैरा पळतांना कव्हर केलेला घाणीचा आणि झोपडपट्टीचा भाग इत्यादी प्रसंगांमुळे चित्रपटाचा संदर्भ अगदी पहिल्या १-२ फ्रेम्समध्ये स्पष्ट होतो आणि पुढचा प्रवास दाखविण्यात चित्रपटाची आणखी रीळे आणि संवादाची भेंडोळी खर्ची पडत नाहीत.
पटकथा मात्र मला तितकीशी रुचली नाही. जमाल पोलीस स्टेशनमध्ये बसून चित्रपट उलगडून दाखवतो ही कल्पना थोडी गुंतागुंतीची वाटली. इरफानच्या प्रश्नांना जमाल उत्तरे देतांना शोमधला प्रसंग आणि मग त्याला प्रश्नाचे उत्तर कशामुळे माहित होते तो प्रसंग असा हा एक कोटी पर्यंतचा प्रवास एक-एक प्रश्नागणिक पुढे सरकतो. अनिल कपूर पोलीसांना बोलावून जमालला त्यांच्या ताब्यात देतो. कुठल्याही लेखी तक्रारीशिवाय पोलीस जमालला कसे काय घेऊन जातात? एक सूत्रसंचालक म्हणून अनिल कपूर स्वतः असा निर्णय कसा काय घेऊ शकतो? शोचे निर्माते, प्रायोजक, दिग्दर्शक इत्यादींना या निर्णयाशी काहीच घेणे-देणे नसते का? चौकशी करून इरफानला जमालच्या सांगण्यातली सत्यता पटते आणि तो त्याला शेवटच्या प्रश्नासाठी शोमध्ये जाण्याची परवानगी देतो. हा भाग खूपच बाळबोध वाटला. अचानक सलीमचे हृदयपरिवर्तन कशामुळे होते? स्वतः मरणार आहे ही खात्री असून देखील तो पळून जाण्याचा प्रयत्न का करत नाही? पापाचे परिमार्जन करण्यासाठी म्हणून तो मरणे पसंत करतो असे घटकाभर मानले तरी त्याच्यात इतका बदल अचानक कसा काय घडतो? लतिकासोबत पळून जाऊन तो जमालच्या प्रेमातला काटा होऊ नये म्हणून दुसरी वाट का पकडत नाही? जावेदला मारणे खरोखर आवश्यक होते का? एक स्पर्धक खेळतांना फसवतो आहे या एका क्षुल्लक शंकेने पोलीस त्याला इतका त्रास देतात तर नायिका मिळाल्यानंतर आणि दोन कोटी मिळाल्यानंतर जावेदविषयी जमालने केलेली तक्रार पोलीसांनी ऐकून घेतली नसती का? किंवा जावेदला मारून सलीम पळून जातो असे दाखवणे शक्य झाले नसते का? की तो पापी आहे म्हणून त्याने मेलेच पाहिजे हा गुळगुळीत चित्रपटीय सिद्धांत वापरून त्याला मारले आहे? एक सरळ पटकथा लिहिली असती तर उत्कंठा वाढली नसती का? पहिल्या भागात चित्रपट थोडा रटाळ वाटतो. लहान मुलांचा भाग थोडा ताणलेला वाटला. शौचालयाच्या टाकीत उडी टाकून अमिताभला भेटायला जाणारा जमाल हा भाग खरच खूप हिडीस आणि अनावश्यक वाटला. त्या प्रसंगाची गरज लक्षात आली नाही. जमालला उत्तरे कशी माहित असतात हे दाखविणारे प्रसंग देखील ओढून्-ताणून घुसडल्यासारखे वाटतात. एक तासानंतर चित्रपट खूप प्रेडीक्टेबल होतो आणि हिंदी चित्रपटाच्या वळणावर जातो. एकंदरीत पटकथेत उत्कंठा मुल्य खूप कमी वाटले.
अभिनयाच्या बाबतीत अनिल कपूरने बाजी मारलेली आहे. शूटींग सुरु होण्या आधीचा धुसफुसत असलेला अनिल आणि लाईट्स ऑनचा आदेश आल्यानंतरचा हसतमुख अनिल हे अक्षरशः पाच ते सात सेकंदात बदलणारे भाव त्याने खूप सुंदर दाखवले आहेत. एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला शोच्या सूत्रसंचालकाची भूमिका करताना जो बाज आवश्यक आहे तो त्याने योग्यरीत्या पकडला आहे. अधून्-मधून जमालला टोचणारे प्रश्न विचारून त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न त्याने फार सुंदररीत्या दाखवले आहेत. लहानपणीचा जमाल, सलीम, लतिका यांची कामे अव्वल झाली आहेत. रुबिनाने लहानपणीची लतिका खूप सुंदर साकरली आहे. आयुष खेडेकरचा जमाल खूपच खरा आणि अप्रतिम! तन्वी लोणकरची थोडी मोठी लतिका पण छान! आंधळ्या भिकार्याची भूमिका करणारा मुलगा पण अभिनयात बाजी मारतो. देव पटेल ठीक वाटला. त्याचे भाव योग्य होते पण बोलण्यातला ब्रिटीश उच्चार त्याच्या व्यक्तिरेखेला खटकतो. इरफान एकच भाव घेऊन वावरतो आणि संवाद नीट म्हणत नाही. त्याचे काम एकसूरी आणि कंटाळवाणे वाटते, सौरभ शुक्ला ठीक. महेश मांजरेकर छोट्याश्या भूमिकेत भाव खाऊन जातो. लतिका आणि जमालच्या सँडविच बनवतांना होणार्या संवादाकडे त्याचे लक्ष गेले तर तो त्यांना गोळ्या घालेल की काय अशी भीती वाटते यातच महेशच्या अभिनयाचे यश दडलेले आहे. फ्रिदा पिंटोने काम चांगले केले आहे. भिकार्यांचा ठेकेदार खूपच मस्त रंगला आहे. लहान मुलांशी प्रेमाने वागून त्यांना भीक मागायला लावणारा क्रूर ठेकेदार त्याने खूप मस्त रंगवला आहे. बाकी श्रुती सेठ (कॉल सेंटरमधली मुलगी), राज झुत्शी (शोच्या टीमचा सदस्य) इत्यादींची कामे योग्य झाली आहेत.
पार्श्वसंगीत सामान्य आहे. 'जय हो' आणि 'रिंगा रिंगा' रहमानच्या इतर उत्कृष्ट गाण्यांपेक्षा कमी उत्कृष्ट आहेत. संवादलेखन अगदीच सामान्य आहे. मसाला चित्रपटाची फोडणी देतांना संवाद अजून खटकेबाज असायला हवे होते. उत्तरे शोधण्यासाठी जमालला जे आयुष्यातले प्रसंग आठवतात त्यांची लांबी कमी करून टोकदारपणा वाढवता आला असता. सरळ पटकथा ठेवली असती तर उत्कंठामुल्य वाढले असते असे मला वाटले. आताच्या पटकथेत चित्रपट तुकड्या-तुकड्यांनी जोडल्यावर होतो तसा कोलाजसदृष्य झाला आहे आणि त्यामुळे कथनामध्ये सुसुत्रता वाटत नाही.
एकंदरीत 'स्लमडॉग मिलिएनिअर' ठीक्-ठाक चित्रपट वाटला. बघायला मिळाला तर ठीक आणि बघायला नाही मिळाला तर काही तरी चांगले न बघितल्याचा पश्चाताप न वाटायला लावणारा वाटला. आपल्याकडचा 'जॉनी गद्दार' आठवा. उत्कृष्ट पटकथा, क्षणोक्षणी वाढत जाणारी उत्कंठा आणि आटोपशीर मांडणी यामुळे हा चित्रपट पुन्हा-पुन्हा बघितला तरी कंटाळा येत नाही. 'आमीर' देखील थोड्या-फार प्रमाणात तसाच वाटला. याहून खूप काही वेगळा "स्लमडॉग..." निश्चितच नाही. पण हॉलीवूडचा परीसस्पर्श झाल्यानंतर यशाच्या आणि जागतिक स्तरावर वाखाणले जाण्याच्या आणि पर्यायाने प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळण्याच्या शक्यता कैकपटीने वाढतात हे खरे!
--समीर
प्रतिक्रिया
25 Feb 2009 - 11:57 am | अमोल केळकर
खुप छान परिक्षण केले आहे.
आवडले
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
25 Feb 2009 - 12:10 pm | अनिल हटेला
उत्तम परीक्षण !!
कालच पाह्यला चित्रपट !! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
25 Feb 2009 - 12:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अनिल कपूर पोलीसांना बोलावून जमालला त्यांच्या ताब्यात देतो. कुठल्याही लेखी तक्रारीशिवाय पोलीस जमालला कसे काय घेऊन जातात? एक सूत्रसंचालक म्हणून अनिल कपूर स्वतः असा निर्णय कसा काय घेऊ शकतो? शोचे निर्माते, प्रायोजक, दिग्दर्शक इत्यादींना या निर्णयाशी काहीच घेणे-देणे नसते का? चौकशी करून इरफानला जमालच्या सांगण्यातली सत्यता पटते आणि तो त्याला शेवटच्या प्रश्नासाठी शोमध्ये जाण्याची परवानगी देतो. हा भाग खूपच बाळबोध वाटला.
मधे गाणी आली असती, एखादा 'इमोसनल अत्याचार' आई, बहीण टाईप सीन आला असता, गेलाबाजार एखादी अतर्क्य मारामारी आणि लगेचच ड्रीम सिक्वेन्स गाणं तर मला फारच सामान्य वाटलं असतं.
शोचे निर्माते, प्रायोजक, दिग्दर्शक इत्यादी लोकं => अधिक पात्रं, अधिक मसाला, अधिक खर्च, अधिक गाणी!
शिवाय पिच्चर पुरेपूर तीन तास चालण्यात बरीच भर पडली असती.
अचानक सलीमचे हृदयपरिवर्तन कशामुळे होते? स्वतः मरणार आहे ही खात्री असून देखील तो पळून जाण्याचा प्रयत्न का करत नाही? पापाचे परिमार्जन करण्यासाठी म्हणून तो मरणे पसंत करतो असे घटकाभर मानले तरी त्याच्यात इतका बदल अचानक कसा काय घडतो? लतिकासोबत पळून जाऊन तो जमालच्या प्रेमातला काटा होऊ नये म्हणून दुसरी वाट का पकडत नाही? जावेदला मारणे खरोखर आवश्यक होते का? एक स्पर्धक खेळतांना फसवतो आहे या एका क्षुल्लक शंकेने पोलीस त्याला इतका त्रास देतात तर नायिका मिळाल्यानंतर आणि दोन कोटी मिळाल्यानंतर जावेदविषयी जमालने केलेली तक्रार पोलीसांनी ऐकून घेतली नसती का? किंवा जावेदला मारून सलीम पळून जातो असे दाखवणे शक्य झाले नसते का? की तो पापी आहे म्हणून त्याने मेलेच पाहिजे हा गुळगुळीत चित्रपटीय सिद्धांत वापरून त्याला मारले आहे?
सलीमच्या आयुक्षात करण्यासारखं रहातंच काय? कुठेही पळाला तरी जावेदने त्याला सोडलं असतं का? बदला घेता आला ना आता त्याला, राव!
शौचालयाच्या टाकीत उडी टाकून अमिताभला भेटायला जाणारा जमाल हा भाग खरच खूप हिडीस आणि अनावश्यक वाटला. त्या प्रसंगाची गरज लक्षात आली नाही
आवडत्या गोष्टीसाठी "काय वाट्टेल ते" (पक्षी: काहीही, कैच्याकै) करणारा मुलगाच पुढे मोठा झाल्यावर लतिकेसाठी एवढे कष्ट घेतो हे मला खूपच लॉजिकल वाटतं.
सरळ पटकथा ठेवली असती तर उत्कंठामुल्य वाढले असते असे मला वाटले.
आमिर खान, तामिळ गझनीवाला जो कोण दिग्दर्शक, मूळ मेमेंटोवाला यांनाही माझं हेच सांगणं आहे. किती उलट-सुलट करता राव, फिल्म अतिहाताळल्यामुळे खराब होईल ना!
अर्थात बरेच पूर्वग्रह मनात ठेवून हा चित्रपट पाहिला. आस-पास घडणार्या घटनांचा, जनमानसात दिल्या गेलेल्या प्रतिक्रियांचा आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा मनावरचा प्रभाव पूर्णपणे काढून टाकून अगदी कोर्या मनाने हा चित्रपट पाहणे अवघड होते हे मान्य! तरीही मी शक्य तितक्या त्रयस्थपणे या चित्रपटाकडे पाहण्याचा प्रयत्न केला.
मेरे कू कुच्च भी समज्या नही।
अवांतर: फ्रेडा पिंटोला पाहून मधूनच 'आभाळमाया'मधली संज्योत हर्डीकर आठवली.
अतिअवांतरः मी करमणूकीसाठी पिच्चर पहाते. कुणाला काय पुरस्कार मिळाला याच्याशी माझं एक सामान्य प्रेक्षक म्हणून काय घेणं-देणं? माझ्या कामामधे मी तीर मारले असं मला आणि माझ्या कलिग्जना वाटतं, तसं इतरांना थोडीच वाटतं? मग मी तरी कशाला पर्वा करू कोणी तीर मारला, कोणी नाही मारला!
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
27 Feb 2009 - 9:54 am | समीरसूर
मधे गाणी आली असती, एखादा 'इमोसनल अत्याचार' आई, बहीण टाईप सीन आला असता, गेलाबाजार एखादी अतर्क्य मारामारी आणि लगेचच ड्रीम सिक्वेन्स गाणं तर मला फारच सामान्य वाटलं असतं. शोचे निर्माते, प्रायोजक, दिग्दर्शक इत्यादी लोकं अधिक पात्रं, अधिक मसाला, अधिक खर्च, अधिक गाणी! शिवाय पिच्चर पुरेपूर तीन तास चालण्यात बरीच भर पडली असती.
हो, हे ही खरेच. :-) पण हे सगळे सामान्यपणा टाळून देखील दाखवता आले असते. काहीतरी तार्किक वाटले असते. आता चित्रपट एका झोपडपट्टीतल्या मुलाच्या अविश्वसनीय आयुष्याचा धावता आलेख वाटतो.
सलीमच्या आयुक्षात करण्यासारखं रहातंच काय? कुठेही पळाला तरी जावेदने त्याला सोडलं असतं का? बदला घेता आला ना आता त्याला, राव!
जावेदने सोडलं नसतं पण पोलीसांनी त्याला अडकवून ठेवल आहे असं दाखवता आलं असतं. तितकंच कायद्याचं महत्व पटवून देता आलं असतं. :-) चित्रपटातील सलीमचा अंत हा केवळ फिल्मी सोयीस्करपणा वाटतो. अचानक लांडग्याचे ससा झाल्यासारखे वाटते जे लोकांना बघायला आवडते.
आवडत्या गोष्टीसाठी "काय वाट्टेल ते" (पक्षी: काहीही, कैच्याकै) करणारा मुलगाच पुढे मोठा झाल्यावर लतिकेसाठी एवढे कष्ट घेतो हे मला खूपच लॉजिकल वाटतं.
थोडं वास्तवाला धरूनही त्याचं हे वेड दाखवता आलं असतं. इतक्या भयंकर थरापर्यंत जाणं पटत नाही. ते ही इतक्या लहान पोराचं??? या वयात आम्हाला अमिताभ माहित होता पण त्याच्या विषयीचं इतकं भयंकर करायला लावणारं वेड आमच्यात आधी ही नव्हतं आणि आता ही नाही! वेड घेऊन जगणारे बरेच असतात; त्यासाठी तत्वांना मुरड घालणारे पण बघितलेत पण हे जरा अतिच झालं. हॉलीवूडवाल्यांना पटविण्यासाठीचा फार्स वाटला.
मेरे कू कुच्च भी समज्या नही।
बर्याच लोकांनी या चित्रपटाला नावे ठेवली होती आणि त्यामुळे त्याच दृष्टीकोनातून हा चित्रपट बघण्याची शक्यता होती. :)
--समीर
25 Feb 2009 - 4:53 pm | भडकमकर मास्तर
मजा आली परीक्षण वाचून...
तुमची समीक्षकी भाषा आवडली...
लांबी कमी करून टोकदारपणा वाढवता आला असता//
///उत्कंठामुल्य वाढले असते ....///. चित्रपट तुकड्या-तुकड्यांनी जोडल्यावर .. कोलाजसदृष्य झाला आहे ..../// कथनामध्ये सुसुत्रता वाटत नाही...///.फोडणी देतांना संवाद अजून खटकेबाज
अवांतर : तुम्ही समीक्षणाचा कोणता क्लास तर लावला नव्हतात? :)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
27 Feb 2009 - 9:57 am | समीरसूर
क्लास वगैरे नाही लावला मी कधी, क्लास लावून नाही शिकता येत अशी भाषा. ;-) आमच्या कंपनीच्या इंट्रानेटवर अवांतर विषयाच्या भागात मी बरीच परीक्षणे लिहिली आहेत, तो अनुभव थोडा गाठीशी आहे आणि शिवाय परीक्षणे वाचण्याचाही फायदा होतो. :-)
धन्यवाद.
--समीर
25 Feb 2009 - 9:24 pm | विकास
>>पार्श्वसंगीत सामान्य आहे. 'जय हो' आणि 'रिंगा रिंगा' रहमानच्या इतर उत्कृष्ट गाण्यांपेक्षा कमी उत्कृष्ट आहेत.
रेहमानच्या संगीताची तुलना त्या कॅटॅगरीतील इतर संगीताशी झाली आहे त्याच्याच आधीच्या संगीतबद्ध गाण्यांशी नाही. कदाचीत ते आंतर्राष्ट्रीय परीक्षकांना कानाला वेगळे वाटले असावे.
तुम्हा-आम्हाला वाटणारा त्यातील तोच तोच पणा कळायला त्याची आधीची गाणी पण त्यांना ऐकावी लागतील.
तीच गोष्ट ऑस्कर मिळण्याबाबत. मुंबईतील दारीद्र्य, भिषणता वगैरे पेक्षा मला वाटते बॉलीवूडचा फिल्मीपणा त्यांना जास्त भावला असावा. कारण ते त्यातील नाविन्य होते! कालच एका अमेरिकन बाईशी बोलत होतो. ती तेच म्हणाली की स्लमडॉग आवडला कारण त्यात हॅपी एंडींग होते! ~X( 8>
25 Feb 2009 - 9:36 pm | भास्कर केन्डे
खूप लक्षपूर्वक बघितला आहे सिनेमा तुम्ही! एका ऑस्कर विजेत्या चित्रपटाची एवढी चिरफाड होऊ शकते त्यातूनच त्या ऑस्करचे मोठेपण कळून चुकते. :)
मला सुद्धा 'जॉनी गद्दार', 'वेन्सडे' असे चित्रपट स्लमडॉगपेक्षा जास्त चांगले वाटले.
आपला,
(सहमत) भास्कर
25 Feb 2009 - 9:48 pm | शिवापा
'वेन्सडे' झकासच होता!
25 Feb 2009 - 9:48 pm | प्राजु
मी अजूनही स्लम डॉग पाहिला नाहीये. आणि खरंतर, इथल्या भारतीय लोकांना आलेले अनुभव ऐकून तर.. तो बघण्याची इच्छाही होत नाहीये. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Feb 2009 - 10:00 pm | योगी९००
खुप छान परिक्षण केले आहे.
आपले बरेचसे विचार जुळले आहेत. मला ही हा चित्रपट काही खास वाटला नाही. सुरूवातीचे काही प्रसंग तर किळसवाणेच..काही काही प्रश्नांची तर ओढून ताणून उत्तरे आणली आहेत असे वाटते. आंधळ्या भिकार्याला (बिचारा..फार छान अभिनय) अमेरिकन १०० डॉलरवर बेंन्जामिन फ्रॅकलिनचा फोटो असतो हे माहित असणे म्हणजे अतीच वाटते.
अभिनयाच्या बाबतीत अनिल कपूरने बाजी मारलेली आहे. शूटींग सुरु होण्या आधीचा धुसफुसत असलेला अनिल आणि लाईट्स ऑनचा आदेश आल्यानंतरचा हसतमुख अनिल हे अक्षरशः पाच ते सात सेकंदात बदलणारे भाव त्याने खूप सुंदर दाखवले आहेत.
यात नवल ते काय..? तो अभिनेता असल्याने त्याच्याकडून हि अपेक्षा ठेवायचीच..काही वेगळे वाटले नाही.
पार्श्वसंगीत सामान्य आहे. 'जय हो' आणि 'रिंगा रिंगा' रहमानच्या इतर उत्कृष्ट गाण्यांपेक्षा कमी उत्कृष्ट आहेत.
पटलं ..पण येथे रहमानच्या इतर गाण्याबरोबर तुलना करण्याऐवजी इतर चित्रपटांच्या संगीताबरोबर तुलना केली असावी. बाकी काही का होईना ..ए.आर. रहमान ऑस्कर मिळवण्याच्या योग्यतेचा होता आणि त्याला ते मिळाले आहे.निम्मित्त या चित्रपटाचे का होईना...
हाच चित्रपट जर कोणा भारतीय व्यक्तीने बनवला असता.. (चोप्रा, भांडारकर, वर्मा वगैरे)..तर त्याला ऑस्कर सोडा..साधा पुरस्कारही मिळाला नसता. तेवढ्याही लायकीचा हा चित्रपट मला वाटला नाही.
खादाडमाऊ
25 Feb 2009 - 10:37 pm | अनामिक
१. वेन्स्डे, आमीर किंवा तत्सम झकास होते/आहेत अगदी मान्य, पण असे चित्रपट ऑस्करला पाठवण्या ऐवजी आपण 'पहेली', 'एकलव्य' असे चित्रपट पाठवतो.
२. हा चित्रपट आपल्यातल्या कुणी (चोप्रा, भांडारकर, वर्मा वगैरे) बनवला असता तर, त्यात अजून ४-५ गाणी आली असती हे पहिले, मुंबईतली झोपडपट्टी अगदी स्वच्छं दिसली असती हे दुसरे, सगळ्या कलाकारांसाठी डिजायनर कपडे आले असते - अगदी त्या अंधळ्या भिकार्यासहीत -हे तिसरे (आताच्या बिल्लु मधे नाही का लारा दत्ता झोपडीत राहुनसुद्धा फुल्ल मेकप करते), चित्रपटाच्या नायक/नायिकेसाठी जास्तं डायलॉग आले असते हे चौथे... मग कसा हो अवॉर्ड मिळणार? (हे फक्त या चित्रपटा संबंधी)
मला आपले चित्रपट ऑस्करसाठी पात्र नाहीत असं अजिबात म्हणायचं नाही... खरंतर ऑस्कर हे इकडच्या (म्हणजे गोर्या लोकांच्या) चित्रपटांसाठी मिळणारे पुरस्कार आहेत तेव्हा आपल्याला हे पुरस्कार मिळावेत ही अपेक्षा का करायची? पण जर का आपल्या कलाकारांना हा पुरस्कार मिळत असेल, जागतिक प्रसिद्धी मिळत असेल तर काय वाईट?
हॉलीवुडमधल्या दिग्दर्शकाने बॉलीवुड मसाला घालुन केलेला चित्रपट... त्यात गोर्या लोकांना नाविण्य वाटंल त्याला आपण काय करणार? आपल्या मते जरी हा चित्रपट अगदी साधारण असला तरी या लोकांना त्यात काहीतरी नवं वाटलं असावं. आणि आपल्या गरिबी /झोपडपट्ट्यांच जे भांडवल केलंय असं आपण म्हणतोय, ती गरीबी आणि त्या झोपडपट्ट्या आपण नाकरणार आहोत का? थोडं बारकाईनं बघीतलं तर लक्षात येईल की चित्रपटात सलीम मोठा झाल्यावर जमाल आणि सलीम एका कंस्ट्रक्शन बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावर भेटतात, तेव्हा सलीम जमालला म्हणतो की "हे जे नवीन कंस्ट्रक्शन बघतोयेस ना ती आपली झोपडपट्टी होती. आता पुर्वीच्या बॉम्बेचं मुंबईत रुपांतर झालंय, सगळं झपाट्यानं बदलतय" हे वाक्य आपल्या देशाची होत असलेली प्रगती दाखवत नाही का? असो, ज्यांना आवडायचा त्यांना चित्रपट आवडला आहे. तुम्हाला नाही आवडला तर सोडुन द्या!
अवांतरः आपल्याकडच्या सत्या, कंपनी, शुटआउट ऍट लोखंडवाला मधूनही इथल्या गुन्हेगारी विश्वाचं प्रदर्शन आपण केलंच की....त्या चित्रपटांना आपण डोक्यावर घेतो.
अनामिक
27 Feb 2009 - 10:07 am | समीरसूर
ज्या इमारतींविषयी बोललं गेलेलं आहे ही प्रगती नसून त्याला थोडा नकारात्मक आणि उपहासात्मक अर्थ आहे असं मला वाटतं. म्हणजे झोपड्या गेल्या, श्रीमंत अधिक गबर झाले परंतु तुझ्या-माझ्यासारख्यांच्या आयुष्याची व्हायची ती राखरांगोळी झालेलीच आहे आणि ती अशीच होत राहणार आहे असा त्याचा चिमटा काढणारा अर्थ होता असं मला वाटते. आपल्या इथे नवीन झोपडपट्टी व्हायला वेळही लागत नाही आणि शासनाची परवानगी ही लागत नाही. त्या वाक्यातून पैशाचं (कुठल्याही मार्गाने कमाविलेला) महत्व पटवण्याचा सलीमचा हेतू आहे असं दिसतं नाहीतर सलीम सारखा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस, डॉनसोबत काम करणारा माणून भारताच्या प्रगतीविषयी बोलेल हे जरा पचायला जड जातं.
आम्ही सोडूनच दिला आहे हो चित्रपट, कारण तो सोडण्याच्याच लायकीचा होता. भारतात ऑस्कर आलेत ही आनंदाची बाब पण ऑस्कर मिळवणारे चित्रपट यांच्या दर्जाविषयी जरा शंका वाटते म्हणून हा लेखप्रपंच. मागे मी एकदा ऑस्करविजेता कॅथरीन झिटा-जोन्सचा 'शिकागो' हा चित्रपट पाहिला होता. भयंकर रटाळ चित्रपट असेच त्याचे वर्णन करता येईल. :-)
--समीर
3 Mar 2009 - 12:07 am | अनामिक
त्या वाक्यातून पैशाचं (कुठल्याही मार्गाने कमाविलेला) महत्व पटवण्याचा सलीमचा हेतू आहे असं दिसतं नाहीतर सलीम सारखा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस, डॉनसोबत काम करणारा माणून भारताच्या प्रगतीविषयी बोलेल हे जरा पचायला जड जातं.
तो प्रगतीविषयी बोलतोय असं मलाही वाटलं नाही, पण झोपडपट्ट्या गेल्या आणि त्याजागी उंच इमारती बनल्या त्यात आपली होणारी प्रगती दिसणं इंप्लिसीट (मराठी शब्द?) आहे असं मला म्हणायचं होतं
ऑस्कर मिळवणारे चित्रपट यांच्या दर्जाविषयी जरा शंका वाटते म्हणून हा लेखप्रपंच.
ऑस्कर मिळणारे सगळेच चित्रपट आपल्याया आवडतील असं नाहीच... तश्याही आपल्या आणि गोर्या लोकांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. त्यांची ह्युमरची डेफिनिशन आपल्या पेक्षा बरीच वेगळी आहे. उदा. द्यायचं तर एक विनोद सांगितल्या जातो इकडे ... तुझ्या म्हातार्या आजीला यंदा वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार आहेस?... तर दुसरा म्हणतो, 'कॉफिन'.... या विनोदावर इकडचे लोक भरभरून हसतील... आणि आपल्याल्या याच वक्तव्यावर चिड येईल. असो, चित्रपटाबद्दल बोलायचे तर, इकडच्या लोकांना त्यात असणारा वेगळेपणा भावला असणार असे वाटते (वेगळेपणा त्यांच्या दृष्टीने). आपल्या साठी असे चित्रपट बघणे नवे नाही. जेव्हा सत्या/वास्तव आले तेव्हा उत्तम प्रतिसाद मिळाला लोकांकडून, पण मग त्याच प्रकारचे चित्रपट आले/येत आहेत तर लोक त्याकडे बघतही नाहीत. हॉलीवुडमधेले इथल्याच वातावरणातले चित्रपट बघून स्लम्डॉग बघीतल्यावर लोकांना ते वेगळेपण आवडले असेल असे वाटते. वेगळ्या कलचरमधला , आणि अगदी त्यांच्याच भाषेतला (इंग्रजी) हा चित्रपट बघायला त्यांना आवडले असणार. चित्रपट वेगवान आहे, कथा छान उलगडत जाते, (आपल्यासाठी नेहमीच्याच पाहणीतला असल्यासारखा असुनही) कुठेच कंटाळवाणा वाटत नाही, रेहमानचं म्युझीक (उत्कृष्ठ नसलं तरी) अगदी प्रभावी आहे... ह्या सगळ्या जमेच्या बाजू असल्याने ऑस्कर मिळालं असावं असे वाटते! चित्रपट उत्कृष्ठं आहे की नाही ते माहीत नाही, कारण अजून मी स्लमडॉगच्या स्पर्धेतला एकही चित्रपट पाहीला नाही (पण क्युरियस केस ऑफ बेन्जामिन बटन यापेक्षा चांगला असावा असे वाटते).
तुम्ही शॉशँक रिडेम्प्शन पाहीला का? त्यातला नायकही शेवटी हव्या असलेल्या स्वातंत्र्यासाठी सुवर मधून पोहत जातो... ते ही किळसवाणेच आहे... !!
सबटायटल्स वाचत चित्रपट बघायला किती कंटाळवाणे असते ते आपल्याला माहीत असेलच. लगान हा चित्रपट कितीही छान असला तरी सबटायटल्स वाचत बघणे थोडे त्रासदायकंच, आणि त्यातही इंग्रजीत ट्रान्सलेट केलेला असल्याने जी खेडेगावातली भाषा आहे तीचा अपेक्षीत असा परिणाम होतच नाही.. नाही का?
अनामिक
25 Feb 2009 - 10:46 pm | प्रसाद लेले
(|: (|:
27 Feb 2009 - 10:19 am | समीरसूर
नावात काय आहे, त्याचप्रमाणे विषयात काय आहे?? आपल्या जांभया बघून कळलं की आपल्यालाही चित्रपट आवडलेला नाही. :-)
--समीर
25 Feb 2009 - 11:11 pm | वेताळ
मला मस्त टाईमपास वाटला.तुम्ही लोक इतका डोक्याचा भुगा का करता?चित्रपट मनोरंजनासाठी बनवतात असे मला वाटते.बाकी ह्या चित्रपटाने भारताची परदेशात बदनामी केली हे देखिल मला मान्य नाही. अरे आपल्या इथल्या झोपडपट्टीत असेच जीवन आहे. त्यात लाजण्यासारखे काय आहे?
वेताळ
27 Feb 2009 - 10:17 am | समीरसूर
इतके भयंकर जीवन हे भारताचे वास्तव असले तरी त्याला खूप उघडं-नागडं करून दाखवलं आहे. जगातल्या लोकांचा आणि विशेष करून अमेरीकेतल्या लोकांचा असा पक्का समज होईल की भारतातले सगळे लोकं असच जगतात. आधीच गारुडी, साप आणि वाघ अशी भारताविषयीची अतर्क्य कल्पना आहे या लोकांची! :-) आता अमेरीकेत भारतीयांना त्यांचा परोक्ष स्लमडॉग म्हणून हिणवतात असे मी ऐकले आहे. आणि इतकं ओंगळवाणं जीणं अमेरीकेतल्या पण कित्येक लोकांच्या नशीबात आहेच की. माणसांच्या प्रवृत्तींबद्दल बोलायचं तर ती सगळ्या जगात सारखी असते. विकृत मनोवृत्तीची माणसें अमेरीकेत आहेत, टांझानियामध्ये आहेत आणि बेल्जियममध्ये देखील आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणतातच ना! :-)
आपल्या घरातल्या चार वाईट गोष्टी, भांडणे किंवा बाहेर सांगून बेअब्रू होईल अशा घटना आपण चारचौघात सांगतो का? किंवा कुणी सांगीतल्या तर ते सत्य आहे, त्यात काय लाजायचं म्हणून सांगणार्याची पाठ थोपटतो का? नाही. तसच थोडफार देशाविषयी आहे. थोड्या-फार प्रमाणात वाईट बाजू जगातल्या प्रत्येक देशात आहेत.
--समीर
2 Mar 2009 - 4:19 pm | मैत्र
जालावर मराठी ब्लॉग्जच्या नित्य वाचकांना ट्युलिपचा ब्लॉग व लिखाण याबद्दल काही सांगण्याची गरज नाही.
http://tulipsintwilight.blogspot.com/2009/02/blog-post.html
दारिद्र्याचं प्रदर्शन करणं या गोष्टीवर विचार करताना हा स्वानुभवातला तुमच्या आमच्या सारख्या पार्श्वभूमीत धारावीशी लिमिटेड संबंध असताना सत्याच्या सणसणीत जाणीवेतून येणारा स्थिर संयत समतोल विचार खूपच महत्त्वाचा आहे.
संपूर्ण लेखाचा सारांश देणं किंवा भूमिका मांडणं यापेक्षा त्याचा दुवा देणं जास्त श्रेयस्कर वाटलं... जरूर वाचा..
27 Feb 2009 - 7:14 am | तात्या विंचु
एकदम बेकार पिक्चर आहे. भारतातली गरीबी दाखवली की ऑस्कर मिळत..असं दिसतय
27 Feb 2009 - 9:00 am | विसोबा खेचर
समीरराव, आपण उत्तम परिक्षण केले आहे! जियो..!
तात्या.
27 Feb 2009 - 10:21 am | समीरसूर
सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल शतशः धन्यवाद! :-)
--समीर
2 Mar 2009 - 9:05 am | विकास
आज एक बॉस्टन ग्लोबमधे लेख वाचला... Learning from slums
काय पण आपल्या (आणि इतरत् ठिकाणच्या) झोपडपट्टीत राहणार्यांचे कौतुक! ते कसे "इको फ्रेंडली" आहेत, "रिसोअर्सफूल" आहेत वगैरे...
तर यातील कळस म्हणजे (आणि तो कळस आहे हे त्या लेखाच्या लेखिकेचेपण मत दिसले) ते म्हणजे प्रिन्स चार्लसचे वाक्य जसाचाअ तसा उतारा खाली देतो:
The appreciation can come from unlikely quarters: In a recent speech, Prince Charles of England, who founded an organization called the Foundation for the Built Environment, praised Dharavi (which he visited in 2003) for its "underlying, intuitive 'grammar of design' " and "the timeless quality and resilience of vernacular settlements." He predicted that "in a few years' time such communities will be perceived as best equipped to face the challenges that confront us because they have built-in resilience and genuinely durable ways of living."
चला म्हणजे आता चार्ल्ससाहेब धारावीत रहायला येणार तर... कायमचे नाही तरी किमानपक्षी फ्रान्स अथवा इतर नयनरम्य युरोपिअन ठिकाणात जाण्याऐवजी, सुट्टी धारावीत घालवणार असे दिसते...वरील वाक्य हे एकदम क्रूर थट्टा वाटले... मात्र याच लेखात सुरवातीस लंडन टाइमचे स्लमडॉग वरून एदोन शब्दात (मला पटलेले) मत दिले आहे: A Times of London columnist dubbed it "poverty porn" for inviting viewers to gawk at the squalor and violence of its setting.
तुमचे मत?
2 Mar 2009 - 4:56 pm | विसोबा खेचर
अरे विकास, अमेरिका हा एक नंबरचा भिकारचोट देश आहे!
आपला,
(अमेरिकाद्वेष्टा) तात्या.
2 Mar 2009 - 5:24 pm | विकास
आपण प्रिन्स चार्ल्सच्या मुक्ताफळाबद्दल काहीच बोलला नाहीत. तो तर अमेरिकेत राहात नाही ना :-)
2 Mar 2009 - 11:18 pm | मिहिर
परिक्षण छान झाले आहे. पिक्चर एकदम भंकस आहे. मला त्या डॅनी बोयलचा रागच आला.
ऑस्कर मिळाल्यावर सकाळमध्ये अग्रलेखाच्या पानावर लेख आला होता. प्रत्यक्षात Q and A मध्ये झोपडपट्टीचा फारसा संबंध नाही. यात कार्यक्रमाचा सूत्रसंचालक नव्हे तर कंपनीचा वरिष्ठ अमेरिकी अधिकारी दुष्ट दाखवला आहे. उलट स्लमडॉग मध्ये उगाच झोपडपट्टीचे प्रदर्शन मांडले आहे. कादंबरीतील परदेशी पात्रे बदलून भारतीयच दुष्ट दाखवले आहेत.
पौर्वात्य देशातील कमीपणाच्या गोष्टी दाखवल्या की पाश्चिमात्य अहंकार सुखावतो. स्लमडॉग हा सरळ्सरळ नालायकपणा आहे.
4 Mar 2009 - 2:48 am | विकास
काँग्रेसचा प्रचारमंत्र... 'जय हो !'
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
ऑस्करविजेता संगीतकार ए. आर. रहमान याच्या जगभरात गाजत असलेल्या ‘ जय हो ’ गाण्याचे सर्व कायदेशीर हक्क काँग्रेस पक्षाने विकत घेतले आहेत. आगामी लोकसभा निवडणूक प्रचारात ‘ जय हो.. ’ हाच काँग्रेसचा प्रचारमंत्र असणार असून, त्यादृष्टीने हे गाणे वाजवण्यात येणार असल्याचे समजते.
स्लमडॉग मिलिनिअर या आठ ऑस्कर विजेत्या चित्रपटातील रहमानच्या या गाण्यालाही ऑस्कर पुरस्कार मिळाला. या गाण्याचे हक्क काँग्रेसने ‘ टी सिरीज ’ या म्युझिक कंपनीकडून विकत घेतले आहेत, अशी माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली. त्यामुळे प्रचारात हेच गाणे सर्वत्र वाजवण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे गाण्याचे हक्क काँग्रेसने विकत घेतल्याने इतर राजकीय पक्षांना आता ते वापरता येणार नाही, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
4 Mar 2009 - 9:06 pm | टायबेरीअस
जे आपल्याकडे नाही त्याचेच आकर्षण लोकाना.. श्रीमंताना गरीबी आणि गरीबाना श्रीमंती.. चालायचेच.. ए.आर. रहमान ला फार पुर्वीच हे अवार्ड मिळायला हवे होते.. ठीक आहे लेट मिळाले ..!
शेवटी सगळ्यामधे राजकारण आहेच..